दिवाळी अंक २०२४ - दिपवाळीचे दिवशी..

श्वेता२४'s picture
श्वेता२४ in दिवाळी अंक
31 Oct 2024 - 6:00 am

“कमल, ऊठ! बाहेर पड! किती दिवस झाले मला भेटलीच नाहीस. पार विसरलीस बघ मला. दिवाळीच्या दिवशी वाडीला मला भेटायला ये. मी तुझी वाट बघतोय.” अतिशय हसतमुख आणि तेजस्वी असा आबांचा चेहरा गोल गोल करत धूसर होऊन दिसेनासा झाला आणि कमलताई खडबडून जाग्या झाल्या. कमलताईंनी हाताने चाचपडून उशीखालचा चश्मा डोळ्यावर लावला आणि पाहिले, तर पहाटेचे साडेपाच वाजले होते.

साठी पार केलेल्या कमलताई आयुष्यभर एका सहकारी बँकेत काम करून निवृत्तीचे आयुष्य जगत होत्या. तसं त्यांचा आयुष्य कष्टातच गेलं. लग्नानंतर सहाव्या वर्षीच नवऱ्याचा मृत्यू झाला आणि पोटच्या दोन पोरांना घेऊन त्या माहेरी आल्या ते कायमच्याच! कमलताईंचे वडील गावचे प्रतिष्ठित व्यावसायिक. पुनर्विवाह करण्यास नकार देताच त्यांनी कमलताईंना गावातीलच एका सहकारी बँकेत नोकरीला लावले. कमलताई पदवीधर होत्या. हुशार होत्या. त्याचप्रमाणे त्यांची दोन्ही मुले हुशार व कर्तृत्ववान निघाली. मोठा मुलगा इंजीनियर होऊन दिल्लीला मोठ्या कंपनीत नोकरीस होता. तिथेच काम करणाऱ्या एका इंजीनियर मुलीशी त्याने प्रेमविवाह केला. तर मुलगीदेखील सरकारी अधिकारी होती व तिच्या सासरी सुखाने संसार करत होती. कमलताई माहेरी आल्या, त्यामुळे इस्टेटीत अजून एक वाटेकरी निर्माण झाल्यामुळे भाऊ व भावजय त्यांच्यावर तसे नाराजच होते. परंतु कमलताईंचे वडील म्हणजेच आबा व त्यांची आई त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. दुर्दैवाने कमलताई चाळिशीत असतानाच त्यांची आई स्वर्गवासी झाली आणि त्यापाठोपाठच काही वर्षात आबादेखील स्वर्गवासी झाले आणि कमलताई मानसिकदृष्ट्या पार कोसळून गेल्या. वयाच्या पंचेचाळिशीतच त्यांना ब्लड प्रेशरचा व शुगरचा त्रास जाणवू लागला. परंतु दोन मुलांकडे बघून त्यांनी स्वतःला सावरले आणि मुलांनीदेखील त्यांच्या कष्टाचे चीज केले. तब्येतीच्या त्रासामुळे कमलताई व्हीआरएस घेऊन निवृत्तीचे आयुष्य जगू लागल्या.

दोन्ही मुलेदेखील आईच्या कष्टाची जाणीव ठेवून तिला पाहत होते. परंतु शेवटी त्यांनादेखील त्यांचे त्यांचे व्याप होते. कमलताई दोन्ही मुलांकडे थोडेफार जाऊन येऊन राहू लागल्या. परंतु नवीन पिढीचे नवीन व्याप, त्यांचे विचार, सवयी, खाण्यापिण्याच्या पद्धती यांच्याशी काही त्या जुळवून घेऊ शकल्या नाहीत. तरुणपणीच नवऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे भौतिक जीवनातील त्यांचा रस आधीच संपला होता. त्यात कमलताईंचे वडील अतिशय धार्मिक. घरामध्ये दत्तभक्तीची परंपरा. त्यामुळे लहानपणापासूनच आध्यात्मिक वातावरणात वाढलेल्या कमलताईंना नवीन पिढीच्या उथळ, भौतिक वागण्याशी जुळवून घेणे जमले नाही. त्यामुळे त्यांचे मुलांकडे जाणे व मुलीकडे जाणे हळूहळू कमी होत गेले. तर मुलाचे व मुलीचेदेखील येणे-जाणे कमी होत गेले. बऱ्याच काळापासून बीपी व शुगरच्या गोळ्या घेतल्या गेल्यामुळे आता किडनीवर परिणाम जाणवू लागला होता. परिणामी नैसर्गिक विधींवरचे नियंत्रण कमी होऊ लागले होते. त्यामुळे प्रवास करण्यावर मर्यादा येऊ लागल्या. साठी पार केलेल्या कमलताई वयापेक्षा दहा वर्षांनी अधिक दिसू लागल्या होत्या. कमलताई अधिकाधिक घरात राहू लागल्या.

एरवी अनेकांमध्ये मिसळणाऱ्या कमलताईंना हल्ली एकटेपणा जाणवू लागला. मुलांनी फोन घेऊन दिला होता. परंतु त्यांना स्मार्टफोनचा तितकासा वापर करता येत नव्हता. मुलाला व मुलीला कधीही काही विचारायला वेळी अवेळी फोन केला की त्यांची चिडचिड व पर्यायाने वाद व्हायला लागले. मुलांचे सगळे व्यवस्थित मार्गी लागले आहे, आता दोन्ही मुलांना आपली गरज नाही, असे वाटून तर त्यांना अधिकच नैराश्य येऊ लागले. आता खरे म्हणजे आपण मरायला हवे, जगून काहीही फायदा नाही, या विचाराने त्यांच्या मनात घर केले. एक-दोनदा मुलाला व मुलीला त्यांनी सुनावलेदेखील की गरज होती, त्या वेळी तुमच्यासाठी मी खूप मर मर कष्ट केले. परंतु आता मी मेले म्हणजे तुमची सुटका होईल व माझा काही त्रास होणार नाही. दोन्ही मुलांना मात्र हे ऐकून खूपच वाईट वाटत असे. ते जमतील तेवढे आईला वेळ देण्याचा प्रयत्न करत होते. तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. परंतु परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत गेली. आपण दुर्लक्षित झालो आहोत, आपण निरुपयोगी झालो आहोत असे वाटून कमलताईंची चिडचिड वाढली. आणि मग त्या दिवशी या सगळ्याचा कडेलोट झाला..

