यांत्रिक घड्याळे
माझा घड्याळांशी संबंध आला तो १९८० मध्ये. काहितरी छंद या दृष्टीने एक जुने मनगटी घड्याळ उघडून ,त्याचे भाग सुटे करून जोडले. मग या घड्याळ रिपेंरिंगची हत्यारे, नवीन सुटे भाग कुठे मिळतील याचा शोध घेतल्यावर मुंबईत जे.जे. हॉस्पिटल आणि भुलेश्वर दरम्यान ही दुकाने सापडली. मग याच घड्याळाबरोबर एक गजराचे घड्याळ आणि भिंतीवरचे टोले देणारे घड्याळही उघडले. तर ही सर्व घड्याळे तांत्रिक पद्धतीची होती. डिजिटल जमाना आला १९९५ मध्ये आणि काम बंद झालं. २००५ नंतर मोबाईल येऊ लागले आणि त्यांनी तर बऱ्याच गोष्टींना बाद केलं. टॉर्च, ओडिओ सिस्टम, गजराची आणि हातातली घड्याळे, डायऱ्या , कॅलेंडर, कॅमेरे आणि घरातले किलिंग किलिंग फोन इत्यादी.
माझा हा छंदच होता आणि नोकरीतील फावल्या वेळात जमेल तसे दुरुस्ती करत असे. तो वेळ मिळावा आणि गिऱ्हाईकांनी( शेजारी किंवा नोकरीतील ओळखीचे लोकच) यांनी तगादा लावू नये म्हणून मी चार मनगटी आणि दोन गजराची घड्याळे ठेवली होती ती बदली म्हणून देत असे. एचएमटीची काळ्या आणि पांढऱ्या डायलची काही घड्याळे तर गिऱ्हाईकांनी घेऊनच टाकली.
गजराची घड्याळे - यांची अचुकता चोविस तासांत पाच मिनिटे एवढी मिळाली तरी काम चालत होते. पण हे गजर देण्याचे अचूक काम मोबाईलने अंगावर घेतले. गजराच्या घड्याळाच्या गजरानेच आमच्या मुलांना जाग येते , मोबाईलच्या आवाजाने नाही असे सांगणारेही लोक होते. पण मुंबईत आणि इतर ठिकाणी बॉमस्फोटासाठी या गजराच्या घड्याळांचा वापर सुरू झाला आणि घरात तीन चार गजराची घड्याळे संशयास्पद वाटू शकतील अशी परिस्थिती आली. ते कामच बंद केले आणि घड्याळे वाटून टाकली गरजूंना.
भिंतीवरील घड्याळे- यात तासाला आणि अर्ध्या तासाला ही टोले पडण्याची सोय असे. रचना फारच मजेशिर असे. एक मोठा लंबक हलत राहाणे आणि मोठी तबकडी हे फारच सुंदर दिसे. माझ्याकडे हे एक घड्याळ प्रथम आले दुरुस्तीला. तो मालक ( वयस्कर गृहस्थ) म्हणाला की हे तुम्हाला देऊनच टाकतो. काहीपण करा.आमच्या घरातल्यांना ते जुनाट घड्याळ नको आहे. त्यांनी नवीन बॅट्री सेलवर चालणारी घड्याळे आणून सर्व खोल्यांत लावून टाकली आहेत.
मी ते चालू करून भिंतीवर लावले. बारा वर्षांनी त्या मालकाच्या मुलाने निरोप पाठवला..." बाबांनी तुमच्याकडे एक घड्याळ दिले होते ते असल्यास हवे आहे." मी बोललो "ते आहे माझ्याकडेच, येऊन घेऊन जा." या घड्याळांना मात्र आता antique value आलेली आहे.
____________
मनगटी घड्याळे-
मेकॅनिकल वॉचची अचुकता फार फार तर दिवसाला दहा सेकंद अधिक उणे इतकी जाऊ शकते. पण फडतूस पंचवीस रुपयांचे डिजिटल क्वार्टझ वॉचसुद्धा वर्षाला दहा सेकंद एवढी अचुकता देते. हे झाले आतल्या यंत्राबाबत( movement).
पुन्हा यांमध्ये १.चावी द्यावी लागणारी आणि २.आपोआप चावी बसणारी auto winding असे दोन प्रकार. क्रमांक दोनमध्ये Seiko 5 नावाजलेले होते.
उरले काय तर वरची केस. ती कितीही महाग करतात. टिटानियम मेटलची असेल तर गंजत नाही.
केसच्या आत पाणी न जाणे आणि न गंजणे यासाठी पैसे अधिक देणे ठीक. पण केवळ डायमंड लावणे, सोने वापरणे हे फक्त सौंदर्यासाठी.
डिजिटल मुव्हमेंट एका बॅटरी सेलवर चालते आणि हे सेल उणे दहा सेंटिग्रेड तापमानास किंवा खाली व्होल्टेज देत नाहीत हा मोठा दोष. मेकॅनिकल ओटो वाईंडिंग मात्र उणे चाळीस तापमानापर्यंत चालते आणि केस चांगली वाटरप्रूफ असेल तर पाण्यात वापरता येते . म्हणून साहसी, हिमालयात जाणारे, बोटीवरचे लोक ही घड्याळे पसंत करतात.
घड्याळात पाणी जाते कसे आणि कुठून? मागच्या झाकणातून किंवा चावीतून किंवा वरच्या काचेतून.
भक्कम केसमध्ये मागचे झाकणच नसते. म्हणजे तिथून पाणी जाण्याचा प्रश्न बाद होतो. चावीच्या आतला वाशर चांगला असतो. ओटोवाइंडिंग प्रकारामुळे चावी फिरवली जातच नाही आणि वाशर झिजत नाही. तिथूनही पाणी जात नाही. वरची काच ही खरोखर काच नसते आणि तो एक चांगला क्रिस्टल असतो. तो अप्रतिम आकारात कापून ( फेस टू फेस) केसमध्ये वर मशिनने प्रेस करून बसवलेला असतो.केस टिटानियमची केलेली म्हणजे गंजण्याचा प्रश्न नसतो. तर हे सगळे असेल तरच जास्ती किंमत मोजायला हरकत नाही. तर मग हे घड्याळ मुव्हमेंट केसमध्ये बसवतात/काढतात तरी कसे? मुव्हमेंट केसमध्ये वरून आत ठेवतात, चावी प्रेस करून जोडतात आणि वरून क्रिस्टल दाबतात. तर हे काम फक्त कंपनीच करू शकते. उघडताना मशिन वापरून क्रिस्टल उचकटल्यावरच मुव्हमेंट बाहेर काढता येते.
वाटरप्रूफींग - घड्याळ कोणतेही असो यांत्रिक अथवा डिजिटल क्वार्टझ किंवा स्मार्ट वॉच ते हातात बांधलेले असते आणि त्यात पाणी जाण्याची शक्यता कमी करण्याची गरज असते. मागचे झाकण हे सगळ्यात मोठे दार असते. त्या झाकणाखाली एक वॉशर असतो. झाकण आट्यांवर ( थ्रेडस) फिरवून लावताना तो वॉशर थोडासा चिरडला जाऊ शकतोच. काही ठिकाणी ते झाकण आणि तो वॉशर प्रेस करून दाबून बसवतात. पण ही युक्ती नंतर काम करत नाही. झाकण सैलच बसते. मी तर झाकणाच्या कडेने फेविबॉंडच लावत असे. त्याने बराच अटकाव होतो.
तर वाच कंपनीचं नाव कितीही नावाजलेले असो आणि केसला मागे झाकण असेल तर अधिक किंमत मोजण्यात काही अर्थ नाही. हल्ली चांगल्या केसमध्ये मेकॅनिकल मुव्हमेंट न टाकता क्वार्टझ मुव्हमेंट टाकतात. हे ठीकच आहे पण वापर उणे तापमानास करता येणार नाही.
मोठ्या कंपन्यांच्या जाहिराती दिसतात आणि त्यात मेकॅनिकल मनगटी घड्याळे घातलेल्या नामवंतांचे फोटो असतात. ते केवळ एक मार्केटिंग उरले आहे असे मला वाटते.
घड्याळाची सुरक्षितता....
पट्टा अडकवायच्या ज्या दोन दांड्या असतात त्यावरच घड्याळाची सुरक्षितता असते आणि त्या कधीही तुटतात.कारण त्यात एक तकलादू स्प्रिंग असते ती गंजते. एकच नायलान बँड दोन्ही दांड्या वरून नेला असेल तर मात्र एक तुटली तरी दुसऱ्यावर घड्याळ मनगटावर लोंबकळत राहाते. पूर्वी काही घड्याळांत ज्यादाची साखळी असे.
काही घड्याळात कायमची पितळी दांडी लावून टाकायचो.
मी घड्याळ रिपेअरिंग शिकलो कुठे आणि कसे?
