अभिजात म्हणजे रे काय भाऊ?
जेव्हा ३ ऑक्टोबर २०२४ला मराठी भाषेला इतरही काही भारतीय भाषांच्या बरोबर अभिजात दर्जा मिळाल्याची बातमी प्रसिद्ध झाली, तेव्हा बऱ्याच लोकांना आणंद झाला, बऱ्याच लोकांना छाण वाटले, काहींना फक्त चान वाटले, तर काहींना प्रसण्ण वाटले. फारच थोड्या लोकांना (आणंद होण्याऐवजी) आनंद व्हायला हवा, (छाण वाटण्याऐवजी) छान वाटले पाहिजे, (चान न वाटता) छान(च) वाटायला हवे आणि अशी बातमी ऐकल्यावर (प्रसण्ण नव्हे) प्रसन्न वाटायला हवे असे म्हणावेसे वाटले असावे, कारण सामाजिक माध्यमात तसे काही कोणी बोलून दाखवताना दिसले नाही. ही घोषणा झाल्यानंतरचा महाराष्ट्रातला आनंद हा मागील १०-११ वर्षे भिजत पडलेले हे घोंगडे एकदाचे झटकत, निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधी वाटण्यासाठी हाती लागलेली (आणखी एक) खिरापत पाहून झालेला होता की त्या वेळी चालू असलेल्या नवरात्र उत्सवाचाच एक भाग होता, हे कळणे कठीण होते.
मराठीला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नक्की काय झाले ? कुणाच्या पदरात काय पडले? आणि त्याची फलनिष्पत्ती काय? लगेचच्या आणि दूरच्या भविष्यकाळात?
या सगळ्यांची उत्तरे शोधणे, त्यासाठी 'सर्कारी खर्चाने' अधिवेशने भरवणे, चर्चा आणि परिसंवाद आयोजित करणे आणि 'आमच्या भाषेचा इतिहास किती गौरवशाली' हे पुन्हा पुन्हा आळवणे हे आता काही वर्षे तरी चालू राहील. सरकारी घोषणाबाजीने सुरू झालेले आणि अल्प काळ चालू राहिलेले 'स्वछ भारत' (Swachh भारत, Swachchh नव्हे!) अभियान किंवा नवजात 'विक्सित (viksit) भारत' यांच्याच धर्तीवर 'आता आमची मराठी एक अभिजात भाषा आहे' ही घोषणाही व्यासपीठावरील चर्चेपुरती मर्यादित नाही ना ठरणार?
हा निराशावादी स्वर अनेक कारणांमुळे लागतो आहे. सध्याच्या अभिजात भाषांमध्ये समाविष्ट असलेल्या प्राकृत, पाली आणि संस्कृत या भाषा रोजच्या वापरातील नाहीत. अभिजात किंवा ऐतिहासिक जुन्या साहित्याचा अभ्यास, जपणूक आणि संवर्धन, तसेच ऐतिहीहासिक घटनांचा अभ्यास अशा कामांकरता त्यांचा वापर होतो आणि त्यामुळे त्यांचा सध्याच्या किंवा भविष्यकाळाशी दूरचाच संबंध असतो. मराठीला (इतरही काही भाषांबरोबर) अभिजात दर्जा देणाऱ्या सरकारी घोषणेत या निर्णयाचा 'Major impact' याबद्दलचे पुढे दिलेले 'सरकारी विचार' सध्यातरी फारसे भविष्यकाळ, विकास किंवा कालानुरूपता या कशाशीच संबंधित नाहीत.
The inclusion of languages as Classical Language will create significant employment opportunities, particularly in academic and research fields. Additionally, the preservation, documentation, and digitization of ancient texts of these languages will generate jobs in archiving, translation, publishing, and digital media.
हे 'सरकारी विचार' आणखीही असेच दर्शवतात की 'आम्हाला आमच्या भाषेबद्दल आणि तिच्या शेकडो वर्षांच्या वापराबद्दल बराच अभ्यास, संशोधन (वगैरे वगैरे) करायचेच होते, बरे झाले आता अभिजात दर्जा मिळाला, त्यामुळे आमचे काम अधिक जोमाने करता येईल.' जे काही करायचे होते, त्याचे घोडे अभिजात दर्जासाठी अडून बसायची काही आवश्यकता होती का? आणि आता हाती असलेली आणि अभिजात दर्जामुळे मिळू घातलेली नवीन साधनसामग्री कशा तऱ्हेने उपयोगात आणली जाईल, याचा काय भरवसा? - उदाहरणार्थ, शिवछत्रपतींच्या काळाचा अभ्यास त्यांच्या लढाया, राज्यकौशल्य आणि समाजकारण हे सगळे बाजूला ठेवून महाराजांचे गुरू कोण अशासारख्या प्रश्नावरच जर केंद्रित होत असेल, तर त्यातून कुणाचे भले होणार आहे?