“ या वर्षी दिवाळीला बायकापोरांना घेऊन ये रे बाबा! न जाणो पुढच्या दिवाळीला मी असेन-नसेन.” मुलगा म्हणाला, “आई, का गं सारखा सारखा मरणाचा विषय काढतेस? चांगलं वाटतं का ऐकायला आम्हाला? गेली तीन वर्षे मी हेच ऐकत आहे. उगाच इमोशनल ब्लॅकमेल करून तेच तेच ऐकवू नकोस. माझ्यावर महत्त्वाच्या प्रोजेक्टची जबाबदारी आहे. ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये विचार करू.” कमलताईंनी मुलीला विचारले, ”दिवाळीला येऊन जातेस का किंवा मला तरी घेऊन जा.” त्यावर मुलगी म्हणाली की "माझे सासू-सासरे या वेळी इकडे येणार आहेत. मी तुला नंतर घेऊन जाते." हे ऐकून त्यांच्या मनाची खातरीच पटली की आता आपण कुणाच्याही आयुष्याचा भाग नाही. दोघेही आपल्याला महत्त्व देत नाहीत आता. आपले जीवन संपलेलेच बरे. कशाला जगायचे? आत्तापासूनच अन्नपाण्याचा त्याग करायचा, जेणेकरून शांतपणे मृत्यू येईल. त्या दिवशी कमलताईंनी दिवसभर अन्नपाणी घेतले नाही. उपाशी राहिल्या. कोणत्याही गोळ्या घेतल्या नाहीत आणि झोपी गेल्या. त्याच रात्री कमलताईंच्या स्वप्नात त्यांचे आबा आले आणि दिवाळीला मला वाडीला येऊन भेट म्हणाले.

आता कसे करावे बरे? कमलताईंना आठवले. लहानपणी त्या वडिलांचे बोट भरून गुरुवारी नरसोबावाडीला जायच्या. आबा मोठे दत्तभक्त. गुरुचरित्राचा रोजचा पाठ वाचल्याशिवाय पाण्याचा थेंब तोंडात घ्यायचे नाहीत. त्यांचा हा नियम अगदी शेवटपर्यंत राहिला. घरामध्ये दत्तजयंती, गुरुपौर्णिमा नेहमीच साजरी व्हायची. सत्संग व्हायचा. आबांनी जिथपर्यंत जमेल तिथपर्यंत ही परंपरा कायम ठेवली. परंतु त्यांच्या साठीनंतर मात्र त्यांना हा सर्व व्याप जमेनासा झाला, तसे उत्सव बंद झाले; तरीही गुरुचरित्राचा पाठ व नरसोबाच्या वाडीची वारी मात्र कधी चुकली नाही. खरे तर वर्षातून एकदा तरी त्या वाडीला जायच्या. आपण शेवटचे वाडीला कधी गेले बरे? कमलताई आठवू लागल्या. घरापासून खरे तर असे काही फार अंतर नव्हते. एका दिवसात जाऊन येता यावे एवढे अंतर असूनही आपण इतक्या वर्षात कसे काय बरे जायचे राहिलो? खरे म्हणजे मृत्यूनंतर आबा कधीच स्वप्नात आले नाहीत. पण आबांनी स्वप्नात येऊन वाडीला ये म्हणल्यावर मात्र कमलताईंना आतूनच एक अनामिक ओढ लागून राहिली. जणू काही वाडीला जाणे हे त्यांच्या जीवनाचे एकमेव ध्येय राहिले होते.

कमलताई शांतपणे उठल्या. आन्हिक उरकून देवपूजा केली. छान दूध गरम केले आणि आपला उपवास सोडला. कमलताईंनी वाडीला जायचा निश्चय केला. ज्या अर्थी आबा आपल्याला वाडीला बोलवत आहेत, त्या अर्थी त्यांना काही सांगायचे तर नसेल? दिवाळी चार-पाच दिवसांवर येऊन ठेपली होती. वाडीला जायचे म्हणजे जायची तयारी करायला हवी. परंतु एवढा तीन तासांचा प्रवास कसा करायचा बरे? आपल्याला तो झेपेल का? दूध पिता पिता कमलताई स्वतःशीच विचार करत होत्या, तेवढ्यात शेजारची मिनी कमलताईंकडे साखर मागायला आली. “आजी, आईने साखर मागितली आहे." कमलताई आपल्याच विचारात होत्या. मिनीने परत मोठ्या आवाजात हाक मारली, “आजी, अगं लक्ष कुठे आहे तुझं? कसला एवढा विचार करतेस?”

“अग बाई, तू कधी आलीस? काय ग, काय हवं तुला?” कमलताई भानावर आल्या.

मिनी म्हणाली, “अग, दोन मिनिटांपूर्वी तर मी तुला हाक मारून सांगितलं की मला साखर हवी आहे. काय झालं? काही टेन्शन आहे का?” शेजारची मिनी कॉलेजला जाणारी असली, तरी कमलताईंची छान मैत्रीण होती. येता-जाता तिला कमलताईंच्या हातचे काही ना काही खायला मिळायचे. त्यामुळे त्यांची चांगली गट्टी जमली होती. त्यांनी मिनीला स्वप्नाबद्दल सर्व काही सांगितले. “मला वाडीला जायचं आहे. पण आताशा मोठा प्रवास मी टाळते. कुठे बाथरूमला जायचं झालं तर अवघड होतं. गेल्या कित्येक वर्षात मी कुठेही प्रवास केलेला नाही.”

मिनी म्हणाली, “त्यात काय एवढं? माझी आजी म्हणजे आईची आई, डायपर वापरते. कुठे कुठे फिरायला जाते. अतिशय सुटसुटीत आहे ते वापरायला. मी तुम्हाला आणून देते. बिनधास्त जा.” असे म्हणून संध्याकाळी तिने ते डायपर त्यांच्या स्वाधीन केलेसुद्धा! कमलताईंचा एक प्रश्न तर सुटला होता. आता जायचे कसे? हा प्रश्न होता. वर्षभरापूर्वीच एका डोळ्याचे ऑपरेशन झाले होते, तर दुसरी दृष्टी मात्र अधूच झालेली होती. चश्म्याशिवाय त्यांना जराही दिसायचे नाही. तसेही चश्मा घालूनही त्यांना फारसे स्पष्ट दिसायचे नाही. तरीही त्यांचे रोजचे काम चालले होते, इतकेच. त्यामुळे एसटीचा प्रवास करणे तर काही शक्य नव्हते. शेवटी खास गाडी करायची ठरवली. मिनीने त्यांच्याच एक ओळखीचा ड्रायव्हर शोधून त्याच्याशी व्यवहार पक्का केला आणि दोन दिवसात निघायची तयारीदेखील झाली!

आज कमलताई अतिशय उत्साहाने पहाटे उठून तयार झाल्या. छान जरीकाठाची साडी नेसली. देवपूजा केली. ड्रायव्हर वेळेत आला, तसा त्यांनी लवकरच सकाळी सकाळी प्रवास सुरू केला. दोन्ही तासांच्या प्रवासानंतर दोन किलोमीटर अलीकडे कुरुंदवाडच्या पुलाजवळ पोहोचतो न पोहोचतो, तेवढ्यातच गाडी बंद पडली. काय झाले ते तपासायला ड्रायव्हर खाली उतरला. गाडीत काहीतरी मोठा बिघाड झाला होता. गाडी काही केल्या सुरू होत नव्हती. समोर तर नरसोबावाडीची कमान दिसत होती. एवढ्या जवळ येऊन हे विघ्न आल्यामुळे कमलताई चिंतित झाल्या. ड्रायव्हरने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना विचारून जवळच एका मेकॅनिककडे जायचे ठरले. कमलताई मात्र खाली उतरल्या व ड्रायव्हरला म्हणाल्या, “मी येथून हळूहळू का असेना, चालतच जाईन. तुमचे झाले की तुम्ही या आणि मला फोन करा. मी जाते.” ड्रायव्हर म्हणाला, “तुम्ही कुठे एवढे चालत जाल? थोडा वेळ थांबा. गाडी होईलच दुरुस्त. तुम्हाला काही झाले तर मी काय करू?” त्यावर कमलताई म्हणाल्या, “मला काही होणार नाही. मी हळूहळू व्यवस्थित चालत जाईन. तुम्ही काळजी करू नका.” त्यांचा हा संवाद चालू असतानाच बाजूने जाणारा एक दुचाकीस्वार थांबला आणि विचारपूस करू लागला. कमलताईंचे म्हणणे ऐकताच तो म्हणाला, “ मी बी वाडीलाच चाललोय. चला माज्यासंगट, सोडतो तुम्हाला. तुमची गाडी नीट झाली का करा कॉल आजींना. काय काळजी करू नगासा. आजी तुमी घट धरून बसा हां.. नायतर पडशीला बगा..” कमलताई त्या माणसाच्या दुचाकीवर मागे त्याला धरून बसल्या. कमलताईंना त्या माणसाने विचारले, “कुनीकडच्या आजी तुमी? कायम येतायसा काय हिकडं?” त्यावर कमलताई म्हणाल्या, “ नाही रे बाबा. खूप दिवस झाले, नरसोबावाडीला आले नाही. लहानपणी वडिलांसोबत खूप वेळा आले आहे. नंतर नोकरीच्या नादात हळूहळू कमी कमी होत गेलं आणि आता बऱ्याच वर्षांत आले नाही. तुम्ही नेहमी येता असं दिसतं आहे.” त्यावर तो माणूस म्हणाला, “व्हय. मी तर रोजच येतो बगा तसं. त्येचं कायाय, देवाचं दर्शन घेतल्याबिगर चैनच पडत नाय बगा. माझ्या दिवसाची सुरुवात दत्ताच्या पाया पडूनच करतो बगा.” कमलताई म्हणाल्या, “खरं आहे. माझे वडीलसुद्धा गुरुचरित्राचा अध्याय वाचल्याशिवाय तोंडात पाण्याचा थेंबही घेत नव्हते.” “नशीबवान हायसा” तो माणूस उत्तरला. “तुम्हाला वडील होते. माजं आय-बा तर ल्हानपनीच वारलं. माझ्या मामांनं मोठं केलं मला. ते मला देवळात घेऊन यायचे. तवापासून दत्तम्हाराजच माझं आय-बा. हितं आलं आणि कृष्णामायच्या पान्यात हात पाय धुतले मंजी कसं आईच्या कुशीत गेल्यावानी वाटतंय. देवासमोर डोकं ठेवलं की बापाचा हात डोक्यावरून फिरतोय असं वाटतंय. शेवटी काय हो, जग लय स्वार्थी हाय. पन देवाकडं कुटल्याच गोष्टीला थारा नाय बघा. आपण कसे बी वागलो तरी देव कधी आपल्याला दूर सारीत न्हायी.”

कमलताईंना आबांचे बोलणे आठवले. ज्या वेळी नवरा मेला, त्या वेळी कमलताई धाय मोकलून रडत होत्या. कित्येक दिवस त्यांच्या डोळ्यातले पाणी थांबले नव्हते. आपल्याच बाबतीत असे का झाले? ह्या प्रश्नाचे त्यांच्याकडे उत्तर नव्हते. त्या वेळी आबा म्हणाले होते, “बाळा, या जगातली सगळीच नाती म्हणजे अळवावरचं पाणी. प्रत्येक जण आलेला माणूस कधी ना कधी जाणार आहे, हे नेहमी लक्षात ठेव. आम्हीदेखील आज आहोत, उद्या नाही. परंतु दत्तगुरू मात्र तू आहेस तोपर्यंत तुझ्यापाशीच आहेत. तुझी सगळी काळजी त्यांच्यावर सोपव आणि त्यांना शरण जा. सगळं काही नीट होईल.” तेव्हादेखील अशाच एका दिवशी कमलताई आपल्या दोन मुलांना घेऊन आबांसोबत इथे वाडीत आल्या होत्या. देवासमोर दोन्ही मुलांना डोके टेकायला लावून त्यांनी आपली सगळी काळजी दत्तासमोर वाहिली होती आणि एका नव्या आयुष्याची सुरुवात केली होती. “आजी, आलो बघा वाडीत. चला, देवाकडे जाऊ या.” कमलताई भानावर येत म्हणाल्या , “तुम्ही व्हा पुढे. मला भरभर चालता येत नाही. मी हळूहळू चालत येते.” “ठीक आहे.” असे म्हणून तो माणूस पुढे गेलादेखील.

नरसोबाची वाडी आता खूपच बदलली होती. खूप सारी दुकाने.. पेढ्यांची, बासुंदीची, खेळण्यांची.. हॉटेल्स तर कित्येक झाली होती. कमलताई लहान असताना यातले काहीदेखील नव्हते. वासूनाना पुजारी यांच्याकडे आबा उतरत असत. आबांची त्यांच्याशी विशेष मैत्री होती. दोघे कित्येक तास अध्यात्माच्या गप्पा मारत बसत. वासूनानांचे घर नेमके कुठे आहे ते कमलताईंना आठवत नव्हते, त्यामुळे देवदर्शन करून वासूनानांकडे जाऊ या, असा त्यांनी विचार केला. कमलताई देवळाकडे जायला निघाल्या. वाटेत कित्येक शेतकरी भाजी घेऊन बसलेले दिसले. एक शेतकरी ओरडत होता, “कृष्णाकाठची वांगी.. घ्या दिगंबरा, खायला चांगली. घ्या दिगंबरा!” कमलताईंना गंमत वाटली. त्यांनी विचारले, “कशी दिली वांगी?” शेतकरी म्हणाला, “चाळीस रुपये किलो घ्या दिगंबरा.” कमलताईंनी पन्नासची नोट देऊन अर्धा किलो वांगी द्यायला सांगितले. “वीस रुपये परत घ्या दिगंबरा.” म्हणून त्याने उरलेले पैसे दिले. कमलताई म्हणाल्या, “तुमची या दिगंबरा म्हणण्याची पद्धत गंमतशीर वाटत आहे.” “आवो, गंमत कसली? शेतकरी मानसाला देव देव कराया येळ हाय कुटं? आपलं काम हयोच आपला देव. त्यामुळे उठता बसता बोलता चालता जसे जमतो तसं देवाचं नाव घेतो बगा. देवानं जर आपल्याला इसरायचं नसंल तर आपल्यालाही देवाला इसरून चालनार नाय ना! कधीतरी देवच जर आपल्याला इसरून गेला, तर चालेल का दिगंबरा?” कमलताई चमकल्या. हा एक साधा शेतकरी जसं जमेल तसं देवाचं नाव घेतो. आबांनीदेखील आपल्याला सांगितलं होतं. नोकरी लागली, तसे देवाचे करणे - देवपूजा असेल किंवा वाचन असेल तितके करणे जमेना. तसे आबा आपल्याला म्हणाले होते, “कमल, ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ याचा जप जसा जमेल तसा उठता बसता बोलता चालता करीत जा.” पण आपण मात्र या संसाराच्या व्यापारात विसरूनच गेलो पार!

विचार करीत करीत पेढे घेऊन कमलताई टेंब्ये स्वामींच्या मंदिराजवळ आल्या. आतमध्ये अनेक लोक पोथी वाचत होते. कोणी ध्यान करत होते. कमलताई नमस्कार करून तिथेच बसल्या. टेंब्ये स्वामींच्या प्रतिमेकडे पाहत असतानाच त्यांनी डोळे मिटले व मनातल्या मनात 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा'चा जप सुरू केला. तसा मनात आनंदलहरींचा अनुभव त्या घेऊन लागल्या. कित्येक दिवसांचे जड, मणामणाचे ओझे फेकून देऊन हलके हलके वाटावे तसे त्यांना वाटू लागले. चिंता, त्रास, भय, काळजी या सगळ्यांपासून आपण दूर जात आहोत असे त्यांना वाटले. त्या आनंदलहरींची अनुभूती जशी ओसरली, तसे कमलताईंनी डोळे उघडले. टेंब्ये स्वामींना नमस्कार करून त्या देवळाबाहेर पडल्या. समोर वासूनाना पुजार्‍यासारखी व्यक्ती दिसू लागली. “वासूनाना!” म्हणून त्यांनी हाक मारताच त्या व्यक्तीने चमकून मागे वळून बघितले. कमलताईंनी आपली ओळख सांगितली व आबांबरोबर येत असल्याचे सांगितले. त्यासरशी त्या व्यक्तीने ओळख पटल्याचे स्मितहास्य केले व सांगितले, “मी रामचंद्र. वासूनानांचा मुलगा. तुम्हाला तुमच्या वडिलांबरोबर इथे आल्याचं मी पाहिलं आहे. माझे वडील व तुमचे वडील परममित्र. आजही ते त्यांची आठवण काढतात. मी महापूजेला जात आहे. तुमचे वडील दर वर्षी वाडीत महापूजा घालायचे. अगदी जायच्या आधीदेखील काही महिने ते इथे आले होते.. शेवटचे! तेव्हादेखील मीच त्यांच्यासाठी महापूजा केली होती. आज चांगला योग आहे. तुम्ही महापूजेला बसा. माझे काही यजमान दक्षिणद्वाराला वाट पाहत आहेत. तुम्हीही तिथेच या.”

कमलताईंना अतिशय आनंद झाला. महापूजा करायचे किंवा नाही याबाबत त्यांनी काहीच ठरवले नव्हते. परंतु योगायोगाने सर्व काही जुळून येत होते. कमलताई कृष्णेच्या काठी गेल्या. पाय धुतले. डोळ्यांना पाणी लावले. सर्व ताप निघून गेल्यासारखे वाटले. खरे आहे. या कृष्णामाईच्या कुशीत आईची माया आहे, मनातील सर्व ताप ही पोटात सामावून घेते असा विचार करत कमलताई हळूहळू देवाजवळ आल्या. दक्षिणद्वारी गुरुजी वाट पाहत होते. अन्य यजमानांसोबत कमलताईंनीदेखील संकल्प सोडला. महापूजा करायला मिळाली. किती वर्षानंतर हे सर्व काही घडून येत होते. कमलताईंना मनातून अतीव समाधान मिळत होते. जणू काही आपल्या वडिलांसोबतचे बालपणाचे आणि तरुणपणीचे दिवस त्या पुन्हा अनुभवत होत्या!! पूजा झाली. गुरुजींनी घरी कसे यायचे हे समजावून सांगितले आणि प्रसाद घ्यायला घरी या हे सांगून ते निघून गेले.

कमलताई पुन्हा एकदा कृष्णाकाठी गेल्या. तिथून पैलतिरी असणाऱ्या अमरेश्वर देवळाकडे जाण्यासाठी एक होडी सज्ज होती. अगदी लहान असताना त्या एकदा आबांसोबत कधीतरी तेथे गेल्या होत्या. त्या वेळी देवापेक्षा नावेत बसायला मिळते याची त्यांना मज्जा वाटत होती. आज मात्र पलीकडचे मंदिर त्यांना खुणावत होते. कमलताईंनी नावेत बसून तेथे जायचे ठरवले. कमलताई नावेत बसल्या, परंतु नावाडी अन्य काही प्रवासी भरण्याची वाट पाहत होता. शेवटी कमलताईंना धीर धरवेना. त्या नावाड्याला म्हणाल्या, “बाबा रे, सगळ्यांचे पैसे मी देते. परंतु मला लवकर पलीकडे सोड.” नावाडी म्हणाला, “आजी, महाराजांच्या कृपेने लय पैसा हाय. महाराजांच्या दारात असलेल्याला काय कमी आहे? पण ही सेवा बी हाय. आता उन्हं तापल्यावर तर नावंची काय लगेच फेरी हुनार नाय. देऊळ बी बंद होईल. तवा तुम्हास्नी सोडून परत घेऊन आलो आणि कोणी राहिलं देवाचं दर्शन घ्यायचं, तर घाईगडबड करून काय करायचं? जी गोष्ट जवा व्हायची तवाच होनार. उगा घाईगडबड करु नगासा.” तेवढ्यात तीन-चार जण नावेत बसण्यासाठी आले. नावाडी म्हणाला, “बघा, तुमच्या नादामध्ये या सगळ्यांचं देवदर्शन राहिलं आसतं का नाय? तवा दमानं घ्यायचं सगळं. अशी गडबड करायची नाय.”

कमलताई अंतर्मुख होऊन विचार करू लागल्या. खरेच आपल्यातल्या संयम संपला आहे का? आपला आक्रस्ताळेपणा वाढला आहे का? थोडी काही मनाविरुद्ध गोष्ट झाली तर आपण जीवन संपवायचा विचार करत होतो. परंतु जी गोष्ट जेव्हा होणार आहे, तेव्हाच होणार आहे. तर मग आपण नेमकी कशाची घाई गडबड करत होतो? विचार करेकरेपर्यंत नाव किनार्‍याला लागलीसुद्धा!! नावाडी म्हणाला, “आवं आजी, कसला इचार करीत होतासा? आधी पलीकडे जायचं.. पलीकडे जायचं.. म्हणून किती गडबड कराय लागलायतासा आणि नाव सुरू झाली तर तुमचं लक्ष तुमच्या पायाकडे? आजूबाजूला किती छान पक्षी आणि काय काय दिसत होतं? लोक पानी उडवत हुते. तिकडं जरा तरी बघायलायतासा का? आता जाताना तरी या प्रवासाचा आनंद घ्या.” कमलताईंना पुन्हा एकदा दचकायला झालं! खरंच की. आपले आयुष्य जेव्हा संपणार आहे तेव्हा संपेल. परंतु तोपर्यंत असलेल्या आयुष्याचा आपण आपल्याला जमेल तसा आनंद घ्यायला नको का? काय करत होतो आपण?

चालत चालत अमरेश्वराच्या देवळात त्या पोहोचल्या. देवांचे दर्शन घेतले. गुरुचरित्रातल्या अनेक अध्यायांचे चित्ररूपात दर्शन घेतले. त्याच्या मागेच गुरुचरित्रातल्या १८व्या अध्यायात ज्या गरीब ब्राह्मणाच्या घरचा घेवड्याचा वेल श्रीगुरूंनी काढून मुळासकट उपटून फेकून दिला व त्याचे दारिद्र्य नष्ट केले, तेथील मंदिरात त्या गेल्या. आजही त्यांचे वंशज तिथे राहत होते. तेथील आजी बाहेर आल्या. कमलताईंना गुरुचरित्रातल्या १८व्या अध्यायाची कथा त्यांनी सांगितली. कमलताईंना प्रसाद दिला व म्हणाल्या, “गुरुमहाराजांच्या कृपेने आमचे दारिद्र्य नष्ट झाले आणि आजही आम्ही सर्व सुखाने नांदत आहोत.” त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, समाधान व शांती पाहून कमलताईंनी न राहवून त्यांना प्रश्न केला, “खरंच तुम्हाला कोणतंच दुःख नाही का? तुमच्या आयुष्यात कधीच काही संकटं आली नाहीत का?” त्या बाई हसल्या आणि त्यांना म्हणाल्या, “प्रत्येकाचे कर्मभोग हे असतातच. मनुष्यजन्म आहे. त्यामुळे भोग हा भोगूनच सारला पाहिजे. परंतु ते करत असताना गुरुकृपा असेल, तर उन्हातही चांदणं असल्याचा अनुभव मिळतो. किती संकटं येतात त्यापेक्षा त्या संकटातून श्रीगुरू आपल्याला तारतात, हे जास्त महत्त्वाचं नाही का?” त्या बाईंचे ते शब्द ऐकताच कमलताईंना अतिशय वाईट वाटले.. खरेच, या बाई किती सकारात्मक विचार करतात आणि आपण मात्र परमेश्वराची एवढी कृपा असताना किती नकारात्मकतेत गेलो. महाराजांसमोर पुन्हा एकदा डोके ठेवून कमलताईंनी क्षमा मागितली आणि समाधानाने त्या नावेत येऊन बसल्या.

दुपारचे दोन वाजले होते. हळूहळू चालत त्या वासूनानांच्या घरी गेल्या. आधीच्या यजमानांच्या पंगती तिथे चालू होत्या. थोड्याच वेळात कमलताईंनादेखील त्यांनी जेवायला वाढले. जेवताना कमलताईंनी विचारले, “वासूनाना कुठे आहेत? मला त्यांना भेटायचे आहे.” रामचंद्र गुरुजी म्हणाले, “बाबा सांगलीला गेले आहेत. चार वाजेपर्यंत परत येतील. तुम्ही तोपर्यंत पडून आराम करा. बाबा आले की मी तुम्हाला उठवतो. संकोच करू नका. आपलंच घर समजा.” कमलताईंनादेखील थकल्यासारखे झाले होते. त्यांचा लगेचच डोळा लागला. जाग आली, तेव्हा पाच वाजत आले होते. मोबाइलवर ड्रायव्हरचे तीन-चार मिस कॉल येऊन गेले होते. त्यांची धांदल उडाली. ड्रायव्हरला फोन करून त्यांनी तासाभरात येत असल्याचे कळवले. बाहेर येऊन पाहतात तर वासूनाना झोपाळ्यावर बसले होते. नव्वदी पार केलेले वासूनाना तब्येतीने अजूनही ठणठणीत होते. झोपाळ्यावर बसून शांतपणे डोळे मिटून नामस्मरण करत असावेत. कमलताईंची चाहूल लागताच त्यांनी डोळे उघडून शांतपणे त्यांच्याकडे पाहून विचारले, “कमलताई, झोप चांगली लागली ना?” कमलताईंना अगदी लाजल्यासारखे झाले. वासूनानांना नमस्कार करत त्या म्हणाल्या, “हो. एवढ्या प्रवासाची सवय नाही. त्यामुळे थकायला झाले होते.” “काही हरकत नाही. हे तुमचे माहेरच आहे. तुमचे वडील, अनंतरावांबरोबर यायचात तुम्ही. आठवते मला. अनंतराव गेले आणि त्याबरोबर तुमचे येणेदेखील थांबले. तसेही शेवटी शेवटी अनंतराव एकटेच इकडे यायचे. अगदी शेवटचे आले होते, तेव्हादेखील एकटेच आले होते. तुमच्या आई गेल्या, तसे तेदेखील एकटे पडले.” हे ऐकताच कमलताईंच्या काळजात एकदम धस्स झाले! आबा एकटे पडले?आबांना एकटेपणा वाटत होता? आपल्याला कसे काही जाणवले नाही? आपण तर त्यांच्यासोबतच होतो ना? तरीदेखील? कमलताईंच्या मेंदूत विचारांचे वादळ उठले.. कमलताईंचा चेहरा संभ्रमात पडलेला पाहून वासूनाना म्हणाले, “त्याचं काय आहे. प्रत्येक जण आपापल्या व्यापात असतो. तुम्ही तुमच्या नोकरीच्या व्यापात, तुमचे भाऊ-भावजय, तुमची मोठी बहीण आपापल्या नोकरीच्या व्यापात. आपापला प्रपंच, त्यातल्या समस्या यामध्ये आपले आपल्या आई-वडिलांसोबत नाही म्हटलं तरी एक प्रकारचे औपचारिक संबंध निर्माण होतात. ते काही मुद्दाम होतात असं नाही. कालचक्राचाच भाग आहे तो. त्यातून कुणाची सुटका झाली नाही. माझीदेखील झाली नाही. आमची अर्धांगिनी तिच्या पंचेचाळिशीतच गेली. मी त्या वेळी पन्नाशीचा असेन. तिच्याशिवाय कधी जगण्याची कल्पनाच केली नव्हती. घरामध्ये वैदिक परंपरा, सर्व धार्मिक कार्यक्रम, यजमानांचे उठणे-बसणे, सोवळ्याचा स्वयंपाक हे सर्व तीच सांभाळायची. ती गेल्यानंतर पुढे सर्व कसे होईल असे वाटू लागले. संसारातील रस संपला. अत्यंत निराश मन:स्थितीत होतो मी. अनंतराव त्या वेळी शेवटचे माझ्याकडे आले होते. आधीच्या काही वर्षांपासून ते माझी मन:स्थिती पाहतच होते. मला ते गुरुबंधूंसारखेच. अध्यात्माची उत्तम बैठक व व्यासंग त्यामुळे त्यांच्याशी मी मनमोकळेपणाने चर्चा करीत असे. त्या वेळी मी मनाच्या समाधानासाठी भगवद्गीता वाचत होतो. माझ्याजवळचे ते पुस्तक पाहून अनंतरावांनी त्याबाबतची चर्चा करायला सुरुवात केली. मी त्यांना सांगितले की मन:स्थिती स्थिर करण्यासाठी मी हे वाचत आहे. मनातील सर्व खेद मी त्यांच्याकडे व्यक्त केला. त्या वेळी त्यांनी मला त्यांची परिस्थिती सांगितली. तुमची आई गेल्यानंतर त्यांना अतिशय एकटे वाटत होते. तुम्ही सर्व मुले आपापल्या विश्वात, व्यापात व परिस्थितीशी संघर्ष करत होता. हे सर्व त्यांनी स्वीकारले होते. त्याबद्दल त्यांच्या मनात खेद नव्हता. मला आश्चर्य वाटले. मी त्यांना म्हणालो, "तुम्ही तुमच्या मुलांसाठी एवढ्या खस्ता खाल्ल्या, त्याग केलात, पण आता तुमची मुले तुम्हाला प्राधान्य देत नाहीत, याबद्दल खेद वाटत नाहीत का?” त्यावर अनंतराव म्हणाले, “तुमच्या हातात जे पुस्तक आहे ना, त्यातीलच एक श्लोक म्हणजे गीतेचे सार आहे असे मला वाटते. 'सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज| अहं त्वं सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच:| याचा अर्थ परमेश्वर म्हणतो, सर्व गोष्टींचा त्याग करून मला शरण ये. मी सर्व पापांपासून तुला शुद्ध करून घेईन आणि मोक्ष देईन. मी या श्लोकाच्या अर्थाचे पालन केले. मला समजले, महाराज मला संकेत देत आहेत की आता सर्व बंधनातून मुक्त होण्याची वेळ आली आहे. शाश्वत अशी कोणतीच गोष्ट या संसारात नाही. ते मला या संसाराचे खरे स्वरूप दाखवत आहेत व या संसाराच्या मोहातून मी मुक्त व्हायला हवे व जी तटस्थता यायला हवी, त्यासाठीच हे वाईट अनुभव मला देत आहेत, हे मी जाणले. मी कुणालाही दोष देत नाही. उलट परमेश्वराचे आभार मानत आहे की ते मला या संसारातील फोलपणाची जाणीव करून देत आहेत. मला आनंद आहे की महाराजांचे माझ्यावर लक्ष आहे. आताही शेवटची उरलेली आनंदयात्रा मी त्यांचे स्मरण करत स्वतःला त्यांच्यावर सोपवून देणार आहे.”

वासूनाना पुढे सांगू लागले, ”खरं सांगतो कमलताई. अनंतरावांचे ते शब्द म्हणजे माझ्यासाठी बोधामृत ठरले. मला असं वाटलं, जणू दत्तमहाराज अनंतरावांच्या रूपानेच माझ्यासमोर बसून मला काही बोध करत आहेत. मनातले सर्व खेद, किल्मिष त्या दिवशी दूर झाले आणि मी सर्वार्थाने स्वतःला या सगळ्यातून अलिप्त केलं. मुलावर सर्व घराची जबाबदारी सोपवून दिली आणि आता केवळ परमेश्वराचं नामस्मरण करत ही उरलेली आनंदयात्रा सफल हावी यासाठी महाराजांची जमेल तेवढी सेवा करीत आहे.” वासूनानांचे हे शब्द ऐकताच कमलताईंना अतिशय पश्चात्ताप झाला. आज आपण जे काही सहन करत आहोत.. काही वर्षांपूर्वी आपणही तेच केले. आईच्या व आबांच्या आजारपणामध्ये त्यांची जबाबदारी आपण किती पार पाडू शकलो? आपल्याकडे रजा कमी होत्या. त्यामुळे दोन महिन्यांच्या आजारपणानंतर आपण मोठ्या बहिणीकडे आईची रवानगी केली. आईला तिच्याकडे राहायचे नव्हते. मोठ्या बहिणीने आईचे जमेल तितके केले. तिथेच तिचा मृत्यू झाला. आबांच्या वेळेस आपण एक महिन्याची रजा काढली. पण पुढची रजा मिळणार नाही म्हटल्यानंतर भावाला आबांना त्यांच्याकडे घेऊन जाण्यास सांगितले. आबांनाही त्याच्याकडे जायचे नव्हते. पण आपला नाइलाज होता. मुलांच्या भविष्यासाठी नोकरीला प्राधान्य देणे गरजेचे होते. भाऊदेखील आईच्या वेळी काही सेवा केली नाही म्हणून झालेली टीका लक्षात घेऊन निमूटपणे आबांना घेऊन गेला. त्यानंतर पंधरा दिवसांतच आबा गेले. सर्व भूतकाळ एखाद्या चित्रपटाप्रमाणे त्यांच्या डोळ्यासमोरून निघून गेला. “आज आलात आणि महापूजेचा अलभ्य लाभ घडलेला आहे. संध्याकाळी पालखी सेवा अवश्य करा. हे तुमचे माहेरच समजा. आज राहा आणि उद्या तुमच्या गावी प्रस्थान करा.” वासूनानांच्या शब्दांनी भानावर आलेल्या कमलताई चहा घेऊन देवळाकडे निघाल्या. ड्रायव्हर गाडी दुरुस्त करून कधीचाच आला होता. कमलताईंनी पालखी सेवा केल्यानंतर घरी निघण्याबद्दल त्याला सूचित केले.

आठ वाजता देवळात महाराजांची मूर्ती पालखीत ठेवून देवळाभोवती प्रदक्षिणा सुरू झाली. त्याबरोबरच पुजारी व सर्व भाविक महाराजांची एकेक पदे सुंदर सुंदर आवाजामध्ये आळवीत होते. 'शांत हो श्री गुरुदत्ता', 'करुणात्रिपदी'.. हे सर्व ऐकत असताना आपण आपल्या आबांचा हात पकडून प्रदक्षिणा घालत आहोत असा कमलताईंना भास होऊ लागला. ही प्रदक्षिणा जशी देवळाभोवती होत होती, तशीच त्यांच्या आयुष्याभोवतीदेखील होत होती. आज पहिल्यांदाच त्या तटस्थपणे त्यांच्या आयुष्याकडे पाहत होत्या. आबांचे आयुष्य व त्यांची महाराजांवरील निष्ठा, त्यातून ते कसे तरून गेले, स्वतःचे आयुष्य, त्यात घडलेले प्रसंग, आबांची शिकवण, आजवर केलेली साधना या सगळ्यांचा मेळ त्या घालत होत्या. स्वतःच उपस्थित केलेल्या बऱ्याच प्रश्नांची आपोआपच उत्तरे त्यांना आज मिळाली होती. मनामध्ये अनामिक लहरी उठत होत्या. आता पुढचे पद सुरू झाले -

येई येई बा गुरुराया
नरहरी दत्तात्रेया येई येई बा प्रभूराया
स्वामी दत्तात्रेया येई येई बा ……
आबांचे अतिशय आवडते पद. लहानपणी कमलताई देखील आबांसोबत हे पद आळवायच्या. आता पालखी मुख्य द्वारापाशी येऊन थांबली.
देवा दिपवाळीचे दिवशी.. अष्टरूप झालासी..

पुजारी धीरगंभीरपणे या ओळी सावकाश आळवीत होते. कमलताईंना आबांनी गुरुचरित्रातील ही कथा खूप वेळा सांगितली होती. नृसिंह सरस्वती महाराजांना त्यांच्या शिष्यांनी दिवाळीला आपल्याकडे येण्याचे आमंत्रण दिले. येतो असे महाराजांनी प्रत्येकाला सांगितले आणि खरेच त्याप्रमाणे आठ रूपे धारण करून महाराज प्रत्यक्ष सर्वांच्या घरी गेले आणि आपल्या मूळ स्थानीदेखील राहिले. परत आल्यानंतर प्रत्येकाने सांगितले की महाराज आमच्याकडे आले होते. सर्वांना महाराजांनी केलेल्या लीलेचा प्रत्यय आला.. अशी ती कथा कमलताईंना आठवली.

देवा दिपवाळीचे दिवशी.. अष्टरूप झालासी..
पुन्हा या ओळी कानावर पडताच कमलताईंना घडलेल्या एकेक गोष्टींची संगती लागू लागली. स्वप्नात आलेले आबा, प्रवासासाठी लागणारी सर्व मदत करणारी चिनू, गाडी बंद पडल्यावर भेटलेला दुचाकीस्वार, वांगी विकणारा शेतकरी, ध्यानीमनी नसताना महापूजा करून घेणारा वासूनानांचा मुलगा रामचंद्र, नावाडी, ओमकारेश्वर मंदिराच्या भेटणाऱ्या बाई व प्रत्यक्ष वासूनाना.. खरेच परमेश्वराने पुन्हा हे अष्टक आपल्यासाठी घडवून तर आणले नाही? आपण विसरलो, तरी महाराज आपल्याला विसरले नाहीत. हृदयाच्या कोपऱ्यात अनामिक हुरहुर, पश्चात्ताप व दत्तमहाराजांविषयी प्रचंड भक्तिरस व प्रेम कमलताईंच्या ह्रदयात दाटून येऊन डोळ्यातून वाहू लागले! बऱ्याच गोष्टींचा उलगडा आपोआपच झाला! कमलताई मनातल्या इच्छा, आकांक्षा, आशा, निराशा या सगळ्यांच्या पलीकडे गेल्या.. खूप वर्षांनंतर अडगळीची खोली साफ करण्यासाठी घ्यावी आणि एखादे दुर्मीळ रत्न हाती लागावे किंवा गारांच्या खड्यांतून पारसमण्याची प्राप्ती व्हावी, त्याप्रमाणे कमलताईंना आज अमूल्य ज्ञान प्राप्त झाले होते. इकडे देवळात पद आळवणे चालू होते..

देवा दिपवाळीचे दिवशी.. अष्टरूप झालासी.. भिक्षा आठ गृही तू घेशी..

कमलताईंनी मनापासून हात जोडले. डोळ्यातून कृतज्ञतेच्या अमृतधारांचा वर्षाव होत होता. कमलताईंचे ओठ आपोआप विलग झाले आणि त्या आपसूकच गाऊ लागल्या -
दीनबंधू म्हणविशी.. करीशी भक्तांशी बहु माया..
नरहरी दत्तात्रेया.. येई येई बा.. प्रभुराया.. स्वामी दत्तात्रेया.. येई येई बा..

कमलताईंची दिवाळी आज खऱ्या अर्थाने साजरी झाली होती!

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

31 Oct 2024 - 3:44 pm | कर्नलतपस्वी

कमलताईं आजच्या मावळत्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात. थोड्याफार प्रमाणात सर्वांची अशी अवस्था. तरूण पिढीची ओढाताण. वृद्धपकाळाचे आपले गाणे कुणी रडगाणे म्हणतील. कोणाचाच दोष नाही.

एकट्याने जगता यायला हवे.
संदर व्यथा मांडली आहे. धन्यवाद.

म्हातारपण बरोबर मांडलं आहे.