नोकरी करत असताना शिफ्ट ड्युटी असत आणि भरपूर फावला वेळ मिळत असे. काहितरी उचापत्या करण्याची आवड होतीच. एकदा एक हेन्री सँडोज कंपनीचे जुने घड्याळ मला भावाने आणून दिले. त्यांच्या ऑफिसातल्या एकाने सांगितले की त्याच्या या घड्याळावर पैसे खर्च करून थकलो आहे , नवीनच घेतो. भाऊ म्हणाला दे मला दहा रुपयांत. त्याने ते दिले लगेच. ते माझ्याकडे देऊन म्हणाला बघ याची काय दुरुस्ती होते का. ती 96 नंबरची मुव्हमेंट ( आतले यंत्र) होती. घड्याळ शिकायला अगदी सोपे असे ते होते. वडलांच्या ओळखीचा एक वॉचमेकर होता दादरला. त्याला वडलांनी विचारले की कोणती हत्यारे लागतील घड्याळ उघडायला आणि पाहायला तर त्याने सांगितले " लेन्स, स्क्रू ड्रायवर अने चिप्प्यो."(= भिंग,स्क्रू ड्रायवर आणि चिमटा). ते बाबा लगेच घेऊन आले. मग माझे रोजचे काम एकच ... रोज ते घड्याळ उघडून सगळे भाग वेगळे करायचे आणि परत जोडायचे. घड्याळाचे सुटे भाग मिळणारी दुकानेही शोधून काढली. दादरमध्ये कोतवाल उद्यानाच्या समोरच एक होते. पण मोठी पेठ जे.जे. हॉस्पिटल - पायधूणीजवळ होती. इब्राहिम रहिमतुल्ला स्ट्रीट आणि अब्दुल रेहमान स्क्रीनवर. एकेक घड्याळ रिपेरिंगची कामे ओळखिच्यांची घेऊ लागलो तरीही अगदी कसबी काम येत नव्हते. तुटलेल्या बॅलन्सचा स्टाफ( मधला दांडा) बदली करणे. कुणाकुणाला वॉचमेकरना विचारत असे परंतू खरी माहिती देण्याचे टाळत. मग प्रश्न पडे की हे लोक शिकले कुठे? ते कळले दादरमधल्याच एका माणसाची( श्री कुलकर्णी)ओळख झाल्यावर. तेही घरूनच काम करत आणि त्यांनी मला एकदा दुकानात पार्टस घेताना पाहिले. तिथे त्यांच्या लक्षात आले की मी नवीन आहे आणि शिकत आहे. मला त्यांनी सांगितले की मी अगदी रोज शिकवू शकणार नाही पण अडचण आल्यास ते काम माझ्याकडे आणा मी सांगेन कसं करायचं ते. मुंबईत मोठी वॉच आणि रेडिओची दुकाने होती त्यात काही लोक नोकरीवर होते. रिटायर झाल्यावर ते बाहेर पडले आणि आपली दुकाने टाकून बसले. त्यांना इत्यंभूत ज्ञान नोकरीतील मिळालेले. पण त्यांच्याकडे शिकायला ठेवलेल्या लोकांना ते प्रथम पट्टे आणि केस साफ करायचं काम देत. नंतर हळूहळू एखादे काम देऊन शिकवत. फावरलूबा दुकानामधून बाहेर पडलेल्या एका मराठी माणसाकडे त्यांनीही उमेदवारी केली होती. एकदा दादर सार्वजनिक वाचनालयात ( छबिलदास हायस्कूलसमोर)विचारले की वॉच रिपेरिंगचे पुस्तक आहे का? त्यांनी एक मराठीतले पुस्तक आणि इंग्रजी पुस्तकं दाखवले. इंग्रजीसाठी दोनशे रुपये अनामत ठेवावी लागेल सांगितलं. आणलं ते. अहाहा... अलिबाबाची गुहाच उघडली. अमेरिकन पब्लिशरचं पुस्तक. संपूर्ण चित्रांसह सर्व दुरुस्ती कामांची स्पष्ट माहिती देणारं पुस्तक होतं. सगळेच प्रश्न सुटले. नंतर ते मराठी पुस्तकही आणलं तर काय आश्चर्य ..त्या फावरलूबा दुकानवाल्यानेच लिहिलं होतं, चित्रे संपूर्णपणे इंग्रजी पुस्तकातून कॉपी केलेली आणि कृती म्हणजे " या भागाची विशिष्ट रचना केलेली असते " अशी मोघम वर्णने होती. सगळी लबाडी.
कामाला खूपच गती आली. इब्राहिम रहिमतुल्ला स्ट्रिटवरचे एक दुकान म्हणजे सर्व स्विस हत्यारे मिळण्याचे ठिकाण होते. बर्जन हा चांगला ब्रँड होता. त्यांची तेलंही मिळायची. इतर स्प्रेअर पार्ट दुकानांपैकी युसुफ वाच सेंटरचा मालक मला खूप मदत करायचा. त्याचा मुलगा युसुफ माझ्याच वयाचा आणि त्याने डिजिटल टेक्निक शिकून बँक गल्लीत नवीन दुकानही टाकले. जे स्प्रेअर पार्ट मी तीन तीन घेत असे तेच अब्दुल रेहमान स्ट्रीटवरच्या दुकानांत बारा मिळत किंवा बारा घ्यावे लागत. भाव अर्थात फारच कमी. इकडे मुंबईतील इतर मोठे दुकानदार खरेदीला येत. पॉलिश पेपर फाइन एक कागद दोन रुपयाला मिळणारा इकडे चार रुपयांना बारा मिळत. सर्व डझनचा होलसेल भाव. चावी रॉड तीन रुपयाला तीन मिळणारे इकडे चार रुपयांना बारा. इत्यादी.
पण ... डिजिटल घड्याळे ९२ त्या आसपास येऊ लागली आणि यांत्रिक घड्याळे त्यांच्या सुनामीत वाहून गेली.
------------
आता कामाची गोष्ट -
बॅटरी सेलवर चालणारी घड्याळे दुरुस्ती अशी करावी?
या घड्याळात दुरुस्ती अशी फारशी नसतेच. एक तर हे घड्याळ अचूक चालते किंवा बंद पडते. बंद पडण्याची कारणं आणि उपाय
- १. बॅट्री सेलची पावर साधारणपणे एक वर्ष असते. तो सेल बदलणे. साधारणपणे 521,621 ,626 या तीन नंबरांचे Sony कंपनीचे सेल होलसेल स्प्रेअर पार्ट दुकानांत मिळतात ते तीन तीन घेतल्यास देतात ते घरी ठेवावेत.( १०-१५-२० /-)या रेंजमध्ये किंमती असतात. त्याच दुकानात ब्लोअर, चिमटा , छोटे स्क्रू ड्रायव्हर आणि भिंगही मिळेल. ही साधने फारशी महाग नसतात शिवाय ती इतर कामांतही उपयोगी आहेत. मग सेल बदलायचे शंभर- दोनशे रुपये देण्यापेक्षा स्वस्त आहे. घरात तीन चार घड्याळे असतातच आणि वर्षांत चार वेळा काम लागतेच तर हे कराच. थोड्या खटपटी नंतर घरीच सेल बदला.
घड्याळाचे मागचे झाकण उघडायचे, ब्लोअरने हवा फुंकून धूळ कचरा उडवायचा,जुना सेल काळजीपूर्वक बाजूला काढायचा आणि त्याच नंबराचा दुसरा टाकायचा. चावी काटे फिरवून आत दाबायची . मग झाकण घट्ट लावायचे. पंधरा मिनिटांचे काम असते.
२. घड्याळात एक इलेक्ट्रॉनिक सर्किट पीसीबी असते ते सर्किट बंद पडते हवेतील दमटपणामुळे. सिटिझनचे सर्किट(2030) यात हा दोष फार म्हणूनच एचएमटी मागे पडले. टाइटन मध्ये नाही.तसेच रस्त्यावर मिळणाऱ्या स्वस्त ( १५०रु/-)इतर चाइनिज घड्याळांतही बहुधा हा दोष नसतो. उपाय नवीन घड्याळ घेणे.
३. क्वार्ट्झ घड्याळाची मुव्हमेंट स्वस्त असते, वरील महाग केस टाकून किंमती वाढवतात. मुव्हमेंट बदलू शकतो पण 2030 नंबरची म्हणजे सिटिझनची अजिबात टाकू नका. पावसाळ्यात बंद पडते. इतर कोणत्याही कंपनीची घ्या.
डिजिटल घड्याळे अचूक चालतात आणि खूप स्वस्त असतात त्यामुळे महागडी घड्याळे घेऊन दुरुस्ती करण्यापेक्षा नवीनच घेणे स्वस्त पडते.
माझ्याकडे बरीच हत्यारे जमा झाली आणि ती आता निरुपयोगी आहेत. त्या सर्वांचा फोटो देऊनही उपयोग नाही. शिवाय त्यांचे रिपेरिंगही नाही.
