समाजवादी याचा काल सुसंगत व व्यापक अर्थ असा की आपण ज्या समाजात राहतो त्याचे काही देण लागतो या दृष्टीने आपल्या कुवतीनुसार समाज उन्नती साठी शक्य असेल ते काम करणे. स्वत:चा विकास करताना सोबत समाजाचाही विकास व्हावा या दृष्टीने काही योगदान देता आले तर ते पाहणे. व्यवहारिक दृष्ट्या स्वार्थ व परमार्थ दोन्ही कसा साधता येईल हे पहाणे. व्यक्तिगत पातळीवर समाजहिताचे व्यापक काम करताना अनेक मर्यादा येतात. त्यामुळॆ संघटनात्मक पातळीवर देखील हे काम केले जाते. एनजीओ, चळवळी, ट्र्स्ट अशा समाजसेवी संस्थांच्या मार्फत हे काम होत असते. यांच्या उद्दीष्ट, कार्य, अडचणी यावर प्रकाश टाकणारा आजच्या सुधारक या विवेवकवादाला वाहिलेल्या चिंतनशील मासिका ने सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर 2008 हे तीन विशेषांक काढले होते. अनेक नामवंत, अभ्यासक, एनजीओंचे संस्थापक यांनी त्यात लेखन केले आहे. समाजसेवी संस्थांच्या अर्थकारण, राजकारण, समाजकारण यावर विस्तृत व अभ्यासपूर्ण भाष्य आहे. या एनजीओ विशेषांकाचे अतिथी संपाद्क हे सुबोध वागळे हे टाटा सामाजिक विज्ञान संस्था चे प्राध्यापक प्रयास या संस्थेचे विश्वस्त तसेच कल्पना दिक्षीत या प्रयास या संस्थेच्या संसाधने व उपजीविका गटातील वरिष्ठ संशोधक सहयोगी हे आहेत. त्या काळात आजच्या सुधारक च्या संपादन मंडळात नंदा खरे (कार्यकारी), सुनीती देव, दिवाकर मोहनी हे होते. तसेच सल्लागार मंडळात प्रमोद सहस्रबुद्धे,उत्तरा सहस्त्रबुद्धे प्रभाकर नानावटी, टी बी खिलारे व रविंद्र रुख्मिणी पंढरीनाथ हे होते. ही सर्व मंडळी आजच्या सुधारक सारख्या विवेकवादाला वाहून घेतलेल्या मासिकाची धुरा अनेक वर्ष सांभाळत होती. या विशेषांकाला आताअनेक वर्षे झाली. या काळात विज्ञान व तंत्रज्ञानामुळे समाजात मोठे बदल झाले आहेत. समाजाचे समाजसेवी संस्थांकडे पहाण्याचे दृष्टीकोनही बदलत आहेत. फाटक्या चपला गुरुशर्ट व शबनम झोळी खांद्यावर टाकून फिरणारे कार्यकर्ते आता समाजातून दिसेनासे झाले आहेत.तो आता इतिहास आहे. एमएसडब्लू झालेले कार्पोरेट कार्यकर्ते आता आधुनिक व्यवस्थापनाचा यथायोग्य वापर करीत आहेत. हा बदल अपरिहार्य आहे. समाजाचे आपण काही देणे लागतो ही भावना तेव्हाही होती व आजही समाजात आहे. बोगस संस्था तेव्हाही होत्या आजही आहेत.काळाशी सुसंगत असे बदल संस्थांनी केले नाहीत तर त्या टिकणार नाहीत. संस्था चळवळी या सारख्या समूहघटकांमधे वर्चस्ववादाचे राजकारण अपरिहार्य असते. कारण ती मानवी प्रवृत्ती आहे. कुटुंब प्रमुख देखील कुटुंबावरील आपले वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न करतो. त्यातून कुंटुंबातल्या सदस्यांचे अवकाश कधी कधी स्तिमित होतात. मग त्यातून हळूहळू विभक्त कुटुंबव्यवस्था तयार होउ लागली. हे मानसिक अवकाश जपणे फार गरजेचेही असते. त्यावर अंजली जोशी यांचा लोकसत्ता मधे सायक्रोस्कोप लेखमालेत सुंदर लेख 2020 मधे लिहिले होते. त्याचे आता पुस्तक ही झाले आहे ते जरुर वाचा.कुटुंबसंस्था काय किंवा समाजसेवी संस्था काय शेवटी ती माणसांचीच बनलेली आहे.
तुम्हाला पिंजरा चित्रपट आठवतो का?"बोर्डावर तुनतुनं देउन न्हाई उभं केल तर नावाची चंद्रकला नव्हं" असे मास्तरांना आव्हान वजा धमकी देणारी तमाशा कलावंतीण साकार करणारी संध्या आणि “व्यक्ती मेली तरी चालेल पण समाजापुढील आदर्श जिवंत राहिले पाहिजेत” या महान तत्वावर श्रद्धा असलेल्या मास्तर ची भूमिका करणारे श्रीराम लागू या दोघांच्या संघर्षाची हृदयस्पर्शी कथा म्हणजे "पिंजरा".समाजासाठी आपले आयुष्य झोकून देउन काम करणारी माणसे असतात. त्यांना असे वाटत असते की आपली मूल्ये समाजाने स्वीकारली कि समाजाचा विकास होईल. त्यासाठी ते व्यक्तिगत आयुष्य, प्रतिष्ठा, सन्मान, ताकद पणाला लावतात. त्यात त्यांना समाधान मिळत असते.
लोक शब्द पाळत नाहीत तत्वनिष्ठ राजकारण आता राहिले नाही अशी ओरड आपण प्रत्येक काळाच्या टप्प्यात ऐकत आलो आहोत. शब्द आणि तत्व घटकाभर राजकारणापासून दूर करु. व्यक्ति म्हणून माणसाच्या आयुष्यात असलेले या गोष्टींचे स्थान विचाराता घेउ.
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले ही म्हण आपल्याला माहित आहे. पाउले वंदावी अशी माणसे फार कमी असतात. ओठात एक पोटात एक ही म्हण दांभिकता,स्वार्थ,लबाडी दर्शवण्यासाठी वापरतात. म्हणजे उक्ती आणी कृती यात फरक दिसला कि त्याला काळ्या यादीत टाकले जाते.आपण बोलतो एक करतो एक असे प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असत. भरपेट जेवल्यानंतर पोटावर हात फिरवत शहाण्याने जेवू नये असे म्हणणारे लोक आपण पहातो.भुकेपेक्षा चार घास कमी खावे हे तत्व त्यांना सांगायचे असते व मान्यही असते पण अन्नपदार्थावर ताव मारण्याचा मोहापासून ते स्वत:ला रोखू शकत नाहीत. स्वत:ला पटत नसलेल्या अनेक गोष्टी आपण तडजोड म्हणून करत असतो. कधी ज्या समाजात रहायचे असते त्यापासून तुटून पडू नये म्हणून, कधी कुटुंबाच्या सुखासाठी, कधी व्यावहारिक सोयी साठी. एक मन विचार करते तर दुसरे मन भावनेच्या आहारी जाते. अशा वेळी मेंदु सोयीस्कर निर्णय घेत असताना तो भावनेच्या आहारी बर्याचदा जातो. कधी संघर्षाची ताकद संपली असते. असहाय्य असतो. कधी अस्तित्वाची लढाई असते. लोक काय म्हणतील या पेक्षा अस्तित्व टिकवणे महत्वाचे असते. अस्तित्व ही जैविक प्रेरणा आहे ते टिकवण्यासाठी मेंदु काही निर्णय चक्क तुमच्या नकळत घेत असतो. एक प्रकारची प्रतिक्षिप्त क्रिया म्हणा ना! fight or flight रिस्पॊन्स मधे मेंदु असे निर्णय घेत असतो. पुढे हा प्रश्न Does free will really exists पर्यंत जाउ शकतो. समाजधुरीणांवर आपण आदर्शवादाचे आरोपण करत असतो. त्याच ओझ त्यांनाही होत असत.समाजाच्या नजरेतुन आपण उतरले जाउ हे भय. त्यांचा तुज आहे तुजपाशी मधला आचार्य होतो. वर आपण विचारांमधे होणार्या बदलामुळे कृतीतील बदल पाहिला. वाल्याचा वाल्मि्की हा बदल रामायणातल्या कथांमधे दिसतो. प्रत्यक्ष अवती भवती पण दिसतो.बदल हा निसर्गाचा नियम आहे.थोडक्यात उक्ती व कृती यातील फरक हा प्रत्येकवेळी दांभिक,लबाडी,स्वार्थ असा नसतो. त्यात सर्वायवल इन्सटिंक्ट असते. शिवाय व्यक्ती तितक्या प्रकृती आहेच. राजकाराणात ही याच समाजातल्या व्यक्ती आहेत.हे आपण विसरुन चालणार नाही.
ज्याचा त्याचा समाजवाद
गाभा:
प्रतिक्रिया
9 Feb 2025 - 11:39 am | कानडाऊ योगेशु
>>स्वत:चा विकास करताना सोबत समाजाचाही विकास व्हावा या दृष्टीने काही योगदान देता आले तर ते पाहणे.
मी स्वतः माझ्या बिगिरी च्या काळात अश्या एन.जी.ओ सोबत काम केले होते व सध्या जवळचा एक नातेवाईक सरकारी नोकरीत काम करतोय व त्याचा अश्या एन.जी.ओ शी संबंध येतो. इथे प्रकार एकदम उलटा आहे. समाजाचा विचार करताना स्वतःचा विकास कसा व्हावा ह्याला प्राथमिकता दिली जाते किंबहुना तसे होत नसेल तर मॅनेज होणार्या इतर एन.जी.ओ शी संपर्क केला जातो हे पाहिले आहे.
पुस्तकी तत्वे व मुल्ये ही पुस्तकातच ठिक असतात किंवा अश्या मुल्यांचा जाहीररित्या उदो उदो करणारेच वेळप्रसंगी ती मुल्ये/तत्वे सोयीस्कररित्या वाकवतात व आपले मातीचे पाय दाखवुन देतात.
लेख थोडा शब्दबंबाळ व त्यामुळे निबंधात्मक दुर्बोध झाला आहे. थोडे एडिटींग केले गेले असते व अनुभव टाकले असते तर जास्त वाचनीय झाला असता.
9 Feb 2025 - 3:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या विचारांशी सहमती आहे घाटपांडे साहेब.
-दिलीप बिरुटे
9 Feb 2025 - 8:16 pm | चौथा कोनाडा
हे दोन्ही परिच्छेद पटले,
लोकमान्य टिळकांची आठवण झाली. रष्ट्रिय पातळीवरचे राजकारण करण्यासाठी त्यांनी स्वतःत वेळोवेळी बदल केल्याचे वाचले होते हे आठवते.