मध्यंतरी काही दिवस माझं डोकं दुखत होतं. (जो अवयव नाहीच, तो दुखेल कसा? बायकांना तो नसतोच.. असले घिसेपिटे विनोद करून दंताड वेंगाडून हसू नका.)
तर माझं डोकं दुखत होतं. माझे डोळेही दुखत होते. ते 'जुल्मी' आणि 'जालिम' होऊन मलाच छळत होते. एरवी दोन दिवसांत एका पुस्तकाचा फडशा पाडणारी मी! पण आताशा जरासं वाचलं तरी माझे डोळे दमू लागले. मोबाइलचा भगभगीत प्रकाश सहन होईना. टीव्हीवर एखादी जरी सिरियल पाहिली, तरी डोळे दुखायला लागायचे. डोळ्यांत काहीतरी दोष आहे, म्हणूनच असह्य डोकेदुखी होत असावी, असं माझ्या चाणाक्ष, बुद्धिमान,पण दुखणाऱ्या डोक्याने ठरवलं आणि कुणाकडून तरी का होईना, उपायाची सुरुवात व्हावी, म्हणून मी नेत्रतज्ज्ञाकडे गेले. 'कोर्टाची आणि डॉक्टरची पायरी चढू नये' असं अनुभवी, थोर लोकांनी सांगितलेलं असूनही मी डॉक्टरची पायरी चढले. एका डाॅक्टरकडे जाणं म्हणजे इतर ८४ लक्ष डॉक्टरांच्या फेऱ्यांत अडकणं हे मला ऐकिवात आणि थोडं थोडं स्वानुभवावरून ज्ञात होतंच. पण.. दुखणाऱ्या डोक्यापुढे शहाणपण चालेना. आणि अनुभव घेणं आयुष्यात कोणाला चुकलंय?
तर डोळ्यांच्या डॉक्टरीणबाईंनी अनेक प्रकारची यंत्रसामग्री वापरून सांगितलं की माझ्या दोन्ही डोळ्यांत मोतीबिंदू आहे, पण वर्षभर तरी ऑपरेशन करण्याची गरज नाही. शिवाय नंबरही वाढलेला नाही, असंही त्यांनी निदान केलं. डोळे इन्फेक्शनमुळे दुखत आहेत आणि लाल झाले आहेत आणि त्यामुळे डोळ्यांतून पाणी येत आहे आणि वयामुळे (जळो मेलं ते म्हातारपण!) डोळे कोरडे होत आहेत, असं सांगितलं. त्यांनी दिवसातून तीन वेळा डोळ्यांत टाकायला ड्राॅप्स दिले, शिवाय गोळ्यांच्या स्वरूपात ॲन्टिबायोटिक (ते तर हवंच), त्याच्यावर उतारा म्हणून ॲन्टासिड आणि इतर तीन गोळ्या लिहून दिल्या. आणि हो! एका महिन्याने 'फाॅलोअप'ला बोलावलं.
जाता जाता त्यांनी शेवटी एक ओळ खरडली आणि मला भ्या घातलं की तुम्ही कान-नाक-घसा तज्ज्ञ आणि एक फिजिशियन या दोघांचं 'ओपिनियन' घ्या. पुढच्या फॉलोअपच्या आत त्या दोघांना दाखवून मगच यांच्याकडे परत भेटायला यायला सांगितलं. अर्थातच ते नाक-कान-घसा तज्ज्ञ आणि फिजिशियन नेमके कोण असावेत तेही त्यांनी ठरवून त्यांची नावंही लिहून दिली. पुलंच्या बटाट्याच्या चाळीतील "पण गच्चीचां काय ?" या वाक्यानुसार मी विचारलं, "पण माझ्या डोकेदुखीचं काय?"
त्यावर त्या म्हणाल्या, "डोळ्यांमुळे डोकं दुखत नाहीय्ये."
हे राम!
