काळ्या डोक्याची शराटी
वडोदरा,पावगढ आणी चंपानेर--१ https://www.misalpav.com/node/52359
झोपेचं खोबरे होणे हा वाक्प्रचार लहानपणा पासून ऐकतोय पण ते होते कसे हे काहीअजून समजले नाही. जर समजा खोबरे झालेच तर ते चटणी,मोदक इत्यादी पदार्थात वापरता येते का? ...वाचकांना हा एक फालतु जोक वाटेल, मलाही तसेच वाटते. मागे मराठी म्हणी आणी वाक्प्रचार विषयावर लिहीताना असे आढळून आले की यांच्या मागे काहीतरी तर्क,इतीहास, कार्यकारणभाव,असतो.तसाच या वाक्प्रचारा मागे आहे का? कुणाला माहीत असल्यास प्रतिसादणे.
विषय असा आहे की कालचा दिवस प्रवासात एकदम गडबडीत गेल्यामुळे रात्री मस्त झोप लागली.तसेही निद्रादेवी माझ्यावर नेहमी प्रसन्न असते.नेहमीप्रमाणेच पहाटे पाच वाजता जाग आली. सहप्रवासी गाढ साखरझोपेत होते. सकाळी सकाळी उठल्यानंतर एक लिटर पाणी व कडक चहा लागतो.रात्री झोपण्या आगोदर याची तरतूद आहे याची खात्री करून मगच झोपलो होतो.पुडीतला ताजमहाल चहा, पुडीतली साखर,इलेक्ट्रिक किटली बघून जग किती आत्मनिर्भर झालायं व सत्तर वर्षात देशाची किती प्रगती झाली याची साधारण कल्पना आली.माझ्या लहानपणी आई सर्वात आगोदर उठायची, चुल पेटवायची,चहाचे आधण ठेवून मुलांना आवाज द्यायची. असो, चहा बनवून घेतला,नित्यक्रम उरकून ताजा तावाना होऊन बाहेर आलो.(Please don't read between the lines).
बाहेर व्हरांड्यात निरव शांतता होती. हाॅटेलची संरचना गोलाकार होती एक चक्कर मारून जिन्याने खाली फिरायला जावे असा विचार केला.सर्व खोल्या बंद होत्या.कडी कुलूपाविना असलेल्या एका दरवाज्यावर लाल रंगात "फायर एक्झिट" असे लिहीले होते व निळ्या रंगात पळणार्या माणसाचे चित्र चिटकवले होते. कुतूहलापोटी दरवाजा उघडून बघीतला.सहा बाय सहा फुट बाल्कनीवजा लोखंडी छज्जा होता.त्यालाच जोडून खालीवर,जाण्या येण्या साठी मजबूत लोखंडी प्रशस्त जिना होता.छज्जा भरपुर मोठा,पाचव्या मजल्यावर असल्याने सीमेवरील ऑब्झरवेशन पोस्ट मधे बसल्या सारखे वाटत होते.हाच मार्ग छोटे मोठे सामान ने आण करण्या साठी वापरात होता. प्रशस्त छज्जा मधे दोन आराम खुर्च्या,बाजुला काही ग्लास,खाली बाटल्यां कुणीतरी रात्री जगराता केल्याची ग्वाही देत होत्या.
आता पौफटणे,झुंजूमुंजू या शब्दांची अनुभूती येत होती.रजनी आणी उषाताई यांचे हॅण्डिंग टेकिंग ओव्हर चालू होते. हाॅटेल नदीकाठावर असल्याने मस्त थंडगार वारे,उगवत्या सूर्याची कोवळी किरणे तन मन सुखावत होती.शहरात दिवे मंद,विझत चालले होते आणी पक्षांचा किलबिलाट कानी येत होता.अशा वेळेस छोटा गंधर्व, प्रभाकर कारेकर यांचे ते सुंदर,प्रसिद्ध नाट्यगीत न आठवले तर नवलच म्हणावे लागेल.
