दिवाळी अंक २०२४ - सुंद

सन्जोप राव's picture
सन्जोप राव in दिवाळी अंक
31 Oct 2024 - 6:00 am

1



यशवंत गावातल्या चार सुतारांसारखाच एक होता. चावडीजवळ एका जुन्या घरात त्याचं दुकान होतं. शेतीची अवजारं दुरुस्त करणं हे मुख्य काम होतं. त्याशिवाय मग कुणी घर, दुकान बांधायला काढलं की त्याच्या तुळया, खांब, चौकटी करणं, दारं करणं, कुणाचं छप्पर बदलायला, दुरुस्त करायला झालं की ते करणं, कुठं जुन्या घराची तुळई तिच्या सांगडीतनं सुटून खाली यायला लागली की तिला खालून ठेप लावणं, कुणाच्या जिन्याची पायरी बदलणं ही अधूनमधून येणारी कामं… असं चाललेलं होतं. आर्थिक परिस्थिती त्यातल्या त्यात बरी असलेल्या लोकांच्या घरी लाकडाचे पलंग असत, सोप्यात बसायला बैठकी असत, खुर्च्या असत, जेवायला बसायला पाट असत, देवघरात पूजेला चौरंग असत. पण अशी घरं फार कमी. बाकीच्यांच्या घरात दुभत्यासाठी एखादी पेटी, कपडे ठेवायला एखादं कपाट, एखादं भिंतीतलं फडताळ एवढंच असे. ते करताना त्यांत फार सफाई नसली, तरी चालून जात असे. टिकाऊपणा हा मुख्य उद्देश, मग तो साधताना ओबडधोबडपणा आला तर त्याचं कुणाला काही वाटत नसे. तुळया अगदी सरळ नसल्या तरी चालून जात. खांबांच्या मध्ये एखादी गाठ असली तरी खपून जाई. लाकडी कामासाठी शक्यतो गावात उपलब्ध असलेलं लाकूडच वापरलं जात असे. शेताच्या बांधांवर लिंबाची झाडं असत, कुठे बांबूची बेटं असत, बाभळ असे. गावातले सुतार यातनंच जसं जमेल तसं लाकूडकाम करत असत. यापेक्षा महाग लाकूड परवडणारे लोक कमी होते. क्वचित कुणीतरी घराच्या चौकटीसाठी बाहेरगावाहून सागवान घेऊन येई, आणि मग पुढे बरेच दिवस त्या अस्सल सागाचं कौतुक, जराशी चेष्टा असं चालू राही. कमी किंमतीत काम करून देणारा सुतार सगळ्यांना पाहिजे असे, मग त्याचं काम दिसायला कसंही का असेना, ते चालून जाई. पण तरीही त्यातल्या त्यात यशवंताचा हात कसबी होता. काय बरं दिसेल, काय दिसणार नाही याची त्याला नजर होती. चार रंधे जास्त मारून काम गुळगुळीत करणं, पटाशीने दर्शनी भागात नक्षी करणं, एकाला दोन जोड करून खांब एकसारखे एक करणं अशा करामती तो करत असे. दिसणं वगैरे विचार करणं हे गावाकडच्या माणसाला परवडत नाही. तरीही इतर सुतारांच्या तुलनेत यशवंताचं काम साजरं दिसत असे. सांगितलेल्या दिवसाचा वायदा पाळायची त्याची वृत्ती होती. काशीच्या न्हाव्यासारखं सतरा लोकांच्या डोक्याला वस्तरा लावून ठेवण्याचा त्याचा स्वभाव नव्हता. त्यातून माणूस वृत्तीने अगदी सज्जन आणि बोलायला अगदी गमत्या. खेडेगावातला माणूस परिस्थितीमुळं गांजलेला असतो. खेड्यातल्या इतर सगळ्या गोष्टींप्रमाणं त्याचं बोलणंही खडबडीत झालेलं असतं. त्यामुळं यशवंताच्या बोलण्याचं गावात लोकांना अप्रूप वाटत असे. त्याची जुनी गिर्‍हाइकं शक्यतो त्याला सोडून दुसर्‍या सुताराकडं जायला बघत नसत.