येता येता ना.का.घ. तज्ज्ञ आणि फिजिशियन या दोघांच्या अनुक्रमे पुढील बुधवार आणि त्याच्या पुढील आठवड्यातला सोमवार अशा अपॉइंटमेंट्स घेऊन घरी परतले.
तर.. डोळ्यांच्या डॉक्टरीणबाईंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पुढच्या आठवड्यात नाक-कान-घसा तज्ज्ञांकडे गेलो. डॉक्टर ही एक अशी व्यक्ती आहे, जिला आपण "का?" हा उलटा प्रश्न विचारूच शकत नाही. विचारला तर ते जे काही सांगतील ते कळणार नाही.
तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली, जी मी एरवी आसपासची माणसं भयभीत होऊ नयेत म्हणून कुणालाही सांगत नाही. पण तुम्हाला सांगते. ती गोष्ट म्हणजे मी गाणं शिकते. माझ्या घराच्या, सर्वांत कोपऱ्यातल्या खोलीत, सर्व दारं, खिडक्या ब्लॅकआउटच्या वेळी करतात तशा बंद करून मी ऑनलाइन गाणं शिकते. अजून तरी आम्हाला "सोसायटी सोडा" असं कुणी म्हणालेलं नाही. सात-आठ महिने सुरळीत गेलेत, पण हल्ली हल्ली माझा गाताना घसा दुखायला लागला. तार सप्तकातले स्वर सहजपणे लावणारी मी, पण आता दमायला लागले. हळूहळू आवाज फाटायला लागला. चिरकायला लागला. घसा कोरडा पडला, लाल झाला. त्यासाठी डॉक्टरांकडे जायचंच होतं. म्हटलं, चला, नाक-कान-घसा तज्ज्ञांकडे जातोच आहे तर गाण्याचा प्रश्नही त्यातच सोडवून घेऊ या. त्यांनी घशात चपटी पट्टी घालून जबडा फाटेपर्यंत उघडायला लावून तपासणी केली. आता कोण्या जबडातज्ज्ञाकडे जावं लागतं की काय, अशी भीती वाटायला लागली. मग ते म्हणाले, "घशाला इन्फेक्शन वाटतंय. घसा सुजलाय असं वाटतं. इन्फ्लेमेशन. घशावर ताण पडू देऊ नका. कमी बोला."
मी म्हटलं, "मी गाणं शिकतेय."
ते स्वरात कठोरपणा आणून म्हणाले, "गाणं ताबडतोब बंद करा."
माझा पडलेला चेहरा सावरत मी माझी एक शेवटची शंका फेडून घेण्यासाठी विचारलं, "डाॅक्टर, मला घशाचा कॅन्सर बिन्सर नसेल ना?" त्यांनी छताकडे बोट दाखवत म्हटलं, "त्याच्या कृपेने वाटत नाही तुम्हाला तसलं काही असेल. सध्यातरी."
या डॉक्टरांचं सगळंच बोलणं असं होतं. "वाटतं आहे", "वाटत नाही." - म्हणजे खातरीने काहीच नाही. सुटकेचा निःश्वास टाकता येईना.
तरी "कॅन्सर नसावा" इतक्या शक्यतेनेही मला आनंद झाला. चला.. फी वसूल! तेवढ्यात ते म्हणाले, "पण इन जनरल तुम्ही एक बेस लाइन टेस्ट म्हणून काही ब्लड टेस्ट करून मला रिपोर्ट्स दाखवा. तुम्हाला ॲनिमिया असावा असं वाटतंय. लिपिड्सही बघून टाका. आणि फास्टिंग शुगरही.." असं म्हणून त्यांनी गिचमिड अक्षरात एक यादी खरडली.
