दिवाळी अंक २०२४ - कधी कधी असं घडतं

नूतन's picture
नूतन in दिवाळी अंक
31 Oct 2024 - 6:00 am

कधी कधी असं घडतं
(गाय दी मोपासां यांच्या 'इन द वूड' या कथेचा भावानुवाद)

मेयरसाहेब नुकतेच नाश्ता करायाला बसले होते, तोच ग्रामीण पोलीस ठाण्याचा एक हवालदार निरोप घेऊन आला.. दोन आरोपींना अटक केली आहे आणि इन्स्पेक्टरसाहेब 'होटेल डी विले' इथे थांबले आहेत.

नाश्ता आटोपून मेयरसाहेब त्या स्थळी पोहोचले. खोलीमध्ये इन्स्पेक्टरसाहेब एका जोडप्यासोबत बसलेले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर चिंतातुर भाव दिसत होते.

जोडप्यापैकी जो गृहस्थ होता, तो वयाने प्रौढ आणि अंगाने जरा स्थूल होता. त्याच्या नाकाचा शेंडा लालसर आणि डोक्यावरचे केस पांढरे झालेले होते. त्याची मुद्रा काहीशी उदास, खिन्न होती. याउलट त्याच्यासोबतची बाई मात्र गुलाबी गालांची होती आणि आपल्याला अटक करणाऱ्या इन्स्पेक्टरकडे बेपर्वा नजरेने पाहत होती.

"काय प्रकार आहे?" मेयरसाहेबांनी विचारलं. इन्स्पेक्टरसाहेब सांगू लागले,
"गळ्याशपथ सांगतो, साहेब.. रोजच्या शिरस्त्याप्रमाणे मी सकाळी गस्त घालत होतो. गस्त घालत घालत मी चॅम्पीओक्सच्या वनराईत थेट अर्जेंटिलच्या हद्दीपर्यंत गस्त घालत असताना मला काही विशेष असं आढळलं नाही. छान ऊन पडलं होतं. गव्हाची रोपं मस्त तरारून आलेली दिसत होती. सगळं ठीकठाक होतं. इतक्यात त्या ब्रेडेलबाबाचा मुलगा, जो त्याच्या मळ्यात चालला होता, त्याने मला बोलावलं आणि म्हणाला, "वनराईच्या सीमेपाशी जा. तिथे जी गर्द झाडी आहे ना, तिथे तुम्हाला पारव्यांची एक जोडी दिसेल. मला तर वाटतं, कमीत कमी एकशे तीस वर्षांची तरी असतील ती पाखरं!"

तशी मग त्याने सांगितलं त्या दिशेने जात, मी गर्द झाडीत शिरलो. माझ्या कानावर जे काही शब्द आले, ते ऐकता खातरी पटली की अगदी खुल्लम खुल्ला काही तरी अनैतिक कृत्य इथे चालू आहे! म्हणून मग आवाज न करता गुडघ्यावर रांगत रांगत तिथे गेलो आणि त्यांना काही समजायच्या आत दोघांचं बखोट धरून घेऊन आलो.

"हम्म.."
मेयरसाहेबांनी निश्वास सोडला. आरोपीकडे त्यांनी जरा विस्मयानेच बघितलं. कारण जोड‌प्यातला पुरुष नक्कीच साठीचा होता आणि ती बाई कमीत कमी पंचावन्न वर्षाची तरी!