गावात यशवंताचं एकत्र कुटुंब होतं. चार एकर जिरायती शेती होती. पाच-सात आकणी जुनं घर होतं. यशवंताचे वडील त्या मानाने लवकर वारले होते. थोरला भाऊही पासष्टीच्या आतच गेला होता. घरात म्हातारी आई, थोरली वाहिनी, तिचा मुलगा, यशवंताचा धाकटा भाऊ, त्याची बायको, दोन मुलं असा संसार होता. खेडेगावाच्या मानाने यशवंताचं लग्न फार उशिरा - म्हणजे त्याच्या पस्तिशीत झालं होतं. त्याच्या धाकट्या बहिणीचं कुठे जमत नव्हतं, म्हणून पुढची सगळीच लग्नं तटली होती. यशवंताची बायको त्याच्या भावकीतलीच होती. दिसायला चारचौघींसारखी, पण रंगानं गोरटेली आणि अंगापिंडाने थोराड होती. यशवंतपेक्षा ती वयाने चांगली बारा-चौदा वर्षं लहान होती. तालुक्याच्या गावातली होती, दहावीपर्यंत शिकलेली होती. लग्नाच्या वेळी नवरा वयाने मोठा म्हणून तिची जरा नाराजी होती, पण तिचा बाप खमक्या होता. त्याच्या शब्दाबाहेर जायची कुणाची टाप नव्हती. त्याने सोयरीक जुळवली आणि कमल मुक्काट्याने लग्नाला उभी राहिली. तिच्या लग्नात ‘म्हातारा न्हवरा करून घेतलीस व्हय गं कमल’ म्हणून काही भोचक बायकांनी तिला चिडवलं, पण कमल गप्प बसली. आता लग्न झालंच म्हटल्यावर सगळ्यांची तोंडं बंद झाली, पण उणीव काढायची संधीच बघत असलेल्या बायका कमलला ऐकू जाईल अशा आवाजात "नव्या घराला जुनी चौकट बशीवली जनू" म्हणून फिदीफिदी हसत, त्यावर कुणी जरा अधिक चावट बाई "असू दे गं, जुन्या सागवानाला कीड लागत न्हाई म्हंत्यात" असं म्हणे आणि बायकांच्या हसण्याचा धुरळा उठे. कधी कमल दारात सडा घालत असली की येणार्‍या-जाणार्‍या बायका "काय कमल, तांबडं फुटायलाच उठलीस म्हणं? तुजी तरी काय चुकी गं.. नाळक्यात राकेलच न्हाई, तर चूल पेटनार कशी" म्हणून तोंडाला पदर लावत. खेड्यात असंच चालत असतंय. लग्नात यशवंत पस्तिशीचा होता, काही म्हातारा जग्ग नव्हता, पण बोलणारे काय, मनाला येईल तसे बोलतात. तसा यशवंत अंगानं जरा लहानसर असल्याने लग्नात काही फार काही थोराड दिसत नव्हता. जोडा अगदी शोभून दिसत नव्हता, पण खेड्यात अशा गोष्टी चालून जातात. खेडेगावात लग्न जरा जुनं झालं की लोक नव्या-जुन्याची भाषा करायला लागतात. तशीच चाल असते. यशवंताला लग्नानंतर वर्षाभरातच पहिला मुलगा झाला. त्यानंतर तीन-चार वर्षांतच दुसरा. मुलं झाली तशी चेष्टा बंद झाली. यशवंताचा संसार रांकेला लागला. आता यशवंताची मुलं चांगली मोठी झालेली होती. थोरला बापू बँकेत होता. गेल्या वर्षी त्याचं लग्न झालं होतं. त्याचं बिर्‍हाड कोल्हापूरला होतं. धाकटा कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होता. एकूण घरची परिस्थिती हातावरचं पोट अशी नसली, तरी खाऊनपिऊन सुखी अशीच होती.