तर हा लेख घड्याळांची आंतररचना सांगण्यापेक्षा त्यासंबंधी किस्से सांगण्याचाच होऊ शकेल. वाचकांनी यात भर घालावी.फोटो टाकावेत.प्रतिसाद येतील तसा लेख वाढवेन.
( संपादन करून दुरुस्ती करता यावी म्हणून लेख कलादालन विभागात देत आहे.)
प्रतिक्रिया
24 Sep 2025 - 5:12 pm | गणेशा
घड्याळाने पहिल्यादा मागचा काळ दाखवला असे म्हणावे लागेल:)
छान लिहिले आहे..
लिहीत रहा.. वाचत आहे...
24 Sep 2025 - 5:59 pm | चौथा कोनाडा
भारी रोचक लेख..... भिंतीवरच्या घड्याळाचा किस्सा भारी आहे. आणि आणि तुमचा घड्याळ दुरुस्तीचा छंद सुद्धा !
मी माझे पहिले रिस्ट वॉच घेतले ते नोकरीला लागल्यानंतर पहिल्या दोन-तीन महिन्यातच .... कारण एकदा कंपनीची बस चुकली .. आणि पोहोचायला उशीर होऊन बॉसच्या शिव्या खायला लागल्या... मग मी सोसायटीचा जेमतेम रक्कमेच लोन काढलं... आणि एक सायकल, टाईम स्टार रिस्ट वॉच मनगटी घड्याळ, आणि फेवरलोबा चे गजराचे घड्याळ.... मनगटी घड्याळ घेण्याचे माझे बजेट नव्हते म्हणून टाईम स्टार घ्यायला लागले.....
प्राईम स्टार पहिले एक-दोन वर्ष ठीक चालले नंतर मात्र कटकटी सुरू केल्या.... काही वर्षांनी एचएमटी घेतले आणि टाइम स्टार धाकट्या भावाला देऊन टाकले.... त्यांनी कुठेतरी हरवून टाकलं, माझी बोलणी खाल्ली .... 1992 साली टायटन नवीनच आले होते तेही सोसायटीच्या लोनवर मिळत होते रुपये दहाशे पन्नास तीन हप्त्यावर... हे मात्र बेस्ट चालले... पुढे कंपनीने एका समारंभा निमित्त कंपनीचा लोगो असलेल्या मोठी डायल असलेलं सोनेरी सुंदर घड्याळ भेट दिले... सर्वच काम डिजिटल सुरू झाल्यानंतर स्क्रीनवर सतत वेळ दाखवणारी पट्टी होती.... घड्याळाची गरज कमी होत गेली हळूहळू मनगटी घड्याळ वापरायचं विसरून गेलो आता मोबाईल मध्येच बघत असतो
24 Sep 2025 - 6:29 pm | टर्मीनेटर
नॉस्टॅलजिक केलंत कंकाका...
छान लेख!
24 Sep 2025 - 7:01 pm | Bhakti
मस्तच लेख!
टायटनचे घड्याळच आवडायचे आणि आता डिजीटल.
24 Sep 2025 - 7:25 pm | धर्मराजमुटके
माझा घड्याळांशी संबंध आला तो १९८७-८८. माझे वडील घड्याळ दुरुस्ती करणारे होते. हातातली घड्याळे, भिंतीवरची घड्याळे (लोलक असलेली, चिऊताई बाहेर येणारी वगैरे). काही काळ ते टॉवर क्लॉक्स देखील दुरुस्त करत. नंतर ते कंपनीत हजेरी लावणारी घड्याळे दुरुस्त करण्याच्या कंपनीत कामाला लागले.
आपणापैकी कोणी २००० सालाच्या अगोदर कोणत्याही मोठ्या ठिकाणी नोकरी केली असेल तर तुमचा ह्या घड्याळाशी नक्कीच संबंध आला असेल. त्यात एक कागदी कार्ड टाकून हँडल दाबले की तुम्ही कामावर येण्याची / जाण्याची तारीख / वेळ त्यावर उमटत असे.
कारखान्यांत उशीरा कामावर येणारे, कामाला खोटी / लवकरची हजेरी लावून देण्यासाठी बरेच लोक आमिश दाखवत / धमक्या देखील देत असत). टाईम किपर हा कारखान्यातला एक शक्तीमान हुद्दा होता.
मला चित्र डकवता येत नाही म्हणून खाली त्या घड्याळ्याच्या चित्राची लिंक/ दुवा देत आहे.
हजेरी लावणारे घड्याळ
दूवा क्र. २
तिकडे त्यांनी जवानीची बरीच वर्ष काढली आणि ९०-९२ साली शेठकडे ८०० ऐवजी १००० रुपये पगार मागीतला तेव्हा त्यांना शेठने कामावरुन काढून टाकले. नंतर त्यांनी त्याच क्षेत्रात स्वत:चा व्यवसाय सुरु केला. त्या व्यवसायाच्या जोरावर त्यांनी बरीच प्रगती केली आणि आम्हाला चांगले दिवस दाखवले.
एक वेळ अशी होती की घाटकोपर पासून ठाणे पर्यंत लाल बहादूर शास्त्री मार्गावर जेवढ्या कंपन्या होत्या तिकडे सगळीकडे वडीलांना कामे मिळत गेली. एक एक घडयाळाचे वजन २२-२५ किलो असायचे आणि आम्ही त्याकाळी डोंगरावर (उंचावर राहायचो). घड्याळ दुरुस्तीसाठी घरी आणायचे तर अंगावर काटा उभा राहायचा. कमीत कमी १००-१५० पायर्या चढून ते घरी न्यावे लागायचे.
घरी कोणीही नवागत आला आणि आजूबाजूच्या परिसरात "घड्याळवाले" म्हणुन विचारले की ओळखणारे कोणीही त्यांना घरी आणून सोडायचे.
मी देखील कॉलेज जीवनात असताना त्यांना मदत म्हणून ५-७ वर्षे ह्या कामात मदत केली. साधारण २००० सालापर्यंत सगळीकडे संगणक दिसू लागली आणि नंतर कार्ड पंच करणारी मायक्रोप्रोसेसर वर आधारीत हजेरी घड्याळांनी बाजारात प्रवेश केला. तेव्हा वायटुके ची चर्चा जोरात होती आणि मी देखील ही संगणकावर आधारीत हजेरी घड्याळे बंद पडतील आणि आपले जुने सोनेरी दिवस परत येतील अशा मुर्खांच्या नंदनवनात वावरत होतो. मात्र जग जेथून सुरु झाले तेथून पुढे जाते, मागे येत नाही हे घड्याळाच्या व्यवसायात असून मला तेव्हा कळाले नाही. (घड्याळ बंद पडते त्याप्रमाणे जग करोना काळात काही प्रमाणात तात्पुरते बंद पडले हा एकमेव अपवाद ).
काही काळ मी देखील 2030 सर्किट वर आधारीत घड्याळे असेंब्ली करुन विकायचा उत्साही उद्योग केला. मजा यायची. एचएमटी / अजंता च्या अगोदर Favre Leuba (गावठी उच्चार फावर लुबा) या कंपनीचे देखील एक साम्राज्य होते. टायटन, सिको , सिटीझन, त्यामानाने फार नंतरचे .
सांगायचा मुद्दा म्हणजे माझ्या बाबतीत घरात दिवसरात्र अनेक घड्याळे असल्यामुळे सतत वेळ दिसत राहायचा आणि टकटक आवाज कानात घुमत राहयचा. त्यामुळे आयुष्यात विकत घेऊन कधी घड्याळ हाती बांधले नाही. लग्नात जोडी घडी मिळाली (नवरा बायकोचे सेम डिझाईनचे घड्याळ). बायकोची मर्जी सांभाळ्ण्यासाठी काही दिवस हातात घातले नंतर ठेऊन दिले.
कामानिमित्त कंपनीत गेलो तरी संबंध घड्याळाशीच. त्यामुळे हातात घड्याळ न बांधताच जवळपास अचूक वेळ ओळखण्याची कला साध्य झाली होती. आता मोबाईलमधे वेळ दिसते ती वेगळी गोष्ट पण अजूनही हातात घड्याळ बांधून मिरवावे असे वाटत नाही.
नंतर इलेक्ट्रॉनिक हजेरी घड्याळे वाढत गेली आणि आमचा व्यवसाय बंद पडला. मी देखील जड अंतःकरणाने शत्रुच्या गोटात प्रवेश केला. (संगणकीय क्षेत्रात प्रवेश केला).
तुमच्या लेखामुळे ह्या आठवणी जाग्या झाल्या.
24 Sep 2025 - 9:14 pm | कंजूस
@धर्मराजमुटके, तुमचा अनुभव वाचून फारच आनंद झाला. तुमचे वडिल आणि तुम्ही खरेच घड्याळजी.
या छंदाबद्दल लिहिण्याचा योग आलाच नाही. २०१२ मध्ये मिपावर आलो आणि घड्याळे रिपेरिंग ९५लाच बंद झाले होते. तसेच ही घड्याळेही बाजारातून मागे पडली होती.
अभ्या.. याच्या खरडफळ्यावरच्या खरडीमुळे चालना मिळाली आणि चामुंडराय यांची विनंती आल्यावर विचार केला की जरा लेखाला सुरुवात तर करू. अजून बरेच किस्से आहेत ते लिहीन.
25 Sep 2025 - 10:09 pm | चौथा कोनाडा
यात दाखवलेलं ह. ला. घ. बरंच जुनं दिसतंय.
आमच्या कंपनीत साधरण १९८५-९० च्या आसपास खालील प्रकारचे ह. ला. घ. वापरात होते.
आणि प्रचित दाखवलेले कार्डस, आणि डावीकडे दाखवलेला कार्ड स्टॅण्ड हा आमच्या त्या वेळच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता.
1 Oct 2025 - 2:09 pm | अनिरुद्ध प
मी स्वतः या प्रकारच्या यन्त्राचि निर्मिति आणि सेवा देण्याच्या कम्पनित नोकरिला होतो, त्याच वेळि रेल्वेने सुद्धा अशी टिकिट वेन्डिन्ग मशीन मुम्बै त सर्व रेल्वे स्थानका वर बसवली होति त्यात कुपन टाकुन पन्च केले असता स्थानकाचे नाव आणि वेळ उमटत असे आणि आपण त्या वर प्रवास करु शकत असु. असो . . .
लेख आवडला.
2 Oct 2025 - 6:08 pm | धर्मराजमुटके
नॅशनल, डिजीटल, दिव्या की अजुन वेगळीच कोणती कंपनी ?
3 Oct 2025 - 12:39 pm | अनिरुद्ध प
ठाणे येथे अमेरिकन वाच कम्पनी नावाचे दुकान होते ते सुद्धा अशा प्रकारच्या यन्त्रान्चि निर्मिति करत होते. आता ते अजुन चालु आहे का ते माहित नाही.
3 Oct 2025 - 5:34 pm | धर्मराजमुटके
अमेरीकन वॉच कंपनी अजून आहे ठाण्यात पण आता हजेरी मशीन, कुपन वॅलीडेटींग मशीनचे काम बंद केले आहे. हातातली आणि भिंतीवरील घड्याळे विकतात.
24 Sep 2025 - 8:00 pm | युयुत्सु
लेख आवडला!
घरातली घड्याळं दुरुस्त करण्याबद्दल खाल्लेला मार पण आठवला! ;)
24 Sep 2025 - 9:00 pm | कंजूस
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार.
साठ सालच्या अगोदरच्या सर्वांना आपले पहिले घड्याळ कधी घेतले असे घेतले यांच्या आठवणी येत राहातात. कारण फक्त यांत्रिक घड्याळे मिळत होती आणि तीही महाग होती. तीनशे रुपयांना शिलाई मशिन येत असे आणि घड्याळाची तीनशे रुपयांना असे. तर सामान्य मनुष्यांस पगार तिनशेच्या आसपास असे.
25 Sep 2025 - 6:58 am | कर्नलतपस्वी
वय वर्ष विस.पहिले घड्याळ पन्नास वर्षापुर्वी १९७५ साली घेतले होते. तबकडीवर टाईमस्टार असेच काहीतरी लिहीलेले आठवते. रूपये एकशेवीस असेच काही आठवते पण नक्की नाही. दुकानातून युनिट मधे परत जाईपर्यंत बंद पडले. कार्य बहुलतेमुळे पंधरा दिवस दुकानात जाऊ शकलो नाही. तसेही युनिट पासून दहा बारा किलोमीटर दुकान दुर होते.
दुकानदार बदमाश निघाला म्हणला हे माझ्याकडून घेतलेच नाही. त्याने मला पावती दिलीच नव्हती. "हम बैठे है ना", अशी गॅरंटी, वॉरंटी दिली होती.खुप बाचा बाची झाली.पण तो ऐकेनाच. शेवटी सटकली आणी माझ्या मित्रानी व मी काऊंटर असलेली नवी जुनी घड्याळे जमिनीवर फेकून दिली आणी पळून गेलो. घड्याळे फुटली काही गटारात पडली बर्यापैकी नुकसान झाले अर्थात माझे पैसेही बुडाले कारण त्यावेळेस पैसे जमा करून अशा गोष्टी घ्याव्या लागत.
पावती नसल्याने त्याला आमचे नाव गाव पत्ता माहीत नव्हता व मी पण त्या बाजूला फिरकलो नाही. कारण छावणी फार दुर होती.
त्यावेळेस एच एम टी घड्याळ कॅन्टीन मधे यायचे पण त्या साठी नंबर लावावा लागत असे.
दुसरे घड्याळ कॅन्टीन मधून एच एम टी सोना यलो डायल घेतले. सुट्टीवर गेल्यावर मित्राने काढून घेतले व पैसे खिशात कोंबले. पुढे हाच सिलसिला चालू राहीला. "घे घड्याळ, जा सुट्टीवर, दे मेव्हण्याला,आमक्ल्या,ढमक्याला", बहुतेक वेळा माझे पैसे बुडाले. "तुम्हाला काय, सगळं फुकटात मिळतं",अशी सर्व मित्र,नातेवाईक यानी करून घेतलेली सोईस्कर कल्पना. पुढे एच एम टी चे क्रेझ कमी झाली व पाच सात वर्षानंतर मनगटावर एक घड्याळ स्थिरावले......
24 Sep 2025 - 10:41 pm | अमरेंद्र बाहुबली
एख आवडला. एवढे छोटे यंत्र तास, मिनिट, सेकंद ह्यांचे काटे अचूक कसे चालतात ह्याचे नेहमीच कुतूहल वाटत आले आहे, एकदा युट्यूबवर समजून घ्यायचा प्रयत्न केला होता.
25 Sep 2025 - 8:24 am | कंजूस
अकरावी झाल्यावर पहिले घड्याळ घेतले.
७१ साली फावरलुबा घड्याळे तीनशे रुपयांना मिळत. परंतू कस्टम्स खात्याने पकडलेली घड्याळे 'अपना बाजार' सारख्या दुकानांतून १५०-२०० रुपयांना विकली जात. त्यासाठी दुकानाबाहेर रांग लावावी लागे. आठ वाजता दुकान उघडल्यावर त्या दिवशीची चार पाच घड्याळे पहिल्या गिऱ्हाइकास दाखवली जात. तर असे मला १६० रुपयांचे फावरलुबा मिळाले. ते मी बरीच वर्षे वापरले.
25 Sep 2025 - 11:38 am | आग्या१९९०
१९७५ चे Tressa Swiss made चावीचे ,स्टील डायल आणि पट्टा असलेले घड्याळ आहे माझ्याकडे. आजोबांनी घेतले होते मला. कधीच बिघडले नाही, अद्याप चालू आहे. रोजच्या रोज चावी दिल्यास अजिबात सेकंदभर मागे पुढे होत नाही.
वीस वर्षापूर्वी थंडीच्या दिवसात पहाटे बाईकवरून जात असताना अचानक काच निखळून आली आणि फुटली. फुटलेली काच घेऊन ओळखीच्या घड्याळ दुरुस्ती करणाऱ्या काकांकडे नवीन काच बसवण्यासाठी घेऊन गेलो. त्यांनी पूर्ण मुंबईमध्ये शोध घेतला त्या साईझची वक्राकार तशीच काच मिळाली नाही. शेवटी त्यांनी सपाट पृष्ठभाग असलेली काच लावली. काच बसवण्यापूर्वी त्यांनी घड्याळ खोलून त्यांच्याकडील ब्रशने साफसूफ करून दिले. काम झाल्यावर त्यांनी ह्या घड्याळाची स्प्रिंग आणि आतील यंत्र हे खूप उच्च दर्जाचे आहे असे सांगितले. कधी भविष्यात बिघडले तर माझ्याकडे घेऊन ये फुकटात दुरुस्त करून देईन पण बाहेर दुसरीकडे दुरुस्तीला देऊ नको. अद्याप तशी वेळ आली नाही. आता ते काका आणि त्यांचे दुकानही नाही.
हे घड्याळ वॉटरप्रूफ नव्हते. पावसाळ्यात काचेच्या आत वाफ जमून काच धुरकट होत असे. मनगटाच्या उष्णतेचे काही वेळाने वाफ निघून जायची. काचेवर बोटाने घर्षण केले की तात्पुरता धूसरपणा निघून जायचा.
त्या काळी घडाळ्यात किती jewels आहेत ह्याचा उल्लेख असायचा. आतील jewels च्या संख्येवर घडाळ्याची किंमत ठरत असे. माझ्याकडील घड्याळ १७ jewels चे आहे.
25 Sep 2025 - 2:28 pm | कंजूस
खरं आहे.
