तुमचं सर्वात आवडतं ड्रिंक कोणतं?
कसा झक्कास विषय आहे! सर्वांना भाग घेता येण्यासारखा आहे की नाही?
पण थांबा, थांबा!
जरा विचार करा. एकदम "बाजीराव-मस्तानी" असं ओरडू नका! हे ड्रिंक असतं हे मला आमच्या एका पुणेरी मित्राकडून समजलं. आम्ही या इतिहासातील व्यक्ति आहेत असं समजत होतो. :)
तेंव्हा जरा विचार करा आणि मग सांगा. मात्र चर्चेत सामील होतांना खालील पथ्ये पाळूया, जरा मजा येईल...
१. नुसतंच ड्रिंकचं नांव किंवा एकच वाक्य नसावे. जरा अधिक वर्णन द्या.
२. ड्रिंक "अल्कोहोलिकच" असायची जरूर नाही. नॉन्-अल्कोहोलिक ड्रिंक्स सुध्धा चालतील. भगिनींना भाग घ्यायला आता हरकत नाही.
३. ते ड्रिंक तुम्हाला का आवडतं ते सांगा
४. त्याविषयीची एखादी आठवण असल्यास ती शेअर करा.
५. जमल्यास त्या ड्रिंकची रेसिपी द्या म्हणजे इतरांनाही त्याची लज्जत लुटता येईल.
ठीक आहे? चला, मी सुरवात करून देतो...
माझं सर्वात आवडतं ड्रिंक आहे...
स्कॉच ऑन द रॉक्स!
सुवर्णकांती झळाळणारं...
आपला आब राखून असणारं...
फक्त बर्फाशिवाय आणखी कुणाशी (सोडा, लेमन, ज्यूस वगैरे) सलगी न करणारं...
दिवसभराचा कामाचा शीण नाहीसा करणारं, पण बेताल होऊ न देणारं....
एक स्वच्छ चकाकणारा क्रिस्टलचा ग्लास घ्यावा. हेवी बेस असल्यास अगदी उत्तम, हातात फिट बसतो.
त्यात बर्फाचे किणकिणणारे चार-पाच स्फटिक घालावे.
बेताची, जेमतेम स्फटिक बुडतील, न बुडतील इतकी स्कॉच घालावी. शिवास रीगल ही माझी वैयक्तिक आवड कारण मला तिची चव आवडते आणि मला तिचा हँगओव्हर येत नाही. पण इतरही स्कॉच तुमच्या आवडीप्रमाणे वापरायला हरकत नाही.
सोनेरी प्रभा उधळणारं ते पेयरत्न दोन मिनीटं नुसतं न्याहाळत रहावं... सुंदर स्त्रीप्रमाणे सुंदर मद्याने भरलेला चषकही अत्यंत आकर्षक दिसतो हे उमजावं...
चषक तोंडाला लावून पहिला 'सिप' घ्यावा. घोट नव्हे, फक्त सिप...
बस्स, जेमेतेम ओठाला स्पर्श होईल इतपतच..
आपलं आवडतं पुस्तक उघडावं. मि.पा.चं खातं उघडून बसलं तरी चालेल...
चषकातील मदिरा चुंबित, चुंबित संपवावी...
पहिला पेग संपल्यावर दुसरा भरावा...
तितक्यात तळलेल्या कोलंबीने भरलेली बशी बायकोने पुढे करावी...
बशी देऊन जाता जाता चषकातली मदिरा तिने हळूच चाखावी....
"जास्त वेळ लावू नको हं, जेवण तयार होईल लवकरच" अशी प्रेमळ धमकी द्यावी...
चुलीवरच्या कोल्हापुरी मटणाचा सुगंध आसमंतात दरवळावा.....
.....
.....
अरे, स्वर्ग स्वर्ग म्हणजे तरी दुसरा काय असतो?
आपला,
(उन्मनी) डांबिसकाका
प्रतिक्रिया
15 Feb 2008 - 8:05 am | विसोबा खेचर
अरे पिवळ्या डांबिसा,
काय सुरेख विषय निवडला आहेस रे चर्चेकरता! अभिनंदन..!
तितक्यात तळलेल्या कोलंबीने भरलेली बशी बायकोने पुढे करावी...
बशी देऊन जाता जाता चषकातली मदिरा तिने हळूच चाखावी....
"जास्त वेळ लावू नको हं, जेवण तयार होईल लवकरच" अशी प्रेमळ धमकी द्यावी...
चुलीवरच्या कोल्हापुरी मटणाचा सुगंध आसमंतात दरवळावा.....
मार डाला! अरे पिवळ्या डांबिसा, इतकं भन्नाट लिहून का रे आमचा असा छळ मांडला आहेस?:)
क्या बात है, फारच सुरेख वर्णन केलं आहेस. जियो...!
माझी सर्वात आवडती ३ पेये आहेत.
१) घरगुती चवीचं, शीतकपाटाच्या नव्हे तर माठाच्या पाण्यात केलेलं लिंबू सरबत!
२) उतमपैकी गोड नीरा,
आणि
३) अर्थातच,
स्कॉच व्हिस्की! ती देखील आवडत्या स्त्रीसोबत! :)
अवांतर - आपण साला अविवाहीत असल्यमुळे आवडती स्त्री म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर जिच्याबरोबर आपलं लफडं सुरू आहे, ती! :))
स्कॉच व्हिस्कीबाबत तुझीमाझी आवड समान आहे बरं का पिवळ्या डांबिसा! ज्या पद्धतीने ती प्राशन करावी ती पद्धत तू दिली आहेस तिच्याशी देखील आपण सहमत आहोत. एकदम मंजूर!
स्कॉच व्हिस्कीत फक्त बर्फ घालण्यास परवानगी आहे असं 'पिणार्यांच्या गीतेत' सांगितलं आहे! :)
अवांतर - आपल्याकडे 'गीतेत सांगितलं आहे!' असं म्हटल्याशिवाय लोकं ऐकतच नाहीत तिच्यायला! :))
अर्थात, 'तुझे आहे तुजपाशी...' मधल्या वासूअण्णाच्या भाषेत सांगायचं तर कुत्र्याच्या शेपटीसारखे झालेले पिंड आमचे, ते भगवत गीतेच्या नळकांड्यात घालून सरळ थोडेच होणार आहेत?! :)
त्यामुळे भगवत गीतेपेक्षा आपली पिणार्यांची गीता बरी! त्यात १८ अध्यायांची गर्दी नाहीये. एखाददुसराच अध्याय आहे, नाही म्हणेनास! :)
(हे खास संत तात्याबांचे मौलिक विचार बरं का! :)
तर ते असो..
हां, तर काय सांगत होतो? स्कॉचमध्ये पाणी किंवा सोडा घालून तिचं कौमार्य भंग करण्याचा अधिकार कुणालाही नाही, असं गीतेत सांगितलं आहे! :)
फक्त स्कॉच व्हिस्कीत देखील ती बनवण्याच्या पद्धती फरक असतो बरं क पिवळ्या डांबिसा. तशी मला तुझ्या शिवास सारखी ब्लेंडेड स्कॉचही अतिशय आवडते परंतु माझं 'सिंगल माल्ट' पद्धतीने बनवलेल्या व्हिस्कीवरच पहिलं प्रेम आहे. आता काय सांगू तुला पिवळ्या डांबिसा, सिंगल माल्ट पद्धत ती सिंगल माल्ट पद्धत रे! तिच्यासारखी न्यारी चव तुमच्या ब्लेंडेड प्रकाराला नाही!
असो, सिंगल माल्ट पद्धतीबद्दल तुला इथे वाचता येईल!
बाकी चर्चाविषय एकदम फस्क्लास! आवडला आपल्याला...
आपला,
(गाण्या-खाण्यातला, बाई-बाटलीतला) बापुभैय्या देवासकर,
देवासकरांची कोठी
(जिथे आग्रेवाली रोशन पुरिया गायली होती!)
इंदौर!
24 Feb 2008 - 11:58 am | पिवळा डांबिस
प्रिय विसोबा,
आपल्याला विषय आवडल्याबद्दल आनंद झाला. आपल्या शाबासकीबद्दलही आभारी आहे.
-पिवळा डांबिस
15 Feb 2008 - 8:35 am | वरदा
मँगो किंवा स्ट्रॉबेरी स्मूदी...
भयंकर उन्हाळ्याचे दिवस...मी न्यूजर्सी हून नॉर्थ कॅरोलीना ला चाल्ले होते....खूप वेळ एकही फूड एक्झीट येत नव्हती...कितीही ए. सी लावला तरी अंगावर ऊन येतच होतं आणि तेव्हा डंकिन डोनट ची एक्झीट मिळाली....आणि मस्त गारेगार दाट गुलाबी रंगाची स्ट्रॉबेरी स्मूदी घेतल्यावर जी मजा आली ती अवर्णनीय....