आपल्याशी लग्न झाल्यापासून आपली बायको फारशी खूश नाही, हे लग्न झाल्यावर थोड्या दिवसांतच यशवंताच्या लक्षात आलं होतं. पण तक्रार करण्याचा त्याचा स्वभाव नव्हता. ‘बहिणीचं लग्न व्हायचं होतं, आपणच आता माझं लग्न करा असं कसं म्हणायचं? बायकोच्या मानानं आपण जरा जून लागलो, पण आता झाल्या गोष्टीला काही इलाज आहे का? तिला नोकरी करणारा, शार गावातला, तिच्या शिणीचा मिळाला असता गडी, तर ती खुशीत राहिली असती, आपलंबी आयुष्य जरा जास्त सुखाचं गेलं असतं. बरं, नव्हती मर्जी, तर तिनं लग्नाआधी एका शब्दाने सांगूने का?’ त्याच्या मनात येत असे. तरी त्यातल्या त्यात तिला बरं वाटावं म्हणून तो धडपडत असे. सुतारकामातनं चार पैसे वाचवून तो कधीतरी कमलच्या हातावर एखादी नोट ठेवत असे, तिला द्राक्षं आवडतात म्हणून बाजारातनं कधीतरी तिच्यासाठी हळूच पावशेर द्राक्षं आणत असे, आपल्या वाटणीचे उसाचे एकदम पैसे आले की तिला एखादा, लहानसाच का होईना, डाग करून आणत असे, आपल्या परीने बायकोला खूश ठेवण्याचा प्रयत्न करत असे. पण आता इतकी वर्षं झाली तरी कमलची समजूत पटली नव्हती. ती नवर्‍याला काही बोलत नसे, पण त्याच्याकडे फारसं लक्षही देत नसे. यशवंताचे सदरे मानेवर अगदी गेले की त्याची म्हातारीच कधीतरी, ती आणि यशवंत एकटेच असताना, "येसवंता, कापडं दोन नवी शिवूनेस काय?" असं विचारत असे. थंडीच्या दिवसांत कधी त्याच्या जिवाला बरं वाटेनासं झालं आणि तो मुरगाळून झोपला असला की आतनं एखादे वाकळ आणत असे आणि थरथरत्या हाताने त्याच्या अंगावर पसरत असे. तो रंजीस होऊन बसला असला की आपल्या मनाने त्याच्यासाठी गोड चहा करत असे आणि त्या चहाचा गरम पेला आपल्या अंगावरच्या लुगड्याच्या पदरात धरून हळूच त्याला आणून देत असे. यशवंत काही बोलत नसे, पण त्या शहाण्या म्हातारीला काही न बोलता लेकाचं मन कळत असे.

खेडेगावात माणसं फार लवकर म्हातारी दिसायला लागतात. यशवंताची आता साठी होऊन गेली होती. आता त्याचे बरेच केस पिकले होते. चेहर्‍यावर वयाच्या रेषा उमटल्या होत्या. हातपाय अजून चालत होते, पण हालचाली मंद झाल्या होत्या. डोळ्यांवर चश्मा आला होता. आधीच कमी बोलणारा यशवंत आता आणखीनच गप्प झाला होता. सकाळी पाचच्या ठोक्याला उठायची यशवंताची जुनी सवय होती. जुन्या चालीरितीप्रमाणं आंघोळ झाल्याशिवाय तो तोंडात पाणी घेत नसे. सकाळी तोंड धुऊन आधी तो बंबाला घालत असे. मग एकीकडे जनावरांचं वैरण-पाणी करून, गोठ्यातलं शेण गोळा करून, ते उकरड्यावर टाकून येऊन तो आंघोळ करून घेत असे. तोवर घरात त्याची म्हातारी, थोरली वहिनी कुणीतरी उठलेलं असे. उगवत्या सूर्याच्या उजेडात सोप्यात बसून यशवंत चहा घेत असे. चहाचा कप खाली ठेवला की तो हातात खुरपं आणि दावं घेऊन वैरण करायला बाहेर पडत असे. घरात चार म्हशी होत्या, त्यातल्या दोन-तीन तरी दुभत्या असत. त्यामुळे वैरणीला एकाला दोघं असले की बरं पडत असे. नदीकाठाचं अर्धा एकर कुरण त्याने खंडून घेतलं होतं. एक आड एक दिवस गवत, एक आड एक दिवस आपल्या उसातले बोंग, मग कधीतरी भुईमुगाचे वेल, उन्हाळ्यात बडमीतला कडबा अशी वैरणीची काहीतरी व्यवस्था करायला लागत असे. एकदा वैरण करून आला की यशवंताला घराकडे बघायला वेळ नसे. घरात चार किलो दूध ठेवून उरलेल्या दुधाचा दोन ठिकाणी रतीब घालणं, त्यातनं काही उरलं तर ते डेअरीला घालणं, दुपारची वैरण करणं आणि शेतीवर देखरेख ही कामं त्याचा धाकटा भाऊ करत होता. थोरल्या भावाच्या मुलाचं काही शिक्षण झालं नव्हतं. तो शेतीच बघत होता. घरातलं सगळं, जनावरांच्या धारा काढणं, आल्यागेलेल्याचं चहापाणी हे सगळं घरातल्या बायका बघत होत्या. वैरण झाली की हातपाय धुऊन यशवंत न्ह्यारीला बसत असे. न्ह्यारी म्हणजे काय, सकाळचं जेवणच. दूध-भाकरी, तिखट भाजी, खर्डा, दही, कधी दूध, गूळ, कण्या. उन्हाळ्यात आंबील. असली न्ह्यारी करून यशवंत दुकानाकडे येत असे. तिथे कुणी ना कुणी त्याची वाट बघत थांबलेला असेच. मग यशवंताला वर बघायला सवड मिळत नसे.