काही घड्याळे उघडताना फार काळजी घ्यावी लागते. स्विस घड्याळात विशेषकरून. घड्याळात नदी स्प्रिंग ही एका गोल डबीत बसवलेली असते. त्या डबीला बाहेरून दाते असतात. तर ही डबी बाजूच्या सेंट्रल वीलला फिरवते. ओवरहॉलिंग करताना या डबीचे झाकण उघडून त्यातली स्प्रिंग बाहेर काढून सर्व पेट्रोलने स्वच्छ करून परत ती आत बसवायची असते.
पण....
स्विसच्या काही घड्याळांत या डबीवर "DO NOT OPEN" असे लिहिलेले असते. तर हे न वाचताच जर ओपन केलीच तर घड्याळ वाल्याला ती परत बसवणे जमत नाही. तो मेलाच. गिऱ्हाइकाला नवीन घड्याळ घेऊन द्यावे लागते.
25 Sep 2025 - 12:20 pm | सुबोध खरे
सातवीची स्कॉलरशिप मिळाली १९७७ तेंव्हा वडिलांनी एच एम टी विजय हे घड्याळ घेतले होते. त्यानंतर बरीच वर्षे ते घड्याळ माझ्या मनगटावर होते.
नंतर १९९१ एम डी ला ऍडमिशन मिळाली तेंव्हा वडिलांनी टायटन चे सुंदर सोनेरी घड्याळ चामड्याचा पत्ता असलेले होते.
१९८७ साली नौदलात रुजू झालो तेंव्हा पासून वाटायचं कि आपल्या हातावर काळ्या रंगाचं इलेक्ट्रॉनिक घड्याळ असावं. पण उगाच पैसे खर्च का करा. वर लिहिलेली दोन घड्याळं होतीच.
१९९६ साली दिवाळीला घरी आलो होतो तेंव्हा डोक्यात एक विचार चमकला कि बायको कडे १५-२० साड्या असल्या तरी नवीन साडी घेतलीच जाते मग मी एक जास्त घड्याळ घेतलं तर काय झालं. तसाच उठलो आणि ठाण्याला पोंक्षे वॉच कंपनीत जाऊन ४०० रुपयाला कॅसिओचा क्रोनोग्राफ घेऊन आलो. ते २००६ मध्ये नौदलातून निवृत्त होईपर्यंत हातावर होतं. नंतर ते मुलाने घेतलं.
२००८ मध्ये एशियन हार्ट इन्स्टिट्यूट मध्ये विभागप्रमुख असताना एक सिटीझनचं घड्याळ विकत घेतले सोनेरी कडा असलेलं पांढरें घड्याळ त्याला छान चामड्याचा पत्ता होता. ते पाहून एका मित्राने विचारलं कितीला घेतलं ?
मी त्याला म्हणालो तूच सांग तो १५ हजार म्हणाला
दुसऱ्या मित्राने तसंच विचारलं तेंव्हा त्यालाही हेच म्हणालो तूच सांग तो म्हणाला २० हजार असेल.
मी फक्त हसलो. तो खनपटीसच बसला. शेवटी मी म्हणालो तुझा विश्वास बसणार नाही पण हे घड्याळ केवळ ७५ रुपयाला कुर्ला स्टेशनच्या पुलावर घेतलं आहे.
ते माझ्या मनगटावर आहे म्हणून त्याची किंमत लोक १५ हजार /२० हजार सांगतात. कारण मी मोठ्या कॉर्पोरेट रुग्णालयात मोठा डॉक्टर आहे म्हणून.
किंमत घड्याळाची नाही तर ते वापरणाऱ्या मनगटाची असते.
अर्थात घड्याळ चिनी बनावटीचे होते पण सव्वा वर्षे बिनतक्रार चालले. बॅटरी संपल्यावर बॅटरी ची किंमत ७५ रुपये सांगितली मी नकार दिला.
केवळ ७५ रुपयात चामड्याच्या पट्ट्यासकट एक वर्ष अचूक चालणारं घड्याळ हे आश्चर्य च नव्हे काय?
त्यांनतर मी घड्याळ वापरणे सोडूनच दिले आहे. दवाखान्यात आणि घरात समोरच घड्याळं आहेत आणि बाकी सोनोग्राफी मशीनवर काळवेळ दिसते तशी भ्रमणध्वनीतहि आहे. मग घड्याळ लागतेच कशाला? तीन टायटनची आणि एक एच एम टी विजय अशी घड्याळे पडून आहेत.
25 Sep 2025 - 2:32 pm | कंजूस
अशी घड्याळे घेऊन काही लोक येतात. ती त्यांच्या नातेवाईकांची आठवण असते.
चष्मा किंवा घड्याळ आठवण म्हणून ठेवणे सोपे असते. वापरणार नाही पण चालू स्थितीत करून द्या सांगणारे येतात.
25 Sep 2025 - 12:45 pm | प्रचेतस
धागा आणि त्यावरील प्रतिसादही खूप आवडले.
कंकाकांचा हा पैलू माहित नव्हता.
25 Sep 2025 - 2:53 pm | विजुभाऊ
सुरवातीला शाळेत परिक्षेला जाताना आईचे एच एम टी चे घड्याअळ वापरले. नंतर कॅसिओ चे डिजिटल घड्याळ स्टील पट्टावाले वापरले ते बरीच वर्षे टिकले. नंतर पहिली नोकरी लागल्यावर वडिलानी टायटन चे घड्याळ दिले. ते पाचसहा वर्षे वापरले. नंतर पट्टा खराब झाल्यामुळे रस्त्यात हरवले.. लाग्नात सोनाटाचे गोल्डन पट्ट्याचे घड्याळ मिळाले. ते अजूनही ( २५ वर्ष झाली ) वापरतो. खरेतर घड्याळाची गरज पडत नाही. पण ते घड्याळ एक आठवण आणि एक दागिना मणून वापरतो.
सोनाटाच्या घड्याळाचे पॉलिश अजूनही टिकून आहे. एकदम नव्यासारखे दिसते
25 Sep 2025 - 3:11 pm | अमरेंद्र बाहुबली
खरडफळा हे उत्तमोत्तम धाग्यांचे उगमस्थान झाले आहे! तिथल्या सुपिक चर्चा धागे जन्माला घालतात!
25 Sep 2025 - 8:49 pm | कंजूस
होय.
आणि जे धागे लेखकाबरोबरच वाचकांनाही लिहायला, मत व्यक्त करायला उद्युक्त करतात तेच चालतात.
25 Sep 2025 - 9:35 pm | चौथा कोनाडा
आता पर्यन्त खरडफळा क्वचित वापरला आहे.... फार काही व्यक्तिगत असेल तरच खफ वापरणे बाकी धागा काढला त र सर्वांनाच चर्चा करता येते.
25 Sep 2025 - 3:21 pm | कर्नलतपस्वी
घरातील गजराचं स्टील चे घड्याळ उघडून ठिक करण्याचा उपद्व्याप कैलास होता पण जमला नाही. मग ते मारूती मंदिर समोरील घड्याळवाल्याकडे दुरूस्त करण्यास दिले. तेच घड्याळाचे वैकुंठ ठरले. पुन्हा बिचारे कधीच घरी आले नाही.
१९९० मधे बेसिक कॉम्प्युटर लँग्वेज शिकलो. If then else loop लावून पहिले,अर्थात माझ्या आयुष्यातले डिजीटल घड्याळाचा कोड लिहून डेस्क टाॅपवर चिकटवले. त्यावेळेस संगणक एक जादूई खेळणे होते. सगळ्यांनाच आश्चर्य वाटायचे.
26 Sep 2025 - 11:04 am | गोरगावलेकर
कंजूसजी , आपला लेख माझ्या जेठांना वाचण्यासाठी पाठवला होता . त्यांचे गावी असतांना
घड्याळ दुरुस्ती - विक्रीचे छोटेसे दुकान होते (साधारण ४ ५ -५ ० वर्षांपूर्वी )
त्या काळी हेनरी सॅन्डोज ची मनगटी घड्याळे चालत . लोक गमतीने यांना हरी सांडूचे घड्याळ म्हणत .
भांडवल नसल्याने विविध प्रकारची घड्याळे विक्रीला ठेवणे जमत नव्हते . तेव्हा हरी सांडूचे मूव्हमेंट (केसच्या आतील मशीन ) साधारण ८० रुपयाला मिळे . डायल, केस , पट्टा २ ० -ते २ ५ रुपये .
वेगवेगळ्या प्रकारच्या डायल , केस दुकानाच्या काउंटरमध्ये काचेच्या खाली मांडून ठेवत . गिऱ्हाईक आधी डायल वगैरे निवडत आणि त्यानंतर १ ५ -२ ० मिनिटात मूव्हमेंट बसवून घड्याळ दिले जायचे . अगदी लग्नाची खरेदी करणारा नवरदेवही असेच घड्याळ घ्यायचा .
