यापूर्वीचा भाग
हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग १
काल रात्री छान झोप झाली . बंगल्यात गरम पाण्याची तसेच शॉवर वगैरेला चांगल्या दाबाने पाणी मिळण्याची सोय होती . (नळ उघडताच प्रेशर पंप सुरु होत असावा )
आजच्या कार्यक्रमाविषयी 'चाय पे चर्चा'
येथील डायनिंग टेबलचा उपयोग टेबल टेनिसचा खेळ खेळण्यासही उपयोगात आणता येत होता . थोडासा खेळण्याचा प्रयत्न करून पहिला .
नाश्त्यासाठी थोडा फेरफटका मारून यायचे ठरले . दोन्ही बाजुंनी झाडी, उतरत्या छपराची जुनी घरे , अंगणात फुलांचा बगीचा , कुठे एखादी छोटीशी विहीर अशा मस्त वातावरणात चालायला खूप छान वाटत होते .
साधारण तासाभराने परत आलो तोपर्यंत आमची भटकंतीसाठी ठरवलेली स्विफ्ट डिझायर गाडी येऊन उभीच होती . दहाला बंगला सोडून बाहेर पडलो .
थोड्याच वेळात कार्मोना समुद्रकिनारी पोहचलो. कार्मोना हे गोव्यातील सालसेट जिल्ह्यातील एक गांव. येथील किनारा कमी गजबजलेला , अतिशय शांत व स्वच्छ आहे . यालाच झालोर किंवा झालोर-कार्मोना बीच नावानेही ओळखले जाते . हलकी सोनेरी बारीक मुलायम वाळू , अतिशय स्वच्छ व निळसर उबदार पाणी हि येथील वैशिष्ट्य .
याच कारणांनी विदेशी पर्यटक इकडे आकर्षित होत असावेत. नोव्हेंबर पासून अनेक विदेशी पर्यटक दक्षिण गोव्याच्या किनारी असलेल्या हॉटेल्स किंवा घरांमध्येही वास्तव्यास येतात . नुकताच सिझन सुरु झाला असल्याने या किनारीही पर्यटक दाखल झालेले दिसले .समुद्र किनारी असलेल्या झोपडीसारख्या दिसणाऱ्या हॉटेल समोरील बेडवर किंवा वाळूत हे पर्यटक सूर्यस्नान घेत होते . बिकिनीतल्या काही गौर वर्णीय ललना ऊन अंगावर घेत मुलायम वाळूत किनाऱ्याने फेऱ्या मारतांना दिसत होत्या. किनाऱ्यावर पोहचण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था नसावी किंवा अन्य काही कारण असावे पण आमच्याशिवाय स्थानिक पर्यटक येथे दिसलेच नाहीत .
आम्हीही थोडेसे किनाऱ्यावर फिरून आलो .
काही काळासाठी तट रक्षकाची खुर्ची व छत्री बळकावली .
किनाऱ्यावर सूर्यस्नानासाठी असलेल्या खुर्चीवर बसून लिंबू सोडा घेतला .
बियरचे घोट आणि नेत्रसुख. चेहरे किती खुलले बघा .
अर्धा पाऊणतास थांबून अजून दक्षिणेकडे निघालो . रस्त्याने वऱका, कॅव्हेलोसिम, बेतूल अशी समुद्र किनारे असलेली अनेक ठिकाणे लागली पण आजच्या प्रवासाच्या काळात शक्य होईल इतकीच ठिकाणे बघायची असल्याने थेट 'काबो दी रामा' किल्ला गाठला . या किल्ल्याविषयी मी काय लिहू ? मिपा सदस्य टर्मीनेटर यांनी पूर्वीच या ठिकाणाची सुंदर ओळख करून दिलेली आहे .
येथे वाचू शकता
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ६
माझ्या काही फोटोंमधूनच किल्ला फिरून येऊया .
