नशा - एक चिंतन!

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in काथ्याकूट
2 Mar 2008 - 10:38 pm
गाभा: 

नशा!

आमच्या असे लक्षांत आले आहे की नशा या विषयावर मि. पा. वर बरेच लिहिले जाते. त्यातील बहुतेक लाईट, थट्टामस्करीच्या स्वरूपातील असते. काही जि़ज्ञासू लोकांनी ज्ञानसंपादनाच्या दृष्टीने विचारलेले प्रश्न असतात, तर काही अज्ञ कॉमेंन्टस ही असतात. परंतु प्रस्तुत प्रयत्न मात्र या विषयावर काही गंभीर विचार मांडण्याचा आहे.

नशा म्हणजे काय हे प्रथम निश्चित केले पाहिजे. मटेरिया मेडिकाच्या व्याख्येनुसार (मराठीत अनुवादित) जेंव्हा मेंदू व इतर मज्जासंस्था शिथील अवस्थेत असते त्या अवस्थेला नशा असे म्हणतात. लक्षात घ्या, "शांत" किंवा "आनंदी" अवस्था नव्हे, तर "शिथील" अवस्था! या अवस्थेत माणूस शांत अथवा उत्तेजित, किंवा आनंदी अथवा दु:ख्खीही असू शकतो.

जेंव्हा मादक पदार्थाचे सेवन केले जाते तेंव्हा त्या पदार्थातील मादक द्रव्य रक्तात शोषले जाते. मेंदू प्रथम शिथील अवस्थेत जातो कारण शरीरातील जास्त रक्तपुरवठा हा मेंदूला होतो. मज्जसंस्था शिथील झाल्याने हलके वाटू लागते. एरवीच्या वेदना, दु:ख्ख, चिंता सुसह्य वाटू लागतात. जेंव्हा अधिक मादक द्रव्य रक्तात जाते तेंव्हा हळूहळू मज्जासंस्थेचा स्नायूंवरचा ताबा सुटतो (पावले अडखळणे, वगैरे...). सरतेशेवटी, मादक द्रव्याचा अतिरेक झाल्यास मज्जासंस्था आपले काम तात्पुरते थांबवते, त्यालाच आपण "माणूस आउट झाला" असे म्हणतो. हा परिणाम फक्त मादक पदार्थाचे अतिरेकी सेवन केल्यावरच होतो आणि तोसुद्धा तात्पुरताच असतो.

सर्वसाधारणपणे नशा ही दारू किंवा मदिरेमुळे येते असे मानले जाते पण ते तितकेसे खरे नाही. मदिरेखेरीज इतर अनेक पदार्थ नशा आणू शकतात. मदिरा जरी द्रवपदार्थ म्हणून सेवन केली जात असली तरी इतर अनेक मादक पदार्थही द्रवात घालून सेवन केले जातात, उदा. भांग. पदार्थ सेवनाच्या इतरही पद्धती असू शकतात, उदा. तंबाखू चावून किंवा धुम्रपान करून, अफू चिलिमीतून, तपकीर आणि कोकेन नाकातून आत ओढून, हेरॉईन इंजेक्शन घेऊन वगैरे... सर्व प्रकारांचा उद्देश व परिणाम सारखाच असतो.

नशेच्या दुष्परिणामाबद्द्ल बरेच लिहिले व बोलले जाते. ते खरे नशेचे दुष्परिणाम नसून मादक पदार्थांच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम असतात. हे परिणाम मुख्यत: मेंदूवर नसून इतर अवयवांवर असतात. उदा. धूम्रपानाचा फुफ्फुसांवर तर दारुचा यकृतावर दुष्परिणाम होतो. असे दुष्परिणाम हे अती व/वा दीर्घकालीन सेवनानेच होतात. तसे परिणाम मादक पदार्थांमुळेच नव्हे तर इतरही पदार्थांमुळे होऊ शकतात. उदा. जास्त गोड पदार्थ खाल्ले की मधुमेह होउ शकतो तसेच जास्त तेलकट पदार्थ खाल्ले तर रक्तवाहिन्या अरुंद होऊन हार्टऍटॅक येऊ शकतो. आमच्या माहितीतल्या एका मादक पदार्थाचे सेवन तर सोडाच पण मांसाहारही न करणार्‍या आयुष्यभर शाकाहारी असलेल्या गृहस्थाला हार्टऍटॅक आलेला आम्हाला माहिती आहे. जास्त तिखट पदार्थ वारंवार खाल्ले तर आतड्याचे अल्सर (व मूळव्याध!) होऊ शकतात. तेंव्हा अती सर्वत्र वर्जयेत हा नियम मादक पदार्थांनाच नव्हे तर सगळ्याच पदार्थांना लागू पडतो. नशेचे खरे दुष्परिणाम म्हणाल तर नशील्या अवस्थेत जर मन एकाग्र करावी लागणारी कामे (उदा. ड्रायव्हिंग, हेवी मशीनरी चालावणे वगैरे) करायचा प्रयत्न केला तर धोका संभवू शकतो. पण सुरक्षित वातावरणाची खात्री करून माफक नशा करण्यात कसलाही गंभीर धोका नसतो.

नशा करणे हे आपल्या संस्कृतीत बसत नाही, हे पाश्चात्य फॅड आहे असाही एक हास्यास्पद मुद्दा मांडला जातो. याच्याइतकं असत्य तर काही नाही!! अगदी आर्यांच्या काळापासून भारतात नशापान होत असल्याचे दाखले आहेत. आमच्या पुरातन ग्रंथामध्येही आमचे देवादिक व ऋषीमुनी सुरापान करत असल्याचे दाखले आहेत. ज्या विवेकानंदांचा आधुनिक संत म्हणून सार्थ उल्लेख होतो ते ही तंबाखूचे सेवन करीत असल्याच्या नोंदी आहेत. हे सेवन त्यांच्या परमेश्वरप्राप्तीच्या आड येऊ शकले नाही. आजही भारतीय बहुजनसमाजामध्ये मदिरा, भांग यांचे सेवन मुक्त पद्धतीने केले जाते. तेंव्हा हा प्रतिबंध (टाबू) फक्त आपले काहीतरी वेगळे कृत्रिम वैशिष्ट्य निर्माण करून पोट भरणारर्‍या पुरोहितवर्गाने निर्माण केला आहे असे माझे मत आहे.

आणि गंमत म्हणजे हे लोक सुद्धा स्वतःच्या नकळत नशा करीत असतात ज्याची त्यांना जाणीवही नसते. उदा. चहात टॅनिन व कॉफीत कॅफिन नांवाचे मादक द्रव्य असते. कोकाकोल्यात व इतर सॉफ्ट ड्रिंक्समध्येही कॅफिन असते. श्रीखंडाने येणारी सुस्ती त्यातील जायफळामध्ये असलेल्या मादक द्रव्यामुळे येते. इराण्याच्या चहात खसखस उकळ्वलेली असते, ती खसखस व अफू ही एकाच झाडापासून तयार होतात. "शक्तिवर्धक" द्राक्षासवात अल्कोहोल असते. पण अज्ञानामुळे हे सर्व दुर्लक्षिले जाते. तेंव्हा पुढ्च्या वेळेस मदिराभक्तांना नांवे ठेवाल तेंव्हा आधी जरा विचार करा की आपण खरोखरच नशामुक्त आहोत का!!! मी इथे फक्त पाच-सहा उदाहरणेच दिली आहेत पण ही यादी खूप मोठी आहे, तुमच्या फार्मसी शिकणार्‍या स्नेह्यांना विचारा...मदिराभक्तांबद्दल तर असे म्हणता येईल की ते आपली आवड प्रगटपणे मान्य करण्याचा प्रामाणिकपणा दर्शवतात!

आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे नशा ही सर्वस्वी वाईट गोष्ट आहे हा समज चुकीचा आहे. कधीकधी नशा हे वरदान ठरते! देव करो आणि वेळ न येवो पण जर कधी तुमचे पोट कापून ऑप्रेशन करायची वेळ आली तर ते ऍनेस्थेशिया दिल्याशिवाय करायला तुम्ही तयार व्हाल का? तेंव्हा तुम्हाला दिली जाणारी मादक द्रव्ये तर दारू सोडाच पण कोकेन व हेरॉईनच्या तोंडात मारणारी असतात. परंतु त्या वेळेस ती वरदानच ठरतात. अपघातात खूप जखमी झालेल्या माणसाला बरे करतांना त्याच्या वेदना सुसह्य करण्यासाठी मॉर्फिनसारखी अतिशय मादक द्रव्ये दिली जातात ति नशा चूक की बरोबर? कॅन्सर झालेल्या रोग्यांना अखेरच्या अवस्थेत निदान मॄत्यूपूर्वी त्यांच्या वेदना विसरता याव्यात व शांतपणे मॄत्यू यावा यासाठी मॉर्फिनची इंजेक्शने दिली जातात ती नशा चूक की बरोबर? अगदी साधे उदाहरण द्यायचे तर आजची एकतरी शहरी महिला एपिड्यूरल किंवा तत्सम इंजेक्शन घेतल्याशिवाय बाळंतपण करून घेईल काय?

सारांश काय की नशेत चांगले किंवा वाईट असे काही नाही, ती एक अवस्था आहे. मात्र ही अवस्था एखाद्या बाह्य पदार्थाच्या सेवनानेच प्राप्त होऊ शकते. मानवी शरीर आपल्याआपण ही अवस्था प्राप्त करून घेऊ शकत नाही. जीवनातील इतर सर्व गोष्टीप्रमाणेच तिचा अतिरेक वाईट असला तरी तिच्या माफक अंगिकारामध्ये काहीही गैर, असंस्कृत वा अपायकारक नाही.

तळटीपः एका रसायनशास्त्राच्या अभ्यासकाच्या व भाकडतथांवर विश्वास न ठेवणार्‍या संशोधकाच्या नजरेतून वरील विचार मी मांडले आहेत. त्यांत काही चुका असल्यास माझ्या नजरेस आणाव्या, मी सुधारणा करीन. आपले विचारही मोकळेपणाने मांडावेत. मात्र हा एक गंभीर चर्चेचा प्रयत्न असल्याने ते वातावरण कायम ठेवावे ही विनंती. मला जाणीव आहे की कधीकधी वात्रटपणा करायचा मोह (मलाही) अनावर होतो. त्यासाठी कृपया नवीन धागा सुरु करावा वा मला वैयक्तिक विरोप पाठ्वावेत. मी निश्चित उत्तरे पाठवीन.

आपला,

पिवळा डांबिस

प्रतिक्रिया

पिवळा डांबिस's picture

2 Mar 2008 - 10:56 pm | पिवळा डांबिस

मूळ लेखात दुरुस्ती करता येण्याची सोय नसल्याने ही सूचना...

भडकमकर मास्तर's picture

3 Mar 2008 - 1:53 am | भडकमकर मास्तर

१. अतिनशेचेच दुष्परिणाम होतात्...माफक प्रमाणात योग्य जागी काय हरकत? .... ई.ई. मुद्दे पटले... दारू पिऊन वाहन चालवणे अत्यंत घातक....( न पिणारा चालक अथवा मित्र चालक म्हणून बरोबर ठेवण्याचे नशीब सर्वांकडे नसते...तरी हे प्रयत्नपूर्वक पाळले पाहिजे).......
..........
२. लोकल ऍनेस्थेशियाची तुलना नशेशी करणे , ( तुमचे एपिड्यूरल चे उदाहरण ) याला असहमत.... जनरल ऍनेस्थेशियाची तुलना एक वेळ ठीक आहे.....
३. हे सेवन त्यांच्या परमेश्वरप्राप्तीच्या आड येऊ शकले नाही. कदाचित मदतच केली असेल... (ह. घ्या)

४. मात्र ही अवस्था एखाद्या बाह्य पदार्थाच्या सेवनानेच प्राप्त होऊ शकते. .... अर्धवट असहमती....मी फार तज्ञ नाही यातला पण माझा स्वतःचा अनुभव आहे की एखाद्या उत्तम इन्स्ट्रक्टरने मार्गदर्शन करत केलेले रिलॅक्सेशन तंत्र / शवासन आणि उत्तम दर्जाची दारू पिऊन आलेली नशा यामध्ये मेंदूची असणारी शांत, शिथील आणि उत्साही अवस्था यात मला तरी साम्य वाटले होते..... उत्तम ध्यानधारणा करू शकणारे लोक मनशक्तीने त्या मेंदूच्या अवस्थेपर्यंत पोचू शकत असावेत.....
....स्वतः डॉक्टर असणार्‍या एका हिप्नॉटिजम इन्स्ट्रक्टरने मला सांगितल्याचे स्मरते की त्याचे काही विद्यार्थी डेंटिस्ट कडे दात काढण्यासाठी लोकल ऍनेस्थेशियाचे इंजेक्षन घेत नाहीत, स्वसंमोहनाच्या सरावाने त्यांना हे जमते....त्या काळात ही गोष्ट आम्ही अविश्वसनीय / फेकाफेकी या सदरात टाकली होती...( आम्ही स्वतः दाताचे डॉक्टर आहोत, एकदा प्रात्यक्षिक पाहिले आणि विश्वास बसला, अर्थात हे रूटीनली सार्‍यांना शक्य नाही हे ही खरेच)__________________________

पुण्यात नारायणपेठेत पत्र्या मारुतीजवळ वैद्य शेंडेशास्त्रींचा दवाखाना आहे.
रुग्णाला एका विशिष्ठ आसनात बसवून (शवासन नाही) ते दुखणारी दाढसुध्दा अनस्थेशिया न देता काढतात. मध्यंतरी पुणे विद्यापीठात झालेल्या जागतिक आयुर्वेद परिषदेत त्यांनी ह्याचे प्रात्यक्षिक दाखविले होते असे कळते.

तेव्हा शिथिल अवस्था ही फक्त मादक पदार्थांच्या सेवनाने येते असे नाही तर योगातल्या काही प्रकारच्या आसनांनीही येते.

चतुरंग

भडकमकर मास्तर's picture

5 Mar 2008 - 12:42 am | भडकमकर मास्तर

अजून तिथे कोणी प्रॆक्टिस करतात काय? मी त्याबद्दल ऐकले आहे, की एक विशिष्ट नस दाबून वगैरे लोकल आनेस्थेशिया (सारखे कही तरी !) देतात किंवा घडवतात असे म्हटले पाहिजे...माझ्या काही पेशंट कडून ऐकली होती गोष्ट...
...ते इथले दाढे डॊक्टर कुठे गेले? त्यांना अधिक डीटेल्स ठाउक असणार..असो हे जरा विषयांतर होतेय...

व्यंकट's picture

3 Mar 2008 - 3:58 am | व्यंकट

सारांश काय की नशेत चांगले किंवा वाईट असे काही नाही, ती एक अवस्था आहे. मात्र ही अवस्था एखाद्या बाह्य पदार्थाच्या सेवनानेच प्राप्त होऊ शकते. मानवी शरीर आपल्याआपण ही अवस्था प्राप्त करून घेऊ शकत नाही. जीवनातील इतर सर्व गोष्टीप्रमाणेच तिचा अतिरेक वाईट असला तरी तिच्या माफक अंगिकारामध्ये काहीही गैर, असंस्कृत वा अपायकारक नाही.

अधोरेखीत सांराशांशी असहमत. दारू प्या काही वाईट नाही असा थोडा सुर वाटतो आहे त्यामुळे लेख जरा एकीकडे झुकला आहे. इतर चिंतन ठीक वाटले.

सर्किट's picture

3 Mar 2008 - 7:03 am | सर्किट (not verified)

आमचे दक्षिणेतले शेजारी पिवळे डांबिसराव ह्यांच्या लेखाला प्रतिसाद देण्याची संधी आम्हाला मिळते आहे, ह्याबद्दल आम्ही मिसळपावाशी कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. (हल्ली तशी फ्याशन आहे, म्हणे.)

नशा हा विषय आमच्या आवडीचा आहे.

मिसळपावावर लिहिण्याची देखील नशा काही व्यक्तींना आहे असे समजते.

ही नशा सर्वात घातक !

ह्यापेक्षा दारू प्या असा सल्ला आम्ही देऊ इच्छितो !

(आम्हीही एकेकाळी विविध संकेतस्थळांवर वावरत होतो. तेथे आपण लिहिणे आणि कुणी वाचले आहे की नाही ते सतत पाहत राहणे ही नशा जबर्दस्त आहे. इतर नशांशीही आम्ही परिचित आहोत, त्यापेक्षाही ही लिहिण्याची नशा अधिक जोमाची आहे. त्यापासून सावध असावे. त्यापेक्षा मस्त दारू प्यावी. ती नशा कमी ठरते.)

- सर्किट

सृष्टीलावण्या's picture

16 Mar 2008 - 8:44 am | सृष्टीलावण्या

@मिसळपावावर लिहिण्याची देखील नशा काही व्यक्तींना आहे असे समजते. ही नशा सर्वात घातक ! ह्यापेक्षा दारू प्या असा सल्ला आम्ही देऊ इच्छितो !

आज सहज मधुमतिचे गाणे आठवले त्यात जॉनी लिव्हर म्हणतो :

किसी को सुट, बुट, कोट का नशा है,
किसी को हरे हरे नोट का नशा है,
हम जो थोडी सी पी के जरा झुमे,
हाय रे सबने देखा,
जंगल मे मोर नाचा किसी ने ना देखा,
हम जो थोडी सी पी के जरा झुमे, हाय रे सबने देखा...

पण ही जी थोडी सी आहे ती कधी जास्त होते सांगता येत नाही. एकच प्याला चे अनेक प्याले होतात. दारुचे व्यसन लागलेल्या अनेक कलाकारांचेच पहा ना, एकेकाळी कोट्यधीश असलेली ही मंडळी मरताना विपन्नावस्थेत, गलितगात्र होऊन, एकाकी (पैशासाठी जमलेली भुते नाहीशी झालेली असतात) मरतात.

मी तर म्हणेन, माणसाने दारु पिणे वाईट नाही पण दारुने माणसाला पिणे नक्कीच वाईट.

कळावें,

केवळ बाटलीबंद खनिज पाण्याने (Mineral Water ने) सुद्धा तोल जाऊ शकणारी,

सृष्टीलावण्या.

>
>
सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

विसोबा खेचर's picture

16 Mar 2008 - 10:49 am | विसोबा खेचर

मी तर म्हणेन, माणसाने दारु पिणे वाईट नाही पण दारुने माणसाला पिणे नक्कीच वाईट.

अगदी सहमत आहे!

आपला,
(दारूला पिणारा!) तात्या.

--
When I read about the evils of drinking, I gave up reading! :)

सृष्टीलावण्या's picture

16 Mar 2008 - 11:18 am | सृष्टीलावण्या

चू.भु.द्या.घ्या.

वरच्या गाण्यातील अभिनेता जॉनी लिव्हर नसून जॉनी वॉकर आहे ज्याने आयुष्यात कधी ही दारुच्या थेंबाला ही स्पर्श केला नाही मात्र तो बेवड्या असण्याचा अभिनय हुबेहुब करायचा.

त्याच्या अभिनयकौशल्याला मुजरा.
>
>
सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

बेसनलाडू's picture

3 Mar 2008 - 8:25 am | बेसनलाडू

विवेचन, दृष्टिकोन आणि माहिती आवडली.
(वाचक)बेसनलाडू
अती सर्वत्र वर्जयेत हा नियम मादक पदार्थांनाच नव्हे तर सगळ्याच पदार्थांना लागू पडतो
आणि विशेषतः 'नशा'बाज, काही विशिष्ट संकेतस्थळांवरील विशिष्ट प्रकारच्या आंतरजालीय लेखनालाही? ;)
(सूचक)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

3 Mar 2008 - 8:36 am | विसोबा खेचर

डांबिसा,

अतिशय सुंदर लेख! मनापासून आवडला....

मी तर म्हणेन की एक वेळ दारुची नशा परवडली परंतु अध्यात्माची नशा तर फारच भयंकर!

आम्ही असे काही आध्यात्मिक नशाबाज पाहिले आहेत! असो...

तात्या.

धमाल मुलगा's picture

3 Mar 2008 - 12:02 pm | धमाल मुलगा

वा डा॑बिसकाका,
आम्हा सर्व मे॑दूच्या शैथिल्याचा आन॑द घेणार्‍या आणि स॑भाविता॑कडून नशेबाज म्हणून हिणवले जाणार्‍या॑चे मसिहा आहात आपण !
प्रणाम !

ह्या विषयावर कि॑बहुना ह्या विषयाच्या बाजूने मत॑ मा॑डणारा हा एकमेव लेख असावा (निदान भारतीय). एरवी सगळे नशेच्या नावान॑ बोट॑ मोडायला सर्वात पुढे !

आपली मत॑ त॑तोत॑त पटली.

बाकी तात्याबा,
मी तर म्हणेन की एक वेळ दारुची नशा परवडली परंतु अध्यात्माची नशा तर फारच भयंकर!
सहमत, ह्याबरोबर मी म्हणेन, "स्टेजवरच्या पडद्याच्या सळसळीची, तिथल्या धूपाच्या वासाची, होणार्‍या तिन्ही घ॑टा॑ची आणि टाळ्या॑च्या कडकडाटाची नशा तर जीवघेणीच! "

अध्यात्माची नशा तर फारच भयंकर!
१००टक्के खरे....आणि या नशे चे स्वरूप सध्या फारच सोज्वळ आहे असे दाखवतात.
शुद्ध मराठीत सांगायचे तर "मी नाही त्यातली अन कडी लाव आतली" असे आहे..बाकी नशा निदान "बदनाम" तरी आहेत
त्या व्यक्तिगत आहेत......अध्यात्माची नशा हा एक सार्वत्रीक रोग आहे....
सगळे टी व्ही चॅनेल रोज सकाळी याचा रतीब घालत असतात.

एक's picture

4 Mar 2008 - 12:07 am | एक

डांबीस,

मी असं वाचल्याचं आठवत आहे कि नशेसाठी काही लोक खाली दिलेले मार्गपण वापरतात.

त्यात कितपत तथ्य आहे?

१. आयोडेक्स सँडविच.
२. पाल मारून, जाळून त्याचा धूर ओढ्णे.
३. कमी विषारी नागाकडून जिभेला चावून घेणे (धामण?)

हे जर खरं असेल तर या प्रकारातून नशा का येते?

बेसनलाडू's picture

4 Mar 2008 - 12:16 am | बेसनलाडू

बाकीचे माहीत नाही
(माहीतगार)बेसनलाडू

प्राजु's picture

4 Mar 2008 - 12:44 am | प्राजु

लेख आवडला. प्रत्येकाला कसलीतरि नशा असतेच.
पण अती सर्वत्र वर्जयेत हा नियम मादक पदार्थांनाच नव्हे तर सगळ्याच पदार्थांना लागू पडतो.. हे महत्वाचे.

आईने पुरणपोळीत घातलेल्या जायफळामुळे परिक्षेच्या काळात अभ्यास करताना झोप आलेली आठवते..

- (सर्वव्यापी)प्राजु

चतुरंग's picture

4 Mar 2008 - 4:13 am | चतुरंग

काही मुद्द्यांबाबत असहमत -
>>>जेंव्हा मेंदू व इतर मज्जासंस्था शिथील अवस्थेत असते त्या अवस्थेला नशा असे म्हणतात
ही व्यख्या फारच तोकडी आहे - प्राणायामाने, शवासनाने सुध्दा मेंदू आणि मज्जसंस्थेला एकप्रकारची शिथिलता येते पण त्यातून बाहेर आल्यावर ती रिजुविनेटिंग (पुनुरुत्साहित?) करणारी असते - हँगओव्हर देणारी नाही.

>>>...त्यालाच आपण "माणूस आउट झाला" असे म्हणतो. हा परिणाम फक्त मादक पदार्थाचे अतिरेकी सेवन केल्यावरच होतो आणि तोसुद्धा तात्पुरताच असतो.
सुरुवातीला तात्पुरता वाटणारा परिणाम हा काही काळानंतर बर्‍याच अंशी कायमचा दिसू लागतो. नशेच्या प्रकार आणि प्रमाणावरती होणारे परिणाम हे किती वेगाने कायम स्वरुपात बदलतात हे ठरते.

>>>>हे परिणाम मुख्यत: मेंदूवर नसून इतर अवयवांवर असतात.
मेंदूवर परिणाम होतोच. तो टाळता येत नाही. नशेने मेंदूत रासायनिक बदल घडतातच. किंबहुना प्रथम तिथेच परिणाम होतो आणि मग अतिरेकी नशा असेल तर इतर अवयवही एकेक करुन कोलमडू शकतात.

>>>>सारांश काय की नशेत चांगले किंवा वाईट असे काही नाही, ती एक अवस्था आहे. मात्र ही अवस्था एखाद्या बाह्य पदार्थाच्या सेवनानेच प्राप्त होऊ शकते. मानवी शरीर आपल्याआपण ही अवस्था प्राप्त करून घेऊ शकत नाही.
नशा ही वाईट आणि चांगली अशी दोन्ही असते. आणि त्यासाठी मादक पदार्थाचे सेवन करावेच लागते असेही नाही. एखाद्या चांगल्या गोष्टीचा पराकोटीचा ध्यास हा नशेत रुपांतरित होतो आणि त्यापुढे अचाट शारीरिक चमत्कारही साध्य होतात की जे सर्वसामान्यपणे केले जाणे अवघड असते. (उदा. बाजीप्रभूने खिंड लढवणे आणि एकहाती अनेक हबशांना रोखून धरणे - शिवरायांना काही केल्या धोका पोहचू नये ह्या टोकाच्या स्वामिभक्तीतून आलेल्या नशेने केलेला तो चमत्कार आहे!) नशा का करावीशी वाटते ह्यातच ती चांगली की वाईट ह्याचे उत्तर आहे असे मला वाटते.

असो. एकूण लेखाचे प्रयोजन हे चिंतनापेक्षा "नशा करणे हे वाईट नाही फक्त अतिरेक टाळावा, नशा करणार्‍यांना वाईट म्हणणे कसे चुकीचे आहे" असा दिसतो.
अर्थातच तुम्ही नशाबाजांची नशीली बाजू मांडली आहे आणि त्यात काही चूक नाही!
विवेकानंदांचे उदाहरण हे हटकून दिले जाते (हे याआधी अशाच प्रकारच्या चर्चेत ऐकण्यात आले आहे आणि काही ठिकाणी माझ्या वाचनातही) कारण त्यायोगे नशा ह्या प्रकाराला एक प्रकारचे वलय किंवा प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न असतो असे मला वाटते. हे उदाहरण मला पटत अशासाठी नाही की केवळ तंबाखू खाणे ह्याच गोष्टीवर भर देऊन विवेकानंदांनीसुध्दा ती खाल्ली मग आम्ही का नको? असा तो युक्तिवाद वाटतो. (तसेच आणखी एक उदा. लो.टिळकांचे सुपारीचे व्यसन...)
त्याखेरीज त्यांच्या बाकीच्या अध्यात्मिक उंचीकडे सोयिस्कर दुर्लक्ष होण्याची दाट शक्यता असते.
ज्यांना नशा करायची आहे त्यांनी ती स्वतःशी प्रामाणिक राहून करावी त्यासाठी इतर कोणाची उदाहरणे देऊ नयेत असे माझे मत आहे. तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल अपराधी भाव मनात असतील तर अशी उदाहरणे दिली जातात कारण मग त्यामुळे तुमच्या मनातली बोच काही अंशी तरी कमी व्हायला मदत होते.

