उबेर / ओला चा संभाव्य फ्रॉड

kvponkshe's picture
kvponkshe in काथ्याकूट
8 Dec 2024 - 1:39 pm
गाभा: 

सावध असा !

काल नांदेड सिटी ते माझे घर [मुकुंदनगर] अशी उबर रिक्षा केली होती. ठरल्या लोकेशन ला रिक्षा आली. ड्रायवर चांगलाच आडदांड होता. otp त्याला दिल्यावर तो निघेल अशी अपेक्षा होती. तरी तो मिनिटभर थांबलेला होता, आणि मोबाईल मध्ये तो काहीतरी करत होता. मग तो निघाला. म्हणाला "उबेर परवडत नाही, आम्हाला खूप कमी पैसे मिळतात:" मी काहीच बोललो नाही.
आता नांदेड सिटी ते मुकुंदनगर हा सरळ रस्ता आहे, निदान दांडेकर पुलापर्यंत तरी, पण त्याने रिक्षा धायरी ब्रिज वरन न नेता डावीकडे खाली प्रयेजा कडे रस्ता जातो तिथे नेली. आतापर्यंत मोबाईल मध्ये चॅट करत असेलेला मी मग आता अलर्ट झालो. त्याचा मॅप्स वारजे कडे जाणाऱ्या रस्त्यावर रस्ता सुचवत होते. मग मी त्याला गोड बोलून पुन्हा सिहंगड रस्त्याला रिक्षा आणायला लावली आणि स्वतः रस्ता दाखवू लागलो. "उबेर परवडत नाही, कमी पैसे मिळतात" , "अहो सर तुम्ही कुठले लोकेशन टाकलाय" अशी त्याची किरकिर चालूच होती. ड्रायवर मुळातच आडदांड होता, आणि हा लोकेशन ट्रॅप पूर्ण झाली की कटकट करणार, मनगटशाही करणार हे मला जाणवू लागले.
तितक्यात मला क्लायंटचे दोन फोन आले, मग त्याचा वापर करून मी पोलीस खात्याशी संबंधित आहे हे मुद्दाम त्याला जाणवेल असे बोललो. माझा संबंध पोलीस, कायदा याच्याशी आहे हे जाणवल्यावर तो जरा गडबडला आणि त्याची किरकिर कमी झाली. मग मीच त्याला म्हणालो, "दादा तुमचे उबेरचे जितके पैसे होतील ते मी देईन , काळजी करू नका".
माझ्या फोन वरच्या बोलण्याचा परिणाम चांगलाच झालेला होता. ड्रॉप लोकेशन ला त्याला झालेले पैसे ट्रान्स्फर केले , त्याने चुपचाप घेतले आणि मी घरी आलो.
आता माझे काही अंदाज :
१. उबेर , Ola कॅब चालकांना जे कमिशन देते त्यावर ते समाधानी नसतात. म्हणून उबेर चे लोकेशन प्रवाशाने नीट टाकले असले तरी गुगल मॅप्स वर ते चुकीचे लोकेशन टाकून तुमची रिक्षा किंवा कार त्या रस्त्यावर न्यायची आणि "तुम्हीच चुकीचे लोकेशन टाकले म्हणून नंतर कटकट करायची आणि जास्त पैसे मागायचे असा नवीन फ्रॉड आहे अशी मला शंका आहे.
२. म्हणून तुम्ही उबेर , ओला केली की प्रवास सुरु झाला की सदा सावध असा. आपण प्रवास सुरु झाला की मोबाईल मध्ये किंवा गप्पात गुंततो. हे टाळाच टाळा.
३. शिवाय त्याच्या मोबाईल मध्ये दिसणारे ड्रॉप लोकेशन आणि आपण सिलेक्ट केलेले ड्रॉप लोकेशन बरोबर आहे ना बघा. प्रवासात मॅप वर दाखवत असलेला रस्त्यानेच आपण चाललो आहे ना हे सतत बघत असा.
४. चालक आला की एकंदर व्यक्तिमत्वाचा थोडा मनात आढावा घ्या, हा पुढे त्रासदायक ठरेल का , जर हो तर किती याचा आढावा घ्या.
५. साधारण प्रतिकार करू शकणार नाहीत असे , पांढरपेशे असे लोक ही लोक एका नजरेत ओळखतात, आणि अशा लोकांचीच ते असले खेळ खेळतात.
६. प्रवासात तुमच्या खाजगी, आर्थिक आणि वैयक्तिक गोष्टी वर चर्चा टाळाच टाळा.
७. चालकांबरोबर शारीरिक हाणामारीत उतरू नका त्यांना शिव्या देऊ नका. बहुतेक केसेस मध्ये ते तुम्हाला सहज लोळवतील आणि शिव्यांत हरवतील. कदाचित इतर चालक त्यांची बाजू घेतील आणि तुम्ही एकटेच असाल.
७. उबेर ओला अँप मध्ये एक आपत्कालीन बटन असते, त्याचा वापर करा.
७. एवढे होऊनही जर तुम्ही अशा वादात अडकलात तर सरळ पोलिस स्टेशन ला गाडी न्या.
टीप : मी आजवर हजारदा ओला उबेर ने प्रवास केलाय आणि एखाद दुसरा अपवाद वगळता, माझा अनुभव चांगलाच आहे.

माझा वरील अनुभव असा आहे म्हणून सरसकट सगळे उबेर ओला चालक असे असतात असा माझा आरोप नाही. पण इतरांनी सावध असावे म्हणून हा प्रपंच !

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

8 Dec 2024 - 5:54 pm | कानडाऊ योगेशु

ओला पोस्टपेड ही अशीच डोकेदुखी देणारी सेवा आहे. बरेच ड्रायवर आधी एक्सेप्ट करुन नंतर कॅन्सल करतात. बेंगलोरमध्ये असताना विमानतळावर जायला आवश्यक ते वेळेचे मार्जिन धरुन ओला बुक केली होती.मी तोपर्यंत ओला पोस्टपेडच वापरत होतो. काही केल्या गाडी येईचना. कॅब चे लोकेशन हलत नव्हते. फोन केल्यावर त्याने कळवले कि पोस्ट पेड आहे म्हणुन येत नाही. तुम्हीच कॅन्सल करा वगैरे. शेवटी कॅन्सल करताना ड्रायवर रिफ्युज्ड असा पर्याय वापरुन कॅन्सल केली. पण हा अनुभव बर्यच जणांना आणि मलाही बर्याच ठिकाणी आला आहे. एकतर साला ओलाचे कस्टमर केअर सेंटर पण नाहीये तक्रार करावी म्हटले तर. आधी होते आता सगळे ओटोमेटेड पर्याय वापरुनच तक्रार करण्याचा पर्याय आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

8 Dec 2024 - 10:05 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

ओला टिपिकल मारवाडी/लाला छाप कंपनी आहे. ड्रायव्हरना समाधानकारक पैसे मिळत नाहीत अशी तक्रार असते. उबेर त्यातल्या त्यात बरे आहे. पण पुण्यात अनेक मराठी ड्राय्व्हर्स्/बेंगळूरूमध्ये कन्नड ड्राय्व्हर्स आळशी असतात. अन्यथा ८/९ वर्षे उबेरमध्ये काम करणारे व बर्यापैकी पैसे मिळणारे ड्रायव्हर्स बघितले आहेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Dec 2024 - 11:13 pm | अमरेंद्र बाहुबली

ओला चांगली कंपनी आहे. योग्य कळा दाबल्या की थेट कंपनीला फोन लागतो, मी फोन कसा लावायचा ते लिहून ठेवले आहे, एकदा एका अडाणी ड्रायव्हरने यूपीआय न समजणाऱ्या, माझ्याशी प्रचंड वाद घालायला सुरुवात केली होती. मी ओला इमर्जन्सीला संपर्क केला नी त्यांनी अतिउत्तम मदत करुन मला सोडवले व माफीही मागितली. उबेर तर सगळ्यात भंगार आहे. सर्व गुंडपुंड ड्रायव्हर उबेर मध्ये आहेत, एकदा तर मला मारायला ड्रायव्हरने मुले बोलावली होती, तेव्हापासून उबेर वापरणे बंद केले.
वरील केस मधे पोंक्षेंचे काही चुकले. त्यानी उतरून थेट सांगायला हवे होते की ठिकाय मी दुसरी रिक्षा करतो. लोकेशन बदलल्यावर उबेरला संपर्क करायचा होता( उबेरला पर्याय आहे की नाही माहित नाही.) हे लोक आपल्या डोक्याशी खेळत असतात, त्यांना आपल्या वरचढ होऊ द्यायचे नाही पण भांडायचेही नाही.
कुठलीही टॅक्सी करा, उंदरा मांजराचा खेळ सुरू असतो, ड्रायव्हर हा आपल्या मनस्थितीशी खेळतो, म्हणजे बसताना काही भाडे सांगायचे उतरताना जास्त पैसे मागायचे असे टॅक्सीवाले करतात पण ओला उबेरने त्यांचा हा खेळ बिघडवला आहे. काही टिप्स.
- ओला वापरावी, उबेर वापरूच नये नाहीतर नवीन पर्याय रॅपिडो आलाय तो वापरावा. मुंबई पुणे मोठ्या शहरात जायला ओला उबेर पेक्षा वन वे कॅब म्हणून एक चांगला पर्याय आहे पिवळ्या चौकोनात निळा गोल वाला तो वापरून पहावा.( स्वतःच्या जबाबदारीवर)
- ड्रायव्हर कॅश/यूपीआय थेट स्वतःला मागत असेल तर देऊन टाकावे, ऐवीतेवी आपले पैसे जाणारच असल्याने कशाला पोस्टपेड किंवा ऑटोपे करायचे?
- गाडी/रिक्षात बसल्यावर ड्रायव्हरशी जास्त बोलू नये, काही एकायचे नसेल तरी कानात हेडफोनचे बोळे कोंबावे.
- आम्हाला जास्त पैसे मिळत नाही अशी ड्रायव्हरने तक्रार केली तर दुसरी गाडी बोलवू का विचारून त्याला जास्त बोलूच देऊ नये.
- ड्रायव्हर सिटच्या बाजूला न बसता ड्रायव्हरच्या विरुद्ध मागच्या सीटवर बसावे, बाजूला बसलो तर तो आपल्याला त्रास देतो मागे बसलो तर चुप बसतो.
-गाडी २-३ मीनिटे ऍपवर हलत नसेल तर लगेच नवी बुक करावी.
-जास्त एंटरटेन करू नये, फोन आला बुकिंग केल्यानंतर तर फक्त लोकेशनला उभोय, बाजुचा एखादा स्पॉट सांगावा, कुठे जायचे विचारले तर फक्त एरिया सांगावा, डिटेलवार घराचा पत्ता सांगू नये.
-शेवटी रेटिंग देताना प्रामाणिक रेटिंग द्यावे, भावनिक राहू नये, गाडी स्वच्छ नसेल तर तसे लिहावे, ड्रायव्हरचे वर्तनही लिहावे.
- एखाद्याने घातलीच हुज्जत तर मागेल तेव्हढे पैसे देऊन टाकावे नंतर ओलाला तक्रार केली की पैसे परत देतात.
- महत्त्वाचे- सगळेच वाईट नसतात तसेच सगळेच चांगले असतात असेही नाही. आपली सुरक्षा महत्त्वाची.

मुक्त विहारि's picture

9 Dec 2024 - 2:38 am | मुक्त विहारि

धन्यवाद...

टर्मीनेटर's picture

8 Dec 2024 - 11:31 pm | टर्मीनेटर

'उबर' पेक्षा 'ओला' लाच प्राधान्य देतो!
धागाकर्त्याने किती वर्षांपुर्वीच्या अनुभवावरुन हा काथ्याकुटिय धागा काढला आहे हे देव जाणे, पण 'ओला'ने गुगल मॅप्स वापरणे बंद केल्यापासुन अधिक चांगली सेवा मिळायला लागल्याने ती जास्तच आवडायला लागली आहे. पण 'उबर' पुण्यात आजही इतकी मागसलेली असेल तर मग तिचा निदान पुण्यात तरी टिकाव लागणे मुष्कील आहे 😀

स्वयंरोजगारी व्यावसायिकांशी चर्चा करून त्यांच्या अर्थिक नियोजनाचा अदमास घेणे माझ्या बर्‍यापैकी अंगवळणी आहे. त्यादृष्टीने प्रवासात रिक्षा आणि कॅबचालकांशी गप्पा करून माहिती घेत असतो.

मला वाटते पुर्वी अ‍ॅपकर्ते रिक्षा-कॅबने केवळ त्यांच्याशीच संलग्न राहावे असा प्रयत्ब करीत. माझ्या माहिती प्रमाणे पुर्वीची एकल संलग्नता आता राहिलेली नाही.

रिक्षा/कॅब कडे हल्ली उबर, ओला, रॅपिडो हया तिन्हीची कनेक्टीव्हिटी असते. जेव्हा कॉल येतो तेव्हा तीन पैकी रॅपिडोचा प्रवासी घेण्यास आम्ही प्राधान्य देतो कारण ते आम्हाला अधिक कमिशन देतात तुम्ही सुद्धा रॅपिडो वापरा म्हणे रिक्षा/कॅब चालक प्रवाशांना कन्व्हीस करण्याच्या प्रयत्नात दिसतात. कमिशनच्या दृष्टीने दुसरे प्राधान्य ते ओला प्रवासी घेण्यास देत असावेत. उबरने प्रवासी आकर्षित ठेवण्यासाठी दर जरासे कमी ठेवले असावेत परिणामी चालकांना मिळणारे कमिशन कमी असावे. रॅपिडो मार्केट मध्ये अद्याप तेवढे प्रचलित नसल्याने चालकांना अधिक कमिशन देत असावे - पण रॅपिडो मी स्वतः अद्याप वापरलेले नसल्याने ग्राहक म्हणून दर आणि अनुभवाबद्दल कल्पना नाही. त्यामुळे रॅपिडो किंवा ओला मार्फत प्रवासी न मिळता उबेर मार्फत प्रवासी घ्यावा लागतो तेव्हा काही चालक नाराज होत असावेत आणि त्यातील काही त्यांचे फ्रस्ट्रेशन ग्राहकांवर काढणे किंवा अयोग्य पद्धतींनी अधिक पैसे मिळ्वण्याचे प्रयत्ब करत असावेत का?

माहितगार's picture

9 Dec 2024 - 6:51 pm | माहितगार

रिक्षा/ कॅब प्रवासासंबधी मी खालील काळजी घेतो:

* प्रवासातील आकस्मिकततेच्या शक्यता गृहीत धरून आम्ही घरी बहुतेक सर्वच रिक्षा/कॅब/बसचे क्रमांक घरातील दुसर्‍या मेंबरना शेअर करण्याची प्रथाठेवली आहे.
* प्रवास नवीन ठिकाणी किंवा विरळ वस्तीतून होणार असतील तर रिअल टाईम मॅप शेअर करण्याबद्दल माझा आग्रह असतो.
* रिक्षा कॅब बूक केल्या नंतर त्याला कॉल करून तो येण्यास उत्सुक आहे याची खात्री करून घेतो.
* रिक्षा/कॅब सुरुवात आणि शेवट शक्यतो सोसायटीच्या गेटच्या आतून किंवा कॅमेरा असण्याची शक्यता असलेल्या एस्टाब्लीशमेंटपाशी करतो.
* परिचित आणि नातेवाईकांना रिक्षा/कॅबमध्ये बसवून देताना (रिक्षा कॅबचालकाचे रेटींग बरे आहे ह्याची खात्री करून घेतो) रिक्षा/कॅब चालकास ऐकु जाईल असे पोहोचल्यावस कॉल करा असे नातेवाईकांना सांगतो म्हणजे रिक्षा/कॅबचालकास आपला प्रवाशाचा परिचित वेळ ट्रॅक करणार आहे आणि वेळेत व्यवस्थीत पोहोचवायचा आहे हे त्याला माहित असते.
* रात्रीच्यावेळी रिक्षा/कॅबचालकास पुरेशी वस्ती किंवा ट्रॅफिक असलेला विशीष्ट मार्ग मी बसण्या आधीच सुचवतो. आपल्याला हव्या असलेल्या मार्गाने येण्यास तयार नसलेले रिक्षा/कॅब मी लगेच कँसल करतो.
* नवीन ठिकाणी जाण्यास वाहन बुक करण्या आधी आधी पुर्वतयारीचा भाग म्हणून अधिक योग्य मार्ग आणि शक्य दर/खर्चाची स्वतंत्रपणे माहिती घेणे आणि माहितीची अजून एका कडून खातरजमा करणे,
* ओला रिक्षा/कॅबमध्ये बसल्यानंतर ओला अ‍ॅप पोहोचण्याची टेंटेटीव्ह वेळ देते तो सुरवातीस पाहून ठेवल्यास नवीन ठिकाणी जाताना रिक्षा/कॅबने अचानक रूट बदलला तर अंदाज येण्यास मदत होते.
* रिक्षा/कॅबचालक कटकटा असल्याचे बसण्या आधीच लक्षात आल्यास अशी रिक्षा/कॅब कँसल करून दुसरी घेणे शक्य असल्यास आवर्जून तसे करतो.
* बसल्या नंतर आपल्याला रूटची माहिती आहे की नाही ह्याचा अदमास घेण्यासाठी काही कटकटे किंवा फसवू इच्छित चालक त्यांना स्वतला माहित नाही तुम्हीच सांगा असे प्रवाशाला खोटेच सांगू शकतात. किंवा अ‍ॅप बंद पडले आहे किंवा इतर स्वरूपाची कटकट करू शकतात. यावर पहिला उपाय म्हणजे आपल्याला कोणत्या रूटने जायचे ते त्याला आधीच सांगायचे किंवा कोणता रुटने घेणार हे बसण्या आधीच विचारायचे; यावरच दुसरा एक नामी उपाय म्हणजे, तुमची गाडी कुठली म्हणजे कोणत्या एरीयातील आहे आणि तो कोणत्या गावचा आहे आणि केव्हापासून चालवतो आहे हे त्यालाच उलटे विचारणे म्हणजे तो खरेच नवा आहे की खरेच माहित नाही याचा अदमास येतो आणि खोटे बोलणार्‍याला आपल्याला उलटा त्याचा अदमास घेता येतो हे बघून बराचसा वरमतो.
* वाढीव पैसे मागणार्‍यांना वाढीब पैसे घेणारे अनेक रिक्षा कॅबचालक वरचे कमावलेले पैसे त्यांच्या घरी न देता व्यसनांवर कसे उडवतात- आणि आपले अधिकचे पैसे वाईट गोष्टीत वापरले जाणे आपल्याला कसे खटकते याबद्दल मी त्यांचे चालवणे चालू असताना बोलत रहातो, प्रवास संपल्यानंतर ठरलेले असले तरी त्याने मागितलेलेल्या वरच्या पैशात दहा रुपयांची भर घालून जवळच्या दुकानातून घरच्यासाठी फळे किंवा ग्रोसरी घेण्याचा एकमेव पर्याय देतो.

* आपल्या स्वतःच्या शहरातील एरीया आणि रस्त्यांच्या नावांचा व्यवस्थीत परीचय माझ्याच फॅमिली मेंबर्सना माहित नसतेच त्यावर कडी म्हणजे रिक्षा कॅबमध्ये बसल्या नंतर आपला जातानाचा रुट अमुक तमुक ठिकाणाहून जातोय ना असे म्हणत चुकीच्या एरीया/रस्त्याचे नाव घेणे म्हणजे रिक्षा कॅबचालकाला तुम्ही रस्त्यांशी नीट परिचित नाही आहात हे आपसूकच समजते. मी सोबत असेन तर रूट रस्ते समजावतो म्हणजे प्रवाशात रुट माहित असलेले कुणि आहे हे रिक्षा/कॅबचालकास समजते.

माझ्या उपरोक्त काळजी घेणे माझ्या बर्‍यापैकी अंगवळणी पडल्याने नैसर्गिक पणे होते तरीही काही आगाऊ चालकांचे अनुभव अधे मधे येतात नाही असे नाही.

माहितगार's picture

9 Dec 2024 - 7:08 pm | माहितगार

मी स्वतः अजून न वापरलेली एक गोष्ट, प्रवासत खूपच त्रास दिलेल्या चालकांना लगेच काही न म्हणता त्यांनी मोडलेले सिग्नल लक्षात ठेऊन पोलीसात आपण प्रवासात विटनेस असल्याचे नमूद करून तक्रार देणे. पुण्यासारख्या शहरात अनेक सिग्नल चौकात सिसिटीव्ही कॅमेरा आहेत त्यांचा उपयोग केवळ हेल्मेट नसलेल्या चालकांकडून दंड वसूली पुरताच होतो आहे. सिग्नल तोडला जाण्या बद्दल अ‍ॅडीशनल विटनेसची आवश्यकता असावी. अ‍ॅप द्वारा प्रवास केल्याने तुम्ही प्रवासी आणि विटनेस असल्याचा कायदेशीर पुरावा तुमच्या कडे असतोच, अशा काही तक्रारी चालकांबाबत पुन्हा पुन्हा गेल्यास वचक बसण्यास मदत होऊ शकते.

मुक्त विहारि's picture

10 Dec 2024 - 3:37 am | मुक्त विहारि

मनापासून आभार...

रात्रीचे चांदणे's picture

10 Dec 2024 - 6:45 am | रात्रीचे चांदणे

उबरच्या सेवेचा वाईट अनुभव मलाही एक दोनदा आलेला. एका नातेवाईकांसाठी मी कॅब बुक केलेली. राईड सुरू झाल्यानंतर काही वेळाने कॅब जवळचा मार्ग न घेता लांबच्या मार्गाने गेली. अपेक्षेप्रमाणे आदी दाखवल्यापेक्षा जास्त भाडे द्यावे लागले. उबेर चे aap वरूनच तक्रार केली तर दुसऱ्याच मिनिटाला जास्तीच्या भाड्याचे पैसे रिटर्न ही आले.

दुसऱ्या वेळी उबेर ड्रायव्हर ने त्यावेळी पुण्यात कॅन्टोन्मेंट एरियात असणारा प्रवेशकर माझ्याकडून घेतला होता. घरी येऊन तक्रार केली असता लगेच माघारी दिला होता.

तिसऱ्या वेळी ड्रायव्हर ने एकही सिग्नल पाळला नव्हता, परत तक्रार केली तर मला २०० रूपये वॉलेट मध्ये दिले होते.

कंपनीच्या पॉलिसी चांगल्या आहेत आणि योग्य ठिकाणी तक्रार केली तर निवरणही झाले आहे. पण ड्रायव्हर मात्र माजुरडे आहेत. आणि हे मजुरडे ड्रायव्हर एक तर मराठी आहेत नाही तर मुस्लिम. परप्रांतीय ड्रायव्हर भीतीने का होईना फसवाफसवी करत नाहीत असा माझा तरी अनुभव आहे.

ड्रॉप लोकेशन अगोदरचे सांगितले आहे ते आल्यावर आणखी पुढे ( कसे जायचे हे माहीत असेल तर) सांगू शकतो का?