घड्याळाची वेळ मागे पडते किंवा पुढे जाते या तक्रारी तर रोजच्याच . यासाठी मूव्हमेंटमध्ये एक गोलाकार स्प्रिंग असायची तिला 'बालतार' म्हणत. ती आखूड-लांब करून किंवा बदलून काम व्हायचे .
लेख आवडला आणि लेखाच्या निमित्ताने त्यांच्याही आठवणी ताज्या झाल्या.
26 Sep 2025 - 11:43 am | कंजूस
धन्यवाद.
मी पण पहिले घड्याळ उघडले ते हेनरी सॅन्डोज 96 . त्यावरच हात साफ केला.
ठिकठिकाणी गावागावात विश्वासू घड्याळवाले असत. घड्याळ घ्यायचे म्हणजे त्याच्याकडेच असा परिपाठ होता.
26 Sep 2025 - 2:13 pm | अनन्त्_यात्री
|आजीचे घड्याळ |
आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक,
देई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुणा ठाउक;
त्याची टिक टिक चालते न कधिही, आहे मुके वाटते,
किल्ली देई न त्यास ती कधि, तरी ते सारखे चालते //
"अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,"
जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी
साडेपाचही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी
"बाळा झांजर जाहले, अरवला तो कोंबडा, उठ की !"//
ताईची करण्यास जम्मत, तसे बाबूसवे भांडता
जाई संपुनियां सकाळ न मुळी पत्ता कधी लागता !
"आली ओटिवरी उन्हे बघ!" म्हणे आजी, "दहा वाजले !
जा जा लौकर !" कानि तो घणघणा घंटाध्वनी आदळे.//
खेळाच्या अगदी भरांत गढुनी जाता अम्ही अंगणी
हो केव्हा तिनिसांज ते न समजे ! आजी परी आंतुनी
बोले, "खेळ पुरे, घरांत परता ! झाली दिवेलागण,
ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन !"//
आजीला बिलगून ऐकत बसू जेव्हा भुतांच्या कथा
जाई झोप उडून, रात्र किती हो ध्यानी न ये ऐकता !
"अर्धी रात्र कि रे" म्हणे उलटली, "गोष्टी पुरे ! जा पडा !'
लागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा//
सांगे वेळ, तशाच वार-तिथीही आजी घड्याळातुनी
थंडी पाऊस ऊनही कळतसे सारें तिला त्यांतुनी
मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले?
गाठोडे फडताळ शोधुनि तिचे आलो ! तरी ना मिळे !//
_ केशवकुमार (प्र. के. अत्रे)
26 Sep 2025 - 5:34 pm | राजेंद्र मेहेंदळे
आणि अनेक आठवणी सुद्ध्हा जाग्या झाल्या.
दहावी पर्यंत घड्याळ नव्हते त्यामुळे परीक्षेला जाताना वडीलांचे एच एम टी घड्याळ घालुन जायचो कधीतरी. पण त्याला फिरवुन बांधायचा स्टील पट्टा होता त्यामुळे बांधायला कठीण जायचे. त्याला रोज कामवरुन आल्यावर चावी द्यावी लागे. त्याच वेळी घरातील फावर ल्युबाच्या गजराच्या घड्याळालाही.
मग मोठ्या बहिणींची घड्याळे कधीतरी लाडीगोडी लावुन वापरायचो. मग कधीतरी कॉलेजात गेल्यावर वडीलांनाच एक टायटन घड्याळाची जोडी भेट मिळाली त्यातले एक मी घेतले. ते लोकल ट्रेनमध्यी हरवले. मग मधेच एक स्पोर्ट डिजिटल वॉच भेट मिळाले ते वापरले.
मात्र २००२ पासुन मोबाईल हाती आला आणि घड्याळ वापरणे सोडले ते आजतागायत.
असाच एक लेख चश्मा या वस्तू बद्दल लिहावा म्हणतो.
26 Sep 2025 - 6:02 pm | टर्मीनेटर
परवा केवळ "नॉस्टॅलजिक केलंत कंकाका..." एवढंच लिहून पोच पावती दिली होती. आज सगळ्यांचे प्रतिसाद वाचले, मस्तच आठवणी / किस्से आहेत सगळ्यांचे आणि त्यातल्या अनेक गमतींशी कमी-अधिक साधर्म्य असणाऱ्या माझ्याही आठवणी असल्यामुळे त्यांच्याशी पटकन रिलेट होता आले त्यामुळे मजा आली!
धर्मराजमुटकेंच्या प्रतिसादातील आठवणींशी बऱ्यापैकी समांतर म्हणता येतील अशा गेल्या चार दशकातल्या माझ्या घड्याळ्यांविषयीच्या अनेक आठवणी आहेत त्यातल्या काही दोन मेगाबाईटी प्रतिसादांत लिहितो 😀
माझ्या आईच्या तीन मावश्यांपैकी सगळ्यात धाकटी मावशी पेणची. तिच्या मिस्टरांचे बाजारपेठेत 'आदर्श वॉच कंपनी' नावाचे घड्याळ विक्री आणि दुरुस्तीचे सुमारे पाऊणशे वर्षांपूर्वी सुरु झालेले दुकान आहे. ऐशीच्या दशकात अगदीच लहान म्हणजे शिशुवर्ग - बालवर्गात असल्यापासून उन्हाळ्याच्या सुट्टीत दरवर्षी आम्ही मावस-मामे भावंडे आमच्या आयांबरोबर दोन-तीन दिवसांसाठी पेणला जायचो.
सख्खा मामा बदलापूरला राहायचा पण अंबरनाथला ऑर्डनान्स फॅक्टरीत नोकरीला असणारा हा मामा प्रेमळ असला तरी त्याच्या (अति)शिस्तप्रिय स्वभावामुळे आम्हाला त्यावेळी तो फार कटकट्या वाटायचा त्यामुळे आजोळी जायला आम्ही सगळी भावंडे नाखुष असायचो. त्याच्या अगदी उलट परिस्थिती पेण मुक्कामी असायची. मावशीआजीला तीन मुलं, त्यांच्या आणि आमच्या वयातही फार काही मोठे अंतर नसल्यामुळे ते तिघे आम्हाला 'मामा' नामक नातेवाईक न वाटता अगदी जवळचे मित्रच वाटतात आणि त्यांना आम्ही सगळे कायम नावानेच बोलवत आलो आहोत. ह्या तिघांपैकी सगळ्यात थोरला माझ्यापेक्षा दहा वर्षांनी आणि सगळ्यात धाकटा फक्त चार वर्षांनी मोठा आहे. अभ्यास सोडून बाकीच्या सगळ्या ऍक्टिव्हीटीज मध्ये पुढे आणि द्वाडपणा/मस्तीखोरपणाची एखादी स्पर्धा ठेवली असती तर प्रथम पारितोषिक तिघांना विभागून द्यावे लागले असते एवढे अतरंगी.
त्यांचे घर/वाडाही चांगला प्रशस्त असल्याने पाच-पंचवीस पाहुणे एकाचवेळी आले तरी जागेची अडचण नव्हती, त्यापेक्षाही जास्त मंडळी जमली तर पोटमाळा होताच! अंगणात आणि परस बागेत आंबा, चिकू, जांभूळ, शेवगा, विविध प्रकारची फुलझाडे आणि एक विहीर आहे. ह्या सगळ्या गोष्टी फार आवडीच्या असल्या तरी खरी मजा त्यांच्या दुकानात यायची.
खूप जुन्या चाळीतले तळमजल्यावरचे त्यांचे दुकान लांबीला चांगलेच मोठे होते. 'आगे दुकान, पीछे मकान' अशा प्रकारची रचना असल्याने आजू-बाजूला गुजराती, मारवाडी लोकांची सोनाराची, भांड्या-कुंड्यांची, किराणा वगैरेची दुकाने होती. ती मंडळी पुढच्या भागात आपले व्यवसाय करायची आणि मागच्या खोल्यांमध्ये संसार थाटून होती पण ह्यांच्या पुढच्या व्यावसायिक जागेचा आणि त्या मागच्या तीन खोल्यांचा वापर केवळ व्यावसायिक कारणासाठीच होत असल्याने ते खूप मोठे वाटायचे.
पुढच्या दर्शनी भागात ज्याला आपण दुकानाचा गाळा म्हणू, त्यात सर्वात पुढे काचेच्या डिस्प्ले काउंटरमध्ये जेन्टस-लेडीज मनगटी आणि स्टीलची चकचकीत गजराची घड्याळे ठेवलेली असत आणि डाव्या आणि उजव्या बाजूच्या संपूर्ण भिंतींवर आणि समोरच्या भिंतीवर आतल्या भागात जाण्यासाठी असलेल्या दरवाजाचा भाग सोडून बाकीच्या भागावर बहुतांश 'Scientific' कंपनीची लाकडी बॉडीची, काचेचा दरवाजा असणारी लोलकवाली, ठोके पडणारी चावीची मोठी घड्याळे लावलेली असत, त्यातल्या बऱ्याचशा घड्याळांना चावी दिलेली असायची. त्यांचे जेव्हा टोल पडायचे ते ऐकायला खूप मजा यायची, विशेषतः बारा वाजता जेव्हा अनेक घड्याळ्यांचे बारा टोल एकाच वेळी वाजायचे तेव्हा जी कर्णमधुर अशी नादनिर्मिती व्हायची ती खूपच खास वाटायची. मध्यभागी दुरुस्ती करण्यासाठी मध्ये पाय ठेवण्यासाठीची जागा आणि डाव्या-उजव्या बाजूस स्पेअरपार्टस आणि छोटी-मोठी औजारे/हत्यारे ठेवण्यासाठी अनेक ड्रॉवर्स आणि दुरुस्ती दरम्यान घड्याळाच्या नाजूक भागांमध्ये धूळ-माती जाऊ नये म्हणून टेबल लॅम्पने सुसज्ज अशी काचेची मोठी पेटी असलेले लाकडी टेबल असायचे.
त्या पुढच्या दुसऱ्या खोलीत लहान-मोठ्या 'पेटी पॅक' घड्याळ्यांचा स्टॉक असायचा आणि त्या पुढच्या तिसऱ्या खोलीत एका कोपऱ्यात टेबलवर घड्याळाच्या सर्व सुट्या भागांची स्वच्छता करण्यासाठी Elma ह्या जर्मन कंपनीचे वॉच क्लीनिंग मशीन आणि दुसऱ्या कोपऱ्यात एक लांब-रुंद लाकडी टेबल होते ज्याचा उपयोग जड औजारे वापरून मोठी घड्याळे उघडण्यासाठी केला जायचा.
त्या पुढची शेवटची चौथी खोली ही त्या चाळीच्या मूळ आराखड्यानुसार स्वयंपाक घर होते. ह्या खोलीत मोरी आणि ओटा होता. त्या ओट्यावर विक्री झालेल्या घड्याळ्यांचे आणि सुट्या भागांचे टाकाऊ पॅकिंग मटेरियल आणि खाली चहा पावडरच्या पॅकिंसाठी वापरले जाणारे हलक्या लाकडाचे दोन खोके ठेवलेले असायचे. त्यातल्या एकात चावीच्या लहान-मोठ्या घड्याळ्यांच्या निकामी झालेल्या स्प्रिंग्स आणि अन्य लोखंडी सुटे भाग तर दुसऱ्या खोक्यात निकामी झालेले पितळी सुटे भाग भंगारात देण्यासाठी जमा केले जायचे.
भरपूर हवा-उजेड आणि जा-ये करायला मागच्या बाजूला दुसरा दरवाजा असणारी ही खोली आमची खेळण्यासाठीची सगळ्यात आवडती जागा होती. पत्ते, सापशिडी, ल्युडो, नवा व्यापार असे बैठे खेळ तर चालायचेच पण त्या व्यतिरिक्त त्या भंगार द्यायला म्हणुन जमा केलेल्या लहान मोठ्या निकामी स्प्रिंग्स आणि गिअर्स/चक्री अशा वस्तूंचाही वापर करून आमचे काहीतरी उपदव्याप चालायचे.
तुटलेल्या स्प्रिंग्सना चावी दिल्यासारखे हाताने गुंडाळून बॉल स्पिन करताना आपण देतो तशी फिरकी देत जमिनीवर सोडल्या की त्या मूळ पदावर येताना अल्पकाळ भुईचक्रासारख्या फिरायच्या. काही वेळा त्या पातळ पट्ट्यांच्या स्प्रिंग्स गुंडाळताना ग्रीप सैल झाली तर बोटे ब्लेड लागल्यासारखी किंचित कापलीही जायची किंवा फिरकी देत जमिनीवर सोडताना अंदाज चुकला तर फॉक्कन उघडणाऱ्या त्या स्प्रिंगचा कोणाच्यातरी पायावर सप्पकन फटका बसायचा आणि चांगलाच वळही उठायचा 😀
मोठ्या घड्याळातले निकामी पितळी गिअर्स आणि चक्र्या-चकत्यांचा वापर करून खेळायचा एक खेळ आम्हाला काकांनी शिकवला होता. काका म्हणजे मावशीआजीचे मिस्टर, म्हणजे म्हंटल तर माझे आजोबाच, पण गंमत म्हणजे त्यांच्या कुटुंबातले सर्व सदस्य आणि आम्ही सर्व नातेवाईक मंडळी त्यांना पहिल्यापासून काकाच म्हणतो, हे तिन्ही मामा लोकही त्यांना बाबा, पप्पा किंवा डॅडी वगैरे न म्हणता 'काका'च म्हणतात. मला हा प्रकार तेव्हाही आणि आताही विचित्रच वाटतो खरा, पण आहे ते असंच आहे 😀
ते असो... तर ह्या काकांच्या शेजारी राहणारे रिसबूड म्हणुन एक गृहस्थ होते. ह्या सख्ख्या शेजाऱ्याचा पोळपाट-लाटणी, ताक घुसळायची रवी, विळीचे पाट, बसायचे पाट, टिपऱ्या, विविध हत्यारे आणि हात अवजारांच्या मुठी, वायरिंगसाठी लागणाऱ्या बॅटन पट्ट्या अशा अनेक प्रकारच्या लाकडी वस्तू बनवण्याचा कारखाना काकांच्या दुकानाच्या बरोबर समोर, रस्त्याच्या पलीकडे होता. लेथ मशीन आणि कुठल्या कुठल्या मशीनवर तयार होणाऱ्या ह्या वस्तूंची निर्मिती प्रक्रिया बघायला पण मजा यायची. त्यांच्या कारखान्यात लाकडी स्विच बोर्ड्स तयार करण्याचे आणि त्यावर स्विच, सॉकेट बसवण्यासाठी ते मापानुसार खाचण्याचे काम मोठ्या प्रमाणावर चालायचे. बोर्डाच्या (सहसा आकाशी किंवा पांढऱ्या रंगाचा) सनमायका लावलेल्या दर्शनी भागावर खाचा पाडल्यावर जे त्याचे लहान-मोठे तुकडे मशीनच्या खाली पडायचे ते तुकडे किंवा रुंद बॅटन पट्टीचे किंवा एखाद्या पातळ फळकुटाचे तुकडे आम्ही तिथून घेऊन यायचो आणि त्यावर सुई, दोरा, टाचण्या, चुका, तारा, रबर बँड अशा सहज उपलब्ध असलेल्या फुटकळ वस्तू आणि मोठ्या घड्याळ्यांचे निकामी पितळी गिअर्स वापरून छोटेसे मेकॅनीझम बनवायचो. खेळाचा नियम एकंच, तो म्हणजे त्या लाकडी बेस प्लेटवर बसवलेल्या गिअर्स, चक्री पैकी कुठलाही एक गिअर किंवा चक्री बोटाने फिरवली की बाकीचे सर्व गिअर्स किंवा चक्र्या पण उलट-सुलट अशा कुठल्याही दिशेने फिरल्या पाहिजेत. ज्याच्या मेकॅनीझममध्ये अशा फिरत्या गिअर्स किंवा चक्र्यांची संख्या जास्ती तो विजेता ठरायचा आणि त्याला काकांकडून काहीतरी बक्षीस मिळायचे.
आज हे वाचताना खूप क्षुल्लक वाटेल पण मनापासून सांगतो त्यावेळी घरच्यांनी आणून दिलेल्या, बाजारात उपलब्ध असलेल्या कुठल्याही मेकॅनो पेक्षा हा प्रकार जास्त आनंददायक आणि मजेदार वाटायचा!
क्रमश:
26 Sep 2025 - 6:11 pm | अभ्या..
टीझरच खतरनाक,
पिच्चर भारीच असणारे,
आन दो, वाट बघता है.
.
मेरे हिसाबसे भारी भारी घड्याल कलेक्शनवाला आदमी लगता है तू.
आणि लैच बारीक निरिक्षण आणि हत्तीची स्मरणशक्ती असल्याशिवाय इतके डीट्टेल लिहिता येतच नै. आवडते असे लेखन.
26 Sep 2025 - 6:14 pm | प्रचेतस
अहा.... जबरदस्त
26 Sep 2025 - 7:05 pm | कंजूस
हे लेखन बहुतेक १००१ अरेबियन नाईटस गोष्टींसारखं होणार आहे.
. उत्सुकता वाढली आहे.
ते स्प्रिंगचे खेळ यावरून आठवलं. रिस्ट वॉचची स्प्रिंग फारच लहान असते आणि फारसा धोका नसतो ती बॅरलमधून सोडवताना किंवा परत भरताना. परंतू हीच जेव्हा भिंतीवरच्या घड्याळाच्या बॅरल ( बंद वाटी सारखी पितळी डबी तीन चार इंच रुंद असते आणि त्यावर बाहेरून दातेही असतात.) मधून काढायची वेळ आली तेव्हा फारच तंतरली होती. स्प्रिंग म्हणजे लोखंडी पट्टाच अडीच तीन फुट लांब. तो पट्टा /पट्टी गुंडाळून त्या वाटीत भरलेली असते. समजा हातातून निसटले दोन्ही तर कपाळमोक्ष नक्कीच. मग मी काय केले, एक आंब्याचे खोके घेतले त्यावर उशी ठेवली व वरून बाजूनं हात घालून ती स्प्रिंग आतमध्ये उलगडली. आणि तशीच भरली.
27 Sep 2025 - 3:00 pm | Bhakti
ये टर्मीनेटर की लेखन स्टाईल है.... खिळवून ठेवते.जबरदस्त,अगदी रेट्रो युगात गेल्यासारखं वाटलं.
27 Sep 2025 - 3:58 pm | सुधीर कांदळकर
मस्त मजा आली वाचायला. मार्गी यांचा प्रतिसादही उत्कृष्ट.
आठवड्यातून एकदा चावी देण्याचे लंबकाचे घड्याळ आमच्या घरी होते. रविवार हा चावीचा दिवस होता. त्याला चावी देण्यात मी आणि माझा मोठा भाऊ यांच्यात चढाओढ होती. म्हणजे तो नेहमीच मला ढकलून चावी देत असे. एकदा तो झोपलेला असतांना मी चावी द्यायचा प्रयत्न केल होता. तेव्हा माझ्या ध्यानात आले की हे ताकदीचे काम होते. शेवटचे दोन फेरे मी देऊं शकलो नव्हतो आणि शुक्रवारी चावी संपल्यामुळे घड्याळ बंद पडले. मग अर्थातच माझी भरपूर टिंगलटवाळी झाली.
या घड्याळाला दोन स्प्रिंगा होत्या. चार आकड्याबाजूची चावी घड्याळाची आणि आठच्या बाजूची चावी टोल्यांची.
वर्षातून एकदा छंद म्हणून तीर्थरूप ते घड्याळ उघडून तेलपाणी करीत. या घड्याळाची स्प्रिंग दणकट आणि नीट न हाताळल्यास. इजा करणारी होती. आमच्या घरी हॅन्डल फिरवून चावी द्यायचा ग्रामोफोन होता. त्याची देखील स्प्रिंग अशीच दणकट होती.
मस्त लेखाबद्दल धन्यवाद.
29 Sep 2025 - 8:51 pm | अमरेंद्र बाहुबली
वडिलांना हे घड्याळ घरात हवे होते, मागेच ऍमेझॉन वरून मागवून लावले.
मुलाच्या फोटोचे हे घड्याळ बनवून घेतले.
आणखी एक घड्याळ आहे , ज्याला खाली जहाजाचा नांगर आहे.

हे आसे.
29 Sep 2025 - 9:21 pm | स्वधर्म
उत्तम पण हुरहूर लावणारा लेख. धन्यवाद कंजूस काका!
आमच्या घरी लहानपणी अभ्यास करायला लवकर उठावे यासाठी जे गजराचे घड्याळ वापरत होतो, ते अतिशय उत्तम दर्जाचे 'हेस' या कंपनीचे होते. त्याची केस स्टेनलेस स्टीलची होती व डायल काळी होती. हिरवट रंगाचे काटे आणि आकडे अंधारात चमकत असत. त्यामुळे किती वाजले ते अंधारातही दिसत असे. त्याला ठेवायला एक लाकडी पेटी होती व त्याला पुन्हा काचेचे दार होते, जे उघडून त्याला रोज न विसरता चावी द्यायला लागायची. त्याचा गजराचा आवाज किर्रर्रर्रर्रर्र असा कर्कश्य होता पण 'कठोर परिश्रमास पर्याय नाही' हा सुविचार न बोलता मनावर ठसवणारा.
पुढे ते बरेच मागे पडू लागले किंवा पुढेच जाऊ लागले. शिवाय ते निगुतीने दुरुस्ती करणारे कारागिर आता निघून गेले होते. पुण्यात यशवंत वॉच अँड इलेक्ट्रॉनिक्स यांच्याकडे दुरुस्तीला द्यायला गेलो. त्यांनी सांगितले की एक पिंप भरून तसली गजराची घड्याळे पडली आहेत व आंम्ही आता ही दुरूस्त करण्याचेच बंद केले आहे. अशा प्रकारे लहानपणापासून जीवनाचा भाग असलेल्या त्या गजराच्या घड्याळाला निरोप देताना खूप हुरहूर लागली होती.
खूप उत्तम स्थितीतील चालू गोष्टी अशा रिपेअर होत नाहीत, किंवा तंत्रज्ञान कालबाह्य झाले म्हणून टाकून देववत नाहीत. असाच किस्सा निकॉन एफ ५५ डी या फिल्म कॅमेर्याबद्दल आहे. फिल्म वापरणंच बंद झाल्याने अजूनही ते एक अत्यंत महागाचं काटेकोर (प्रिसिजन) उपकरण चालू अवस्थेत घरी पडून आहे.
काळाचा महिमा.
2 Oct 2025 - 10:25 pm | धनावडे
Seiko 5 हे वडिलांचे ५० वर्ष जुने घड्याळ आता मी वापरतो.
3 Oct 2025 - 5:50 pm | अभ्या..
अरे वा, सिको 5.
भारीच चॉईस.
अजूनही क्रेझ आहे ह्या वॉचची.
3 Oct 2025 - 5:49 pm | अभ्या..
माझ्या आवडीच्या विषयाला बोर्डावर आणल्याबद्दल कंकाकांना थ्यान्क्स.
खरे पाहता घड्याळ म्हणले की मला आठवते ते माझ्या अजोबांचे घड्याळ. ते पोलीस पाटील होते आणि गावाकडे वाड्यात राहायचे. त्यांच्याकडं गाव जवळ असल्याने जाणेयेणे व्हायचेच. वाड्यातल्या माझ्या तीन आवडत्या गोष्टी म्हणजे आजोबांची एकनळी ब्रिटिश(की स्कॉटीश) बंदूक, जुन्या ब्युक कारच्या आकाराचा पानाचा पितळी डबा आणि एक झाकणवाले पॉकेट वॉच. ते वॉच खरेतर बंद पडलेले होते आणि दुरुस्तही होत नव्हते तेम्व्हा ते माझे खेळणे झालेले. बाकी दोन गोष्टींना हात लावू दिला जात नसे.
ते पॉकेट वॉच एकदा मी शाळेत घेऊन गेलेलो. बापूजींचे घड्याळ असेच म्हणले सगळेजण. वडिलांच्या हातातल्या घड्याळाला मात्र हात लावू दिला जात नसे. त्यांचे एक हेन्री सँडोझ होते आणि नंतर एक एचएमटी, एक दोनदा ते पटेल वॉच कंपनी मध्ये दुरुस्तीला दिल्यावर आणण्याची जबाबदारी मिळाल्याचे आठवते. कोणते घड्याळ असे विचार्ल्यावर सांगायचे उत्तर "एचेमटी कैलाश" असे माझ्याकडून तीन चारदा वदवून घेतले गेले. ते आयएनएस विक्रान्त सारखे वाटायचे म्हणायला. एक दोन परिक्षांमध्ये ते मी वापरले, दहावीच्यापर्यंत डिजिटल आणि ऑल्विनच्या घड्याळांची क्रेझ होती. एचएमटी घड्याळे पण असायची आणि ट्रॅक्टर पण, कॅसिओची घड्याळे असायची, कॅल्क्युलेटर आणि सिंथेसायझरलाही आम्ही कॅसिओच म्हणायचो. त्यामुळे एलसीडी आणि बटणंवाल्या गोष्टी जपानी लोक भारी बनवतात असे वाटायचे. ज्यु. कॉलेजात मात्र फारसे घड्याळ वापरल्याचे आठवत नाही. दिवसभर मैदानात पडीक असल्याने देखील घड्याळ नकोसेच असायचे.
डिग्रीच्या चांगल्या रिझल्टनंतर आतोबांनी चक्क सिटिझन इको ड्राईव्ह दिलेले गिफ्ट. ते महाग होते पण आतोबा एअरफोर्स मध्ये असल्याने ते आम्हाला कॅन्टीनमध्ये स्वस्त मिळालेय असे सांगितले. ते खरे नव्हते. त्यांनी बाहेर विकत घेतेलेले ते. ते आजही महाग आणि क्लासिकच समजले जाते.
स्वतःचे असे पहिले घड्याळ इंटर्नशिपच्या पैशात घेतले ते सोनाटा, थोडे टँक वॉच प्रमाणे लंबआयताकार, मेटल ब्रेसलेट, व्हाईट डायल, क्वार्टझ. अजून आहे ते चालू.
इथून पुढे चालू झाली माझी घड्याळाची प्रेमकहाणी.
ती अजून एक दोन प्रतिसादात. सवडीने, आवडीने.......