आधीचा भाग
1)पूर्वतयारी
सहलीचा पहिला दिवस उजाडला. आज आम्हाला कलाडी या आद्य शंकराचार्यांच्या जन्मगावी भेट देऊन पुढे मुन्नारला पोहोचायचे होते. सकाळी आम्ही लवकर उठून आंघोळी करून आठ वाजेपर्यंत तयार झालो. हॉटेल मालकांनी अर्धा तासात ऑर्डर प्रमाणे नाश्ता बनवून देण्यात येईल म्हणून सांगितले. तथापि आम्हाला तेवढा वेळ नव्हता. त्यामुळे आम्ही चहा मागवला. नुकतीच दिवाळी झाल्यामुळे तसेच सासूबाईंना सकाळची गोळी घ्यायची असल्यामुळे फराळ सोबत ठेवला होता. आम्ही चहा व फराळ करून घेतला. आमचा ड्रायव्हर आम्हाला आठ वाजता घ्यायला आला. ड्रायव्हरचे नाव शामियर असे होते. हसतमुख, बोलक्या अशा शामियरचे आम्ही शमीभाई असे नामकरण करून टाकले. शमीभाईला एकंदरीत सहलीचा प्लॅन सांगितला. हॉटेलमधून चेक आउट करून आम्ही कलाडीकडे साधारण साडेआठच्या दरम्यान प्रस्थान केले. कलाडी येथे आद्य शंकराचार्यांचा जन्म झाला. तेथे शारदा शृंगेरी मठ आहे.
आत शारदा देवीची मूर्ती , अष्टदुर्गांच्या मूर्ती, तसेच श्री शंकराचार्यांच्या आईची समाधी आहे. मंदिराच्या आत मध्ये कुठेही फोटो काढणे अलाउड नसल्याने बाहेरूनच फोटो काढले. तसेच जवळच श्रीकृष्ण मंदिर आहे. श्रीकृष्ण मंदिरांमधील मूर्ती अत्यंत मोहक होती.
केरळ मधील मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृहात कृत्रिम दिवा नसतो. केवळ पणत्यांच्या नैसर्गिक प्रकाशात जे भगवंताचे दृश्य दिसते ते केवळ-अवर्णनीय!! शारदा मठ व श्रीकृष्ण मंदिर या दोन्हीही मंदिरांमध्ये जाऊन मन खूप प्रसन्न झाले. मंदीर परीसर अत्यंत शांत व रमणीय आहे. आवर्जून भेट द्यावीत अशी ही मंदीरे आहेत. इथे आमचा दीड तास कसा गेला तेच कळले नाही. सहलीची सुरुवात तर उत्तम झाली होती.
शमी भाईला मी विचारले की आम्हाला केरळची प्रसिद्ध राईस प्लेट “ साध्य” खायचे आहे. त्यावर त्यांनी मुन्नारला जाताना एक अतिशय प्रसिद्ध व उत्तम हॉटेल आहे तिथे आपण जेवूयात. साधारण एक तासात आपण तिथे पोहोचू असे सांगितले. मंदिरातून आम्ही निघालो त्यावेळी साडेअकरा वाजले होते. तसाही आम्ही नाष्टा केला नव्हता. त्यामुळे आता नाश्ता न करता थेट लवकर जेवणच करावे असा आम्ही विचार केला आणि मार्गस्थ झालो. हॉटेल “ रस ” असे या विशेष करून केरळी साध्य मिळण्यासाठी प्रसिद्ध असलेले हॉटेल आहे. अत्यंत उत्कृष्ट असे हे हॉटेल असून अडीचशे रुपयाला अनलिमिटेड थाळी मिळते. या मार्गावर रस या नावाची अनेक हॉटेल्स असल्याने मी ज्या हॉटेलमध्ये जेवले त्याची लिंक देत आहे.
