आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई
हे गाणे श्री गदिमा यांनी एका लहान मुलीच्या तोंडी लिहिले आहे कि लहानपणी आई कसा जाच करते, ते मी तिची आई झाले तर तिला दाखवून देईन या अर्थाने.
आता स्थिती उलटी होऊ घातली आहे. मुलगा किंवा मुलगी आज आईबापांना जास्त दिवस सांभाळतो अशी स्थिती आली आहे
हि आज अनेक घरात दिसणारी कहाणी आहे. सत्य घटनांवर आधारित आहे. नावे अर्थात बदलली आहेत.
शंकरराव पाटील हे खान्देशातील एक बडे प्रस्थ. ते आणि पार्वतीबाई एरंडोल येथे एका मोठ्या वाड्यासारख्या घरात राहत असत त्यांची भली मोठी शेती होती आणि व्यापार होता.
त्यांना वसुधा नावाची एकुलती एक मुलगी. पुढे तिचे लग्न एका सुस्थितीत असलेल्या घरी करून दिले.
जावई वसंतराव आर्किटेकट असून मुंबईत व्यवसाय करत असे. वसंतराव अत्यंत सुस्वभावी हसतमुख आणि मितभाषी होते.
वसंतराव आणि वसुधा याना एक गोंडस मुलगा होता. हे तिघे आपल्या मुंबईतील दोन बेडरूमच्या घरात राहत असत. वसंतरावांचे आईवडील मुंबईतच दुसऱ्या घरात राहत असत.
दुर्दैवाने शंकरराव याना कसला तरी कर्करोग झाला आणि मुंबईत टाटा रुग्णालयात उत्तम उपचार करून केवळ ५३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
पार्वतीबाई गावच्याच घरात राहत होत्या. कारण तेथे त्यांचे भाडेकरू आणि इतर सर्व नोकर चाकर होतेच. शंकरराव गेले तेंव्हा त्यान्चे वय केवळ ४८ होते.
अंगात धमक होती शिवाय सासरचा आणि माहेरचा पैसा होता. मुलगी जावई जाऊन येऊन होते.
करायला कोणी नाही म्हणून गावची शेती विकून टाकली. घर (वाडा) होता तो तसाच ठेवला. कालांतराने भाडेकरू सुद्धा सोडून गेले.
मग वाडा पाडून तेथे दुमजली इमारत बांधली. दोन मोठे फ्लॅट ठेवले आणि बाकी विकून टाकले. पार्वतीबाई एका फ्लॅट मध्ये राहत आणि शेजारचा तसा बंदच होता.
जशी साठी जवळ आली तसे मुलीने निर्णय घेतला आता आईला एकटे ठेवायला नको. मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले आणि पार्वतीबाई कायमच्या मुलीच्या घरी राहायला आल्या.
कानाला ऐकू कमी येऊ लागले तसे त्यांच्याशी बोलायला इतरांना मोठ्याने बोलावे लागे. यासाठी त्यांना मुलीने एका चांगल्या कानाच्या तज्ज्ञाला दाखवले त्याने कानाला वयपरत्वे कमी ऐकू येऊ लागले आहे त्यासाठी यंत्र लावा म्हणजे स्पष्ट ऐकू येईल असा सल्ला दिला.
अर्थात मला काही कमी ऐकू येत नाही आणि मी काही कानाला यंत्र लावणार नाही असे पार्वतीबाईनी ठणकावून सांगितले.
त्यातून जरा चांगले यंत्र पंचवीस हजार रुपयाला येते असे ऐकल्यावर तर त्या कान नाक घसा तज्ज्ञांच्या सात पिढ्यांचा उद्धार झाला
सुंभ जळला तरी पीळ सुटत नाही तसे पार्वती बाईंचे होते. दोन बेडरूम पैकी एक बेडरूम मध्ये त्यांनी आपला डेरा टाकला आणि नातवाला बाहेरच्या खोलीत झोपायला लागले.
नातू इंजिनियरिंग ला गेला तसा हॉस्टेल ला गेला त्यामुळे आता घरात पार्वतीबाई मुलगी आणि जावई असे तिघेच.
पार्वती बाईंचा स्वभाव चिडचिडा झाला होता. आपल्या बेडरूम मध्ये त्या दुसरे कोणतेही सामान ठेवू देत नसत. मुंबईत खोल्या लहान म्हणून जातायेता मुलीकडे उद्धार चालू असे. त्यातून आपले सामान बेडरूम मध्ये ठेवले तरी त्या मात्र बाहेरच सोफ्यावर बसत असत.
दिवसभर काहीही काम करत नसत कि बाहेर जात नसत. त्यामुळे वजन प्रमाणाबाहेर वाढलेलं होतं त्यामुळे गुढघे दुखीचा त्रास चालू झाला होता. नको तितके खाल्ल्यामुळे आणि वयपरत्वे गॅसेस चा त्रास होता.
त्यामुळे बाहेर सोफ्यावर बसून वेळी अवेळी कायम ओ~~ब्बा अशी भयाण ढेकर देत असत.
दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी सात वाजता त्यांना जेवायला लागायचे. जावई दुपारी एक दीड ला जेवायला आला तरी त्या त्याची वाट पाहत नसत किंवा रात्री आठ वाजेपर्यंत थांबण्याची त्यांची तयारी नसे. त्यामुळे मुलीला त्यांना प्रथम वाढून द्यायला लागायचे.
आपण गरम गरम जेवून झालं आणि मुलगी जेवायला बसली कि त्या बेडरूम मध्ये जाऊन ठणठणीत आवाजात अग मला सुपारी आणून दे, माझं औषध आणून दे, पंखा कमी कर, पाणी आणून दे अशी काहींना काही मागणी करून तिला जेवणावरून उठवत.
त्यांनी दीड ला झोपायची सवय लावून घेतली होती. जावई परत गेला आणि मुलगी मागचं आवरून अडीच वाजता झोपायला गेली कि तीन वाजता यांचा गजर सुरु होत असे, अग मला चहा करून दे. चहा बरोबर मारीची बिस्किटं लागत असत.
चहा झाला कि चार वाजता त्या आपल्या जुन्या भ्रमणध्वनीवरून कोणा तरी मैत्रिणीला बाहेरच्या खोलीत सोफ्यावर बसून फोन करत असत आणि मग अर्धा तास मोठ्या आवाजात त्यांचं बोलणं चालत असे.
त्यांना मुलीने सांगितले कि संध्याकाळी जरा बाहेर जाऊन ये चार बायका भेटतील वेळ चांगला जाईल पण नाही माझे गुढघे दुखतात आता चार जिने ( दोन मजले) कोण उतरणार आणि परत चढणार? असे सांगितले. बिचारी मुलगीच संध्यकाळी बाहेर जात असे बाजार करून चार मैत्रिणीना भेटून परत येत असे.
परत आल्या कि मला जळजळ होते आहे जेवायला वाढ हा तगादा सुरु होत असे. मुलगी स्वयंपाक करे पर्यंत त्या टीव्ही वर कुठल्या ना कुठल्या मालिका लावून बसत. आता नीट ऐकू येत नसे म्हणून मोठ्या आवाजात टीव्ही लावला जात असे ज्यामुळे कोणत्याही खोलीत त्याचा भरपूर आवाज येत असे.
सात ला त्या जेवायला बसत. जावई आठ वाजता परत आला तरी सारखं मला हे दे ते दे करत मुलीला नवऱ्याबरोबर चार गोष्टी बोलायला सवड देत नसत.
नातू इंजिनियर होऊन नोकरीला लागला तो नोकरी नंतर रात्री उशिरापर्यंत बाहेरच असे त्यामुळे त्याचे फारसे नडत नसे. पण यथावकाश त्याचे लग्न झाले तेंव्हा नातसुनेला या गोष्टी खटकत असत. यामुळे नातवाने आखाती देशात नोकरी पत्करली आणि तो बायकोला घेऊन तिकडे निघून गेला.
सुटीवर आला तरी तीन चार दिवस घरी येत असे मग आठवडा भर सासरी( पुण्याला) जाऊन परत जाताना एक दोन दिवस राहून परदेशात जात असे.
नातू काही आजी जिवंत असेपर्यंत तिकडची नोकरी सोडून परत आला नाही.
पुढे वयामुळे पार्वतीबाई जास्तजास्त गलितगात्र होत गेल्या पण त्यांचा ताठा कधी कमी झाला नव्हता. शेवटची दोन वर्षे त्या अक्षरशः अंथरुणात होत्या पण मुलीने कधी तोंडातून अक्षर काढले नाही.
जावई भला माणूस होता त्यामुळे किंवा खेड्यातील पार्श्वभूमीमुळे आपल्या आईला वृद्धश्रमात ठेवावे असा विचार मुलीने कधीही केला नाही.
शेवटची आठ नऊ वर्षे त्या परावलंबी झाल्यामुळे वसुधाताईंना कुठे दूर सहलीला किंवा पर्यटनाला जाणे पण अशक्य झाले होते. त्यांची स्वतःची पण साठी जवळ आल्याने त्यांची दमछाक होत असे. अर्थात घरात काही कुरबुरी होती असतील पण त्या आमच्या पर्यंत आल्या नव्हत्या
वसुधा ताईंची चुलत बहीण माझ्या संपर्कात असल्यामुळे यातील काही गोष्टी ज्या अन्यथा बाहेरच्याला दिसल्या नसत्या त्या आमच्या लक्षात आल्या. "पार्वती काकू आपल्या मुलीला फार छळतात" या शब्दात तिने आम्हाला सांगितले तेंव्हा या बाबीचे गांभीर्य आमच्या लक्षात आले
हि स्थिती पार्वती बाईंचे वय वर्षे ८४ मध्ये निधन होईपर्यंत कायम होती.
म्हणजे आईने मुलीला १९ वर्षे सांभाळले आणि मुलीने आईला २४-२५ वर्षे.
आज डॉक्टर म्हणून मी लोकांच्या घरी जातो तेंव्हा या अशा अनेक कथा ऐकायला आणि पाहायला मिळतात.
समाजमन अजूनही अशा वृद्धांना वृद्धाश्रमात ठेवण्याच्या बाजूने तयार झालेलं नाही.
घरातच राहून वृद्धांची काळजी घेणारी माणसे मिळू शकतात पण मागच्या पिढीतील लोकांचे अशा गोष्टीवर पैसे खर्च करावे अशी मनोवृत्ती सुद्धा नाही.
या प्रश्नाला नक्की असे उत्तर नाही. प्रत्येक कुटुंबाला आपला प्रश्न आपल्या आहे त्या परिस्थितीतच सोडवावा लागतो.
बऱ्याच वेळेस हे प्रश्न घरच्या बाईलाच सोडवावे लागतात आणि मुंबईत तर जागांचे भाव आभाळाला भिडलेले असल्याने एक अतिरिक्त खोली असणे हि चैन आहे आणि ती बहुसंख्य लोकांना परवडत नाही.
प्रतिक्रिया
26 Sep 2025 - 8:32 pm | अभ्या..
हम्म
अगदीच निवाडा वगैरे नाही पण पार्वतीबाईंचा स्वभाव पाहता, मुलीने आणि इस्पेशली जावयाने बरेच सहन केले असे म्हणता येईल. म्हणजे जावयाच्याच घरात राहून असल्याने "फार छळतात" हे योग्यच वाक्य वाटते. नॉर्मली छळणे हा कॉपीराईट सासूच्या नावाने असल्याने सक्खी आईच छळते असे मुलगी तरी कोणत्या तोंडाने बोलणार?
घरातच राहून वृद्धांची काळजी घेणारी माणसे मिळू शकतात पण मागच्या पिढीतील लोकांचे अशा गोष्टीवर पैसे खर्च करावे अशी मनोवृत्ती सुद्धा नाही
अगदी हेच उदहरण मात्र नुकतेच पाहण्यात आले. योगायोगाने हे प्रस्थ ही खानदेशातीलच.