घरचा खटाला मोठा होता आणि घरातली मुलं मोठी होत होती, तसं भांड्याला भांडं लागायचं वाढत चाललं होतं. शेवटी शहाणी म्हातारीच एक दिवस म्हणाली की "वाटणी करून घ्या जावा बाबांनो. गोडीत हाय तवर मोकळं झाल्यालं बरं. मागनं कोर्टकज्जा होण्यापेक्षा हे बरं." यशवंताचा भाऊ त्याच्यासारखाच मनाने निर्मळ होता. पुतण्याही आपल्या काकांच्या शब्दाबाहेर नव्हता. घराणं निष्कर्जी होतं, पान-तंबाखू सोडलं तर घरातल्या कुणाला कसलं व्यसन-बिसन नव्हतं. जमिनी, घरावर कुठे काही बोजा नव्हता. त्यांनी सरळपणाने समजुतीने जमिनी वाटून घेतल्या, घरात उभे पडदे घालून घराचे तीन भाग केले. ज्याने-त्याने आपापल्या न्हाण्या बांधून घेतल्या. भांडीकुंडी काय होती ती तीन ठिकाणी वाटून घेतली. म्हातारीचे डाग होते त्याला काही कुणी हात लावला नाही. "तुझी इच्छा असेल त्याला तू दे, तुझ्या मर्जीने दे"असं यशवंत म्हणाला आणि त्याच्या भावाने मान डोलावली. सुनांनी, नातसुनांनी आपापल्या अंगावरचं सोनंनाणं आपापल्या घरात आणलं. म्हातारीला पडायला हक्काची तीन घरं झाली. सकाळची न्ह्यारी एका ठिकाणी, दुपारच्या गूळकण्या एका ठिकाणी, संध्याकाळचा दूधभात एका ठिकाणी अशी म्हातारीची आबदा झाली. रात्री म्हातारी जिथं असंल तिथे तिच्या कांबरूणात झोपायला तिन्ही घरातली लहान मुलं यायला लागली, सकाळी शाळेची वेळ झाली की डोळे चोळत आपापल्या घराकडं जायला लागली.

