विसर्जन
वाडीच्या स्टॅण्डवर मी उतरलो, तेव्हा पावसाळ्यातील कुंद हवेत छान गारवा जाणवत होता. एक फक्कड चहा प्यायलाच हवा, असं मस्त वातावरण होतं. मी खूप वर्षांनी एस.टी.ने प्रवास केला होता, पण अल्हाददायक हवेमुळे प्रवासाचा शिणवटा जाणवत नव्हता. मी पहिल्यांदाच वाडीला आलो होतो. समाधान उपाहारगृहामध्ये चहा घेता घेता पत्ता कुणाला विचारावा, याचा अंदाज घेतला. बाहेरगावी मी ज्या व्यक्तीला पत्ता विचारतो, ती बरेचदा त्या गावात नवखी असते. माया अनेक वेळा मला यावरून टोकायची. कसं माहीत नाही, पण तिने पत्ता विचारलेला माणूस अगदी बरोबर पत्ता सांगायचा. माया.. माझी बायको! काही दिवसांपूर्वीच तिचं निधन झालं आणि खरं तर म्हणूनच.. केवळ तिच्या शेवटच्या दिवसातील इच्छेप्रमाणं तिच्या अस्थी घेऊन मी वाडीत आलो होतो. मायाची आठवण काढतच मी हॉटेलवाल्याला पत्ता विचारायचं ठरवून पैसे द्यायला उठलो. मायाइतकीच तिची आठवणही इतकं जबरदस्त काम करेल असं वाटलं नव्हतं. हॉटेलवाल्याला पत्ता नीट माहित नव्हता, पण त्याच्या बाजूला बसलेल्या माणसाने बरोबर पत्ता सांगितला. इतकंच काय, चालत अंतर किती, वेळ किती लागेल तेसुद्धा सांगितलं. त्यांना 'धन्यवाद' म्हणत मी बाहेर पडलो. सामान फारस नसल्याने मी चालत निघालो.
'सद्गुरुकृपा' असं नाव असणाऱ्या घरावर कुणाचीही 'कृपा' नसल्याचं वाटलं. घराबाहेर, अंगणात काही छोटी-मोठी झाडं कशीही वाढली होती. घरावरील कौलांवर हिरवाईचा शालू पसरला होता. तुळशी वृंदावनातील कृष्णतुळस मात्र सुरेख डोलत होती. स्वच्छ सारवलेल्या पडवीत दोन लाकडी खुर्च्या कुणाची तरी वाट पहात बसल्या होल्या. मायाच्या मामेभावाचं हे घर! माया लहानपणीच्या आठवणी सांगताना दादांबद्दल बोलायची. आमचा सुकृत जन्मला, तेव्हाही दादा सुकृतला पाहायला मायाच्या माहेरी आले होते म्हणायची. गेल्या वीस वर्षांत मी त्यांना कधीही भेटलो नव्हतो, कारण दादा अनेकदा कुठल्या ना कुठल्यातरी यात्रेला किंवा तीर्थक्षेत्री असायचे. मायाच्या शेवटच्या दिवसात दादांबद्दल बोलताना माया हळवी व्हायची.
मायाने कधी फार कुठले हट्ट धरले नव्हते, अवाजवी अपेक्षा ठेवल्या नव्हत्या की अवास्तव मागण्या केल्या नव्हत्या. खरं तर त्यामुळेच तिच्या शेवटच्या दिवसांतील बहुतेक सर्व इच्छा मी पूर्ण करायचा प्रयत्न केला. तिलाही तिच्या आजारपणाची कल्पना आली असावी. अगदी शेवटच्या काही दिवसांत तिने मला सांगितलं की "माझ्यानंतर सुकृतला सांभाळा - धीर द्या, बोला त्याच्याशी.. आणि शक्य झाल्यास माझ्या अस्थी वाडीच्या मामेभावाला भेटून विसर्जित करा." त्या दिवशी मला खूप वाईट वाटलं. आयुष्यभर काही न मागणाऱ्या मायाने माझ्याकडे मागून मागितलं तर काय.. अस्थिविसर्जन!
मायाच्या आजाराचं निदान शेवटपर्यंत झालंच नाही, त्यामुळे उपचार केवळ उपचारापुरतेच ठरले. तिच्या आजारपणात सुकृतने तिची खूप काळजी घेतली, सेवा केली. रोज तिला तो इतकं छान आवरायचा की पाहणाऱ्याला ती आजारी वाटायचीच नाही. आमच्या बागेतली चार सुगंधी फुलं रोज तिच्याजवळ ठेवायचा. सुकलेल्या फुलांकडे पाहताना माया हसली की तो हळवा व्हायचा. तिला काय हवंय ते त्याला बरोबर समजायचं. ती आई होती, पण इथे तो तिची 'आई' झाला होता. तिची औषधं, रक्ताच्या तपासण्या, रिपोर्टस्, उपचार सगळं तो पहायचा. माझं मन माया, सुकृतच्या विचारांच्या गर्तेत जाण्याआधीच दादा पडवीत आले.
मी माझी ओळख सांगितली. "मायाच्या अस्थी आणल्या आहेत" अस सांगताच दाराजवळच्या देवळीवजा कोनाड्यात त्या ठेवायला सांगितल्या. मी बाहेरच हातपाय धुऊन आत गेलो. ब्रह्मचर्याची मठी असावी असं मोजकंच सामान, पण नीट लावलेल होतं. दादांनी मला पाणी दिलं. माझी, सुकृतची आस्थेने चौकशी केली. "सुकृतबद्दल आपण नंतर बोलू" म्हणाले. खरं तर मला मायाचं आजारपण, आमच्या मुलाच्या भवितव्याबाबत कुणाशीही बोलायची इच्छा नव्हती आणि पहिल्याच भेटीत दादांशी हे सर्व बोलायची तर अजिबातच गरज वाटत नव्हती. दादा माझ्याकडे पहात गूढसे हसले. मला त्यांच्या त्या हसण्याचा नीटसा अर्थ कळला नाही. तोपर्यंतच ते म्हणाले, "खुप दमलाय तुम्ही.. थोडी विश्रांती घ्या! थोड्या वेळाने मी आपला दोघांचा जेवणाचा डबा घेऊन येतो."
मायाच्या आजारपणामुळे मी कितीतरी दिवस.. कितीतरी महिने कुठे बाहेरगावी गेलोच नव्हतो. आमच्या घरात औषधं-डेटॉल-फिनेल आणि आजारपणाचा एक संमिश्र वास भरून राहिला होता. दादांनी देवासमोर उदबत्ती लावली. त्या चंदनाचा मंद सुवास मला सुखावून गेला. काही वेळा किती सामान्य, छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्याला आनंद मिळतो.. फक्त तो उमगायला, समजायला आपल्याला त्यापासून वंचित का रहावं लागतं? एखादी गोष्ट जवळ असताना, सहज उपलब्ध होणार हे माहीत असतं, तेव्हा त्याची किंमत - महती समजत नाही..पण तीच गोष्ट अप्राप्य, दुर्लभ झालेली समोर आली की अगदी 'अहाहा!' असं होतं. माया असताना मला रोज मिळणार घरचं जेवण, नीटनेटकं सुव्यवस्थित घर सहज मिळत होतं. मायाची तब्येत बिघडली आणि मग स्वयंपाकीण बाई, जेवणाचा डबा, पोळी-भाजी केंद्रावरचं तिखट, मसालेदार अन्न जेवायला लागल्यावर त्या साध्या, चवदार, घरच्या जेवणाचं महत्त्व समजलं. माया गेल्यावर घराचं घरपण ओसरलं, वस्तू लपंडाव खेळू लागल्या आणि सुनियोजित नीटनेटक्या घराचं अप्रूप का वाटतं, ते लख्ख समजलं.
दादांचा पत्रिका, ज्योतिष, अनेक पोथ्या-पुराणाचं वाचन, त्यांचा अभ्यास ज्ञान छान असल्याचं माया म्हणाली होती. त्याची साक्ष दादांच्या घरी आल्यावर पटली. अनेक ग्रंथ-पोथ्या, ते वाचण्यासाठी मुद्दाम ठेवलेलं घडीचं लाकडी ग्रंथासन, जपमाळा आणि ॐकारसाधनेला उपयुक्त मोठी तसबीर होती. उपासना करणाऱ्या दादांकडे माझे लक्ष गेलं. शांत लयीत श्वास घेणारा त्यांचा देह एका वेगळ्या विश्वात पोहोचला होता. चेहरा अगदी प्रसन्न, समाधानी दिसत होता. दोन मिनिटांनी दादांनी डोळे उघडले आणि पुन्हा एकदा ते माझ्याकडे पाहून हसले.
"खूप भूक नाही ना लागली? आठ वाजेपर्यंत मी जेवणाचा डबा आणतो." त्यांनी जेवणाचा डबा पुसायला घेतला.. मी मानेनेच होकार दिला. आमचा संवाद असा तुटक तुटक होत असल्याने उगाचच संभाषणात एक अवघडलेपणा येत होता. दादांकडे मी पुन्हा कधी येईन असं वाटत नव्हतं, त्यामुळेच मी ठरवलं, 'ज्यांना मी ह्याआधी कधीही भेटलो नाही, पुढे भेटायची फारशी शक्यता नाही, त्यांच्यासमोर आपण का मुखवटा घालायचा? का त्यांना बरं वाटेल, त्यांच्याकड बरं दिसेल असं वागायचं? उलट मोकळेपणाने जे मनात येईल, वाटेल ते बोलू - विचारु - सांगू. कुठे परत भेटणार आहोत आम्ही दोघेही!' त्या क्षणी अचानक मला ते मायाचे भाऊ नसून माझे जवळचे मित्र असल्यासारखे वाटायला लागले.
"उद्या सकाळी अस्थिविसर्जन किती वाजता करू या?" मी संवाद सुरूच केला. ते म्हणाले, "उद्या एक चांगला ग्रहयोग आहे. मायाला लवकर मुक्ती मिळेल." "दादा, अस्थिविसर्जन करावं लागतंय यासाठीचा योग चांगला कसा असेल? तुमचा फलज्योतिष-ग्रह तारे यांचा अभ्यास आहे ते मला माहीत आहे.. पण 'अस्थिविसर्जना'चा योग चांगला आहे, हे मला फारसं पटत नाही."
"अभ्यास तर अजूनही माझा सुरूच आहे.. पत्रिका, ग्रहतारे, त्यांची स्थिती मला विलक्षण अचंबित करतात.. महाभारतातले दाखले वाचताना समजतं की हे शास्त्र- त्याचा अभ्यास आपल्या पूर्वजांनी किती निष्ठेने केला होता. त्याचे दाखले पाहिले की विश्वास बसतो आणि मी ग्रहदशा मानतो. तुम्ही पंचमहाभूतांना मानता ना?" मी मानेनच होकार दर्शवला.. तसं ते म्हणाले, "तुमच्यासाठी तोच ईश्वर! मायाची मृत्युतिथी, वेळ पाहता तिच्यासाठीचा योग मला उत्तम वाटतो. तुम्ही तुमचं जवळच माणूस गमावलंय.. तुम्हाला आत्यंतिक दुःख होणं स्वाभाविक आहे. तुमच्याजागी तुम्ही बरोबर आहात. मायाच्या आजाराचं निदान का झालं नाही? तिचं असं अवचित जाणं हे सगळं मला ग्रहदशा दाखवते, म्हणून माझा विश्वास आहे." तिच्या आजाराचं निदान झालं नव्हतं, हे दादांना कसं माहीत? मी अचंबित होऊन स्पष्ट विचारलं, "दादा, माया आजारी पडणार, तिला अकाली मृत्यू येणार हे तुमच्यासारख्याला माहीत होतं, तर का नाही प्रयत्न केले तिला वाचवायला? आता तिच्या मृत्यूनंतर काय उपयोग ह्या तुमच्या ज्ञानाचा? तिच्या मृत्यूचं कारण न समजल्याने मी आजही अस्वस्थ होतोय. आता तरी तिच्या मृत्यूचं कारण तुम्ही सांगू शकता?" दादा पुन्हा गूढसे हसले.. एक मिनिट विचित्र शांतता पसरली. संध्याकाळच्या कातरवेळी ती शांतता जास्तच भयाण झाली. दादा म्हणाले, "जन्मासोबत मृत्यू अटळ आहे. तो थांबवणं म्हणजे पुढचा प्रवास लांबवणं असं आम्ही मानतो. पण तुमची अस्वस्थता मी समजू शकतो. मी सांगतो म्हणून एक प्रयोग करून पहा - माझ्या इतक्या पोथ्या-पुस्तकांतून तुम्हीच कोणतीही पोथी, पुस्तक हातात घ्या. तुमच्या मनास येईल ते पान उघडा आणि वाचा. तुमचं उत्तर तुम्हाला मिळेल. खरी अडचण अशी असते की आपण ज्ञान घेऊन विश्वास ठेवण्याआधी शंकाच फार घेतो आणि त्यात गुरफटून गेल्यावर म्हणतो, 'मला अनुभव आला नाही - माझा विश्वास नाही. त्यासाठी तुमचे ज्ञानचक्षू, मनाची कवाडं उघडा तरी! संदेश आले, तरी ते ग्रहण करण्याची शक्ती, पात्रताही हवीच !"
मी एक ग्रंथासारखं दिसणारं पुस्तक घेतलं. त्यातलं मधलंच पान उघडलं. दुसरीच ओळ अशी होती - 'कुंडलीतल्या ग्रहांच्या अधिकाराची मर्यादा देहापर्यंतच आहे. देहबुद्धी आहे तोवर 'मी देही आहे' ही भावनाच सत्य वाटते.' मी पुस्तक बंद केलं. दादा म्हणाले, "तुम्हाला स्वत:ला अनुभव येईल, फक्त तुम्ही तुमच्याकडे येणाऱ्या संकेताना नीट समजलं पाहिजे, जाणलं पाहिजे. अनुभव घेण्यासाठी स्वत:ला तयार केलं पाहिजे. माझं शास्त्र सांगतं, मायाचा मृत्यू तिच्या रक्तातील दोषामुळे झाला. नेमकं कारण मला माहीत नाही, पण तुम्हाला उकल होते का पहा!"
मायाच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी "यांना रक्त द्यावं लागेल!" असं डॉक्टर म्हणाले होते. सुकृत तिचं सॅम्पलचं रक्त घेऊन गेलाही होता रक्तपेढीत.. पण रक्त का दिलं नाही, ते मात्र मला आठवेना. तिच्या मृत्यूमुळे तो प्रश्नही विचारावा लागला नव्हता. मायाच्या ह्या आजारपणात मी आणि सुकृत फारसे बोललोही नव्हतो.. तिच्या जाण्यानंतरही आवश्यक तेवढंच बोलणं होत होतं. गेल्या वर्षभरात तर त्याचं आणि माझं नातं जरा ताणलेलंच होतं. अनेकदा 'माहिती देणं आवश्यक आहे' ते आणि तेवढंच आमच्यात संभाषण व्हायचं.
गेल्या वर्षी त्याच्या वाढदिवसाला मी थोडी मोठी रक्कम 'त्याच्या बाइकसाठी त्याला देणार' असं सांगितल्यावर त्याने माझ्याकडे ते पैसे ज्या कारणासाठी द्यावेत असं सांगितलं, ते मला पटलंच नव्हतं. ते कारण - ते उपाय - तो विषय काहीही.. पटलंही नव्हतं आणि आजतागायत पचलंही नव्हतं. पैसे मी त्याच्यासाठी खर्चायला तयार होतो, पण त्याच्या त्या कारणाने मी अस्वस्थ झालो. लगेचच मायाचं आजारपण सुरू झालं आणि मी त्या विषयावर माती टाकली. आजही ते पैसे बँकेत वाट पहात आहेत. मायांच्या मृत्यूनंतर सुकृतने तिचं नेत्रदान, त्वचादान करू या म्हणून सुचवलं. पण केवळ 'त्याने' विचारलं, म्हणून मी त्याला नकार दिला. माझ्या मनात त्याच्याबद्दल इतकी अढी बसली होती. सुकृत सांगत होता "बाबा, तिचे प्राण गेले तरी त्वचा-डोळ्याच्या पडद्यात जीव आहे. ती जिवंत राहिली तर मला तिच्या डोळ्यांनी बघेल." पण मी का कुणास ठाऊक, अडून राहिलो. माणूस वारला तरी पुढे किमान काही तास त्याचे काही अवयव जिवंत कसे काय राहतात? आपण 'माणूस मेला' म्हटलं, तरी काही अंशी जिवंत असतोच.. काही पेशींमध्ये जीव असतो, तर त्याला तोपर्यंत जिवंतच म्हटलं पाहिजे... म्हणजे माया गेली, तेव्हा ती काही अंशी जिवंत होती. माया आणि सुकृतच्या आठवणीने डोळे पाण्यान भरले. 'दानात शाश्वत आनंद असतो' तर मग मी मायाचे नेत्रदान करायला हवं होतं का? मी वेगळ्याच विचारात गेलो.. त्या विचारात मला कधी डुलकी लागली, तेही समजलं नाही.
घरातल्या फोनमुळे मला जाग आली. उठलो, तर दादा कुठे दिसेनात. बाहेरही चांगलं अंधारलं होतं. दादा बहुतेक डबा आणायला गेले असावेत. मीच उठून फोन घेतला. मी काही बोलायच्या आत पलीकडच्या व्यक्तीने बोलायलाच सुरुवात केली. "नमस्कार, माउलींच्या आदेशाप्रमाणे तुम्हाला फोन केलाय.. जे झालं ते झालं. तुम्हीहि घडून गेलेल्या गोष्टी धरून ठेवू नका. भूतकाळातलं सोडून वर्तमानकाळात पाहू या.. वर्तमानातल्या गोष्टी मान्य केल्यानेच सकारात्मक बदल होणार. बघा, जितकं लवकर मान्य होईल, तेवढं लवकर पुढे जाता येईल.. विचार करा.. नमस्कार! ठेवतो फोन." मला काही बोलायची संधीही न देता फोन बंद झाला. दादांना आल्यावर मी निरोप सांगेन, पण फोन कुणाचा ते त्यांना समजेल अशी आशा करत मी खोलीतला दिवा लावला.
मघाशी वाचलेलं पुस्तक नीट जागेवर ठेवलं आणि सहजच एक चकचकीत कव्हरचं थोड नवंकोर पुस्तक दिसलं. इतक्या जुन्या ग्रंथांत ते अगदीच वेगळं उठून दिसत होतं. मघाशी कसं काय दिसलं नाही हे पुस्तक असं वाटलं. सुकृतबद्दलचा प्रश्न मनात घेऊन मी मघासारखं या पुस्तकाचं पान उघडलं. पुस्तक चक्क इंग्लिश होतं. काही आकृत्या, रंगीत फोटो होते. चौकोनी, षटकोनी A-T-C-G अशी असंबद्ध अक्षरं जोडणारी एक मोठी आकृती होती. ती पाहताना मला आमच्या गच्चीवर जाणाऱ्या गोल वळणाच्या जिन्याचीच आठवण आली. पिळाचा जिना काही ठिकाणी तुटक दाखवला होता. त्या क्षणी मला 'बरं झालं! आपण सायन्स साइड घेतली नाही!' असं वाटलं. पुढच्या पानावर तुटका जिना पुन्हा जोडल्याची रंगीत चित्रं होती. एका गोंडस बाळाचा फोटो होता. त्याखाली K.J. असं नावही लिहिलेलं होतं. त्यापुढे मोठ्या अक्षरात CRISPR BABY असं लिहिलं होतं. 'दादांकडं हे पुस्तक कसं' असा विचार करत मी पुस्तक बंद करताना त्यातून एक बुकमार्क पडला. त्यावर एका बाजूला 'जे ज्ञान समाधान देत नाही, ते खरे ज्ञान नाही' असं लिहिलं होतं आणि मागच्या बाजूला 'माझे ते खरे म्हणू नका.. खरे ते माझे म्हणा!' असे विनोबा भावेंचं वचन लिहिलेलं होतं.
मी पुस्तक जागेवर ठेवण्याआधीच दादा डबा घेऊन आले. माझ्या हातातील पुस्तक आणि चेहर्यावरचं मोठं प्रश्नचिन्ह वाचून हसून म्हणाले, "हे पुस्तक गुणसूत्रांचा अभ्यास करणाऱ्या एकांचं आहे. ते सध्या जुन्या ग्रंथांमधील श्लोक, वचनं आणि नव्या युगातील शोध, तंत्रज्ञान यामध्ये पूलबांधणीचं काम करत आहेत. त्यांच्या मते आपल्या वेद-ग्रंथांमध्ये अनेक आश्चर्यकारक पुरावे आहेत. पण पुराण जाणणाऱ्यांना नवीन तंत्र, प्रयोग माहीत नाहीत आणि नव्या ज्ञानाने उजळलेल्याना पुराणं ज्ञान घेण्याइतका वेळ नाही!"
मी म्हणालो, "दादा, पूर्वी कुठे होते सूक्ष्मदर्शक? गुणसूत्र, त्यांच्या रचना-दोष हे सगळं समजायला आवश्यक साधनं नसताना हे ज्ञान इतक्या पुराण पोथ्यात कसं असेल? मला तर हे पटतच नाही."
दादा म्हणाले, "ह्या साधनांची आवश्यकता आत्ताच्या आपल्या लोकांना जाणवते, कारण आपण स्वत:ला सूक्ष्म-अतिसूक्ष्म करायची क्षमता न वापरल्याने गमावली असेल. साधनं नव्हती, पण निरीक्षणं-अनुमान-अनुभव होते. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे वेगळे, नवे अनुभव येणार याची तयारी होती. ज्ञानावर श्रद्धा होती. श्रद्धेने कार्य केलं, तर परिणाम दिसणार! अगदी साधं-सोपं तुम्हाला पटेल असं उदाहरण बघा. डॉक्टरांवर श्रद्धा, विश्वास ठेवून त्यांनी दिलेली औषधं-गोळ्या मुकाट घेतो. खातरी बाळगतो की 'ह्यामुळे मला बरं वाटणार' आणि बरं वाटलं की श्रद्धा अधिक दृढ होते."
"दादा, त्याचा अनुभव स्वत:ला येतो, म्हणून पटते खातरी."
"मायाच्या बाबतीत मृत्यूचं कारण सापडलं नाही, तरी विश्वास डळमळला नाही तुमचा डॉक्टरी ज्ञानावरचा! विश्वास ठेवलाही पाहिजे आणि कारणंही शोधली पाहिजेत. पूर्वी कुठलीही साधनं नसताना ग्रह-तार्यांच्या गती-स्थिती, त्यांची केलेली निरीक्षणं आजही अचूक येतात. आपल्याला सूर्य उगवतो-मावळतो असं वाटतं, पण प्रत्यक्षात आपण फिरतोय ना त्याच्याभोवती? आपल्याला तेच सत्य वाटतं, जे आपल्या इंद्रियांना जाणवतं. कितीतरी गोष्टी अनुभवायाला आपली ज्ञानेंद्रियं कमी पडतात! आपल्यापासून कितीतरी प्रकाशवर्षं दूर असणारे अरुंधती-वशिष्ठ हे दोन तारे 'जोडतारे' आहेत, हे पूर्वजांना कस दिसलं? हिंदू धर्मात लग्नानंतर नवदांपत्याला त्यांचंच दर्शन घेण्यासाठी का सांगतात? आपण विचार केला पाहिजे." दादांचं म्हणणं काहीसं पटत होतं.
दादाच पुढे म्हणाले, "माझ्याकडे निळावंती पोथी आहे. त्याच वाचन करून, त्याबद्दल जाणून घ्यायलाही एक पक्षितज्ज्ञ अभ्यासक येतात. असा समज आहे की निळावंतीचं वाचन केलं, ती समजली की त्या व्यक्तीला पशुपक्ष्यांची भाषा समजते. काहींना वाटतं, त्याने माणूस वेडा होतो. काहींना वाटतं, गुप्तधनाचा मार्ग समजतो. गुप्तधन हे 'गुह्य ज्ञान' असू शकतं. प्रपंचात - कर्मकांडात बुडालेल्या सर्वसामान्य व्यक्तीला पशुपक्ष्यांची भाषा जाणून, पैसा-प्रसिद्धीपासून दूर जाणारी व्यक्ती 'वेडी'च वाटणार. मी तुम्हाला वेडा वाटतो का? मी वाचलीय, अभ्यासलीय ती पोथी!"
मी दादांना मानेनेच नकार दिला. दादांनी डब्यातील अन्न दोन ताटात वाढायला घेतलं. दादा म्हणाले, "असं बघा - पशुपक्ष्यांची भाषा आपल्याला समजत नाही. निळावंतीबद्दल तुम्हाला माहीत नाही. पण आता मानसशास्त्रात, आजच्या युगात प्राण्यांचं-पक्ष्यांचं म्हणणं ऐकणारी-सांगणारी माणसं तुम्ही मोबाइलवर पाहता, ती मान्य करता. ज्ञानोबा माउलींनी रेड्यामुखी वेद वदवले, तर ते तुम्ही खोटं ठरवता - कारण ते तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेल नाही. मात्र प्राणी-पक्षीच काय, भिंत-घरं अशा निर्जीव वस्तूंशी बोलणाऱ्या व्यक्तींना तुम्ही मान्यता देता. अहो कासव, मुंग्या, जीवजंतू, झाडं-वेली सगळी बोलतात हो, पण ते आपल्याला ऐकू येत नाही, म्हणून आपण मान्यच करू शकत नाही. झाडं बोलतात हे अनेक वर्षांपूर्वी मान्य नव्हतं. आता झाडांची मुळं एकमेकांशी संभाषण करतात, हे विज्ञान प्रयोगांनी सिद्ध केलं. पूर्वी परदेशस्थ व्यक्तीला पाहणं, बोलणं अशक्य वाटलं होतं. आता ते सहज सोपं झालंय. ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान सगळं एकाच मार्गावर आहे. विज्ञानप्रेमींना अनेकदा वाटतं, ह्या ज्ञानमार्गावर पुढे, भविष्याकडे पाहणं म्हणजे विज्ञाननिष्ठ प्रगत दृष्टीकोन! मला वाटतं, सिंहावलोकन करत कधीतरी पुन्हा मागचे दाखले नव्या नजरेने पाहणं म्हणजे प्रगती! दुर्दैवाने आत्ताच्या दिवसात माणसं चमत्काराला 'नमस्कार' करतात आणि ज्ञान,सिद्धी मिळालेले त्याचं 'प्रदर्शन' करतात. आपल्याला जे दिसतंय, समजतंय तेच शंभर टक्के खरं आणि बरोबर आहे हा आपलाच हट्ट, पूर्वग्रह असतो. आपल्याला रंगीत दिसणारी फुलं पक्ष्यांच्या डोळ्यांना वेगळी दिसतात, फूलपाखरांना वेगळी दिसतात. ग्रहणाचा चंद्र प्रत्यक्ष डोळ्यांना वेगळा दिसतो आणि कॅमेऱ्याच्या प्रतिमेला वेगळाच दिसतो. कुठलं खरं समजायच? आपण स्वत:ला शहाणे, प्रगत म्हणवतो, पण आजही वनस्पतीसारखं आपण आपलं अन्न तयार करू शकत नाही! बघा ना.. म्हणून हे असं अन्न तयार करवून आणाव लागतं!" दादांनी हसतहसत मला ताट दिलं. "सावकाश, पोटभर जेवा" म्हणाले.
स्वतःचं म्हणणं शांतपणे सांगायची दादांची पद्धत, युक्तिवाद वादाकडे न जाण्याची लकब मला आवडली. मला आता जेवणाइतकीच त्यांच्याशी गप्पा मारायचीही भूक लागली. दादा बोलताना कुठेही टोकाचं, अती ठासून, दुराग्रहाने बोलत नव्हते. स्वत:चं म्हणणं सांगताना नर्मविनोदाने संभाषण हलकंफुलकं ठेवत होते. जे जसं आहे ते तसं स्वीकारायची त्यांच्या मनाची स्वीकृती मला फारच आवडली. जेवण साधं होतं, पण रुचकर होतं. "कितीतरी दिवसांनी मी घरचं सात्त्विक अन्न खातोय!" मी पावती दिली. दादा हसत म्हणाले, "अहो, ते आपल्या आणि करणाऱ्याच्या वृत्तीवर असतं. ह्या ताई स्वयंपाक करताना आनंदी असतात. त्याच्या वाट्याला आलेलं हे क्षुधाशांतीच काम जणू देवपूजा करावी इतक्या श्रद्धेने करतात. मन त्यात असलं की सगळं सामान तेच असलं तरी पदार्थ चवदार होतो." हसत, गप्पागोष्टी करत आमची जेवणं झाली. दादांनी त्यांचं ताट अगदी स्वच्छ केलं. त्या ताटातच पाणी घेऊन ते पाणी प्यायलेही. मला आता दादा एखाद्द्या पर्यावरणप्रेमी निसर्गसेवकासारखे वाटायला लागले. इतक्या छान व्यक्तीला मी इतकी वर्षं का भेटलो नव्हतो, असं वाटलं. माया आता असती, तर मी तिला नक्कीच हे सांगितलं असतं. माया असताना ह्यांच्याकडे कधीच का नाही आलो? अशी चुटपुट लागली. मनात आलं.. 'माया गेली, म्हणूनच आताही भेटतो आहे!' प्रत्येक गोष्टीची वेळच यावी लागते. परत गेल्यावर सुकृतला 'यांना भेट' असं सांगायचं ठरवलं. हात धुताना 'सुकृतबद्दल बोलावं का त्यांच्याशी?' असं वाटलं.
सुकृतचा - त्याच्या विचित्र मागणीचा विचार आला तरी आताही मला कसंसंच झालं. दादांना हे सगळं कसं सांगावं? सांगावं की बोलूच नये? आजच भेटतोय त्यांना.. पण उद्या परत गेल्यावर ह्या प्रश्नाला - समस्येला कधीतरी लवकरच सामोरं जावं लागणार होतं. माझी शांतता ओळखल्यासारखं दादा म्हणाले, "बोला. सुकृतचं काय चाललंय? काय म्हणतोय?" खरं तर साधेच प्रश्न, पण ते अशा नेमक्या वेळी विचारल्याने फारशी लपवालपवी न करता मी आत दाबून ठेवलेलं सगळं बोलायला लागलो.
"दादा, सुकृतच्या ह्या वाढदिवसाला मी त्याच्यासाठी छान बाइक घेणार होतो. त्याच्यासाठी खास प्रेझेंट! मी त्यासाठी त्याला पैसे ठेवलेत असं सांगितलं, पण त्याने ते पैसे मी त्याला वेगळ्या कारणासाठी देणार असाल तर द्या, असं सांगितलं." मी एक मोठा श्वास घेतला आणि म्हणालो, "दादा, त्याला 'मुलगी' व्हायचंय! स्वत:चं लिंगपरिवर्तन करून घ्यायचंय. ते पैसे तो त्यासाठी वापरणार म्हणतोय! दादा, तुम्हीच सांगा.. एक बाप म्हणून मी त्याला कशी परवानगी देऊ हे असं करायला?"
दादा ताठ बसले. त्यांनी डोळे मिटून खोल श्वास घेतले. शांतपणे मला म्हणाले, "तो परवानगी नाही, तुमची स्वीकृती मागतोय, त्याच्यातील स्त्री तत्त्व त्याला व्यक्त करायचंय. त्याची आंतरिक ऊर्जा, शक्ती त्याला प्रवृत्त करतीय.. आणि खरं तर ह्यामध्ये त्याची चूक काय आहे? निसर्गतः मिळालेल्या शरीराबद्दल तुम्ही त्याला चुकीचं, गैर ठरवताय, कारण फक्त त्याला 'तुमच्यासारखं' वाटत नाही. काही प्राण्यात नर-मादी वेगळे नसतात. ते आपल्याला गैर वाटत नाही. प्राण्यांमधले गांडूळ,जळू असे प्राणी दोन्ही प्रजोत्पादन अंग सांभाळतात. फुलांमध्ये स्त्रीकेसर-पुंकेसर दोन्हीही असतात. पण झाड फुलाला कधी हिणवत नाही की चूकही समजत नाही. गुलाबासारखी कित्येक फुलं फुलतात, पण फळत नाहीत. गुलाबाच्या फळणाऱ्याही प्रजाती आहेत, पण म्हणून निसर्गात त्यांना कोणी विशेष दर्जा देत नाही. तुम्ही शांतपणे विचार करा - स्वीकारा अथवा नाकारा, पण त्या निर्णयाची जबाबदारी घ्या. तुम्ही आणि तो एकटे पडाल असं व्हायला नको. माया अनंताच्या प्रवासाला जाताना तुमची, त्याची काळजी का करत गेली.. आठवा!" एक विचित्र शांतता खोलीत पसरली. दादाच पुढे म्हणाले, "स्वामित्व ही कठीण गोष्ट आहे, त्याची किंमत मोठी असते."
"दादा, मला समजेल असं सांगा. मी त्याचा प्रस्ताव स्वीकारावा असं सुचवताय का? स्वीकारला ऑपरेशनचा पर्याय, तर तो माझ्यासोबत रहावा हा स्वार्थी विचार नाही का? नाकारला प्रस्ताव, तर सोबत कुणी नसेल तर ते पैसे काय कामाचे? दादा, तुमच्या शास्त्रात काही नाही का उपाय?"
"थोडंसं आठवा.. ह्या शास्त्रावर तुमची श्रद्धा-विश्वास आहे का? अडचणींच्या वेळी शास्त्र मानणं ही तर अंधश्रद्धा! तुम्ही विवेकी विचाराने निर्णय घ्या. आमचे गुणसूत्रांचे अभ्यासक स्नेही सांगत होते. नुकतेच क्रिस्पर टेक्नॉलॉजीने गुणसूत्रात आवश्यक बदल करून KJ नावाचं बाळ जन्माला आलंय. तसं पाहिलं, तर जनुकीय आई-बाबांइतकाच जैविक बदल करणारे शास्त्रज्ञही त्याचे जैविक माता-पिताच! पण सर्वांनी बाळासाठीचा योग्य निर्णय घेतला आणि पेलला. भविष्यात जीन एडिटिंगने माणूस अमरत्वाचा ध्यासही धरेल.. पुराणात अमरत्व-अमृताच्या कथा आहेतच. बघा, पुराणात आहे ते नवं तंत्रज्ञानही शोधू पाहतंय. रामायण-महाभारत काळातही तृतीयपंथीय, क्लिब होते. पण त्या काळच्या समाजाने त्यांना नाकारलं नव्हतं, तर सहज स्वीकारलं होतं. मग तुम्हीच ठरवा तेव्हाचे लोक प्रगल्भ की आत्ताचे आपण? शिखंडी, अर्जुन यांची उदाहरणं आपल्याला माहीत आहेत, कारण कुठेतरी त्याची नोंद झाली. माहीत नसणारे अनेक जण तेव्हाही असतील. आता वैद्यकीय प्रगतीने अंतर्बाह्य दोन्ही बदल शक्य आहेत." दादांनी माझ्याकडे प्रेमळपणे पाहिलं आणि म्हणाले, "तुम्ही आज विश्रांती घ्या. उद्या अस्थिविसर्जनानंतर बोलू. इतकंच सांगतो.. तुम्हाला अनुभव येतील, संकेत मिळतील, माहिती समजेल, ती नीट जागरूकतेने पहा. प्रत्येक गोष्टीचे प्रयोग मी स्वतःच करणार आणि मला आलेलं अनुमान, निरीक्षण फक्त खरं मानणार असं झालं, तर शास्त्र पुढे कसं जाणार? पूर्वीच्या पिढीच्या प्रयोगांचा, अनुभवांचा फायदा घेतला पाहिजे. ज्ञानासाठी, विज्ञानासाठी स्वतःला खुलं मुक्त करा!"
दादाच पुढे म्हणाले, "तुम्ही आता विश्रांती घ्या. मी थोडा वेळ ध्यान करणार आहे." मी पाणी पिऊन अंथरुणावर आडवा झालो. मघाशी सुकृतचा प्रश्न मनात धरून मी त्या पुस्तकातील नेमकं जे पान उघडलं, तेच दादांनी समजावून कसं सांगितलं? मनात आलं - 'सुकृतला मी आत्तापर्यंत फक्त माझ्या बाजूनेच पहात होतो. त्याच्या इतक्या वर्षांच्या त्रासाची मी कधी कल्पनाच केली नव्हती. मला आमचं मूल असं आहे हेच पचवणं झेपलं नव्हतं. त्या क्षणी सुकृतला जवळ घ्यावं, त्याच्याशी बोलावंसं वाटलं. मग मी ठरवलं, उद्या अस्थी विसर्जित करताना हे मायाला आधी सांगायचं आणि घरी गेल्यावर प्रत्यक्ष भेटल्यावर सुकृतलाही! त्या क्षणी मला शांत वाटलं आणि अचानक आठवलं की दादानां मी मघाशी आलेल्या फोनचा निरोप सांगितलाच नाही. ते पार विसरलो. मनातल्या मनात निरोपाची उजळणी केली आणि झोपलो.
रात्री मस्त झोप लागल्याने सकाळी प्रसन्न वाटत होतं. दादा माझ्या आधीच उठले होते. मला चहा देऊन आवरायला सांगितलं. आम्ही दोघे अस्थी घेऊन नदीवर गेलो. दादांनी काही मंत्र म्हटले आणि मला म्हणाले, "प्रवाहात अस्थी विसर्जित करा आणि जे तुम्हाला मायाला सांगायचं असेल ते सांगा. तिच्यापर्यंत पोहोचेल!" काल रात्री मी मनात ठरवलेलं यांना कसं समजलं? असं वाटलं. घाटाच्या पायर्या उतरताना दादा म्हणाले, "मी पोहत पलीकडे जाणार आहे. तुम्ही इथलं झाल्यावर घरी जा. तुमच्यासाठी न्याहरी तयार ठेवलीय. तुमचं आवरलं की दार लोटून परतीला निघा. आत्ताही मी तसंच केलंय. मला थोडा वेळ लागेल. माझी वाट पाहू नका.. आणि हो, काल तुम्ही पत्ता विचारलात, त्यांनी तुमचे चहाचे पैसे दिलेत."
हातातील अस्थींकडे पहात मी सद्गदित होऊन म्हणालो, "दादा, माया आत्ताही माझ्यासोबत आहे. आम्हा उभयतांचा तुम्हांला नमस्कार. तुम्हाला भेटायला मी उशीर केलाय, पण आता सुकृतबरोबर येईन!" दादांनी 'तथास्तु' म्हणत आशीर्वाद दिला आणि नदीत बुडी मारली.
मायाला आयुष्यभर न सांगू शकलेलो सगळं त्या क्षणी सांगितलं आणि मनातील अविचाराची जळमटं, सुकृतच्या निर्णयाबद्दलचा आकस, मायाच्या आकस्मित जाण्याने झालेली अस्वस्थ, अंधारी पोकळी सगळं सगळं अस्थींबरोबर नदीत 'विसर्जन' केलं. पाण्याचं तीन वेळा अर्घ्य देऊन उगवत्या सूर्याला नमस्कार केला. डोळे मिटताच डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. त्याअवस्थेत खुप शांत वाटलं. ती शांती खोलवर साठवली, डोळे उघडले आणि दादा कुठे पोहोचले ते पाहिलं. ते कधीच पैलतिरावर पोहोचले होते. मी प्रपंचाच्या काठावर, तर ते परमार्थाच्या काठावर असल्यासारखे भासले. 'माझ्या प्रपंचातील अनुभवांना सामोरं जाण्याची आणि तरीही प्रवाही राहण्याची प्रेरणा मिळो' असं नदीला सांगून भारलेल्या मनाने मी घरी निघालो.
परतीच्या वाटेवर असतानाच सुकृतला फोन केला. 'मायाचं अस्थिविसर्जन कार्य' नीट झाल्याचं सांगितलं आणि आजच घरी परत येतोय म्हणालो. सहज आठवलं म्हणून त्याला विचारलं, "आईला आपण रक्त देणार होतो, ते का दिलं नव्हतं रे?" सुकृत म्हणाला, "बाबा, तुम्हाला पटणार नाही, पण आईचा रक्तगट नेहमीच्या कुठल्याच रक्तगटात बसणारा नव्हता. कुठलंच रक्त मॅच होत नव्हतं. कालच त्या रक्तपेढीतून फोन आला होता. हा पाचवा नवा रक्तगट असल्याचं त्यांनी सांगितलं!" माझ्या कानांवर माझाच विश्वास बसेना.
मी घराजवळ आलो. 'सद्गुरुकृपा' घरावर आता मला कुणाचीतरी असीम कृपा आहे असं वाटलं. दादांनी ठेवलेली न्याहरी केली, माझं सामान आवरलं. मी निघणार, इतक्यात फोन वाजला. 'अरे, मी दादांना कालचा निरोप सांगायचा आजही विसरलो' हे त्या क्षणी आठवलं. फोन घेताच समोरची व्यक्ती म्हणाली, "नमस्कार! ज्याचा आनंद कायम टिकतो, त्याच्या जन्माचं सार्थक झालं. परिस्थिती स्वीकारण्याचं धैर्य मिळणं महत्त्वाचं होतं. तुम्ही आलात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.. ठेवतो!" हे दोन्ही निरोप मी दादांना द्यायला हवेत, पण गडबडीत मी दादांचा फोन नंबरच घेतला नव्हता. त्यांचा संपर्क क्रमांक कसा मिळवावा, याचा विचार करत दोन्ही निरोपांची मी मनातल्या मनात उजळणी केली. अचानक माझ्या लक्षात आलं, 'हे दोन्हीही निरोप माझ्या परिस्थितीत मला अगदी मार्गदर्शक, सूचक ठरावेत असेच होते. खरंच हे निरोप दादांसाठी होते की माझ्यासाठीच? हा निव्वळ योगायोग की संकेत?' दादांशी पुन्हा संपर्क साधायचा झाला, तर इथला नंबर माझ्याजवळ हवाच.. काय करावं असा विचार करताना एक आयडिया सुचली. 'इथल्या नंबरवरून माझ्या मोबाइलला रिंग दिली की मला इथला संपर्क क्रमांक मिळेल!' मी त्यांच्या फोनवरून माझा मोबाइल नंबर डायल केला. मला आता माझ्याच डोळ्यांवरही विश्वास बसेना.. माझ्या मोबाइलवरील रिंग वाजत होती, पण माझ्या हातातील मोबाइल स्क्रीनवर कुठलाच नंबर उमटलेला नव्हता!
प्रतिक्रिया
20 Oct 2025 - 1:32 pm | गवि
फारच सुंदर कथा. ओघवती.. काहीशी गूढ, काहीशी रम्य. आवडली.
23 Oct 2025 - 2:13 pm | निमी
तुमची प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे.. खूप खूप आभारी आहे.
20 Oct 2025 - 3:34 pm | श्वेता२४
सुरुवात केली आणि वाचत शेवट कधी आला कळलं नाही. आवडली कथा.
23 Oct 2025 - 2:12 pm | निमी
मनःपूर्वक धन्यवाद..आपल्या शाबासकीमुळे लिखाण करण्याची नवी उर्मी आली.
22 Oct 2025 - 1:22 pm | कर्नलतपस्वी
पुराण जाणणाऱ्यांना नवीन तंत्र, प्रयोग माहीत नाहीत आणि नव्या ज्ञानाने उजळलेल्याना पुराणं ज्ञान घेण्याइतका वेळ नाही!"
हेच काय पण प्रत्येक वाक्याच्या पूर्णविराम जवळ मन थोडावेळ थबकलं, विचार करत उभे राहीले.
केवळ अशक्य लिखाण. कुठल्यातरी उर्मीत लेख लिहीला गेला असावा.
23 Oct 2025 - 2:10 pm | निमी
सर मनःपूर्वक धन्यवाद.. तुमच्या सारख्या व्यक्तींनी अशी प्रतिक्रिया देणे ही माझ्यासाठी खूप मोठी दिवाळी भेट आहे.
23 Oct 2025 - 4:37 pm | स्वधर्म
उत्सुकतेने वाचत गेलो. आणखी लिहा, वाचायला आवडेल.
24 Oct 2025 - 11:58 am | निमी
धन्यवाद ! तुमच्या सांगण्या प्रमाणे लिखाण सुरू ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन.
23 Oct 2025 - 5:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कथा आवडली. गुढ दादा आणि सुकृतचा विषय भारी.
शास्त्र, काही पारंपरिक गोष्टी, विज्ञान, सांगड उत्तम.
वर्णन, शैली. छान.
-दिलीप बिरुटे
24 Oct 2025 - 12:01 pm | निमी
मनःपूर्वक धन्यवाद! तुमच्या प्रतिसादामुळे लिखाण करण्याची प्रेरणा, ऊर्जा मिळेल.
24 Oct 2025 - 4:22 pm | भागो
काहीतरी निराळे वाचण्याचे समाधान.
भाषा शैली देखील हटके आहे,
तुमच्या अजून कथा वाचायला आवडतील .
24 Oct 2025 - 9:55 pm | निमी
मला भाषाशैलीतील वेगळेपणा म्हणजे नेमके समजले नाही परंतु तुमच्या प्रोत्साहनाने आता अजून काही कथा लिहायची प्रेरणा नक्कीच मिळाली.
24 Oct 2025 - 5:41 pm | विवेकपटाईत
कथा आवडली
24 Oct 2025 - 9:56 pm | निमी
मनःपूर्वक धन्यवाद
25 Oct 2025 - 8:27 pm | सस्नेह
अतिशय समर्पक गूढ कथा !
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील नेमका फरक अचूक दाखवलात.
खूप आवडली कथा.
स्नेहा
27 Oct 2025 - 9:38 am | निमी
धन्यवाद.. तुमच्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभारी आहे
26 Oct 2025 - 12:22 pm | योगी९००
कथा आवडली..
'सद्गुरुकृपा' असं नाव असणाऱ्या घरावर कुणाचीही 'कृपा' नसल्याचं वाटलं. ही सुरूवात व " 'सद्गुरुकृपा' घरावर आता मला कुणाचीतरी असीम कृपा आहे असं वाटलं" हा शेवट. ह्या मध्ये लिहीलेले वाचत नाही तर अनुभवत आहे असे वाटले.
27 Oct 2025 - 9:39 am | निमी
आपल्यासारख्या उत्तम लेखकांनी सुरुवातीचा सोडलेला धागा आणि नंतर शेवटाकडे केलेला उल्लेख अचूक टिपला आहे.
15 Nov 2025 - 3:06 pm | चौथा कोनाडा
कथा आवडली... शैली सॉलिड आहे. ओघवते लेखन वाचतच जावे असे!
बाकी रसग्रहण करत बसत नाही.... आधीच्या प्रतिक्रियांमध्ये ते आलेलंच आहे...
मला आता उत्सुकता आहे पुढील कथेची, येऊद्यात लवकरात लवकर.
|| पुलेशु ||
3 Dec 2025 - 6:30 pm | श्वेता व्यास
कथा आवडली
6 Dec 2025 - 12:18 pm | टर्मीनेटर
कथा छानच जमुन आली आहे 👍
ह्या कथेतल्या 'दादां' सारख्या (कोल्हापुर जवळच्या गगनबावडा निवासी असलेल्या) 'अण्णा' म्हणुन ओळखल्या जाणार्या एका सिद्ध व्यक्तीशी दिड दशकापुर्वी भेट झाली असल्याने ही कथा मला काल्पनीक न वाटता अनुभवाधारीत वाटली आहे! बाकी वरती चौथा कोनाडा ह्यांनी म्हंटले आहे,
अगदी तेच मलाही म्हणावेसे वाटते आहे.
पुढील लेखनास शुभेच्छा!