मला चहा कॉफी फारशी आवडत नाही त्यामुळे कोल्ड कॉफी पेक्षा जास्तं आवडते ती स्मूदी.....
आता मी घरी ती अशी बनवते.....फ्रेश स्ट्रॉबेरी आणायच्या...कापून देठं काढून टाकायची...स्मूदी मेकर मधे टाकायच्या...त्यात व्हिप्ड क्रिम टाकायचं...थोडं दूध टाकून फिरवायचं... हवं तर थोडा बर्फ घालायचा...बास आता इतकच वर्णन.... मला इतक्या थंडीत पण करावीशी वाट्टेय स्मूदी....कुणाकडे अजुन छान रेसिपी असेल तर मला नक्की सांगा....
15 Feb 2008 - 8:45 am | नंदन
झकास टॉपिक आहे. मात्र आवडत्या ड्रिंक्सची रेंज खूप मोठी असल्याने (लेखासंदर्भात), कुठले निवडावे हा प्रश्न पडला आहे. तेव्हा शहाळ्याचं पाणी, पन्हं, कोकम सरबत असल्या सात्विक ड्रिंक्सना विचारात न घेता इतर दोन ड्रिंक्स निवडतो --
१. टर्किश कॉफी --
रविवारी सकाळी उशीरा झालेल्या नाश्त्यानंतर किंवा सरत्या संध्याकाळी एखाद्या लेबनीज हाटिलात जाऊन फलाफलापासून सुरुवात करून बकलावा पर्यंत पोचल्यावर, त्यावर कळस चढवावा तशी टर्किश कॉफी प्यावी. दूध नसलं तरी वेलची आणि साखर असल्याने कॉफीचा कडूपणा अजिबात जाणवत नाही. इडलीचा भरपेट नाश्ता झाल्यावर जशी फिल्टर कॉफी झकास लागते किंवा (उपम्यातल्या मिरचीने आपला जहालपणा दाखवल्यावर प्यालेला चहा), तशीच हीही जोडगोळी.
२. शार्डने --
व्हाईट वाईनचा हा प्रकार टेक्निकली ड्रिंक या सदरात मोडत नसला, तरी चिकन किंवा माशांचे जेवण असेल तर ही वारूणी छान सोबत करते. दुसरा आवडता प्रकार म्हणजे शुक्रवारी रात्री समवयस्क, समविचारी मित्रांचा घोळका असावा. समोर चिकन विन्ग्ज, साउथवेस्टर्न एगरोल्स किंवा तत्सम चखणा असावा. टवाळक्या, एकमेकांची खेचणे अशा प्रकाराला ऊत आलेला असावा. अशावेळी कार्ल स्ट्रॉस किंवा फॅट टायरची बीअर साथीला हवीच :) [ऍम्बर एल आणि इतर]
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
15 Feb 2008 - 10:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मोहाची फूलापासून तयार केलेली एकदा खास आग्रहास्तव चव चाखली ( ओरीजनल हं )
दोन चार पेग घेतले ( म्हणजे चांगले सिक्स्टी चे ) त्या सोबत अंड्याचं आम्लेट, सुरवातील काय वाटंना :)
मग अजून दोन भरले...!!!
पण महाराज, जेव्हा आमचं विमान निघालं ना ? लँडीगच करेना मग :))
15 Feb 2008 - 10:40 am | विसोबा खेचर
मग अजून दोन भरले...!!!
पण महाराज, जेव्हा आमचं विमान निघालं ना ? लँडीगच करेना मग :))
हा हा हा बिरुटेसाहेब, हे बाकी मस्तच!
बाय द वे, मोहाच्या फुलांची दारू छानच लागते. अत्यंत सुरेख अशी देशीमातीची, ठाकरी चव असते तिची. आम्हालाही मोहाच्या फुलांची दारु आवडते बर्र का बिरुटेशेठ! आणि त्यासोबत, ओल्या जवळ्याची चटणी खाल्ली होती एकदा!
हा....ण तिच्यायला! साला त्या दिवशी आपण एकदम छप्पर फाडके गायलो होतो! :)
मोहाच्या फुलांची झोकल्यावर असा सुंदर पुरियाकल्याण जमला होता म्हणून सांगू!
आपला,
(माहुलीच्या पायथ्याजवळचा ठाकर) तात्या.
16 Feb 2008 - 12:07 am | llपुण्याचे पेशवेll
हवे तर 'मोहाची' सोय मी करेन.. पण एकदा मैफल व्हायलाच पाहीजे.
पुण्याचे पेशवे
15 Feb 2008 - 10:50 am | मनस्वी
१. कैरीचे पन्हे
२. लिंबू सरबत
३. वाळा सरबत
४. चहा
५. कॉफी
६. कोल्ड कॉफी
७. घरी केलेले चिकन आणि मटन सूप
८. ताक
९. आणि हो - मठ्ठा!
(मठ्ठाप्रिय) मनस्वी
Assumption (ह्याला मराठीत काय बरे शब्द आहे..?) : सर्व द्रवपदार्थ म्हणजे ड्रिंक होय.
15 Feb 2008 - 11:05 am | विसोबा खेचर
य्य्य्य्येस! विसरलोच होतो..
घरी केलेल्या गोड ताकाची सर कशालाच नाही..
आपला,
(ताकप्रेमी) तात्या.
15 Feb 2008 - 11:09 am | ध्रुव
वरील सर्व आणि...
निरा
तांबडा रस्सा
पांढरा रस्सा
--
ध्रुव
15 Feb 2008 - 2:27 pm | अनिकेत
Assumption (ह्याला मराठीत काय बरे शब्द आहे..?)
गृहितक ... बहुतेक :)
15 Feb 2008 - 11:20 am | विसोबा खेचर
एकदम "बाजीराव-मस्तानी" असं ओरडू नका! हे ड्रिंक असतं हे मला आमच्या एका पुणेरी मित्राकडून समजलं.
बाकी एका अत्यंत सुमार आणि बेतास बात अश्या पेयाला बाजीराव-मस्तानी म्हणणार्या पुणेकरांची दया येते! :)
असो..
20 Feb 2008 - 6:41 pm | परीचा परा
विसोबा राव...
"बाजीराव-मस्तानी " हे मस्तानी ह्या पेयाचे नाव आहे.... पुण्यात गुजरांच्या मस्तानी हाऊसमध्ये मिळते....तशि मस्तानी मी कुठे पिली नाही... मी स्वतः ती चाखली आहे... त्यामुळे खात्रीने सांगतो...सुमार पेय हे नक्कीच नाही आहे..... शेवटी प्रत्येकाची आवड वेगळी....
पण आम्च्या बाजीराव-मस्तानीला सुमार म्हणु नका राव ...
{परीच्या प्रतिक्षेत} परा ....
15 Feb 2008 - 12:05 pm | धमाल मुलगा
आमची आवडती पेय॑ म्हणजे...
१.आयशीच्या हातच॑ पन्ह॑
२.आजीन॑ केलेला मठ्ठा
३.रात्री-अपरात्री गप्पा॑चा फड जमवून बसलेल॑ असताना केलेली एकदम इष्ट्रॉ॑ग फिल्टर कॉफी
४.मित्रम॑डळी॑बरोबर पबमध्ये ऊतमात घालताना सुरुवातीला "एनर्जी" म्हणून घेतलेली जॅक डॅनियल्स...आणि नाचून नाचून थकल॑ की मधून अधून केलेली "टकिला" ची आचमन॑ !!! हाय..उद्याच होणार हे सगळ॑.
५.सार्वजनिक ठिकाणी एकटेच असु तर निवा॑त सगळा हॉल दिसेल अश्या एकाकोपर्यात बसुन घोट घोट घोळवत तो॑डभर तिचा स्वाद अनुभवत घ्यायची "ड्राय मार्टिनी विथ ऑलिव्ह्स कि॑वा लाईम स्लाईसेस"
६.हे अतिशय लाडक॑:
घरात अगदी कुण्णी कुण्णी नसाव॑, स॑ध्याकाळ रात्रीकड॑ झुकलेली असावी, हॉलमध्ये एकटेच बसुन, एखादा म॑ssद दिवा लाऊन...तबकडीवर गुलाम अलीसाहेब कि॑वा हरिहरन आपल्या खर्ज अन् मधूरतेच्या सीमेवरल्या आवाजात एक से एक आर्त गझला गात असावेत....
आणि हातात "टिचर्स" चा "ऑन द रॉक्स" जाम असावा. जोडीला चीझ असाव॑, वातावरणात दिव्याच्या अ॑धूक पिवळ्या प्रकाशात "अल्ट्रा-माईल्ड्सचा" निळसर धूर तर॑गून ते अजून धु॑द झालेल॑ असाव॑,
मागे गुलाम अली/हरिहरनच्या आवाजातला दर्द आपल्या छातीत को॑डून यावासा व्हाव॑, अन् त्या चषकातल्या स्कॉचची हलकी हलकी चु॑बन॑ घेत हे आपल॑ फक्त एकट्याच॑ विश्व अनभिषिक्त सम्राटाच्या तोर्यात अनुभवाव॑.
अगदीच कोणी बरोबर हव॑ असेल तर आमच्या जिम्याला घरीच ठेवाव॑, लेकाचा पक्का र॑गेल आहे. पायाशी बसुन सिगारेटचा धूर काय हु॑गतो, माझ्या ग्लासाकडे बघत जिभल्या काय चाटतो, स्कॉचशिवाय इतर कोणत्याही प्रकाराला तो॑ड नाही लावत. कधी कधी तर गुलाम अली ऐकताना त्याच्याही डोळ्यात मला ते दर्द दिसत॑. पठ्ठ्या हा सगळा कार्यक्रम होईपर्य॑त हू॑ की चू॑ करत नाही.
आपला
- र॑गेल ध मा ल.
15 Feb 2008 - 12:35 pm | विसोबा खेचर
आणि हातात "टिचर्स" चा "ऑन द रॉक्स" जाम असावा. जोडीला चीझ असाव॑, वातावरणात दिव्याच्या अ॑धूक पिवळ्या प्रकाशात "अल्ट्रा-माईल्ड्सचा" निळसर धूर तर॑गून ते अजून धु॑द झालेल॑ असाव॑,
मागे गुलाम अली/हरिहरनच्या आवाजातला दर्द आपल्या छातीत को॑डून यावासा व्हाव॑, अन् त्या चषकातल्या स्कॉचची हलकी हलकी चु॑बन॑ घेत हे आपल॑ फक्त एकट्याच॑ विश्व अनभिषिक्त सम्राटाच्या तोर्यात अनुभवाव॑.
लेको, जो उठतो तो अगदी मिटक्या मारत मारत साली स्कॉच पितोय! साला, पण आंतरजालावर 'बेवडा' म्हणून बदनाम मात्र एकटा तात्या होतो! :)
काय रे धमाला, मारे स्कॉचची चुंबनं वगैरे घेतोस काय? हेच शिकिवलं का तुला साळेत मास्तरांनी? :)
स्कॉचची हलकी हलकी चुंबनं घेणारा अनभिषिक्त सम्राट म्हणे! आवशीला आणि बापसाला नांव सांगू का? :))
असो,
प्रतिसाद बाकी आवडला रे धमाला! :)
अवांतर - धमाला, तुझ्या आवशीच फोन नंबर मला देऊन ठेव रे. "काकू, तुमच्या अनभिषिक्त सम्राटाकडे जरा लक्ष ठेवा!" असं सांगणार आहे मी त्या माऊलीला! :))
आणि हातात "टिचर्स" चा "ऑन द रॉक्स" जाम असावा.
हम्म्म! म्हणजे पुन्हा ब्लेन्डेडच! :(
अरे काय रे लेको, सिंगल-माल्ट वाली शराब कुणी पितो की नाही? :)
आपला,
(सिंगलमाल्टवाली ग्लेनमोरांजी प्रेमी) तात्या.
15 Feb 2008 - 2:11 pm | धमाल मुलगा
साला, पण आंतरजालावर 'बेवडा' म्हणून बदनाम मात्र एकटा तात्या होतो! :)
मी पण आहे ना खारीचा वाटा उचलायला (कधीमधी).
काय रे धमाला, मारे स्कॉचची चुंबनं वगैरे घेतोस काय? हेच शिकिवलं का तुला साळेत मास्तरांनी? :)
साळ॑त न्हाई पर कालिजात शिकलो मास्तरकडूनच, त्या॑नीच शिकिवल॑ स्कॉच फकस्त बर्फात घ्याची म्हनून..
स्कॉचची हलकी हलकी चुंबनं घेणारा अनभिषिक्त सम्राट म्हणे! आवशीला आणि बापसाला नांव सांगू का? :))
ओ तात्या, अहो..जौ दे ना भौ...रोज रोज नाही हो करत मी अस॑...शप्पथ! कधीतरीच स॑धी मिळते हो!
धमाला, तुझ्या आवशीच फोन नंबर मला देऊन ठेव रे. "काकू, तुमच्या अनभिषिक्त सम्राटाकडे जरा लक्ष ठेवा!" असं सांगणार आहे मी त्या माऊलीला! :))
काय येड लागल॑य का काय मला? जोड्यान॑ मारेल ना ती मला. :))
प्रतिसाद बाकी आवडला रे धमाला! :)
धन्यवाद. आता तात्या॑नी पावती दिली म्हणजे मी पण जरा बर॑ खरडतो अस॑ मानायला हरकत नसावी.
हम्म्म! म्हणजे पुन्हा ब्लेन्डेडच! :(
अरे काय रे लेको, सिंगल-माल्ट वाली शराब कुणी पितो की नाही? :)
मला गरिबाला परवडत नाही हो ते प्रकरण...एव्हढी स्तुती करत असता सि॑गल माल्टची, एक डाव बघायलाच पायजे काय असत॑ हे प्रकरण!
आपला,
- आवशीला घाबरणारा, पण चोरुन स्कॉचची हलकी हलकी चुंबनं घेणारा अनभिषिक्त सम्राट
ध मा ल.
15 Feb 2008 - 2:23 pm | अनिकेत
डिस्क मधे नाचून आऊट व्हायचय तर...
AK47 cocktail: नाही नाही त्या गोष्टी असतात त्यात... रेसिपी पहा: http://www.barnonedrinks.com/drinks/a/ak47-5913.html
माहौल बनवून प्यायचय तर...
काळी रम .... स्कॉच परवडत नाही ... शिकतो आम्ही.
कुणाला वास यायला नको तर....
जिन
कॅज्युअली एकटच प्यायचय....
व्होडका
काहितरी वेगळ....
व्होडका आणून कॉकटेल बनवायचे प्रयोग.
सगळे पितायत आणी आग्रह करतायत म्हणून.....
बियर्..जेव्हा कमवत होतो तेव्हा वाइन
अनिकेत
15 Feb 2008 - 3:02 pm | स्वाती दिनेश
एकच असं नाही सांगता येणार,ऋतु आणि मूड प्रमाणे वेगवेगळी पेये आवडतात.
धुंद पावसाळी हवा असताना, पावसाचे धारानृत्य खिडकीतून पाहत असताना गरमागरम कांदा भज्यांबरोबर स्ट्राँग कॉफीचा भलामोठ्ठा मग मजा आणतो तर उन्हाच्या काहिलीने हाशहुश करत घरात शिरले की वेलची ,केशर घातलेले किसून केलेले कैरीचे पन्हे थंडावा देते (उकडलेल्या कैरीचे पन्हे मनापासून नाही आवडत.)नाहीतर मग वेलची ,केशर घालून केलेले लिंबाचे थंडगार सरबत किवा जास्वंद,स्ट्रॉबेरी फ्लेवरचा आईस्ड टी आवडतो नाहीतर मग शहाळ्याचे पाणी!
रात्री ९ च्या सुमाराला वादळी वार्यापावसातून फुजीसान चढून वर पोहोचल्यावर मोठ्ठया बादलीएवढ्या किटलीत उकळत असलेला ओचा जेव्हा प्यायला त्याची गोडी काय वर्णावी!(ओचा-जपानी बिनदुधाचा ग्रीन टी )
विमानामध्ये प्यायला टोमॅटो ज्युस आवडतो तर हिवाळ्यातल्या गार दुपारी ४,५ मित्रमंडळींबरोबर स्ट्राँग कॉफीचे प्याल्यावर प्याले ,जोडीला ऍपल केक,अम्म्म!!! आणि तीच जर ढळती संध्याकाळ असेल तर एखादा रेड वाईनचा प्याला!
लांबलचक करड्या संध्याकाळी,कुडकुडत ख्रिसमस मार्केटमध्ये गरमागरम ग्लुवाईन मजा आणते.(ग्लु वाईन -विशिष्ठ मसाले घालून रेड वाईन उकळतात आणि कपातून पितात)आणि काही सेलेब्रेशन असेल तर सेक्ट (जर्मन शँपेन)+ ऑरेंज ज्युस चे मिश्रण मस्त वाटते.
खूप हेवी जेवण झाल्यावर मात्र उझोचा छोटासा रॉ पेग,श्नाप्सच्या चिमुकल्या पेल्यातून!(उझो- बडिशेपेचा अर्क असलेले ग्रीक लिक्युअर)
असो,इति पेयपुराणम् समाप्तम्।
स्वाती
15 Feb 2008 - 3:25 pm | संजय अभ्यंकर
स्वातीजी,
पिवळा डांबिस हा डांबिस नसुन खविस आहे.
त्याने असला विषय सुरु करुन, सगळ्यांना चाळवले आहे.