पाचाच्या ठोक्याला उठून, उगवतीला हात जोडून, अंथरूण कांबरूण गोळा करून कामाला लागणारा यशवंत उठायला उशीर करायला लागला, तशी त्याच्या बायकोची - कमलची तक्रार सुरू झाली. यशवंताच्या वाट्याला तिसरं वेत झालेली पंढरपुरी म्हैस आली होती आणि तिची धार काढण्यापलीकडे कमलला काही करायला होत नसे. एकतर सकाळी लवकर उठायचं काही कमलला जमत नसे. दिवस वर आला की मग ती उठत असे. उठल्यावर अर्धा तास ती मिश्री लावत बसलेली असे. मग सगळं आवरत असे. यशवंताला वैरणीला उशीर व्हायला लागला, तशी म्हैस गोठ्यात धडपड करू लागली. वैरणपाणी करून, जराशी न्ह्यारी करून कामावर जायला यशवंताला उशीर व्हायला लागला आणि कधी नव्हे ते त्याची गिर्‍हाईकं तटून राहायला लागली. सकाळी वैरण-पाणी चुकलं की मग यशवंताची म्हैस लवकर पान्हायची नाही आणि मग दहा-पंधरा मिनिटं तिची कास गोंजारावी, तेव्हा ती पान्हा घालत असे. तोही नेहमीइतका नाही. कासेला रेडी होती, म्हणून एका सडातलं दूध तिला सोडावं लागे. म्हैस पान्हा चोरायला लागली, तसं घरात दूध कमी पडायला लागलं आणि मग कमल यशवंताला शिव्याशाप द्यायला लागली. उलटून फार तोंड करण्याचा यशवंताचा स्वभाव नव्हताच. यशवंत अलीकडे आत आला होता. त्याच्या चलाख चेहर्‍यावर आता एक सुंदपणा आला होता. आता तो गोठ्यातली स्वच्छता, वैरण करून येईपर्यंत दिवस चांगला उजडत असे. त्याची चाल मंदावल्यासारखी झाली होती आणि अंगात शिसं भरावं असा जडपणा आला होता. आपल्या डोळ्यासमोरनं ढग गेल्यासारखं होतंय असं त्याला वाटू लागलं होतं आणि उठता-बसता तो बारीक कण्हू लागला. दुकानातल्या कामांना वेळ लागायला लागला आणि गिर्‍हाइकांची तक्रार सुरू झाली, तेव्हा यशवंत अधिकच गांजल्यासारखा झाला. आपल्याला काय होतंय हे त्याला समजेनासं झालं. कुठल्या डॉक्टरला दाखवावं म्हटलं, तर कोण शहाणा डॉक्टर भेटणार? ज्याच्याकडे जावं तो सतरा तपासण्या मागं लावणार. हजार दोन हजार रुपये काढायला बघणार. बरोबर कुणाला न्ह्यावं म्हटलं तर कोण आपल्या बरोबर येणार? थोरल्या मुलाच्या बायकोला दिवस गेले होते, त्यामुळे तो तिच्यातच गुंतला होता. धाकटा कॉलेज करून दुपारी येत असे, पण आल्या आल्या भाकरी खाऊन मधल्या खोलीतल्या बाजावर हातात मोबाइल घेऊन पडत असे तो अगदी सांज मावळेपर्यंत. मध्ये उठलाच तर नवीन घेतलेल्या गाडीवरनं त्याच्या मित्रांकडं जायला निघत असे. त्याचं जे बोलणं होतं ते आईबरोबर, यशवंताबरोबर तो महिना महिना भाषा करत नसे. बोलला तर एकदम तुटक, तोडून टाकल्यासारखं बोलत असे. असं एकदमच एकटं पडल्यासारखं झालं, तेव्हा कधी नव्हे ते यशवंता आपल्या बायकोला म्हणाला, ”जिवाला बरं वाटत नाही गं कमल मला. कुठल्यातरी डॉक्टरला तरी दाखवू या का काय ते बघ.”

या बोलण्याची वाटच बघत असल्यासारखी बायको फणकारली, “व्हय, बरं वाटत न्हाई. काय रोगडा आलाय तुमास्नी? दोनाला तीन येळा भाकरी खातासा आणि रातसारी हूं म्हणून झोपतासा आणि जिवाला बरं नं वाटायला काय धाड?”

बोलूने ते आपण बोललो.. यशवंताला वाटलं. गप्पच बसावं असं त्याला वाटलं, पण तरीही न राहवून दुखावलेल्या आवाजात तो म्हणाला, “अगं, मी मुद्दाम करत नाही. आतापर्यंत कधी दिवस वर आलाय आणि मी मुरगाळून झोपलोय असं झालंय काय? काहीतरी बिघडलं असेल असं वाटलं, म्हणून बोललो. कुणीतरी बघा कुठल्या डॉक्टरला दाखवायचं का काय ते.”

“काय डॉक्टर नको का फिक्टर नको. भायेरचं असंल कायतर. सदलग्याला देवरुषी हाय एक चांगला.” ती कोरड्या आवाजात म्हणाली. “तुमच्या पुतण्याला घेऊन जावा या शुक्करवारी. काय सांगंल ते करा सा म्हैने वरीसभर. बापई माणूस आन असं कसं सुंद बडवल्यावाणी बसता वं घरात? काय काम कराय नको काय नको..”

डॉक्टर, देवरुषी कोण का असेना, कुठं का असेना, पण मी संगट येते असं बायकोनं म्हणायला पाहिजे होतं असं यशवंताला वाटलं. तसं तिला बोलून दाखवावं म्हणून त्यानं तोंड उघडलं, पण कशाला उगंच म्हणून तो गप्प बसला. हातातल्या कपातला चहा आता गार होत आला होता. यशवंताला चहाची काही चवच लागत नव्हती. आता या उरलेल्या चहाचं काय करावं हे त्याला समजेना. कमल आणखी काहीतरी बोलत होती, पण तिच्या पत्र्यावर मोळा ओढावा अशा आवाजाचा त्याला काही अर्थच समजेना. त्याचा पुतण्या काहीतरी विचारायला आला होता, त्याच्याही बोलण्यावर काय बोलावं हे त्याला सुचेना. कसली भांगलण? सोयाबीन? सोयाबीन म्हणजे काय?

