#केरळाफूड
केरळ फुड सिरीज मध्ये आता पुढचा केरळी पदार्थ आहे गव्हाचा हलवा!
तसं पाहिलं त्याला गव्हाची आपण बर्फी सुद्धा म्हणू शकतो कारण की हे खाताना आपण वड्या पाडून खात असतो. तर पाहूया याची कृती आणि साहित्य.
अगदी कमीत कमी साहित्यात आपण तयार करणार आहोत. ते म्हणजे आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ, एक वाटी गुळ, इलायची सुंठ पावडर, ड्रायफूट पावडर.
पहिल्यांदा मी इथे जरा जाडसर गव्हाचे पीठ घेतले. जे मी दाळ बट्टी साठी केल होत, तुम्ही नेहमीचेच बारीक गव्हाचे पीठ वापरू शकता.हे दोन वाट्या जे जाडसर पीठ ते कणिका सारख भिजवून घ्यायचा आहे. कणिकाचा उंडा आहे तो पूर्णपणे पाण्यामध्ये बुडेल अशाप्रकारे एका भांड्यामध्ये अर्धा तास ठेवायचा आहे. अर्ध्या तास ठेवल्यानंतर त्या कणिकाचे तंतू बाहेर पडतात. मग ते आपण अजून थोडे हाताने त्याला स्मूदन करायचं त्याला मोकळं करायचं.पाण्यातले हे जे गव्हातले तंतू आहेत त्यामध्ये ते विरघळतात किंवा त्यामध्ये तरंगतात.मग काय वेळाने ते पूर्ण सेटल झाल्यानंतर हे जे आहे त्यातलं वरवरचं पाणी दुसऱ्या भांड्यामध्ये काढायचा आहे.
तोपर्यंत एका कढईमध्ये थोडंसं तूप टाकून किसलेला बारीक गूळ त्या पॅनमध्ये टाकायचा. त्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. हा जो पाक तयार झालाय त्याच्यामध्ये थोडी सुंठ आणि इलायची पावडरची तयार केली आहे ती टाकायची आहे. या पाकामध्ये हे गव्हाच्या पिठाचे मिश्रण(पाणी) जे आपण पाणी तयार केलेले आहे. त्यामध्ये हळूहळू ओतत जायचं आहे आणि ते सतत हलवत राहायचं आहे ढवळत राहायचं आहे त्यानंतर ते पूर्णपणे ढवळत राहिल्यानंतर हळूहळू दहा मिनिटानंतर त्याच्यामध्ये आपण ज्या प्रकारे गव्हाचा चिक आपल्याला दिसतो तशा प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये चिकटपणा दिसतो.असा हा एक गोड प्रकारचा चिकच तयार होतो. यात आता तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स टाकू शकता. एक पंधरा मिनिटानंतर हा चिक पूर्णतः सेट होण्यासाठी तयार होतो .
आता एका चौकोनी किंवा गोल उभट भांड्यात आहे आधी तूप लावून त्यात हा गव्हाचा हलवा ट्रान्सफर करायचा आहे. भांड्यात आधी ड्रायफ्रूट्स टाकू शकता. त्यानंतर हलवा सेट करण्यासाठी ओतल्यानंतर वरतून सुद्धा ड्रायफ्रूट टाकायचे आहेत.हा हलवा सेट व्हायला जवळपास पाच ते सहा तास लागू शकतात. तुमचं ज्या प्रकारे गुळाचा पाक जास्त तयार झालेला आहे त्यावरती किंवा तुम्ही ज्या प्रमाणात गव्हाच्या पिठाच पाणी वापरलं त्या प्रमाणात त्याला सेट व्हायला वेळ लागतो. त्यामुळे जास्त घाई न करता एक सहा तास तरी मिनिमम ठेवा.
जर गव्हाचं पाणी जर जास्त घट्ट असेल तर तो लवकर हलवा सेट होऊ शकतो. यामध्ये अजून तो लालसर हलवा दिसावा म्हणून लाल फूड रंग सुद्धा वापरतात.
अशा प्रकारे एक छान पैकी अशी एक मऊसर स्पंजी चिकट (भोपळ्याचा मिठाई सारखी)आणि छान मुलायमदार अशी ही बर्फी तयार होते.
कृतीसाठी युट्यूब लिंक
https://youtu.be/E8xw0iG-fwA?si=xMZzO_4M26jxaUeD
असा हा एक वेगळा पदार्थ करायला काहीच हरकत नाही. सदा गोडधोड खाऊ या गोडगोडच बोलूया
-भक्ती
प्रतिक्रिया
28 Jul 2024 - 10:39 am | श्वेता२४
फोटो एकदम कातिल आहेत!! परफेक्ट पाककृती जमली आहे. करायला थोडी किचकट वाटते पण कधीतरी नक्की करेन.
28 Jul 2024 - 10:56 am | Bhakti
नाही,खुप सोप्पी आहे.
28 Jul 2024 - 11:36 am | कर्नलतपस्वी
आमची आई कणीक,गव्हाचा आटा डालडा तुपात लालसर भाजून घ्यायची नंतर गुळ किसून वर टाकायची. उष्णते मुळे गुळ पाघळायचा व त्यालाच कणीक चिकटायची. उरलेले काम आम्हीं मुले करायचो.
पाकृ आवडली.
मला वाटते मिपावर पद्म पुरस्कार देण्यात आले तर तुम्हांला पाकपद्म या पुरस्कारासाठी मी अनुमोदन देईन.
28 Jul 2024 - 1:21 pm | प्रचेतस
व्वा....!
हलव्याच्या वड्या एकदम भारी झाल्यात. मस्त पाकृ.
हे दोन वाट्या जे जाडसर पीठ ते कणिका सारख भिजवून घ्यायचा आहे. कणिकाचा उंडा आहे तो पूर्णपणे पाण्यामध्ये बुडेल अशाप्रकारे एका भांड्यामध्ये अर्धा तास ठेवायचा आहे. अर्ध्या तास ठेवल्यानंतर त्या कणिकाचे तंतू बाहेर पडतात. मग ते आपण अजून थोडे हाताने त्याला स्मूदन करायचं त्याला मोकळं करायचं.पाण्यातले हे जे गव्हातले तंतू आहेत त्यामध्ये ते विरघळतात किंवा त्यामध्ये तरंगतात.मग काय वेळाने ते पूर्ण सेटल झाल्यानंतर हे जे आहे त्यातलं वरवरचं पाणी दुसऱ्या भांड्यामध्ये काढायचा आहे.
बाकी ही वाक्यरचना एकदम कहर झालीय.
28 Jul 2024 - 1:25 pm | गवि
अगदी अगदी..
आणखी एक स्पर्धक आहे कहर पुरस्काराचा..
एकदा तरी पूर्व परीक्षण बटण इज मस्ट
28 Jul 2024 - 2:40 pm | Bhakti
बरं मास्तरजी!
व्हाईस टायपिंग वापरणं आता बंद करावं वाटेल तर 😏
28 Jul 2024 - 3:53 pm | कंजूस
छान जमला आहे.
झटपट पाककला करून लेखही आला!!
....................
हा गव्हाचा हलवा आणि केळ्याचा हलवा दोन्ही पदार्थ कर्नाटकातील उडुपी, मंगळुरू आणि केरळातील उत्तरेचे जिल्हे कासारगोड, कन्नूर, कोळ्हीकोड, मल्लापूरम ते त्रिशुरपर्यंत फार विकले जातात. खाडी देशांतून आलेल्या लोकांनी हे इकडे प्रचलित केले वाटतं. दोन्ही चांगले लागतात. पण केरळकडचे हलवे खोबऱ्याच्या(नारळाच्या) तेलातील असू शकतात आणि खमंग लागतात. तरीही चवीची सवय करावी लागते.
ज्याला बदामी हलवा म्हणतात तो पंजाबकडून आला. गहू तीन दिवस भिजवून वाटून त्याचा चीक ( एक प्रकारे आंबलेला मैदाच) काढून तुपात आटवून त्यात करतात. बदामाचे काप बरेच घालून नाव सार्थ करतात. मुंबईत चंदू हलवाई दुकानांचा खास पदार्थ. याला एक शॉर्टकट म्हणजे ॲरोरूट किंवा मक्याच्या पिठाचा करतात. तुर्कस्तान तुर्की पदार्थ. अर्थातच चिकापेक्षा स्वस्त असतो.
कणीक तुपात भाजून गूळ घालून करतात त्यास सोळा सोमवारचे चुरमा लाडू म्हणतात. गुजरातमध्ये यातील एक साधा प्रकार 'सुकडी'. तर अधिक तूप आणि सुका मेवा ( खारीक) घालून केल्यावर ठाकुरजीच्या( डाकोर, नाथद्वारा, द्वारका) छप्पन भोगातील एक स्वादिष्ट भोग. आम्ही गोवर्धन उचलत नसलो तरी या भोगाचा यथेच्छ समाचार घेतो.
28 Jul 2024 - 8:33 pm | Bhakti
अगदी माहितीपूर्ण,असा हा अप्रतिम प्रतिसाद! खुप खुप धन्यवाद कंकाका!
28 Jul 2024 - 10:36 pm | टर्मीनेटर
पर्शिअन लोकांनी केरळात आणलेला हा पदार्थ कोझिकोड (कालिकत) मधुन उर्वरित केरळात पसरला. मुळात गव्हाचा आणि केरळचा पूर्वापार काहीही संबंध नाही आणि तुपाचाही वापर एक पायसम सोडले तर तिथल्या अन्य कुठल्याही पारंपरिक पदार्थात होत नाही. युट्युबर्स आणि जालीय शेफ्स काय वाट्टेल त्या थापा मारत असले तरी तिथे व्यावसयीक (आणि बहुतांशी घरगुती) स्तरावर बनवला जाणारा हलवा हा मैद्यापासून आणि खोबरेल तेलात* बनवतात (*त्यामुळे अर्थातच मला आवडत नाही 😀).
आजघडीला केरळमध्ये जवळपास १५० प्रकारचे वेगवेगळे हलवे मिळतात. तिथे 'कांदारी (कांधारी)' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंचभरापेक्षा कमी लांबीच्या जबरदस्त तिखट मिर्चीचा वापर करून बनवलेला तिखट हलवाही मिळतो. गंमत म्हणजे आता केरळचे हे हलवे आखाती देशांत इतके प्रसिद्ध झाले आहेत कि अन्य देशांतील सहकाऱ्यांच्या इच्छापूर्तीसाठी सुट्टी संपवून परत आखातात जाणाऱ्या सर्व मल्याळी लोकांच्या बॅग्स चेक केल्या तर त्यांच्या सामानाच्या एकूण वजनापैकी २० ते ३० टक्के वजन ह्या हलव्यांचे भरेल 😀
बाकी हेल्थ कॉन्शस भक्तींनी गव्हाचा आणि तुपाचा वापर करून बनवलेला हा हलवा खाऊन बघायला नक्कीच आवडेल. आणि वाक्यरचना वगैरे बद्दलच्या प्रतिसादांशी संपूर्ण सहमती असली तरी 'भक्तिघाई' ह्या त्यांनीच प्रचलित केलेल्या शब्दाखातर तो प्रकार कितीही खटकत असला तरी त्याविषयी आता मौन पाळायचे ठरवले आहे 😂
29 Jul 2024 - 6:05 am | कंजूस
सहमत.
>>मुळात गव्हाचा आणि केरळचा पूर्वापार काहीही संबंध नाही>>
किनारपट्टीला गहू पिकतच नाही. तांदुळ पिकतो , खाल्ला जातो. पदार्थही त्याचेच. गव्हाचे त्यांना कौतुक. उडुपी, मंगळुरू येथे मिळणारे मंगलोरी बन्स(/बनाना बन्स) किंवा गोली बजे (गोल भजी) हे मैद्याचे पदार्थ तिकडे आवडीने खाल्ले जातात. ( परंतू थोडक्यात मैद्याची गोड आणि तिखट भजीच.)
29 Jul 2024 - 11:45 am | Bhakti
अच्छा या भौगोलिक परिस्थितीचा विचारच केला नव्हता.हो म्हणून तिथे मैदा आणि आपल्याकडे अशा पद्धतीची बर्फी कोर्नफ्लोरने बनवली जाते.अरे वाह! म्हणजे गव्हाची अशी बनवलेली ही माझी पाककृती अद्भुतच मानावी लागेल(शाब्बास भक्ती 😃)
29 Jul 2024 - 11:40 am | Bhakti
29 Jul 2024 - 11:40 am | Bhakti
म्हणजे केरळी हलवा अभ्यासाचा विषय आहे तर!
कांदारी मिरची चाखली नाही.पण दह्यातल्या वाळवलेल्या मोरमिलगाई ह्या मिरच्या आणल्यात.कशा संपवाव्या हे समजत नाहीये.नुसत्या खाणं शक्यच नाही कारण प्रचंड तिखट आहेत.
हम्म व्हिडिओ पहा,अर्धा चमचाच तूप वापरले आहे.बाकी हेल्थच म्हणाल तर 'तो' माझ्या आयुष्यात परत आलाय,तरी बरं सकाळीच भेटतो 😂 तो-चहा
29 Jul 2024 - 11:46 am | प्रचेतस
ह्या मिरच्या तळून दहिभातात टाकाव्यात, छान चव येते.
29 Jul 2024 - 12:19 pm | Bhakti
वाह! करतेच!
30 Jul 2024 - 7:45 pm | Bhakti
या मिरच्या तळून नारळाच्या चटणीला फोडणी दिली,चवीला मस्तच लागतात.
https://www.misalpav.com/node/52379
29 Jul 2024 - 1:44 pm | टर्मीनेटर
''कांदारी / कांधारी = कंदहारी'' मिरची पण केरळात अफगाणिस्तानातून आली असावी असा तिच्या नावावरून मी बांधलेला एक अंदाज! तिच्यातल्या औषधी गुणधर्मांमुळे केरळी लोक हाय ब्लडप्रेशर वरचे औषध म्हणून कच्च्या स्वरूपात तिचे चावून सेवन करतात. फारतर पाऊण इंच लांबीची हि जबरा तिखट चवीची मिरची कच्ची चावून खाल्यावर कायकीणी गोपाळरावांच्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याला "हाय म्हणून नाही, लो म्हणून नाही, प्रेशर नाही, ब्लड नाही, काही राहाणार नाही..." असेच वाटते 😂
दरवर्षीप्रमाणे शारजाहुन सुट्टीवर येणारा एक खासमखास केरळी मित्र परतीच्या प्रवासासाठी कोचीनपेक्षा मुंबईहून फ्लाईट बऱ्यापैकी स्वस्त पडत असल्याने गावाहून परस्पर तिथे परत न जाता पुन्हा चार दिवसांसाठी नुकताच मुंबईला येऊन गेला. त्याला हाय ब्लडप्रेशरचा त्रास असंल्याने दरवर्षी तो जाताना आपल्याबरोबर किलोभर नेत असलेल्या ह्या मिरच्यांपैकी मूठभर मिरच्या माझ्याकडे ठेऊन गेला. त्यातल्या सात-आठ मिरच्या मी वाळवायला ठेवल्यात, आता त्यांच्या बिया पेरून त्या अंकुरीत होतात का ते बघायचे आहे. त्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्राच्या हवामानात त्यांची रोपे उगवणे बहुतेक तरी शक्य नाही, पण तरी हा प्रयोग करून बघणार आहे! बीजांकुरण होउन रोपे उगवली आणि त्यांना पुढे मिरच्याही लागल्या तर तुम्हाला त्या चाखण्यासाठी कुरियर करतो 😀
29 Jul 2024 - 1:50 pm | गवि
म्हणजे ही मिरची आणली की आपल्याला ऑफिस ऑफ द डॉक्टर किंवा फॅमिली ऑफ माय डॉक्टर यापैकी कोणाकडेच जायची गरज नाही. फक्त मिरची खायची, व्हाईट्ट कपडे घालून मोस्ट रेव्हरंड गुरुदेवांकडे जायचे आणि युनिव्हर्सल केऑस सोडून कॉसमॉसशी ट्यून व्हायचे.. असेच ना?
29 Jul 2024 - 2:11 pm | टर्मीनेटर
येस्स... प्रोफेसर कुंभकोणमने सायलेंस असे दरडावुन मोस्ट रेव्हरंड गुरुदेवांच्या ऑर्डरवरुन 'प्रेय्यर'ला सुरुवात करायच्या आधीच सुप्राकॉन्शसच्या पातळीवरुन आपल्याला ऑकल्ट एक्स्पीरीयंसेस मिळायला सुरुवात होते 😂
31 Jul 2024 - 7:48 pm | मुक्त विहारि
होतील..
महाराष्ट्रात, मिरच्या आणि हळद, कुठेही होउ शकते...
26 Aug 2024 - 5:16 pm | टर्मीनेटर
हो, मलाही तसेच वाटत आहे! सेफर साइड म्हणुन परवा येताना तिथल्या नर्सरीतुन तिच्या बियांची दोन पाकिटेही आणली आहेत...
आणि एक... त्या नर्सरीवाल्याने मिरीच्या वेलाची कुंडीत लावण्यासारखी कलमी रोपेही तयार केली आहेत.
भरपुर मिरी लागलेले हे रोपटे मला खुप आवडले पण आकाराने तसे मोठे असल्याने बरोबर घेउन नाही येता आले. आता ते आणण्यासाठी काहीतरी जुगाड करावा लगेल!
26 Aug 2024 - 5:20 pm | कंजूस
बुश पेप्पर
यातली लहान रोपे पाठारे नर्सरी कल्याण यांचेकडे येत असतात.
26 Aug 2024 - 5:24 pm | टर्मीनेटर
अरे वाह! बघायला पाहिजे त्यांच्याकडे मिळाली तर...
26 Aug 2024 - 5:07 pm | टर्मीनेटर
'कांदारी / कांधारी' मिरची. ही हिरव्या रंगाची असते...
'पाल कांदारी / कांधारी' (मिल्की कांदारी) मिरची. ही आकाराने किंचीत मोठी आणि पांढरट हिरव्या रंगाची असते...
29 Jul 2024 - 12:16 pm | चौकस२१२
तुर्कस्तान तुर्की पदार्थ. अर्थातच चिकापेक्षा स्वस्त असतो.
तो कोणता ?
ओमान मध्ये पण असा मैदा आणि साखर पिस्ते केशर घालून मिळतो
हे जे वर्णन आहे ते गव्हातील ग्लुटेन चे आहे का ?
29 Jul 2024 - 5:36 pm | कंजूस
हलवण्याचा बेस .. .. गव्हाचा चीक.. .मैदा...गव्हाचे पीठ ...कॉन फ्लोर.. रताळ्याचे पीठ यातून होऊ शकतो.
https://youtube.com/shorts/0PVRyyAlTuk?si=TtMNnGrqqDz3iJIJ
हे कॉन फ्लोरचं.
29 Jul 2024 - 5:37 pm | कंजूस
दुरुस्ती - हलव्याचा बेस
7 Sep 2024 - 6:53 pm | जुइ
बाकी कृती वाचून अवघड वाटत आहे.