महाराष्ट्रातील सरकारी धोरणांच्या परिणामाचे एक प्रतीक म्हणून मुंबईतील परिस्थिती पाहिल्यास बृहन्मुंबई महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थिसंख्या घटत आहे. २०११-१२ या शैक्षणिक वर्षातले ११६,०८६ विद्यार्थी २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात ३८%ने घटून ७१,४५४पर्यंत कमी झाले होते. भविष्यातल्या संधींचा लाभ मिळवता यावा म्हणून असेल, पण त्याच काळात दुसरीकडे बृहन्मुंबई महापालिकेच्या इंग्लिश माध्यमातील शाळांमधील विद्यार्थी ४७%नी वाढले. बृहन्मुंबईमधील अनेक नामांकित मराठी माध्यमाच्या खाजगी शाळांनादेखील मराठी माध्यमातील घटत जाणाऱ्या विद्यार्थिसंख्येला तोंड देण्याकरता इंग्लिश माध्यम किंवा 'semi English' अभ्यासक्रम सुरू करावे लागले. अशी घट चालूच असून इतर मोठ्या शहरांतूनही साधारण असेच चित्र दिसते.
अशा कमकुवत होऊ पाहणाऱ्या मराठी शालेय शिक्षणाच्या पायावर, त्यात सुधारणेसाठी फारसे प्रयत्न न करता, आणखीनच उंच इमले बांधणे हा सरकारी विचारसरणीतील विरोधाभास समजायला कठीण आहे. सुयोग्य शिक्षक, पाठ्यपुस्तके आणि वेगवेगळ्या मान्यता यांची पुरेशी तयारी नसतानाही मराठी माध्यमातून वैद्यकीय आणि अभियांत्रिकी उच्च शिक्षणाची हल्ली वेळोवेळी केली जाणारी घोषणा पाहता यात मराठीचा गौरव आहे की सरकारी कार्यक्रमामुळे विस्थापितांच्या संख्येत भविष्यकाळात भर घालणे हाच त्यामागचा उद्देश आहे, हा विवाद्य मुद्दा ठरेल. या घोषणा अंमलात आणणे वेळोवेळी पुढे ढकलले जाणे हे या बाबतीतला सर्वांगीण अभ्यास आणि नियोजन केले गेले नसल्याचेच दर्शवतात.
आमच्या भाषेचा इतिहास किती गौरवशाली' हा राग आळवताना भाषा हे संवादाचे आणि मनुष्यबळ विकासाचे एक साधन आहे हे विसरता कामा नये. मराठीला अभिजात दर्जा मिळणे ही जशी मराठीच्या वैभवशाली गतकाळाची पावती आहे, तशीच ही घटना उज्ज्वल भविष्यकाळाची पहाटदेखील ठरायला हवी. मराठी असणे हे किती अभिमानास्पद आहे, हे शाहीर साबळे आणि अमर शेख यांच्या रचना गर्जून सांगतात, तसेच 'मराठी पाऊल पडते पुढे' हेदेखील आवर्जून सांगतात. 'अमृताशी पैजा जिंके' अशी आपली मराठी भाषा कालानुरूप 'अमृता'ची व्याख्या बदलली, तरीही त्याच्याशीही पैजा जिंकण्यास सदैव तयार पाहिजे. कालानुरूप जर ज्ञान मिळवण्याचे आपले माध्यम मराठीपुरतेच मर्यादित राखले, तर आपल्या भाषेच्या (आता 'सरकारी शिक्कामोर्तब' झालेल्या) अभिजातपणाचा अभिमान बाळगताना आपण वर्तमानकाळासाठी आणि भविष्यकाळासाठी निरुपयोगी ठरत जाऊ.
आपल्या भाषेचाच नव्हे, तर आपल्या संस्कृतीचा उज्ज्वल ऐतिहासिक ठेवा सांभाळून ठेवण्यासाठी आणि इतर देशांशी स्पर्धा करत आणि त्यात विजय मिळवत आपल्या देशाचे, भाषेचे आणि अस्मितेचे गतवैभव पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी इतर देशात झालेल्या प्रयत्नांची माहिती असणे हे कदाचित भविष्यकाळातील 'मराठीपणा'च्या जोपासनेसाठी उपयोगी पडेल.