प्रिये पहा रात्रीचा समय सरूनि येत उषःकाल हा ॥धृ०॥
थंडगार वारा सुटत । दीपतेज मंद होत ।
द्विग्वदने स्वच्छ करित । अरुण पसरि निज महा ॥प्रिये०॥१॥
पक्षि मधुर शब्द करित । गुंजारव मधुप वरिति ।
विरलपर्ण शाखि होति । विकसन ये जलरुहा ॥प्रिये०॥२॥
अगदी असेच वातावरण होते. खाली वाकून पाहिले असता डोळे फिरत होते.विश्वामित्री नदी नागमोडी वळणे घेत दुरवर जाताना दिसत होती.बऱ्यापैकी पाणी होते. तिच्या दोन्ही काठावर घनदाट मोठमोठे वृक्ष,काळ्या दगडी कातळाच्या नैसर्गिक भिंती, पुर्वेकडे नदीच्या दोन्ही काठांना आणी पर्यायाने शहराच्या दोन भागानां जोडणारा पुल,जोडून काळा घोडा चौक आणी लागून सायाजी उद्यानाचा मुख्य दरवाजा.घनदाट वृक्षराजी मुळे जंगल असल्या सारखे वाटत होते तर दुरवर बहुमंजीला इमारती दिसत होत्या.तरी पुण्या मुंबई पेक्षा कमीच. पूर्वेकडील अशाच एका इमारतीच्या मागून रश्मीरथ वर येत होता. सूर्योदयाचा तो नजारा एकदम मस्त होता. सभोवारचा निसर्ग बघून, पाचव्या मजल्यावर खोली घेतल्याचे पुर्ण समाधान झाले. पुढचे पाच दिवस तरी सकाळ इथेच घालवायची असे मनोमन ठरवले.
इकडे तिकडे बघत असताना,काळ्या मानेची शराटी (Black Headed Ibis) या पक्षांचा एक थवा हल्के हल्के उडत पुर्वेकडून पश्चिमेस चालला होता.इतके विहंगम दृश्य होते.पटकन रूम कडे पळालो.हळूच दार उघडून कॅमेरा, स्पेअर बॅटरी व बायन्याक्युलर उचलला.परत आलो तर पक्षांचा थवा दुर उडून गेला होता. निराशेने मन झाकोळत असतानाच पहिल्या ग्रुप पेक्षा आणखीन मोठा ग्रुप समोर उडताना दिसला आणी मग एका मागोमाग एक असे बरेच समुह एका विशिष्ट झाडाच्या दिशेने जाताना दिसले जिकडे दुर एका झाडावर काही काळ्या मानेचे शराटी दाटीवाटीने बसले होते.अगदी शाळा किवां सभा भरवल्यासारखे. हिरव्यागार जंगलात त्या झाडाचा शेंडा शुभ्र पाढंरा दिसत होता. पुलाखाली एक छोटेसेच पण नजरेत भरणारे देऊळ होते. पुढे मोठा चबुतरा आणी जुने वडाचे झाड.झाडावर कावळे,मैना,कबुतरे बसलेली होती.तीथे बहुदा अंतीम संस्कार होत असावेत.
https://i.imgur.com/qIF3iMb.mp4
चलचित्र फीत बघण्यासाठी लिन्क्वर टिचकी मारा
आता हाॅटेल व आसपासच्या भागाला जाग आली होती.वेटर्स खालीवर करत होते. कॅमेरा, दुर्बीण बघून प्रत्येकजण थांबून पुढे जात होता. चहा घेऊन चाललेल्या एका धिट्ट वेटरने विचारले, "साब,चाय?",बरोबरच साब, थोडा दुर्बीणसे देखूं क्या?" मी हसून मान डोलावली. सकाळच्या डिप डिप वाल्या चहापेक्षा हा उजवा होता.तरतरी आली.पुढे त्याच वेटरने नदीचे नाव व इतर स्थानिक माहीती पुरवली.
नदीच्या पात्रात/पात्रावर घारी,बगळे, कावळे, शराटी,पाणकावळे,खंड्या सारखे पक्षी आपले भक्ष शोधण्यात मग्न होते. हाॅटेलच्या आवारात पिंपळ,आकाश शेवगा व उंबर तीन मोठी झाडे होती. त्याच्यावर तांबट,सुर्यपक्षी,कोकीळ, गुलाबी मैना,साधी मैना,दयाळ, चष्मेवाला आणी हळद्या एव्हढे पक्षी एकाच वेळी बागडत होते. तांबट दांपत्ये व त्यांची नवजात पिल्ले एकाच ठीकाणी जणू तांबट आळीच.....
=
= गुलाबी मैना
=
=सुभग
=
=ताम्बट दाम्पत्य
=
=कोतवाल
रहदारी सुरू झाली होती. ध्यानी मनी नसताना अनपेक्षितपणे निसर्गाचे एव्हढे सुंदर रूप बघून मन सौमित्र ची एक मला आवडणारी रचना गाऊ लागले. अर्थात याचा संदर्भ फक्त मन मुदित होण्यापुरतीच.
दिस चार झाले मन हो पाखरू होऊन
दिस चार झाले मन हो पाखरू होऊन
पानपान आर्त आणि
पानपान आर्त आणि झाडं बावरून
दिस चार झाले मन हो पाखरू होऊन
दिस चार झाले मन हो पाखरू होऊन
हे सर्व बघता बघता दोन तास वेळ कसा गेला कळालेच नाही. आठ वाजले होते,मोबाईलची घंटी वाजली, चलो बुलावा आया है....
बाकी सहप्रवासी तयार झाले होते. तुम्हीं पुढे व्हा मी कपडे बदलून आलोच म्हणून त्यांना नाष्ट्यासाठी पाठवले.खटाखट आवरले, टकाटक तयार झालो व नाष्ट्या करता प्रस्थान केले. टेरेस रेस्टॉरंट, अतीशय नीटनेटके व प्रशस्त,हसतमुख कर्मचारी आणी ग्राहकांची लगबग. पांढरे ॲप्रन, टोपी घालून खानसामे सज्ज होते.एकदा फेरी मारून सर्व नजरे खालून घातले आणी इथेच चुक झाली. साऊथ इंडियन ते नाॅर्थ इंडियन,ड्रायफ्रूट्स ते फ्रेशफ्रुटस्,चहा काॅफी ते कोकाकोला, अगदी ताजा उसाचा रस सुद्धा, केक,पेस्ट्रीज,मोड असलेली धान्ये,दुधी भोपळा आणी कार्ल्याचा रस सुद्धा ऑन डिमांड होता.( हे काही जास्तच झालयं ना,पण ....) दिक्षित ते दिवेकर आणी आमच्या सारखे फ्रिलान्स फुडीं करता हजर होते. (सबका साथ सबका विकास) मला तर अन्नकोट आहे असेच वाटले. काय खावे आणी काय नाही?,संभवत: माझ्यासारखीच इतरांची अवस्था होती."अजी म्या ब्रह्म पाहीले".पुढील पाच दिवस नाष्टयाचे हेच विश्वरूप दर्शन होणार असल्याने,पंजाबी,साऊथ इंडियन, चायनीज, गुजराथी अशी थीम बनवून एक दिवस एक प्रकारचा नाष्टा ट्राय करायचे ठरवले.मुख्य म्हणजे नाष्टा काॅम्प्लिमेंटरी होता त्यामुळे आणखीनच चविष्ट लागत होता. एव्हढ्यात गाडीवाल्याने आल्याची वर्दी दिली. सर्वांना सांगीतलं आणी पटकन आवरा म्हणून सूचनाही केली.आज गरूडेश्वर,एकता नगर, जंगल सफारी इत्यादी बघण्याचे ठरले होते.
आवांतर,
विश्वामित्री नदी एक पावसाळी नदी आहे, काही महीने कोरडी असते. पंचमहाला जिल्ह्य़ातील पावगढ डोंगरातून उगमपावते व खंबातच्या खाडी मधे अरबी समुद्राला मिळते. बडोदा शहर याच नदीकाठावर वसलेले आहे. ही एक अत्यंत असुरक्षित नदी मानली जाते.या नदीत ३०० च्या वर मगरी रहातात असा अनुमान आहे. पावसाळ्यात जेव्हां नदी दुथडी भरून वाहते तेव्हा शहरामधे घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही......
प्रतिक्रिया
21 Jul 2024 - 6:38 pm | कर्नलतपस्वी
लेख कृपया भटकंतीत हलवावा.
21 Jul 2024 - 6:41 pm | कर्नलतपस्वी
फोटोवर दिसणारी तारीख सुधारित अवृत्ती असल्याने लेखना बरोबर जुळत नाही असे वाटेल.
चलचित्र फित व्यवस्थित अपलोड करता आली नाही. तज्ञांनी मदत केल्यास आभारी राहीन.
21 Jul 2024 - 7:24 pm | कंजूस
पर्यटन ललित लेख. मजा येत आहे.
चांगल्या हॉटेलातील वास्तव्य पर्यटन आनंदात अवश्य भर घालते.
21 Jul 2024 - 7:44 pm | श्वेता२४
पक्षांचे फोटो सुरेख आले आहेत.
21 Jul 2024 - 8:16 pm | Bhakti
छान पक्षी निरीक्षण! निवांत डिटेलवारी लिहित आहात हे बरंय 😌
21 Jul 2024 - 8:30 pm | मुक्त विहारि
पुभाप्र...
22 Jul 2024 - 8:41 am | प्रचेतस
व्वा....!
तपशीलवार वर्णनामुळे वाचायला मजा येत आहे.
22 Jul 2024 - 2:19 pm | गोरगावलेकर
या नदीत ३०० च्या वर मगरी रहातात असा अनुमान आहे. पावसाळ्यात जेव्हां नदी दुथडी भरून वाहते तेव्हा शहरामधे घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही......
हो, शहरातील एक पूल ओलांडताना या मगरी पहिल्या आहेत
24 Jul 2024 - 5:54 pm | टर्मीनेटर
हा भागही आणि व्हिडिओही आवडला 👍
पुढील भागाच्या प्रतिक्षेत...
25 Jul 2024 - 6:01 pm | चौथा कोनाडा
वा .. मस्तच !
पक्षी सुंदर आणि त्या सोबत दिलेली गाणी . भारी वाटतंय ओघवतं लेखन वाचायला ... मजा येतेय !
25 Jul 2024 - 7:27 pm | गवि
सुंदर पक्षी. उत्तम छंद आहे.
रच्याकने. तो सुभग म्हणून जो दाखवला आहे तो सुभग (आयोरा, iora) नसून हळद्या (ओरिओल) आहे.
असे वैयक्तिक मत.
28 Jul 2024 - 11:51 am | कर्नलतपस्वी
सहमत आहे. मिपावर लेख आणी ते सुद्धा छायाचित्रा सह म्हणजे पावनखिंड लढवण्या सारखे. एखाद दुसरा वार चुकीचा होणारच.
तुम्ही इतके बारकाईने, लक्ष देऊन लेख वाचता याचा आनंद झाला.
नाहीतर आमचे मिपावरचे लेखन म्हणजे चितळ्यांच्या शेजारीच बाकरवडीचे दुकान टाकल्या सारखेच म्हणायचे.
28 Jul 2024 - 11:58 am | गवि
पण पण...
मागच्या वेळी प्रमुख पाहुणे होते त्यांना तुम्ही "ते आणि साने गुरुजी" असं म्हणाला होतात.
;-))
28 Jul 2024 - 1:02 pm | कर्नलतपस्वी
म्हणजे राम(RAM).
नाही समजलो. उलगडून सांगा.
28 Jul 2024 - 1:29 pm | गवि
https://www.misalpav.com/comment/1183237#comment-1183237
संदर्भ: सखाराम गटणे, (पुलं)
28 Jul 2024 - 9:23 pm | Bhakti
या प्रतिसादाचा संदर्भासह अजून स्पष्टीकरण द्या ना गविशेठ ;)
बाकी सखाराम गटणे ऐकला ,तुफान म्हणजे तुफान हसत सुटले होते,कारण लग्नाआधीची मीच मला आठवली 😆
आणि 'म्हैस' कथाकथन ऐकल्यावर परवा घरी चालले होते.आमचा गवळीवाड्याच्या चरायला रस्त्यावर येणाऱ्या म्हशी आणि घरी सुटलो एकदाचे असे आम्ही राजीखुशीं यांची एकच वेळ असते.एक म्हैस डिव्हायडरच्या आल्याड बाकी सगळ्या पल्याड हिची आपली धावपळ हायवे वरून सुरू होती,जर का एखादा बाणा प्रसंग घडला असता तर ,पुलं प्रमाणे मलापण लिहायला विषय मिळतो काय अस मनात चमकून गेलं 😂
28 Jul 2024 - 10:07 pm | गवि
सखाराम गटणे पुलंना (प्रमुख पाहुणे) म्हणतो की "तुम्ही आणि साने गुरुजी माझे आदर्श आहात."
तेव्हा तेथील सेक्रेटरी त्याला म्हणतो की, "पण मागे ते प्रमुख पाहुणे आले होते त्यांना तू ते आणि साने गुरुजी असं म्हणाला होतास.."
आणि असे म्हणून गटणेला तो कानकोंडे करतो. सेक्रेटरी या मनुष्य विषयाला (कुठे काय बोलावे याचा ) पोच असता कामा नये असा काही नियम आहे की काय असे पुलंना वाटले. *
कर्नल साहेबांनी वरील सेम टु सेम डायलॉग (पक्षी, बारकाईने वाचता, चितळेंच्या शेजारी बाकरवडीचे दुकान इ.) या आधी प्रचुला मारलेला होता. तोच त्यांनी मला उद्देशून पेस्टवला.
असा तो काहीसा संबंध.
बाकी म्हैस म्हंटल्यावर लक्ष्मीबाईंच्या स्मृतिचित्रे मधली नगर मुक्कामी असताना, कल्याणी म्हैस मोकळी सुटून पळत निघणे आणि टिळकांनी कॉलेजात वर्ग घेताना तिला पाहून शिकवणे सोडून पाठलाग करणे इत्यादि आठवले.
* इथे सेक्रेटरीची भूमिका मी केली. :-))
28 Jul 2024 - 10:38 pm | Bhakti
हा हा ;) खरंच की!
29 Jul 2024 - 6:06 am | कर्नलतपस्वी
नंतर माझ्याही लक्षात आले होते.
आहो हाच डायलॉग अनेक मिपा भटक्यांवर लागू होतो. इतके सुंदर सटिक आणी सखोल वर्णन करतात की त्याच्यापुढे माझे लिखाण काहीच नाही.
प्रचेतस, गारगोवलेकर ताई,टर्मिनेटर, चक्कर बंडा आणी इतर काही मिपाकर यांचे प्रवास वर्णन वाचताना स्वतःच प्रवास करत आहे असे प्रतित होते.
यांना सुद्धा मिपा पद्म पुरस्कार देण्यास मी अनुमोदन करेन.
भक्तीला पाक पद्म पुरस्कारासाठी माझे अनुमोदन आहे हे मी त्यांच्या पाकृ धाग्यावर लिहीले आहे.
29 Jul 2024 - 7:28 pm | कंजूस
पाकपद्म मिळाले की दुसऱ्या दिवशी .......
कमळाच्या पानांची भजी, फुलांच्या केशराचे श्रीखंड , कमळ दांड्यांची भाजी या पाककृती आल्याच समजा. ( बियांच्या लाह्या - मखाण्यांची खीर येऊन गेली आहेच.)
29 Jul 2024 - 9:19 pm | Bhakti
अळूच्या देठांना कसे विसरणार.
😂
https://www.misalpav.com/node/50546
29 Jul 2024 - 9:34 pm | कंजूस
अळू पुरस्कार नसतो ना. ( कमळ आणि अळूची पाने अंगाला पाणी लावून घेत नाहीत हे साम्य.)
28 Jul 2024 - 11:52 am | कर्नलतपस्वी
आभार.