पुढच्या शुक्रवारी यशवंताला पुढे घालून त्याच्या पुतण्याने त्याला सदलग्याला नेलं. उन्हाचा ताप, वडापमधली गर्दी, त्यात सदलगा स्टँडवर पुतण्याने जबरीने खायला घातलेली तेलकट मिसळ.. यशवंताचं डोकं गरगरायला लागलं. देवरुषाच्या वाड्यात हूं म्हणून गर्दी होती. आलेल्यातल्या काही बायका घुमत होत्या, एकदोघी फीट येऊन पडल्या असाव्यात. यशवंताला काही कळेचना. उपास म्हणजे काय? डोंगराला जायला लागणार म्हणजे कुठे? तो सुंद नजरेने एकदा देवरुषाकडे आणि एकदा पुतण्याकडे बघत राहिला. देवरुषाने त्याच्या कपाळावर भंडारा फासला असावा. यशवंताला सगळं पिवळं पिवळं दिसायला लागलं. आपल्या पुतण्याचा हात हातात घेऊन तो कसाबसा म्हणाला, “घराकडं.. घराकडं जाऊ या रं.”

पुढक्या शुक्रवारी कमलनं यशवंताला सकाळचा चहापण दिला नाही, तेव्हा त्याने तिच्याकडे बघितलं. ती चिडल्यासारख्या आवाजात म्हणाली, “उपास हाय न्हवं तुमचा? च्या कापी काही घ्यायचं न्हाई दिवसभर . सांच्याला लवकर सोडा म्हनं उपास.”

“आणि न्ह्यारी गं?”

“अवो, काय डोकंबिकं फिरलं का काय तुमचं? उपास म्हंजे काही खायचं-प्यायचं न्हाई. पानी प्यून र्‍हायाचं दिवसभर. जावा, वैरणीला जावा.”

नेहमीच्या जागेवर वैरण बांधायचा कासरा दिसला नाही, तेव्हा यशवंत मधल्या खोलीत आला. धाकटा मुलगा जागा झाला होता, पण पालथा पडून तो तोंडासमोर मोबाइल धरून बघत होता. यशवंताला कासरा काही सापडेना, म्हणून तो तसाच सोप्यात आला. आता कुणाला विचारावं आणि कुणाशी बोलावं हे त्याला समजेना. तो अजून गेलाच नाही हे बघून कमल तरातरा सोप्यात आली आणि तिने नेहमीच्याच जागेवर असलेला कासरा आणि विळा त्याच्यासमोर फेकला. नुकतंच पाणी पाजवून आणलेल्या त्या विळ्याकडे बघून यशवंताला फार भीती वाटायला लागली. तो कासरा त्याला सापासारखा दिसायला लागला. असला साप हातात घेऊन आपण वैरण करायला कसे जाणार हे त्याला कळेना.

दुसर्‍या आठवड्यात यशवंताच्या थोरल्या सुनेचं डोहाळेजेवण होतं. कार्यक्रमात एकूण यशवंताचा नूर बघून बापूने दोन दिवस रजा वाढवली. कार्यक्रम झाला आणि दुसर्‍या दिवशी सकाळी मुलगा यशवंताला म्हणाला, “आज कामावर जाऊ नको, बाबा. आज दवाखान्यात जाऊ या तुला दाखवायला.”

यशवंत काही बोलायच्या आताच कमल तिच्या त्या उंच आवाजात म्हणाली. “कोंच्या दवाखान्यात?”

“आई, मी बघतो.” बापू म्हणाला. “बाबाची तब्येत नाही धड. तुम्ही एकाला चार जण घरात असून तुमच्या हातने त्याला डॉक्टरला दाखवायला झालं नाही. आता कोण डॉक्टर, कुठला डॉक्टर ते मी बघतो.”

“बया गं. न्हवं, बगंनास का म्हणं तूच. बापाची एवडी माया हाय तर नोकरी सोडून त्याच्या उसाभरीला र्‍हाईनास का म्हणं तू, खरं कुटं काय हे सांगून तरी जा की. आमी कोन बोलणार रं? एवडा सौंसार वडला मी, एकाला चार येळा भाकरी करून घातलो, शेनामुतानं भरल्याली कापड धुतलो ते सगळं नदीच्या पुरातनं गेलं काय रं?”

कमलच्या आवाजाने म्हातारी पलीकडच्या घरातनं बेताने यशवंताच्या दारात येऊन उभी राहिली. यशवंताचा धाकटा मुलगा मधल्या चौकटीत येऊन उभा राहिला होता. त्याची नजर हातातल्या मोबाइलवर होती.

“आई, तमाशा करू नको.” यशवंताचा थोरला मुलगा खालच्या आवाजात म्हणाला. “हे दुखणं सगळ्या घराण्याच्या रक्तात आहे. आज्जा पण त्याच्यातच गेला आणि थोरलं तात्याबी त्याच्यातच गेलं. त्यांना औषधपाणी काय झालं नाही, पण बाबाला डॉक्टरला दाखवणार आहे मी. तालुक्याला डोक्याचा डॉक्टर आहे. बाबाला तिकडं घेऊन जाणार आहे मी.”

म्हातारी जागेवरच खाली बसली आणि तिने डोळ्याला पदर लावला. कमलने तव्यावर टाकायला थापलेली भाकरी परत परातीतच टाकली आणि ती झटक्यासरशी उठली.

“हां, आता खुळ्याच्या दवाखान्यात न्ह्यून टाक बाबा बापाला. तिकडं झटकं द्यून मारून टाकूद्यात त्याला, माज्या कपाळावर कसलं का आसंना, पर कुक्कू हाय ते पुसून टाक, म्हणजे जिवाला थंडोसा व्हील तुझ्या.” ती किंचाळली.

“आई, आता गप बस, न्हाईतर अंगावर राकेल टाकून पेटवून घेतो बघ मी.” बापू म्हणाला. “आगं, किती अडाणीपणा करचील? दिवस उजाडायच्या आत वैरणीला रानात जाणारा बा आमचा, सुंद बडवल्यागत घरात बसायला लागला तरी तू आणि तुझा लाडका धाकटा लेक त्याच्याकडं लक्ष द्यायला तयार नाही. कुठं देवरुषाला दाखव आणि उपास करायला लाव असला अडाणीपणा करत बसलाय. त्याला औषध नाही की पाणी नाही. उद्या आज्जा आणि तात्यासारखा बा मरुन गेला तर केवढ्याला पडंल ते?”

यशवंताची सून कावर्‍याबावर्‍या चेहर्‍याने आत आली. कमलने भाकरीचं पीठ असलेली परात जाग्यावर आदळली आणि ती उठली.

“करा बाबा काय करायचं ते.” ती म्हणाली. “तू करणारा, तुजा बा करून घेणारा. मग मी कशाला मधे बोलू? काय करायचं ते करा.”

“आरं, काय झालं? मला काही झाल्यालं नाही, बापू,” यशवंत कसाबसा म्हणाला. “वैरणीला न्हवं काय? जातो की मी. जरा ऊन खाली हू दे, मग जातो.” त्याने जागेवर जरा हालचाल करण्याचा प्रयत्न केला.

बापूच्या डोळ्याला पाणी आलं.

दुसर्‍या दिवशी यशवंताला घेऊन बापू तालुक्याला गेला. डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या केल्या. “अल्झायमरची सुरुवात आहे.” ते म्हणाले. “हा नेहमीच आनुवंशिक असतो असं नाही, पण घरातले रक्ताचे दोन नातेवाईक त्याने गेले आहेत म्हटल्यावर तीच शक्यता जास्त आहे. फार काही करता येण्यासारखं नाही. दोन प्रकारच्या गोळ्या देतो, पण त्याने फारसा उपयोग होणार नाही. घरातलं वातावरण चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यांना जुन्या गोष्टी आठवतात का बघा. कोडी, खेळ यातलं काही जमतंय का बघा. त्यांचे कुणी मित्र असतील तर त्यांच्यात मन रमतंय का बघा..”

दोन दिवसांनी बापू आणि त्याची बायको निघून गेले. यशवंत आता बारा बारा वाजेपर्यंत दुकानात येत नव्हता. गिर्‍हाइकाने एखादं काम सांगितलं, तर ते त्याच्या पटकन लक्षात येत नव्हतं. एखादं काम केलं तर त्याची मजुरी किती सांगावी याचा त्याच्या मनात गोंधळ होत असे. चार वाजताच तो गबाळं आवरत असे आणि घराकडे यायला निघत असे. घरात आल्यावर पुढच्या खोलीतल्या बाजेवर तो एकटाच बसून राहत असे. कुणाशी बोलणं नाही की काही नाही. म्हातारी हळूहळू चालत त्याच्याजवळ येऊन बसे आणि मायेने त्याला विचारी, "एसवंता, जरा गुळाचा सांजा करून दिऊ? खातोस?”

यशवंत कधी उत्तर देई, कधी नाही. म्हातारी जरा वेळ इकडच्या-तिकडच्या गोष्टी करे. यशवंताचं एक नाही की दोन नाही हे बघून ती ‘पांडुरंगा’ म्हणत हळूच उठे. “दमला असचील बाबा, पड जरा येळ.” म्हणून कधी त्याच्या घरात, कधी शेजारच्या घरात जाई. भिंतीशेजारी आडवी होई.

रात्री यशवंताला अचानक जाग आली. हवेत जबरदस्त उष्मा होता. कसातरी तो उठून बसला. त्याला गरगरल्यासारखं होत होतं. किती वाजले आणि उजाडायला आणखी किती वेळ याचा त्याला काही मेळ लागेना. त्याला तहान लागली होती. तोंड, घसा कोरडा पडला होता. बाजेच्या खाली भरलेला तांब्या आहे का म्हणून त्याने खाली वाकून हात फिरवला, तर खाली काही नव्हतं. अंधुक उजेडात त्याने डोळे बारीक करून बघितलं. खाली वाकळेवर झोपलेल्या कमलने कूस बदलली. ती जागीच होती की काय कुणास ठाऊक. खाली वाकून त्याने अंदाजाने हात लांबवला. त्याच्या हाताला घामेजलेला, उष्ण, मऊ स्पर्श झाला.

“काय पायजे?” कमलचा झोपेतला पण तसाच कर्कश आवाज आला.

“मला, कमल...मला...” यशवंताच्या तोंडून शब्द फुटेना.

“आता काय खूळ लागलंय का काय वं तुमाला?” ती तिच्या तसल्या आवाजात म्हणाली. “का म्हातारपनी चळ लागला म्हनायचा?”

“कमल, अगं मला जरा पानी..” यशवंताची जीभ तोंडात चिकटून बसल्यासारखी झाली.

“आता कशाला आंगाला हात लावता माज्या?” कमल तिच्या तसल्या आवाजात म्हणाली. “सगळ्या जलमाचा उन्नाळा झाला माज्या. जवा मला पायजे हुतं तवा ढिल्लं पडला तुमी. दोन पोरांत जवानी सपली तुमची. उपाशी वनवाशी ठेवला मला तुमी. माझा बा मला म्हातार्‍याच्या पदरात टाकून गेला, मडं बशीवलं त्याचं. म्हातारा नवरा करून दिला मला. सगळी आग लागली माज्या जिवाला. माज्या पोटात सगळा वणवा, आनि आता म्हातारपणी तुमाला ह्ये सुचायलंय व्हय? मी म्हनून नांदलो, न्हाईतर दुसरी कोन आसती तर..”

उष्म्याने जिवाची तगमग तगमग होत होती. बाहेर रातकिडे किरकिरत होते. यशवंताच्या डोक्यात मधमाश्या गुंगावल्यासारखा आवाज येत होता. कमलचा बारीक किरकिटल्यासारखा आवाज येत होता. कमल बोलत होती आणि अंधारात कुठेतरी बघत यशवंत गप बसला होता. सुंद बडवल्यासारखा बसला होता

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

31 Oct 2024 - 12:33 pm | सौंदाळा

कथा आवडली.
पहिल्या दोन परीच्छेदातच सर्व चित्र डोळ्यासमोर उभे राहिले.

गडद रंगाच्या छटा दाखवणारी कथा. एखादी जखम काळानुसार भरत न जाता आणखीच चिघळत जावी तसे काहीसे फीलिंग. संजोपराव म्हणजे खणखणीत कथा असणारच हे समीकरण दरवर्षी दिसतं.

पाषाणभेद's picture

31 Oct 2024 - 2:04 pm | पाषाणभेद

वातावरण निर्मीती जबरदस्त असलेली कथा.

श्वेता२४'s picture

31 Oct 2024 - 2:46 pm | श्वेता२४

सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहीलं.

अमरेंद्र बाहुबली's picture

31 Oct 2024 - 4:02 pm | अमरेंद्र बाहुबली

छान कथा. डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं.

कंजूस's picture

31 Oct 2024 - 5:22 pm | कंजूस

परिस्थिती.