आता काय करणार? मग दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी उपाशीपोटी ती लॅबोरेटरी गाठणं, वेटिंग, सुई टोचणं, मग पुन्हा वेटिंग, मग दोन दिवसांनी एकेक करत सर्व रिपोर्ट जमा होणं. ते सगळे सोपस्कार पार पाडून पुन्हा 'नाक-कान-घसा'कडे गेलो. पण कळलं की त्या दिवशी ते अचानक 'इमर्जन्सी सर्जरी'साठी निघून गेले होते. पहिल्या अपॉइंटमेंटमध्ये त्यांनीही ॲन्टिबायोटिक, ॲन्टासिड आणि इतर तीन-चार औषधं प्रसाद म्हणून दिलेली होतीच. त्यामुळे मग आम्ही काही त्यांच्यासाठी थांबलो नाही. किंवा दुसऱ्या दिवशीही गेलो नाही. कारण त्यांच्या दृष्टीने ॲनिमिक असलेल्या माझं हिमोग्लोबिन चक्क तेरा होतं. बाकीही रिपोर्ट नॉर्मल रेंजमध्ये होते. पुढच्या आठवड्यात फिजिशियन होताच. त्याला रिपोर्ट्स दाखवू म्हटलं.
इकडे गच्चीचा प्रश्न अजूनही भिजत घोंगडं होऊन पडला होता. माझं डोकं दुखतच होतं. इतकं ट्रिमेंडस दुखायचं की सहनच व्हायचं नाही. मानेपासून सुरुवात व्हायची, डोक्याची मागची बाजू, माथा, कपाळ सगळं दुखायचं. वेदनेने डोळ्यांत पाणी यायचं. घरातले घाबरले. दरम्यान फिजिशियन व्हिजिट झाली. त्यांनी सांगितलं की हा सायनसायटिस वाटतो आहे. मग हे नाकाघतज्ज्ञाला कळलं कसं नाही? सॉरी, "वाटलं" कसं नाही?
परत नाकाघचे पाय धरणं आलं. त्याच्यासाठी वेटिंग. त्याची फॉलोअप फी. पुन्हा नवीन ॲन्टिबायोटिक, ॲन्टासिड आणि इतर औषधं. त्याने पित्त सुरू झालं, पण डोकेदुखी थांबेना. घरच्यांना, मला आणखी टेन्शन आलं. मग नाकाघ म्हणाले की "एक न्यूरोलॉजिस्ट ओपिनियन घेऊन टाका. काही ट्यूमर वगैरे असेल तर दुर्लक्ष नको." बापरे.. त्या ताणात एक आठवडा गेला. कारण यांचे रेकमेंडेड न्यूरॉलॉजिस्ट पुढच्या आठवड्यातच उपलब्ध होते. त्यांनी लगेच एमाराय करून घेतली. (उगीच आपलं रूल आउट करून टाकू या.. इत्यादी म्हणत) शेवटी सर्व काही रूल आउट करत मला सांगितलं की हा 'मायग्रेन' आहे. त्यावर गोळ्या सुरू.
आमचा केमिस्ट माझ्यावर खूपच खूश झाला. तो एक्स्ट्रा डिस्काउंट द्यायला लागला. तेवढ्यात दुष्काळात तेरावा महिना येऊन मला तीव्र खोकला झाला. ढास इतकी लागायची की मी रात्रभर झोपू शकायची नाही. रात्रभर कोचावर खोकत बसून राहायची. एक शब्दही बोलू शकत नव्हते. अशक्तपणा आला. अन्नावरची वांछा गेली. नेब्युलायझेशन, ॲन्टिबायोटिक, खोकल्याचं औषध चालू होतंच. मग मात्र सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे भरती व्हा म्हणाले. मी ॲडमिट झाले. तिथल्या औषधांनी मला हळूहळू बरं वाटायला लागलं. पण त्यांनी नखापासून मेंदूपर्यंत सर्व स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या व्हिजिट्सची माळका लावली. एक स्पेशालिस्ट बेडजवळ येऊन पल्स बघून दोन प्रश्न विचारून गेला की दीड हजार.
खोकल्यासाठी ज्या चेस्ट स्पेशालिस्टच्या देखरेखीखाली मी ॲडमिट होते, ते डॉक्टर मात्र अगदी जगावेगळे होते.
