मत म्हणजे मत म्हणजे मत असते.
तुमचे, आमचे, सर्वांचे सेम मात्र नसते||
लोकशाहीतील ते अमोघ अस्त्र असते.
मतदाराच्या हातचे एक शस्त्र असते.
कुण्या ऐऱ्यागैऱ्याची मालमत्ता नसते.
प्रत्येक मताची एक किं'मत'असते.
उगाच वाटायची ती खिरापत नसते.
ते बदलायची कुणाची हिंमत नसते.
मतदात्यांनापण ठाऊकच नसते,
की मत देणे ही गंमत नसते.
मत म्हणजे मत म्हणजे मत असते||
भोगण्या त्यांनी सत्ता, होण्या पद लाभांकित,
भरण्या खिसे आणि बांधण्या घरे अगणित,
त्यांनी व त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी अखंडित,
त्यांनी 'उडवावी आश्वासनकारंजी, स्वप्नरंजित!
पोकळ आश्वासनाने व्हावे आपण आनंदित,
तृप्त होउन, त्या कोरड्या, मामुली सवलतीत
झोकून द्यावे अलगद याच्या त्याच्या झोळीत.
यासाठी द्यायची ती खैरात नसते.
मत म्हणजे मत म्हणजे मत असते||
निष्ठा ज्यांची विष्ठेवरल्या माशी जैशी,
स्पर्धा ज्यांची रंग बदलत्या सरड्यांशी!
मांदियाळी अशा स्वार्थी भोंदू दलबदलू नेत्यांची.
भुलविती जे देऊन रंगीत चविष्ट गोळी जात-धर्माची.
जागा त्यांना दाखवायची एकच संधी असते.
मत म्हणजे मत म्हणजे मत असते||
तुझे आहे तुजपाशी,
परी तू महत्त्व त्याचे विसरलाशी!
जाणून मर्म, ओळखून धर्म, मतदानादिवशी.
आपले आहे जे आपल्याचसाठी,
'दान' ते श्रद्धेने द्यावे साऱ्यांच्या कल्याणासाठी,
हे कधी म्हणजे कधीच विसरायचे नसते.
मत म्हणजे मत म्हणजे मत असते.
तुमचे, आमचे, सर्वांचे सेम मात्र नसते||
प्रतिक्रिया
31 Oct 2024 - 5:54 pm | चौथा कोनाडा
समर्पक रचना ... आवडली असं कसं म्हणाव ?
रचना .. पण... पण लैच आदर्शवादी झालीय !
नेते आणी गुंड याची दहशत असेल तर मत ही त्यांचीच मालमत्ता असते.
या विरुद्ध बंड केले तर अन्नाला महाग झाल्याची उदाहरणे दिसुन येतात !
.. पण दुर्दैवाने हेच सगळीकडं चाललंय ! घोडेबाजार कायमच तेजीत असलेला स्पष्ट दिसतो
या बद्दल काय लिहिणार ? सगळी बजबजपुरी माजलीय !
महाराष्ट्रातील घोडा मैदान जवळच आहे .. पाहू काय होते ते !
31 Oct 2024 - 7:33 pm | पाषाणभेद
आपल्याकडच्या निवडणूकांची पद्धत बदलायला हवी.
जिंकणारा उमेदवार अन ज्याला दुसर्या क्रमांकाची मते मिळाली आहे त्यांच्यात साधारण ४०% अंतर असले पाहिजे असला नियम हवा.
तसेच समोरच्या पक्षाच्या उमेदवाराला छळण्यासाठी सरकार पक्षातर्फे त्याच्या घरातल्या कुणावरतरी खोटे आरोप दाखल करून जेल, ईडी, आयकर असले काहीतरी लचांड लावतात त्यावर आळा घालायला हवा.