जेवताना पुढील पदार्थ होते - लिंबू लोणचे, आल्याचे लोणचे, कैरी लोणचे, यासोबत बारीक चिरलेल्या बटाट्याची वेगळीच भाजी, मिक्स व्हेजिटेबल हे सर्व पारंपरिक केरळी पद्धतीचे होते. या सोबतच अननसाची कोशिंबीर, लाल भोपळ्याची अतिशय चविष्ट भाजी, पांढऱ्या भोपळ्याची चणा घालून केलेली चविष्ट भाजी, सांबार, रस्सम, साधे वरण, कढी, बीटाची कोशिंबीर, सांडगी तळलेली मिरची, बनाना चिप्स, त्याच्यासोबत मिळणारा गुळाचा खडा, तीन प्रकारचे पायसम म्हणजे खीर होती. त्यामध्ये एक गव्हाची खीर, दुसरी शेवयाची खीर व तिसरी गाजराची खीर केली होती यासोबत पापड दही, केळ हे अतिशय पारंपारिक पद्धतीने केळीच्या पानावरती वाढून दिलेले अप्रतिम जेवण होते. जेवणातील प्रत्येक भाजी व कोशिंबीर चविष्ट होती. आम्ही 2-3 वेळी मागून मागून खाल्ली. खीर/पायसंम खाण्याची इथे विशिष्ट पद्धत आहे. खीरीमध्ये केळ कुस्करायचे व त्यात पापड मिक्स करायचा... जबरदस्त चव लागते. इथे जेवणे हा सोहळा आहे. अजिबात मिस करु नये.
इथले जेवण जेवून आम्ही तृप्त झालो. शमी भाई ने सांगितले मी फूडी आहे त्यामुळे मला केरळमध्ये कुठे काय चांगले खायला मिळते ते अगदीच माहित आहे. तुम्हाला मी उत्तम प्युअर व्हेज मिळणार्या ठिकाणी नेत जाईन काळजी करू नका, असे सांगितले, मी त्याला सांगितले की मला या संपूर्ण प्रवासात पुट्टू विथ कडला करी, अप्पम विथ व्हेज स्ट्यू, तसेच केरला पराठा खायचे आहे. त्यावर त्याला आश्चर्य वाटले की मला इतके केरळी पदार्थ कसे काय माहिती? मी त्याला सांगितले की, मी पण खूप फूडी आहे. त्यामुळे मला इथले लोकल पदार्थ खायची इच्छा आहे. तुम्हाला जिथे वाटेल की इथला हा पदार्थ लोकल आहे आणि तो खाल्ला पाहिजे तेव्हा नक्की सांगा. त्यावर तो म्हणाला की खरंच तुम्ही बराच रिसर्च केला आहे. तुम्ही अल्लेपी ऐवजी मुन्रो आयर्लंड ला जाणार आहात. हे ठिकाण मी पहिल्यांदाच ऐकत आहे. तुमच्यामुळे मलाही ते पाहायला मिळेल असे तो म्हणाला. मी मात्र मनात हा निर्णय योग्य ठरेल किंवा वेडेपणा ठरेल हे भविष्यातच कळेल अशा विचार करत होते.
आता घाट एरिया सुरू झाला होता आणि निसर्गाने त्याची रूपे दाखवायला सुरुवात केली होती. मी बहुदा मुन्नार या ठिकाणाबाबत खूप जास्त अपेक्षा ठेवल्या होत्या. परंतु घाटामध्ये मला जो निसर्ग दिसत होता त्या निसर्गाच्या रूपांमध्ये आणि आपल्या कोकणातल्या घाटांमध्ये दिसणाऱ्या रूपांमध्ये फारसा काही फरक नव्हता. वाटेत आम्ही चिअप्परा वॉटरफॉल, वलरा वॉटरफॉल, अशा ठिकाणी थांबलो.
फोटोसेशन केले. तथापि या वॉटर फॉल मध्ये जाऊन आपण भिजू शकत नाही. केवळ लांबून बघणे इतकेच करू शकतो. त्यामुळे थोडासा मूड ऑफ झाला. मुन्नार मध्ये तुम्हाला काय काय पाहायचे आहे असे शमीभाईने विचारले. त्यावरती मी त्याला माझा प्लॅन सांगितला. तर तो म्हणाला या ठिकाणी तर सर्वच जण जातात. मी तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे तुम्ही प्लान करा. काही वेगळी ठिकाणे पहा. तुम्हाला ती ठिकाणे नक्की आवडतील. त्याने आता जाताना हत्तीची सफारी करूयात, चॉकलेट फॅक्टरी पाहूयात, स्पाइस गार्डन पाहुयात आणि संध्याकाळी कथकली डान्स शो बघूयात असे सुचवले. त्यावर चॉकलेट फॅक्टरी पहाण्यात आम्हाला रस नाही. तसेच कथाकली शो आम्ही थेकडी ला पहायचा ठरवला आहे असे सांगितले. तथापि सासूबाईंसाठी हा पहिलाच अनुभव असल्यामुळे स्पाइस गार्डन पाहण्याचे ठरले. तसेच मी शमी भाईला सुचवले की आम्हाला झिप लाईन करायची आहे. शमीभाईने एका स्पाइस गार्डनच्या तिथे आमची गाडी थांबवली. हे फ्री होते. एका गाईडने आम्हाला तेथील वनस्पतींची माहिती दिली.