आज समस्त मि.पा. वासी तराट होणार असे वाटते.
आणि त्यात तुम्ही त्या उझो`ची आठवण काढलीत.
त्याबरोबर मला ही सारी नांवे आठवली.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
24 Feb 2008 - 12:13 pm | पिवळा डांबिस
पिवळा डांबिस हा डांबिस नसुन खविस आहे.
हा, हा, हा, हा, हा.......:)))))
उझो, ग्राप्पा, फेर्नेट ब्रांका, येगर माइश्तर, उंदेरबर्ग...
ह्या सगळ्या शिव्या आहेत का हो?
:)))))
15 Feb 2008 - 4:06 pm | गीतांजली
आई खुप छान करते.
15 Feb 2008 - 7:16 pm | स्वाती राजेश
नाचण्याच्या पिठाचे "आंबील "हे माझे सर्वात आवडते पेय.
माझी आई उन्हाळ्यात मोठे पातेले भर करून ठेवायची त्याकाळी आमच्याकडे फ्रिज नव्हता म्हणून ती त्याला ओले फडके गुंडाळत असे.
दुपारचे बाहेरून खेळून आले की ती "थंडगार आंबील" ......वा काय मस्त दिवस होते ते.
माझी आई, नाचणीच्या पिठात ताक, लसूण पाकळ्या, आणि जिर्याची पुड आणि चवीनुसार मीठ घालून करत असे.
15 Feb 2008 - 7:25 pm | विसोबा खेचर
वा स्वातीताई, अहो काय सुंदर आठवण करून दिलीत हो!
खूप दिस झाले आंबिल खाल्ल्याला!
आपला,
(हळवा) तात्या.
15 Feb 2008 - 8:14 pm | llपुण्याचे पेशवेll
सखाराम गटण्याचे हे उत्तेजक पेय आम्ही मात्र वारंवार पितो.
पुण्याला चहाच्या टपरीवर अमृततुल्य असे लिहीलेले असते. खरच चहा हा अमृतच आहे. कधीही कितीही प्या. माझी आई तर चहा मस्तच करते. तसाही चहा मला फार आवडत असल्याने मी कुठलाही चहा आवडीने पितो अगदी अमेरीकेतला पाणचट चहा सुध्दा...
पुण्याचे पेशवे
15 Feb 2008 - 9:18 pm | प्रभाकर पेठकर
चहा (बिन साखरेचा)
चहा (वेलची, पुदीना आणि २ थेंब लींबाचे घालून[बिन साखरेचा])
चहा ( साखरेचा[बायकोची नजर चुकवून])
कॉफी (काळी, बिनसाखरेची)
काहवा (अरेबिक कॉफी)
कॉफी (कॅपुचिनो)
फिल्टर कॉफी (साखर, दूध, जायफळ, वेलची मिश्रीत)
दूध (गायीचे)
दूध (सायीचे [बायकोची नजर चुकवून])
मसाले दूध (काजू, बदाम, वेलची, साखर, केशर मिश्रीत)
पियुष (थंडगार)
ताक (पात्त्त्त्तळ)
लस्सी (मलाई मारके)
कोकम सरबत
सोलकढी
फुटाची कढी
रस्सम्
पिनाकोलाडा
मँगो मिल्क शेक
व्हॅनिला मिल्क शेक
मस्तानी
आईस्क्रिम सोडा (फार पूर्वी मिळायचा)
बिअर (कडू आणि स्ट्राँग [अर्थात चिल्ड]) {बायको समोर, संमतीने इ.}
व्हिस्की (डिंपल्, ब्लॅक डॉग, ब्लॅक लेबल [ह्या नाही मिळाल्यातर...... मिळेल ती] अर्थात, {बायको समोर, संमतीने इ.}
रम (लॅम्ब्स नेव्ही रम[४०% अल्कोहॉल बाय् व्हॉल्यूम] किंवा ओल्ड माँक)
लिक्यूर (कॅडबरी चॉकलेट, ऑरेंज, कॉफी, आयरिश मिस्ट)
कॉकटेल (व्हिस्की + बिअर)
पाणी (हिस्टॅक ३०० घेण्यासाठी)
धन्यवाद.
15 Feb 2008 - 9:21 pm | सुनील
डांबीसराव,
आज बर्याच दिवसानी टंकायला फुरसद मिळाली आणि बघतो तर तुम्ही मांडलेली ही "रस"भरीत चर्चा!
आता आवडतं ड्रिंक कुठले? मला वाटतं की ते स्थळकाळाप्रमाणे बदलतं.
लहानपणी कोकणातील गावी, सकाळी रामा गडी गोठ्यात जाऊन दूध काढीत असताना आजी एक पेला हातात देऊन आम्हाला गोठ्यात पाठवत असे. थेट आचळातून पेल्यात आलेले ते धारोष्ण निरसं दूध काय फक्कड लागतं म्हणून सांगू?
मग आठवतात ते कॉलेजचे दिवस. लेक्चरला दांडी मारून, मित्रमंडळीसहीत एखाद्या अंधार्या बारमध्ये "डायरेक्टर स्पेशल" नावाचे रसायन (हो, रसायनच पण तेव्हा दुसरं काय परवडत होतं म्हणा) पापड - शेंगदाण्यासारख्या फुकट मिळणार्या चकण्यासोबत पिताना जे "थ्रील" मिळायचे ते केवळ अद्वितीय!
वर जाणकार मंडळींनी ब्लेण्डेड स्कॉच, सिंगल माल्ट, वाईन इत्यादींबद्दल भरभरून लिहिले आहेच. ती ड्रिंक्सदेखील वेगवेगळ्या ऋतूत, वेगवेगळ्या संगतीत आणि वेगवेगळ्या मूडमध्ये खुलून येतात.
तसा मी मूळचा "हार्ड"वाला! बियर म्हणजे मुंबईच्या उन्हाळ्यात उतारा म्हणून असलेले पेय मानणारा! पण एकदा इंग्लंडमध्ये, डिसेंबरच्या ऐन थंडीत जी बियर प्यायली त्याने बियरकडे पहायचा दृष्टीकोनच बदलून गेला.
ख्रिसमस तोंडावर आलेला. सगळीकडे कसा उत्साह भरून राहिलेला. तशातच रॉबर्ट नावाच्या एका इंग्लिश सहकार्याने पबमध्ये येण्यासंबंधी विचारले. मी गेलो. विचार केला एखादा स्कॉचचा पेग वगैरे घेऊ. त्याने स्वतःसाठी "हार्वीज्"चा एक पाईंट घेतला. म्हटलं बघू तर खरं म्हणून मीही घेतला.
आणि काय सांगू? बियरदेखील इतकी "चवदार" असू शकते हे मला पहिल्यांदा कळले!!
"ही आहे एल", रॉबर्ट सांगत होता, "आणि त्यातून हार्वीजची. म्हणजे अगदी इथलीच, ससेक्सची!"
एल आणि लागरमधील फरक ऐकताऐकता आणखी दोन पाईंट रिचवले तेव्हा बरे वाटले.
भारतातील बियर ह्या लागर जमातीतील असल्यमुळे त्यांना "तशी" चव लागत नाही. ही एल असल्यामुळे चवदार आहे, हे नवीन ज्ञानही प्राप्त झाले! आणि महत्वाचे म्हणजे बियरचा आणि उन्हाळ्याचा काहीही संबंध नसतो हेही उमजले!!
आता तुम्हाला एक शिक्रेट सांगतो. केशवसूतदेखील बियरचे भोक्ते होते बरे का! हे आम्हालादेखील हल्लीच कळले. अहो, "काठोकाठ भरू द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या", अशा ओळी काय लेखणीतून उगाच उतरतात काय??
(एलप्रेमी) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
15 Feb 2008 - 9:39 pm | बुध्दू बैल
ताक आणि सोलकढी ही माझी 'फेव्हरेट' पेये आहेत. आमरस हा तर माझा जीवलग मित्र आहे.
एकदा कोकणात मित्राबरोबर पैज लावून सात वाट्या ताक प्यायलो होतो. तो देखील सात वाट्या ताक प्यायला.
मग बाकी सगळ्यांसमोर जाऊन खूप फुशारक्या मारू लागलो. मी दबावाखाली होतो, पण पैज होती, त्यामुळे थांबून राहिलो होतो. शेवटी मित्रानेच बाथरूमात जाऊया का विचारल्यावर कसली पैज अन कसलं काय
दुस-या दिवशी आमरस होता. जेवण वाढणा-या मावशींना 'ताक नाहीये का मावशी?' असं विचारल्यावर 'आहे, पण पैज लावण्यासाठी नाहीये' असे मावशींनी म्हटल्यावर निरुत्तर झालेल्या मी आणि माझ्या मित्राने आमरस सुध्दा परत मागितला नाही.
15 Feb 2008 - 9:53 pm | प्रकाश घाटपांडे
माझे नावडते पेय म्हणजे 'गोमुत्र' नावडते पेय प्वावे लागले कि मग आवडत्या पेयाचे महत्व समजते.
प्रकाश घाटपांडे
15 Feb 2008 - 10:03 pm | अविनाश ओगले
तुमचं सर्वात आवडतं ड्रिंक कोणतं? या परिसंवादात आपापल्या परीनं भाग घेणार्या सर्व दर्दी मंडळीना आमचा दंडवत. इथपर्यंत वाचत येऊनच इतका बेहोष झालो आहे की साध्या नमस्काराचा एकदम दंडवतच घडला. आता सवडीने मी ही काही लिहिन म्हणतो... पण तूर्तास
``ला पिला दे साकिया, पैमाना पैमाने के बाद
होश की बाते करुंगा, होश मे आनेके बाद"
चांगभलं
15 Feb 2008 - 10:15 pm | बुध्दू बैल
ओगले साहेब, तुम्ही लिहीलेल्या शेराची आम्हालापण हवा लागलीया, म्हणूनच,
अर्ज करता हू,
पैखाने मै बैठे थे मैखाना समझकर
पी लिया पानी पैमाना समझकर
15 Feb 2008 - 10:56 pm | चतुरंग
तुम्ही तुमचं नाव सार्थ केलंत! मि.पा. ची एकदम 'मधुशाला' करुन टाकलीत! लोकं एकदम 'झुम बराबर झुम शराबी' झाली की!!
असो. आम्ही सुरापान करीत नसल्यामुळे आम्हाला ह्यातील काही गम्य नाही, पण.. पण आम्हालाही काही ड्रिंक्स आवडतात -
रणरणत्या उन्हाच्या झळातून आल्यावर कैरीचे थंडगार पन्हे (किंचित केशर आणि वेलचीची पूड टाकून) अंतरात्मा थंड करते!
गरमागरम जेवणानंतर ताजं ताजं ताक (त्यात किंचित मीठ टाकून) क्या बात है, 'तक्रं शक्रस्य दुर्लभं!'
तशीच लस्सीही छान लागते पण ती पंजाबी लस्सीच हवी - उगीच ते आईसक्रीम वैगेरे घातलेले गोड पेय लस्सी म्हणून देतात तसले नको!
कडक मद्रास कॉफी सुध्दा मला आवडते - फार दूध नको, किंचित कडवट चव मस्त वाटते.
कोजागिरीचे मसाला दूध - मस्त आटवून मंद पिवळसर रंग आलेला, चवीला नीट बसेल अशी साखर, केशर, वेलची, थोडं जायफळ लावलेलं, बदामाचे काप, थोडे पिस्ते आणि चांदीच्याच भांड्यातून प्यायला मजा येते! एकदम राजेशाही! (विकतचा मसाला मात्र नाही, त्यापेक्षा नुसतं आटवलेलं दूध सुध्दा बरं!)
पावसातून भिजून आलोय किंवा बाहेर पाऊस आहे - गरमागरम कांदा मिरची भजी आणि कडक चहा (एकदम 'वाघासारख्या मर्दांसाठी' इश्टाइल!) पण हा एखादाच कप वैगेरे नाही, चांगला बंपर भरुन, पाहिजे तेवढा घेता यायला हवा!
(अवांतर - वेळ संध्याकाळची असेल तर हिचा 'प्रेमळ' सल्ला कानी येतो, "जास्ती हादडू नका, जेवायची पंचाईत करुन ठेवाल!")
गरमागरम कढी - मस्त जिरं, लाल सुक्या मिर्चीची तुपाची झकास फोडणी, ठेचलेल्या आल्याचा तिखट स्वाद लागलेला वा वा वा एकदम तबियतदार प्रकार!
चतुरंग
14 Apr 2013 - 1:45 am | शुचि
मसाला दूध, कढी वा!!!! झकास.
14 Apr 2013 - 10:32 am | सुबोध खरे
http://www.misalpav.com/node/23980
http://www.misalpav.com/node/23987
दिवसभर उपाशी आणि तहानलेले राहून संध्याकाळी प्यायलेला लिंबू घातलेला कोका कोला तो सुद्धा आयुष्यात समुद्रावरील पहिला दिवस .
आजही त्या आठवणी निघाल्या कि मला परत तसाच कॅन मधील कोका कोला लिंबू पिळून प्यावासा वाटतो.
असाच एकदा मी विक्रांत वर असताना (मे १९९०) समुद्रावरून कारवार ला जाण्यासाठी एक व्हेलर ( लाकडी लाइफ बोट टायटनिक मध्ये असते तशी)निघाली होती का कुणास ठाऊक पण मी त्यातून जाण्यासाठी तयारी दाखविली. आणि ती बोट वल्हवत आम्ही सहा जण विक्रांत वरून कारवार बंदराकडे निघालो.सकाळी १० वाजता नाश्ताकरून निघालो होतो. पण समुद्रातील प्रवाहाची आम्हाला कल्पना नव्हती आणि आम्ही कारवारच्या दक्षिणेस कोणत्यातरी किनार्यावर लागलो साधारण १२ वाजता.बोट वल्हववण्याचे कष्ट वर उत्तमांगी तळपणारा सुर्य आणि भरकटलेले आम्ही. भूक भयंकर लागली होती. आमच्या कडे एक मिल्कमेड चा डबा आणि एक पावाचा लोफ एवढेच होते. मिल्कमेड बरोबर साही जणानी पाव खाल्ला. ( आयष्यात कधीच असे जेवण मी केले नव्हते). पाण्याची बाटली सांडून गेली होती. अर्धवट भुकेले आणि ठार कोरड्या तोंडाने आम्ही कारवर च्या दिशेने चालत कूच केले. थोडेसे चालल्यावर कानडीत एक बोर्ड होता त्यात काहीतरी जिलब्या आणि १२ किमी असे लिहिले होते आम्ही समजलो कि आम्ही कारवारच्या दक्षिणेला १२ किमी भरकटलो होतो. रणरणत्या उन्हात चालत चालत आम्ही ५-६ किमी चाललो असू तेंव्हा एक वस्तीजवळ नारळवाला दिसला. त्याचे नारळ पाणी प्रत्येकी दोन अशा दराने प्यायलो. असे अमृततुल्य नारळ पाणी मी आयुष्यात प्यायलो नाही.
15 Feb 2008 - 11:18 pm | सुधीर कांदळकर
यात निरनिराळ्या वारुणी, फळांचे रस वगैरे घालून उत्तम पेये करता येतात.
उदा बकार्डी इन ऍपल जूस आणि पाणी.
व्होदका इन टोमॅटो जुस आणि पाणी.
जिन इन लाईम कॉर्डीअल आणी फ्रेश वॉटर लाईम.
इ. इ.
15 Feb 2008 - 11:35 pm | वरदा
गरमागरम कढी - मस्त जिरं, लाल सुक्या मिर्चीची तुपाची झकास फोडणी, ठेचलेल्या आल्याचा तिखट स्वाद लागलेला वा वा वा एकदम तबियतदार प्रकार!
अगदी पटलं
16 Feb 2008 - 12:34 am | llपुण्याचे पेशवेll
कुळथाचे काळी मिरी आणि इतर (मला रेसिपी माहीत नाही नक्की नाहीतर वरदाताईसारखे मसालेदार वर्णन केले असते)अनेक तिखट मसाले घालून केलेले ठसकेबाज कळण मला फार फार आवडते.
एकदम नाकातोंडातून धूर निघतो. सर्दी पडसे दूर पळून जाते.
-सर्दाळलेला
डॅनी
पुण्याचे पेशवे
16 Feb 2008 - 1:25 am | प्राजु
१.कोल्हापूरी पांढरा रस्सा... खूप आवडतो
२. उन्हाळ्यात सिंहगडावर मिळणारे मड्क्यातल्या दह्याचे गोड ताक.. मस्त जिर्याची पावडर घालून.
३. उन्हाळ्यात पुण्यात निराविक्रिकेंद्रांवर मिळणारी थंडगार निरा....खूप आवडते. पुण्याच्या त्या मेल्या प्रदूषणात आणि कडकडीत उन्हात निरा पिताना होणारा आनंद काय वर्णावा?
४. डंकिन्स मध्ये मिळणारे हॉट चॉकलेत विथ व्हिप्ड क्रिम.. भरपूर शॉपिंग करावी आणि मग तिथल्याच डंकिन्समध्ये मस्त हॉटचॉकलेट, सोबत हॅश ब्राऊन्स किंवा फ्लॅटब्रेड चिझ सँडविच..
५. डंकिन्स मधलाच वेनिला मिल्क्शेक...
६. हे सगळ्यात आवडते :
नेस टी... थोडि चहाची चव.. थोडि लिंबाची.. पिझ्झा किंवा बर्गर सोबत कोक आणि नेस टी दोन्ही आवडते. नेस टी जास्ती.
नेस टी हे कधीही छानच लागते. एरवी जेवताना सुद्धा सोबत घ्यायला आवडते.
- प्राजु
20 Feb 2008 - 4:05 pm | विजुभाऊ
काय राव तुम्हि सग्ळे सोल कढि विसरला की.....
कोकमाचे आगळ घालुन केलेली सोलकढी......
20 Feb 2008 - 5:45 pm | सृष्टीलावण्या
.
.
.
पण कोकणात होणारी फणसाची कढी तळीराम गार करते...
.
.
.
इतर वेळी फिल्टर कॉफी, राजस्थानी कढी, कळंण, सोलकढी त्यातल्या त्यात जास्तच आवडतात.
पेयांवरून आठवले..
आम्ही एकदा गिर्यारोहणाला गेलो होतो. चालता चालता मध्यरात्री एक थांबा घेतला. आमच्यातल्या एकाने २-३ दा चहा हवा होता म्हटले.. आमच्या टोळीप्रमुखाने दुर्लक्ष केल्यावर तर त्याला चेवच चढला.. तो चहाबाज असण्याचे फायदे मोठ्यामोठ्याने सांगायला लागला.
आमचा टोळीप्रमुख, श्री. लेले वैतागला, सर्वांसमोर म्हणाला सध्या पाण्याशिवाय इथे एकच प्यायला मिळेल आणि ते म्हणजे शिवाम्बु.
त्या चहाबाजाच्या तोंडाला कायमचे कुलुप लागले...
20 Feb 2008 - 9:22 pm | संजय अभ्यंकर
सृष्टीलावण्य देवी (नांव टंकताना घाम फुटला),
आपणांस फि. कॉ. आवडते, ती सुद्धा, दक्षिण भारतीय फिल्टर भांड्यातली.
मग एकदा, बँगलोरच्या कोतास कॉफी वाल्याची प्रिमियम ब्लेंड पूड वापरून पहा (७०% शुद्ध कॉफी + ३०% चिकोरी). केवळ अप्रतीम!
ह्या प्रिमियम ब्लेंड्ची एस्प्रेस्सो सुद्धा अप्रतीम लागते.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
21 Feb 2008 - 4:59 am | सृष्टीलावण्या
मी आता पुढच्या माटुंगम् भेटीत महेश्वरी उद्यानाच्या आसपास शोधेनच ही प्रजात..
21 Feb 2008 - 5:43 am | धनंजय
पुण्यातल्या या "खर्या" कॉफीच्या दुकानाचा पत्ता मी कधी लक्षात ठेवला नाही. के ई एम हॉस्पिटलच्या आसपास घुटमळताना, ताज्या दळलेल्या उत्कृष्ट कॉफीचा वास येताच, माझे नाक हुंगत हुंगत आपोआप मला तिथे नेत असे!
(पण तरी सांगतो - हिची चव न घेतलेली बरी. कारण तिची चटक लागायची शक्यता आहे. मग कोणीही ओळखीचे दक्षिण कर्नाटकाला किंवा तमिळनाडूला जात असेल तर आशाळभूतपणे "अहो, एक पाव किलो कॉफी आणा" असे सांगणे आपोआप होते. मग एक भयंकर लोचट माणूस म्हणून आपली मित्रांमध्ये नाचक्की होते. कुणी सांगितले आहे नसता वाईटपणा घ्यायला...)
20 Feb 2008 - 6:49 pm | परीचा परा
आमची आवड
तसे आम्हाला वाईन भयंकर आवडते....
पण व्होडका घेण्याची मजा औरच असते ... तेव्हा आम्ची व्होडका आम्ही कशी घेतो ते सांगतो...
पहिले म्हणजे रात्रीचे घरापासून दूर एखाद्या चांगल्या बारमधे जावे...
मग तिथे व्होडकात भरपूर साखर टाकून चांगले अर्धे लिंबू पिळावे.....
आणि अगदी आरामात चवीने व्होडका घ्यावी....
(ज्याने त्याने आपापल्या क्षमतेने घ्यावी... आम्हाला व्होडकाच्या २ बाटल्या लागतात...)
२-४ तासांनी पोटभर जेवून बारमधून बाहेर पड्लो की बाईक वर घरी जाईपर्यंत वार्याने व्होडका झकास चढते....
मग तो हँगओव्हर जो दुसर्या दिवशी संध्याकाळपर्यंत टिकतो.... तो काय वर्णावा ??? अहाहा हा...
(धोक्याची सूचना: व्होडका घेऊन गाडी चालवू नये... अपघात झाल्यास आमची जबाबदारी नाही.... ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या पद्धतीने व्होडका घ्यावी.... वारे लागणे महत्त्वाचे आहे हे आम्ही सांगतोय....उगीच कसरती करायला कोणी जाऊ नका...)
{परीच्या प्रतिक्षेत} परा ....
20 Feb 2008 - 6:59 pm | प्रभाकर पेठकर
{परीच्या प्रतिक्षेत}
अरेरे...! परी मिळण्याच्या होत्या नव्हत्या त्या सर्व शक्यता क्षीऽऽऽण झाल्या.
आता 'परा'चा 'कावळा' होण्यास किती तो वेळ लागणार?
20 Feb 2008 - 8:15 pm | परीचा परा
प्रभाकरराव,
अरेरे...! परी मिळण्याच्या होत्या नव्हत्या त्या सर्व शक्यता क्षीऽऽऽण झाल्या.
कोणती परी मिळण्याची शक्यता होती जी क्षीण झाली? ... ती तर केव्हाच निघून गेली.... आता सोबतीला फक्त आमचे निस्सिम आणि खरे प्रेम आणि आठवणी राहिल्या आहेत....
आणि पराचा कावळा तर काही आमचा होणार नाही...मनाने आम्ही खंबीर आहोत.... कोसळू पण त्यातूनही सावरू
परीचे नसले म्हणून काय झाले? आमचे प्रेम तर खरे होते .... त्यामुळे प्रतिक्षा ही कायमचीच राहीन....
आपलं हे असं रोख ठोक असतं...
{परीच्या प्रतिक्षेत} परा ....
21 Feb 2008 - 2:12 pm | झकासराव
काय तरी एकेका बहाद्दराची वर्णन.
वाचुनच आकर्षण वाटलं.
पण मी पीत नसल्याने काही फायदा नाही.
माझ आवडतं.
कोल्हापुरातल्या महानगर पालिकेजवळच्या मोहक लस्सी मधली लस्से मलाई मारके.
(साधीच बरं तिथे पेशल लस्से मागवाल तर त्यात सुका मेवा घालुन केलेली लस्सी देतील.)
भरपुर पावसात थंडी वार्यात बोंबलत फिरायला गेल डोंगर दर्यात की जिथे मिळेल तिथे मिळेल तसा चहा :)
घरी मस्त संध्याकाळी तर मूड नुसार चहा किंवा कॉफी एकदम कडक अशी गृहलक्ष्मीने बनवलेल.
अजुन आमरसाचा नं आहेच पण तो असाच पिणे ह्यापेक्षा जेवणात असण मला तरी जास्त चांगल वाटत.
खास देवगड हापुस उत्तम प्रतीचा आणावा आणि त्याचा आमरस खावा. (चपाती असो वा पुरी ब्रह्मानंदी लागतेच :))
ताक पिण देखिल आवडत बॉ आपल्याला. :)
अजुन आठवेल तस लिहिनच म्हणा.
अवांतर : सोनेरी प्रभा उधळणारं ते पेयरत्न दोन मिनीटं नुसतं न्याहाळत रहावं>>>>
पिवळा डँबिस यांनी अतिशय जबराच वर्णन केल आहे.
एक शंका आहे. सोनेरी झळाळता वर्ण आहे तोच पिवळा ना??
म्हणजे मी ऐकलय की जर्मन लोकाना सोनेरी म्हणजे पिवळा हे सांगाव लागत.
आता खरा डँबिस च्या मागच्या "पिवळा" ह्या शब्दाचा अर्थ कळाला तर :)
काय डँबिस काका बरोब्बर क्काय्य?? :)
ह. घ्या हो जस स्कॉच घेता तसाच हा माझा वात्रटपणा :)
21 Feb 2008 - 10:58 pm | llपुण्याचे पेशवेll
अहो लोक म्हणतात की त्या उंची मद्याने किक लागते म्हणे.. पण काय सांगू? आर्धी बादली आमरस पिल्यावर जी काय किक बसते ती केवळ अवर्णनीय. अहो ताटावरून उठायची पण शुद्ध रहात नाही हो.
(ओगराळी भरभरून आमरस वाढणारा)
डॅनी.
पुण्याचे पेशवे
22 Feb 2008 - 12:00 am | प्रियाली
22 Feb 2008 - 12:03 am | विसोबा खेचर
फोटू!
ती ग्लासं पाहून आम्हालाही त्यातलं द्रव्य प्यावसं वाटतं आहे! :)
तात्या.
22 Feb 2008 - 12:12 am | प्रियाली
ते शनिवार बुधवारी प्यायचं द्रव्य आहे. ;-)
असो, शनिवार बुधवारवरून सर्किटची आठवण झाली. हल्ली गेला सर्किट कुणीकडे?
22 Feb 2008 - 12:19 am | आणिबाणीचा शासनकर्ता
ते शनिवार बुधवारी प्यायचं द्रव्य आहे. ;-)
वा वा! :)
असो, शनिवार बुधवारवरून सर्किटची आठवण झाली. हल्ली गेला सर्किट कुणीकडे?
हल्ली बराच बिजी असतो असं ऐकून आहे. त्यामुळे इथे यायला वेळ नसेल मिळत!
असो.. लवकरच इथे यावा हीच इच्छा!
आपला,
(विकासरावांसारखी, कोलबेरसारखी, प्रियालीसारखी जुनी माणसं पुन्हा भेटल्याने खूप आनंदीत झालेला!) तात्या.
22 Feb 2008 - 9:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>असो, शनिवार बुधवारवरून सर्किटची आठवण झाली. हल्ली गेला सर्किट कुणीकडे?
हल्ली बराच बिजी असतो असं ऐकून आहे. त्यामुळे इथे यायला वेळ नसेल मिळत!
सर्किटराव, कामातच बरे आहेत. याहू आणि मायक्रोसॉफ्ट्ची युती होऊन त्यांच्या बॉसने इतके कामे सांगावी या सर्किटाला की बस :)
त्यांच्यासारख्या माणसाने कामात असणे चांगली गोष्ट आहे, ते जर का मोकळे असले ना !!!! संकेतस्थळावर त्यांना आवरणे आणि आमच्या सारख्यांना वावरणे ,कठीण जाते :)
तसे, सॅन होजे ला जाऊन त्यांना मला एक 'मानपत्रही' द्यायचंय ;)
जुनी माणसं भेटल्यावर आम्हालाही खूप आनंद झाला !!!!!
सर्किटची वाट पाहणारा
प्रा.डॉ.........
22 Feb 2008 - 2:52 pm | प्रमोद देव
तसे, सॅन होजे ला जाऊन त्यांना मला एक 'मानपत्रही' द्यायचंय ;)
क्या बात है!
22 Feb 2008 - 3:37 pm | प्रियाली
त्यांच्यासारख्या माणसाने कामात असणे चांगली गोष्ट आहे, ते जर का मोकळे असले ना !!!! संकेतस्थळावर त्यांना आवरणे आणि आमच्या सारख्यांना वावरणे ,कठीण जाते :)
आणि नाका-डोळ्यातून पाणी येतं आहे म्हणून तक्रार करायची? :)))
22 Feb 2008 - 12:55 am | सुनील
फक्त बुधवार-शनिवारच का?
तसा मार्गारीतातील पीच फ्लेवर माझा आवडीचा. पण खरच सांगायचं तर, हे "भेसळीचे" तकीला दिसायला मनमोहक आणि चवीलाही छान! तरीही, मीठ-लिबाने गिलावा केलेल्या तोंडात थेट तकीला शॉट टाकण्यातील थ्रील काही वेगळेच!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
22 Feb 2008 - 1:08 am | प्रियाली
तात्यांचे खास "आवडते" दिवस आहेत आणि सर्किटच्या कायम आठवणीत राहणारे.
(सर्वांचा हिशेब चोख राखणारी) प्रियाली
22 Feb 2008 - 4:38 pm | सख्याहरि
स्कॉच ऑन द रॉक्स! आम्हांस ही फार आवडते.
सुवर्णकांती झळाळणारं...
आपला आब राखून असणारं...
फक्त बर्फाशिवाय आणखी कुणाशी (सोडा, लेमन, ज्यूस वगैरे) सलगी न करणारं... मस्त वर्णन केले आहे. वा.
त्यानन्तर... म्हनजे जर चांगली स्कॉच उपलब्ध नसेल्...(उदा. ग्लेन्न्फिडिच, शीवसरीगल..) तर
रम वुइथ कोला..
याची क्रुती देत आहोत!
एक लांब स्वच्छ चकाकणारा क्रिस्टलचा ग्लास घ्यावा. त्यात बर्फाचे किणकिणणारे चार-पाच स्फटिक घालावे.
बेताची, जेमतेम स्फटिक बुडतील, न बुडतील इतकी (६० - सुमारे)बकार्डी रम घालावी. (माफ करा पिवळा डांबिस.. तुमची कृती चपखल बसत असल्यामुळे कॉपी पेस्ट केली थोडी.. आम्च्या लिखाणाच्या वेगाची जरा बोम्बाबोम्ब आहे :))
तर.. त्यानंन्तर, त्यात एक लिंबू पिळावे..
ग्लास अता ३०-४०टक्के भर्लेला असेल.
अता ग्लास मधे चिल्ड कोला भरावा.. (भारता सार्खे थम्स्-अप मिळत नस्ल्याने, कोककोला किंवा तत्सम कोला आवडीप्रमाणे)
ग्लासावरती लिम्बची एक चक्ती अडकववी.. सजावट म्हणून...
ज्यांना ऑल्कोहोल ची चव अवडत नाही पण टल्ली व्हावे वाटते, त्यांना हे पेय हमखास आवडते..
अवश्य करून पहा.. मस्त लागते. ४-५ ड्रिन्क्स घेततल्यावर हळूच समाधी कधी लागते समजत नाही...
-(स्कॉच प्रेमी) सख्याहरी
22 Feb 2008 - 5:09 pm | विसोबा खेचर
४-५ ड्रिन्क्स घेततल्यावर हळूच समाधी कधी लागते समजत नाही...
वा!
आपला,
(समाधिस्त!) तात्या.
24 Feb 2008 - 12:07 pm | पिवळा डांबिस
प्रिय सख्याहरी,
आमची स्कॉचस्तुती आवडल्याचे कळवल्याबद्दल आभारी आहे.
तुमच्या रम च्या रेसेपीमध्ये एक नम्र सूचना...
साध्या क्लिअर बकार्डीपेक्षा, डार्क बकार्डी घालून ट्राय करा एकदा...
ओक बॅरलची इतकी सुंदर चव येते म्हणून सांगू...
आपला मदिरापरायण,
पिवळा डांबिस
25 Feb 2008 - 8:43 pm | सख्याहरि
डार्क बकार्डी घालून ट्राय करीन लवकरच...
टिप दिल्याबद्दल धन्यवाद.
इथे जर्मनीमध्ये बीयरही फार मस्त मिळते.वाइझन बीयर.. विशेष!
-कृतकृत्त्य सख्याहरी
22 Feb 2008 - 5:40 pm | सख्याहरि
एक तर शुक्रवार्ची दुपार.. त्यात हा दरू गझलंचा विशय...
कधी घरी जातो... आणि .. बसतोय असे झलेय.. ...
त.क. - इथे चित्रे कशि हो घालतात प्रतिक्रीयेत? आम्च्याकडे बरीच लई भारी भारी चित्रे आहेत...
22 Feb 2008 - 6:05 pm | लबाड मुलगा
ताजा ताजा उसाचा रस (लिंबु आले घालुन)
पक्या
9 Mar 2008 - 8:15 am | कोलबेर
स्कॉचमध्ये आम्हाला ब्लेंडेड प्रकारात जॉनी वॉकर ब्लॅक लेबल आणि शिवस रिगल (डांबीस काकांची फेव्हरेट) आवडते..आणि सिंगल माल्ट मध्ये ग्लेन फिडीच आणि ग्लेन लिविट आवडते.. (इतकीच ट्राय केली आहे).. डांबीस काकांनी सांगीतलेल्या कृती व्यतिरिक्त स्कॉच आम्हाला कधी कधी थोडासा क्लब सोडा घालून देखिल आवडते!
स्कॉच खेरीज आम्हाला आमच्या टेनिसीची जॅक डॅनीयल व्हिस्की पण जाम आवडते.. लाजवाब आहे.. सोड्या मध्ये मस्त लागते!.. एखाद दुसरा पेग घेतल्यावर आमच्या इथल्या बार्बेक्यू जॉइंट मधील रिब्ज खावेत.. आहाहाहा!!!
इस्ट कोस्ट वेस्ट कोस्ट वाले तुमची संमेलने संपली इकडे या.... तुम्हाला उत्कृष्ट बारबेक्यू खिलवू!!!
-कोलबेर
14 Apr 2013 - 10:14 am | पिंपातला उंदीर
अस्मादिक रम आणि बियर या दोन टोकाच्या आवडी बाळगून आहेत. दोन्ही एकत्र पिल्यात तर अती उत्तम
14 Apr 2013 - 10:29 am | प्रकाश घाटपांडे
२००८ साली आवडत असलेल पेय २०१३ साली नावडत होउ शकत अथवा उलट ही होउ शकते.
14 Apr 2013 - 11:28 am | निनाद मुक्काम प...
शारीरिक व मानसिक त्राण ज्या दिवशी अधिक असते अश्या कामाच्या बहुतेक दिवशी रेड्बुल हे पेय माझ्या मानसिक व शारीरिक शिणवट्यावर सर्वोत्तम पर्याय असतो
उन्हाळ्याच्या झळा सुसह्य करण्यासाठी ,उसाचा रस , चिल्ड बियर ,येथे चिल्ड मध्ये बर्फात गोठवलेली अगदी ज्या ग्लासात ती रीती होते तो सुद्धा आइस कोल्ड हवा.
दादरच्या कैलास नाथ ची लस्सी चमच्याने खायला आवडते.
रम्य संध्याकाळी मार्गरिटा, पिनाकोलाडा ,मार्टीनी , अश्या कॉकटेल सोबत सांध्र संगीत कानावर पडत असतांना प्यायला खूप आवडते.
साग्रसंगीत ब्रंच करायचा असेल तर फेसाळणारी वारुणी शॅम्पेन माझ्यामते अत्यंत महागडं आणि उच्च अभिरुचीच पेय अशी शॅम्पेन म्हणजे पांढराशुभ्र फेस, झिंगवणारा स्वाद आणि उत्कृष्ट मुरलेली चव, सेलिब्रेशनचा मूड आणणारं हे
सोनेरी मद्य आनंदाचं उत्साहाचं सर्वोत्तम प्रतीक आहे.
किंवा डिनर साठी रक्तवर्णी वारुणी
भोजनाच्या उत्तरार्धात Cognac
चा चषक हातात रेंगाळत चर्चिल च्या थाटात गहन विषयावर काथ्याकूट करायला खूप आवडतो.
14 Apr 2013 - 8:58 pm | टिनटिन
आयरीश बीअर आहे (स्टाउट). काळ्या रन्गाची असते. त्याच्या बरोबर सोडा ब्रेड असेल तर अजुन धमाल. चव कडु असते पण एकदा आवडली तर त्याच्या सारखे दुसरी बीअर नाही. आपल्याकडे कुठे मिळत असेल तर कळवा.
14 Apr 2013 - 10:43 pm | निनाद मुक्काम प...
आपल्याकडे अनेकदा घरी आलेल्या पाहुण्यांना काय घेणार असे विचारले तर बरेचदा
त्यांचे उत्तर कूच नही असे असते.
अश्यावेळी त्यांना अगत्याने कूच नही पाजावे.
लय भारी
15 Apr 2013 - 7:51 am | श्रीरंग_जोशी
४४/४५ डिग्री से. तापमानात सायकलवरून अंतर कापताना घामाघूम होऊन जीव घाबरा झाल्यावर कडुनिंबाच्या झाडाखाली वाळ्याच्या ताट्या वापरून तात्पुरत्या टपरीमध्ये कानपुरवाले परदेसी भैय्या यांनी बनवलेली आइसक्रीम लस्सी पिल्यावर जी अनुभूती मिळाली होती तशी पुन्हा कधीच भेटली नाही.
अनेक वर्षे गेली पण त्या लस्सीची चव अगदी काल प्यायल्याप्रमाणे जीभेवर आहे.
लेख व प्रतिसाद आवडले.
15 Apr 2013 - 9:52 am | चौकटराजा
मला खाण्यापेक्षा " पिण्याचा" नाद अधिक आहे. मद्यापेक्षाही मादक , अजिबात " पेय" नसलेले मला प्यायला आवडते.
मी ते फक्त डोळ्याने पितो. काय असेल ते. आता साठीला आलो तरी या पेयाची संवय जात नाही. काय करावे बरे ?
18 Apr 2013 - 10:05 am | पक पक पक
मद्यापेक्षाही मादक , अजिबात " पेय" नसलेले मला प्यायला आवडते.
आजोबा, आता तरी बास की... ;)
17 Apr 2013 - 11:51 am | भटक्य आणि उनाड
काय पन मस्स्त विशय !!!
17 Apr 2013 - 11:53 am | भटक्य आणि उनाड
काय पन मस्स्त विशय !!!
17 Apr 2013 - 3:42 pm | बॅटमॅन
नॉन-अल्कोहोलिच ड्रिंक चालणार नै का हो?
(टीटोटलर) बॅटमॅन.
18 Apr 2013 - 10:07 am | पक पक पक
नॉन-अल्कोहोलिच ड्रिंक चालणार नै का हो?
चालतय ! तु बनव अल्कोहल आम्ही टाकु ... ;) सोत्री आहेतच कॉकटेल बनवायला... :)
18 Apr 2013 - 5:30 pm | बॅटमॅन
हौ अबौट ताक/लस्सी/रसम ?
शिवाय एका जवळच्या सोर्सकडून ऐकलेय की चेन्नैच्या काही बार्समधून चखणा म्हणून रसम देतात म्हणे. ऐकूनच तोंडाला पाणी सुटले. सोत्रिअण्णांचा अनुभव काय आहे म्हणे?
18 Apr 2013 - 9:19 pm | तुमचा अभिषेक
लहान असतानाची आठवण.. आमची आजी नॉनवेज करण्यात अख्ख्या गावात प्रसिद्ध.. मग आजकालच्या शहरी मुली तर सोडा अगदी माझी आई वगैरे ही त्या समोर पाणीकमच.. त्यात ही तिच्या हातचे कोंबडी म्हणजे अहाहा.. आजही म्हातार्या कोतार्यांनी नाव काढावे.. असो, तर विषय ड्रींकचा आहे तर ती कोंबडीचा कसलासा काढा करायची.. काय कसा हे समजण्याच्या वयात मी नव्हतो.. अर्थात आजही स्वयंपाकघरात मी लुडबुड करत नाही ती गोष्ट वेगळीच.. पण त्या तिखट झणझणीत काढ्याची चव अवर्णनीयच असायची.. जणू काही सारे कोंबडीचे सार त्या काढ्यात उतरले असायचे.. आणि हा खास काढा मी आणि आजीच प्यायचो, इतरांना नुसता चवीला मिळायचा.. आणि म्हणूनच इतर सारे चिडायचे.. कारण त्या काढ्यामुळे कोंबडीची चवही कमी व्हायची.. साहजिकच आहे म्हणा, ती सारी चव त्या काढ्यात घोळवून मी आणि आजीच जे फस्त करायचो...
आज हा धागा बघून काहीतरी वेगळे ड्रीक लिहावे म्हणून आठवायला घेतले आणि... धन्यवाद माझ्या आठवणी जागवल्याबद्दल.. आजी गेली त्याला आज चौदा-पंधरा वर्षे झालीत.. चव मात्र अजूनही रेंगाळतेय..
19 Apr 2013 - 2:02 am | मोदक
थम्स अप ऑन द रॉक्स! (कृपया हसू नये!!!! ;-))
मोठ्या बुडाचा ग्लास भरून बर्फ आणि त्यामध्ये बर्फांच्या राशीमधून हळूहळू भरत जाणारे.. काठोकाठ भरलेले थम्स अप. उगाच किडा म्हणून लिंबू पिळणे वगैरे प्रकार करायचे नाहीत.. आहे तसे आहे त्या चवीचे. सोबत तंदूरी चिकन आणि गरमागरम कबाब! वाह्!
आणखी एक आवडते ड्रिंक (?) म्हणावे तर तांबडा आणि पांढरा रस्सा.
मागच्या वर्षी पावसाळ्यात कमळगडाचा ट्रेक केल्यानंतर परत येताना दिवसभराचा पाऊस, बोचरा वारा, नखशिखांत भिजणे आणि कमळगडापासून वाईपर्यंत त्या नदीच्या शेजारून कुडकुडत बाईक चालवून वाईला थांबलो होतो.. "सिद्धगिरी" नावाच्या एका धाब्यावर फुल्ल वेटींग सहन करून जेवायला बसल्यावर वाट्या बाजूला सारून बिन्धास्त पाण्याच्या ग्लास मधून गरमागरम तांबडा आणि पांढरा रस्सा रिचवला होता. सोबतीला सुरमई फ्राय.
अशी मनासारखी वेळ खूप कमी वेळा जमून येते!!!
19 Apr 2013 - 11:27 am | बॅटमॅन
+११११११११११११११११११११.
थम्स अप बद्दल नै तर रश्श्याबद्दल. आपलेपण लै आवडते ड्रिंक :)
19 Apr 2013 - 11:37 am | बाबा पाटील
आपले आवडते एकच ड्रिंक दुद्दु...(कृपया चावट अर्थ काढु नये.)