हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग ४ : परतीच्या प्रवासातील मंदिरे आणि कॅसिनो

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
30 Dec 2024 - 2:13 am

आधीचा भाग
हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ

आज भटकंतीचा चवथा दिवस . तीन दिवस होऊन गेले, अनेक किनारे पाहिले तरी अजून समुद्राच्या पाण्यात डुंबायचे बाकीच होते . आज ती इच्छा सुद्धा पूर्ण करून घेतली.

नाश्ता वगैरे आटोपला. किनारे पाहून झाले होते. यानंतर कुठल्याही किनाऱ्याला जायचे नव्हते . परत एकदा पाळोळेचा किनारा नजरेत भरून घेतला आणि हॉटेल सोडले . हॉटेल थोडं महागडं असलं तरी खूप चांगली सुविधा मिळाली . परत कधी येणं झालं तर येथेच उतरायला आवडेल .

आज काही मंदिरे पाहत पणजीला पोहचायचे होते . गाडीवाले जाण्या - येण्याचे दोन्ही बाजूचे अंतर मोजतात त्यामुळे येथून गाडी केली किंवा बाहेरून गाडी बोलावली तरी खर्च तेव्हडाच लागणार होता . पणजीला आमच्या ओळखीतली एक गाडी होती तीच बोलवायचे ठरले . गाडीवाल्याने सांगितले मला स्थानिक लोक हॉटेलवर येऊ देणार नाहीत, तुम्ही काणकोण बस स्थानकावर या, मी तेथे तुम्हाला भेटेन .
आम्हालाही स्थानिकांचा रोश ओढवून घ्यायचा नव्हता . रिसेप्शनला जाऊन काणकोण साठी गाडी बोलावली . चालकाशी त्यांचे फोनवर कोंकणी भाषेत चाडी,चाडी असे असे काही बोलणे सुरु होते . नंतर कळले की कोणकोणला चार्डि किंवा चौरी असेही म्हणतात. कण्व ऋषींच्या वास्तव्यामुळे या भागास 'कण्वपुरम' असे नाव पडले व कालांतराने त्याचा उच्चार कोणकोण असा झाल्याचे समजते .
दहा - पंधरा मिनिटात चार्डि बस स्थानकावर पोहचलो . ठरल्याप्रमाणे गाडीचे तीनशे रुपये चुकते केले . आमची पणजीहून निघालेली गाडी आमच्या आधीच येथे येऊन पोहचली होती . काणकोण रेल्वे स्टेशनच्या ईशान्येस असलेले श्री मल्लिकार्जुन मंदिर पाहण्यासाठी निघालो .
गावडोंगरी किंवा श्रीस्थळ येथील निसर्गसौंदर्याच्या सानिध्यात वसलेले हे महादेवाचे मंदिर आहे .

सभामंडपानंतर येणाऱ्या मंदिराच्या अंतराळात काष्ठशिल्प असलेले सहा सुंदर खांब आहेत . यावर रामायण , महाभारतातील प्रसंग अतिशय सुंदरतेने कोरले आहेत. अंतराळाच्या छतावरही सुंदर नक्षीकाम आहे . गाभाऱ्यात महादेवाची शिवपिंडी आहे . प्रवेशद्वाराला चांदीची चौकट असून त्यावर यक्ष , किन्नर आहेत .

अमृत मंथन काष्ठ शिल्प ?

(प्रचेतस माहिती सांगू शकतील. कृपया मदत करा )

मंदिर परिसरात अनेक देवालये आहेत .
हे काशी पुरुष मंदिर . यातही काष्ठ शिल्प असलेले सहा सुंदर खांब आहेत .

सुंदर प्रदक्षिणा मार्ग

काही रथ


मंदिर परिसर

एक विठ्ठल रुक्मिणी मंदिरही दिसले .

पणजीच्या दिशेने निघालो आणि लेकीने सुचवलेले एक ठिकाण आठवले ते म्हणजे ' Sadolxem Bridge'. चालकाला हे ठिकाण माहित नव्हते . गुगलचा नकाशा बघून आमची गाडी उलट दिशेने म्हणजेच पेंगिंगच्या दिशेने धावू लागली . (ओळखीतली गाडी ठरविल्याचा हा एक फायदा ) गुगलने थोडासा चकवा दिला पण वाटेत विचारणा केल्यावर लगेच ठिकाण सापडले . या भागात हा पूल 'ब्लु ब्रिज' म्हणून ओळखला जातो .
सदोलक्सम (उच्चार माहित नाही ) हे एक छोटेसे गाव. तळपोना नदीमुळे हे गाव दोन भागात विभागले गेले आणि या पुलामुळे ते परत जोडले गेले आहे . पोर्तुगीज वसाहती काळातील हा एक सुंदर वारसा आहे . राज्याच्या दक्षिण भागात प्रवेश करणे, व्यापार इ .सोयीसाठी पुलाची उभारणी केली गेली . पुलावरून छोट्या गाड्या जाऊ शकतात . पुलाच्या आजूबाजूने असणाऱ्या निसर्ग सौंदर्यामुळे फोटोग्राफी व निवांत फेरफटका मारण्यासाठी हा पूल सध्या लोकप्रिय होत आहे . निळा रंग बराचसा उडाला आहे तरी या पुलाची सुंदरता लपत नाही

तळपोना नदी

थोडे रेंगाळून निघालो पुढच्या ठिकाणाकडे . दोन तासांचा प्रवास करून आम्ही पोहचलो श्री शांता दुर्गा मंदिराजवळ. फोंडा बस स्थानकापासून सुमारे तीन किमी अंतरावरील हे मंदिर कवळे गावात आहे . मंदिर पूर्वाभिमुख असून प्राकाराच्या बाहेरच एक सुंदर तलाव आहे .

दोघांनी हाफ पॅन्ट घातल्याने मंदिर परिसरात प्रवेश तर मिळाला पण मुख्य मंदिरात जाऊ दिले नाही . परत बाहेर येऊन सोवळे नेसून (भाडे २ ० रुपये) आत यावे लागले

देवालयाच्या समोरच एक सुरेख उंच दीपमाळ आहे

गाभाऱ्यात शांतादुर्गेची मूर्ती सिंहासनावर अधिष्टित आहे . देवालयाच्या डावीकडील मंदिरात श्री नारायणाची पाषाणमूर्ती आहे . मंदिरात फोटो घेऊ देत नाहीत त्यामुळे आतील फोटो नाहीत .

येथून पुढे तासाभरात पोहचलो ते प्रियोळ येथील श्री मंगेश देवालयाला . फोंडा तालुक्यातील प्रियोळ गांव व आसपासचा परिसर मंगेशी नावाने ओळखला जातो . श्री शांता दुर्गा मंदिराप्रमाणे हे मंदिरही पूर्वाभिमुख असून येथेही एक सुंदर तलाव आहे .

देवालयाच्या समोर उंचच उंच सुंदर दीपमाळ दिसते . मंदिराच्या तिन्ही बाजूस अग्रशाळा आहेत .

देवालयाच्या गर्भगृहात श्री मंगेशाची मूर्ती आहे . (मंदिरात फोटो घेऊ देत नाहीत ) या मंदिरातही तोकडे कपडे घालण्यावर निर्बंध आहेत. आपण काळजी घ्यावी .
मंगेशी मंदिर पाहून संध्याकाळी पाचच्या दरम्यान आम्ही पणजीत दाखल झालो . येथे आजच्या मुक्कामासाठी गोवा पर्यटन मंडळाच्या 'पणजी रेसिडेन्सी ' मध्ये आमच्या रूम आरक्षित होत्या . आज जाण्या येण्याचे अंतर पकडून गाडीने एकूण सव्वा दोनशे किमी अंतर कापले होते . गाडीवाल्याने ४ ५ ० ० /- मागितले ते दिले व उद्या सकाळी दहाला ये असे सांगून त्याला मोकळे केले .
आज सकाळच्या नाश्त्यानंतर काहीच खाल्लेले नव्हते . आधी रूममध्ये थोडे खायला मागवले व नंतर तासभर आराम . उत्तर गोव्याला पूर्वी दोन वेळा ओझरती भेट दिली होती . त्यावेळेपासून गोव्यातील कॅसिनो एकदा तरी बघायचे असे मनात होते . मिपाकर टर्मिनेटर यांचा कॅसिनोंवरील कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ५ हा भाग वाचल्यापासून हि इच्छा प्रबळ झाली होती आणि आम्ही दोघींनी नाही म्हटले तरी दोन्ही मित्र ऐकणार नव्हतेच . कॅसिनो बघायचा हा उद्देश समोर ठेवूनच आजचे हॉटेल बुक केलेले होते . मांडवी नदीच्या किनारी अगदी रस्त्यालगत हे हॉटेल आहे यातील नदीच्या बाजूकडील AC Deluxe रूम मधून मांडवी नदीचा नजाराही दिसतो त्यामुळे याच रूम आम्ही घेतल्या होत्या . कपड्यांच्या बाबतीत पुरुषांना कॅसिनोत प्रवेश करण्यासाठी ड्रेस कोड असतो असे वाचले होते . जसे शॉर्ट्स , स्लिव्हलेस टी शर्ट , चप्पल घालून येण्यास बंदी आहे . महिलांना मात्र असा कोणताही नियम नाही . त्याप्रमाणे साडेसातला आम्ही बाहेर जाण्याची तयारी केली .
हॉटलच्या समोरचा रस्ता ओलांडला की लगेच सगळ्या कॅसिनोच्या तिकीट विक्री काउंटरची रांगच लागते .
कॅसिनो प्राईड , डेल्टीन रोयाल',  'डेल्टीन जॅक' अशी एक एक ठिकाणी चौकशी करीत पुढे जात होतो . कुठे दोन, कुठे अडीच कुठे तीन हजार असे वेगवेगळे दर व त्यानुसार सुविधाही वेगवेगळ्या . असे करत करत आम्ही बिग डॅडी पर्यंत पोहचलो . येथे तर अजून जास्त दर होते . तरुण वयोगटासाठी वेगळा दर वगैरे . आम्हाला लागू होईल असा तिकिटाचा दर ४ ५ ० ० /- इतका ऐकून परत पहिल्या ठिकाणापर्यंत चालत आलो . पण तिकीट काढायचे मन होईना . तिकिटांसाठी रांगेत जास्त गर्दी नव्हती आणि आजूबाजूलाही स्त्रिया अगदीच कमी होत्या.बिग डॅडीला तर स्त्री - पुरुषांची झुंबड उडाली होती आणि त्यांचे पेहराव वगैरेही खूपच सुंदर वाटत होते . त्या क्षणाला तरी आम्हाला बिग डॅडी शिवाय दुसरा पर्याय दिसला नाही . परत येऊन प्रिमिअम श्रेणीची चार तिकिटे घेतली . यात अमर्याद जेवण/पेयपान , सर्व मजल्यांवर/डेकवर प्रवेश इ . गोष्टी समाविष्ट होत्या .
किनाऱ्यापासून नदीतल्या तरंगत्या कॅसिनोपर्यंत एका छोट्या बोटीने आपल्याला नेले जाते .

आपला कॅसिनोत प्रवेश होतो .