तेथील काही फोटो –
स्पाइस गार्डनची व्हिजिट हा एक खूप चांगला अनुभव होता. नंतर त्यांनी आम्हाला स्टोअर मध्ये नेले तथापि आम्ही तिथून काहीही घेतले नाही. तिथून आम्ही झिप लाईन साठी निघालो. ही झिप लाईन तेथील सर्वात लांब जीप लाईन आहे. खाली पूर्ण हिरवीगार दरी दिसत होती. आम्ही सर्वजण रोमांचित झालो होतो. मी सासूबाईंना देखील झिप लाईन करण्याचा आग्रह केला. नाही होय म्हणत त्या तयार झाल्या. परंतु जेव्हा सर्वप्रथम माझा आठ वर्षाचा मुलगा एका ट्रेनर सोबत गेला तेव्हा मात्र त्या घाबरू लागल्या. मी काही जाणार नाही पैसे परत करा असे म्हणू लागल्या. माझा नवरा पुढे गेला. शेवटी त्या येत नाहीत हे पाहून मीही गेले. शमी भाई ने एक युक्ती केली. तो म्हणाला छोट्या बरोबर जसा ट्रेनर गेला तसा तुमच्याबरोबर पण हा ट्रेनर येईल. त्याच्याशी मल्याळीमध्ये बोलून काहीतरी सांगितले आणि सासूबाईंना त्यांनी तयार केले. सासूबाईंना वाटले की आपल्याबरोबर हा ट्रेनर येणार आहे त्यामुळे त्या तयार झाल्या. तर ट्रेनरने त्यांना धरून उभा केले आणि धक्का देताना त्यांना एकट्यालाच सोडले. अशा रीतीने सासूबाईंनी देखील या वयात झिप लाईन चा आनंद घेतला.
मी पुढे जाऊन त्यांच्यासाठी थांबले होते. त्या येत असताना बघून मला खूप आनंद झाला. मी दुसऱ्या बाजूने पुढे गेले आणि त्याही माझ्या मागोमाग आल्या. आयुष्यात कधी करू न शकणारे धाडस केल्याचा आनंद व आश्चर्य त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. परत आल्यानंतर आम्ही दोघींनीही एकमेकींना कडकडून मिठी मारली. आमच्या सर्वांसाठी एक लाईफ टाईम अनुभव होता हा. पैसे पूर्ण वसूल झाले होते. ट्रिपचा आता आनंद यायला लागला होता. आम्हाला बऱ्यापैकी वेळ झाला होता. शमी भाई आम्हाला तिथे जवळच असलेल्या कथकली शो पहा असे सांगू लागले. पण तिकीट खूपच जास्त होते. पाचशे रुपये एकाचे. मी त्यांना म्हणले की हा शो २०० रुपयांमध्ये पाहायला मिळतो. त्यावरती शमीभाईचे म्हणणे पडले की मी खूप ठिकाणी हा शो पाहिलेला आहे. त्याच्यात काही मजा नाही. परंतु हा शो पाहिल्यानंतर तुम्हाला पैसे वसूल झाल्याचे फील येईल. मी सकाळी सुचवलेला हॉटेलच्या जेवणाचा अनुभव तुम्ही घेतलात ना, त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा. तुमची सहल चांगलीच होईल अशाच गोष्टीं मी तुम्हाला सुचवेन. शेवटी मी त्याला सांगितले की रेट मध्ये काहीतरी घासाघीस कर हे मला खूपच जास्त वाटतं. त्यावर त्याने मल्याळीमध्ये बोलून प्रत्येकाचे आठशे रुपये दोन्ही शोचे ठरवले. म्हणजेच एक तासाचा कथकली शो व एक तासाचा कलरीपट्टू बघायला मिळणार होता. हे आम्हाला जास्तच वाटले. परंतु ठीक आहे. सहलीमध्ये असे काही ना काही आऊट ऑफ बजेट होत असते असा आम्ही विचार केला. त्याच वेळी तिथे असलेल्या एका माणसाकडे दुसऱ्या दिवशी साठी एक जीप ठरवली जी अर्धा दिवसांसाठी आम्हाला पाच वेगवेगळ्या ठीकाणी फिरवणार होती. जिचे आम्ही तीन हजार पाचशे रुपये पे केले.