माहिती फलक
किल्ल्याच्या बाजूने पूर्वी खंदक होता . कठडे असलेल्या पुलावरून आपण प्रवेश द्वाराजवळ येतो
ग्रुपमधील कोणा एकाचे आधार कार्ड दाखवल्यावर, अ .क्र , प्रवेशाची वेळ वगैरेची रजिस्टर मध्ये नोंद केली जाते . आपला क्रमांक लक्षात ठेवायचा . जातांना बाहेर पडल्याची वेळ लिहिण्यास याची मदत होते .
जागोजागी पडलेल्या तोफा
बुरुजाकडे जाण्याचा मार्ग
बुरुज
बाजूच्या तटबंदीवरुन दिसणारा निसर्ग
चर्चची इमारत
चर्चच्या बाजूने खाली उतरत जाणारी पायऱ्यांची वाट आहे जी पेबल बीचवर जाते
अर्ध्या वाटेत
इतर सर्व किनाऱ्यांवर दिसणारी मुलायम वाळू येथे नाही . दगड गोटे असलेला हा सुंदर पेबल बीच . खडकांवर तोल सांभाळत चालतांना मजा येते .
थोडा वेळ येथील खडकांवरून सागराचे रूप नजरेत साठवून परत फिरलो . अ.क्र. सांगताच रजिस्टरमध्ये आमच्या परतीच्या वेळेची नोंद केल्या गेली . थोड्याच अंतरावर रस्त्यालगत असलेल्या एका हॉटेलला चालकाने गाडी थांबवली .आम्हालाही भूक लागलेलीच होती . जेवून पुढे निघालो . (अंदाजाप्रमाणेच चालकाला यथे जेवण फुकट होते ) बाजूलाच एका कड्यावर 'केप गोवा' म्हणून महागडे हॉटेल आहे . येथून समुद्र किनाऱ्याचे सुंदर दर्शन होते . चालकाने आम्हाला खर्चात न पाडता हॉटेलच्या बाजूलाच असलेल्या कड्यावर नेले . खूप सुंदर दृश्य होते .
थोडा वेळ येथे थांबून परत दक्षिणेस प्रवास सुरु केला . थोड्याच वेळात मुख्य रस्ता सोडून गाडी खडकाळ कच्च्या रस्त्याला लागली. जमिनीपासून कमी उंची असलेल्या गाड्या निश्चितच खडकांना आपटतील. साधारण दोन किमी अंतर पार करून आम्ही एका कड्यावर पोहचलो . सर्व गाड्या येथेच पार्क केल्या जातात . काही खाद्य पदार्थांची दुकानेही आहेत . येथून थोडे पुढे गेल्यावर किनाऱ्यावर उतरण्यासाठी पायऱ्या आहेत . हाच तो कोला बीच जेथे गोड्या पाण्याच्या नदीत कयाकिंग (kayaking) करता येते .
तिकिटाचे दर सध्या वाढलेले आहेत . आठशे रुपये प्रति होडी , दोघांकरिता . थोडी घासाघीस करून दोन होड्यांचे १ ४ ० ० /- रुपये दिले .
पाणी नदीसारखे दिसत असले तरी ते एखाद्या सरोवराचे पाणी येथपर्यंत वाहून येत असावे व ते थेट समुद्रात विलीन होत नसल्याने भरतीचे पाणी यात मिसळत नाही व हे पाणी गोडेच राहते.
सुरुवातीला वल्हे मारायला नीट जमत नव्हते . दोघांचा ताळमेळही जमत नव्हता . त्यामुळे होडी कधी डावीकडे तर कधी उजवीकडे जास्तच वळत होती . पण हळूहळू ताळमेळ जमला. पाणी अगदीच उथळ आहे . त्यामुळे पडलो तरी भीती नाही . दोन्ही किनाऱ्यावर ताड - माडाची सुंदर झाडे व त्यामधून स्वत : वल्हवत होडी चालवायची मजाच निराळी .
एक फेरा मारून आलो पण मन भरले नाही . परत एक फेरा मारला . थोडी गर्दी कमी झाली होती त्यामुळे होडीवालेही घाई करत नव्हते . आजचा हा एक वेगळाच अनुभव होता . कड्याच्या पायऱ्या चढतांना थोडी दमछाक झाली . वर आल्यावर लिंबूसोडा , शहाळ्याचे पाणी घेतले व पुढचा प्रवास सुरु केला. पाळोळेच्या साधारण पाच किमी आधी अगोंदा आले . येथील बीच खूप सुंदर आहे असे ऐकले होते पण आज आमच्याकडे वेळ नव्हता . सूर्यास्ताच्या आधी पाळोळे येथे मुक्कामाच्या ठिकाणी पोहचायचे होते . ठरल्याप्रमाणे साडे पाचला आम्ही "Marron Sea View' रिसॉर्टला पोहचलो .
गाडीचे आजचे भाडे ऐंशी किमी साठी २ ६ ० ० /- ठरले होते पण हे लोक परतीचेही अंतर मोजतात त्यामुळे २ ५ किमी जास्त भरले . त्यासाठी वेगळे ५ ० ० रुपये चुकते करून गाडी सोडली . स्वागत कक्षात आवश्यक त्या नोंदी करून रूमवर आलो .
आम्ही सी व्ह्यू कॉटेज निवडल्या होत्या . समुद्राच्या बाजूने खोलीला संपूर्ण काच होती . तेथील दरवाजा उघडून बाहेर आलो तर अगदी बिचवरच पोचल्याचा अनुभव आला .
सूर्य अस्ताला जात होता .
पर्यटक अगदी रूमच्या समोर बसून सूर्यास्ताची मजा अनुभवत होते .
मुलांचा खेळ रंगात आला होता . छोटा गोलकिपर तडफेने समोरून आलेले फूटबॉल चे आक्रमण परतवून लावत होता .
आम्ही कितीतरी वेळ तेथेच बसून सूर्यास्त व सुंदर किनारा न्याहाळत बसलो. त्यांनतर रूममध्ये येऊन थोडे ताजेतवाने झालो व थोड्या वेळात परत बाहेर आलो . अंधार पडायला सुरुवात झाली होती .
किनाऱ्यावर वाळूतच जेवणाचे टेबल मांडल्या गेले. कंदिलात पेटलेल्या मेणबत्या उजळू लागल्या . थोड्या वेळात संपूर्ण किनाराच दिव्यांच्या उजेडात झगमगू लागला .
पेले भरल्या गेले .
जेवणाचा खर्च खोलीच्या बिलात समाविष्ट नसल्याने कोठेही जाऊन जेवलो तर चालणार होते पण आता परत कुठे बाहेर पडायची इच्छा नव्हती . येथेच जेवलो आणि खूप वेळ गप्पा मारून रात्री अकराच्या दरम्यान झोपायला गेलो.
क्रमश :
हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ
प्रतिक्रिया
17 Dec 2024 - 4:03 am | गवि
अतिशय सुंदर परिसर आणि तुमचे वर्णन. फोटोंनी आणखीच मजा आली.
गोव्याचा हा भाग अतिशय परिचित आणि आवडता असल्याने हा लेख अधिकच आवडला.
तुम्ही वाहनासाठी खर्च केलेली रक्कम पाहता असे सुचवेन की गोव्यात बिनधास्त सेल्फ ड्राईव्ह कार घ्या. अतिशय स्वस्त पडते. तुम्ही जो खर्च एका दिवशी थोड्या अंतराच्या टॅक्सीसाठी करता त्यात पाच दिवसांची सेल्फ ड्राईव्ह कार मिळून जाते. ती आल्यापासून निघेपर्यंत सर्व दिवस चोवीस तास आपल्याच हाती असल्याने मनसोक्त कधीही फिरण्याचे स्वातंत्र्य राहते. साधारण नऊशे हजार रुपयांपासून प्रतिदिन या रेटने स्विफ्ट किंवा तत्सम कार सहज मिळतात. थोडी मोठी कार देखील घासाघीस करून बाराशे तेराशेत मिळते. कुठेही आणून देतात आणि घेऊन जातात. एअरपोर्ट बाहेर तर ऐनवेळी देखील मिळते.