जपानमध्ये १९व्या शतकाच्या उत्तरार्धात Meiji Restorationच्या काळात जेव्हा राज्यकर्त्यांना जपान आणि पाश्चिमात्य राष्ट्रे यांच्या प्रगतीतील तफावतीचा अंदाज येऊ लागला, तेव्हा जपानमधील फक्त २-४% लोकांचे शिक्षण पाश्चिमात्य भाषांत (मुख्यतः इंग्लिशमध्ये) झालेले असल्यामुळे, पाश्चिमात्य राष्ट्रांच्या सर्व आघाड्यांवरील प्रगतीचा अभ्यास करण्यासाठी अशा उच्चशिक्षित जपानी लोकांचा उपयोग करून त्यातून जपानची प्रगती साधणे कठीण होते. या काळात जपानमधून अनेक शिष्टमंडळे पाश्चिमात्य देशात अभ्यासाकरता गेली, अनेक जपानी तरुण सरकारी मदतीने पाश्चिमात्य विद्यापीठात शिकले (आणि जपानमध्ये त्या ज्ञानाचा वापर करण्याकरता परतले) आणि अनेक पाश्चिमात्य तज्ज्ञ जपानमध्ये शिक्षक किंवा प्रबंधक म्हणून बोलावले गेले. या सगळ्या मंथनातून जमा होत गेलेली विविध प्रकारची माहिती, ज्यांना फक्त जपानी भाषेतूनच लिहिता-वाचता येत होते अशा लोकांसाठी जपानी भाषेतल्या पुस्तकांतून आणि नियतकालिकांमधून (सरकारी पाठिंब्याने आणि जनतेच्या सहभागाने) प्रकाशित होत राहिली. अशा तऱ्हेने पाश्चिमात्य राष्ट्रांकडून प्रेरित होऊन पण बहुतांशी जपानी भाषेतून प्रसारित आणि संवर्धित ज्ञानातून देशाच्या कारभारात आणलेल्या बदलांखेरीज, तारायंत्रे/टेलिफोन यांचे जाळे, दळणवळणासाठी लोहमार्ग आणि जहाजे, अनेक नित्योपयोगी वस्तूंची उत्पादन केंद्रे आणि त्यांचे वितरण करण्यासाठी व्यवस्था प्रस्थापित करून या सगळ्यांकरता अवाढव्य सरकारी यंत्रणा तयार केली गेली. या यंत्रणेचा बराच भाग १९व्या शतकाच्या शेवटी खाजगी उद्योगांना विकण्यात आला आणि त्यातूनच जपानमधील सध्या 'Zaibatsu' या सामूहिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या अनेक जागतिक दर्जाच्या कंपन्यांचा (मित्सुबिशी, मित्सुई, सुमितोमो इ. इ.) उगम झाला. २०व्या शतकात दुसऱ्या महायुद्धाची तयारी करताना आणि दुसऱ्या महायुद्धानंतरच्या संपूर्ण विनाशातूनसुद्धा बाहेर पडून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय चढाओढीत आघाडी मिळवताना जपानला याच सक्षम आणि बलवान पायाभूत संघटनांचा मोठाच उपयोग झाला.
साधारण याच धर्तीवर, चीनमध्ये २०व्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकांत Deng Xiaoping यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या सर्वांगीण बदलामधून अशाच तऱ्हेने, पाश्चिमात्य भाषांत (मुख्यतः इंग्लिश) शिकलेल्या थोडक्याच लोकांचा, सरकारी मदतीने पाश्चिमात्य शिक्षण घेतलेल्या तरुणांचा आणि चीनबाहेर काही काळापासून स्थायिक असलेल्या चिनी वंशाच्या लोकांचा, तसेच विविध क्षेत्रांत जमवून आणलेल्या संयुक्त उपक्रमातून मिळालेले धडे गिरवत चीननेदेखील जागतिक उद्योगधंद्यात इतक्या झपाट्याने प्रगती केली की 'Fortune ५००' या जगभरच्या सगळ्यात मोठ्या ५०० व्यापारी कंपन्यांच्या यादीत २०२२ साली १३६ चिनी कंपन्या होत्या (जगभरातल्या सर्वात अधिक), तर त्याच यादीत सध्या चीनच्या १२८ कंपन्या आहेत (दुसरा क्रमांक). त्याचप्रमाणे Academic Ranking of World Universities (ARWU) या जागतिक विश्वविद्यालयाच्या गुणवत्ता यादीतल्या पहिल्या १००० विश्वविद्यालयांतील २०३ विश्वविद्यालये चीनमधील होती (२०२३ साली १९१). अजूनही चीनमधील विश्वविद्यालयीन शिक्षण मुख्यतः मांदारीन (मुख्य चिनी भाषा) मध्येच होते.
जपानने आणि चीनने आपापल्या भाषेची कास न सोडता ही सर्वांगीण आणि पाश्चात्त्यांच्या तोलामोलाची प्रगती केली. या यशामध्ये राज्यकर्त्यांची दूरदृष्टी, विकास आणि प्रगती साधण्यासाठी पाश्चिमात्य भाषांचा केलेला सुयोग्य उपयोग आणि सर्व स्तरांवरचे अथक कष्ट आणि प्रयत्न या सगळ्यांचाच मोठा वाटा आहे. हे देश जर नुसतेच 'आमच्या भाषेचा इतिहास किती गौरवशाली' हे पुन्हा पुन्हा आळवत सरकारी खाक्याने चर्चासत्रे घेत राहिले असते, तर अशा तऱ्हेची प्रगती करणे त्यांना जमले नसते. जपानमधील आणि चीनमधील सर्व स्तरांतल्या स्थानिक भाषेच्या वापरात किंचितही कमीपणा न बाळगणे आणि फक्त भूतकाळातल्या यशाचा गर्व न बाळगता त्या भाषा वर्तमानकाळासाठी आणि भविष्यकाळासाठीदेखील सचेतन राखणे हे गुण कदाचित आपल्याकडे कमी पडतात आणि त्यांच्या वाढीकरता आपल्याला भविष्यकाळात बरेच प्रयत्न करणे आवश्यक आहे. किमान सध्या अनेक मराठी भाषकांना मराठी बोलण्यात वाटत असलेला कमीपणा आणि एकमेकांतसुद्धा मराठीऐवजी मोडक्यातोडक्या का होईना, पण इंग्लिशमध्ये बोलण्याचा अट्टाहास जर सामूहिक प्रयत्नातून कमी झाला, तर मराठी भाषेला नक्कीच बरे दिवस येतील.
'आता मराठीला अभिजात दर्जा आहे' हे समाधान मिळवण्यासाठी एका तपाहून अधिक वाट बघावी लागली. सध्या तरी त्यातून जे काही हाती लागेल, ते भूतकाळात जास्त सखोल डोकावण्याच्या उपयोगाचे असेल: परंतु मराठी भाषकांच्या भविष्यकाळातल्या गरजा पुरवण्यासाठी उपयुक्त असे काही मराठी भाषेला मिळण्यासाठी अजूनही बऱ्याच काळासाठी सर्वंकष नियोजन, प्रयत्न, विचारमंथन आणि साधनसामग्रीची जुळवाजुळव या सगळ्याचीच नितांत गरज आहे. अन्यथा पु.ल. देशपांड्यांच्या अभिजात शैलीतल्या 'दारू म्हणजे रे काय भाऊ?' यासारखेच 'अभिजात म्हणजे काय?' या प्रश्नाचे सुयोग्य उत्तर शोधताना, भरकटत गेल्याने फक्त अनेक प्रश्नोत्तरांच्या फैरीच झडत राहतील आणि 'आता पुढे काय आणि कुणी करायला हवे?' हा त्यानंतरचा क्रमप्राप्त प्रश्न विचारायचेच राहून जाईल, मग त्याची उत्तरे शोधणे दूरच.
प्रतिक्रिया
1 Nov 2024 - 1:35 pm | कर्नलतपस्वी
यात शंकाच नाही. जनमानसात आगोदरच अभिजात आहे.
मातृभाषा ही अभिजातच असते. फक्त सरकारी अनुमोदन मिळाले की बरोबर अनुदान मिळते.बाकी सरकारी मोहोर लागली की ती सरकार दरबारी अभिजात झाली..
ग्रंथालये समृद्ध व्हायला हवी,पुस्तक प्रकाशन व्यवसायाचे पुनरूज्जीवन व्हायला हवे,वाचकांना पुस्तके माफक दरात तर लेखकांना योग्यतेनुसार मोबदला मिळायला हवा.
छान आढावा घेतला आहे. लेखकाच्या मताशी पुर्ण सहमत.
2 Nov 2024 - 8:12 pm | शेखरमोघे
प्रतिसादाबद्दल आभार.
अभिजातपणाचा शिक्का मिळणे हे अभिनन्दनीयच, पण त्याखेरीज आणखीही बरेच काही करणे जरूर आहे, खासकरून भविष्य काळासाठी, हे अधोरेखित करण्याचा उद्देश होता.
2 Nov 2024 - 12:21 pm | अथांग आकाश
लेख खुप आवडला!
2 Nov 2024 - 8:15 pm | शेखरमोघे
प्रतिसादाबद्दल आभार.
अभिजातपणाचा शिक्का तर मिळाला पण भविष्य काळासाठी देखील मराठी उपयोगी आणि प्रचलित रहाण्यासाठी आपण सगळ्यानीच प्रयत्न केले पाहिजेत.
2 Nov 2024 - 11:20 pm | श्वेता२४
लेखातून अत्यंत योग्य मुद्दा मांडला गेला आहे .तो म्हणजे पाश्चिमात्य ज्ञान हे त्या त्या देशांनी आपल्या भाषेमध्ये लोकांना उपलब्ध करून दिले गेले. नेमकी हीच दूरदृष्टी महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी आजवर दाखवलेली नाही. महाराष्ट्रामध्ये जे कोणी मराठीचे प्राध्यापक आहेत त्यांना अनेक पाश्चिमात्य संदर्भ ग्रंथ भाषांतरित करून घेण्याच्या कामे वापरले गेले पाहिजे. जेणेकरून महाविद्यालयीन शिक्षण सुद्धा मातृभाषित घेणे शक्य होईल. मी माझा स्वतःचा एक सोपा अनुभव सांगते. ज्यावेळी मी यूपीएससी करत होते त्यावेळी संपूर्ण वर्गामध्ये मराठी भाषेतून यूपीएससी देणारी माझ्यासारखी फक्त दोन विद्यार्थी होते आणि इतर काही विद्यार्थी लाजेने हात सुद्धा वर करत नव्हते.तेथील शिक्षकांनी आम्हाला सांगितले होते की मराठीतून जर यूपीएससी करणार असाल तर चांगल्या दर्जाचे संदर्भ ग्रंथ मराठीतून उपलब्ध नाही. त्यामुळे इंग्रजीत वाचनाची सवय लावा आणि खरंच त्यावेळी याचा पुरेपूर अनुभव आला. की बरेचसे उत्तम साहित्य हे हिंदीमध्ये उपलब्ध असायचे परंतु मराठी मध्ये मात्र उपलब्ध नसायचे .बर जे मराठी मध्ये उत्तम दर्जाचे प्राध्यापक वगैरे मंडळींनी लिहिलेले पुस्तके जी असायची ती इंग्रजी पुस्तकांच्या तोडीची अजिबात नसायची. त्याचवेळी हा मनात विचार आला की ही प्रस्थापित असलेली अनेक पुस्तके आजवर मराठीमध्ये का बरं भाषांतरित झाली नसावीत? त्यामुळे मराठी भाषा ही प्रवाही ठेवायची असेल दीर्घकालीन टिकवून ठेवायची असेल तर त्याचा व्यवहारात जास्तीत जास्त वापर होणे आवश्यक आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण जर मातृभाषेतून द्यायचे असेल तर सगळ्या चांगल्या संदर्भ ग्रंथांचे मराठी मध्ये भाषांतर करून घेण्याचा कालबद्ध कार्यक्रम सरकारने राबवला पाहिजे. त्यामुळे जे काही मराठीचे शिक्षक, प्राध्यापक असतील त्यांच्या ज्ञानाचा उपयोग होईल आणि मराठी ही भाषा बिनकामाची नसून उपयोजित भाषा आहे हे सर्व जनमानसात रूढ होईल. दुसरे म्हणजे अनेक नवनवीन इंग्रजी शब्द व्यवहारात असतात त्यांच्यासाठी पर्यायी मराठी शब्द शोधून काढले पाहिजेत व ते रुळले पाहिजेत. काही वर्षांपूर्वी भाषा संचलनालयाने कार्यालयामध्ये वापरायचे प्रचलित नवीन इंग्रजी शब्द व त्यासाठी मराठी पर्यायी शब्द सुचवण्यासाठी एक परिपत्रक सर्व विभागांमध्ये फिरवले. त्याला प्रतिसाद देणारी व निरनिराळे पर्यायी मराठी शब्द सुचवणारी मी एकमेव अधिकारी होते. त्यामुळे नवनवीन इंग्रजी शब्दांना मराठी पर्यायी शब्द शोधणे व ते जनमानसात रुढ करणे हे एक मोठे काम आहे. तिसरे म्हणजे जिथे जिथे शक्य आहे तेव्हा केवळ आणि केवळ पूर्णतः मराठी भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करणे व कमीत कमी इंग्रजी शब्दांचा वापर करणे. जेणेकरून ऐकून ऐकून समोरचा माणूस ते मराठी शब्द संवादात वापरायला लागेल. माझे एक निरीक्षण आहे की आपण जाणीवपूर्वक एखादा मराठी शब्द सारखा सारखा म्हणला तर समोरचा माणूस देखील त्याची पुनरावृत्ती करतो. जसे की मी माझ्या कार्यालयांमध्ये कधीही कॉम्प्युटर म्हणत नाही तर संगणक संगणक असे सतत संवादात म्हणत राहते. मग माझे वरिष्ठ व सहकारी देखील कॉम्प्युटर या शब्दावरून संगणक वरती येतात. :D असो. लेखक महोदयांनी अतिशय अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे व महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याबद्दल धन्यवाद!!
टीप: मी इंग्रजी भाषेची विरोधक नाही. इंग्रजी व्यवहारात महत्त्वाचे नाही असे कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. माझ्या बोलण्यात देखील हल्ली बरेच इंग्रजी शब्द येत असतात. त्यामुळे उगाच कोणी मराठी इंग्रजी , मराठी - हिंदी असा वाद उकरून काढू नये ही नम्र विनंती. मराठीचा व्यवहारात वापर वाढला पाहिजे असे माझे प्रांजळ मत आहे.
3 Nov 2024 - 8:32 am | शेखरमोघे
प्रतिसादाबद्दल आभार.
मराठीला अभिजात दर्जा मिळल्याबद्दल महाराष्ट्रामध्ये जो आनन्द व्यक्त केला गेला त्यात पुन्हा "भूतकालातील घटना आणि रचना" यातील स्वारस्य दिसले पण भविष्याची तयारी किन्वा किमान त्याबद्दल विचार वा कष्ट करण्याची तयारी अजिबात दिसली नाही. काही काळापूर्वी मराठीतून अभियान्त्रिकी, वैद्यकशास्त्र इ. इ. मधील उच्च शिक्षण सुरू करण्याची इच्छा जाहीर करताना (फक्त) २०-३० (आता पक्का आकडा लक्षात नाही, पण एकूणच मोजकीच) पुस्तके (क्रमिक? संदर्भ ग्रंथ ?) विद्यार्थ्यान्साठी "तयार" असल्याचे आणि म्हणून आणखी काही फारशी तयारी करण्याची जरूर नसल्याचे सूर होते.
भूतकाळातच रमायचे आहे की भविष्याची जरूर ती तयारी करण्याची जिद्द, आस आणि कुवत जोपासायची आहे हेच आधी अनिश्चित असताना जर अभिजातपणाचा पाठपुरावा होत असेल तर तो फक्त आणखी एक बिरुद मिरवण्याचा सोस आहे असे नाइलाजाने म्हणावे लागेल.
3 Nov 2024 - 11:32 am | चौथा कोनाडा
महत्वाचा प्रश्न आहे.
अ ति शय योग्य पद्धतीने मांडले आहे !
जपानमधील १९व्या शतकातिळ Meiji Restoration चा संदर्भ महत्वाचा आहे !
शेवटी शेवटी तर " मराठीला अभिजात भाषेचा दर्जा" ही चळवळ फक्त साहित्यिक आणी ठराविक मंडळींपुरतीच उरली होती !
राजकिय लोकांनी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बाजी मारली ... आणी आम्ही काही तरी मोठं मिळवलं अशी काही काळ बढाई मिरवली.
पुढं काय ........ ?
एक ही राजकिय नेता या बद्द्ल बोलायला तयार नाही ... काही योजना मांडल्या ... धन आणलं असं ही कोणी बोलत नाहिय.
ते लोक मुग गिळून बसले म्हटल्यावर साहित्यिक आणि मराठी प्रेमी काय बोलणार ?
मराठी भाषेला मायबोलीप्रेमी सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकी असलेला राजिकिय खरोखरचा "जाणता राजा" मिळालयाशिवाय पुढं काही होइल असं वाटत नाही !
4 Nov 2024 - 8:22 am | शेखरमोघे
प्रतिसादाबद्दल आभार.
एका राजकीय पक्षाचे नेते आम्हीच पहिल्यान्दा "मराठीला अभिजात दर्जा मिळवा" हा प्रस्ताव (१० वर्षापूर्वी) मांडल्याची प्रौढी मिरवतो तर दुसरा पक्ष आम्हीच तो दर्जा मिळवला हे सान्गतो. शाबासकी दोघानाही हवी आहे पण "पुढे काय" हे कुणालाच नक्की सान्गता येत नाही किन्वा त्यान्च्याकडे सान्गायला काही नाही.
5 Nov 2024 - 5:47 pm | चौथा कोनाडा
या बाबतीत सर्वच राजकिय पक्षांबाबत भ्रम निरास झाला आहे !
मराठी समाजाचं विस्कळीतपण आणि दिवसेंदिवस सत्ताकेंद्री राज्य स्तरावरचे सामजिक, सांस्कृतिक आणि राजकिय नेतृत्व हे पाहता मायमराठीला नैराश्य आलं तर नवल नाही !
4 Nov 2024 - 9:33 am | विवेकपटाईत
जो पर्यन्त भाषा रोजगारशी जोडली जात नाही. अभिजात घोषित करण्याचा काहीही उपयोग नाही. राज्य सरकारने आधुनिक वैद्यक शास्त्र , वास्तु शास्त्र, अभियांत्रिकी इत्यादि विषय मराठीत शिकविणे सुरू केले पाहिजे. तरच काही लाभ होईल.
4 Nov 2024 - 8:48 pm | शेखरमोघे
प्रतिसादाबद्दल आभारी.
"जो पर्यन्त भाषा रोजगारशी जोडली जात नाही. अभिजात घोषित करण्याचा काहीही उपयोग नाही. राज्य सरकारने आधुनिक वैद्यक शास्त्र , वास्तु शास्त्र, अभियांत्रिकी इत्यादि विषय मराठीत शिकविणे सुरू केले पाहिजे. तरच काही लाभ होईल."
कमीत कमी कष्ट घेऊन भाषा रोजगाराशी जोडायची असे ठरवले तर सगळेच सोपे होऊन जाते - सध्या चालू असलेले काहीच न बदलणे आणि सध्यासारखेच सगळे फक्त इन्ग्लिशमध्येच चालू ठेवणे. तसे ठेवणे म्हणजे राज्यकर्त्याना आम्ही मराठीसाठी काहीतरी करतो आहोत हे म्हणण्याची सन्धी मिळत नाही आणि म्हणून ते " आपण काहीतरी केले आहे" हे दाखवण्यासाठी धडपडत रहातात. "राज्य सरकारने आधुनिक वैद्यक शास्त्र , वास्तु शास्त्र, अभियांत्रिकी इत्यादि विषय मराठीत शिकविणे" सुरू करण्याचे काही कारणाने अगदी पक्के ठरवले तरी त्या करता लागणारी पूर्ण यन्त्रणा - जसे शिक्षक, पाठ्य पुस्तके, मराठीतील सर्वमान्य तान्त्रिक शब्द्/मापदन्ड इ. इ. आणि "मराठी डॉक्टर" हे "मराठी रुग्ण" या जमातीकरता " acceptable" व्हावेत या साठी "जे जे लागेल ते" (म्हणजे काय हे उमगण्याकरता जरूर असलेल्या सगळ्या प्रयत्नान्च्या सकट) - हे सगळे उभे करावे लागेल. म्हणजेच एका सरकारच्या कारकीर्दीत कदाचित न होण्यासारखे काम, म्हणजेच नेहमीच "बोलाचीच कढी, बोलाचाच भात" हे तत्व पाळत रहाणे, असेच चालू राहील.
इथे फक्त "QED" म्हणून माझा प्रतिसाद थाम्बवणे उचित, पण कोणी हे प्रमेय "सोदाहरण" आणी "सोपपत्तिक" खोडून काढू शकल्यास आनन्दच वाटेल.
4 Nov 2024 - 1:11 pm | Bhakti
खुप महत्वाचे प्रश्न मांडले.इंग्रजी मावशीला इतकं प्रेम देताना,माय मराठीची लाज वाटेल, इतक्या टोकापर्यंत अनेक ठिकाणी वातावरण असते.
मी सुचवेल, मराठी ग्रंथालय आणि मराठी परिसंवाद जास्तीत जास्त घडावेत.
+१
4 Nov 2024 - 9:29 pm | शेखरमोघे
प्रतिसादाबद्दल आभार.
"मराठी ग्रंथालय आणि मराठी परिसंवाद जास्तीत जास्त घडावेत" हा स्तुत्य विचार. सद्य परिस्थितीचे एक उदाहरण - पुण्यात मी शोधलेल्या "मराठी ग्रन्थालयात" (सकाळ नगरमधील "सकाळ"चे ग्रन्थालय) जी मला, भारत/महाराष्ट्र/मराठी सम्बन्धित विषयान्साठी उपयोगी मराठी पुस्तके मिळाली त्यात असलेल्यापेक्षा जास्त माहिती मला (इन्ग्रजीतून) अन्तर्जालावर मिळत असे. "सकाळ"चे ग्रन्थालय नन्तर बन्द देखील झाले (कारण त्याना पुस्तके साठवणे देणे घेणे यापेक्षा त्या जागेचा जास्त लाभदायक पर्यायी उपयोग करायचा होता, असे ऐकले). त्याहूनही मोठ्या असलेल्या (म्हणजे जास्त विविध पुस्तके असण्याची शक्यता) पुणे विद्यापीठाच्या ग्रन्थालयात मी पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी नसल्यामुळे मला प्रवेश नाही आणि काही खटाटोपातून ते जमवलेच तर तेथील पुस्तके काय तर्हेची असतील ही काहीच कल्पना नसल्यामुळे हा खटाटोप करावा की नाही याबद्दल खात्री नाही. इतर बर्याच ग्रन्थालयात बहुतेक बाबा आदमच्या काळातल्या कादम्बर्या/अनुवादित मराठी पुस्तकेच असतात आणि त्यात ती देखील "दोन/चार दिवसात वाचा आणि परत करा, नाहीतर दन्ड भरा" अशा तर्हेची असतात. पुन्हा माझ्या उपयोगाची/आवडीची माहिती अन्तर्जालावर मिळाली की (जरी इन्ग्रजीत असली तरी माझे अडत नसल्याने) माझे काम होते. वाचक नाहीत म्हणून नवे फारसे काही तयार होत नाही आणि त्यामुळे नवे वाचक आकर्षित होत नाहित, असे हे अभेद्य वर्तुळ. मी इच्छा असूनही कुठल्या मराठी ग्रन्थालयाचा आणि कसा उपयोग करणार?
4 Nov 2024 - 3:39 pm | अकिलिज
मराठी वाहिन्यांवर थोडीफार बंधने घातली पाहिजेत. आजकालच्या कुठल्याही (सह्याद्री अपवाद) कार्यक्रमात कलाकाराचे कलादर्शन झाल्यावर, ''एक्सलंट परफॉरमन्स'' किंवा ''माईंण्ड ब्लोईंग'' अश्या अभिप्राय सारख्या गोष्टींचा सतत मारा होत असेल तर हळू हळू तेच तोंडवळणी पडत जाते. एका वेळेला तर हे ही मराठीच आहे इथपर्यंत आलेलं आहे. आणि जर ख्यातनाम व्यक्ती जर असे बोलत असेल तर त्यांचा कित्ता गिरवणं आलंच. याला एकेका पायरीने आवर घातला पाहिजे.
मध्येच असाच एक तेलुगु कार्यक्रम पाहण्यात आला. तिथेही तेच आहे. ते इतकं ईंग्रजाळलेलं तेलुगु बोलत होते कि तेलुगुचा गंध नसलेल्यालाही सगळे कळत होते.
4 Nov 2024 - 4:36 pm | Bhakti
अगदी बरोबर.सह्याद्री वाहिनीची कोणताही जुना कार्यक्रम पाहिला की दिवस सुंदर होतोच मन अस्सल मराठी भूतकाळात फेरी मारून येते.
4 Nov 2024 - 9:30 pm | शेखरमोघे
"अकिलिज" आणि भक्तिताई, धन्यवाद.
21 Nov 2024 - 9:45 am | श्रीगणेशा
आमच्या इथे वसाहत मोठी असल्याने अनेक मराठी कुटुंबे राहतात, साधारण ५० ते १०० असावेत. आमच्या कायप्पा समूहाचं नाव "मराठी कट्टा" ठेवलं आहे. पण बहुतेक सर्व संवाद इंग्रजीतूनच. किंवा फारतर रोमन लिपी वापरून. मोबाईलवर देवनागरी लिपीतील लिखाण एवढं सोपं झालं असताना, स्वतःच्या मातृभाषेत, देवनागरी लिपीत लिहिण्याचा एवढा कंटाळा का असावा?
21 Nov 2024 - 9:48 am | श्रीगणेशा
लेख आवडला.
निराशावादी वाटेल, पण कटू सत्य हेच आहे की, आपली मातृभाषा रोजगाराशी जोडण्याची संधी आपण कधीच गमावली आहे, असं मला वाटतं.
15 Dec 2024 - 4:29 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
15 Dec 2024 - 10:35 am | शेखरमोघे
प्रतिसादाबद्दल आभार. आपली मातृभाषा रोजगाराशी जोडण्याची संधी मिळण्यासाठी रोजचे सर्व तर्हेचे व्यवहार मातृभाषेतून (मराठीतून) होणे गरजेचे आहे. ते तर महाराष्ट्रातही मराठीतून होत नाहीत - जे काही थोडेबहुत होतात त्यासाठी ही इन्ग्रजी किन्वा हिन्दीचा पर्याय असतोच. अशी वस्तुस्थिती असतानाही, ती बदलण्याचा काहीच प्रयत्न न करता राज्यकर्ते वैद्यकीय आणि अभियान्त्रिकी शिक्षण आणि म्हणून त्याच्याशी निगडित व्यवहार मराठी भाषेतून होतील अशी आशा बाळगतात आणि दाखवतात. मराठी भाषेतून शिकलेल्याना महाराष्ट्राबाहेर व्यावसायिक किन्वा इतर कुठल्याच तर्हेच्या सन्धी उपलब्ध नसतील ही देखील लक्षात ठेवणे जरूर आहे.
15 Dec 2024 - 12:25 pm | मुक्त विहारि
वाखुसा
2 Jan 2025 - 9:12 am | शेखरमोघे
प्रतिसादाबद्दल आभारी
5 Jan 2025 - 8:14 pm | चौथा कोनाडा
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचा शासकीय अध्यादेश अर्थात जी आर अजूनही संबंधित संस्थांकडे पोहोचला नाही असे आज सांगितले. पण माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्व कागदपत्रे केंद्र शासनाकडे सुपूर्द केलेली आहेत आणि लोक जी चर्चा करत आहेत तिकडे दुर्लक्ष करावे असे सांगितले आहे.
आता काय खरे समजायचे ? अभिजात भाषेचा दर्जा देता देता दहा वर्ष अशीच मोदी सरकारने काढली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाषेचा दर्जा दिला दिल्याची घोषणा केली. आता प्रत्यक्ष जीआर काढायला किती दशकं लावणार ?
6 Jan 2025 - 3:21 am | मुक्त विहारि
माझ्या दृष्टीने तेच वाक्य...
निदान दहा वर्षांत तरी मोदी सरकारने, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला.१९५० ते २०१४ पर्यंत हे का जमले नाही?
------
आत्ता कुठे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. GR वगैरे सोपस्कार होत राहतील.