गुलकंद शिरा

Bhakti's picture
Bhakti in पाककृती
16 Mar 2025 - 10:39 am

*गुलकंद शिरा*
उन्हाळ्या सुरू झालाय.लाहीलाही व्हायला सुरुवात झाली आहे आणि खरंच मन थंड गोष्टींकडे आकर्षित होत आहे.तर आज शिऱ्यावर ताव मारायची इच्छा झालीच होती. उन्हात गुलाबाची थंड शीतलता हवीशी वाटु लागली.तेव्हा गुलकंद शिरा करायचं ठरवलं.

म्हटलं "इतकं काय शिरा करतांना गुलकंद टाकला की झाला गुलकंद शिरा!"
पण जी काय चव झाली आहे,अहाहा!!
जिभेवर अजून रेंगाळत आहे.सारा जीवच गुलकंदी गुलाबी झालंय.

यासाठी मी घरीच केलेला गुलकंद वापरला आहे ‌.
गुलकंद करण्यासाठी गावठी गुलाबाच्या पाकळ्या व खडीसाखर एवढेच लागते.खडीसाखर कुटून वेळोवेळी त्यात पाकळ्या टाकायच्या सारे काही अंदाजानुसार
पण मुरायला खुप काळ लागतो.हा गुलकंद ८-९ महिने जुना आहे.
१
गुलकंद शिरा पाककृती
**साहित्य*
एक वाटी तुपात भाजलेला रवा
एक वाटी साखर
चार वाटी गरम पाणी
चार मोठे चमचे /एक छोटी वाटी गुलकंद
अर्धी वाटी साय/एक कप दूध
इलायची पुड,सुकामेवा पूड
खायचा गुलाबी रंग(माझ्याकडे केशरी होता)

**कृती*
तूपात भाजलेल्या रव्यात उकळते गरम पाणी हळूहळू घालत रवा शिजवून घ्यायचा.चांगली वाफ आल्यावर त्यात खायचा रंग किंचित टाकायचा.आता यात साय टाकायची.वाफ आल्यावर त्यात गुलकंद टाकायचा.मिश्रण एकत्र केल्यावर शेवटी साखर इलायची सुकामेवा पुड टाकायची.साखर विरघळेपर्यंत शिरा परतत राहायचा.

गुलकंद शिऱ्याची मूद गुलाबी पाकळ्यांनी सजवायची!
-भक्ती
टीप- फोटो अजिबात एडिटेड नाहीये,मीच याच फोटोच्या प्रेमात पडलेय.

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

16 Mar 2025 - 11:27 am | कर्नलतपस्वी

अगदी लहानपणापासून शिरा हा आवडता पदार्थ. मग तो गुळाचा ,साखरेचा,उसाच्या रसाचा, अंबरसाचा,पायन्यापल कुठलाही असो. सर्वात जास्त आवडणारा सत्यनारायणाला केलेला प्रसाद.

एकदा पुष्कर, राजस्थान इथे गेलो होतो. गुलकंद स्वस्त दरात आणी चांगला मुरलेला मिळतो. हावरट सारखा खरेदी केला. मग थोड्याच दिवसात हौस फिटली. उरलेल्या गुलकंद शिरा बनवताना वापरला.

मस्त फोटो आहे. चक्षू तृप्त झाले. आता मन तृप्त करण्यासाठी शिरा बनवणे आले. नुकतेच विहीणबाई पुष्कर ला गेल्या होत्या एक पॅकेट घरात पडले आहे. साजूक तूप सुद्धा आहे रेसिपी ट्राय करतो.

एकदा पुष्कर, राजस्थान इथे गेलो होतो. गुलकंद स्वस्त दरात आणी चांगला मुरलेला मिळतो.

हे नवीन समजलं.बघते मिळतो का.

कंजूस's picture

17 Mar 2025 - 5:12 am | कंजूस

चांगला दिसतो आहे.
...........
गुलकंद टाकून रवा केक केला होता पण गुलकंदाची तीव्र चव आणि वास डोक्यात फार जातो.

श्वेता२४'s picture

18 Mar 2025 - 8:58 am | श्वेता२४

नवीन पाककृती. मलाही गुलकंद किंवा गुलाबाचा इसेन्स आवडत नाही. पण कधीतरी नक्की करुन पाहीन

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Mar 2025 - 12:40 pm | अमरेंद्र बाहुबली

ताई नुसत्या पाकृती नको! खायला कधी बोलावणार?

कानडाऊ योगेशु's picture

20 Mar 2025 - 1:40 pm | कानडाऊ योगेशु

रा गां पंतप्रधान झाल्यावर? (ह.घ्या)

यश राज's picture

19 Mar 2025 - 1:01 pm | यश राज

मस्त रेसिपी आहे

शिरा आणि गुलकंद दोन्ही आवडतात. रेसिपी आवडलीच.
फोटो कातिल आलाय ... !