बऱ्याच वेळेस हे प्रश्न घरच्या बाईलाच सोडवावे लागतात
खरे तर नवराबायकोने संमतीने सोडवावेत पण गुंते नाजूक, सोडवणारे हातही नाजूकच लागणार. त्यात बायस असणारच प्रत्येकाचा.
26 Sep 2025 - 10:37 pm | चित्रगुप्त
तिन्ही पिढीतल्या लोकांना यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे, असे वाटले.
-- कदाचित आईची इच्छा नसेल गाव सोडायची, पण मुलीने निर्णय घेतल्यामुळे तिचा नाईलाज /संताप झाला असेल आणि मग मनाविरुद्ध करावे लागल्याचा (कळत-नकळत) 'बदला' म्हणून मुलीचा 'छळ' केला जात असेल.
-- कठीण आहे. हल्ली जवळ जवळ सर्वच कुटुंबात असे काही ना काही घडत असणार.
मी पुण्यातल्या वेगवेगळ्या तीन महागड्या (दरमहा पन्नास हजार रुपये + औषधे वगैरे ) वृद्धाश्रमांमधे माझ्या नातेवाईकांना भेटायला जाऊन आलेलो आहे. त्या त्या जागेच्या वेबसाईट वर आणि पँप्लेटमधे तिथे जणूकाय स्वर्गच अवतरला असावा, असे फोटो, विडियो दिलेले होते.
-- प्रत्यक्षात मात्र अत्यंत दारूण परिस्थितीत त्यांना रहावे लागत असल्याचे बघून खूप वाईट वाटले होते. सगळ्यांच्या मुलांची परिस्थिती उत्तम असूनही.
-- अगदी.
27 Sep 2025 - 6:26 am | कंजूस
खरंय.
आणि अगदी तिकडे ठेवलं तरी तिकडे भांडतात.
27 Sep 2025 - 2:45 pm | सुधीर कांदळकर
वाईट वाटले पार्वतीबाईंच्या मुलीचे. ५-१५ किलो वजनाच्या बालकाचे ५-७ वर्षे लाड पुरवावेत आणि नंतर मोठे झाल्यावर त्या पुत्राने/कन्येने नी ५०-८० किलो वजनाच्या तर्हेवाईक म्हातार्याला/म्हातारीला १०-१५ वर्षे सांभाळावे हे काही पटत नाही. आवळा देऊन कोहळा काढण्यासारखे आहे हे.
खरे तर सध्याच्या युगात तरुण पिढीच्या नोकर्या/व्यवसाय पूर्वीपेक्षा जास्त कठीण, खूपच ताणतणावाचे आहेत. त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षण/सुरक्षा आणि इतर जबाबदार्या पण पूर्वीपेक्षा जास्त आहेत. अशात वृद्धांनीं त्यांचे तणाव/जबाबदार्या हलक्या करायला पाहिजेत. आर्थिक नियोजन करून आपली आर्थिक सोय आपणच करायला पाहिजे. बहुतेक कुटुंब आरोग्यविम्यात आईबापांची सोय केलेली असते. त्यामुळे बव्हंशी तो भार वृद्धांवर नसतो. माझ्या दोन्ही डोळ्यांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया चि.च्या कुटुंब आरोग्यविम्यात २०२३ साली विनारोकड-कॅशलेस बेनिफिटमध्ये झाली. फक्त औषधे आणि सर्जिकल वस्तूंचा खर्च आम्हांला करावा लागला.
प्रत्येक साठीपार तरुणाने वा वृद्धाने दैनंदिन आहारविहाराची शिस्त पाळून आपले आरोग्य व्यवस्थित ठेवायला पाहिजे आणि मुलांबाळांवर कमीत कमी भार टाकायला पाहिजे. स्वतंत्र जगणे जमत नसेल तर वृद्धाश्रमात राहायला हवे.
वृद्ध कितीही तर्हेवाईक आणि परावलंबी असला तरी त्याच्या मुलाबाळांना दोष देणे या समाजमनात नक्कीच बदल व्हायला हवा.
परंतु अनेक वृद्धाश्रमात पैसे घेऊनही ग्राहकांची म्हणजेच वृद्धांना चांगली सेवा दिली जात नाही. यातही काहीतरी बदल व्हायला हवा. कसे ते मात्र ठाऊक नाही. यात सुधारणा झाल्या तर अनेक वृद्ध आपणहून वृद्धाश्रमात जाणे पसंत करतील. किंबहुना वृद्धाश्रमाला काहीतरी ग्लॅमर यायला हवे. मार्केटिंगच्या जमान्यात हे काही फारसे कठीण नाही.
मु़ख्य म्हणजे अनेक वेळा स्वभावात कमकुवतपणा हाच दोषी असतो. तरुणांनी तो टाकून कणखरपणा अंगिकारायला हवा.
एका महत्त्वाच्या सामाजिक विषयाला तोंड फोडल्याबद्दल धन्यवाद.
27 Sep 2025 - 4:51 pm | गणेशा
तीन पिढ्या आणि त्यांच्या भाव भावना स्पष्ट पणे कळतात लेखनातून...
माणसे तितक्या प्रवृत्ती...
अवांतर :
मुंबई मध्ये असताना, थोडे सोशल असल्याने.. वृद्धाश्रमाच्या मदती साठी आम्ही काही जण वृद्धाश्रमात गेलो होतो..
तिथले चित्र.. माणसे पाहून खुप्प वाईट वाटले..
काही उपवाद होते.. जसे की एक आज्जी बाई खूप खूष होत्या, त्यांना कोकण साईडची समुद्राची गाणी येत होती.. त्या आनंदाने त्या म्हणत होत्या.. सोबत दुसरे अजोबा छान enjoy करत होते.
माझे मात्र त्या इथल्या पेक्षा त्यांच्या घरी का नसतील ह्याच विचारात गेले.