पाच वाजले होते आणि कथकली शो ची वेळ झाली होती. या प्रोग्रॅम मध्ये त्यांनी कथकली, भरतनाट्यम त्याचबरोबर केरळमधील थय्यम हे नृत्य प्रकार देखील दाखवले. हा कार्यक्रम अतिशय नेत्रदीपक असा झाला. आम्हाला अतिशय आवडला. त्यानंतर कलरीयापट्टू हा केरळमधील पारंपारिक मार्शल आर्ट च्या कार्यक्रम देखील चांगलाच होता.
त्याचे काही फोटो –
कथकली
थय्यम
भीम व दूर्योधन युद्ध
कार्यक्रमा मधील कलाकारांबरोबर काही फोटो काढून आम्ही हॉटेलकडे प्रस्थान केले. हॉटेलच्या मालकाला आम्ही उशिरा येत आहोत हे सकाळीच सांगून ठेवले होते. त्याप्रमाणे आम्ही साधारण साडेनऊ वाजता हॉटेलवर पोहोचलो. आमची रूम तिसऱ्या मजल्यावर होती. रूम प्रशस्त होती. बाहेर एक कॉमन पेसेज होता. तिथे बेड टाकून ठेवले होते. एकंदरीतच उत्तम रूम आम्हाला केवळ सतराशे रुपये मध्ये मिळाली होती. 24 तास गरम पाणी होते. स्वच्छता होती. अजून काय हवे होते? हॉटेल मालकाने आमच्या चारही बॅगा तिसऱ्या मजल्यावरती स्वतः चढवल्या. आम्ही तेथे दोन दिवस राहणार होतो. आजचा पूर्ण दिवस अत्यंत अविस्मरणीय असाच गेला. सकाळी मंदिरांची भेट, चविष्ट अशी साध्य थाळी, त्यानंतर झिप लाईन चा थरार, स्पाइस गार्डन ची भेट, कथकली आणि कलरीयापट्टूचा शो हे सर्वच आम्ही खूप जास्त एन्जॉय केले. आता सर्वांना भूक लागली होती. जवळच एका प्युअर व्हेज असलेल्या अन्नपूर्णा नावाच्या हॉटेलमध्ये आम्ही चायनीज खायचे ठरवले. त्यानुसार आम्ही मशरूम फ्राईड राईस, गोबी मंचुरियन व पनीर चिली ऑर्डर केले. हे सर्व आम्हाला खूप होईल असे वाटले होते तथापि क्वांटिटी कमी होती. हे पाहून नूडल्स देखील ऑर्डर केल्या. आश्चर्यकारकरीत्या सर्व पदार्थांची चव अत्यंतिक चांगली होती. आजचा दिवस सार्थकी लागला होता. उद्या आता मुन्नाचे काय दर्शन होते आणि काय नवीन अनुभव मिळतो याबाबत उत्सुकता मनात घेऊन आम्ही झोपी गेलो......
प्रतिक्रिया
9 Jul 2024 - 1:10 pm | प्रचेतस
हा भागही आवडला.
केरळी जेवण विशेषतः त्यातल्या भाज्या तर अतिशय आवडतात. मिरीच्या वेलावरची हिरव्या मिरीची चव देखील खूप भारी लागते. कथकली आणि कलरीपट्टूचे फोटो मस्तच.
लिहित राहा. वाचत आहेच.
9 Jul 2024 - 7:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा भागही आवडला.
पुलेशु.
-दिलीप बिरुटे
9 Jul 2024 - 2:47 pm | Bhakti
छानच!
मला आमच्याकडे चक्क एक केरळी दुकान सापडलं आहे.तिथे ते उडदाचे पापड मिळाले ,फोटोतले आहेत तसेच टम्म पुरी सारखे फुगतात.खीरीबरोबर खायचे तर आजच करते खीर ;)
पुट्टू विथ कडला करी,
येस हाही भन्नाट प्रकार त्या दुकानात एक पीठी मिळाली तर बनवायचे प्रयत्न केलाय!येऊ द्या अजून खाद्यभ्रमंती.
12 Jul 2024 - 11:35 am | Bhakti
#अप्पलम
#पायसम
तर काय झालं,जवळच केरळाहून महाराष्ट्रात स्थायिक झालेल्यांच एक स्टेशनरी दुकान आहे.तिथे गेले असता ते फणसाचे वेफर्स पैकिंग करतांना दिसले.तेव्हा त्यांनी इतर केरळी खाद्यपदार्थही दाखवले.मग फणसाचे वेफर्स,राईस गुलगुलासारखा केक,दह्यातल्या खारावलेल्या तिखटजाळ मिरच्या,फुलाच्या आकाराचे मुरूक्कू,पिवळे लांबसर चिरोटे,काळ्या तिळाचे लाडू,लालसर तुकडा तांदूळ,तांदळाचा पुट्टू असे पदार्थ एक एक करत चव घेतली.तिथूनच वाटीच्या आकाराचे पापड जे उडीद आणि तांदूळ मिक्सचे असतात ते घेतले.म्हटल पापडासारखे पापड असतील.भाजून पाहिले अजिबात भाजले गेले नाही जळायचे.मग तळून पाहिले तर छान पुरी सारखे टम्म ,खुशखुशीत फुगले.पण हे प्लेन असल्याने नुसते खाण्यात मज्जा येईना.मग तुमच्या भटकंती धाग्यात समजल की ते कसे खायचे 😀
तर त्यासाठी केला शेवयाचा पायसम(मी अधिक खोदाखोद न करता खीरीसारखाच बनवला )
मग काय ते अप्पलम(प्लेन पापड)तळला.केळीच्या पानावर आधी अप्पलम ठेवला त्यावर शेवय्या पायसम टाकला...परत अप्पलम ...परत पायसम...शेवटी केळ कुस्करून त्यात घेतले.खुसखुशीत पापड कुडुडुम त्यात क्रश केला.... अहाहा काय ती चव!!!
खरच कसं खायचं हे शिकवावं लागते कधी कधी
पुट्टू कसा खायचा याची कथा पुढच्यावेळी ;) 😀
-भक्ती
13 Jul 2024 - 12:03 pm | श्वेता२४
तुमच्या पाककृती आणि त्यांचे फोटो याची मी जबरदस्त फॅन आहे!! खरंच हे टम्म फुगणारे पापड हे केरळी पापडांची खासियत आहे .तुम्हाला केळ आणि पापड पायसम मध्ये कुस्करून खायला आवडले हे ऐकून छान वाटले. काही काही पदार्थ हे त्याच पद्धतीने खाल्ले तर त्याची चव कित्येक पटीने वाढते हेच खरे आहे. आम्ही पुट्टू काडला करी मध्ये कुस्करून त्यामध्ये पापड कुस्करून खाल्ला होता. तुमची काय पद्धत आहे हे जाणून घ्यायला आवडेल.
13 Jul 2024 - 12:58 pm | Bhakti
धन्स!
नाही ओ मी सांबर सोबतच पुट्टु खाल्ला.मिपाच्या लेखमालेसाठी पाककृती राखून ठेवलीये :)
9 Jul 2024 - 3:02 pm | श्वेता२४
@प्रचेतस व @भक्ती प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद !! केरळची खाद्य संस्कृती ही अतिशय समृद्ध अशी आहे. साध्य थाळी मधील भाज्या या अत्यंत साध्या कमीत कमी मसाले वापरून व खोबऱ्यांचा मुक्तहस्ते वापर केलेल्या असतात. बाकी आपल्या पंजाबी भाज्या या खडे मसाले वापरून केलेले सर्वच हॉटेलमध्ये सापडल्या. त्यामुळे त्या भाज्यांमध्ये खडे मसाल्याचा एक प्रकारचा फ्रेश वास आणि चव असते. मी साउथ इंडियन पदार्थांची विशेष फॅन आहे त्यामुळे मी देखील घरात असेच पदार्थ करून बघण्याचा प्रयत्न करत असते.
9 Jul 2024 - 3:25 pm | Bhakti
हो,खोबऱ्यांचा मुक्तहस्ते वापर केलेल्या असतात.आणि तांदळाचा,तांदळाच्या पिठीचाही वापर खुबीने करतात,हीच ती सुंदरता 😀
9 Jul 2024 - 7:29 pm | कर्नलतपस्वी
सर्व प्रत्यक्ष अनुभवले असल्याने पुनरावृत्ती झाली.