:-))
याच वेळी त्यांच्या सोबतच्या स्त्रीवर्गाचे चेहरे देखील एका फोटोत दाखवायला हवे होते. डोळ्यांतील जळजळीत निखारे पाहायला मिळाले असते. ;-)
17 Dec 2024 - 6:13 am | प्रचेतस
गोवा म्हटलं की तुमचा उत्साह बीयरच्या फसफसलेल्या बाटल्यांसारखाच फसफसून वाहू लागतो.
17 Dec 2024 - 7:09 am | गवि
आला का हा प्रचु??? हं.. काय करणार. प्राक्तन आपले..
हं. तर मा प्रचेतस जी.. तुम्ही आणि साने गुरुजी माझे आदर्श आहात. "गोवा पोर्ट वाईन क्रमांक सात" या विषयावर आपल्याशी एकदा चर्चा करायची आहे. आपल्या प्रतिभासाधनेच्या वेळा सोडून कोणतीही वेळ सांगा. मी रोज येत जाईन. "प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे" असे स. त. कुडचेडकरांनी "केतकी पिवळी पडली"त म्हटलंच आहे.
17 Dec 2024 - 7:17 am | प्रचेतस
"धन्यवाद तुमच्या आदरभावासाठी! 'गोवा पोर्ट वाईन क्रमांक सात'या विषयावर चर्चा करण्यासाठी मला नक्की आनंद होईल. माझ्या प्रतिभासाधनेच्या वेळा जसे ठरतील, तसे सांगेन. तुमचा उत्साह प्रेरणादायी आहे, आणि स. त. कुडचेडकरांच्या विचारांशी तुमची नाळ जुळल्याचे जाणवते. योग्य वेळ ठरवून आपण ही चर्चा घडवूया."
17 Dec 2024 - 10:17 am | टर्मीनेटर
विषय आवडीचा असल्याने दोन प्रतिभावंतात घडणाऱ्या 'त्या' सांगोपांग चर्चेचे 'सार' सारांशलेखनातुन आमच्यासारख्या जिज्ञासु वाचकांपर्यंत पोचवण्याचेही मनावर घ्यावे अशी नम्र विनंती 😀
17 Dec 2024 - 11:53 am | प्रचेतस
त्या चर्चेत सहभागी होऊन आपणही काही ज्ञानकण त्यात शिंपडावेत अशी आपणास आग्रहाची विनंती.
17 Dec 2024 - 12:02 pm | टर्मीनेटर
चर्चा सहभागासाठीच्या आपल्या निमंत्रणाचा मी सहर्ष आणि कृतज्ञतापूर्वक स्वीकार करत आहे 🙏
17 Dec 2024 - 5:56 am | कंजूस
आता पुढची सहल इकडे करणार.
....
फोटो आणि थोडक्यात वर्णन ही शैली बरी आहे.
17 Dec 2024 - 6:11 am | प्रचेतस
सुरेख वर्णन.
काब द रामचा केप गोव्याच्या इथे असलेला बीच हा गोव्यातील अत्यंत सुंदर आणि अत्यंत स्वच्छ बीचेसपैकी एक आहे. मात्र इथे पाण्यात उतरणे अत्यंत धोकादायक आहे. मधेच खोल खड्डे आहेत. बाकी कोला आणि कार्मोना बीचवर कधी जाणे झाले नाही. पाळोलेला एकेकाळी गर्दी नसायची, आता मात्र कायम भरलेला असतो.
17 Dec 2024 - 8:04 am | मुक्त विहारि
गोवा हे आवडते ठिकाण.
17 Dec 2024 - 10:07 am | टर्मीनेटर
मस्त 👍 अत्ता दोन्ही भाग सलग वाचले.
आधीच्या भागावरच्या प्रतिसादात प्रचेतस बुवांनी म्हंटल्याप्रमाणे 'रिफ्रेशींग' मालिका होणार आहे. आधी निवडणुका, मग निकाल आणि त्यानंतर सत्तास्थापनेपर्यंतच्या चर्चांमूळे जो वैताग आला होता तो दुर करण्यासाठी आपले विषेश आभार!
पुढिल भागांच्या प्रतिक्षेत आहे....
17 Dec 2024 - 1:08 pm | अथांग आकाश
वाचतोय! पुभाप्र!!
17 Dec 2024 - 1:29 pm | कर्नलतपस्वी
भाग आवडला. पु भा प्र.
प्रचेतस, गवी, टर्मिनेटर जुगलबंदीची प्रतिक्षा.
17 Dec 2024 - 2:11 pm | चंद्रसूर्यकुमार
नेहमीप्रमाणे मस्त लेख आणि प्रवासवर्णन. दक्षिण गोव्यातील बरेचशा समुद्रकिनार्यांजवळ राहून झाले आहे. त्यामुळे आता पुढच्या ट्रीपला कुठचा समुद्रकिनारा निवडावा हा प्रश्नच होता. कार्मोना चांगला दिसतोय. तिथे जायला हवे.
गोव्यातील, विशेषतः दक्षिण गोव्यातील चॅपेल/चर्च बघायला छान वाटते. तिथल्या गावातील सुशेगाद वातावरणात एखादी चर्चची पांढरी इमारत अगदी देखणी दिसते. बेतालबातीम आणि आणखी दक्षिणेला जाताना माजोर्डाहून रस्ता उजवीकडे वळतो तिथेच एक असेच सुंदर चर्च आहे- बहुदा मदर ऑफ गॉड्स की असे काहीतरी त्या चर्चचे नाव आहे. ते बघायला नेहमी आवडते. वरील फोटोतील ते चर्च बघून माजोर्डामधील त्या चर्चचीच आठवण झाली. कधीतरी ख्रिसमसच्या आदल्या दिवशीपासून २ जानेवारी पर्यंत दक्षिण गोव्यात जायचे आहे. बघू कधी योग येतो ते. माजोर्डातील त्या चर्चवरून आठवले. त्या चर्चवरून पुढे गेल्यावर एक रेल्वे क्रॉसिंग आहे. त्याच्या आसपास एका दुकानात गोवन मिठाई बेबिंका मिळते. छान असतो तिथला बेबिंका. तो एक प्रकार मला फार आवडतो. काही दिवसांपूर्वी गोव्याहून मुद्दामून बेबिंका मागवला होता. बेबिंका आणि/किंवा डोडोलची चव घेतली का? दोन्ही पदार्थ मस्त असतात. आणि हो.. गोव्यातील काजू फेनी तर अगदीच मस्त असते.
(गोव्याविषयी अतोनात आकर्षण वाटणारा आणि बहुतेक मागच्या जन्मीचा गोवन) चंसूकु
17 Dec 2024 - 2:23 pm | मुक्त विहारि
मी एकदाच चव घेऊन बघीतली.
पण
आम्हाला आमची बियर किंवा व्हिस्कीच बरी वाटते. त्यातही LP आणि McDowell No.1 हे First Preference.
खिशात थोडे पैसे असले तर, ब्लॅक अँड व्हाईट...
आणि
खूपच ऐश करावीशी वाटली तर, Cardhu
जाऊ द्या.... दारु महत्त्वाची नसते तर सोबतीचे मित्र महत्वाचे असतात. टेबलावर पंगत बसली की प्रत्येकाचे ब्रँड वेगळे. एक दिवस बसू या.
17 Dec 2024 - 3:14 pm | चंद्रसूर्यकुमार
बापरे. इतकी नावेही मला माहित नाहीत. माझी उडी फक्त काजू फेनी आणि फार तर पोर्ट वाईन किंवा व्होडकापर्यंत आणि ते पण गोव्यामध्ये. गोव्याबाहेर नाही :)
जरूर. मी माझे आवडते पेय पिनाकोलाडा पिणार :)
17 Dec 2024 - 6:14 pm | मुक्त विहारि
डन...
17 Dec 2024 - 3:16 pm | गवि
कार धुण्यातून असे काय पैशे मिळणार की ब्लॅक अँड व्हाईटपेक्षा अधिक महाग दारु घेता येईल..?!
;-)
17 Dec 2024 - 3:23 pm | टर्मीनेटर
'कोट्याधीश' गवि
हॅट्स ऑफ 😀
17 Dec 2024 - 3:18 pm | टर्मीनेटर
ह्यावरून आठवले.... मुविकाका बरेच दिवसांत ( मला वाटतं कोविड पश्चात आपण एकत्र 'बसलो' नाही... कधी तुमची कोकणातली 'हळद' शेती आड आली तर कधी 'बांबू' शेती...
असो... आता जेव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा कळवा, मस्त मैफील रंगवू...
17 Dec 2024 - 4:21 pm | मुक्त विहारि
एक दिवस नक्कीच बसू या...
17 Dec 2024 - 3:20 pm | गवि
काहीही हं मुविकाका. एक प्रयोग म्हणून अशा ओल्या कट्ट्यावर आधी ठरलेल्या प्लॅनमध्ये फक्त एकच बदल : मद्य अजिबात नाही. (आणि वाटल्यास कट्टा ठिकाण बदलून विना बार) असे जाहीर करून पहा. किती मोत्ये गळतील एकेक करून. एक दोन लोकांचा कट्टा होईल सुद्धा कदाचित, पण काहीच विशेष फरक नसेल असे नाही. ;-))
17 Dec 2024 - 3:27 pm | प्रचेतस
पहिले तुम्ही गळाल असे वाटते :)
17 Dec 2024 - 3:29 pm | गवि
तुम्ही कट्ट्याला येणार म्हंटल्यावर मी तसाही रद्द पडणार. त्यासाठी मद्य नसण्याची गरज नै.
तरी .. प्रयोग करून पहा.
17 Dec 2024 - 3:30 pm | प्रचेतस
चला क्युबा अगोंदला विना मद्य कट्टा करू.
17 Dec 2024 - 3:34 pm | गवि
इतक्या सुंदर ठिकाणी जाताना अशी कंपनी सोबत न्यावी लागावी अशी अद्याप वेळ आली नाही. लोलयेच्या वेताळाच्या कृपेने. तिकडे जाऊन चपला वाहणार आहे.
17 Dec 2024 - 3:38 pm | प्रचेतस
वेताळाला चपला नै हो, वहाण अर्पण करतात.
बाकी तुम्ही विना मद्य कट्ट्याला सोयीस्करपणे बगल दिलीय हे जाणवले.
17 Dec 2024 - 3:41 pm | गवि
जो पॉइंट मी मांडतोय तोच तुम्ही प्रूव्ह करताय. धन्यवाद .
मित्र येत नाहीत फारसे. हेच तर म्हणतोय. :-D
17 Dec 2024 - 7:06 pm | कंजूस
विना मद्य कट्टा?
बुद्धिबळाची स्पर्धा ठेवा.
17 Dec 2024 - 4:05 pm | चंद्रसूर्यकुमार
अरे वा. क्युबा अगोंद तुमचेही आवडते ठिकाण आहे का? आम्ही उतरलो होतो क्युबापासून जवळच असलेल्या डनहिलमध्ये पण जेवण आणि नाश्ता वगैरे असायचा क्युबा आणि एच२ओ मध्ये. अगोंदचे क्युबा खूपच सुंदर आहे. त्यामुळे पुढच्या ट्रीपला पाटणेमध्येही क्युबामध्येच उतरलो पण ते अगोंदच्या क्युबाइतके चांगले नाही. थोडी निराशाच झाली तिथे.
अगोंदमध्ये चर्चच्या जवळ समुद्रकिनार्यावर ओम साई बीच हट्स या नावाचे हॉटेल बघितले होते. गोव्यासारख्या ठिकाणी, जिथे 'पिणे' हा बहुतेक लोकांचा एक मुख्य उद्देश असतो अशा ठिकाणी ओम साई हे सात्विक नाव थोडे वेगळेच वाटले. तिथे दारू देत असतील का? काय माहीत.
17 Dec 2024 - 6:55 pm | प्रचेतस
क्युबा अगोंद आवडते जरी असले तरी अजून तिथे राहिलो नाही. कधी योग येतो ते पाहू.
17 Dec 2024 - 4:05 pm | मुक्त विहारि
एक इस्पिक एक्का ह्यांच्या बरोबर.
एक स्पेशल २६
एक जॅक डॅनियल बरोबर
आणि
एक हेमांगी ताई ह्यांच्या बरोबर
एक संमिश्र कट्टा, वाशी येथे झाला होता.
