हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग १ : प्रवास

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
11 Dec 2024 - 4:26 pm

गेल्या दहा वर्षांपासून होणारी कौटुंबिक हिवाळी सहल यावेळी रद्द झाली. त्याला कारण मे महिन्यात ग्रुपने एका यात्रा कंपनीतर्फे केलेली हिमालयीन चारधाम यात्रा. कंपनीचे मूळचे पॅकेज स्वस्त दिसत असले तरी थोड्या चांगल्या रूम , ग्रुपसाठी स्वतंत्र वाहन असे करत किंमत वाढत गेली . त्याचबरोबर पिट्ठू , घोडा, पालखी, मधल्या वेळातले जेवण यावर बराच खर्च झाल्याने सगळ्यांनी दुसरी मोठी सहल करण्याचे टाळले .
यात्रेसाठी आमच्या नावाचीही नोंदणी झाली होती पण मुंबईहून जळगांव जाणारी रेल्वे सोळा तास उशिराने सुटणार असल्याने आम्हाला जळगावपासूनची कनेक्टेड गाडी मिळणे शक्य नव्हते . आमच्यासाठी दुसऱ्या गाडीने सामान घेऊन आणि तेही खचाखच भरलेल्या जनरल डब्यातून प्रवास करणे अशक्यच वाटत होते. तसेही गर्दीच्या वेळी धार्मिक यात्रेत एकाच वेळी चारही धाम करणे मनाला पटत नव्हते त्यामुळे यात्रेतून माघार घेण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि तो योग्यही होता असे यात्रा करून आलेल्या लोकांच्या अनुभवावरून कळले . कुठे सांगितल्यापेक्षा वेगळ्याच प्रकारच्या खोल्या किंवा हॉटेलच दुसरे असेही प्रकार झाले . तक्रार केल्यावर तुम्ही धार्मिक यात्रेला आला आहात, फिरायला नाही अशी उत्तरेही मिळाली . इतरही बराच त्रास झाला पण तो या लेखाचा विषय नाही त्यामुळे येथेच थांबते .
आम्हाला मात्र हिवाळी सहल चुकवायची नव्हती म्हणून पारिवारिक मित्र / मैत्रिणींसोबत सहा जणांची दक्षिण गोव्याची सहल ठरवली . ऐनवेळी दोघांचे येणे रद्द झाल्याने चौघेच उरलो . मोठ्या ग्रुपमध्ये सहल आखतांना खर्चाच्या बाबतीत सगळ्यांना सोईस्कर होईल त्याप्रमाणे विचार करावा लागतो . यावेळी तसा प्रश्न नसल्याने थोडी लक्झरी प्रकारातली सहल ठरवली .
सर्वात आधी रेल्वेचे जाण्या - येण्याचे आरक्षण पक्के केले . तिकीट जास्त असले तरी कोकणचे सौंदर्य अनुभवण्यासाठी जातांना तेजस एक्सप्रेसच्या विस्टाडोम डब्यातील सीट बुक केल्या . त्यानंतर कुठेकुठे फिरायचे त्याचा अंदाज घेत हॉटेल बुक केले .
सहलीचा दिवस उजाडला (अजून अंधारच होता!). आम्ही पनवेल रेल्वे स्टेशनवर हजर झालो .

आमचा विस्टाडोमचा हा पहिलाच प्रवास असणार होता . नेटवर गाडीच्या डब्यांची स्थिति पहिली आणि आमचा थोडासा हिरमोड झाला . गाडीला हल्ली दोन विस्टाडोम कोच लागतात आणि आमचा डबा अगदी इंजिनला लागून होता . त्यामुळे पुढच्या बाजूस प्रवास संपेपर्यंत फक्त इंजिनच दिसणार होते . शेवटचा डबा मिळाला असता तर मागच्या गॅलरीतून लांबपर्यंतचा व्ह्यू मिळणार होता . सातची गाडी पावणेआठला आली .
इंजिनला लागून असलेला आमचा डबा

आम्ही गाडीत चढलो . सुरुवातीलाच सामान ठेवण्यासाठी जागा दिली आहे . डब्याला वरच्या बाजूसही काचा असल्याने आतमध्ये त्याबाजूला सामान सेवण्यासाठी बाकडे नाहीत . बऱ्याच सीट रिकाम्या होत्या . आम्ही स्थानापन्न झालो .

थोड्याच वेळात चहा/कॉफी आली.

त्यानंतर नाश्ताही . सँडविच , कटलेट , कॉर्नफ्लेक्स आणि फ्रुट ज्यूस. नॉनव्हेजमध्ये सॅन्डविच ऐवजी ब्रेड ऑम्लेट .

गाडीचे सीट म्हणजे दोन आरामदायी खुर्च्या असलेला एक बाकडाच आहे . हा सम्पूर्ण बाकडा ९ ० अंशात खिडकीकडे किंवा १ ८ ० अंशात पाठीमागेही वळवता येतो . आम्हला एकामागे एक असे दोन बाकडे मिळाल्याने पाहिजे तसा फिरवून गप्पा मारता येत होत्या.

थोडा वेळ इंजिन जवळील बाल्कनीतही जाऊन आलो . हाच डबा परतीच्या प्रवासात शेवटचा होईल . पाठीमागच्या दृश्याऐवजी आम्हाला फक्त इंजिनचेच दर्शन नशिबात होते.

प्रवाशांना दिले जाणारे जेवण येथेच बाजूला असलेल्या जागेत ताटांमध्ये भरले जाते व सर्व खरकटेही येथेच जमा होते त्यामुळे थोडी दुर्गंधी येत होती . जास्त वेळ थांबवल्या गेले नाही .

चिपळूण , रत्नागिरी मागे पडले.

कुडाळच्या आसपास साधारण दुपारी दोन वाजता जेवण आले . डाळ, भात, पनीरची भाजी , बटाट्याची भाजी , चपाती, दही आणि शिरा . नॉनव्हेज मध्ये पनीरच्या ऐवजी चिकन होते . चव एकदम खूप चांगली नसली तरी जेवण बरे होते.

हिरवीगार झाडी , घाट , बोगदे , नद्या असा सुंदर नजारा दाखवत गाडी पुढे सरकत होती . डब्याच्या छताच्या तावदानांचे परावर्तन खिडकीच्या काचेत येत असल्याने चांगले फोटो मात्र घेता आले नाहीत . थोड्याच वेळात गाडी महाराष्ट्राची सीमा ओलांडून गोव्यात करमळी येथे दाखल झाली .

उत्तर गोव्याच्या भटकंतीसाठी आलेले बरेच पर्यटक येते उतरले . आम्हाला दक्षिण गोव्यात जायचे असल्याने आम्ही पुढच्या स्टेशनची वाट बघत बसलो .
अखेर संध्याकाळी पाच वाजता निर्धारित वेळेपेक्षा अर्धा तास उशिराने आम्ही मडगाव स्टेशनला दाखल झालो .
सर्व गाडी रिकामी झाली .

आम्हाला दक्षिण गोव्याच्या जवळजवळ अगदी शेवटच्या टोकाला जायचे असले तरी जातांना समुद्र किनारे पाहत जायचे होते व परतीच्या प्रवासात इतर ठिकाणे पाहावयाची होती . आता थोड्याच वेळात अंधार पडणार होता त्यामुळे आज जवळपासच मुक्काम करून सकाळी प्रवास करायचा असे आधीच ठरले होते. त्याप्रमाणे ७ -८ किमीवरील कोलवा बीचच्या जवळ Air BNB वरून ३ बेडरूम असलेला एक सुंदर बंगला रात्रीकरिता बुक केलेला होता . आमच्यातील दोघे येऊ शकले नाही त्यामुळे एक बेडरूमचा काहीच उपयोग नव्हता पण पूर्ण बांगलाच भाड्याने घेतल्याने एका रूमचा परतावा मिळणार नव्हता.
मडगांव स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी स्टॅन्ड आहे . तेथे बंगल्याचे लोकेशन दाखवून ५ ० ० रुपयात नॉन AC टॅक्सी केली. (AC चा दर ७ ० ० रुपये)

१ ५ -२ ० मिनिटात आम्ही आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलो . बंगला छानच होता .
बेडरूम

हॉल

सुसज्ज असे किचन आणि डायनिंग. चहा, कॉफीचे मशीन होते . पाहिजे तेव्हा बटन दाबले की चहा कॉफी मिळत होती .


सामान ठेवून थोडावेळ आराम केला आणि कोलवा बीचकडे जाण्यासाठी पायीच निघालो . छोटे छोटे पण सुंदर रस्ते . बीचच्या जवळ पोहचलो . मार्केट सुरु झाले . दुतर्फा दुकाने , हॉटेल्स आणि खरेदीसाठी बाहेर पडलेले पर्यटक दिसत होते . .
कोलवा बिच हा नारळाची झाडे व पांढरी मुलायम वाळू असलेला विस्तीर्ण समुद्र किनारा . मडगाव स्टेशनपासून जवळ आणि येथील वॉटर स्पोर्ट्स यामुळे हा किनारा दिवसा बराच गजबजलेला असतो . बिचवर पोहचलो तेव्हा अंधार झाला होता तरी बऱ्यापैकी गर्दी होती . थोडा फेरफटका मारला.

बीचवरच एखाद्या शॅकमध्ये जेवणार होतो पण पुढचे दोन दिवस बीचवरच्याच रिसॉर्ट मध्ये राहायचे होते आणि जेवल्यानंतर(खरं तर प्यायल्यानंतर) जास्त चालावे लागू नये म्हणून दोन्ही मित्रांनी मुक्कामाच्या ठिकाणापासून जवळच्या एखाद्या हॉटेलमध्ये जेवायचा निर्णय घेतला . उद्याच्या भटकंतीकरिता बंगल्याच्या मॅनेजरने एक फोन नंबर दिला होता त्यावर फोन करून गाडी बुक केली व जेवण आटोपून रात्री साडेनऊ दहाला रूमवर परत आलो .

क्रमश :

हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग २ : काही सागरी किनारे

प्रतिक्रिया

कंजूस's picture

11 Dec 2024 - 5:36 pm | कंजूस

छान सुरुवात.

कर्नलतपस्वी's picture

11 Dec 2024 - 6:49 pm | कर्नलतपस्वी

बाकी विस्टा डोम तिकीट ऐ बी बी चे बुकींग वर वाचकांच्या माहीती साठी लेखाच्या शेवटी जरूर लिहा.

चंद्रसूर्यकुमार's picture

11 Dec 2024 - 7:52 pm | चंद्रसूर्यकुमार

मस्त लेख. कधीतरी व्हिस्टाडोमने जायचे आहे. कधी योग येतो ते बघायचे.

कोलव्याहून थोड्या अंतरावर वारका बीच आहे. जमल्यास तिथेही जाऊन या. तिकडची वाळू अगदी अशक्य मऊ आहे. तशी मऊ वाळू मी तरी दुसरीकडे कुठेच बघितलेली नाही. मी फ्लॅट फूटेड असल्याने थोडेसे काही असले तरी ते पायाच्या तळव्यांना टोचते. तसा काहीही त्रास वारकाला झाला नाही.

गोव्याच्या थेट दक्षिणेला म्हणजे अगोंडाला राहणार असाल तर समुद्रकिनार्‍याला समांतर रस्त्याचे फोटो येतीलच याची खात्री आहे. अगदी दृष्ट लागावी तसा एखाद्या चित्रात असतो तसा देखणा रस्ता आहे तो.

(शरीराने कुठेही असला तरी मनाने गोव्यातच राहणारा गोवाभक्त) चंसूकु

Bhakti's picture

11 Dec 2024 - 8:28 pm | Bhakti

मस्तच..

चौथा कोनाडा's picture

11 Dec 2024 - 10:37 pm | चौथा कोनाडा

व्वा ... मस्त .....
व्हिस्टाडोम अनुभव आवडला.

तुमच्या भटकंती धाग्याचे आम्ही अ‍ॅडिक्ट होत चाललो आहोत... फोटो आणी वर्णन दोन्ही सही असते..

|| पुभाप्र ||

वाह.. पुढचा भाग अगोंद, पाटणे की पाळोळे याची उत्सुकता.

प्रचेतस's picture

12 Dec 2024 - 5:42 am | प्रचेतस

एकदम रिफ्रेशिंग लेख. गोवा अत्यंत आवडीचं.

गोरगावलेकर's picture

12 Dec 2024 - 8:22 am | गोरगावलेकर

@कंजूस, कर्नलतपस्वी, चंद्रसूर्यकुमार, Bhakti, चौथा कोनाडा, गवि, प्रचेतस.
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार .

गोरगावलेकर's picture

12 Dec 2024 - 8:23 am | गोरगावलेकर

संपादकांना विनंती की लेख भटकंती विभागात हलवावा .

त्यामुळेच लेखाच्या शेवटी पुढच्या भागाची लिंक देणे शक्य झाले .

गोवा प्रवास वर्णन, एक कॅलिडोस्कोप प्रवास वर्णन असते. प्रत्येकाचे अनुभव वेगळे.

वामन देशमुख's picture

12 Dec 2024 - 10:40 am | वामन देशमुख

गोरगावलेकर,

तुमची प्रवासवर्णने, विशेषतः प्रवास-तयारी-वर्णने आवडतात. प्रवास-पर्यटन-देशाटन इ ची मलाही आवड आहे.

लिहीत रहा, आम्ही वाचत राहतो. पुभाप्र.

झकासराव's picture

12 Dec 2024 - 3:10 pm | झकासराव

छान सुरवात

Vista डोम कोच कुठे असणार ते बुक करताना कळत नाही का?
फसवणूक केल्यासारखे आहे
इंजिन बघणे म्हणजे.

कंजूस's picture

12 Dec 2024 - 3:35 pm | कंजूस

रेल्वेने विस्टाडोम डबे जोडायला सुरुवात केल्यावर त्याच्या प्रवासाचे बरेच विडिओ आले होते यूट्यूबवर. किती छान वगैरे. पण एकाने ' विस्टाडोमने प्रवास न करण्याची चार कारणे' असा विडिओ टाकल्यावर कळले की हे आपल्यासाठी नाही. आता तो विडिओ सापडत नाही.

विस्टाडोमचे तिकीट विमानाइतके किंवा कधी कधी त्याहून जास्त असते * (विमान योग्य वेळ आधी बुक केल्यास). अशा वेळी कोंकणाची रम्य दृश्ये बघता यावीत म्हणून ते बुक केले जाणार. त्यात जर असे इंजिनचे ढुंगण बघत प्रवास करावा लागला तर नक्कीच मूड ऑफ होणार. साईडच्या खिडकीतूनच बघायचे तर तुलनेत स्वस्त डबा घेणे बरे. सीट लहान असतील आणि गोल फिरत नसतील किंवा आडव्या होत नसतील पण प्रवास देखील तसा दिवसरात्र नाहीये. तिकिटात खूपच फरक आहे चेअर कार आणि विस्टाडोम असे आठवते. मागे एकदा दोनदा चेक केले होते.

* चुभूद्याघ्या

थंडीच्या दिवसांत ठीक आहे पण.....

ऊन तापले की तिरके आतमध्ये येणार तोंडावर. पडदे सोडा मग त्या काचांचा उपयोग शून्य.
* अर्धा पाऊण तास झाडी पाहिल्यावर प्रवासी आपल्या वयाप्रमाणे मोबल्यात गुंग होतात किंवा वाचन करतात किंवा स्लीपर डब्यांत बर्थ सीट्स एका बाजूच्या पाडून आळीपाळीने लोळतात तसे करता येत नाही. कायम झगझगीत उजेड नकोसा वाटतो. पहाटे लवकर निघालेले प्रवासी एक झोप काढायची.
* बॅगा जवळच ठेवता येत नाहीत. मग त्यातले डबे उघडून आणलेला खाऊ चरता येत नाही.
*एखादे दृष्य चांगले वाटले तर पटकन मोबाईलमध्ये फोटो काढता येत नाहीत. काच आडवी येते. काचा नंतर धुरकटही होतात.
* गाडी एखाद्या स्टेशनवर थांबल्यास फलाटावरचा एखादा पदार्थ खिडकीतून विकत घेता येत नाही.

बॅगा जवळच ठेवता येत नाहीत.

हा पण एक बुचकळ्यात टाकणारा प्रकार आहे. आपणच सामान तिथे ठेवायचे आणि आपणच आपले स्टेशन आले की नेमके आपले सामान उचलून चालते व्हायचे असे असते की कोणी मनुष्य तिथे बसून व्यवस्थापन, टोकन वगैरे बघत असतो?

एरवी मामला गडबडीचा आहे. चोरी वगैरे ही एक शक्यता आणि कोणीतरी एकसारख्या दिसणाऱ्या बॅगा उचलून चालू पडणे हा दुसरा धोका..

श्वेता२४'s picture

12 Dec 2024 - 5:44 pm | श्वेता२४

आम्ही मधुचंद्राकरीता गोव्याला गेलो होतो. त्यावेळी स्टेट बॅंकेच्या गेस्ट हाऊसला २००/- प्रति रात्री या दराने ४ दिवस मडगाव येथे राहिलो होतो. त्यावेळी १ दिवस दक्षिण गोव्याची बस टूर केली व नंतर १ दिवस बाईक ने पाळेलोम या सुंदर बीच ला भेट दिली. तुमच्या लेखाच्या निमित्ताने या आठवणी जाग्या झाल्या. आता पुन्हा एकदा जायचे आहे. तुमचा लेख कामी येईल.

गोरगावलेकर's picture

18 Dec 2024 - 11:00 pm | गोरगावलेकर

प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे तसेच सर्व वाचकांचे खूप खूप आभार

MipaPremiYogesh's picture

30 Dec 2024 - 1:15 am | MipaPremiYogesh

छान लिहिले आहे नेहेमीप्रमाणे..