नेपाळ : एक जीवंत सांस्कृतिक संग्रहालय - भाग ५ (चांगु नारायण मंदिर)

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in भटकंती
30 Aug 2024 - 12:03 pm

आधीचे भाग:

"गेटवरून 'इंटरनॅशनल अरायव्हल' कडे जाणारी शटल बस पकडून आम्ही तिथे पोचलो आणि निर्धारित वेळेवर लँड झालेली आमची मंडळी बाहेर येण्याची वाट बघत थांबलो... "

भारतातून हवाईमार्गे नेपाळमध्ये प्रवेश करण्यासाठी (प्रौढ) भारतीय प्रवाशाकडे आयडेंटिटी प्रूफ म्हणून वैध 'पासपोर्ट' किंवा 'मतदार ओळखपत्र' ह्यापैकी काहीतरी एक असणे अनिवार्य आहे. विमानतळावर पासपोर्ट धारकांना इमिग्रेशनसाठी फारसा वेळ लागत नाही पण मतदार ओळखपत्र धारकांसाठी एक वेगळी रांग लागत असल्याने त्यात थोडाफार वेळ जातो.

आमची सर्व मंडळी पासपोर्ट धारक असल्याने कोणा एकासाठी थांबावे लागले नाही त्यामुळे इमिग्रेशनही पटकन झाले आणि आमच्याबरोबर त्यांचेही बरेचसे सामान वाहून आणण्याची हमाली आम्ही आधीच करून झालेली असल्याने त्यांच्याकडे कॅरी ऑन लगेज वगळता कुठलेही चेक्ड लगेज नसल्याने बॅगेज कलेक्शनमध्ये वेळ जाण्याचाही प्रश्न नव्हता त्यामुळे जेमतेम वीस-पंचवीस मिनिटांत सर्व सोपस्कार पार पडून पावणेतीनच्या सुमारास बाहेर पडलेल्या मंडळींना घेऊन आम्ही हॉटेलवर पोचलो.

रात्री थामेल येथे जाऊन 'चिल' मारण्याचा पोरांचा प्लॅन अंमलात आणायच्या आधी आज संध्याकाळी अप्रतिम लिच्छवी शिल्पकला, नेवारी काष्ठ शिल्पकला आणि धातूवरील सुंदर नक्षीकामासाठी प्रसिद्ध आणि पुरातत्वीय पुराव्यांनुसार 'नेपाळमधले सर्वात प्राचीन मंदिर' म्हणून मान्यता असलेले 'चांगु नारायण मंदिर' बघण्याचा आमचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. त्यासाठी हॉटेलच्या व्यवस्थापकाने काल त्याला सांगून ठेवल्याप्रमाणे एका इको व्हॅनवाल्याशी बोलणीही करून ठेवली होती, परंतु तिथून सुमारे पंधरा किमी अंतरावरच्या ह्या मंदिरात जाण्यासाठी नुकत्याच मुंबई ते काठमांडू प्रवास करून आलेल्या आमच्या बहिणाबाई आणि सौभाग्यवतींच्या उत्साहाच्या पातळी विषयी मात्र थोडा साशंक असल्याने मी ती बुक करून ठेवली नव्हती. जर त्या दोघी येणार असतील तर आम्ही सहाजण त्या व्हॅनने आणि जर त्या येणार नसतील तर आम्ही चौघेजण टॅक्सीने तिथे जाण्याचा पर्याय आमच्यासाठी उपलब्ध होता.

शटल बसने एअरपोर्टचे गेट गाठल्यावर तिथून हॉटेल पर्यंतच्या जेमतेम सव्वाशे-दीडशे मीटर्सच्या आमच्या पदयात्रेत थोड्याशा साशंकित मनाने ह्या मंदिर भेटीच्या संदर्भात त्यांना विचारलेल्या 'How's the Josh?' ह्या माझ्या फिल्मी प्रश्नाला त्याच भाषेत 'High Sir' असे माझी शंका फोल ठरवणारे उत्तर देत दोघींनीही तिथे येण्याची तयारी दर्शवली होती त्यामुळे नव्याने जॉईन झालेल्या मंडळींना फ्रेश होण्यासाठी थोडा वेळ हातात ठेऊन पावणेचार पर्यंत व्हॅनवाल्याला हॉटेलवर बोलावून घेण्याची सूचना व्यवस्थापकाला दिली. ठरल्या वेळेच्या पाच-दहा मिनिटे आधीच गाडी घेऊन तिथे पोचलेल्या ड्रायव्हरला अजिबात ताटकळत न ठेवता चांगु नारायण मंदिराच्या दिशेने आमचा प्रवास सुरु झाला आणि सकाळपासून आमच्या सोबतीला असलेला प्रॉमिस रात्री नऊ वाजता पुन्हा भेटण्याचे ठरवून त्याच्या घरी निघून गेला.