तळमजल्यावर जुगाराची रांगेने खूप टेबल लागलेली होती . काही लोक ससराइतपणे खेळत होते , काही आमच्यासारखेच तेथील वातावरणात सरवण्यासाठी अंदाज घेत नुसतेच इकडून तिकडे फिरत होते . तेथली झगमगाट पाहून गांगरल्यासारखे झाले . तेथल्याच एका कॅश काउंटरवर आमची तिकिटे दाखवून आमच्या हिश्श्याच्या प्रत्येकी ५ ० ० रु . च्या दोन OTP चिप्स घेतल्या . मध्यभागी थोड्या थोड्या वेळाने पोल डान्सचा कार्यक्रम सुरु होता . आम्ही चिप्स खिशात ठेवून न खेळताच वरच्या मजल्यावर गेलो . येथेही खालच्या मजल्याप्रमाणे जुगाराची वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांची खूप टेबल्स होती . सराईतपणे पत्ते वाटले जात होते . येथेही अधून मधून पोल डान्स सुरु होता . चिप्स खिशात तशाच ठेवून वरच्या मजल्यावर गेलो . आता भूक लागली होती त्यामुळे येथे न थांबता अजून वरच्या मजल्यावरच्या उपहारगृहात गेलो . टेबल खुर्च्या मांडलेल्या होत्या . स्टेजवर बेली डान्स , इतर नाच गाणी व करमणुकीचे कार्यक्रम सुरु होते . आमच्या मनगटावर बांधलेली प्रिमिअम फीत पाहताच हवे ते व हवे तितके पेय मिळत होते . व्हेज, नॉनव्हेजचे बुफे डिनर काउंटर लागलेले होते .
करमणुकीचे कार्यक्रम बघता बघता बारा वाजून गेले . पेयांचे काउंटर बंद झाले . गर्दी ओसरायला लागली . या गडबडीत डेकवर जायचे आम्ही विसरलोच . प्रिमिअम तिकीटामुळे आम्हाला तेथे प्रवेश होता . डेकवर गेलो . येथेही खाण्यापिण्याची व्यवस्था होती . करमणुकीच्या कार्यक्रमाचे स्टेजही होते . पण आता बारा वाजून गेल्याने सर्व बंद झाले होते .

दोन चार फोटो काढले आणि तळमजल्यावर आलो . नशीब आजमावायचे होते . माझ्या चिप्सही नवऱ्याकडे दिल्या . कोणते गेम होते मला सांगता येणार नाही . चार चिप्सच्या आमच्याकडे आठ झाल्या पण थोड्याच वेळात सर्व संपल्या . त्यामानाने यांच्या मित्राचे नशीब चांगले होते . त्याने सहा हजारांच्या चिप्स मिळवल्या . मिळाल्या तेव्हड्या पुरे झाल्या असे म्हणून कॅश काउंटरला जाऊन रोख करून घेतल्या . रात्रीचा दीड वाजला. आम्ही छोट्या बोटीने किनाऱ्यावर पोहचलो . येथून पाच-सात मिनिटात चालत हॉटेलला पोहचलो.

आज सहलीचा पाचवा आणि शेवटचा दिवस . आज आम्हाला परतीच्या प्रवासासाठी करमळीहुन दुपारी अडीचची गाडी होती, तोपर्यंत अजून एकदोन पर्यटन स्थळे पाहता आली असती पण आम्ही टाळले . सकाळी आरामात उठलो . सर्व आवरून हॉटेलच्या उपाहारगृहात जाऊन फुकटच्या नाश्त्याचा आस्वाद घेतला . तोपर्यंत दहा वाजले .
रूम मधून दिसणारी मांडवी नदी आणि पूल

करमळीला जाण्यासाठी बोलावलेली आमची गाडी वेळेवर हजर झाली . आज काही भेटवस्तू , लहान मुलांचे कपडे वगैरे खरेदी करायची होती . गाडीवाल्याने आम्हाला मार्केटमध्ये आणून सोडले . येथील खरेदी आटोपल्यावर परत गाडीत येऊन बसलो . दोन्ही मित्रांची काहीतरी कुजबुज सुरु होती. थोडा अंदाज आला पण जेव्हा गाडी एका वाईन शॉप समोर थांबली तेव्हा अंदाज खरा होता हे जाणवले . दुकानात चौकशी केली असता परवाना घेतल्यास प्रत्येकी दोन बाटल्या बरोबर घेऊन जाता येईल असे समजले . प्रत्येकी वीस रुपये भरून चौघांचेही परवाने घेतले . दोन्ही मित्रांनी चार चार बाटल्या खरेदी केल्या .

परवान्याप्रमाणे रोड, रेल्वे , जल मार्गे दमनपर्यंत यांची वाहतूक करता येणार होती . परवान्यावर काय खरडले तेही नीट वाचता येत नाही . नियम निश्चित काय असतील याची कल्पना नाही . स्टेशनवर सामानाची तपासणी होते . सापडल्यास या वस्तू तेथेच सोडाव्या लागतात असेही काही जण सांगतात . स्टेशनला पोहचलो . गाडीवाल्याचा अर्धा दिवस गेला होता . त्याने बाराशे रुपये मागितले ते दिले आणि त्याचे आभार मानून निरोप घेतला . फलाटावर आलो .

गाडी लागलेलीच होती . सामानाची कुठलीही तपासणी झाली नाही. गाडी वेळेवर निघाली आणि रात्री अकराला आम्ही पनवेलला उतरलो .
थोडासा खर्चाचा तपशील
१ . जातांना रेल्वे विस्टा डोम व येतांना २ AC प्रवास - 4500 /- प्रत्येकी
२ . हॉटेल मुक्काम खर्च (चार मुक्काम ) - 12600/- प्रत्येकी
३ . स्थानिक भटकंतीसाठी चारचाकी , दुचाकी - 2700/- प्रत्येकी
३ . कायाकिंग व बोटिंग - 1200/- प्रत्येकी
४. जेवणखर्च,पेयपान - 3500/- प्रत्येकी
५ . कॅसिनो - 4500/- प्रत्येकी
एकूण खर्च - 29000/- प्रत्येकी

रेल्वेचा विस्टाडोम प्रवास , रस्त्याने चारचाकी व दुचाकीने केलेली रोमांचक भटकंती , जलमार्गे समुद्रात फेरफटका, किल्ला , किनारे , मंदिरे , कयाकिंग, कॅसिनो अशी विविधरंगी सफर हे या सहलीचे वैशिष्ठ .

समाप्त

प्रतिक्रिया

नेमकं आणि चांगलं वर्णन. फोटो सुरेखच.

अथांग आकाश's picture

30 Dec 2024 - 8:31 am | अथांग आकाश

छान झाली मालिका!

मुक्त विहारि's picture

30 Dec 2024 - 8:48 am | मुक्त विहारि

सगळे भाग मस्त...

प्रचेतस's picture

30 Dec 2024 - 9:46 am | प्रचेतस

मस्त झाली मालिका. गोव्याचे नुकतेच किनारे न पाहता तुम्ही गोव्याची विविधांगे पाहिली हे खूपच आवडले. गोव्यातील हल्लीची मंदिरेदेखील प्रचंड मोठी आणि खास कोंकणी-गोवन शैली असलेली. मल्लिकार्जुन मंदिराचा काष्ठमंडप सुंदर आहे. कोरीव काम खूप बारीक असल्याने समुद्रमंथन शिल्प नीट दिसत नाही मात्र डावीकडे मत्स्य, वराह अवतार तर कमळावर उभी असलेली लक्ष्मी सहज ओळखता येतेय तर डावीकडे वामन अवतार स्पष्ट दिसतोय. त्याचे मस्तक मात्र निएंडरथल मानवासारखे लांबूळके दिसतेय :)
कॅसिनोचे वर्णदेखील आवडले व तिथे जाण्यास प्रवृत्त करणारे आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

30 Dec 2024 - 10:09 am | चंद्रसूर्यकुमार

मस्त लेखमाला, वर्णन आणि फोटो.

श्वेता२४'s picture

30 Dec 2024 - 11:11 am | श्वेता२४

सर्व बारीकसारीक तपशील दिल्यामुळे प्रवास नियोजनासाठी अतीशय उपयुक्त माहिती आहे. काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर विशेष आवडले.

मनो's picture

30 Dec 2024 - 11:19 am | मनो

Sadolxem => साडोळशी?

खुपच मस्त गोवा भटकंती केली आहे.

लेख.

दोन हजार तीन मधे पुण्यात बदली होऊन आलो तेव्हां बायरोड स्वताच्या चारचाकीने गेलो होतो. खंबाटकी,अबोली घाट अपले रौद्र रूप टिकवून होते. चार दिवस राहीलो होतो.
सर्व सामान्य पर्यटकांना सारखे एक दिवस क्रुझ वर,साठ रूपायाचे समोसे खाऊन धुंद झालो होतो. एक दिवस समुद्र किनारे,एक दिवस. मंदिरे. तेव्हां आता एव्हढी जाण नव्हती.

आता पुन्हा एकदा जाण्याचा विचार पक्का झालाय. घाटमाथेही माझ्या सारखेच मवाळ झाले आहेत. गाडी चालवायला तेव्हढा थरार राहीला नाही.

आपली सदर भटकंती वाचनखणात बंद केली आहे. ऐनवेळेस पुन्हा एकदा उजळणी करून त्यानुसार गोवा ट्रिप आयोजित करण्याचा विचार आहे.

लेख आवडला. विस्तृत माहिती साठी धन्यवाद.

गोरगावलेकर's picture

1 Jan 2025 - 9:55 am | गोरगावलेकर

@ कंजूस, अथांग आकाश,  मुक्त विहारि, प्रचेतस, चंद्रसूर्यकुमार,  श्वेता२४, मनो, Bhakti,  कर्नलतपस्वी यांचे प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार

गोरगावलेकर's picture

1 Jan 2025 - 9:55 am | गोरगावलेकर

कृपया धागा भटकंती विभागात हलवावा

मस्त झाली मालिका 👍

परवान्याप्रमाणे रोड, रेल्वे , जल मार्गे दमनपर्यंत यांची वाहतूक करता येणार होती . परवान्यावर काय खरडले तेही नीट वाचता येत नाही . नियम निश्चित काय असतील याची कल्पना नाही .

त्या परवान्याला काहीही अर्थ नसतो... प्रत्येक राज्याचे 'उत्पादन शुल्क' (Excise Duty) विषयक नियम, कायदे-कानुन वेगवेगळे असतात. महाराष्ट्रात मद्यावरचे उत्पादन शुल्क हे गोव्याच्या तुलनेत खुप जास्त असल्याने इथे मद्य महाग आहे. एक काळ असा होता की संपुर्ण देशात महाराष्ट्रातच मद्याचे भाव (किंमत) ही उत्पादन शुल्कामुळे सर्वाधीक होती, पण मागे राज्यात लागु केलेली दारुबंदी केरळ सरकारच्या महसुलाच्या दृष्टिने (आणि राज्यातल्या जनतेसाठीही) गैरसोयीची ठरल्याने ती मागे घेतली, पण आज केरळ मधले मद्याचे भाव (आपल्यासारखे वाईनशॉप्स नसुन 'बेव्हरेजेस' नामक घाणेरडी कम्यूनिस्ट पद्धती अस्तित्वात असुन) भारतात सगळ्यात जास्ती आहेत 😀

रेल्वेचा विस्टाडोम प्रवास , रस्त्याने चारचाकी व दुचाकीने केलेली रोमांचक भटकंती , जलमार्गे समुद्रात फेरफटका, किल्ला , किनारे , मंदिरे , कयाकिंग, कॅसिनो अशी विविधरंगी सफर हे या सहलीचे वैशिष्ठ

पूर्णतः सहमत, फारच सुरेख भटकंती !
मंदिरे विशेष आवडली.
स्प्रिंग सहलीसाठी शुभेच्छा ! :)