मी स्वतः दारू घेत नाही. मी कोणत्याही गेट्-टुगेदरला गेलो, खास करुन सगळेच भारतीय असलेल्या, की हमखास जवळजवळ सगळेच घेणारे असतात. मला आग्रह होतो. मी नाकारतो. फळांचे रस वगैरे घेणारा मी एकटाच निघतो. दारु पिणार्‍यांना मी कोणताही उपदेश करत नाही, त्यांना घ्या-घेऊ नका असेही सांगत नाही पण तरीही थोड्या वेळाने दारू पिणे ह्यात गैर कसे काही नाही, आम्ही थोडीच घेतो, आम्ही काय बेवडे वाटतो काय? आमचा कंट्रोल कसा जात नाही... इ. गप्पा सुरु होतात. (मग हळूहळू कंट्रोल कसा जातो हेही समजते;)). मला काहीही करुन त्यांच्या कळपात खेचण्याचा आग्रह होतोच. असे का व्हावे? हा सर्व प्रकार मला हास्यास्पद वाटतो. तुम्ही घेत असाल तर घ्या, त्यात नाकारण्यासारखे किंवा समर्थन करण्यासारखे दोन्हीही नाही. आणि तुमच्या मनात जर अपराधी भाव असला तर तो तसा का आहे ह्याचा शोध तुम्हालाच घ्यायचा आहे, न पिणार्‍यांना प्यायला लावून तो लागणार नाही, असे माझे मत असते! आणि ह्यावरुन बराच वाद-विवाद होतो.

तरीही एकूण अशा प्रकारच्या मुक्त चर्चेचे मी स्वागतच करतो कारण त्यामुळे माझी वैचारिक मतप्रदर्शनाची नशा काही अंशीतरी पूर्ण होतेच!! :)) तेव्हा डांबिसकाका, चियर्स!!!;))

चतुरंग

प्राजु's picture

4 Mar 2008 - 8:39 am | प्राजु

अतिशय सुंदर प्रतिसाद.... प्रत्येक वाक्यागणिक दाद द्यावी वाटत होती वाचताना.
- (सर्वव्यापी)प्राजु

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Mar 2008 - 9:58 am | llपुण्याचे पेशवेll

मी पण असाच असुरावादी आहे. त्यामुळे पार्टी मधे एकटाच मी लिम्का पित आणि चकण्याचे दाणे खात बसत असे. बा़की टेबलवर सर्वजण धुंद आणि मी सर्वाना सावरत बसत असे. :) ते डोलकर आणि मी सावरकर...

पुण्याचे पेशवे

सृष्टीलावण्या's picture

4 Mar 2008 - 7:33 am | सृष्टीलावण्या

दारु आणि इतर नशा स्वत:ची, स्वत:च्या शरीराची वाट लावतात, धुम्रपान मात्र स्वत: बरोबर इतरांच्या आयुष्याची पण वाट लावते. स्वत:च्या २ वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन अखंड धुम्रपान करणारा महाभाग मी पाहिला आहे. त्याने सोडलेला धूर त्या मुलाच्या नाकातोंडात जात असतो.

थोडक्यात काय तर धुम्रपान करणे शरीराला घातक आणि धुम्रपान करणारे समाजाला घातक. त्यांची नशा दुसर्‍यांसाठी सजा बनते.

>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

छोटा डॉन's picture

4 Mar 2008 - 10:33 am | छोटा डॉन

डांबिसकाकांनी छेडलेल्या 'नशा' या विषयावरील चर्चेला मिळालेले अनेक अर्थपूर्ण प्रतिसाद पाहून आमची अवस्था एकदम धूंदीत गेल्यासारखी झाली आहे. त्या धूंदीचा अंमल कालपर्यंत टिकून होता म्हणून आज "पूर्णपणे होशोहवाज" मध्ये मी प्रतिसाद द्याय्चे ठरवले....

"सारांश काय की नशेत चांगले किंवा वाईट असे काही नाही, ती एक अवस्था आहे ....."
मान्य आहे. सामान्यता कोणतीही अवस्था नैसर्गीकच असते त्यामुळे इथून पुढे आम्ही "पिऊन टूल्ल होऊन पडणे" यालाच सभ्य भाषेत "आम्ही एका अवस्थेत होतो" असे म्हणणार. त्यात काही वाईट नाही .

"अतिनशेचेच दुष्परिणाम होतात्...माफक प्रमाणात योग्य जागी काय हरकत"
आम्ही सुध्धा हेच म्हणतो. पण हे "योग्य प्रमाण" आणि "अतिसेवन" यांचे परिमाण आणि त्यांची सिमारेषा अतिशय तुटक आहे. त्यात आपण जनरली 'गफलत' करतो व योग्य प्रमाण म्हणून अतिसेवन करतो व परिणाम म्हणजे धूंद अवस्था.

".......... दारू प्या काही वाईट नाही असा थोडा सुर वाटतो आहे त्यामुळे लेख जरा एकीकडे झुकला आहे"
नाही. आम्हाला असे वाटत नाही, एकदम मस्त लिहला आहे लेख.