चांगु नारायण मंदिरात येण्यासाठी दोन रस्ते आहेत. काठमांडू शहराच्या मध्यवर्ती भागात आपले वास्तव्य असेल तर तिथून भक्तपूरमार्गे सुमारे वीस किमी अंतराचा एक रस्ता आहे आणि एअरपोर्टजवळच्या सिनामंगल भागात आपले वास्तव्य असेल तर वरती नकाशात दिलेल्या कागेश्वरी मनोहरा मार्गे साडे चौदा किमी अंतराचा दुसरा रस्ता आहे.

ह्या दोनपैकी पहिला शहरी आणि निमशहरी भागातून असल्याने रस्ता बऱ्यापैकी चांगला आहे आणि पार्किंगपासून गावातून थोडे अंतर चढणीच्या रस्त्याने चालत आणि थोड्या पायऱ्या चढल्यावर आपण पूर्व दिशेच्या दरवाजाकडून मंदिर संकुलात प्रवेश करतो. आणि दुसऱ्या रस्त्याने आल्यास गामढोका गावाजवळच्या पायऱ्या चढून आपण उत्तर दिशेच्या दरवाजाकडून मंदिर संकुलात प्रवेश करतो. ड्रायव्हरने आम्हाला दोन्ही पर्याय सांगितले होते, त्यातला दुसरा रस्ता थोडा खराब असला तरी निसर्गरम्य परिसरातून आणि मुख्य म्हणजे पायपीट करावी न लागता केवळ पायऱ्या चढून मंदिरात पोचता येत असल्याने हा जवळचा मार्ग आमच्यासाठी सोयीस्कर होता.

सिनामंगल पासून नऊ-दहा किमी अंतराचा प्रवास शहरी भागातील महामार्गावरून झाल्यावर पुढचा पाच-सहा किमी अंतराचा प्रवास ग्रामीण भागातल्या थोड्या कच्च्या थोड्या पक्क्या अशा चढणीच्या रस्त्यावरून चंपकारण्यातल्या सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेत पाऊण तासात आम्ही 'डोलागिरी' टेकडीवरील गामढोका नामक गावाजवळच्या मंदिरात जाण्यासाठी असलेल्या दगडी पायऱ्यांजवळ पोचलो.

काठमांडू खोऱ्याच्या चार टोकांना असलेली भगवान विष्णूची अनुक्रमे 'चांगु नारायण', 'इचंगू नारायण', 'विशंखु नारायण' आणि 'शेष नारायण' हि प्राचीन जागृत देवस्थाने एकत्रितपणे 'चार नारायण' नावाने सुप्रसिद्ध आहेत. आपल्याकडे ज्याप्रमाणे आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरची वारी करण्याची पूर्वापार परंपरा आहे त्याप्रमाणे नेपाळ आणि उत्तर भारतीय राज्यांमधल्या विष्णुभक्त / वैष्णवपंथी भाविकांमध्ये 'हरीबोधिनी एकादशी' (कार्तिकी एकादशी) च्या दिवशी ह्या चार विष्णूस्थानांची यात्रा करण्याची पूर्वापार परंपरा आहे.

.

भौगोलिकदृष्ट्या काठमांडू खोऱ्याच्या चार टोकांना असलेल्या ह्या चारही देवस्थानांना भेट देणे काही आम्हाला जमणार नव्हते. त्यामुळे ह्या 'चार' नारायणांपैकी 'भक्तपूर' ह्या नेपाळमधल्या सर्वात लहान जिल्ह्यातील 'डोलागिरी' नामक निसर्गरम्य टेकडीवरच्या 'चांगु नारायण मंदिर' ह्या युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून सूचिबद्ध केलेल्या काठमांडू खोऱ्यातील सात प्राचीन स्थळांपैकी एक असलेल्या प्राचीन मंदिराची आम्ही निवड केली होती.

नेपाळी नागरिकांसाठी निःशुल्क, परदेशी नागरिकांसाठी ३५०/- आणि आपल्यासाठी, म्हणजे सार्क देशांतील नागरिकांसाठी २५०/- नेपाळी रुपये प्रवेश शुल्क असलेली तिकिटे घेऊन आम्ही चांगु नारायण मंदिर संकुलात प्रवेशकर्ते झालो.

चांगु नारायण मंदिर (पश्चिमेकडील मुख्य प्रवेशद्वाराची बाजू) ▼

प्रत्येक प्राचीन मंदिराला कुठलातरी पौराणिक संदर्भ असतोच त्याला हे मंदिरही अपवाद नाही. एका आख्यायिकेनुसार चंगू नारायण मंदिराच्या निर्माणाची कहाणी काहीशी अशी...

कोणे एकेकाळी सुदर्शन नावाच्या एका ब्राह्मणाने आपली चांगली दुभती गाय एका गवळ्याला विकली होती. तो गवळी चांगला हिरवा चारा उपलब्ध असलेल्या चंपकारण्यातल्या ह्या टेकडीवर आपल्या गायींना चरायला सोडत असे. सुदर्शनच्या घरी भरपूर दूध देणारी त्याची गाय इतका चांगला चारा खायला घालूनही ह्या गवळ्याला मात्र अत्यल्प दूध देत असे. त्यामुळे निराश झालेल्या गवळ्याने एके दिवशी सुदर्शनाला बोलावून आपली समस्या त्याच्या कानावर घातल्यावर त्या दोघांनी ह्या प्रकाराचा छडा लावण्यासाठी चरायला सोडलेल्या गायींचा गुपचूप पाठलाग करायचे ठरवले आणि त्यातून एक विलक्षण गोष्ट त्यांच्या लक्षात आली.

सुदर्शनने गवळ्याला दिलेली गाय एका चंपक वृक्षाजवळ जाऊन थांबत असे आणि त्या वृक्षाच्या खोडातून एक लहान मुलासारखी काळी आकृती बाहेर येऊन त्या गायीचे दूध पित असे. सलग दोन-चार दिवस हा अनैसर्गिक प्रकार पाहिल्यावर ती आकृती मानवी नसून कोणा राक्षस पुत्राची असावी ह्याबद्दल त्यांची खात्री पटल्याने त्या दोघांनी त्या चंपक वृक्षावर कुऱ्हाडीचे घाव घालण्यास सुरुवात केल्यावर त्याच्या खोडातून रक्त वाहू लागले.

हि विचित्र घटना पाहून भयभीत झालेले ते दोघे मोठ्याने रडत झाल्या प्रकाराबद्दल क्षमा याचना करू लागल्यावर भगवान विष्णू त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यांचे सांत्वन करून त्यांना ह्या प्रकारामागची कहाणी सांगितली.

एका राक्षसाचा वध करण्यासाठी त्याचा पाठलाग करत असताना भगवान विष्णूंच्या हातून अनवधानाने सुदर्शनच्या वडिलांची हत्या झाली होते. आपल्या शिष्याची हत्या झाल्यामुळे क्रोधीत झालेल्या सुदर्शनच्या वडिलांच्या गुरूंनी विष्णूला शाप देऊन त्या चंपक वृक्षात बंदिस्त केले होते. त्यावर भगवान विष्णूंनी उ:शाप मागितल्यावर त्या गुरूंनी सुदर्शनच्या हातून त्या वृक्षावर कुऱ्हाडीचे घाव घातले गेल्यावर रक्तस्त्राव होऊन तुझी प्रतीकात्मक हत्या झाल्यावर तुला ह्या शापातून मुक्ती मिळेल असे सांगितले होते.

हि कहाणी ऐकल्यावर सुदर्शन आणि गवळ्याला दिलासा मिळाला आणि मोठ्या भक्तिभावाने दोघांनी त्या ठिकाणी भगवान विष्णूंचे एक लहानसे मंदिर बांधले. प्राचीन काळी ज्या टेकडीवर ते बांधले तिच्या डोलागिरी ह्या नावावरून 'डोलागिरी नारायण' आणि चंपक वृक्षांच्या अरण्यात असल्याने 'चंपक नारायण', 'चंगू नारायण' म्हणूनही ओळखले जाणारे हे मंदिर मध्ययुगापासून 'चांगु नारायण मंदिर' म्हणून प्रसिद्ध आहे.

असो... पौराणिक संदर्भामुळे नेपाळी हिंदूंसाठी धार्मिकदृष्ट्या महत्वाचे असलेले हे मंदिर नेपाळच्या लिखित इतिहासाची सुरुवातच ह्याठिकाणाहून झाल्याने नेपाळसाठी ऐतिहासिकदृष्ट्याही फार महत्वाचे आहे.

ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात आजच्या बिहारमधील पाटणा शहराजवळचे 'वैशाली' हे राजधानीचे शहर असलेल्या 'लिच्छवी' राजवंशाच्या वारसांनी ख्रिस्तपूर्व तिसऱ्या-चौथ्या शतकात नेपाळचे तत्कालीन राज्यकर्ते असलेल्या किराती राजांची लहान-मोठी राज्ये जिंकून तिथे लिच्छवी राजवट प्रस्थापित केली होती. त्यांच्या पुढच्या पिढ्यांमधले वंशज इ.स. ४५० ते ७५० अशी सुमारे तीनशे वर्षे (विस्तारित) काठमांडू खोऱ्याचे सत्ताधीश होते. नेपाळच्या इतिहासात 'लिच्छवी युग' म्हणून ओळखला जाणारा हा कालखंड तिथला सुवर्णकाळ मानला जातो.

आपल्या कारकिर्दीत काठमांडू खोऱ्याच्या पश्चिमेला गंडकी नदी, उत्तरेला हिमालय आणि पूर्वेला कोसी नदी पर्यंत राज्याचा विस्तार करणाऱ्या लिच्छवी राजवंशातल्या 'राजा मानदेव' ह्याने त्याच्या शासनकाळात नेपाळमध्ये एकूण १४ शिलालेख स्थापन केले होते त्यातला इ.स. ४६४ सालातला त्याच्या कारकिर्दीतला आणि नेपाळच्या इतिहासातला पहिला शिलालेख ह्या चांगु नारायण मंदिरात आहे.

इ.स. पूर्व काही शतके जुनी प्राचीन मंदिरे नेपाळमध्ये अस्तित्वात असण्याला तार्किक/वैचारिक मान्यता असली तरी ह्या प्राचीन शिलालेखरूपी पुरातत्वीय पुराव्याच्या आधारावर चांगु नारायण मंदिर हे नेपाळमधील शास्त्रीय मान्यताप्राप्त सर्वात प्राचीन मंदिर ठरले आहे. विक्रमी संवत ५२१ (इ.स. ४६४) साली राजा मानदेवाने मंदिरासमोर गरुड मूर्ती सोबत स्थापित केलेल्या ह्या शिलालेखातून राजा हरिदत्त वर्माने बांधलेल्या ह्या मंदिराविषयीची माहिती, तसेच राजा मानदेव ह्याच्या आधी शासक असलेले त्याचे वडील आणि आजोबांच्या नावांचे उल्लेख आणि त्याचे वडील धर्मदेव ह्यांचे निधन झाल्यावर लहान वयातच गादीवर बसवण्यात आलेल्या मानदेवाने त्याकाळी प्रचलित असलेली सतीची प्रथा मोडीत काढून आपली आई 'राज्यवती' हिला सती जाण्यापासून परावृत्त करून त्याला राज्यकारभारात मदत करण्यासाठी तीला प्रेरित केल्याची महत्वपूर्ण ऐतिहासिक माहिती मिळते.

शिलालेख आणि गरुड मूर्ती ▼

युनेस्कोने सूचिबद्ध केलेल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील क्षेत्रफळाच्या निकषावर सर्वात लहान असले तरी भगवान विष्णूला समर्पित असलेले हे पॅगोडा आणि नेवारी शैलीतील ताम्राच्छादित छताचे दुमजली मंदिर, त्याच्या चारही बाजूंना असलेले दरवाजे आणि त्यांच्या तोरणांवरचे सुंदर कोरीव/उठावदार नक्षीकाम, प्रत्येक दरवाजाच्या डाव्या-उजव्या बाजूस असलेलया द्वाररक्षक सिंह, शरभ, हत्ती आणि ग्रिफिन्सच्या जोड्यांची दगडी शिल्पे, पश्चिमेच्या स्वर्णसदृश्य चमकदार धातूच्छादित मुख्य दर्शनीभागावरील नक्षीकाम, घंटा, पहिल्या मजल्याच्या छताला आधार देणाऱ्या चोवीस आणि दुसऱ्या मजल्याला आधार देणाऱ्या सोळा अशा एकूण चाळीस तिरक्या खांबांच्या दर्शनीभागावर कोरलेली विष्णूच्या दशावतारांची आणि विविध शस्त्रधारी तांत्रिक देवी-देवतांची व मानवाकृतींची काष्ठशिल्पे अतिशय सुंदर आहेत.