मेयरसाहेबांनी प्रथम त्या पुरुषाला प्रश्न विचारायला सुरुवात केली.
"नाव काय तुझं?"
क्षीण आवाजात तो उत्तरला, "निकोलस ब्यूरेन."
"कामधंदा काय करतोस?"
"किरकोळ वस्तू विकतो साहेब. कुठे फण्या, कंगवे, पिना, नाड्या.. पॅरिसमध्ये 'रु दे मार्टीअ'वर. (हा पॅरिसमधील बाजारपेठ, रेस्टॉरंट इत्यादींनी गजबजलेला एक प्रसिद्ध रस्ता आहे.)
"मग इथे वनराईत काय करत होतास, हं?"
यावर तो गप्पच राहिला.आपल्या सुटलेल्या पोटाच्या दोन्ही बाजूंना हात लटकते ठेवून तो खाली मान घालून उभा राहिला. मेयरसाहेबांनी विचारलं,
"इन्स्पेक्टरसाहेबांनी केलेले आरोप तुला मान्य आहेत का?"
"होय साहेब!"
"कबूल?"
"कबूल, साहेब!"
"तुला आणखी काही सांगायचं आहे?'"
"नाही, साहेब."
"तुझ्या या गैरवर्तनात सहभागी असलेली ही साथीदार कुठे भेटली तुला?"
"ती माझी बायको आहे साहेब!"
"तुझी बायको?"
"होय, साहेब!"
"अच्छा, म्हणजे मग तुम्ही दोघं पॅरिसमध्ये एकत्र राहात नाही वाटतं!'
"माफ करा साहेब, पण आम्ही एकत्रच राहतो."
कपाळावर हलकेच मुठीने आपटत मेयरसाहेब म्हणाले,
"ओह! म्हणजे मग नक्कीच तुमचं डोकं फिरलेलं असलं पाहिजे! या गावाकडच्या वनराईत हे असे प्रेमाचे चाळे? तेही दिवसाढवळ्या, सकाळी दहा वाजता? ठार वेडे असले पाहिजेत तुम्ही!"

निकोलसचा चेहरा शरमेने लाल झाला. तो अगदी रडवेला होत पुटपुटला, "हिने.. साहेब, हिने मला मोहात पाडलं. खरं तर मी म्हणालो होतो, काय हा वेडेपणा! पण तुम्हाला माहीत आहे ना साहेब, बायकांनी एखादी गोष्ट एकदा डोक्यात घेतली की.. ब्रह्मदेवसुद्धा काही करू शकत नाही!"

निकोलसच्या बोलण्यावर मंद स्मित करत मेयरसाहेब म्हणाले, "पण तूपण काहीतरी केलं असशीलच ना! ही फक्त तिच्या डोक्यातली गोष्ट असती, तर तू इथे सापडला असतास का?"

आता मात्र निकोलस एकदम रागाने बायकोकडे बघत म्हणाला, "बघितलंस! तुझ्या त्या रम्य कल्पनेचे काय परिणाम झाले आहेत ते! आता या वयात आपल्याला कोर्टाची पायरी चढावी लागणार आणि तेसुद्धा अनैतिक वर्तनाच्या गुन्ह्यासाठी! त्याशिवाय आता दुकान बंद करावं लागेल, बेअब्रू होईल. चंबूगबाळं आवरून दुसऱ्या गावी जावं लागेल! हे असं सगळं होणार आता!"

मॅडम निकोलस उठून उभ्या राहिल्या. नवऱ्याकडे न बघता त्यांनी आपली बाजू मांडायला सुरुवात केली. उगाचच खोटा विनय वगैरे न दाखवता स्पष्टपणे बोलायला सुरुवात केली.
"साहेब, मला कल्पना आहे की आमच्या या वर्तनाने आम्ही आमचं जरा हसू करून घेतलं आहे. पण मी जरा माझी वकिली करू का? किंवा असाम समजा की एका गरीब स्त्रीची व्यथा मी मांडते आहे. आणि मला आशा आहे की माझं म्हणणं ऐकल्यावर तुम्ही आम्हाला घरी जाऊ‌ द्याल. अटक होण्याच्या दोषातून आम्हाला मुक्त कराल.

खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. त्या वेळी मी तरुण होते. याच गावामध्ये एका रविवारी निकोलसशी माझी ओळख झाली. त्या वेळी तो एका कापडाच्या दुकानात कामाला होता आणि मी तयार कपड्यांच्या एका दुकानात कामाला होते. त्या सगळ्या गोष्टी मला अगदी काल घडल्याइतक्या स्वच्छ आठवत आहेत. त्या काळी रविवारी मी माझ्या मैत्रिणीबरोबर कधीकधी सुटी घालवण्यासाठी इथे येत असे. माझ्या‌ मैत्रिणीचं नाव होतं 'रोझ'. रोझ आणि मी दोघीही 'रु पिगेल'मध्ये राहायचो. 'रोझ'चा एक प्रियकर होता आणि माझा मात्र कुणीच नव्हता! रोझ आणि सिमोन - म्हणजे तिचा प्रियकर मला इथे, या वनराईत कधीकधी घेऊन यायचे. अशाच एका शनिवारी तो हसत हसत मला म्हणाला, "उद्या एकटीने यायचं नाही, बरं का! एखाद्या मित्राला सोबत घेऊन यायचं. कळलं का?"

त्याच्या बोलण्याचा मथितार्थ माझ्या लक्षात आला होता साहेब! पण मी म्हणाले, "कठीण आहे! मी अत्यंत सदाचारी आहे. त्यामुळे हे असलं मला काही जमेल असं वाटत नाही."

तरीही दुसऱ्या दिवशी आम्ही आलो आणि तेव्हा एक अनोळखी तरुण, रोझ आणि सिमोनबरोबर आला होता. रेल्वे स्टेशनवर रोझने माझी त्याच्याशी ओळख करून दिली. तो तरुण म्हणजेच हे मि. निकोलस. त्या वेळी मि. निकोलस देखणे दिसायचे. ही ओळख करून देण्यामागचा हेतू माझ्या ध्यानात आला‌ होता. पण तरीही मी ठरवलं की आपण काही याच्या पुढे जायचं नाही. त्याप्रमाणे मी वागलेदेखील. मग आम्ही चौघे जण - म्हणजे मी, रोझ, सिमोन आणि मि. निकोलस असे या इथे, या वनराईत आलो. इतका सुंदर आणि प्रसन्न दिवस होता तो! कोणाचंही हृदय प्रफुल्लित होईल असा! ते वातावरणच असं होतं ना, की तेव्हाच कशाला, आजही अशा वातावरणात मी अगदी बेभान होऊन जाते. इथलं हे हिरवंंगार, मऊ गवत, त्यावर उमललेली पॉपीची लालचुटुक फुलं, हवेवर डोलणारे ते 'डेझी'च्या फुलांचे नाजूक ताटवे या सगळ्याने मी अगदी धुंद होऊन जाते. क्वचित कधीतरी 'शॅम्पेन' पिणाऱ्या माणसासारखी गत होऊन जाते माझी!

'त्या' दिवशीचं उबदार वातावरण, स्वच्छ सूर्यप्रकाश, मोकळी हवा हे सारं डोळ्यातून, श्वासातून माझ्या शरीरात झिरपायला लागलं. तिकडे रोझ आणि सिमोन चालता चालता मिनिटा‌‌मिनिटाला एकमेकांना चुंबत‌ होते, मिठ्या मारत होते! इकडे माझी मन:स्थिती मात्र फारच विचित्र झाली होती. आणि मला वाटतं मि. निकोलस यांचीही तीच गत झाली असावी! म्हणून मग आम्ही दोघे त्यांच्या मागून चालू लागलो. तसे आम्ही गप्प गप्पच चालत होतो. कारण बघा ना, पुरेशी ओळख नसते तेव्हा काय बोलणार ना आपण एकमेकांशी? मि. निकोलस जरा बुजल्यासारखे वागत होते. त्यांचं ते गोंधळणं बघून मला खूप गंमत वाटत होती. चालत चालत आम्ही चौघे जण वनराईच्या दाट झाडीत शिरलो. इथली हवा अगदी मस्त, थंडगार होती. एक चांगलीशी जागा बघून आम्ही चौघे जण जण बसलो.

"अशा वातावरणात एक तरुण आणि एक तरुणी असे निर्विकार कसे राहू शकतात?" रोझ आणि सिमोन आम्हाला चिडवत होते. पण मी माझ्या विचारांवर ठाम होते. काय करणार? माझा स्वभाव होता खरा तसा!

मग पुन्हा त्यांचं चुंबन घेणं, मिठ्या मारणं सुरू झालं. आम्ही दोघं जणू काही तिथे नव्हतोच असं त्यांचं प्रणयाराधन चालू होतं. थोड्या वेळाने ते एकमेकांच्या कानात काहीतरी कुजबुजले आणि सरळ उठून आणखी आतल्या झाडीत गेले. आता तुम्ही कल्पना करा की माझी अवस्था काय झाली असेल? त्या निर्जन ठिकाणी मी एका अनोळखी तरुणाबरोबर बसले होते. काही वेळ असाच गेला आणि मग मी थोडा धीर केला आणि मि. निकोलसशी बोलायला सुरुवात केली.

मी विचारलं, "तुम्ही काय कामधंदा करता?"
तर ते म्हणाले की ते एका कापडाच्या दुकानात साहाय्यक म्हणून काम करतात. मघाशी मी हे सांगित‌लंच आहे. थोडा वेळ असं संभाषण झाल्यावर मि. निकोलसनाही जरा धीर आला. इतका की, आपण पण या एकांताचा थोडा उपयोग करून घेऊ या का? असं म्हणायला लागले! पण मी स्पष्ट नकार दिला आणि म्हटलं, मि. निकोलस, कृपया मर्यादा ओलांडू नका. काय? आठवतं आहे ना मि. निकोलस?"

संभ्रमित स्थितीत असलेले मि. निकोलस नजर खाली करून उभे होते. ते काहीच बोलले नाहीत. मग बाईसाहेबांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली.

"तर माझं बोलणं ऐकून मि. निकोलस समजले की मी त्यातली बाई नाही! मग मात्र एखाद्या सभ्य गृहस्थाप्रमाणे ते माझ्याशी बोलू लागले. पण या घटनेनंतर काही दिवसांतच ते माझ्या प्रेमात पडले आणि मग दर रविवारी आमच्या भेटी घडू लागल्या. मलापण ते खूप आवडायला लागले होते. होतेच ते तसे आवडण्यासारखे! थोडक्यात काय! आम्ही लवकरच विवाहबद्ध झालो आणि मग 'रु दी मार्टिअ'वर आमचा हा छोटासा व्यवसाय आम्ही सुरू केला.

तुम्हाला कल्पना आहेच साहेब, व्यवसाय करताना सुरुवातीचा काळ किती कठीण असतो ते! व्यवसायात स्थिरावण्यात आमची बरीच वर्षं गेली. या काळात निवांतपणे कुठे जायला सवडच झाली नाही. शिवाय 'पैसा' हीपण एक महत्त्वाची गोष्ट असते, नाही का? व्यवसाय करणाऱ्या माणसांचं सगळं लक्ष असतं 'कॅश-बॉक्स'वर. प्रेमालाप करायला कुठे महत्त्व उरतं तेव्हा! तर असंच प्रेमाशिवाय आम्ही जगत राहिलो आणि म्हातारे होत गेलो. आणि असं आहे साहेब, आपण काय गमावलं आहे हे जोवर समजत नाही, तोवर त्याची खंत आपल्याला वाटत नाही.

काही वर्षांनंतर आमचा व्यवसाय छान चालू लागला, आमच्या भविष्याबद्दल आम्ही थोडे निश्चिंत झालो आणि मग एक दिवस... मला काय झालं कोण जाणे! मला एकदम अल्लड युवती झाल्यासारखं वाटाय‌ला लागलं. दुकानाच्या गल्ल्यावर मी बसलेली असायचे आणि रस्त्यावर फुलांनी भरलेली हातगाडी जाताना बघितली की हृदयाचे ठोके वाढायला लागायचे. 'व्हायलेट'च्या फुलांचा सुगंध नाकावाटे शरीरभर भिनायला लागायचा. मी खुर्चीतून उठून बाहेर यायचे. मोकळं आकाश डोळे भरून बघायचे. आकाश बघता बघता माझ्या डोळ्यासमोर वळणं घेत धावणारा नदीचा प्रवाह दिसू लागायचा. 'स्वॅलो' पक्षी उडताना दिसायचे आणि जणू काही नदीच्या पाण्यात विहरणाऱ्या माशांप्रमाणे ते आभाळात विहार करायचे. आयुष्यात असे काही क्षण येतात, ज्या वेळी असं वाटतं की आहे ते सगळं सोडून या क्षणी आपल्याला हवं ते, आपल्याला आवडतं ते करावं! मला कधीकधी खूप वाईट वाटतं. वाटायचं, गेल्या वीस-तीस वर्षांत चारचौघांसारखे आम्हीपण असं निसर्गाच्या सहवासात, मजा‌‌ करायला गेलो असतो तर? इतरांसारखं आम्हीदेखील प्रणयरंगात काही काळ तरी बुडून गेलो असतो ‌तर? मला वाटू लागलं की हिरव्यागार वनात, एखाद्या वृक्षाखाली एकमेकांच्या मिठीत पडून राहावं! चांदण्या रात्री एकमेकांच्या सहवासात न्हाऊन निघावं!

त्या दिवसापासून हा विचार अहोरात्र माझ्या मनात घोळू लागला. सुरुवातीला हा विचार फक्त माझ्या मनातच होता. निकोलसपाशी तो बोलून दाखवायचं धाडस मला होत नव्हतं. मला वाटायचं, तो माझी चेष्टा करेल. म्हणेल, "जा, त्यापेक्षा दुकानात बसून दोरे-पिना विक." पण कबूल करते, निकोलस असं काही म्हणाला नाही. शिवाय जेव्हा जेव्हा मी आरशासमोर उभी राहायचे, तेव्हा मला जाणवायचं की कुणाला आकर्षण वाटेल अशी मी कुठे आहे आता? पण तो विचार माझा पिच्छा काही केल्या सोडत नव्हता. शेवटी एक दिवस हिय्या करून मी निकोलसला म्हणाले, "निकोलस, आपण सगळ्यात प्रथम वनराईत जिथे भेटलो, तिथे जाऊ या आपण एकदा ?" माझ्या डोक्यात जे चालू होतं, त्याचा याच्याशी काही संबंध असेल असं निकोलस‌ला बहुधा वाटलं नसावं! त्यामुळे फारसे आढेवेढे न घेता तो तयार झाला आणि मग आज सकाळी नऊ वाजता आम्ही इथे, म्हणजे या वनराईत आलो.

इथे आल्यावर मला वीस वर्षांनी तरुण झाल्यासारखं वाटलं. 'स्त्री मनाने नेहमीच तरुण असते!'..
मी गव्हाच्या शेतातून धावत गेले, बागडले! त्या वेळी माझा हा नवरा, आत्ता दिसतोय तसा नाही हं, पहिल्यांदा भेटलो होतो तसा दिसू लागला मला! देवाशपथ सांगते, मी अगदी उन्मादित झाले होते. मी त्याला जवळ ओढलं आणि भराभर त्याची चुंबनं घेऊ लागले. माझ्या या कृतीने तो इत‌का अचंबित झाला की कदाचित मी त्याचा खून करेन असं म्हटलं असतं, तरी त्याला इतकं आश्चर्य वाटलं नसतं!

तो इतकंच म्हणाला, "आज सकाळपासून काय झालं आहे तुला? अशी वेड्यासारखी का वागतेस?"

पण मी कोणाचंच ऐकायच्या मन:स्थितीत नव्हते. मला फक्त माझ्या हृदयाचं सांगणं ऐकू येत होतं आणि म्हणूनच आम्ही इथे आलो होतो.

"बस! मला एवढचं सांगायचं आहे साहेब. "

मेयरसाहेब सुज्ञ होते. मंद स्मित करत, खुर्चीतून उठत ते म्हणाले, "तुम्ही जाऊ शकता. यापुढे कधी या वनराईत याल, तेव्हा विवेक बाळगा. आणखी काय सांगू?"
*****

प्रतिक्रिया

थीमला साजेश्या कथेची केलेली निवड आवडली 👍
भावानुवाद नेहमीप्रमाणेच छान झालाय...! धन्यवाद.

नूतन's picture

31 Oct 2024 - 9:48 pm | नूतन

प्रतिसादाबद्दल आभार

अमरेंद्र बाहुबली's picture

31 Oct 2024 - 9:17 pm | अमरेंद्र बाहुबली

मस्त कथा.

नूतन's picture

31 Oct 2024 - 9:48 pm | नूतन

प्रतिसादाबद्दल आभार

नूतन's picture

31 Oct 2024 - 9:52 pm | नूतन

प्रतिसादाबद्दल आभार