दिवाळी अंक २०२४ - हॅप्पी दिवाळी

Bhakti's picture
Bhakti in दिवाळी अंक
31 Oct 2024 - 6:00 am

मनीषाला त्या खोलीतली दूरची खिडकी प्रकाशाने उजळलेली दिसली. आक्काने दिवाळीच्या पहाटे तिथे पणत्या लावल्या असतील, हे तिला समजले. आता उठून सडा-रांगोळी करावे, म्हणून लवकर उठावे लागेल, असा साहजिक विचार तिने केला.

सुमेधची प्रेमळ मिठी अगदीच घट्ट होती. तिने तरीही एकवार प्रेमाने त्याच्याकडे पाहिले आणि त्याचा हात दूर केला. लांबसडक मोकळ्या केसांचा अंबाडा बांधताना बांगड्यांची जरा किणकिण झाली. सुमेधला जाग आली. तिच्या सुबक हालचालींकडे लोळतच पाहत राहिला. ती उठून निघणार, तोच तिने तिचा हात धरला. "अग, थांब. काय घाई आहे?" तो म्हणाला.

"दिवाळी पहाट आहे नवरोबा. अभ्यंगस्नानाची तयारी नको करायला?" मनीषा मागे वळत त्याला म्हणाली.

आणि "हॅप्पी दिवाळी" म्हणत त्याच्या ओठावर हलकेसे चुंबन घेतले व लाडिक आवेगात बेडरूममधून पळून गेली.

"अग थांब, थांब, मलाही हॅप्पी दिवाली करायचं आहे तुला. अभ्यंगस्नानाची तयारी करायला मीपण येतो ना" सुमेध बोलत दारापाशी आला होता.

मनीषा स्वयंपाकघराच्या पायऱ्या चढत आक्कांकडे गेली. सुमेध-मनीषाच्या लग्नाला एकच महिना झाला होता. लग्नानंतर पहिली दिवाळी, म्हणून ती साजरी करायला गावाकडच्या घरी - वाड्यावर ते आले होते. घरी आईला ते आक्का म्हणत, वडिलांना दादा म्हणायचे. एवढेच दोघे होते, तरी आक्कांनी लाडू, करंज्या अनारसे, शंकरपाळे असे ठोक दिवाळी फराळ करून ठेवले होते. वयोमानाने चकल्या यंत्रातून करणे त्यांना जमत नसे. ते कसब नव्या सुनेकडून बघण्यासाठी दिवाळीच्या दिवशी करायच्या ठरवल्या होत्या.

आक्कांनी तुळशीपाशी, वाड्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी, अंगणात पणत्या लावल्या होत्या. मनीषाला सडा-रांगोळी करायला सांगितले. चहा घेऊन मनीषा बाहेर अंगणात निघाली. जाता जाता बेडरूममध्ये डोकावले. दारातूनच सडा टाकायच्या बादलीतल्या पाण्याचा थोडासा शिडकावा सुमेधकडे टाकला आणि पुटपुटली, "हॅप्पी दिवाली!" आणि लगेच अंगणाकडे गेली.

आता मात्र सुमेध पुरता जागा झाला. खोलीतले सर्व आवरून आक्काकडे आला.

"अरे, लवकर तोंड धुऊन चहा घे. मी उटणं, गरम पाणी काढलं आहे, मनीषा येईल आता रांगोळी काढून. आवर पाहू लवकर."
ब्रश करत करत तो अंगणाकडे गेला. शेणाने सारवलेल्या अंगणात इंद्रधनूच्या सप्तरंगांनी रांगोळी उठून दिसत होती.

"हं, गुलाबी रंग इथे कमी आहे, थांब, मी देतो" असं म्हणत त्याने गुलाबी रंगाची वाटी तिला देण्याचा बहाणा केला.

मनीषाने "रांगोळी पूर्ण झालीये" असे सांगितले. ती सगळे रंग आवरून लगबगीने आत निघणार, तोच ती हळूच मागे वळली आणि रंगाने माखलेली चार बोटे त्याच्या गालावर हळूच पुसली आणि पुटपुटली, "हॅप्पी दिवाळी"आणि निघून गेली.
"अगं मुली, थांब, मलापण हॅप्पी दिवाळी करू दे" आता मात्र मनीषाला हॅपी दिवाळी करायची संधी सुमेधला प्रकर्षाने पाहिजे होती.

अक्काने दिवाणखान्यात पाट मांडून सुबक रांगोळी काढली होती. बाजूला ओवाळायचे तबक, उटणे, ऊन ऊन सुगंधी तेल यांचा घमघमाट पसरला होता. "सुमेध, बस बघू पाटावर, दादांचं अभ्यंगस्नान उरकत आलंय, तुला तेल लावू या." आक्का म्हणाल्या.
सुमेध पाटावर बसला. आक्काने त्याला ओवाळून दोन बोटे तेल त्याच्या डोक्यावर, कानात लावली.
"मनीषा, तूसुद्धा सुमेधाला ओवाळून तेल-उटणं लाव आता." आक्काने फर्मान सोडले.
मनीषाने सुमेधला ओवाळत लाजत लाजत त्याच्या उघड्या शरीरावर अक्कासमोर तेल-उटणे लावायला सुरुवात केली.

"अगं बाई, दूध गॅसवर आहे" असे म्हणत त्या आत स्वयंपाकघरात गेल्या. आक्का तशा हुशार! मनीषा-सुमेधला मोकळीक मिळावी, म्हणून त्या आत गेल्या.

मनीषाचा अलवार स्पर्श मोरपिसाप्रमाणे, पावसाच्या पहिल्या सरींसारखा सुगंधी भासत होता. सुमेध या कोमल अनुभवाने आता गालातल्या गालात हसू लागला.

मनीषाच्या गालीही लाजेची लाली चढली होती. हा स्पर्शातला गुलाबी संवाद पुढे पूर्ण चढणार, तोच आवाज आला. "मनीषा, अग, ओवाळायचं तबक इकडे आण पाहू. दादांना अभ्यंगस्नानाच्या मध्ये ओवाळायचं आहे."

मनीषाने उटणे लावण्यासाठी सुमेधचा हात अलगद हातात घेतला. त्याला शेकहँड करत त्याला पुन्हा एकदा हॅप्पी दिवाळी म्हणाली आणि लगेचच तबक धरत आत गेली.

सुमेध पुन्हा हॅप्पी दिवाळी करायच्या संधीची वाट पाहू लागला.
दादांचे स्नान उरकले, तसा सुमेध न्हाणीघरात गेला. वाड्यातील जुन्या पद्धतीचे न्हाणीघर ते. एक मोठी खोलीच, वरती मोकळे आकाश, प्रचंड वाढलेल्या चाफ्याच्या फूलझाडाची फुले टपटप हळूच अधीमधी पडत, थंडगार वाऱ्याची झुळूक अंगाला शहारा आणत असे.

आक्कांनी मनीषाला अंघोळीच्या मध्ये त्याला ओवाळायला सांगितले. मनीषाने त्याला ओवाळले. हळूच म्हणाली, "हॅप्पी दिवाळी."

तबकाच्या दिव्यातल्या लखलखाटात तिचे शुभ्र हसू सुमेध पाहतच बसला.

"मनीषा, बस. तुला दोन बोटं तेल लावते आणि तू स्नान करून घे." आक्का म्हणाल्या.

मनीषाचे सर्व आवरेपर्यंत सुमेध दिवाणखान्यात फराळ करत होता. "अग आक्का, लाडू नेहमीप्रमाण बेस्ट झाले आहेत. पण चकल्या कुठे राहिल्या?" सुमेध विचारू लागला.

"हो अरे, करायच्या आहेत. मनीषाची मदत पाहिजे होती, म्हणून ठेवल्या मागे तशाच करायला. पीठ तिंबलं आहे. करतो आता लगेच गरमगरम. ती बघ, मनीषाही आली आवरून." आक्का स्वयंपाकघरातूनच बोलत होत्या.

"मीही मदत करतो. लहानपणी ताई आणि मी तुला चकल्या सोऱ्यामधून काढून द्यायचो. मी चकल्या सोऱ्यातून काढतो आणि मनीषा तळून घेईल." सुमेध म्हणाला.

आक्कांनी वाती वळायला घेतल्या आणि त्या देवघरासमोर बसल्या.

सुमेधने पितळी सोऱ्यामधून पटापट चकल्या काढल्या. मनीषा निगुतीने त्या तळत होती.

"आक्का, टेस्ट बघ, खुसखुशीत झाल्यात का?" सुमेध आक्काला चकली देत म्हणाला.

"वा! सुंदर खुसखुशीत झाल्या आहेत हो चकल्या! आणि लहानपणी आली दिवाळी, हॅप्पी दिवाळी, चकल्याची मेजवानी असं काहीही 'स'ला 'ट' लावत गुणगुणायचा, आता जरा दिवाळी पहाटेचा कवितांचा, गाण्यांचा कार्यक्रम होऊ दे की!"
आक्कांना आता गप्पांचा सूर गवसला होता.

"हो हो, गुणगुणतो की" सुमेध आनंदाने म्हणाला.

त्याने चकलीचा तुकडा मनीषाला भरवला आणि आयत्या आलेल्या संधीचा फायदा घेत गुणगुणू लागला.

तू निरागस चंद्रमा, तू सखी मधुशर्वरी
चांदणे माझ्या मनीचे पसरले क्षितिजावरी

काजळाचे बोट घे तू लावुनी गालावरी
मन्मनीचे भाव सारे उमलले चेहऱ्यावरी
पाहतो जेव्हा तुला मी गझल उमटे अंतरी
शब्द झाले सप्तरंगी झेप घेण्या अंबरी

तिच्या गालाचे अलवार चुंबन घेत म्हणाला, "हॅप्पी दिवाळी डियर मनीषा."

घडलेला प्रसंग पाहत आक्काला हसू आले, तर मनीषा अक्कांपुढे अवाक होत सुमेधकडे पाहत राहिली.

मनीषाला हॅप्पी दिवाळी म्हणायची संधी सुमेधने अखेर साधली होती.

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

31 Oct 2024 - 3:10 pm | पाषाणभेद

उत्तम लिहीले आहे, आवडली कथा.

श्वेता२४'s picture

31 Oct 2024 - 3:17 pm | श्वेता२४

कथा अतीशय आवडली. आमची पहिली दिवाळी आठवली :))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Nov 2024 - 10:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहिती प्लीज. ;)

-दिलीप बिरुटे

श्वेता२४'s picture

2 Nov 2024 - 6:54 pm | श्वेता२४

तपशीलवार म्हणाल तर.... आमचे लग्न झाले त्यावेळी नोकरीनिमित्त मी पुण्यात तर नवरा कोल्हापूरात... लग्नासाठी अगदी 3 आठवडे रजा काढल्यामुळे नंतर केवळ लागून सुट्ट्या आल्या तरच घरी जाणे व्हायचे. अगदी दोन दोन महिन्यानंतर भेट व्हायची. त्यामुळे पहिल्या दिवाळी आणि लग्न यादरम्यान केवळ दोन-तीनदाच भेटलो होतो. आणि अशातच दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरी चक्क सहा-सात दिवस राहण्याचा योग आला!!!! म्हणजे खरंच काय दिवाळी असेल याची कल्पना करा ;))) याहून अधिक 'तपशिलात' जायचे म्हटले तर अजून एक अठरा + कथाच व्हायची :D अशी कथा लिहिण्याचे ना माझ्या धाडस आहे, ना प्रतिभा!!! त्यामुळे माझे तपशील इथेच संपवते. ;D

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Nov 2024 - 10:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे वाह ! मस्त आठवणी...! प्रसिद्ध शायर वसीम बरेलवीचा शेर अर्ज है...

'कोई इशारा दिलासा न कोई व'अदा मगर
जब आई शाम तिरा इंतिज़ार करने लगे'

-दिलीप बिरुटे

धर्मराजमुटके's picture

9 Nov 2024 - 8:33 pm | धर्मराजमुटके

“The devil is in the details” ही म्हण तुम्ही ऐकली असेलच.

कर्नलतपस्वी's picture

31 Oct 2024 - 3:56 pm | कर्नलतपस्वी

म्हणजे,

नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी
मनी नवीन भावना नवेच स्वप्न लोचनी
-गदिमा

नंतर काही वर्षांनी,

तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामीनी
-शांताबाई

कथा चांगली फुलवली आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

31 Oct 2024 - 5:05 pm | अमरेंद्र बाहुबली

छान कथा.

कंजूस's picture

31 Oct 2024 - 5:29 pm | कंजूस

असो.

चालायचंच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Nov 2024 - 10:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हॅपी दीपावलीच्या काही कडू आठवणी आहेत का ? ;)

-दिलीप बिरुटे

तसं नसेल. बहुधा ते "नावाला" जागण्याचा प्रयत्न करताहेत :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Nov 2024 - 10:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हॅपी दीपावली. छान लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

गोरगावलेकर's picture

6 Nov 2024 - 12:50 pm | गोरगावलेकर

छान लिहिले आहे

सविता००१'s picture

7 Nov 2024 - 8:55 pm | सविता००१

मस्त कथा. सगळ्यांना (माझ्यासह) आपापली पहिली दिवाळी नक्की आठवली असणार

टर्मीनेटर's picture

8 Nov 2024 - 7:55 pm | टर्मीनेटर

चला... अखेर सुमेधचं घोडं गंगेत न्हायलं म्हणायचं 😀
कथा आवडली आहे!

वामन देशमुख's picture

10 Nov 2024 - 1:51 pm | वामन देशमुख

अलवार भावनांचे अलवार कथन आवडले.

श्रीगणेशा's picture

30 Nov 2024 - 1:53 pm | श्रीगणेशा

आवडली कथा. हलकीफुलकी.

मुक्त विहारि's picture

9 Dec 2024 - 1:08 pm | मुक्त विहारि

एकदम गुलाबी...

चौथा कोनाडा's picture

14 Dec 2024 - 9:15 pm | चौथा कोनाडा

रोमॅणण्टिक दिवाळी, सुंदर दिवाळी, हॅप्पी दिवाळी ..

हळुवार गुलाबी वर्णन आणि लेखन शैली आवडली ..

व्वा, भक्ति व्वा !