धार्मिकदृष्ट्या सहिष्णू मानल्या जाणाऱ्या लिच्छवी राजवटीत हिंदू, बौद्ध आणि किराती धर्मीय प्रजा गुण्यागोविंदाने नांदत होती. स्वतः राजा मानदेव हा विष्णुभक्त असला तरी त्याच्या तीन पैकी एक-दोन राण्या आणि मुली शिवभक्त होत्या त्यामुळे ह्या मंदिर संकुलात मुख्य विष्णू मंदिराच्या बरोबरीनेच छिन्नमस्ता माता मंदिर, किलेश्वर महादेव मंदिर अशी दोन लहान मंदिरे आणि एक शंकराचे, एक कृष्णाचे, एक लक्ष्मी-नारायणाचे आणि एक गणपतीचे अशी चार छोटीशी देवळेही असल्याने एकूणच लिच्छवी राजवटीत आणि त्यापुढच्या काळातही शैव, वैष्णव व शाक्त पंथीयांमध्ये कुठल्याही प्रकारचे वैमनस्य नसल्याचे ठळकपणे जाणवते. ह्या छोट्या-मोठ्या मंदिर आणि देवळांच्या जोडीने परिसरात ठिकठिकाणी पाहायला मिळणारी पाचव्या ते बाराव्या शतकातली अनेक बास रिलिफ प्रकारची सुरेख शिल्पेही खूप छान आहेत.

मंदिर संकुलाची व्यवस्थित कल्पना येण्यासाठी जालावरून साभार घेतलेली एक ड्रोन इमेज देत आहे ▼

वरील फोटोत समोर मंदिराचे पश्चिमेकडील दर्शनासाठी खुले असणारे मुख्य प्रवेशद्वार, त्यापुढे असलेले शंख, चक्र, गदा स्तंभ, घंटा, पाठमोरी गरुड मूर्ती, द्वाररक्षक सिंहांची जोडी तर खालच्या बाजूला डावीकडे लक्ष्मी-नारायणाचे देऊळ तर उजवीकडे किलेश्वर महादेव मंदिर, मधल्या भागात डावीकडे कृष्णाचे देऊळ तर उजवीकडे छिन्नमस्ता माता मंदिर आणि वरच्या बाजूला डावीकडे शंकराचे देऊळ आणि ठिकठिकाणी विखुरलेली काही शिल्पे दिसत आहेत तर काही मंदिराच्या मागे लपली आहेत. आता ती शिल्पे जवळून पाहण्यासाठी मंदिराला दर्शनी भागाकडून एक प्रदक्षिणा घालुयात.

२०१५ साली नेपाळमध्ये झालेल्या प्रलयकारी भूकंपात सातशे त्रेपन्न प्राचीन मंदिरे आणि मठांची प्रचंड हानी झाली होती त्यापैकी दोनशे एक्केचाळीस मंदिरे आणि मठ काठमांडू खोऱ्यातले होते. त्या भूकंपात चांगु नारायण मंदिर आणि त्याच्या आवारातील अन्य लहान-मोठ्या मंदिरांचे आणि अन्य वास्तूंचेही नुकसान झाले होते. भूकंपात पडझड झालेली काही प्राचीन शिल्पे नव्याने विटांचे कोनाडे बांधून त्यात स्थापित केली आहेत. मंदिर परिसरातल्या लहान-मोठ्या सर्व दगडी शिल्पांची संख्या मोजली तर ती दीड-दोनशेच्या घरात भरण्याएवढी असली तरी त्यातली काही निवडक वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे तेवढी आपण पाहू.

मंदिराचे दर्शनद्वार ▼

१७०२ साली लागलेल्या भीषण आगीत मूळच्या प्राचीन मंदिराचे खूप नुकसान झाल्याने भक्तपूरचे तत्कालीन राजा असलेल्या 'भूपतींद्र मल्ल' ह्यांनी मंदिराचे पुनर्निर्माण केले होते. वरच्या फोटोत प्रवेशद्वारासमोर जो जाळीदार पिंजरा दिसतोय त्यात राजा भूपतींद्र मल्ल आणि त्यांच्या राणीचे भगवान विष्णूंची आराधना करतानाच्या पोझमधले पितळी पुतळे बसवले आहेत.

चक्र, गदा आणि शंख धारण केलेला 'गरुडारूढ विष्णू'. प्राचीन लिच्छवी शिल्पकलेचा अप्रतिम नमुना मानले जाणाऱ्या सातव्या शतकातल्या ह्या गरुडारूढ विष्णूच्या सुरेख शिल्पाचे चित्र नेपाळी चलनातील दहा रुपयांच्या नोटेवर छापले आहे. ▼

'श्रीधर विष्णू'. नवव्या शतकातील ह्या शिल्पात मध्यभागी उभ्या चतुर्भुज विष्णूने आपल्या उजव्या हातांत चक्र आणि कमळ आणि डाव्या हातांत गदा आणि शंख धारण केले आहे. विष्णूच्या डावीकडे गरुड आणि उजवीकडे लक्ष्मी दिसत आहे.

