दिवाळी अंक २०२४ - फटाके, काही फुसके, काही?

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in दिवाळी अंक
31 Oct 2024 - 6:00 am

1



सैनिक असल्यामुळे मला फक्त एवढेच माहीत होते,

Do or die, soldier never ask why!

कवी अल्फ्रेड लाॅर्ड टेनिसन यांच्या 'द चार्ज ऑफ द लाइट ब्रिगेड'वर अधारित या प्रसिद्ध ओळी आजही सैन्यात प्रचलित आहेत.

The Charge of the Light Brigade

'Theirs not to reason why,
theirs but to do and die.'

The poem tells of the famous and brutal military disaster in the Crimean war. Nowadays, the saying is often used in the workplace and encourages one to press on no matter what the task.

सैन्यात राजकीय उपक्रमांमध्ये भाग घेणे प्रतिबंधित आहे. आयुष्यभर तीच मूल्ये मनावर बिंबल्यामुळे, सेवानिवृत्तीनंतर त्यात फारसा काही फरक पडला नाही. त्यामुळे, माझे राजकीय ज्ञान हे कुंपणावर बसल्यासारखेच आहे. थोडक्यात.. स्वभावाची जडणघडण अशीच,

भवताली संगर चाले,
तो विस्फारून बघताना
कुणी पोटातून चिरताना,
कुणी रक्ताळून लढताना

मी दगड होउनी थिजलो,
रस्त्याच्या बाजूस जेव्हा
तो मारायालादेखील
कुणी मला उचलले नाही

मी मोर्चा नेला नाही,
मी संपही केला नाही
मी निषेधसुद्धा साधा,
कधी नोंदवलेला नाही
- संदीप खरे

'प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य आहे' या उक्तीप्रमाणे राजकारणातही असेच काही, पण ते न्याय्य आहे किंवा नाही ते मात्र मतदार राजा ठरवतो. लोकशाहीचे वय वाढते आहे, तद्वत मतदार राजासुद्धा शहाणा होत आहे. याची प्रचिती प्रत्येक निवडणुकीत येत आहे.

तोडाफोडी, आयाराम-गयाराम, मतदार राजाला आकर्षित करण्यासाठी काहीही, हे सर्वच पक्षीय धोरण असते. त्यात काही गैर नाही, कारण सत्ता प्राप्त झाली तर जनतेचे - पर्यायाने देशाचे, राज्यांचे भले, विकास(?) करता येतो. यामध्ये विरोधी पक्षाचे महत्त्व आणि योगदान कमी नसते. विकास ही निरंतर प्रक्रिया आहे असे माझे प्रामाणिक मत आहे. राजकारणात कोणी कुणाचे नसते. जसे वारे वाहतात, तशी पाठ फिरवतात.

कविवर्य संदीप खरे म्हणतात त्याप्रमाणे,

दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही

मी तुसडा की मी भगवा बैरागी, मद्यपि वा मी गांजेवाला जोगी
अस्तित्वाला हजार नावे देतो, परी नाव ठेववत नाही

अस्वीकृती - राज्यातील एकूण राजकीय रणधुमाळीचे अवलोकन करताना माझ्या बालबुद्धीला काही दिसले, काही वाचले, काही सुचले, काही वाटले, काही पटले, तर काही खटकले. जे काही टंकाळले आहे, तो कल्पनाविलास आहे. कुणा व्यक्तीशी, प्रसंगाशी साधर्म्य असू शकते; पण कुठल्या पक्षाचा, नेत्याचा, व्यक्तीचा प्रचार, प्रसार,अपमान करण्याचा उद्देश नाही. कुणाच्याही अस्मितेला ठेच पोहोचवणे, मतांची पायमल्ली करणे हाही या लेखाच उद्देश नसून निर्भेळ मनोरंजन हा आहे. यदाकदाचित माझ्या लेखनात असे काही दिसून आले, तर ते केवळ अपघात समजून वाचक कानामागे टाकेल, अशी अपेक्षा. यासाठी मी आगोदरच क्षमायाचना करतो.
_____________________________________
(रॅप)

बंडाचा झेंडा, तिकिटाचा घोळ,
नेत्यांच्या मागे (अंध)भक्तांची ओळ.
मशाल, तुतारी, नाहीतर हाती धरीन कमळ,
कुठं ना कुठं तरी तिकीट मला मिळंल.
मिळालं तर मिळालं, नाहीतर नाही
'एकला चलो रे' कुठं गेलंच नाही
बंडाचा झेंडा, तिकिटाचा घोळ..

मतदार, राजा शिराळशेठ,
पाच वर्षांत एकदाच विनम्र भेट.
एक दिवसाचं राज्य, एक दिवसाचा राजा,
टका सेर भाजी, टका सेर खाजा..
______________________________________

फुसकुल्या

चला चला इलेक्शनची घडी आली
तुतारी वाजवायची वेळ झाली

- अलार्म काका
______________________________________
उठा उठा, इडी आली
कमळाच्या तळ्यावर अभ्यंगस्नानाची वेळ झाली

- !!!!!!?
_____________________________________
एका हातात मशाल, एका हातात तुतारी
जो देईल खोके, त्यालाच मिळेल सुपारी
______________________________________
बुंदीच्या झाडाला जिलाबीचं फळ
पप्पूच्या हाताला तुतारीचं बळ
______________________________________
प्रश्न अनेक, उत्तर एक

महाभारत का झाले?
पेशवाई का बुडाली?
१२मतीमध्ये तारामती का हरली?

आपल्यामुळं नाही रे भौ..
______________________________________
(अ)राजकीय भोंडला

एक नाना फोडू बाई
दोन तात्या जोडू
तीन मामा फोडू बाई
चार अण्णा जोडू

एक पक्ष फोडू बाई
दोन पक्ष जोडू
तीन पक्षांची तिघाडी

माळ घाली देवेंद्राला
देवेंद्राची गोड वाणी
येता जाता XXदार फोडी

कमळाच्या पाठीमागे लपली जोडी
कुणाच्या नावाने खsssडे फोडी

आता माझा (?) दादा येईल गं
कमळीच्या पाठीवर बसेल गं
जलेबी!!!?, रेवड्या वाटील गं

रेवड्या नव्हे, प्रेमपान्हा
इलेक्शनचा सुटला वारा
भावाने केला बहिणीचा धावा
पेटी भरून फराळ द्यावा

चिलार दादाला भूक लागली
कोणाच्या हाताने? (गाजराची) खीर पाजली
गप रे, गप रे, चिलार दादा
एवीन गा, तेवीन गा...
अर्धं अर्धं वाटून घ्या
तूपरोटी खाऊन घ्या

एकोबाची आली स्वारी
व्हाया सुरत, गोहाट्टीची वारी
देवेंद्र तारी त्याला कोण मारी
खुर्चीवर बसायची sssss आली बारी
______________________________________
ऐलमा, पैलमा, १२मतीच्या देवा,
माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा.
तुझा खेळ मांडला वर्षाच्या दारी,
'मारबत', घुमतंय पारावरी.
आतुल्या मातुल्या चरणी चाXल्या,
चरणी चार खोके...
हातीपायी खणखणीत बोके.

एक एक खोका विसाविसाचा.
गाड्या नांगर फिरवायच्या,
शेतात जिल्ब्या पाडायच्या

पाडा रे पाडा जिल्ब्या पाडा.
आयाबायांना खटाखट वाढा.
खा बाई खा, जिल्ब्या खा.
म्होरली पाच वर्षं आम्हाला द्या.
______________________________________
( किस बाई किस)

पाड बाई पाsssड, जिल्ब्या पाड
पाड बाई पाssड, जिल्ब्या पाड
जिल्बीची फोड लागते गोड
आणिक तोड बाई, आण्णिक तोड...
_____________________________________

(अ)राजकीय (उ)खाणे

पहाटेच्या रामप्रहरी, म्हणा हरी हरी
दादांचं नाव घेते कमळाबाईच्या घरी

काहीच कळत नाही, नाही रहात लक्षात
रामदासराव आमचे सगळ्याच पक्षात

टका शेर रवा, टका शेर खवा
पप्पू हलवाई उडवतो जिल्बीचा थवा
______________________________________
(आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना)

जिल्ब्या..

आम्ही पाडल्या काही, तुम्हीपण पाडा ना!
आम्ही चाखल्या काही, तुम्हीपण चाखा ना !

- बेतुक्या, ठार बिघडला,

प्रतिक्रिया

कंजूस's picture

31 Oct 2024 - 6:01 pm | कंजूस

अंगाला.

काय झकास काव्य, भोंडला, उखाणे, ओव्या केल्या आहेत.