वर्णन करण्याची शैली बांधून ठेवते.
लि. रा. वा. रा.
10 Jul 2024 - 12:40 am | रामचंद्र
प्रसन्न प्रवासवर्णन. शाकाहारी भोजनाचा सात्त्विक आनंद.
10 Jul 2024 - 10:39 am | श्वेता२४
@ कर्नल तपस्वी@ रामचंद्र
आपल्याला प्रवास वर्णन आवडले हे वाचून आनंद झाला.
10 Jul 2024 - 10:40 am | श्वेता२४
व्हिडिओ कसा चढवावा याबाबत काही लेख मला सापडत नाही आहे मी पावर होता कुणाला माहित असेल तर त्यांनी कृपया लिंक द्यावी.
10 Jul 2024 - 2:17 pm | गोरगावलेकर
आमचा आद्य शंकराचार्यांचा मठ पाहायचा राहिला होता. त्या भागातील पारंपरिक जेवण व धबधब्याचे वर्णन व फोटो आवडले.
दहा वर्षांपूर्वी डिसेम्बर महिन्यात चिअप्परा वॉटरफॉल पहिला त्याची आठवण झाली.
सात टप्प्यात पडणारा हा एक सुंदर धबधबा .
व्हिडीओ यु ट्यूबवर चढवून लिंक देता आली तर बघा.
10 Jul 2024 - 4:06 pm | टर्मीनेटर
वाचतोय... हा भागही आवडला 👍
10 Jul 2024 - 5:13 pm | श्वेता२४
@टर्मिनेटर व @गोरगावलेकर प्रतिसादासाठी धन्यवाद तथापि युट्युब वरती व्हिडिओ चढवणे हा एकच मार्ग आहे का?
10 Jul 2024 - 5:42 pm | चौथा कोनाडा
हा ही भाग खूप सुंदर !
वाचताना आपल्या सोबतच आहे असं वाटतंय !
केरळची प्रसिद्ध राईस प्लेट “ साध्य” : तोंपासु !
आणि ऑल प्रचि ... +१ अ ति सुं द र !
10 Jul 2024 - 9:13 pm | श्वेता२४
प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद
31 Jul 2024 - 3:40 pm | श्वेता व्यास
शृंगेरी मठ आणि श्रीकृष्ण मंदिर सोडता इतर सर्व सेम सेम, पण फोटो बघून वाटतंय तेच मुख्य होतं.
साध्य ची पण आठवण ताजी झाली, हे साध्य पुण्यात कुठे मिळते का शोध घ्यायला हवा :)
1 Aug 2024 - 12:03 pm | श्वेता२४
शृंगेरी मठाची शांतता व एकंदरीतच येथील वातावरण हे तुम्हाला वेगळ्या जगात घेऊन जाते. खूप मानसिक शांतता लाभते आणि श्रीकृष्ण मंदिरातील श्रीकृष्णाचे दर्शन हे खूपच अद्भुत होते. फोटो काढणे अलाउड नसल्यामुळे तेथील फोटो देता येत नाहीत. अन्यथा ही दोनही देवळे अजिबात चुकवू नयेत अशी आहेत. परंतु ट्रॅव्हल कंपन्या वेळेअभावी तिथे नेत नाही .आम्ही मात्र आवर्जून गेलो होतो. पर्यटन ठिकाणी एखादे प्रसिद्ध मंदिर असेल तर त्याला मला आवर्जून भेट त्याला आवडते.
1 Aug 2024 - 3:27 pm | अमर विश्वास
केरळी जेवणाचे फोटो मस्त ...
पण मुन्नार आणि कोकण ही तुलना पाहून थोडे नवल वाटले ...
मुन्नार ची खरी मजा ही इथले चहाचे मळे, Tea Museum, मदुपट्टी डॅम , high point, Eravikulam National Park, कुंडाला डॅम (तलाव), चोकरमुदी पिक आणि असे इतर छोटे मोठे ट्रेल्स .. इथे मरमुराद भटकंती करण्यात आहे ,,, एक वेगळाच निसर्ग आहेर ... मानवनिर्मित (चहाचे मळे) आणि पश्चिम घाट यांचा सुरेख मेळ आहे इथे
1 Aug 2024 - 9:09 pm | श्वेता२४
अमर विश्वास जी प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद