दिवाळी अंक २०२४ - कोण आहेत हे कलंदर चंदू जोशी ?

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in दिवाळी अंक
31 Oct 2024 - 6:00 am

कोण आहेत हे कलंदर चंदू जोशी?

मित्रांनो, मलाही तुमच्यासारखाच प्रश्न पडला होता. त्याचं उत्तर मिळालं, जेव्हा आम्ही त्यांना भेटलो!

त्या दिवशी दुपारी बरोबर साडेतीन वाजता मी आणि प्रफुल्ल भिष्णूरकर त्यांच्या सोसायटीत पोहोचलो. प्रफुल्लने त्यांच्या घराच्या दरवाजाची बेल वाजवली.. त्यांच्या म्हणजे अर्थातच चंदू जोशींच्या! एका मिनिटात दार उघडले गेले आणि सुहास्यवदने चंदू जोशी यांनी आमचे स्वागत केले. प्रफुल्लच्या खांद्यावर हात ठेवताना जोशींच्या डोळ्यांच्या भिंगाआडून जिव्हाळ्याची नजर पाझरली आणि उद्गारले, “आज मुहूर्त लागला म्हणायचा!” बऱ्याच दिवसांपासूनचा योग आज आला, याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. आम्ही त्यांच्या प्रशस्त फ्लॅटच्या सोफ्यावर बसते झालो.

त्याचे झाले होते असे.. चित्रकला, शिल्पकला या संदर्भात चंदू जोशी जेव्हा जेव्हा चित्रकार प्रफुल्ल भिष्णूरकर याला भेटत असायचे, चर्चा करायचे, तेव्हा जोशींचे लक्ष कायम प्रफुल्लच्या चेहऱ्याकडे जात राहायचे आणि त्याच्या चेहऱ्याचे शिल्प (बस्ट / अर्धपुतळा) करण्याच्या मोह चंदू जोशी यांना आवरायचा नाही. मग ते प्रफुल्लच्या मागे लागले! एक दिवस सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि बघायला मिळाली चंदू जोशी यांच्या कलाकारीची करामत! मॉडेल अर्थातच प्रफुल्ल!

आमच्याच समूहातील युवा शिल्पकार अश्विनी कुदळे हिला यायला उशीर होणार होता, म्हणून तिने आर्मेचर तयार करून पाठवले होते. आर्मेचर म्हणजे शिल्पासाठीचा सांगाडा. हा सळई, तारा, बांबू काड्या किंवा इतर सोयीच्या साहित्यापासून तयार करून एका पाटावर उभा केला जातो अन त्यावर शिल्प साकारले जाते. चंदू जोशींनी गप्पा मारत मारत ते आर्मेचर तपासून घेतले आणि “ओके” अशी समाधानाची मंजुरी दिली.

मॉडेलने कुठे बसायचे, मॉडेलच्या चेहऱ्यावर नैसर्गिक प्रकाश कसा पडणार, ट्यूब लाइटच्या प्रकाशाचा लाभ कसा होईल. मॉडेलच्या चेहऱ्याची नेमकी फीचर्स कशी हायलाइट होतील हे बघत प्रफुल्लच्या बसण्याची जागा नक्की केली. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. दारात उत्तम साठे शाडू मातीचे पोते खांद्यावर पेलत घामाघूम उभा. त्याला आत घेऊन पोते उतरवले. उत्तम साठे युवा पिढीतला चित्रकार-शिल्पकार, तरुण कलाकार पिढीचा लाडका! (सोशल मीडियावर त्याची माहिती / कलाकृती पाहायला मिळतील, आवर्जून पाहा. सिनेमा-नाटकातील कलानिर्मिती आणि कमर्शियल क्षेत्रातही त्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलीय.) पाठोपाठ लीना आढाव, रमेश खडबडे, रूपकांत जोशी, प्रचिती भिष्णूरकर, गणेश आढाव आदींचे आगमन झाले. ही सगळी आमच्याच समूहातील कलाकार मंडळी. शिल्पकला डेमो पाहायला उत्सुकतेने उपस्थित झाली होती. अकस्मात आलेली ही गर्दी पाहून चंदू जोशी जरा चकितच झाले. पण त्यांची कला बघण्यासाठी खास आलेत म्हटल्यावर खूशही झाले.
जमलेल्या मंडळींशी औपचारिक परिचय झाल्यावर प्रफुल्ल आणि उत्तम झपाट्याने कामाला लागले.

ओली शाडू माती तपासून सुधारणा करून चंदू जोशींना हवी तशी तयार करून पाटावर लावली. शाडू माती आर्मेचरवर थापून योग्य उंची आणि आकार तयार करून दिला.

1

चंदू जोशींनी प्रफुल्लचे पुन्हा एकदा मागून, पुढून, बाजूने निरीक्षण करून अदमास घेतला.

2

बारकाईने निरीक्षण करत चंदू जोशींनी शिल्प घडवायला सुरुवात केली. वेळोवेळी पाट हवा तसा फिरवून घेतला.

3

चेहऱ्याचे तंतोतंत चित्रण हवे असेल, तर वारंवार निरीक्षणे करत आकारात सुधारणा करून घ्याव्या लागतात. चंदू जोशी तर यात वाकबगार. हे करताना त्यांची तडफ तरुणाला लाजवेल अशी होती.

4

त्यांचे डोळे या मॉडेलच्या चेहऱ्याच्या विविध मितींचा वेध घेत होते आणि तसतशी वैशिष्ट्ये मातीवर साकारली जात होती. काही ठिकाणची माती काढली जात होती, तर काही ठिकाणी भर घातली जात होती. पातळीचा तोल सांभाळत एक एक फीचर उमटत होते.. चेहरा हुबेहूब घडत असल्याचे आम्ही सारे साक्षीदार होत होतो. शिल्प आता पूर्णत्वाकडे वाटचाल करत होते.

5

मॉडेलचे डोळे कोरून शिल्पात चैतन्य फुंकणे हे शेवटचे महत्त्वाचे काम. तेही नजाकतीने साकारले जात होते. पोताची घडणही काळजीपूर्वक केली जात होती.

6

मॉडेल आणि शिल्प.. तुलना करत आणखी आणखी भरीवकाम अन कोरीवकाम

7

..आणि काही वेळाने साकारले परिपूर्ण अप्रतिम सुंदर शिल्प!

8

(वरच्या प्रचित डावीकडील चित्रात डोळे कोरण्यापूर्वी)
सगळे फीचर्स पूर्ण झाले.. शिल्प साकारले! अप्रतिम सुंदर शिल्प !

हाच तो क्षण, हीच ती वेळ.. टाळ्यांच्या कडकडाटात जोरदार दाद!

9

हा कलंदर युवा कलाकार चंदू जोशी, ज्याचे वय आहे फक्त ९२ वर्षे! टाळ्यांचा कडकडाट थांबायचे नाव घेईना!
या अद्भुत अनुभवाचा बहर ओसरल्यावर आता मैफल होती गप्पांची आणि त्याबरोबर अर्थात चहापान. लगेच मी, गणेश अन लीना त्यांच्या कीचनमध्ये घुसलो. चहा, साखर, पातेले, कपबश्या, मोठे गाळणे, दूध इ. कुठे कुठे ठेवलेय, ते चंदू जोशींनी बाहेरूनच सांगत आमच्या 'चहा मेकिंग'ला चालना दिली.

10

कडक चहा आल्यावर चंदू जोशींसह चहापान आणि गप्पांमध्ये सर्व जण रंगून गेलो.

चंदू जोशी - अतिशय काटेकोर पण जिव्हाळा जपणारा माणूस. एकदा थोडेफार सूर जुळले की विश्वास टाकून नाते फुलवणार!

मागच्या दोन वेळा हा 'चहा मेकिंग' कार्यक्रम मी आणि माझ्या पत्नीने केला होता. तेव्हा चंदू जोशींच्या लाघवी स्वभावाच्या पत्नी होत्या. या वेळी त्यांची उणीव भासली. जिव्हाळा जपणारा कलंदर कलाकार आणि लाघवी स्वभावाची जोडीदारीण पत्नी (कोविड साथीनंतर त्या दीड-दोन वर्षांनी निवर्तल्या) म्हटल्यावर सहजीवन किती आनंदी आणि समाधानी असेल, याची कल्पना करू शकतो!

चंदू जोशी अर्थात नाव चंद्रशेखर गणेश जोशी. निष्णात चित्रकार, शिल्पकार, कलाअध्यापक! चित्रकलेतील आणि शिल्पकलेतील सर्व माध्यमांमध्ये हातखंडा! विद्यार्थी, सहकारी आणि मित्रांमध्येही चंदू जोशी या नावाने अतिशय लोकप्रिय!

त्यांचा बायोडेटा पहिला, तर अचंबित व्हायला होते.

बी.ए. (फाइन आर्ट्स – शिल्पकला) : १९५१ ते १९५५

बडोदा युनिव्हर्सिटीमधून मास्टर्स इन फाइन आर्ट्स आणि शिल्पकला – १९५५ ते १९५७

१९५८ साली अजमेर (राजस्थान)मधील प्रतिष्ठित अशा मेयो कॉलेजमध्ये कलाअध्यापक म्हणून सेवेस सुरुवात. (मेयो कॉलेज हे १५० वर्षांपूर्वी ब्रिटिशकाळात स्थापन झालेले नामांकित राजेशाही कॉलेज आहे.) तब्बल ३२ वर्षांच्या सेवेनंतर १९९०मध्ये इथूनच हेड ऑफ डिपार्टमेंट (आर्ट अँड क्राफ्ट्स) म्हणून सेवानिवृत्त. इथे ते क्रिकेट विभागाचेही इन-चार्ज होते.

आणि कला?

चित्रकला : रंगीत पेन्सिल, पेस्टल खडू, जलरंग, तैलरंग इ.मध्ये हातखंडा
शिल्पकला : माती, प्लास्टर, लाकूड, पाषाण, धातू इ.मध्ये सिद्धहस्त

पारितोषिके : अनेक! उदाहरणार्थ – बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे शिल्पकलेसाठी दिले जाणारे अतिशय प्रतिष्ठित असे सर जॉन मथई पारितोषिक

पदव्युत्तर कला शिक्षणासाठी इटालियन सरकारतर्फे शिष्यवृत्ती. यानिमित्त वर्षभर इटलीमध्ये राहण्याची संधी. इथे त्यांनी संगमरवर आणि ब्राँझ धातू माध्यमातील शिल्पकलेचे उच्चशिक्षण घेतले.
आणि अर्थातच अनेक बक्षिसे.

निरागस, प्रसन्न, टवटवीत व्यक्तिमत्त्व, युवकांसारखी सळसळती ऊर्जा दाखवणारे, थेट संवाद साधणारे आणि पोरांमध्ये पोर होऊन वावरणारे चंदू जोशी विद्यार्थिवर्गामध्ये प्रिय व्हायला वेळ लागला नाही. स्वत:चे हात काळे, रंगीत करत, पोरांमध्ये बसकण मारून चित्र काढून दाखवायला कसलाच संकोच नसे. त्यामुळे सी.जी. जोशी सर कधी सर्वांचे आवडते चंदू जोशी होऊन पोरांचे दोस्त झाले, हे कळले नाही.

त्यांचा फ्लॅट प्रशस्त आहे. आतल्या दोन प्रशस्त खोल्यांमध्ये कॅनव्हास, इझल्स, ब्रशेस इ.बरोबर स्केच केलेली पॅड्स, वॉटर कलर पेंटिंग, ऑइल पेंटिंग असा सगळा संसार. (यावर वेगळा लेख लिहावा लागेल.) प्रत्येक दिवशी नवीन टास्क आणि त्याची साकारणी. या खोल्यांमध्ये कलाप्रेमींना मुक्त प्रवेश अन जिव्हाळ्याने स्वागत! शिल्पे घरभर विखुरलेली. विविध स्टँडवर ठेवलेली दिसतात. त्यांची काही शिल्पनिर्मिती नमुन्यादाखल -

11

लाकडतील करामत.. अर्थात काष्ठशिल्प

12

शिल्पातील वेग-आवेग

13

पुढील शिल्पाची आठवण तर खासच आहे. भारतीय चित्रसृष्टीचे मुगल-ए-आज़म म्हणून ओळखले जाणारे स्व. पृथ्वीराज कपूर यांनी जेव्हा मेयो आर्ट कॉलेजला भेट दिली, तेव्हा तिथले कलाशिक्षण आणि कलानिर्मिती पाहून खूश झाले. रंगमंच, मूकपट, बोलपट असा तळापासूनचा प्रवास करत ते उच्च स्थानी पोहोचले होते. कलाक्षेत्राबद्दल त्यांचे प्रेम सर्वश्रुत होते (आणि तो काळही तसा होता.)

मेयो आर्ट डिपार्टमेंटला भेट दिल्यावर शेवटी त्यांनी चंदू जोशींच्या शिल्पकृती पाहिल्या. त्यांच्या कलाकारीवर ते बेहद्द खूश झाले आणि मुक्तकंठाने प्रशंसा केली. ही संधी साधून चंदू जोशींनी त्यांचा अर्धपुतळा - बस्ट करू शकतो का आणि त्यासाठी सिटिंगला वेळ देण्याची विनंती केली. स्व. पृथ्वीराज कपूर यांनी आनंदाने मान्य करत खास वेळ काढून सिटिंग दिले. हा डेमो पाहायला मोठी गर्दी झाली होती आणि अर्थातच त्यांच्या कलेला मोठी दाद मिळाली. खाली फोटोत दिसतोय ती ब्रो नज मध्ये ओतलेली कलाकृती आहे आणि त्याच्या काही प्रतिकृती वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या आहेत.

14

'The Teacher who is indeed wise does not bid you to enter the house his wisdom but rather leads you to the threshold of your mind' – Khalil Gibran

हे सुंदर वाक्य कोरलेय त्या जीवन गौरव पुरस्कार मानपत्रात, जे मेयो कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी त्यांना सन २०१२ साली विशेष जीवन गौरव पुरस्कार दिला, त्यात आहे. आपले जीवन घडवणाऱ्या या गुरूला अशा सुंदर पद्धतीने मानवंदना मिळणे ही एक संस्मरणीय भेट आहे.

हं.. तर तुम्हाला काय सांगत होतो..

तर ते विद्यार्थी, सहकारी आणि मित्रांमध्ये तर लोकप्रिय आहेतच, अन वर क्रिकेटपटू मित्रांमध्येही चंदू जोशी लोकप्रिय!
क्रिकेटपटू मित्रांमध्येही? हो, कारण ते बडोदा आणि राजस्थान क्रिकेट संघातर्फे रणजी ट्रॉफीत खेळलेले नावाजलेले लेग स्पिनर आहेत. बडोदा संघातर्फे ५ वर्षे आणि राजस्थान संघातर्फे चक्क १९ वर्षे. १९५२-५३ दौऱ्यात बडोदा इथे खेळल्या गेलेल्या गुजराथविरुद्धच्या सामन्यात सेंच्युरी स्टार! शतकवीर! आणि १९७५मध्ये दिल्लीविरुद्धच्या सामन्यात ७६ धावांत १० विकेट्स!

प्रथम श्रेणी क्रिकेट ९६ सामने आणि २९२ विकेट्स अशी जोरकस कारकिर्द.

सलग ६ वर्षे दुलिप ट्रॉफी, सेंट्रल झोनतर्फे प्रतिनिधित्व.

इराणी ट्रॉफी उर्वरित भारत (रेस्ट ऑफ इंडिया) संघातफे सलग ६ प्रतिनिधित्व.
सर्वोत्तम ५ क्रिकेटपटू ( फाइव्ह बेस्ट क्रिकेटर)पैकी एक म्हणून गौरवण्यात आले.

अजित वाडेकर, विजय मांजरेकर, सुभाष गुप्ते, एकनाथ सोलकर, वेंकटराघवन, नरी कॉन्ट्रॅक्टर, चंदू बोर्डे, सुधीर नाईक, चंदू पाटणकर आणि पुढील पिढीतील सुनील गावसकर, गुंडाप्पा विश्वनाथ, चंद्रशेखर, इरपल्ली प्रसन्ना आदी खेळाडूंबरोबर क्रिकेट उपभोगलेले दिवस हा त्यांच्या भावविश्वाचा अमूल्य ठेवा आहे.

कै. शिरीष कणेकर यांनी साधारण २० वर्षांपूर्वी दै. लोकसत्तामधल्या 'बिशनसिंग कह गये..' या लेखाचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. गोऱ्या क्रिकेटपटूंचे अतिकौतुक करत त्यांना थोर मानणे या वृत्तीवर टीका करताना ते लिहून जातात - 'शेन वॉर्न अजिबात एवढा मोठा गोलंदाज नाही. तो षटकात दोन किंवा तीन खराब चेंडू टाकतो. सुभाष गुप्ते तर जादूगर होता.. पण राजस्थानचा चंदू जोशीही वॉर्नपेक्षा सरस लेग स्पिनर होता..' यातला तुलनात्मक / अतिशयोक्तीचा भाग सोडला, तर असे गौरवले जाणे किती मोठी गोष्ट आहे!

या वर्षी लिटल मास्टर सुनील गावसकरचा ७५वा वाढदिवस नुकताच साजरा झाला. त्यानिमित्त गावसकरांनी आपल्या क्रिकेटपटू आणि खास मित्रांसाठी नुकतीच एक पार्टी दिली. त्यात चंदू जोशी यांना विशेष निमंत्रण होते. नंतर त्यांनी एक विशेष व्हिडिओ प्रसारित करत सर्वांना ही क्षणचित्रे शेअर केली. त्यात चंदू जोशींचा आदराने उल्लेख केलाय. काही क्षणचित्रे -

15

क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्यासमवेत

16

क्रीडाक्षेत्रात तर त्यांचे चाहते आहेतच आणि नाटक, सिनेमा, सांस्कृतिक क्षेत्रातही - नाना पाटेकर यांच्यासमवेत

17

सचिन खेडेकर यांच्यासमवेत

18

आता परत बॅक टू स्क्वेअर, प्रफुल्ल याची सुंदर शिल्पकृती साकारली, टाळ्यांचा कडकडाटात दाद मिळाली, फक्कड चहापान आणि गप्पांचा झकास कार्यक्रम पार पडला. आता वेळ आली होती त्यांचा निरोप घेण्याची! प्रफुल्लने त्यांना शाल-श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला. कलाकार स्मरणिकाही प्रदान करण्यात आली. त्या वेळी भारून जाऊन भावना व्यक्त करताना मा. चंदू जोशी

१९

या वेळी स्मरणिकेतल्या कलाकारांची माहिती आणि त्यांच्या कलाकृती पाहून आनंद व्यक्त केला. सोबत लीना आढाव, रमेश खडबडे, उत्तम साठे इ. कलाकार

20

सुंदर शिल्प आणि कलंदर शिल्पकार यांच्यासह फोटो - कायम आठवणीत ठेवण्याजोगा.
आम्ही सर्व (डावीकडून) रूपकांत जोशी, भाग्येश अवधानी, रमेश खडबडे, लीना आढाव, मा. चंदू जोशी, उत्तम साठे, गणेश आढाव इ. आणि दोन छोटे कलाकार :

21

खरेच.. कलंदर अशा मा. चंदू जोशी अशा ऋषितुल्य कलाकाराबरोबर असे क्षण अनुभवणे ही आयुष्याच्या पटावरील अविस्मरणीय आठवण म्हणावी लागेल.

22

ऋषितुल्य कलाकार मा. चंदू जोशी यांना मानवंदना देण्यासाठी कितीही शब्दांची उधळण केली, तरीही कमीच वाटेल!

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

31 Oct 2024 - 2:43 pm | पाषाणभेद

चांगली ओळख करून दिलीत. शिल्पकला छानच आहे.

चौथा कोनाडा's picture

2 Nov 2024 - 1:15 pm | चौथा कोनाडा

मनःपूर्वक धन्यवाद, पाषाणभेद.

श्वेता२४'s picture

1 Nov 2024 - 1:54 pm | श्वेता२४

तुम्ही असं वर्णन केला आहे की वाचक प्रत्यक्ष तिथे नसला तरी तुमच्या लिखाणाच्या द्वारे तिथेच सर्व काही पाहत आहे . पहिले शाळू मातीचे गोळे पाहून मला असे वाटले की आता यातून कसे काय शिल्प होईल बरे? त्यातही श्री प्रफुल्ल सरांचे शिल्प करणे सोपे नाही. कारण दाढीचा आकार इत्यादी. पण तुम्ही टप्प्याटप्प्याने जी काही फोटो टाकले आहेत ते पाहता आता पुढे काय होईल याची उत्सुकता होती आणि शेवटचा फोटो बघताच बाप रे!! असे वाटले. ते हुबेहुब शिल्प बघून इतका आनंद झाला म्हणून सांगू? वा!! मजा आली!!! श्री. चंदू जोशी सरांबद्दल माहित नव्हते .अशा अष्टपैलू कलाकाराची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!!!

चौथा कोनाडा's picture

3 Nov 2024 - 11:41 am | चौथा कोनाडा

खुप सुंदर अभिप्राय !

श्री प्रफुल्ल सरांचे शिल्प करणे सोपे नाही. कारण दाढीचा आकार इत्यादी.

अगदी नेमकं हेरलंत ! .. खरोखरच , त्यांनी याचा कसा आदमास घेतला असेल आणि ते कसं उतरवलं असेल याचं मला तेव्हाही नवल वाटलेलं (आणि आताही वाटत आहे)
तुमचा हा सुंदर प्रतिसाद त्यांच्या पर्यंंत पोहोचवत आहे !

मन:पुर्वक धन्यवाद, श्वेता२४ !

नठ्यारा's picture

2 Nov 2024 - 6:04 pm | नठ्यारा

एकदम शॉल्लेट चौफेर फटकेबाजी आहे. सृजनशील हाताची व त्यामागील माणसाची ओळख करवून दिलेला लेख आवडला.
-नाठाळ नठ्या

चौथा कोनाडा's picture

5 Nov 2024 - 12:41 pm | चौथा कोनाडा

मनःपूर्वक धन्यवाद, नठ्यारा.

अथांग आकाश's picture

3 Nov 2024 - 7:05 pm | अथांग आकाश

मस्त लेख आहे!

चौथा कोनाडा's picture

6 Nov 2024 - 8:24 pm | चौथा कोनाडा

मनापासुन आभार, अथांग आकाश.

कर्नलतपस्वी's picture

5 Nov 2024 - 1:54 pm | कर्नलतपस्वी

ऋषितुल्य कलाकार मा. चंदू जोशी यांना मानवंदना देण्यासाठी कितीही शब्द लिहीले तरी कमीच.

दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती.

कडक मानवंदना.

चौथा कोनाडा's picture

6 Nov 2024 - 8:26 pm | चौथा कोनाडा

दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती.

अगदी परफेक्ट मानवंदना....

मनःपुर्वक धन्यवाद, कर्नल साहेब !

एका महान कलातपस्वीची सुंदर ओळख. ते नामवंत क्रिकेटपट्टू पण होते हे तुमच्या या लेखामुळेच माहित पडले. तुमची समर्पक वर्णन शैली आणि त्यासोबत अनुरुप छायाचित्रे यामुळे लेखाला चार चांद लागले आहेत. अजुनही माहित नसलेली अशी काही अज्ञात रत्ने तुम्ही तुमच्या सिद्ध हस्त लेखणीने ज्ञात करुन द्याल हि अपेक्षा.
गावस्कर, संदीप पाटिल, नाना पाटेकर या नामवंतांबरोबरची चंदु कुलकर्णी यांची छायाचित्रे खासच !! धन्यवाद चौको.

चौथा कोनाडा's picture

6 Nov 2024 - 8:36 pm | चौथा कोनाडा


कलातपस्वीची सुंदर ओळख.


खरोखरच तपस्वी म्हणायला हवेत ! आज वयाच्या ९२ व्या वर्षी इतक्या कमी वेळेत अशी कलाकृती साकार करतात केवढी तपस्या असेल त्यांची !

स्वतः कोविड साथीत बालंबाल बचावले, पत्नीने कोविड साथीनंतर त्या दीड-दोन वर्षांतच जगाचा निरोप घेतला ... तरी ही प्रतिकुल परिस्थितीतून उभारी घेत पुन्हा कला-व्यासंग सुरु केला... काय म्हणावे या उभारीला ? ..शब्दच नाहीत ...
...... हे सगळं .. हरुन सुद्धा परत मैदानात उतरुन जिंकायची जिद्द धरायची हे कदाचित दिर्घ काळ क्रिकेट खेळल्यामुळेचं साध्य होत असेल ?

मनापासून आभार, बबन ताम्बे .. हा समर्पक अभिप्राय दिल्याबद्दल !

करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
लेख वाचनीय झाला आहे.

चौथा कोनाडा's picture

11 Nov 2024 - 4:15 pm | चौथा कोनाडा

मनःपूर्वक धन्यवाद, स्वधर्म.

सविता००१'s picture

7 Nov 2024 - 9:42 pm | सविता००१

वाचनखूण साठवूनच ठेवली आहे .या तपस्व्याला प्रणाम

चौथा कोनाडा's picture

11 Nov 2024 - 4:56 pm | चौथा कोनाडा

मनापासून धन्यवाद. सविता जी

आज वयाच्या ९२ व्या वर्षी इतक्या कमी वेळेत अशी कलाकृती साकार करतात केवढी तपस्या असेल त्यांची !

🙏
अतिशय सुरेख पद्धतीने ओळख करुन दिली आहे तुम्ही ह्या कलंदर व्यक्तीमत्वाची!
लेख खुप आवडला 👍

चौथा कोनाडा's picture

11 Nov 2024 - 4:56 pm | चौथा कोनाडा

मनापासून धन्यवाद. टर्मीभाऊ !

MipaPremiYogesh's picture

17 Nov 2024 - 2:26 am | MipaPremiYogesh

काय अशक्य प्रकार आहे हा..लेख मस्त जुळून आहे..काय vrushitulya व्यक्तिमत्त्व आहे...अप्रतिम

चौथा कोनाडा's picture

21 Nov 2024 - 7:07 pm | चौथा कोनाडा

मनापासून धन्यवाद, मिपाप्रेमीयोगेश !