म्हटलं तर इडली नाही तर ढोकळा

युयुत्सु's picture
युयुत्सु in पाककृती
6 Dec 2025 - 11:20 am

म्हटलं तर इडली नाही तर ढोकळा
====================

--राजीव उपाध्ये


परवाच मी धिरडी केली होती. भन्नाट झाली होती. बायकोने तर मिटक्या मारत खाल्ली, मग लेक म्हणाली -"बाबा, या विकेंडला माझ्यासाठी परत करा."

लेकीचा हट्ट पुरवायला काल परत साहित्य जमवायला गेलो तर हवी ती पिठं सापडेनात. म्हणून पर्यायाचा विचार करत असताना हरभरा डाळ आणि पोन्नी तांदूळ शिल्लक असल्याचे लक्षात आले.

मग एखाद्या मुक्तकाव्या प्रमाणे पुढील पाकृ जन्माला आली-

२ वाटी हरभरा डाळ+ १ वाटी पोन्नी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले. मग जवळपास ४ वाट्या पाणी उकळायला ठेवले. पाणी उकळल्यावर धुतलेले डाळ-तांदूळ त्यात भिजवले आणि झाकून ठेवले.

सुमारे दोन तासांनी सदर मिश्रण बर्‍यापैकी थंड झाल्यावर डाळ-तांदूळ पाणी शोषल्यामुळे खुपच फुलले आहेत, असे लक्षात आले. धिरडी करताना मी पिठे ताकात भिजवतो. इथे तसं आता करता येणार नव्हते, असे लक्षात आल्याने आपली वाट आज चुकल्याचे लक्षात आले.

मग इडली-डोसा अंगाचा राग आळवायला सुरुवात केली...

भिजवलेले डाळ-तांदूळ मग मिक्सर मधून बारीक करून घेतले. तयार झालेल्या बॅटरचे डोसे करावेत का इडली या संभ्रमात असताना मनाने वेगळाच रस्ता दाखवला.

थंडी असल्यामुळे बॅटरमध्ये चिमूटभर (पाव चमच्यापेक्षाही कमी) यीस्ट घातले आणि गरम जागी झाकून ठेवले आणि झोपून गेलो.

आज पहाटे उठलो तेव्हा बॅटरची आठवण झाली. ते छान फुगले होते. परत एकदा इडली की डोसा, असा छापा की काटा टाईप कौल लावला. मन म्हणाले, "बॅटर भरपूर तयार झाले आहे, तेव्हा थोड्या पिठाचे डोसे कर आणि थोड्या पिठाच्या इडल्या कर".

पण मग परत पहाटेच्यावेळी इडली-पात्र शोधा ते धुवा, हे सर्व करताना होणार्‍या आवाजाने इतरांची झोपमोड होणार म्हणून पाकृच्या आलापीत ढोकळ्याचे सूर लावायचे ठरवले.

मग,

अर्धा चमचा हळद
अर्धा चमचा लाल तिखट
पाव चमचा हिंग
पाव चमचा दालचिनी पावडर
चवी पुरते मीठ

घालून बॅटर ढवळले. मग एका लंगडीत (आमच्याकडे कुकरच्या भांड्याला लंगडी म्हणतात) सर्व बाजूना तेल लावून ३/४ भांडे भरेल इतके बॅटर कुकरमध्ये शिट्टी काढून उकडायला ठेवले. उरलेल्या बॅटरचे संध्याकाळी डोसे करायचा विचार आहे.

२५ मि०च्या बाष्पसंकारानंतर गॅस बंद केला, सुरीने टोचून व्यवस्थित शिजल्याची खात्री केली. मग लंगडी कुकर मधून बाहेर काढून ठेवली.

आता बर्‍यापैकी उजाडले असल्याने बागेत जाऊन कढीपत्ता आणला आणि हिंग-मोहरीच्या फोडणीची तयारी सुरु केली.

तयार झालेला ’इडला’ आता गार झाला होता. फोडणी कारून ती पसरवून मग तुकडे पाडले आणि एक बारीक तुकडा तोंडात टाकला तेव्हा चव भन्नाट लागली.

पण इडली अंगाचा मस्त रवाळ ढोकळा तयार झाला होता...

टीप- वरील बॅटरमध्ये आलं आणि मिरच्यांचे वाटण घातले असते तर अजून मजा आली असती.

प्रतिक्रिया

चामुंडराय's picture

6 Dec 2025 - 12:47 pm | चामुंडराय

छान प्रयोग.
एकदा एका ठिकाणी इडली पात्रात केलेला ढोकळा (दिसायला अगदी इडली सारखा) खाल्ला होता ते आठवले.

टर्मीनेटर's picture

6 Dec 2025 - 1:23 pm | टर्मीनेटर

म्हटलं तर इडली नाही तर ढोकळा 😀
भारीच! कधी कधी अपघाताने अशा चांगल्या रेसिपीज जन्माला येतात...

गेल्या आठवड्यात घरी एकटाच होतो आणि अचानक 'रोस्टेड टोमॅटो सुप' प्यायची हुक्की आली म्हणुन गुगलवर त्याची रेसिपी शोधली तर ही रेसिपी सापडली होती परंतु इतके कमी पदार्थ वापरुन बनवलेले सुप चवीला मिळमिळीत लागेल अशी शंका आल्याने त्यात काही पदार्थ वाढवले आणि कृतीतही काही फेरबदल करुन बनवलेले 'रोस्टेड टोमॅटो सुप' चवीला तर झकास झालेच होते व त्याचे टेक्स्चर आणि रंगही मस्त आला होता. आता पुन्हा एकदा ते बनवुन त्याची सचित्र रेसिपी टाकतो...

टीप- वरील बॅटरमध्ये आलं आणि मिरच्यांचे वाटण घातले असते तर अजून मजा आली असती.

ह्यात 'लसुण'ही अ‍ॅड करावी अशी एक सुचवणी (ढोकळ्यात चांगली लागते असा स्वानुभव आहे). तसेच फोडणीत मोहरी बरोबर धनेही घालुन बघा त्यानेही स्वाद चांगला खुलतो!

कंजूस's picture

6 Dec 2025 - 2:45 pm | कंजूस

नेहमी करतो.
लवकर करायचे झाल्यास इनो घालतात.
गुजराती ढोकळा /खमण/ इदडा यूट्यूबवर शोधल्यास हजारो विडिओ आणि प्रकार सापडतील.
लसणाची पातळ चटणी किंवा आंबटगोड लोणच्याबरोबर हे पदार्थ चांगले लागतात.

युयुत्सु's picture

7 Dec 2025 - 9:02 am | युयुत्सु

सर्वश्री० चामुंडराय, टर्मीनेटर आणि कजूस

अभिप्राय आणि उपयुक्त सूचनांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!