बाकी, लोक मात्र गलित गात्र वाटली..
त्या नंतर ते अजोबा काठी टेकावत बाहेर गेले, बोलावणे आले म्हणून.. आणि त्यांना भेटायला त्यांची सून किंवा मुलगी असेल आणि नात आली होती.. नातीने त्यांना वाढदिवसाचे गिफ्ट दिले..अजोबा च्या डोळ्यातून पाणीच पाणी वाहत होते..हे दृष्य अजून माझ्या डोळ्यासमोरून जात नाही..
या नंतर कसलीही मदत असली तरी मी वृद्धाश्रमात कधी गेलो नाही.. मुदामून जाणे टाळलेच...
नुकतेच पुण्यात नवक्षितिज गतिमंद मुलांसाठी असलेल्या संस्थेला भेट दिली.. तेथे पहिल्यादा मी नको जायला असेच वाटत होते, पण गेलो.. परंतु तेथील वातावरण खूपच best होते हे मी नमूद करतो
असो, तुम्ही dr असल्याने प्रत्येक प्रकारच्या लोकांशी संबंध येत असतीलच.. नुसते इन्शुरन्स sector शी थोडेसे संबंधित झालोय तर लोकांच्या हालत पाहून रात्र रात्र मला झोप येत नाही.
27 Sep 2025 - 5:01 pm | कर्नलतपस्वी
लेख वाचल्यानंतर काय प्रतिसाद द्यावा हेच सुचेना.
समाजात आनेक वेगवेगळया प्रकारची उदाहरणे बघायला मिळतात. काय खरे काय खोटे ज्याचे त्यालाच माहीत.
एक उदाहरण...
एका बाईला तीन मुले,दोन मुली. बांईचे वय ब्याऐंशी,प्रकृती स्वास्थ्य उत्तम. नवरा मरून बरेच वर्ष झाली.
बाईंना अर्थिक प्राप्ती चे साधन नाही. नवर्याने ठेवलेली संपत्ती मुलांनी वाटून घेतली. बाईंनी का दिली कारण पाच विरूद्ध एक असा सामना होता. दर दोन महिने बारा दिवसांनी बाईंची बदली होते. सदाशिव पेठेतून,नारायण पेठेत तर कधी चिंचवड तर कधी बिबवेवाडी.
एका बाईला एकच मुलगा नवरा लवकर गेला. मुलाला लहानाचे मोठे केले. आता त्याच्याच डोक्यावर बसून दळण दळत आहेत. उपकार झाले जन्माला घालून अशीच म्हणायचे बाकी ठेवले आहे.
थोडक्यात सांगायचा उद्देश समाजात भावनिक भागांक जवळपास नाहीच म्हणले तरी वावगे ठरणार नाही.
भावनांना अचूकपणे समजणे, आयुष्य सुलभ करण्यासाठी भावनांचा वापर करणे,आणि भावनांचे व्यवस्थापन करणे," हे सर्व नदारद आहे. प्रत्येक जण गरजे प्रमाणे वागतो. मग तो तरूण असो किंवा म्हातारा. यात एक त्रास देणारा व एक घेणारा. प्रत्येकावर अवलंबून आहे की कसे वागायचे,बाकी समाजाचे काय....
कुछ तो लोग कहेंगें....
27 Sep 2025 - 7:38 pm | सुबोध खरे
माझा सर्वात मोठा मामा ९५ वर्षापर्यंत जगला. समृद्ध जीवन कसं असावं याचा तो आदर्श वस्तुपाठ होता.
शेवटची पाच वर्षे त्याची दृष्टी अतिशय अधू झाली होती. सर्व उपचार करून काही फायदा झाला नव्हता परंतु तरीही त्याच्या चेहऱ्यावर कधी आठी दिसली नाही.
स्वतः भरपूर पैसे मिळवलेले होते पण शेवटची दहा वर्षे जेंव्हा मामी गेली तेंव्हा मुलींनी त्याला आता तुम्ही एकटे राहू नका म्हटले. तेंव्हा त्याने आपली सर्व संपत्ती (अन राहते घर) विकून टाकली आणि पैसे तिन्ही मुलींकडे सुपूर्द केले.
मामी जिवंत असताना शेवटची दोन तीन वर्ष ती फार चिडचिडी झाली होती. तिचा त्याने छान सांभाळ केला होता.
तो तीन मुलींकडॆ त्यांच्या सोयीप्रमाणे पाळीपाळीने राहत असे. मुली जिच्याकडे म्हणत तिथे तो आनंदाने जात असे. एका मुलीची दोन्ही मुले अमेरिकेत आहेत. ती तेथे जाऊन येऊन असते त्यामुळे तिला जेंव्हा सोयीचे असेल तेंव्हा तिच्याकडे जात असे. हे सर्व तिन्ही बहिणी आपसात ठरवत असत आणि त्याबद्दल त्याला कधीही तक्रार नसे. त्याला सांभाळायला एक माणूस असे. आपल्यला जे काही हवाय ते त्या माणसाकडून मामा करवून घेत असे. यामुळे मुलींना कधीही त्याचा जाच झाला नव्हता. त्याचा एक जावई मोठा डॉक्टर होता म्हणून त्याने कधी त्यांच्यावर भार टाकला नाही.
दिसत नव्हते तरी तो आपला ट्रान्सिस्टर घेऊन त्यावर बातम्या गाणी श्रुतिका ऐकणे यात काळ घालवत असे. त्याला भेटणे हा एक सुखद अनुभव असे.
मी आणि माझी पत्नी डॉक्टर असून त्याने कधी आपल्या प्रकृतीच्या तक्रारी केल्या नाहीत. आपल्या सख्ख्या भावंडाना सतत फोन करून त्यांच्याकडे आपल्या प्रकृतीचे रडगाणे त्याने कधी गायले नाही. उलट त्याचे धाकटे भाऊ जर काही तक्रार करायला लागले तर आता या वयात असं चालायचंच म्हणू तो त्यांना गप्प करत असे.
अन्यथा डॉक्टर दिसला कि त्याला आपल्या प्रकृतीच्या तक्रारी सविस्तर ऐकवणे हा बहुसंख्य वरिष्ठ नागरिकांचा आवडता छंद असतो.
कोणत्याही कौटुंबिक कार्यक्रमात आमचा एक दीड तास यात अक्षरशः फुकट जातो.
28 Sep 2025 - 1:33 pm | स्वधर्म
हा जटील प्रश्न प्रत्येक कुटंबाने आपआपला सोडवावा, हेच बरे. यात काही नियम नाहीत पण गाईड्लाईन्स असू शकतील.
आपल्यापुरते बोलायचे तर धरणीला पडून अवलंबित होऊन मृत्यू आपल्याला येऊ नये अशीच इच्छा ठेऊ शकतो. पण तसेच घडेल असे नाही.
29 Sep 2025 - 10:20 am | सुबोध खरे
आता ७५ च्या पुढे असलेल्या पिढीने आपल्या तरुण पणात संपन्नतेचा काळ फारसा पाहिलेला नव्हता. तेंव्हा बहुतांश गोष्टी अभावानेच मिळत होत्या. त्यामुळे आजच्या पिढीतील मुली चार पैसे खर्च करून थोडा फार अराम मिळवत असतील किंवा जर स्वयंपाकाची बाई आली नाही तर रेस्टॉरंटमधून जेवण मागवलं तर लगेच नाक मुरडणारे वरिष्ठ नागरिक घरोघरी सापडतील. सून नोकरी करते म्हणून तिला तोंडावर बोलता येत नसलं तर अशा सासवा पाठीमागून बडबड करून सुनेला कानकोंडं करत असतात.
जुन्या काळात स्त्रियांना नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी फारशा नव्हत्या. यामुळे स्त्रिया घरी होत्या आणि गृहिणीच्या कामला प्रतिष्ठा तेंव्हाही नव्हती आणि आताही नाही. त्यामुळे घरच्या वरिष्ठांची काळजी घेणे हा आपसूक स्त्रीच्या कर्तव्याचा एक भाग होता आणि आहे.
आजही घरचे वरिष्ठ किंवा बालक आजारी पडले तर राजा घ्यावी लागली तर ती घरच्या स्त्रीनेच घेतली पाहिजे अशी कुटुंबाची आणि पुरुषांची अपेक्षा असते.
या जुन्या मनोवृत्तीमुळे घरच्या बाईकडून काम/ सेवा करवून घेणे यात काही चुकीचे आहे असे आपला समाज मानतच नाही.
त्यातून सासू आपल्या सुनेकडून काम करून घेणे हा मुलाच्या जन्मापासून आपल्याला मिळालेला हक्कच आहे असे समजते तर मुलीची आईसुद्धा तिला मी जन्मच दिलेला आहे तेंव्हा तिने माझी थोडीशी सेवा केली तर काय बिघडतं?
आता थोडीशी ची व्याख्या करणे अशक्य आहे. त्यामुळे कुठे सेवा संपते आणि कुठे जाच चालू होतो हे सांगणे कठीण असते.
नोकरी करणारी मुलगी जर रविवारी थोडा जास्त वेळ झोपली तरी वरिष्ठ नागरिक तिला इतका वेळ झोपतात का? घरच्या बाईने असं झोपून राहिलं तर कसं चालेल? संसाराचं वाटोळं होईल. मुलांना काय शिस्त लागणार इत्यादी तर्हेची वाक्ये बोलून कानकोंडं करत असतात.
आपल्याला झोप येत नाही तर आपण जागं झालं तर स्वतःचा सकाळचा चहा स्वतः करून घ्यावा. याऐवजी सून किंवा मुलगी उठुन चहा करेपर्यंत वाट पाहत राहायचं. यामुळे रविवार असला तरी सुनेला सकाळी थोडं जास्त वेळ झोपलं तरी मन खायला उठतं.
आता आमचं काही राहिलं नाही. आजकालच्या मुलींना वरिष्ठ नागरिकांना मान देणे म्हणजे काय ते माहितीच नाही. अशा तर्हेची बडबड करत राहून घरातलं वातावरण गढूळ करणारे वरिष्ठ नागरिक घरोघरी सापडतील.
29 Sep 2025 - 6:52 pm | गणेशा
हे मुद्दे बरोबर असले तरी, खूप एकाच बाजूचे चित्रण करत आहे..मूळ लेख हा खऱ्या गोष्टीवर चित्रित आहे..
परंतु समाजात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात.. या प्रतिसादा मध्ये मात्र तुम्ही ते एक चित्रण पूर्ण समाजाला चिकटवले आहे असे वाटते..
सगळीकडे वृद्ध सासू सासरे आई वडील च दोषी किंवा बडबड करणारे असतील असे नाहि.
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती...
29 Sep 2025 - 7:03 pm | सुबोध खरे
सगळीकडे वृद्ध सासू सासरे आई वडील च दोषी किंवा बडबड करणारे असतील असे नाहि.
बहुसंख्य घरात सुसंवादच असतो आणि बहुसंख्य घरात लोक समजून सांभाळूनच असतात
सगळेच्या सगळे वरिष्ठ नागरिक असेच असतात असे माझे म्हणणे मुळीच नाही
ज्या घरात असे नसते ते दाखवणे आणि ज्यांना असा त्रास होतो आहे त्यांना यात आपण जगावेगळे आहोत असे वाटू नये म्हणून हा लेख लिहिलेला आहे.
29 Sep 2025 - 7:19 pm | गवि
सहमत आहे. आणि तरुणपणी कितीही समजूतदार विचार असले तरी वयपरत्वे मनुष्य बदलत जातो हेही बघितले आहे. तरुणपणी कळलेले म्हातारपणी वळतेच असे नाही.
यामागे काही शारीरिक वैद्यकीय केमिकल कारणेही असू शकतील असे वाटते.
जवळ येणाऱ्या मृत्यूने भेडसावले जाणे (भीती म्हणा किंवा अस्वस्थता म्हणा).. आपले दिवस बघता बघता संपले.. आता आपले महत्व उरले नाही.. कोणाला आपले काही पडले नाही.. मला कोणी काही साधे सांगत देखील नाही (उदा. प्रत्येक वेळी बाहेर जाताना, मोठी खरेदी करण्यापूर्वी इत्यादि).. आपले मत कोणी विचारायला येत नाही. नातवंडे लहान असताना जशी चिकटून असत तशी कॉलेजात गेल्यावर रहात नाहीत.. ऐकू कमी येत असल्यावर संवादात अंतर वाढते. मग आपल्याला टाळत आहेत किंवा आपल्यामागे काही बोलत आहेत असे भासते. विस्मरण होते पण स्वीकारणे अवघड. चहा दिला तरी तो दिलाच नाही, विसरून गेले असे वाटते.
हे सर्व वाटणे वृद्ध लोकांच्या वागण्यात बोलण्यात इतके सर्वत्र जाणवते की ज्याचे नाव ते.
29 Sep 2025 - 6:56 pm | सिरुसेरि
पुर्वी प्राथमिक शाळांमधे वर्ग चालु होण्यापुर्वी १० , १५ मिनिटे वेगवेगळी बालगीते स्पिकर वर लावत असत . तेव्हा हे गाणे बरेचदा ऐकायला मिळत असे.
लेखाबद्दल , कदाचित मुलीचे आणी आईचे नाते हे वेगळेच ( व्यवहारा पलिकडचे ) असल्यामुळे , वयस्क आईचे हट्टी वागणे हे मुलगी सहन करत असेल .
30 Sep 2025 - 1:28 pm | हणमंतअण्णा शंकर...
ज्येष्ठांकडून हे सतत ऐकणे नको नको वाटते.
दुसरे काहीच बोलत नाहीत.
टाचा दुखतात पाय दुखतात सगळं दुखतं. हे आणि ते. दवाखान्यात गेलो. औषधे घेतली. हा डॉक्टर भंगार आहे तो चांगला आहे. दुखण्याशिवाय आणि मेडिकल गोष्टींशिवाय एकही विषयवार माझ्या घरातले ज्येष्ठ लोक बोलत नाहीत. खूप वैतागवाणे वाटते. मी तर सासऱ्यांना व्हॉट्सअपवर वगैरे ब्लॉक मारला आहे. त्यांच्याशी दोन वाक्ये देखील बोलू वाटत नाही.
यांना रेग्युलर कॉल केला तर दुसरे काहीच बोलत नाहीत. प्रकृतीच्या तक्रारी आणि कशाची तरी किरकिर किंवा अतिशय फालतू सल्ले.
आर्ट ऑफ संवाद किंवा तसले कोर्सेस १५ वर्षे कंपल्सरी करायला पाहिजेत हिंदी सक्ती पेक्षा. पुढच्या माणसाच्या आयुष्यात काय चालले आहे काय नाही याचे या ज्येष्ठांना काही नसते. सतत मी मी चालले असते.
या उलट माझे आजोबा जे ९०+ आहेत ते मात्र जुन्या आठवणी सांगत बसतात आणि त्या खूप गमतीशीर असतात. पाऊस पाणी वगैरे झाल्यावर आज इथे मासे धरले, तिकडे हा भेटला, इकडे हे खाल्ले, गाडीचा पार्ट असा बसवायचा असे काहीतरी त्यांना सांगायचे असते. तब्येतीच्या तक्रारी करतात पण त्या कधी जाणवून ना देता सटली करतात.
एखाद्या माणसाला मोठा कॉल केला तर मी कॉल झाल्यावर आता थोडक्यात कोणत्या विषयावर बोललो आणि त्या माणसाचे महत्त्वाचे अपडेट्स लिहून ठेवतो मोबाईल मधे. त्यामुळे पुढच्या कॉल मधे रिपिटिशन होत नाही आणि पुढच्या माणसाला अश्यर्य वाटते की मला सगळं लक्षात आहे. खुपदा मित्रांच्या मुलांची नावे चटकन आठवत नाहीत. अशा वेळेस हे नोट्स कामी येतात.
30 Sep 2025 - 1:59 pm | कर्नलतपस्वी
आता म्हातारपण म्हंटल्यावर अंडरलाईन कंडिशन असणे सहाजिकच. म्हणून सतत त्यावर चर्चा योग्य नाही. समोरचा व्यक्ती बघून बोलायला हवे.
उतारवयात काही ना काही रिकामटेकडे उद्योग मागे लावून घेतले पाहिजेत.
अस्मादिक सत्तर पार करत आहे. सर्व कौटुंबिक जबाबदार्या पार पडल्यात. माझे स्वतःचे एक शेड्युल आहे.ते मी काटेकोर पणे,अर्थात सवयीचा भाग ,पाळतो.
कायप्पावर वर्ग मित्रांचा समुहातील अनेक मित्र जे सतत आपण म्हातारे झालो आहोत आणी कसे वागायचे यावर ढकलपत्रे टाकत असतात त्यांना फाट्यावर मारतो.
तुकोबाराय म्हणतात,
सुख देवास मागावे
दुख देवास सांगावे
मी तर म्हणेन कुणालाच काही सांगू नये.
एक नव्वदी जवळचे मिपाकरांना भेटलो होतो. शेंगदाणे,गोड,तळके सर्व पदार्थ मनसोक्त खात होते. आजही ते एक कि मी चालतात. काही त्रास विचारले तर म्हणतात त्रास नाही हाच मोठा त्रास आहे.
30 Sep 2025 - 9:21 pm | Bhakti
आमच्याकडे उलटी गंगा आहे ;)
निवृत्तीनंतर आईबाबा दोघेही पहिल्यांदा फीट झाले,कारण त्यांनी स्वतःकडे पुन्हा नव्याने लक्ष द्यायला सुरुवात केली.अनेक लोकांना जोडले गेले.स्वत: खुश राहतात , आम्हांला खुश ठेवतात.उलट मीच सगळ्यांमध्ये हे दुखणं ते दुखणं करत असते ;)
1 Oct 2025 - 11:29 am | सुबोध खरे
सध्या तरी आयुष्यभर मुलांवर अवलंबून राहायला नको या दृष्टीने मी आपली वाटचाल करीत आहे.
दोघे डॉक्टर असल्यामुळे जोवर मानसिक स्थिती ठीक असेल तो वर मुलांकडे वैद्यकीय मदतीची आवश्यकता पडणार नाही आणि त्यासाठी लागणाऱ्या पैशाची तजवीज मी केलेली आहे.
पण आम्हा दोघांना अल्झायमर डिमेन्शिया सारखे मानसिक आजार झाले तर काय याचे उत्तर माझ्याकडे सुद्धा नाही.
अर्थात एकत्र दोघांना असे होण्याची शक्यता फारच कमी आहे.
आताच एप्रिल २५ मध्ये माझ्या मुलाचे लग्न झाले. त्या वेळेस त्याच्यासाठी माझ्या घराच्या जवळच एक २ बेडरूमचे घर मी भाड्याने घेऊन दिले आहे.माझे सध्याचे घर तीन बेडरूमचे असून सुद्धा. माझ्या मुलीचे लग्न झालेले असून ती दिल्लीत असते. त्यातून ते मुंबईत येण्याची शक्यता नगण्यच आहे
मुलगा आणि सून दोघे नोकरी करतात त्यांच्या साठी पुरेल एवढा पैसा ते मिळवतात.
मुलगा आतापर्यंत आमच्या बरोबर रहात होता. पण १ एप्रिल पासून ते घर भाड्याने घेतले आणि हनिमून हुन परत आल्यावर ते तिथे राहायला गेले. एक तर भाड्याचे पैसे द्यायला सुरुवात झाली आणि सगळं खर्च स्वतःच करायला लागल्यावर हिंदीत म्हणतात तसं "आटे दाल का भाव मालूम" पडायला लागतो.
त्यामुळे महिन्याचा खर्च किती लागतो याची दोघांना कल्पना यायला लागली आहे.
सुनेला आमच्या घरात आपल्या आवडीचा रंग किंवा फर्निचर घेणे अशक्य होते कारण ते आताच दोन वर्षांपूर्वी बायकोच्या आवडीचे घेतलेले आहे. आणि लशंकरात असल्यामुळे आम्ही लग्न झाल्यापासून वेगळेच राहत होतो त्यामुळे स्वातंत्र्याची किंमत काय असते हे आम्हाला उत्तमपणे माहिती आहे
राजाराणीच्या संसारात राणीची सासू कुठेच फिट होत नाही.
त्यातून त्यांचा प्रेमविवाह आहे एका शाळेत होते आणि दोघेही एम बी ए झालेले आहेत त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार बराच मोठा आहे. त्यांचे बरेच येणे जाणे असते. शिवाय सुनेचे आईवडील किंवा नातेवाईक याना यायचे असेल तर आमच्या घरात त्यांची कुचंबणा/ अडचण होऊ शकते.
जवळ राहून भांड्याला भांडे लागण्यापेक्षा दूर राहून नातेसंबंध जास्त चांगले राहतात. अर्थात आमच्या बऱ्याच नातेवाईकांच्या हे पचनी पडलेले नाही. तीन बेडरूम असून मुलाने वेगळे कशाला राहायचे? मुलाला घराबाहेर का काढतोस हे माझ्याच आईने विचारले.
जवळ राहूनही त्यांना त्यांचे स्वातंत्र्य उपभोगू द्यावे असा माझा विचार होता. अर्थात सुनेचा आईवडिलांना हि मी हा विचार बोलून दाखवला तेंव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले.
हे सर्व आम्हाला पुरेसा पैसा मिळतो म्हणून शक्य आहे हेही मला मान्य आहे.
असो
1 Oct 2025 - 2:49 pm | स्वधर्म
तुंम्ही वैद्यकीय व्यवसायात असल्याने एक प्रश्न विचारत आहे. तुंम्ही वरती बरेच व्यक्तीगत निर्णय शेअर केले आहेत पण हा प्रश्न व्यक्तीगत आहे असे वाटल्यास सोडून द्या.
>> मुलांकडे वैद्यकीय मदतीची आवश्यकता पडणार नाही आणि त्यासाठी लागणाऱ्या पैशाची तजवीज मी केलेली आहे.
विमा घेऊन की सांभाव्य आजारपणासाठी स्वतःचे पैसे बाजूला ठेऊन?
विमा काढावा असे सगळेच सांगतात पण सदैव नोकरीत विमा असल्याने व्यक्तीगत विमा काढून हप्ते भरत राहण्याची गरज पडली नाही. म्हातारपणासाठी विमा काढावा की फक्त तुमच्याप्रमाणे पैसे बाजूला ठेवावे, असा प्रश्न आहे.
1 Oct 2025 - 6:23 pm | सुबोध खरे
म्हातारपणासाठी विमा काढावा की फक्त तुमच्याप्रमाणे पैसे बाजूला ठेवावे
माझा वीस लाखाचा आरोग्य विमा आहे याशिवाय मी अधिक रकमेची तजवीज केलेली आहे. तेंव्हा दोन्ही गोष्टी केलेल्या बऱ्या.
वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवाचे बोल- वैद्यकीय कारणासाठी मोठा खर्च आला तर माणूस माझ्यावर एक पैसा खर्च करू नका असे सांगू शकेल.
पण तोच भाव आपल्या बायकोबद्दल घेऊ शकेल असे नाही. कारण मुलांची आणि समाजाची बोलणी सहन करण्याची स्थिती वय झाल्यावर असू शकतेच नाही.
2 Oct 2025 - 4:36 pm | स्वधर्म
काही एका मर्यादेपर्यंत म्हातारपणातील आजारासाठी आपले पैसे बाजूला काढून ठेवावेत हे पटते. पण विमा हा खूपच किचकट विषय आहे. कार्पोरेटवाले निगोशिएट करून चांगल्या टर्म्स व कव्हरेज मिळवतात पण व्यक्तीगत पातळीवर तेवढे सरळ नसावे. शिवाय प्रत्येक डॉक्टर हल्ली विमा असल्यास आधी सांगावे अशी पाटी लावतात. बहुधा विमा असेल तर त्यांचे दरच वेगळे असतात असे पाहिले आहे. विमा कंपनी व दवाखाने यात मधल्या मधे रूग्ण अडकू शकतो. फारसा अनुभव नाही, पण असे काहीसे अनुभव आलेत.
1 Oct 2025 - 3:27 pm | चित्रगुप्त
-- नवीन सून आल्यावर घराचा रंग, फर्निचर, कपबश्या, कपडे, भिंतीवर कोणती चित्रे, कॅलेंडर वा फोटो वगैरे टांगावेत, घरात नवीन पुस्तके आणावीत की असलेलीच सर्व रद्दीत द्यावीत, कोणत्या बुवाच्या भजनी लागावे, बाहेर जेवायला कितीदा जावे, पिझा वगैरे कितीदा मागवावा, शाकाहार चांगला की मंसाहार, संध्याकाळचे जेवण किती वाजता करावे, टीव्हीवर काय आणि केंव्हा बघावे, मोबाईलपासून किती मिनीटे दूर रहावे, कोणत्या पॅथीची औषधे घ्यावीत किंवा घेऊ नयेत, मॉलमधून किती वस्तू आणाव्यात, किती वाजता उठावे आणि झोपावे, घरात कोणी यावे आणि कोणी येऊ नये .... अश्या अनंत बाबतीत मतभेद निर्माण होत असतात. नंतर नातवंडे झाल्यावर (- अर्थात सुनेला मुले होऊ द्यायची असतील तर. हल्ली याही कारणावरून काडीमोड झालेले बघितले आहेत) त्यात आणखी अनेक गोष्टीची भर पडत जाते.
एकंदरित जवळच, पण वेगळे रहावे हे उत्तम.
माझ्या एका परिचितांच्या घरी एक प्रत्यक्ष घडलेला मजेशीर किस्सा:
लग्न झाल्यानंतर मुलगा नोकरीवर जायला निघण्यापूर्वी जेवायला बसला. शेवटी थोडासा 'मागचा भात' घेतल्यावर त्यावर टाकायला त्याची आई रोजच्याप्रमाणे दही घेऊन आली, तर सुनेच्या घरच्या पद्धतीप्रमाणे ती दूध घेऊन आली. मुलाची पंचाईत झाली की आता काय घ्यावे. त्याने सवयीप्रमाणे दहीभात खाल्ला आणि बाहेर गेला. झाले. सुनेचे माथे ठणकले. रात्री त्याची चांगलीच हजेरी घेतली गेली म्हणून त्याने दुसर्या दिवशी भातावर दूध घेतले, तर आईला रडू फुटले. एका रात्रीत माझा मुलगा बदलला, सुनेने त्याला आपल्याकडे वळवून घेतले, आता त्याला आई नकोशी झाली, चांगले 'पांग' फेडले ... वगैरे.
आम्हाला पहिला नातू झाला तेंव्हा बाळाला बेसन चोळून आंघोळ घालावी की आटा चोळून, यावर सासू-सुनेचा वाद झाला होता.
1 Oct 2025 - 6:33 pm | सुबोध खरे
आम्हाला पहिला नातू झाला तेंव्हा बाळाला बेसन चोळून आंघोळ घालावी की आटा चोळून, यावर सासू-सुनेचा वाद झाला होता.
या वादासाठी सूनच असायला हवी असे नाही.
आमच्या नातवाच्या वेळेस आमच्या मुलीने एक दिवस झाल्यावर बाळाला मालिश करायला आलेल्या बाईला काढून टाकले.
यावर तिच्यात आणि आमच्या पत्नीमध्ये वाद सुरु होता. पुढचे तीन महिने ती स्वतः आपल्या मुलाला मालिश करत असे. दिल्लीला परत गेल्यावर ती आणि जावई मिळून नातवाला अंघोळ घालतात.
बाळाला संभाळायला ठेवलेल्या बाईने एक आठवडा झाल्यावर काम सोडून दिले कारण आमच्या मुलीने आपल्या मुलाला तिच्या हातात देण्यास नकार दिला.
आई मुलीत वाद थांबवण्याचे काम मला करावे लागे आणि अर्थातच "तू सदा सर्वदा मुलीचीच बाजू घेतोस आणि त्यामुळे मुलगी माझं ऐकत नाही "हे बोलणे मी अनेकदा ऐकले आहे. बाळंतिणीने बायकांकडून कामं करून घ्यायची असतात हा बायकोचा युक्तिवाद.
आता तीस वर्षाची मुलगी स्वतःच्या मुलाचे सर्व सोपस्कार स्वतः करणार असेल तर त्यात विरोध करण्यासारखे काय आहे?
1 Oct 2025 - 2:22 pm | अनिरुद्ध प
पु ले शु
1 Oct 2025 - 4:58 pm | कुमार१
संवेदनशील विषय आहे खरा . . .
1 Oct 2025 - 7:22 pm | कर्नलतपस्वी
एल पी जी,एम एन जी एल,इन्डक्शन, विद्युत चुली आल्या तरी मराठीतली म्हण काही बदलली नाही. कारण माणसांचे स्वभाव अजून तसेच आहेत.
यावर मी एक उपाय शोधला आहे सिलेक्टिव्ह डेफनेस, जास्त त्रास करून घ्यायचा नाही..
3 Oct 2025 - 9:13 pm | कॉमी
छान लेख.
आणि डॉ. खऱ्यांचे प्रतिसादही आवडेल.