कोविड नंतर कट्टा असा झाला नाही.
किंबहुना Whats App मुळे, इथे कुणी आजकाल तसे आमंत्रण पण देत नाही.
17 Dec 2024 - 4:35 pm | गवि
फरक आहे.
मुळात जे कट्टे अथवा मिपाकट्टे सुकेच ठरले होते ते अटेंड करणे आणि ते उत्तम संख्येच्या उपस्थितीने पार पडणे हे वेगळे.
जो असा कट्टा ठरला आहे ज्यात मित्र एकत्र येऊन अशीच जागा निवडत आहेत किंवा निवडली आहे की जी ओलीच आहे आणि मैफिल देखील ओलीच असणार आहे. अशा स्थितीत ऐनवेळी फक्त मद्य हा भाग रद्द असे जाहीर करून पाहा. तटस्थपणे प्रयोग करून पहा. सार्वजनिक जाहीर मिपाकट्ट्याबाबत नव्हे. ते तर अनेकदा उभ्या उभ्या भेळ मिसळ खाऊन देखील होतात.
17 Dec 2024 - 5:52 pm | मुक्त विहारि
कशेळी कट्टा===> मुंबई-ठा णे-कल्याण-नाशिक, इथल्या मिपाकरांसाठी
https://misalpav.com/node/30303#comment-form
हा कट्टा सुकाच ठरला होता आणि तसाच पार पडला.
17 Dec 2024 - 7:10 pm | गवि
आता फार कीस पाडत नाही. सुका कट्टा ठरला आणि सुकाच झाला असे ठीकच आहे हो.
मी एवढेच म्हणत होतो की मद्य हा महत्वाचा भाग नाही असे ऑलरेडी जे ओले कट्टे ठरतात त्यात नसते. ऑलरेडी ठरलेला ओल्या ग्रुपचा कट्टा ऐनवेळी फक्त मद्य हा भाग रद्द करून तसाच पार पडला असे होणे दुर्मिळ. अशक्य नाही.
पण असू दे. अटीतटीने काही सिद्ध करण्याचा उद्देश नाही.
ह. घ्या.
17 Dec 2024 - 10:02 pm | टर्मीनेटर
सहमत आहे! अशी जाहीर केलेली मैफिल ओली नसेल तर मी तरी तिथे हजेरी लावणार नाही.... जवळ्पासचे एखादे ठिकाण बघुन तिथे बसेन (Who cares?) 😀
17 Dec 2024 - 10:32 pm | गवि
काही कट्ट्यांना सर्वांना शक्य किंवा आवडत नसेल तर रात्री उशिरा, आधीच पोचून किंवा मागे थांबून किंवा कुठेतरी वेळ काढून कोपऱ्यात पटकन उपकट्टा ठेवला जातो किंवा मग मोठे व्यवस्थापन झाले तर कार्यकारी मंडळाचा नंतर खाजगीत "श्रम परिहार" ;-)
17 Dec 2024 - 10:59 pm | टर्मीनेटर
गंभीर आरोप आहे हा... हे असले काही वाचण्याआधी माझे डोळे का नाही फुटले???
जमत नसेल, किंवा आवडत नसेल तर येउच नये की अशा कट्यांना... फालतु की गर्दी से तो कम गर्दी कभीभी अच्छी 😀
17 Dec 2024 - 11:20 pm | टर्मीनेटर
गंमत केली हो.. पण असेही काही प्रकार झाले आहेत का पुर्वी?
18 Dec 2024 - 3:50 am | गवि
मिपाकट्टे बाजूला ठेवा. त्यात उद्देश वेगळा असतो. तिथे भेटणे हेच मुख्य. लोक देखील एकमेकांना प्रथमच भेटत असतात अनेकजण. काही लोक आधी भेटलेले असतात देखील पण शक्यतो प्लॅन हा कोरडा असतो.
इन जनरल म्हणत होतो. एकूण निरीक्षण असे की "तो" भाग महत्वाचा ठरतो जेव्हा आधी मुळात तसाच प्लॅन ठरतो आणि मग काही कारणाने तो भाग वजा करू जाल तर उत्साहात मोठा फरक पडू शकतो.