मंदिराचा उत्तरेकडील दरवाजा आणि द्वाररक्षक 'ग्रिफिन्स'ची जोडी. ▼

वरील फोटोत उजवीकडील ग्रिफिनच्या शेजरी दिसणाऱ्या लहानशा दगडी स्तंभावर विष्णू, दुर्गा आणि शिव प्रतिमा कोरलेल्या आहेत. अगदी लहान आकाराचे असूनही ह्या शिल्पातले बारकावे वाखाणण्यासारखे आहेत. चतुर्भुज विष्णूच्या हातांत चक्र आणि गदा आहे, अष्टभुजा दुर्गेच्या हातांत तलवार, डमरू, त्रिशूळ आणि चक्र आहे तर चतुर्भुज शिवाच्या हातांत डमरू, त्रिशूळ आणि कमंडलू आहे ▼

'वैकुंठ विष्णू'. सहा हात असलेल्या गरुडावर स्वार झालेल्या, दहा हात आणि चार पैकी एक वराह मस्तक असलेल्या वैकुंठ विष्णूच्या मांडीवर लक्ष्मी विराजमान झालेली आहे ▼

पारिजातकाच्या पारावर विष्णूच्या तीन मूर्ती बघायला मिळतात. त्यापैकी मधल्या गरुडावर बसलेल्या विष्णूच्या उंचावलेल्या दोन हातांत चक्र आणि एक लांब गदा आहे. डाव्या आणि उजव्या बाजूचे शंख, चक्र, गदाधारी विष्णू प्रत्येकी दोन लहान आकृत्यांच्या मध्ये उभे आहेत. ▼

'पद्मपाणी लोकेश्वर'. विष्णूच्या तीन मूर्तींच्या शेजारी आपल्या डाव्या हातात कमळाचे फूल धारण केलेल्या आणि उजव्या हाताने वरद मुद्रा दाखवणाऱ्या विष्णूचे शिल्प आहे ▼

पाराच्या एका बाजूला अष्टभुजा दुर्गेची प्रतिमा आहे. दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकातील ह्या शिल्पाची बरीच झीज झाली असल्याने दुर्गेने आपल्या हातात नक्की काय वस्तू धारण केलया आहेत हे लक्षात येत नाही. ▼

मंदिराची पूर्वेकडील बाजू ▼

मंदिराच्या पूर्वेकडून दक्षिणेकडे जाताना समोर दिसणारे सोनेरी छताचे छिन्नमस्ता माता मंदिर, त्याच्या डावीकडे असलेले छोटेसे गणपतीचे देऊळ आणि त्याशेजारचे एक अपूर्णावस्थेतले खूपच प्राचीन हत्तीचे शिल्प आणि उजवीकडे भूकंपात उध्वस्त झाल्याने नव्याने बांधण्यात येत असलेले शिव मंदिर ▼

गणपतीच्या देवळातले श्री गणेशाचे बास रिलीफ आणि छिन्नमस्ता माता मंदिरा बाहेरची देखणी घंटा ▼

छिन्नमस्ता माता मंदिराचे तीन दरवाजे, त्यावरची शिव, चामुंडा, भगवती आणि गणपतीच्या प्रतिमा असलेली तीन सुरेख तोरणे आणि मंदिरा शेजारचे अपूर्णावस्थेतले हत्तीचे प्राचीन शिल्प ▼

काळ्या पाषाणात कोरलेले दहा मस्तके आणि दहा हात असलेल्या उभ्या विष्णूचे सहाव्या शतकातील एक अप्रतिम शिल्प. स्वर्गलोक, पृथ्वीलोक आणि पाताळलोक दर्शवणाऱ्या ह्या शिल्पात उभ्या विष्णूच्या खाली शेष (अनंत) नागावर पहुडलेला दुसरा विष्णूही दर्शवला आहे ▼

लक्ष्मी-नारायण देवळाच्या पुढ्यात असलेले आठव्या शतकातले 'विष्णू विक्रांत' शिल्प. दोन पावलांत पृथ्वीलोक आणि स्वर्गलोक पादाक्रांत केल्यावर तिसरे पाऊल बळी राजाच्या डोक्यावर ठेऊन त्याला पाताळलोकाचा राजा बनवताना वामन अवतारातील विष्णूने धारण केलेले महाकाय रूप 'विष्णू विक्रांत' आणि 'त्रिविक्रम' म्हणूनही ओळखले जाते ▼

'नृसिंहावतार'. आपला प्रिय भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी नृसिंह अवतार धारण करून हिरण्यकश्यपूचा वध करणाऱ्या विष्णूचे शिल्प ▼

'वैकुंठ विष्णू' चे आणखीन एक शिल्प. ह्यात सहा हातांच्या गरुडावर विराजमान झालेल्या बारा हात असलेल्या विष्णूच्या तीन मुखांपैकी एक वराहाचे आणि एक सिंहाचे मुख असून त्याच्या मांडीवर लक्ष्मी बसली आहे ▼

'भैरव' (विष्णूचे रौद्र रूप) ▼

शंख, चक्र, गदा आणि कमळधारी गरुडावर उभ्या विष्णूचे एक आणि विष्णू आणि गरुडाचे दुसरे एक खडबडीत शिल्प ▼

मंदिराच्या दक्षिण द्वाराचे रक्षक हत्ती आणि समोर दिसणारे किलेश्वर महादेव मंदिर ▼

किलेश्वर महादेव मंदिराच्या दर्शनद्वारा समोरचे तीन छोटे नंदी. त्यातले दोन मला नंदी कमी पण ससे जास्ती वाटले ▼

उत्सवकाळात वापरात येणारा सुंदरसा लाकडी रथ ▼

मंदिर संकुलात अनेक प्राचीन वस्तूंचा संग्रह असलेले एक संग्रहालयही आहे पण ते चार वाजता बंद होत असल्याने पाहता नाही आले. डोलगिरी टेकडीवरून चहूबाजूचे दिसणारे देखावेही प्रेक्षणीय आहेत. गिर्यारोहणाची आवड असलेले अनेक स्थानिक लोक आणि विदेशी पर्यटक माउंट एव्हरेस्टचे दुरून दर्शन घेण्यासाठी नगरकोटचा ट्रेक करून झाल्यावर परतताना तेलकोट मार्गे सुमारे १० किमी अंतराचा ट्रेक करून चांगुनारायण मंदिराला भेट देतात.

ज्यावरून संपूर्ण काठमांडू खोरे आणि माउंट एव्हरेस्ट पाहायला मिळत असल्याने गिर्यारोहकांमध्ये लोकप्रिय असलेला 'नगरकोट' डोंगर आणि परिसर ▼

सहा वाजता मंदिर बंद होण्याच्या सुमारास आम्ही तेथून निघालो आणि आलो होतो त्याच मार्गाने परतीच्या प्रवासाला लागलो. सातच्या थोडे आधी हॉटेलजवळ पोचल्यावर नव्याने आलेल्या मंडळींच्या क्षुधाशांतीसाठी त्यांना आम्ही काल गेलेल्या पराठा एक्स्प्रेस मध्ये घेऊन गेलो. खरंतर त्यांना चांगु नारायण मंदिरातून निघतानाच भूक लागली होती पण मंदिराच्या पूर्व दरवाजातून भक्तपूर मार्गे मंदिरात येण्याच्या रस्त्यावर असलेल्या दोन-तीन उपहारगृहांच्या बाहेर लावलेल्या मेनू बोर्ड वर दोन-चार शाकाहारी पदार्थांच्या संगतीने बफ मोमो'ज, बफ थुक्पा, बफ चीली, बफ चाऊमीन, बफ फ्राईड राईस अशा पदार्थांच्या नावांची मांदियाळी वाचल्यावर त्यांची तिथे काही खाण्याची इच्छाच विरून गेली होती.

मला आणि भाच्याला विशेष भूक नव्हती पण थोड्या वेळाने रात्र रंगीत करण्यासाठी जायचे असल्याने कमी-अधिक प्रमाणात मद्यपान होणे अत्यंत स्वाभाविक होते. पौराणिक संदर्भ नसला तरी रिकाम्यापोटी मद्यपान करणे हे देखील ब्रम्हहत्येच्या तोडीचे महापातक असते अशी माझी अनुभवाअंती समजूत झालेली असल्याने त्याआधी पोटात काहीतरी असणे अत्यावश्यक होते म्हणून बाकीच्या चौघांनी मागवलेल्या पाच-सहा वेगवेगळ्या पराठ्यांचे दीड-दोन तुकडे खाऊन आम्हीही थोडीशी पोटपूजा करून घेतली.

थामेलहून परत यायला मध्यरात्रीचे/पहाटेचे किती वाजतील ह्याचा काही अंदाज नव्हता पण आज झोपेचा बोऱ्या वाजणार ह्याची खात्री मात्र होती. त्यामुळे उद्या सकाळी पशुपतीनाथ दर्शन आणि त्यानंतर भक्तपूर दरबार स्क्वेअर पाहण्याचा पूर्णदिवस चालणारा पूर्वनियोजित कार्यक्रम पार पाडण्यासाठी थोडातरी उत्साह शाबूत असावा म्हणून नऊ वाजता प्रॉमिस येईपर्यंत तासभर तरी झोप काढावी असा मनात आलेला विचार रूमवर पोचल्यावर तात्काळ अंमलात आणला.

नऊच्या ठरलेल्या वेळेपेक्षा प्रॉमिस थोडा उशिरा आल्याने पंधरावीस मिनिटे जास्त झोप मिळाल्याबद्दल त्याचे आभार मानून तयारीला लागलो आणि पावणे दहाच्या सुमारास रिंगरोडवरून टॅक्सी पकडून आम्ही 'थामेलच्या' दिशेने कूच केले....

क्रमशः

प्रतिक्रिया

कंजूस's picture

30 Aug 2024 - 1:02 pm | कंजूस

सचित्र छान वर्णन.

शिल्पे फारच आवडली.

श्वेता२४'s picture

30 Aug 2024 - 3:09 pm | श्वेता२४

मस्त लिहीले आहे. वाटेतील निसर्गचित्रे अप्रतिम. मंदिराचे फोटो व तेथील शिल्पकाम अप्रतीम आहे. शिवाय तुमचे डिटेल वर्णन..... दिल खूश हो गया....
येथे परकीय आक्रमणे झालेली दिसत नाहीत... सर्व शिल्पे अखंड आहेत. त्यामुळे त्याचे सौंदर्य ऊठून दिसते...

सुंदर शिल्पे आणि मंदिर,पॅगोडा‌ शैली मस्त रूजली आहे तिकडे, सुंदर मिलाफ!

किल्लेदार's picture

31 Aug 2024 - 10:34 pm | किल्लेदार

नवीन माहिती बरीच मिळाली पण हिमालयाचे दर्शन अजून झाले नाही :( !!!
2016 ला गेलो तेव्हा काठमांडू भूकंपातून सावरले नव्हते. टेकू लावून ठेवलेली मंदिरे आणि अजस्त्र तुळया अंगावर येत होत्या. पण या सगळ्याहून जास्त दुःख झाले ते तिथल्या कबुत्तरांची प्रजा बघितल्यावर. पुरातन वारसे घाण करण्याचे काम हे "Flying Pests" अविरत करीत असतात.

प्रचेतस's picture

2 Sep 2024 - 8:54 pm | प्रचेतस

मस्तच झालाय हा लेख.
नेपाळमध्ये इतके प्राचीन मंदिर असेल असे वाटलेच नव्हते. शिलालेख ब्राह्मी लिपीत आहे. भैरव हे विष्णूचे रूप नसून शिवाचे आहे. बाकी येथील मूर्ती देखण्या आहेत. मात्र ह्या समभंग मुद्रेत असल्याने त्या पाहताना डौल कमी वाटतो. वैकुंठ विष्णू, त्रिविक्रम आणि विदारण नृसिंहाच्या शिल्पातील बारकावे वाखाणण्याजोगे आहेत. काळ्या पाषाणात कोरलेले दहा मस्तके आणि दहा हात असलेल्या उभ्या विष्णूचे शिल्प बहुधा विष्णूचे विश्वरुप दर्शन घडवणारे असावे. वराह आणि सिंहाचे मुख असलेल्या विष्णूचे वराहवतार आणि नृसिंहावतार दाखवणारे शिल्प तर प्रथमच पाहिले.
आता थामेलच्या नाईटलाईफबद्द्ल वाचण्यास उत्सुक.

कर्नलतपस्वी's picture

3 Sep 2024 - 12:48 pm | कर्नलतपस्वी

हाही लेख आवडला.

बुद्धाच्या जन्मासंबंधी प्रसिद्ध असलेली गावे पाहायला कुणी जात नाही का?

लुंबिनी, कपिलवस्तू?

झकासराव's picture

4 Sep 2024 - 11:43 am | झकासराव

सचित्र उत्तम।लेख

अथांग आकाश's picture

6 Sep 2024 - 7:41 am | अथांग आकाश

मस्त लेख! शिल्पकला अप्रतीम आहे!!

गोरगावलेकर's picture

12 Sep 2024 - 1:53 pm | गोरगावलेकर

खूपच सुंदर

सौंदाळा's picture

13 Sep 2024 - 3:27 pm | सौंदाळा

पॅगोडा शैलीतले मंदीर आणि पौराणिक कोरीव मुर्ती हे एकाच मंदीरात! फोटो छानच आले आहेत.
थामेलची वाट बघत आहे.