बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण झालं त्यानंतर त्यांची त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येचे पडसाद राज्यभरात उमटले. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपींना अटक झाली नाही म्हणून गावकऱ्यांनी आणि कुटूंबाने आंदोलने केली. या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आल्याचं सांगितलं होतं. त्याचबरोबर या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं म्हटलं होतं. या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचे निकटनर्तीय असलेले वाल्मिक कराड यांचं नाव आलं, त्यांना राजकीय संरक्षण असल्याचा दावा देखील अनेक नेत्यांनी केला होता, त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप झाले, तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात जे दोषी असतील त्यांना फाशी द्या, असं म्हटलं होतं.
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 23 दिवस होत आहेत. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर वारंवार आरोप होत असलेले तसेच मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे.
घटनाक्रम:
6 डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता अशोक घुले, सुदर्शन घुले, प्रतिक घुले आणि इतर अनोळखी इसमानी आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्पात अनधिकृत प्रवेश केला आणि अधिकारी शिवाजी थोपटे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि चौघा विरोधात गुन्हा दाखल झाला.
9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला. सरपंचाचे भाऊ यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात सहा जणां विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
10 डिसेंबर रोजी यातील दोषी आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी तब्बल बारा तास अहमदपूर अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग चक्काजाम करण्यात आला. त्याच दिवशी या प्रकरणात जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांना अटक केली.
मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यस्थी नंतर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन मागे घेऊन सरपंच देशमुख यांच्या मृतदेहावर 24 तासानंतर अंत्यसंस्कार केले.
11 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेने प्रतिक घुले याला पुण्यातील रांजणगाव येथून अटक केली.
11 डिसेंबर रोजी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करत थेट वाल्मीक कराड यांच्यावर आरोप करत यांना दोषी ठरवले.
तर सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील देशमुख कुटुंबाची भेट घेतली यातील राक्षसी प्रवृत्तीचे लोक दहशत निर्माण करत असून कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली.
11 डिसेंबर रोजी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड अजित पवार गटाचे केज तालुका अध्यक्ष विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले याच्यावर केज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
12 डिसेंबर रोजी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेऊन या गुन्हेगारांचे जे कोणी आका असतील. त्यांच्यावर पहिल्यांदा कारवाईची मागणी केली.
13 डिसेंबर रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती.
तर त्याच 13 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला.
14 डिसेंबर रोजी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले.
14 डिसेंबर रोजी आरोपी विष्णू चाटे याची अजित पवार गटातून हकालपट्टी करण्यात आली.
या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळाले. बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके आणि नमिता मुंदडा यांनी यात न्यायाची मागणी केली.
18 डिसेंबर रोजी देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटे याला अटक करण्यात आली.
19 डिसेंबर रोजी सरपंच देशमुख यांचा शवविच्छेदनाचा अहवाल आला.. यात त्यांच्या अंगावर 56 जखमा आढळून आल्या.. आणि मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झालं.
21 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली झाली.. आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला.
21 डिसेंबर रोजी शरद पवार त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनी देशमुख कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.
तर 21 डिसेंबर रोजी नवनीत कावत यांची पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली.
24 डिसेंबर रोजी मसाजोग येथील आवादा एनर्जी पवनचक्की येथे झालेल्या मारहाण तसेच खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला.
28 डिसेंबर रोजी तीन आरोपींच्या अटकेच्या मागणीसह वाल्मीक कराड यांच्यावर या प्रकरणात गुन्हा नोंदवून अटक केली जावी.. या मागणीसाठी सर्वपक्षीयांचा मोर्चा काढण्यात आला.
31 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीसमोर शरण आला.
या प्रकरणी तपास योग्य तर्हेने पूर्ण व्हावा आणि संतोष देशमुख यांना आणि त्यांच्या परिवाराला न्याय मिळावा हि न्याय देवते चरणी प्रार्थना!
या विषयावर चर्चा न आढळल्याने हा धागा काढला आहे.
प्रतिक्रिया
1 Jan 2025 - 1:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आमदार धस यांनी सभागृहात जो वृत्तांत सांगितला तो हादरवणारा वाटला. बाकी गुंडगिरी, आर्थिक व्यवहार, राजकारण यावर तर कितीही चर्चा होत राहील. सरकारं कोणाचीही असू देत ही प्रवृत्ती सत्तेत सर्वांशी जमवून घेते. आणि कधीतरी एखाद्या प्रकरणाची चर्चा होते.
-दिलीप बिरुटे
1 Jan 2025 - 8:29 pm | चौथा कोनाडा
... .... ....
2 Jan 2025 - 7:42 am | मुक्त विहारि
मध्यंतरी, ताज्या घडामोडी, ह्या लेखांत अशा चर्चा होत होत्या.
पण, नंतर ते सदरच बंद करण्यात आले.
असो,
तर, तुमच्या ह्या धाग्या बद्दल...
जितके सरळ दिसते, तितके सरळ हे प्रकरण नाही. खोदकामात बरेच काही निघण्याची शक्यता आहे.
तूर्तास इतकेच...
6 Jan 2025 - 12:04 pm | वेडा बेडूक
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट आहे. राज्य सरकारने संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक म्हणजे SIT ची स्थापना केली आहे. या SIT मधून तीन अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. वाल्मिक कराड सोबत फोटो त्यांच्या अंगलट आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपी अटकेत आहेत. या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना शनिवारी पुण्यातून अटक करण्यात आली. वाल्मिक कराड या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप होतोय. त्याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. 31 डिसेंबरला तो सुद्धा पुण्यातच सीआयडीला शरण आला होता.
राज्य सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथक म्हणजे SIT मधील एपीआय महेश विघ्ने यांचा वाल्मिक कराड सोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो समोर आल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला. तपास निष्पक्षपणे होणार नाही, असा आक्षेप विरोधी पक्षाने घेतला. त्यामुळे एपीआय महेश विघ्ने, हवलादार मनोज वाघ आणि एका उपनिरीक्षकाला SIT मधून हटवण्यात आलं आहे. बीडची स्थानिक गुन्हे शाखा या हत्या प्रकरणाचा तपास करत आहे. आतापर्यंत त्यांनीच पाच आरोपींना अटक केली आहे. अजून एक मुख्य आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे.
6 Jan 2025 - 7:52 pm | रात्रीचे चांदणे
ह्याच्या आदिही फडणवीस आणि पवारांनी धनंजय मुंढे आणि आव्हाडांना पाठीशी घातलंय. ह्यावेळी लोकांचा रेटा आहे म्हणून कारवाईच नाटक तरी चालू आहे.