अर्थात निरीक्षणे आणि अनुभव वैयक्तिक पातळीवर बदलू शकतात. यात काही नियम नसतो. गमतीचा भाग होता. आणि त्यात काही चूक आहे असेही नव्हे. :-)
18 Dec 2024 - 2:30 pm | टर्मीनेटर
+१०००
पाच दिवसांपुर्वी निगडी येथे 'भेटणे हाच मुख्य उद्देश असलेला' एक 'अचानक' कट्टा घडुन आला. संध्याकाळी सात वाजेपर्यंत 'ओला-सुकाच' काय पण कुठे भेटायचे, कोण कोण येणार आहेत वगैरे गोष्टींचाही कोणाला थांगपत्ता नव्हता 😀
पण तरी निगडीच्या भव्य श्रीकृष्ण मंदीरात साडेसातच्या सुमारास पाच जणांच्या उपस्थितीने सुरु झालेल्या अचानक कट्ट्याचा सहा जणांच्या उपस्थितीत 'बाबा फाईन डाईन' नामक उपहारगृहात सुमारे साडे दहाच्या सुमारास समारोप झाला. प्रशांत शेठची पुणे ते अयोध्या सायकलवारी, प्रचेतस बुवांचे विविध विषयांवरचे महितीपुर्ण निरुपण, कविराज चांदणे संदीप ह्यांच्याकडुन त्यांच्या कवितांच्या जन्माच्या कथा असे उत्तमोत्तम परिसंवाद घडले, खुप मजा आली... पुढे झालेल्या प्रीती-भोजनास मात्र हे तीन दिग्गज मिपाकर थांबु शकले नाहीत ह्याची रुखरुख लागुन राहिली आहे!
बादवे... भरघोस मिशा असलेला श्रीकृष्ण ह्या मंदिरात (मुर्तीरुपात) मी पहिल्यांदाच पाहिला...
17 Dec 2024 - 11:05 pm | प्रशांत
बांडिस
18 Dec 2024 - 11:16 pm | गोरगावलेकर
आठवण ताजी झाली . कट्ट्यास जागा उपलब्ध करून देण्यात थोडासा सहभाग घेतल्याने माझे पती व मी कट्ट्यास निमित्तमात्र हजर राहिलो होतो.
17 Dec 2024 - 5:16 pm | श्वेता२४
तपशीलवार वर्णन वाचायला मजा येतेय. पु.भा.प्र.
18 Dec 2024 - 11:10 am | चंद्रसूर्यकुमार
कोणत्याही प्रकारची कला हा माझा प्रांत नाही. तरीही पाळोलेच्या समुद्रकिनार्यावर पूर्वी घेतलेले दोन फोटो इथे देत आहे.
18 Dec 2024 - 3:35 pm | कंजूस
सूर्यास्त आणि कोळ्यांची होडी हा फोटो आवडला आहे.
18 Dec 2024 - 6:00 pm | Bhakti
सुंदर फोटो.
18 Dec 2024 - 6:34 pm | मुक्त विहारि
विशेषतः होडी वाला...
18 Dec 2024 - 6:00 pm | Bhakti
खुपच सुंदर!
18 Dec 2024 - 11:04 pm | गोरगावलेकर
गोवा सगळ्यांच्याच आवडीचे ठिकाण दिसतेय . प्रतिसाद देणाऱ्या प्रत्येकाचे नांव लिहीत नाही. खूप जणांनी भरभरून प्रतिसाद दिला . लेखाच्या निमित्ताने मिसळपाव कट्ट्यांबद्दलही बरीच चांगली चर्चा वाचावयास मिळाली.
इतर सर्व वाचकांचेही धन्यवाद .
18 Dec 2024 - 11:05 pm | गोरगावलेकर
विंनंती न करताही संपादकांनी धागा भटकंती विभागात हलवला याबद्दल त्यांचेही
विशेष आभार. आता लेखाच्या शेवटी पुढच्या भागाची लिंक देणे शक्य होणार आहे .