गेले काही दिवस आपण डेट्रॉईट बीग-३ संकटात, यु ए डब्ल्यु शी बोलणी फिसकटली, ट्रेझरी डिपार्टमेंटकडुन अजुन नवा बेल्-आउट पॅकजचा प्रस्ताव , क्रायस्लरची दिवाळखोरी, रिक वॅगनरची हकालपट्टी, जनरल मोटर्सला ३१ मे ची अखेरची मुदत, मॅग्ना आणि फियाट ओपेलच्या रेसमध्ये वगैरे बातम्या वाचत अगर ऐकत असाल ...
आज त्याची परमोच्चवधी झाली आहे ....
"आज जगातल्या नंबर १ च्या जनरल मोटर्सने दिवाळे घोषीत केले आहे".
त्यांनी आज फेडरल कोर्टात "चॅप्टर-११, बँकरप्सी प्रोटेक्शन" साठी अर्ज केला आहे ....
२-३ वर्षापुर्वीच यशाच्या शिखरावर असलेल्या वाहननिर्मीतीउद्योगाच्या इतिहासातला हा एक सर्वात वाईट क्षण, ऑटो उद्योग म्हणाजे जनरल मोटर्स असे समिकरण असलेली एक महाबलाढ्य आणि अवाढव्य कंपनी आज दिवाळखोरीत जाऊन बसली आहे.
कुठल्या कुठे दिवस बदलले ?
अर्थात दिवाळखोरी म्हणजे सर्व बिझीनेस बंद असे नाही पण बरेच बदल होतील हे नक्की ...
एक नक्की आहे ही "जी एम" ही पुर्वीची "जी एम" राहणार नाही, आता टोयोटा आणि होंडासारख्या त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना रान मोकळे सापडेल.
ह्या अनुषंगाने काही महत्वाच्या नोंदी :
- आज सकाळी जनरल मोटर्सने आपला २४ पानी दिवाळखोरी अर्ज कोर्टात दाखल केला. त्यात त्यांनी ८२.२९ बिलीयन डोलर्सची संपत्ती (ऍसेट्स) जमाखात्यावर दाखवले तर १७२.८१ बिलीयन डॉलर्सची देणी दाखवली आहेत.
- त्यांनी आत्तापर्यंत सुमारे ११ बिलीयन डॉलर्स कर्ज म्हणुन वापरले आहेत ....
- नव्या घोषणेनुसार अमेरिकन सरकार अजुन ३० बिलीयन डॉलर्स गुंतवणुक करुन कंपनीचे ६०% समभाग स्वतःच्या ताब्यात ठेवेल आणि कॅनेडियन सरकार ९.५ बिलीयन डॉलर्सची गुंतवणुक करुन १२.५% समभाग स्वतःच्या ताब्यात ठेवतील. उरलेल्या भागांवर शेअरहोल्डर्सचा ताबा असेल. म्हणजे थोडक्यात इथुन पुढे जनरल मोटर्स ही अमेरिकन सरकारची कंपनी असेल.
- जनरल मोटर्स आपल्या ९ मॅन्युफॅक्चरिंग कारखान्यांना कायमचे टाळे ठोकेल व ३ इतर कारखाने काही काहीसाठी "विनाकाम" ठेऊन नंतर हे विकुन टाकेल.
- ह्याचा परिणाम सुमारे १८०००-२१००० डायरेक्ट जी एम नोकरदारांचे व सुमारे ५०००० इतर लहान सपोर्ट इंडस्ट्रीतल्या नोकरदारांचे जॉब जाण्यात होईल.
- जी एम च्या अमिरिकेतल्या ८ ब्रँडपैकी ४ ब्रँडला एक तर विकले जातील अथवा सरकारकडुन लिक्विडेट ( मराठी शब्द ? ) केले जातील. ह्यात बहुचर्चित हॅमर, साब, पोन्टेक, सॅटर्न ब्रँडचा समावेश आहे.
- साधारणता ६० ते ९० दिवसात भविष्यात जनरल मोटर्स नक्की कशी असेल ह्याचे चित्र स्पष्ट होईल असा अंदाज आहे ...
हे थोडक्यात विवरण झाले.
थोडा अजुन वेळ मिळाला की "सविस्तर लेखाजोखा" लिहण्याचा प्रयत्न करेन.
योगायोगाने मी ह्याच क्षेत्रातला असल्याने मी शक्य तितकी खात्रीशिर व सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करेन ...
तोपर्यंत :
- मिपाकरांचे ह्या चाललेल्या घडामोडीबद्दल काय मत आहे ?
- अमेरिकन ओटो उद्योगाचा हा अंत की नवी पहाट ?
- ह्याचा दुरगामी परिणाम काय असु शकतो ?
- इतर जगावर नक्की काय परिणाम होईल ?
- बुडत्या अर्थव्यवस्थेला हा प्रसंग "काडीचे ओझे" ठरणार नाही ना ?
आदी मुद्द्यांवर सविस्तर विवेचन वाचायला आवडेल.
अवलियासाहेबांचा विस्तारित प्रतिसाद मला इथे अपेक्षित आहे, मी वाट पहातो आहे ...
बाकी अजुन सविस्तर सवड मिळाली की लगेच, ही फक्त चर्चेची सुरवात आहे ....
प्रतिक्रिया
1 Jun 2009 - 11:17 pm | यन्ना _रास्कला
रान मोकल होनार... बजाज आनि ईतर लोक पन हात धुवुन घेनार.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?
पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
2 Jun 2009 - 12:16 am | विकास
चांगला विषय आणि या घटनेचा थोडक्यात पण छान परीचय.
कोणे एके काळी अमेरिकेत म्हणले जायचे की, "whatever good for GM is good for America" आणि त्याचाच उलट अर्थ पण कधी काळी खरा होता. म्हणजे जर जीएमला काही चांगले नसेल तर अमेरिकेला पण ते चांगले ठरणार नाही.
अर्थात तो काळ हा जागतिकीकरणाच्या आधीचा आणि अमेरिकन तंत्रज्ञानाच्या वर्चस्वाचा होता... अमेरिका ही गाड्यांच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून होती. काळ बदलला. जागतिकीकरणाबरोबर आता जीएमला पण इतर कंपन्यांशी स्पर्धा करत अधुनिक काळाला अनुसरून नवीन तंत्रज्ञानाच्या गाड्या तयार कराव्या लागतील. तसेच इंटरनेटमुळे नवीन उद्योग चालू झाले आणि पुर्वी वरकरणी खुली अर्थव्यवस्था आणि आत मात्र बंधनांमुळे उद्यमशिलतेला असलेली मर्यादीत चालना आता अमेरिकन अर्थव्यवस्था केवळ जीएम (अथवा तत्सम अमेरिकन ब्रँड्सवर) अवलंबून नाही. (स्थानिक फरक दुर्दैवाने पडू शकेल तो भाग वेगळा).
यात जीएमचे काय होते वगैरे हा एक प्रश्न झाला. पण यातून आपले उद्योग काय शिकू शकतात हा मुद्दा मला जास्त महत्वाचा वाटतो. तितकेच महत्वाचे आपल्या धोरणकर्त्यांनी आपली अर्थव्यवस्था पुढे नेताना करायचा विचार आहे असे कुठेतरी वाटते...
2 Jun 2009 - 5:36 am | हुप्प्या
काही लोकांच्या मते युनियनबाजी हे जीएम बुडण्याचे एक कारण आहे. युनियन्स च्या अवाच्या सवा मागण्या पुर्या करण्यात तिजोरी रिकामी झाली. कंपनीला फायदा होतो आहे का तोटा ह्याचा विचार न करता अफाट पगार, अफाट पेन्शने देत राहिल्यामुळे ही कंपनी संपली असे अनेक लोक सांगतात. टोयोटा व अन्य जपानी कंपन्यांमधे ह्या समस्या तुलनेने कमी आहेत.
कमी पेट्रोल वापरुन जास्त अंतर जाणारी वाहने बनवण्याऐवजी अमेरिकन कंपन्या भलीमोठी वाहने बनवत राहिली. हमरसारखी प्रचंड इंधनखाऊ वाहने बनवण्यात अमेरिकन कंपन्या भूषण मानत राहिल्या. टोयोटाची प्रियस आणि अन्य हायब्रीड वाहने लोकांना जास्त आकर्षक वाटली.
एकंदर लोकांना काय हवे आहे ते जाणून त्या दृष्टीने संशोधन करण्यात ह्या कंपन्या मागे राहिल्या आणि त्याची फळे त्या भोगत आहेत.
अर्थात असंख्य कामगार बेकार होणार आणि त्याचा परिणाम अन्य उद्योगांवर होणार ही एक मोठी समस्या आहे.
2 Jun 2009 - 10:11 am | अविनाशकुलकर्णी
अमेरीका व रशिया शित युध्ध चालु होते त्या वेळचा विनोद.रशिया चे प्रेसिडेंट लश्करी चर्चेत अमेरीकन प्रेसिडेंटला म्हणाले..आमचे सारे जनरल्स तुम्हाला देतो.तुमचा एकच जनरल आम्हाला द्या..जनरल मोटर्स
2 Jun 2009 - 9:04 pm | एकलव्य
हीच गोष्ट आम्ही तीन जनरल्सविषयी ऐकलेली आठवते --
(१) GM, (२) GE and (३) G?!
2 Jun 2009 - 10:56 am | नितिन थत्ते
काल वि़कीवर जी एम विषयी वाचत होतो.
त्यात १९३० च्या सुमारास स्वतःच्या वाहन उद्योगास वर आणण्यासाठी जी एम ने अमेरिकेतील ट्राम आणि रेलवे कंपन्या विकत घेतल्या आणि नंतर त्या पद्धतशीरपणे बंद पाडल्या अशी माहिती दिली आहे.
असले उद्योग करणारी कंपनी बंद पडली तर दु:ख वाटण्याचे कारण नाही.
खराटा
(रंग माझा वेगळा)
2 Jun 2009 - 7:31 pm | महेश हतोळकर
काही दिवसांपूर्वी मायबोली वर एक लेख वाचला होता. त्या लेखात आणि प्रतीसादात खूपच माहिती मिळाली.
2 Jun 2009 - 8:00 pm | छोटा डॉन
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, मीसुद्धा तो धागा आधीच वाचला होता.
१०० वर्षपुर्तीनिमीत्त निघालेल्या एका माहितीपत्रकाचा अतिशय सुंदर आढावा लेखकाने घेतला होता.
फारच सुंदर लेख आहे तो, दुव्यासाठी आभारी आहे ...
अवांतर :
आज रात्री अजुन विस्तारात "भविष्यातली प्रोजेक्टेड - जी एम आणि अमेरिकन सरकारचे धोरण" ह्यावर एक सविस्तर प्रतिसाद लिहीन.
बर्याच वेळा कंपन्यांच्या धोरणांचा व योजनांचा डायरेक्ट इंपॅक्ट सरकारच्या विकासयोजना व गुंतवणुक धोरणावर होतो, आज त्याचाच उहापोह करायचा प्रयत्न करेन.
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
2 Jun 2009 - 8:26 pm | रामदास
काही वर्षांपूर्वी वाचले होते त्या पुस्तकाची आज आठवण झाली. अमेझॉन वर खाली लिहीलेली टिप्पणी सापडली. सोयीसाठी जशी आहे तशी देतो आहे.
"I got the empty feeling that "what I am doing here may be nothing more than perpetuating a gigantic fraud," a fraud on the American consumer by promising him something new but giving him only the surface alterations....I always had he vague suspicion that the annual model change may be good for the auto business in the short term but that it wasn't good for the economy and the country. Couldn't the money we spent on annual, superficial styling changes be better spent in reducing prices or in improving service and reliability? Or seeking solutions to the sociological problems with which our products were creating in areas of pollution, energy consumption, safety, and congestion?" "A fault that GM has had for a long time is its feeling that, since it sells more cars and trucks than anyone else in the world and makes far more money than any other automotive company, the GM way is the only way.
2 Jun 2009 - 10:04 pm | छोटा डॉन
बहुतांशी भानवा मनातुन उतरल्यासारख्या वाटतात, पण बिझीनेस असा नाहीच.
>> a fraud on the American consumer by promising him something new but giving him only the surface alterations....
बरोबर ...!!!
हे तर सर्वच करतात, हा शुद्ध फ्रॉडच आहे.
पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कंपन्यांना बर्याच गोष्टी टेक्निकली, प्रॅक्टिकली शक्य असतात पण त्या "पॉलिटिकली आणि सोशली" कितपत हे ठरवणे अशक्य असते म्हणुन असे प्रोजेक्ट दाबुन ठेवले जातात.
एखादी कंपनी आज समजा "हायब्रीड कार" बाजारात आणते आहे ह्याचाच अर्थ त्यांच्याकडे त्याच्या २० वर्षापुढील टेक्नोलॉजी तयार असते असा आहे, त्याशिवाय कोण अशी रिस्क घेणार नाही.
आज तुम्हाला रस्त्यावर अथवा मिडीयात "हारब्रीड अथवा इलेक्ट्रिक कार्स्"ची बुम दिसत आहे, पण हे आजचे नाही १० वर्षापुर्वीपासुनच कंपन्या ह्या टेक्नोलोजी बाळगुन होत्या, आज फक्त जगासमोर येताहेत हे खरे. आज कंपन्यांकडे त्याहुन स्वतातली आणि "व्हर्च्युअल झिरो इमिशन, इफिशियंट" वगैरे टेक्नो असु शकते, पण ती "केव्हा आणायची ?" ह्याचा निर्णय मात्र लगेच घेतला जात नाही.
आज खरोखर पेट्रोल्/डिसेल शिवाय कार बाजारात आणाणे केव्हाही शक्य आहे.
मात्र ह्यासोबतचे "राजकारण आणि वित्तकारण" लक्षात घेता खात्री बाळगा की अजुन ५ वर्षे अशी कार भारतात येणार नाही.
सध्या जरी "टोयोटा प्रायस आणि शेव्ही व्होल्ट" बाजारात असल्या तरी किमती आपल्याला झेपणार्या नाहीत.
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
2 Jun 2009 - 9:01 pm | चतुरंग
अमेरिकेत मोठ्या शहरांअंतर्गत वाहतूक सोडली तर सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा उडवण्याचे काम पद्धतशीरपणे जीएम सारख्या कंपन्यांनी केले. संपूर्ण जनता ही जणू आपल्या वहानांची बटीक व्हावी हाच पाताळयंत्री उद्देश होता हे उघड आहे!
रस्ते बांधणी आणि त्यांची देखभाल ह्याला पैसे पुरवून त्यांनी रस्त्यांचे जाळे अप्रतिम विणले ही जमेची बाजू सोडली तर बाकी वजाबाकी जास्त मोठी आहे. रेल्वे अजिबात न वाढायला हे लोक कारण ठरले. रेल्वेने होणारी माल आणि प्रवासी वाहतूक ही अतिशय किफायतशीर ठरते. शिवाय विजेवर चालणारे असल्याने प्रदूषण कमी ठेवायला मदत.
मुक्त बाजारपेठेचे तत्त्व अंगिकारताना अमेरिकन लोक हे आपल्याच गाड्या घेत रहाणार ह्या भ्रमात जीएम आणि फोर्ड सारख्या कंपन्या राहिल्या. मूळ इंजिनात काहीही मोठे बदल न करता फक्त वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगांचे पत्र्याचे डबे त्यावर बसवून इतकी वर्षे चक्क ह्या लोकांनी फसवणूक केली आहे. असल्या कंपनीला अब्जावधी डॉलर्स कर्जाऊ द्यायची ओबामांची नीती समजत नाही.
परवाच्या ओपिनियन पोल मध्ये ५७% लोकांनी "जीएम शुड गो बेली अप!" असा स्पष्ट निर्वाळा दिलाय. हजारो लोकांचे काम जाणार ही खरी गोष्ट असली तरी असल्या बुडीतखाती करदात्यांचे इतके डॉलर्स ओतून ते कोणाचं भलं करताहेत?
जो पर्यंत पेट्रोलच्या किमती आवाक्यात होत्या, बाहेरच्या देशातले लोक इथे येऊन इथल्या नोकर्यांवर हक्क सांगत नव्हते तोपर्यंत एकूणच स्पर्धा कमी होती. लोक आपापल्या कोषात सुखी होते. त्याकाळात सर्वसामान्य लोकांना एसयूवी सारखे पेट्रोल खाणारे रणगाडे विकून ह्या कंपन्यांनी तुंबडी भरली. १९८० च्या दशकात होंडा/टोयोटा सारख्या जपानी गाड्यांवर भरमसाठ कर बसवून सुरुवातीला त्यांची गळचेपी करायचेही व्यवस्थित प्रयत्न झाले त्याला चिवट जपानी पुरुन उरले. एकदा ते इथे शिरल्यावर आकाराने मध्यम आणि छोट्या पण अतिशय ताकदवान आणि इंधन वाचवणारी यंत्रे असलेल्या उत्तम गाड्या बाजारात आणल्या. त्यावेळी अमेरिकन कंपन्यांनी डोळेझाक केली; तंत्रज्ञानातली प्रगती, हायब्रिड वेहिकल मधील संशोधन ह्याकडे पाठ फिरवली आणि त्याचा परिणाम व्हायचा तोच झालाय. आता अमेरिकन लोक अमेरिकन गाड्या घेत नाहीत.
अमेरिकन कार्सचा वर्ष दोन वर्षात खुळखुळा होतो. त्याचवेळी २ लाख मैल (लक्षात घ्या मैल, किलोमीटर नव्हे! म्हणजे ३ लाख २० हजार किमी) चाललेल्या होंडा आणि टोयोटा लोकं सेकंड्/थर्ड हँड आरामत विकत घेतात आणि मजेत चालवतात. रेग्युलर मेंटेनन्स शिवाय काहीही लागत नाही! इतका धडधडीत फरक असताना लोकांनी अमेरिकन कार्स घ्याव्यात म्हणून मागे लागणे आणि करदात्यांचा पैसा अशा ठीकाणी सरकारने ओतणे हे अगम्य आहे!
चतुरंग
2 Jun 2009 - 9:15 pm | अनामिक
.... "टोयोटा प्रायस आणि शेव्ही व्होल्ट" बाजारात असल्या तरी किमती आपल्याला झेपणार्या नाहीत...
टोयोटा- प्रियस (फोर डोअर सिडन मॉडेल) ची सध्याची बाजारातली किंमत २२,००० डॉलर्सच्या आसपास आहे.... जी येथील इतर कार्सच्या (होंडा, निसान, शेव्ही इ.) किमतीच्या मानाने काही जास्तं नाहीये. त्यामुळे न झेपणारी किंमत असे म्हणू शकत नाही (अर्थात हे अमेरिकन नागरिकांसाठी आहे).
(शेव्ही व्होल्टची किंमत त्यामानाने बरीच जास्तं आहे.... ३०-३२ हजार डॉलर्सपेक्षाही जास्तं)
डॉन- तुझा पुढचा प्रतिसाद (वर बोलल्या प्रमाणे) वाचायला उत्सूक आहे.
-अनामिक
2 Jun 2009 - 10:04 pm | छोटा डॉन
अनामिकराव जे म्हणतात ते बरोबर आहे.
टोयोटा प्रायसचे जे बेसिक मॉडेल आहे त्याची किंमत २२०००$ तर शेव्ही व्होल्ट साधारणाता ३५०००$ च्या आसपास जाईल.
ह्याच काळात होंडाचे "इनसाईट" नावाचे मॉडेल मात्र १८५००$ ला मिळत्/मिळणार होते.
मात्र ह्यांच्या टेक्निकल आणि पर्फॉर्मन्समध्ये बराच फरक आहे.
शेव्ही वोल्ट ही खरोखर "इलेक्ट्रिक कार" होऊ शकते, त्यांचे आयडियस गॅसोलिन युसेज चक्क "झिरो" आहे.
प्रायसचे इंजिन १.५ ते १.८ लीटर-४ सिलिंडर ह्या कॅटॅगिरीत मिळते की जे ७५ ते ११० हॉर्सपावर इतकी ताकद गाडीला देऊ शकते. गाडी चालतानाच ह्यांच्यताल्या "निकेल बॅटर्या" चार्ज होतील व पावर सप्लाय करतील असे डिसाईन आहे.
लुक बराच "सिव्हिक" सारखा आहे असे वाटते आहे.
मात्र वोल्ट की इलेक्ट्रिक कार असुन ती ४-५ तास चार्ज केल्यावर ४० माईल्स धावु शकेल, इंधनाचा शुन्य वापर असेल. त्यानंतर इथे १लिटर कॅपॅसितीचे ३ सिलिम्डरवाले टर्बोचार्जड इंजिन आहे. लुक तर भारी आहेच. ह्यांची मेन ताकद "मोस्ट इफिशियंट लिथीयम आयन बॅटर्या आहे.
अल्टिमेटली वोल्ट ही खरोखर इलेक्ट्रिक अथवा हायब्रिड कार आहे ...
"इमिशन्स"चे परिमाण आहेच की ...
बाकी अजुन हवी असल्यास "टेक्निकल स्पेक्स / माहिती " देऊ शकेन ...
बाकी मी जे किमतीबाबत बोलत आहे "भारतातल्या" ग्राहकवर्गाबाबत म्हणत आहे.
आपल्याला अजुन हे परवडण्याबाहेर आहे, थोडा वेळ हवा अजुन ...
बाकी प्रतिसाद लिहतोच थोड्या वेळात.
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
2 Jun 2009 - 10:11 pm | चतुरंग
(चित्र जालावरुन साभार)
लुक बराचसा 'सिविक'सारखा आहे पण ट्रंक मोठी आणि मागे सपाट आहे तिथे मला वाटते बॅटरीज असतात.
चतुरंग
2 Jun 2009 - 10:28 pm | हुप्प्या
वरती असे सूचित केले आहे की इलेक्ट्रिकवर चालणारी कार म्हणजे प्रदूषणमुक्त. हा एक मोठा गैरसमज आहे. अमेरिकेत तरी
बहुतांश वीज ही गॅस वा कोळसा जाळून बनवतात. पाणी (हायड्रो-इलेक्ट्रिक) वा अणूऊर्जा विद्युतनिर्मितीकरता अगदी थोड्या प्रमाणात वापरली
जाते. त्यामुळे जी वाहने वीज जाळतात त्यांचे प्रदूषण रस्त्यावर होत नसेल पण बॅटरी चार्ज करताना जी जास्तीची ऊर्जा वापरली जाते
त्याने प्रदूषण होणारच. किंबहुना, वीज जिथे निर्माण होते तिथून शेकडो मैल दूर नेली जाते. तशी नेताना बरीच ऊर्जा वाया जाते.
त्यामुळे वीज जर औष्णिक ऊर्जा वापरून बनवली असेल तर प्रदूषण कमी असण्याचा मुद्दा चूक आहे. फारतर असे म्हणता येईल की
असल्या वाहनांचे प्रदूषण डोळ्यासमोर न होता दूर कुठेतरी जिथे वीज बनते तिथे होते. पण ते होतेच.
असे व्हायला नको असेल तर न्युक्लियर ऊर्जा वापरून वीज बनवली पाहिजे. तशी बनवणारी केंद्रे अजून बनायला हवी आहेत. पण
अतिरेकी पर्यावरणवादी हे होऊ देत नाहीत. आणि प्रदूषण वाढतच जाते.
2 Jun 2009 - 10:43 pm | नितिन थत्ते
हुप्प्याशी सहमत. एवढेच नाही तर उष्णता - वीज आणि वीज - यांत्रिक असे उर्जेचे दोन टप्प्यात रूपांतर होत असल्यामुळे एकूण उर्जेचा वापर (इंधनाचा खप) हा पेट्रोलच्या गाडीच्या जवळजवळ दुप्पट होईल.
खराटा
(रंग माझा वेगळा)
3 Jun 2009 - 6:57 am | अनामिक
काहीतरी गल्लत होते आहे. इथे (म्हणजे सध्या वापरात असलेल्या हॅब्रीड) कारमधे वापरलेली बॅटरी चार्ज करायला विजेची गरज नाहीये. कारमधे बसवलेली बॅटरी कारमधल्या इक्विपमेंट्शी अशा प्रकारे जोडली जाते की जेणेकरुन कायनेटीक एनर्जीचा (उदा. म्हणजे ब्रेक किंवा ऍक्सलरेटर दाबल्याने निर्माण होणार्या एनर्जीचा) उपयोग बॅटरी चार्ज करण्यासाठी होतो. अशा रितीने चार्ज झालेल्या बॅटरीवर कार चालली तर सहाजिकच पेट्रोल कमी जळणार. शिवाय कार्बन मोनॉक्साईड/कार्बन डाय ऑक्साइडही कमी प्रमाणात बाहेर पडणार. हॅब्रीड वाहनांच्या संपूर्ण आयुष्यात (इतर वाहनांच्या कंपॅरिझनमधे) साधारणपणे ४०% प्रदुषण कमी होतं (म्हणे).
प्लग्-ईन हॅब्रीड-ईलेक्ट्रीक व्हेईकल हा जरा वेगळा प्रकार आहे... तो सध्या कितपत आमलात येतो त्या बद्दल माहीती नाही, पण त्यात विजेचा वापर बॅटरी चार्ज करण्यासाठी होत असावा असे वाटते. डॉन - बरोबर आहे ना?
-अनामिक
3 Jun 2009 - 10:20 am | नितिन थत्ते
असं होय! असं असेल तर काही प्रमाणात इंधनाची बचतच होईल.
हायब्रीड म्हणजे दोन्ही प्रकारे चालणारी असे समजून आधीचा प्रतिसाद लिहिला होता.
खराटा
(रंग माझा वेगळा)
3 Jun 2009 - 10:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
समजून घेण्यात माझी काहीतरी गल्लत होते आहे.
छोटा डॉन, अनामिक, बबलु आणि इतर गाडी-एक्सपर्ट्स:
गाडी ऍक्सिलरेट करताना जर बॅटरी चार्ज होत असेल तर ती जास्त इंधन खाणार नाही का? का इंधन १००% पेक्षा बरंच कमी इफिशियंट असतं; तेव्हा फुकट जाणारी उर्जा या बॅटरीज मधे साठवतात?
ब्रेक मारताना ऊर्जा बॅटरीत साठवता येईल हे पटत आहे, (अजून नीट समजलं नाही आहे) पण वेग घेताना ऊर्जा कशी साठवता येईल?
3 Jun 2009 - 11:07 am | छोटा डॉन
समजा तुझ्याकडे "क्ष" इंधन आहे आणि त्याच्या ऑक्टेन नंबर ९५-९६ वगैरे आहे ( हे अतिशय उच्च इंधन समजले जाते.)
आता ह्याच इंधनाचे जेव्हा इंजिन सिंलिंडरमध्ये ज्वलन होते तेव्हा बर्याच फॅक्टर्समुळे कधीच १००% इंधन "योग्य पद्धतीने" जळत नाही, आता ह्यात इंधनाचे केमिलक गुणधर्मही विचारात घ्यावे लागतात. मग ह्या ज्वलनातुन जी एकुण एनर्जी तयर होईल ती समजा ८५-९० पर्यंत असते, उरलेली एनर्जी "केमिकल लॉस" मध्ये निघुन जाते.
ह्याच ज्वलनकार्यात मिळणार्या इफिशियंसीला "वोल्युमेट्रिक इफि." म्हणतात.
आता ह्या उपलब्ध असणार्या ८५% उर्जेपैकी सुमारे ३०% उर्जा ही इंजिन आणि बाकीचे पार्ट थंड ठेवणार्या कुलिंग सॉल्व्हंटबरोबर निघुन जाते.
म्हणजे ह्या उर्जेचा सुद्धा वापर शुन्यच झाला, ह्यालाच "थर्मल इफिशियंसी" असे म्हणतात ...
आता उललेली ५० ते ५५% उर्जी ही "क्रँकशाफ्टकडे" येते की जो त्याचे रुपांतर यात्रीक उर्जेत करणार्या साखळीतला पहिला दुवा आहे.
मग इथुन ती शेकडे मेकॅनिझम्समधुन वाहुन शेवटी गाडीच्या चाकांकडे जाते. शेवटी जेव्हा ते चाकापाशी मोजली जाते तेव्हा ती फक्त २५ ते ३० % एवढीच रहाते.
बाकीचे लॉसेस हे मॅकेनिकल अथवा फ्रिक्शन लॉसेस म्हणुन पकडले जातात ....
शेवटी जी उर्जी उरते त्यालाच "ब्रेक पावर्/बीएचपी/एचपी" असे म्हणतात ....
आता ह्यातल्या वाया जाणार्या "मेकॅनिकल लॉसेस आणि कुलिंग लॉसेस" चा उपयोग करुन नवी इफिशियंट वहाने बनवण्याचा प्रयत्न आहे.
हायब्रीड व्हेईकल त्यातलेच एक ...
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
3 Jun 2009 - 11:24 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आता समजलं; धन्यवाद डॉन.
इलेक्ट्रीक कार्स शहरात वापरल्यामुळे एकाजागी, उदाहरणार्थ खूप वापरले जाणारे रस्ते, चौक इ ठिकाणी होणारे, प्रदूषण थोडं कमी होईल. पर्यायाने शहरांमधे जी उष्णतेची बेटं तयार होतात ती होणार नाहीत.
अर्थात त्यासाठी खेडी प्रदूषित करून वीज तयार करावी असं नाही पण हरीत ऊर्जा मिळवण्यास हरकत नाही.
3 Jun 2009 - 11:47 am | नितिन थत्ते
>> प्रदूषण थोडं कमी होईल. पर्यायाने शहरांमधे जी उष्णतेची बेटं तयार होतात ती होणार नाहीत.
प्रदूषण कमी होईल हे बरोबर. वायूचे आणी आवाजाचे.
उष्णतेची बेटे कमी होतील याविषयी शंका आहे (गणित करून पहायला हवे).
खराटा
(रंग माझा वेगळा)
3 Jun 2009 - 11:26 am | नितिन थत्ते
याचे उत्तर म्हणून छोटा डॉन यांनी जे लिहिले आहे ते बरोबर आहे पण त्या वेस्ट ऊर्जेचा वापर करून ए सी वगैरे चालवण्याचे प्रयत्न चालू आहेत.
दुसरा चार्जिंगचा प्रकार म्हणजे रिजनरेटिव्ह चार्जिंग. आपण ब्रेक लावतो तेव्हा चाकाच्या ड्रम्/डिस्क वर काहीतरी घासून कायनेटिक ऊर्जेचे घर्षणाने उष्णतेत रूपांतर करतो. म्हणजे ती ऊर्जाही आपण चक्क फुकट घालवतो. त्याऐवजी त्यावेळी जनरेटर वापरून बॅटरी चार्ज केली जाते.
(सध्या लोणावळा ते कर्जत उतरणार्या गाड्यांची इंजिने अशा प्रकारे उतारावरील गतिज ऊर्जेचे विजेत रूपांतर करून ती वरच्या वायरमध्ये फीड करीत असतात. ज्यावेळी एक गाडी उतरत असते तेव्हा दुसरी चढेल अशा रीतीने वेळापत्रके ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न असतो).
खराटा
(रंग माझा वेगळा)
3 Jun 2009 - 11:31 am | छोटा डॉन
खराटाशेठचा उत्तम प्रतिसाद ...
ही नवी माहिती कळाली, माहितीसाठी धन्यवाद ...
बाकी वेस्ट एनर्जी रिसायकलिंगचे अनेक प्रकारे सुयोग्य वापर करण्याचे प्रकार चालु आहेत.
डायरेक्ट त्याच्या उपयोग "ब्रेक पावर" मध्ये होतो का ह्यापेक्षा बाकीच्या ठिकाणी ही उर्जा वापरुन एकुण इंधनाची बचत करण्याचे प्रयत्न चालु आहेत.
उदा: एसी, पावर स्टियरिंग, एलेक्ट्रिक ऍप्लायंसेस, ऍक्सेसरिस वगैरे ....
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
3 Jun 2009 - 10:44 am | छोटा डॉन
अनामिक म्हणतो तोच कन्सेप्ट चार्जिंग साठी वापरला जातो, सध्या जी गाडीत एकुण उर्जा निर्माण होते त्यातल्या वाया जाणार्या सुमारे ३० ते ३५ % भागामधल्या ( जसे की क्लचिंग्-डि क्लचिं, ब्रेकिंग, ऍक्सेलरेशन, कायनेमिट लॉसेस वगैरे ) काही भागाची उपयोग बॅटरी चार्ज करण्यासाठी होतो.
त्यामुळे चार्जिंगसाठी जास्त इंधन लागेन व जास्त प्रदुषण होईल हे चुकीचे आहे ....
दुसरा प्रकार आहे रो "प्लग-इन बॅटर्या" वाला, भारतात "रेवा" कार आहेत तसा.
तर तेही शक्य आहे आनि वापरले जाते. कोणतेही हायब्रीड व्हेईकल तुम्ही ११० वोल्ट अथवा जास्त विसलेल्या इलेक्ट्रिक सॉकेटमधुन चार्ज करु शकता.
साधारणता ४-५ तास असे चार्जिंग झाले की इंधनाचा वापर न करता गाडी ४०-४५ मैल आरामात जाईल.
सिटी राईडसाठी बेस्ट ऑप्शन ...!!!
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
3 Jun 2009 - 2:20 am | बबलु
अनामिक यांच्याशी सहमत.
टोयोटा प्रियस ची बॅटरी चार्ज करायला गाडीतील कायनेटीक एनर्जीचाच उपयोग केला जातो.
अवांतरः-- इथे अमेरिकेत टोयोटा प्रियस बरीच प्रसिद्ध पावलेय याचं मुख्य कारण "माईलेज" ( ४५ मैल प्रति गॅलन). :)
....बबलु
3 Jun 2009 - 10:38 am | अभिज्ञ
डॉनराव यांनी मांडलेला विषय व त्यावर झालेली उपयुक्त चर्चा आवडली.
याविषयावर अजून वाचायला निश्चितच आवडेल.
भारतीय मोटार कंपन्यांचे भारतातले भविष्य काय असेल व जीएम च्या पडझडी मुळे त्यांना
परदेशातील बाजारपेठेत काहि शिरकाव मिळू शकेल काय?
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
3 Jun 2009 - 12:11 pm | आनंदयात्री
असेच म्हणतो !!
डॉनरावांचा लेख अत्यंत माहितीपुर्ण. तसे खालच्या प्रतिसादांमधे डिस्कशनही आवडले, नविन गोष्टी कळाल्या. ऑटो उद्योगात काय चालु आहे याचा अम्दाज आला.
धन्यवाद.
3 Jun 2009 - 12:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
जीएम आणणार २ लाखांची छोटी कार
3 Jun 2009 - 1:00 pm | अवलिया
डॉनराव तुमचा लेख अतिशय माहितीपूर्ण तसेच सर्व प्रतिसादांमधली विचारांची देवाण घेवाण बरीच माहिती देत आहे.
सबप्राईम क्रायसिस असेच सुरवातीला नगण्य आहे असे भासणारा हा समस्येचा हिमनग आता त्याचे खरे वास्तव रुप दाखवायला लागला आहे असे म्हटले तरी हरकत नाही. जगात आतापर्यत मंदी अनेक वेळेला आली आणि गेली, हे जरी खरे असले तरी आतापर्यतची मंदी येण्याची कारणे आणि या वेळची मंदी येण्याची कारणे यात मुलभुत फरक असल्याने आजपर्यत केलेल्या उपाययोजना जशाच्या तशा लागु पडतीलच असे मानण्याचे कारण नाही. उपाययोजना लागुच पडणार नाहीत असे माझे म्हणणे नाही, परंतु सर्वसाधारण राज्यकर्त्यांचा या मंदीकडे एक समस्या म्हणुन पहाण्यापेक्षा स्वतःचे वैयक्तिक स्वार्थ साधणे हाच दृष्टीकोन असल्याचे दिसते. (हे केवळ भारतालाच लागु आहे असे नाही)
आणि केवळ याच कारणाने कुठलीही शक्यता वर्तवणे हे अत्यंत कठीण आहे.
जे जे होईल ते ते पहावे !
--अवलिया
3 Jun 2009 - 3:21 pm | मराठमोळा
छान चर्चाप्रस्ताव आहे. लेख आणी चर्चा दोन्ही माहितीपुर्ण आहेत. (मला या विषयाचे जास्त ज्ञान नाही.)
परंतु एकंदरीत या सर्वाचा अर्थव्यवस्थेवर किंवा वाहन उद्योगाच्या भविष्यावर होणारा परीणाम वर्तवणे कुणालाही थोडेसे अवघडच आहे.
पण अमेरीकन लोकांची विचारसरणी बदलेल असे दिसते आहे. आजतागायत जे लोक We are the Best म्हणत होते ते ठेच खाउन पडले आहेत.
ओबामा यांनी जरी जीएम ला आश्रय दिला असला तरी ती कंपनी आता खाजगी न राहता सरकारी होणार आहे (ईतरांचे झाले तसे). थोडक्यात सरकारी प्रक्रिया
आणी निर्णयांवर येणारे बंधन यामुळे उत्पादन गुणवत्तेला आणी विकासाला धोका पोहोचु शकतो. म्हणजे अमेरिका पुढील ५ वर्षात जी प्रगती करु
शकणार होती त्याला कदाचित आता ८-९ वर्षे लागु शकतात. (हे माझे वैयक्तीक मत आहे).
भारत त्या मानाने हळु का होईना पण दर्जेदार प्रगती करत आहे. उदा. १९९३ ची मल्होत्रा कमिटी आठवा. भारतात सेक्टर (मराठी शब्द?)
खाजगीकरण जरी झाले असले तरी खुपच प्रोऍक्टीव (मराठी शब्द?) पाउले उचलली गेली होती आणी त्यामुळेच प्रगती जरी संथ असली तरी
ती बर्यापैकी भक्कम आहे.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
3 Jun 2009 - 5:47 pm | अनामिक
परंतु एकंदरीत या सर्वाचा अर्थव्यवस्थेवर किंवा वाहन उद्योगाच्या भविष्यावर होणारा परीणाम वर्तवणे कुणालाही थोडेसे अवघडच आहे.
खरंय, पण असे असले तरी जी-एमचं काही खरं दिसत नाही. सध्या सरकारने दिलेल्या 'टेकू'मुळे पुढची काही वर्ष जी-एम परत यशस्वी होण्याचा प्रयत्न करेलही. पण हळुहळू ही कंपनी लयास जाईल असे वाटते. अधार एवढाच की हि स्लो-प्रोसेस असल्याने नोकरदार या बदलाला सरावलेले (ऍडज्स्ट झालेले) असतील. तसेच आजच्या परिस्थितीत जी-एमच्या वाहनांची मागणी फार कमी झाली आहे. शिवाय त्याच किमतीत अधिक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळेच जी-एमला जर खरंच यशस्वी व्हायचं असेल तर काहितरी 'रिव्होलुशनरी' की काय म्हणतात ते करावं लागेल.
-अनामिक
3 Jun 2009 - 5:59 pm | छोटा डॉन
अनामिकशी तंतोतंत सहमत आहे.
असेच म्हणतो.
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
3 Jun 2009 - 5:11 pm | नितिन थत्ते
रंगाशेट,
चित्राचा आकार लहान करू शकाल काय?
खराटा
(रंग माझा वेगळा)
3 Jun 2009 - 7:15 pm | चतुरंग
चतुरंग
26 Jul 2012 - 3:01 pm | नाना चेंगट
मंदीच्या पार्श्वभूमीवर हा लेख वर आणावासा वाटला.
26 Jul 2012 - 4:08 pm | कुंदन
तुला मेल्या फार प्रेम मंदी बद्दल.
इतका का आतुरतेने वाट पाहातोयेस ?
26 Jul 2012 - 5:22 pm | विजुभाऊ
कुंद्या चुकतोस चुकतोस्.अभ्यास कमी पडतोय
नान्याला मंदीच्या पार्श्वभूमी बद्दल प्रेम आहे.
काय रे नान्या बरोब्बर की नै
26 Jul 2012 - 7:30 pm | परिकथेतील राजकुमार
बर्याच दिवसांनी अत्यंत हि & हि प्रतिसाद वाचायला मिळाला. जुन्या मिपाच्या आठवणीने डोळे भरुन आले.
विजुभौंना महावस्त्र व श्रीफळ देउन गौरवण्यात येत आहे.
विजुभौंचे धन्यवाद.
27 Jul 2012 - 12:07 pm | विजुभाऊ
परा काका यावर खरेतर नान्याने प्रतिक्रीया द्यावी असे अपेक्षीत होते.
त्याने मौन ठेवले आहे........बघ म्हणतात ना मौनं सर्वार्थ साधनम.
27 Jul 2012 - 6:25 pm | बॅटमॅन
जुने मिपा काय शुद्ध मांसाहारी होते की काय ;) मस्त चैन केलीत लेको, रोज खाल्लेत शिकरण , मटार उसळ!
26 Jul 2012 - 3:31 pm | विजुभाऊ
मंदी : या शब्दाबद्दल खुलासा करावा. द्व्यर्थी शब्द वापरणे टाळावे.
अवांतरः जनरल मोटर्स च्या दिवाळखोरीचे काय झाले?
27 Jul 2012 - 3:33 pm | चौकटराजा
आता हळू हळू जगाला मुक्त अर्थव्यवस्थेचे खायचे दात दिसू लागलेयत. अनावश्यक उत्पादन ( अनावश्यकता ही सापेक्ष) निर्माण करायचे , जाहिराती सारखा अनावश्यक खर्च करून ते लोकांच्या गळी
उतरावायचे व सारा देश या मार्केट तंत्राला जुंपायचा. हे खरे स्वरूप आहे. भारतातील बी सी सी आय ची प्रगती हे याचे उत्तम उदाहरण आहे. रोटी कपडा मकान, आरोग्य, माफक करमणूक कौतुक व प्रेम हे खरे
आयुष्य आहे. दिव्यांचा झगमगाट, सेलेब्रेशन्स, सततचे क्रिकेटचे सामने, हे खरेच जीवन आहे का ? हा खरा प्रश्न आहे. आजही पाणी वीज, आरोग्य , उर्जा , वहातुक, प्रदुषण यांचे प्रश्न कोणत्या मोठ्या कंपनीने सोडविले आहेत? आळसाला, उदासीनतेला थारा नाही असे काहीच फायदे मुक्त अर्थव्यवस्थेचे आहेत.
27 Jul 2012 - 7:35 pm | चित्रगुप्त
मला नेहमी प्रश्न पडतो, टीव्हीवरील अत्यंत टाकावू नाच-गाण्यांच्या कार्यक्रमात शेकडो-हजारो दिव्यांचा झगमगाट, फडफडाट याची काय गरज असते, त्यातून भर म्हणून पार्श्वभूमीला पडद्यावर सतत हलते-चालते चित्रविचित्र भडक आकार, ज्यामुळे कित्येकदा मूळ गायक इ. सुद्धा दिसत नाहीत.... इकडे विजेची टंचाई, भारनियमन, आणि तिकडे असली थेरं...
आणि अगदी महागायक, आयडॉल वगैरे ठरवले जाणारे फक्त नक्कल करू शकतात....