"विविध संकेतस्थळांवर आपण लिहिणे आणि कुणी वाचले आहे की नाही ते सतत पाहत राहणे ही नशा जबर्दस्त आहे. इतर नशांशीही आम्ही परिचित आहोत, त्यापेक्षाही ही लिहिण्याची नशा अधिक जोमाची आहे. त्यापासून सावध असावे. त्यापेक्षा मस्त दारू प्यावी. ती नशा कमी ठरते"
सर्कीटेश्वर क्या सही डायलॉक मारा है भाय. आपूनको १०० % कबूल ....
खरचं सगळ्यात डेजर नशा आहे ही. ....

"मी तर म्हणेन की एक वेळ दारुची नशा परवडली परंतु अध्यात्माची नशा तर फारच भयंकर!
स्टेजवरच्या पडद्याच्या सळसळीची, तिथल्या धूपाच्या वासाची, होणार्‍या तिन्ही घ॑टा॑ची आणि टाळ्या॑च्या कडकडाटाची नशा तर जीवघेणीच! "

सहमत . आध्यात्म्याच्या नशेचा जेवढा तिरस्कार करतो तेवढेच 'स्टेजवरच्या पडद्याच्या सळसळीची, तिथल्या धूपाच्या वासाची, होणार्‍या तिन्ही घ॑टा॑ची आणि टाळ्या॑च्या कडकडाटाची नशा ' यावर प्रेम करतो. या नशेवर ताबा ठेवणे हे मला या जन्मात तरी शक्य नाही, पुढच्या जन्मात बघू जमले तर .....

"१. आयोडेक्स सँडविच.
२. पाल मारून, जाळून त्याचा धूर ओढ्णे.
३. कमी विषारी नागाकडून जिभेला चावून घेणे (धामण?)"

अनभिज्ञ .........

"आईने पुरणपोळीत घातलेल्या जायफळामुळे परिक्षेच्या काळात अभ्यास करताना झोप आलेली आठवते.""
अशी नशा आम्ही आवडीने व कुणाची तमा न बाळागता करू .....

काही इतर नशा :
आपल्या आवडत्या 'व्यक्तीशी तासनतास फोनवर बोलण्याअची नशा ', त्या व्यक्तीच्या 'डोळ्यात बूडून जाण्याची नशा' , आपापसात घडलेल्या घटना आठवून एकटेच हसत बसण्याची नशा , ३ महिन्याच्या अवकाशानंतर बेंगलोरहून पुण्याला जाऊन तिला भेटण्याच्या कल्पनेतील नशा वगैरे वगैरे .....
गररोज ऊठल्या ऊठल्या पेपर वाचण्याची नशा ....
खाताना / जेवण करताना काही तरी वाचन करण्यची नशा ....
'रेहमानची गाणी ' ऐकत झोपण्याची नशा ....
इत्यादी इत्यादी ..........

तळटीप : वर व्यक्त झालेल्या 'इतर नशा' ह्या मला अतिप्रिय आहेत. कोणतेही दूष्परिणाम जर त्यामुळे होणार असलील तर मला त्याची तमा नाही.

छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या "http://chhota-don.blogspot.com/ "]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

विजुभाऊ's picture

4 Mar 2008 - 12:13 pm | विजुभाऊ

नशा ही नशा च असते......तुमची आणि आमची अगदी सेम असते.....
कोणत्याही गोष्टीत वहावत जाणे म्हणजे नशा.....
काही नशा चांगल्या असतात्.......उदा: यश मिळवण्याची नशा.......
त्यामुळे माणसाचा उतकर्ष होतो.....
मला वाटते की जी गोष्ट जगाचा विसर पाडण्यास भग पाडते तिला नशा म्हणण्यास हरकत नसावी.
पण केवळ दारु बद्दल बोलायचे झाले तर आपल्या सगळ्याना केवळ आपल्याला हव्या याच गोष्टी ऐकु येतात
कोणी "दारु सोडा.....असे सांगितले तर्....दारु आणि सोडा...." असे ऐकु येते..
आपला
अट्टल वाचन बाज
विजुभाऊ

विकास's picture

4 Mar 2008 - 6:13 pm | विकास

सर्व प्रथम चतुरंग यांचा आणि तसेच या संदर्भातील इतर काही प्रतिसाद पटले.

गेल्या जुलै मधे उपक्रमावर मी "दारू एक दृष्टांत" म्हणून छोटासा लेख वजा चर्चा टाकली होती. त्यातपण अशाच रोचक प्रतिक्रीया आल्या होत्या. मिपासदस्यांना कदाचीत ही घटना वाचायला आवडेलः

उपक्रमात सध्या दारूपायी भांडणे होत आहेत.. सध्याचे एक ताजे वाक्य होते:

शेवटी दारू आणि व्यसन वाईटच.

त्यावरून एक पाहीलेली घटना आठवली, ती वरील वाक्याला केवळ प्रतिसाद म्हणून न देता चर्चेच्या रूपाने सुरू करतो. आपल्याला काय वाटते ते जरूर लिहा!

बॉस्टनमधील एका विश्व विद्यालयात एक भारतीय मुलांचा सांस्कृतीक कार्यक्रम चालू होता (दोन दिवसांचे संमेलनच होते). त्यातील एका उपकार्यक्रमाला एक स्वामीजी आले होते. नाव असेच काहीतरी *आनंद होते (मला वटते सर्वगतानंद अथवा तदात्मानंद पण १५ वर्षांपुर्वीची घटना असल्याने नी टसे आठवत नाही, आणि चुकीचे नाव सांगायला नको म्हणून लिहीत नाही).तर् ते असो.

कार्यक्रमाचा एक भाग म्हणून प्रश्नोत्तरच्या वेळात एका अमेरिकेत जन्मलेल्या भारतीय वंशाच्या वीस-एक वर्षाच्या तरूणाने (थोडासा खोचकपणानेच) स्वामिजींना प्रश्न विचारला, "स्वामीजी , दारू पिणे चांगले की वाईट?"

असे वाटले, आता स्वामिजी बिचारे काय म्हणणार? ते तर दारू पित नाहीत... पण स्वामिजींनी शांतपणे अशा अर्थाचे उत्तर दिले, "दारू पिणे चांगले का वाईट हा प्रश्न नाही , चांगले काय नाही तर"कशाचीही नशा चढणे" (something on this line, "it's not the issue if conuming alcohol is good or bad, what is bad is intoxication") . माणसाला (मुख्यत्वे मनुष्य स्वभावाला आणि त्यामुळे इतरांना) मारक काय असते तर ते "कशाचीही नशा चढणे".

पुढचे पारायण माझे:-)

तात्पर्यः कुठलेही काम अथवा क्रिया करताना माणसाने ते मन लावून करावे (वी) पण त्याचा दुरूपयोग न होता उचीत उपयोग होण्यासाठी आणि स्वतःस त्याचा त्रास होऊ न देता "आत्मोद्धारासाठी" म्हणून त्या कार्याची "नशा चढणार नाही "याची काळजी घ्यावी.

चांगली गोष्ट करताना पण अशी नशा चढते आणि माणसं, सात्वीक असला तरी अहंकारापोटी स्वतःच्या कार्यपद्धती आणि कार्याबद्दल अतिरेकी होयला लागतात आणि त्यामुळे चांगल्या कार्याचा नाश तरी होतो अथवा चुकीची फळे मिळू लागतात. इतिहासाची पाने चाळली तर महाभारतापासून ते अर्वाचीन भारतापर्यंत (आणि अर्थातच जगात इतरत्रही) अशी बरीच महान व्यक्तिमत्वे दिसतील ज्यांना असे स्वतःच्या कार्याच्या नशेने पछाडले आणि परीणामी चुकीची फळे त्यांना आणि इतरांना भोगावी लागली. पण तो आत्ता (जुन्या कुरापती काढायचा हा) विषय नाही ...

असे थोरांचे होते तर तुम्ही आम्ही कोण लागून गेलो!

खुलासा
प्रेषक विकास (रवि, 07/15/2007 - 23:34)
>>>....त्यामुळे त्यातल्या त्यात निवडीत पहिल्या प्रकारच्या नशेचे पारडे जड असावे असे वाटते.

मी हे लिहीत असताना कुठल्याही नशेचे अजिबातच समर्थन करत नव्हतो अथवा दारू (किंवा तत्सम इतर उत्तेजके/अंमली पदार्थ) यांना आणि इतर गोष्टींना (विशेष करून चांगल्या कार्याला) समान मानत नव्हतो.

कदाची त काही म्हणतच असलो तर ते इतकेच की ज्याला/जीला ज्याची नशा चढते त्याला/तीला त्या नशेचा कालांतराने त्रास होऊ शकतो. दारू पिऊन पण इतरांना खच्ची करणारे असतात आणि न पिऊन पण स्वतः खच्ची होणारे असतात. दोन्हीचे कारण / मूळ अखेर मानसीकतेत आणि स्वत:ला कोण कसे त्यामुळे "intoxicate" करून घेत आहे यात आहेत, इतकेच.

धन्यवाद

»

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Mar 2008 - 7:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डांबिसा,विषय चांगलाच आहे आणि आपण केलेले विवेचनही, त्याचबरोबर काही प्रतिसादही तितकेच चिंतनात भर टाकणारे. बाकी नशेचे प्रकार अनेक  असु शकतात तो भाग वेगळा ,त्याच्याइतकेच कोणतीही नशा 'अधिकची' ती वाईट इतके आम्हाला समजते.'नशे मे कोण नही है मुझे बताओ जरा ' या गाण्याची आम्हाला मुद्दाम आठवण झाली. इथे प्रत्येकाची नशा वेगवेगळी आहे  आणि धडपडही नशेचीच आहे, असे वाटत राहते. कोणत्या तरी नशेत माणूस असतोच, कोणाला दारु आणि इतर मादक द्रव्याची, कोणाला अध्यात्माच्या नशेची, राजकीय, पुस्तकाची, माणसाची, आणि कितीतरी सांगता येतील. पण शरिरावर आघात करणार्‍या  अनुक्रमे नशा कोणत्या, त्याचे अनुक्रमही व्यक्तीसापेक्ष असावेत की काय असे आम्हास वाटते.   माणुस 'आउट होतो ते केवळ मज्जासंस्थेने काम थांबविल्यावर, आणि ते केवळ मादक पदार्थानेच होते, तसेच असेल तर तशा नशेपासून दूर राहिले पाहिजे.......असे वाटते !!!प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास's picture

4 Mar 2008 - 8:02 pm | विकास

माणुस 'आउट होतो ते केवळ मज्जासंस्थेने काम थांबविल्यावर, आणि ते केवळ मादक पदार्थानेच होते, तसेच असेल तर तशा नशेपासून दूर राहिले पाहिजे.......असे वाटते !!!

छान वाक्य आणि चर्चेतून निघावे असे तात्पर्य!

हल्ली महाराष्ट्रात नशेसंंबंधी बरीच चर्चा घडत आहे.