त्यांच्या बाबतीत चक्क चांगला अनुभव आला. ते तपासायला आले की माझ्याशी सविस्तर बोलायचे. त्यांनी मला प्रत्येक वेळी नीट तपासलं आणि म्हणाले, "तुम्हाला काही गंभीर आजार नाही, टीबी नाही. पुन्हा पुन्हा एक्सरे काढण्याची गरज नाही. फक्त जरा ॲलर्जी आहे. औषधं आणि नेब्युलायझेशनने बरं वाटेल." शेवटी डिस्चार्ज देताना म्हणाले, "आता पूर्ण बरं वाटलं नाही, तर पाच दिवसांनी या. बरं वाटलं तर यायची अजिबात आवश्यकता नाही." आणि हसले.
मी थोडी धिटाई दाखवून त्या डॉक्टरांशी बोलले. म्हटलं, "डाॅक्टर, मी तुमची खरोखर मनापासून आभारी आहे. तुम्ही माझ्याशी सविस्तर बोललात. तुम्ही मला वेळ दिलात. धीर दिलात. दिलासा दिलात. मला काय झालं आहे हे मला समजावून सांगितलंत. हल्ली कोणी असं नाही हो करत. डॉक्टर आणि पेशंट यांच्यामध्ये एक बाॅंड हवाच. डॉक्टरांनी आपलं नुसतं ऐकून घेतलं एवढ्यानेच पेशंटचं निम्मं दुखणं बरं होतं. असिस्टंट्सनी तयार केलेले रिपोर्ट्स बघून, त्यावरून औषधं लिहून देऊन पेशंटकडे वळूनही न बघता, त्याच्याशी न बोलता निघून जाणाऱ्या डॉक्टरांशी पेशंट रिलेटच होऊ शकत नाही."
माझ्या लहानपणी फॅमिली डॉक्टर असायचे. घरातल्या सगळ्यांची आरोग्याची हिस्टरी त्यांना माहीत असायची. ते जणू काही कुटुंबातील सदस्यच असायचे. तसं आता शक्य नाही. पण पेशंट-डाॅक्टरांमध्ये जवळीक निर्माण व्हायला हवी, हे मात्र नक्की.
बाय द वे, मी आता पूर्ण बरी झाली आहे.
एक सांगते तुम्हाला! या आजाराच्या उपचारासाठी डाॅक्टरांची पायरी चढण्याआधी मी चित्रगुप्ताकडे राइट टु इन्फर्मेशन या कायद्याअंतर्गत मी गेल्याजन्मीचं डाॅक्टरांचं किती रुपये देणं लागते, याची माहिती मिळवली होती. पण प्रत्यक्षात मात्र मला त्याहून कितीतरी पटीने अधिक रक्कम खर्च करावी लागली. एकूण 'तिथल्या' काय आणि 'इथल्या' काय, 'राइट टु इन्फर्मेशन'मध्ये काही तथ्य नाही, हेच खरं. शुभंकरोती म्हणताना आता "आरोग्यं धनसंपवा" असेच शब्द तोंडात येतात..
आता मी शिकले आहे की कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या आणि आईच्या हातचा काढा हीच ती लहानपणची रेमेडी बेस्ट होती!
प्रतिक्रिया
31 Oct 2024 - 3:07 pm | पाषाणभेद
नेहमीची हसरी बॅटींग केलीत.
31 Oct 2024 - 4:07 pm | श्वेता२४
आजी तब्येत जपा आणि असेच खुसखुशीत लेख लिहुन आम्हाला हसवा.
31 Oct 2024 - 5:05 pm | कंजूस
दुखण्याच्या उपचारांचाही विनोदी लेख होऊ शकतो याचे प्रमाण.
31 Oct 2024 - 5:58 pm | वामन देशमुख
हे कॅप्शन आवडले!
बाकी, तुमच्या लेखातील खुसखुशीतपणा अजून किमान २५ वर्षे वाहत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना!