कर्म विपाक सिद्धांत

अभिजीत's picture
अभिजीत in काथ्याकूट
7 Mar 2024 - 10:16 am
गाभा: 

कर्म विपाक सिद्धांत
‘कर्म’ हा शब्द माहीत नसलेला भारतीय मनुष्य विरळाच म्हणावा लागेल. आपल्या सर्वांच्या मनात पाप-पुण्य, कर्म, प्रारब्ध, संचित, दैव, नियती वगैरे विचार कधीनाकधी येतातच. चार्वाक सोडून हिंदू धर्माच्या सर्व परंपरा – बौद्ध, जैन सुद्धा – कर्मसिद्धांत मानतात. चार्वाकांचा कर्म विपाक सिद्धांताला विरोध आहे आणि एकप्रकारे त्यांचा विचार कर्म विपाक सिद्धांताभोवतीच फिरतो. त्यामुळे हिंदूंच्या हजारो वर्षांचे विचाराचे एक फलित (pun intended) म्हणून कर्म विपाक सिद्धांत समजून घ्यावा लागतो.

कर्म विपाक सिद्धांत थोडक्यात –
मनुष्याच्या प्रत्येक कर्माला दोन प्रकारचे परिणाम (फले) मिळतात – दृश्य आणि अदृश्य. जे दृश्य परिणाम असतात त्यातून मनुष्याला सुख आणि दु:ख प्राप्ती होते. जेंव्हा परिणाम अपेक्षेनुसार अथवा अपेक्षेपेक्षा जास्त असतो, तेंव्हा शक्यतो सुखाची निर्मिती होते. याउलट, परिणाम अपेक्षेपेक्षा कमी असतो, तेंव्हा शक्यतो दु:खाची निर्मिती होते. मनुष्याच्या कृतीचे दोन प्रकार आहेत – धार्मिक व अधार्मिक. भारतीय संस्कृतीत यज्ञ-याग यांना प्राधान्य होते, तेंव्हा धार्मिक कृत्यांमध्ये यज्ञाला प्रमुख स्थान होते. पुढे विविध परंपरा विकसित झाल्या आणि धार्मिक कर्माची कक्षा रुंदावली. आधुनिक काळात धार्मिक या शब्दाचे religious आणि moral असे दोन अर्थ आहेत. मूळ सनातन धर्मात धर्म म्हणजे – धारयति इति धर्म व अहिंसा परमो धर्म. सर्वकाही (व्यक्ति-समष्टि) धरून ठेवणारा तो धर्म आणि कमीतकमी हिंसेचा मार्ग म्हणजे धर्म. मनुष्याने धार्मिक असणे म्हणजे – आजुबाजूच्या सर्व जीवित-निर्जीव वस्तूंवर माझ्या कृतीने काय परिणाम होईल याचा विचार करून कमीतकमी हिंसेचा मार्ग स्विकारत कर्म करणे. यालाच कर्तव्य असे म्हणतात. चार पुरुषार्थातील धर्म पुरुषार्थ मनुष्याला सर्वसमावेशक कृती निवडण्यासाठी सतत मार्गदर्शन करतो. अर्थ (security या अर्थी) आणि काम (सुखप्राप्ती या अर्थी) हे दोन पुरुषार्थ, धर्म आणि मोक्ष या दोन पुरुषार्थांच्या मर्यादेत साधायचे आहेत ही सनातन धर्माची मूळ शिकवण आहे. संपूर्ण समाजरचना या भोवती केलेली आहे. आधुनिक काळात व्यक्तीकेंद्रित व्यवस्थेमुळे ‘कर्तव्यापेक्षा हक्क महत्वाचे बनले आहेत आणि त्यातून वैयक्तिक आणि सामाजिक नीतीमूल्ये निर्माण करावी लागली आहेत. वैयक्तिक नीतीमूल्य म्हणजे ज्याला आपण इंग्रजीत morality म्हणतो आणि सामाजिक नीतीमूल्यांना ethics म्हणून ओळखतो. सनातन धर्म व्यक्ति-समष्टिचा सखोल विचार करत असल्याने, नैतिकता - ethics आणि morality - हे आधुनिक मूल्य सनातन धर्मात स्वतंत्रपणे येत नाही, धर्म या विचारात नैतिकता अंतर्भूत झालेली आहे. सनातन धर्म आणि आधुनिकता यातला फरक समजला नाही तर आपण सतत आधुनिकतेच्या चष्म्यातून सनातन धर्माचा विचार करत राहतो आणि इथे गोंधळ व्हायला सुरुवात होते. धर्म म्हणजे ज्याला इंग्रजीत रिलीजन म्हणतात तो की नीतीमूल्याने वागणे हा प्रश्न पडत असेल तर हे समजून घ्यावे की आपण आधुनिकतेच्या चष्म्यातून सनातन धर्माचा विचार करत आहोत. आधुनिकतेच्या दृष्टीने रिलीजन म्हटले की कर्म-कांडे येतात आणि ‘आता यांची गरज नाही’ असा एक समज करून दिला जातो, ज्याला लगेच श्रद्धा-अंधश्रद्धा चिकटतात. आधुनिकतेने वागणे म्हणजे ‘नीतीमूल्याने वागणे’ म्हणजे morality-ethics ने वागणे अपेक्षित असते.

आधुनिकतेतून कर्म विपाकाचा विचार करायचा असेल तर तशी काही गरज नाही. स्वघोषित आधुनिकतेच्या विचाराने पाहता कर्म विपाक सिद्धांत थोतांड आहे हा निष्कर्ष गृहीत असतो. चर्चा फक्त ते गृहीतक सिद्ध करण्यासाठी असते. कारण ‘आधुनिक’, ‘शास्त्रीय’ या शब्दांनी हे लगेचच सिद्ध होतं की जे जे विचार आधुनिक जग निर्माण होण्यापूर्वीचे आहेत, ते ते विचार मागासलेले आहेत.

‘आधुनिक’ हा शब्द स्वत:बरोबर अशी एक स्वघोषित कसोटी (criterion) घेवून येतो की ज्या कसोटीतून पुरोगामी-प्रतिगामी अशी विभागणी सहज करता येते. आधुनिक आणि ओघाने वैज्ञानिक विचार (reasoning) यांत फरक केला जात नाही कारण Modernity has appropriated scientific thinking. आधुनिकतेने वैज्ञानिक विचारावर अशी मालकी दाखवली आहे की जणूकाही आधुनिकतेशिवाय विवेकपूर्ण विचार करणेच शक्य नाही. ‘आधुनिक’ हा शब्दच सर्व ज्ञानाचे ध्रुवीकरण करून टाकणारा शब्द आहे. ध्रुवीकरण कसे होते ते पहा – कोणताही विचार आधुनिक आहे की नाही हे आम्ही कसे ठरवतो? आम्ही सर्वप्रथम स्वत:कडे न्यायाधीश म्हणून पाहतो. आधुनिक काळात आम्हाला मत देण्याचा अधिकार असल्याने आमच्या मनात दोन गोष्टी पक्क्या आहेत १) आम्हाला सर्व गोष्टीत बिनदिक्कतपणे - पात्रता असो वा नसो – विशेषतः पात्रता नसताना मत देण्याचा अधिकार आहे. आणि २) आमचे मत हे ‘एक योग्य मत म्हणून गणले जावे’ या हक्काची स्वघोषित जाणीव असते. ही जाणीव त्याच आधुनिकतेच्या व्यक्तीवादाच्या भूमिकेतून येते. व्यक्तीवाद – ‘मला अमुक-ढमुक वाटतं – यावर आधारित असतो. व्यक्तीवादाला कोणत्याही परांपरांचं वावडं असतं, त्यात अर्हता (qualification – अधिकार) हा मुद्दा गौण बनतो किंवा बाद केला जातो. वैज्ञानिक विचार (scientific temperament) हा आधुनिकतेचा एक विशिष्ट वरकरणी देखावा असावा अशी सध्याची अवस्था आहे. यातून परंपरेतून आलेल्या सर्व गोष्टींना कचऱ्याची टोपली दाखवायची सोय होते. कोणत्याही मुद्द्याला ‘सायंटिफिकली सिद्ध करा’ असा पवित्रा घेता येतो पण खरा उद्देश युरोपियन विचारानुसार जे सायन्स निर्माण झालं आहे त्यातल्या कुणी याला सिद्ध केलं आहे का हे शोधणे हा हेतू असतो.

कर्म विपाक सिद्धांताचा विचार करताना ही सनातन धर्म – चार पुरुषार्थ – ethics-morality – आधुनिकता-वैज्ञानिक विचार ची लांबड कशाला लावली तर त्याशिवाय आपल्या विचाराची चौकट ही सनातन धर्माची असली पाहिजे हे लक्षात यावे यासाठी. आता या पार्श्वभूमीवर आपण कर्म विपाक सिद्धांताचा विचार करूया.
कर्मविपाक सिद्धांत –
१. मनुष्याच्या प्रत्येक कर्माला दोन प्रकारचे परिणाम (फले) मिळतात – दृश्य आणि अदृश्य. दृश्य परिणामातून सुख आणि दु:ख निर्मिती होते.
२. कर्म करण्याचे दोन पर्याय मनुष्यापुढे असतात – धार्मिक आणि अधार्मिक. धार्मिक म्हणजे कमीतकमी हिंसेचा मार्ग स्वीकारून जे श्रेयस आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करणे. आणि अधार्मिक म्हणजे ज्यातून इतर व्यक्ति-समष्टिवर दुष्परिणाम होवू शकतात, पण त्याची चिंता न करता जे श्रेयस आहे ते मिळवण्या साठी सोपा मार्ग वापरणे. इथं पुण्य आणि पाप यांचा उगम होतो.
३. धार्मिक कर्माने पुण्य मिळते आणि अधार्मिक कर्माने पाप! पाप-पुण्य फल हे सूक्ष्मात असते. म्हणजे अदृश्य कर्मफल असते. पाप आणि पुण्य यांच्या राशी बनतात. या राशींना ‘संचित’ कर्म म्हणतात.
४. मनुष्य जे कर्म करतो त्या कर्माचे दृश्य फल हे पूर्वीच्या पाप-पुण्यावर अवलंबून असते. परंतु पाप आणि पुण्य ही कधी फलित होतील याचा नियम नाही. त्यामुळे दृश्य फल जर अपेक्षेपेक्षा कमी अथवा जास्त आले तर कोणते पाप (फल कमी करण्यास) किंवा पुण्य (फल वाढवण्यास) कारणीभूत ठरले याचा नियम नाही.
५. सर्व अदृश्य फले मनुष्याच्या एकाच आयुष्यात फलित होतील याचा नियम नाही. इथे पुनर्जन्म असला पाहिजे असा अनुमान काढतात.
६. आता पुनर्जन्म व्हायचा असेल तर, स्थूल शरीराबरोबर सूक्ष्म शरीर व कारण शरीर यांचा अनुमान करावा लागतो. कारण स्थूल शरीर येवून जर कर्म फल भोगणार असेल तर, भोगणारा या स्थूल शरीरात असला पाहिजे जो पूर्वीच्या शरीरातून मृत्यूनंतर बाहेर पडला असला पाहिजे, याला सूक्ष्म शरीर म्हणतात. लिंग शरीर असेही म्हणतात. सूक्ष्म म्हणायचं कारण ते दिसत नाही, पण अनुमानाने मानावे लागते. सूक्ष्म शरीर निर्माण होण्यासाठी कारणीभूत असणारे ‘कारण शरीर’ मानावे लागते. या ‘कारण’ शरीरावर मनुष्याच्या सर्व कर्मांचे संस्कार (impressions या अर्थी) होतात. पाप-पुण्याच्या राशी त्या ह्याच! हिंदू धर्मात जन्म-मृत्यू हे चक्र सतत सुरु असते हे जे मानले जाते त्यामुळे कोणताही जन्म हा संचितांमुळे निर्माण होतो हा अनुमान काढावा लागतो.
७. संचित कर्म हे पाप-पुण्याच्या अनंत राशीनी भरलेले आहे. जीवाचा जन्म होताच या अनंत राशीपैकी जेव्हडा भाग त्या जीवाला मिळतो त्यावर त्या जीवाचे आयुष्यमान ठरते. या मर्यादित राशींना ‘प्रारब्ध’ म्हणतात. म्हणजे आपले आयुष्यमान हे प्रारब्ध भोंगेपर्यंत असते. ज्या क्षणी प्रारब्ध संपते, तिथे स्थूल शरीराचा त्याग करून सुक्ष्म शरीर कारण शरीरासकट नवीन स्थूल देहाच्या शोधार्थ बाहेर पडते. प्रारब्धामुळे मनुष्याला सुख-दुखा:चा अनुभव येतो.
८. मनुष्याचे स्थूल आणि सूक्ष्म शरीर त्रिगुणाने बनलेले असल्यामुळे, त्या गुणांच्या प्रादुर्भावाने मनुष्यात आवड-निवड (गीतेत याला राग-द्वेष म्हटलेले आहे) असते आणि कोणतेही कर्म करताना कर्म निवडीचे स्वातंत्र्य असते. या कर्म निवडीतून नवीन कर्म उदयास येते. मनुष्य कर्माचे दृश्य परिणाम भोगतो व अदृश्य परिणाम नवीन कर्माची निर्मिती करतात (संचित-प्रारब्ध).
९. मनुष्य सोडून इतर सजीवात कर्म निवडीचे स्वातंत्र्य अतिशय कमी प्रमाणात असते. त्यामुळे प्राण्यांना केवळ प्रारब्ध व फलभोग आहेत.

अशा प्रकारे कर्म सिद्धांत, पुनर्जन्म आणि फ्री विल (कर्म करण्याचे मनुष्याला असलेले स्वातंत्र्य) यांचा संबंध येतो.

कर्म विपाक सिद्धांत आणि प्रश्न
१. कर्म विपाक मनुष्यात निष्क्रियता निर्माण करतो का?
भगवंताने गीतेत याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ २-४७ ॥ अर्थात, ‘कर्म करणे मनुष्याच्या हातात आहे तथापि मनुष्य केलेल्या कर्माचे त्याला हवे तसे फल स्वत:च मिळवू शकत नाही. (ईश्वर हा कर्मफल दाता आहे.) पण केवळ हवे ते फल मिळणे हातात नाही यामुळे मनुष्याने कर्मच न करणे हा मार्ग स्वीकारू नये.’ बहुतेक वेळा या श्लोकाचा अर्थ, ‘कर्म कर पण फलाची अपेक्षा धरू नकोस’, असा केला जातो जो चुकीचा आहे. काही ठिकाणी ‘कर कर पण फलावर तुझा अधिकार नाही’, असा केला जातो, तोही चुकीचाच. कधी ‘अधिकार’ या शब्दाचा अर्थ हक्क असा केला जातो, तोही चुकीचा आहे. मुळात प्रेरणा नसेल तर कोणीही काहीही करायला कशाला तयार होईल? ईप्सित साध्य करण्यासाठी सर्वंकष विचार करून सर्वप्रकारची तयारी करावीच लागते आणि त्यानुसार पावले उचलावी लागतात. व्यवहारात आपण हेच करतो. आणि आपल्याला हेही माहिती असतं की प्रत्येकवेळी आपण जे मनाशी धरून कार्य करायचे ठरवतो ते जसेच्यातसे घडत नाही. गीतेत हेच सांगितले आहे. फक्त चुकीच्या भाषांतरांमुळे भगवतगीतेच्या या श्लोकाला बोल लावले जातात. दुसरे म्हणजे, अधिकार यांचा अर्थ ‘अर्हता – qualification’ असा आहे. या श्लोकातून भगवंत मनुष्याला कर्म निवडीचे स्वातंत्र्य आहे हे शिकवतो. पुढे अठराव्या अध्यायात भगवंत अर्जुनाला ‘इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्‍गुह्यतरं मया । विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु ॥ १८-६३ ॥‘ असे म्हणतो. अर्थात, ‘हे गुह्यतम ज्ञान मे तुला सांगितले, आता यांचा विचार करून तुझी इच्छा असेल तसे कर.’ ‘यथेच्छसि तथा कुरु´- म्हणजे जशी तुझी इच्छा असेल ते कर’. इतरही काही ठिकाणी निष्क्रियतेने मनुष्य राहुच शकत नाही असे विवेचनही भगवंत करतो. एकूण काय तर गीतेच्या श्लोकातून कर्म निवडीचे स्वातंत्र्य सनातन धर्मात आहे हे सिद्ध होते.

२. कर्म विपाक मनुष्याला ज्या दुर्दैवी, दुर्धर आणि दु:खी परिस्थितीला सामोरे जावे लागते, त्याचे समर्थन करतो का? आणि आधीच हतबल असलेल्याला ‘याला तूच कारणीभूत आहेस, मग भोग आपल्या कर्माची फळं!’ अशी संभावना करतो का?
हा प्रश्न ‘वाईट, अधार्मिक लोक मजेत जगतायंत आणि गरीब, समजूतदार, सज्जन लोकांना मात्र त्रास सहन का करावा लागतो?’ असाही विचारला जावू शकतो. कधीकधी तर रागात किंवा उद्विग्नतेने प्रसंगोपात्त प्रश्न उभे केले जातात, जसे की, ‘एखाद्या स्त्री वर बलात्कार झाला तर कर्मविपाक सिद्धांतानुसार ते तिचे भोग आहेत आणि पूर्वीच्या जन्मातल्या कृत्याचे हे फल तिने भोगले पाहिजे, त्यात काय चुकीचे?’ एकूणच कर्मविपाकानुसार मनुष्याला सुख-दु:ख अनुभवास येते, पण अशा दुर्दैवी घटना दाखवून मूळ सिद्धांत या दुर्दैवी घटनांचे समर्थन करून अन्याय कारक आहे असं चित्र निर्माण केलं जातं. यातून सनातन धर्म विचार कालबाह्य झालाय, तो अन्यायकारक आहे हे ठसवायचं असतं. मुळात, कर्मविपाकात कुठलंही समर्थन नाही आणि ज्या व्यक्तीने अधार्मिक कृती केलेली आहे, अशा व्यक्तीला कर्मविपाकाच्या आड लपून आपल्या कृत्याची जवाबदारी टाळता येत नाही. अधार्मिक व्यक्तीला दंड देवू नये आणि दु:खी व्यक्तीचे दु:ख दूर करू नये असं कर्मविपाक सिद्धांत शिकवत नाही आणि असे सुचवतही नाही. कर्मविपाकातून वर्णव्यवस्थेचा पुरस्कार आणि सामाजिक न्याय हा तर म्हणजे भलताच बहकलेला विषय आहे. त्यावर वेगळे लिहावे लागेल.

३. कर्म विपाकाचा मनुष्याला काय उपयोग?
कर्मविपाक सिद्धांत आणि त्या अनुषंगाने पुनर्जन्म, पाप-पुण्य हे विषय केवळ मोजमाप करून सिद्ध करू म्हटले तर सिद्ध करता येत नाहीत किंवा नाकारू म्हटले तर नाकारताही येत नाहीत. सनातन विचाराच्या चौकटीत कर्म विपाक, पुनर्जन्म आणि पाप-पुण्य मनुष्याला जबाबदार (accountable) बनवतात. यातून दुर्दैवी, दुर्धर आणि दु:खी परिस्थिती बदलत नाही पण मनुष्याला स्थिरचित्त राहून संकटाला सामोरे जाण्याचे बळ देतो. कर्मविपाक हा सर्वांना एकसारखा लागू होतो. आणि त्यामुळे न्याय्य आहे. हा विश्वास मनुष्याला सनातन विचाराच्या चौकटीत मिळतो. पुनर्जन्म न मानता कर्मविपाकाचा विचार केला तर असा विश्वास निर्माण होणे शक्य नाही. पाप-पुण्याचा विचार मनुष्याला कर्तव्य करण्यास भाग पाडतो आणि मनुष्य धार्मिक बनतो. मराठीत आपण सहज म्हणतो – ‘देह ठेवला’, ‘या जन्मी इतकंच...’ – यातून या जन्माचे सार्थक करून ईश्वरेच्छेनुसार पुढील जन्माची वाटचाल करण्यास तयार होणे हा एक परिपूर्ण विचार स्वीकारला जातो. शेवटी श्रीकृष्णार्पणमस्तु म्हणत प्रत्येक मनुष्य जन्मात मुक्तीची साधना करणे हा प्रगल्भ विचार मनुष्याला तारुन नेतो.

४. कर्मविपाक, पुनर्जन्म, पाप-पुण्य सिद्ध करता येत नाही म्हणून ही सर्व थोतांड आहे का?
आता पाप-पुण्याचा विषय सुरू झाला की लगेच, ‘ते कुठं जमा होतं’, ‘त्याचा हिशोब कोण ठेवतं’ वगैरे प्रश्न सुरू होतात. कारण आपण आपली अशी समजूत करून घेतो की जणू काही मासिक/वार्षिक जमा-खर्च ताळेबंदासारखा एखादा तक्ता आपल्याला ‘प्रत्यक्ष’पणे पाहायला, तपासायला मिळेल आणि या एकमेव निकषावर जर कर्म विपाक सिद्धांत खरा ठरला तरच तो खरा, नाहितर थोतांड म्हणायला आम्ही मोकळे! तसंच पुनर्जन्माचा ‘प्रत्यक्ष’ पुरावा काय? कोणत्या जन्मातल्या कोणत्या कृत्याची मला सजा मिळते आहे? याला तार्किक प्रमाण काय? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात.

थोडा विचार केला तर, ‘प्रत्यक्ष’ प्रमाण हे काही भरवशाचे (reliable) प्रमाण नाही आणि आपण सर्व गोष्टी ‘प्रत्यक्ष’ प्रमाणाने मान्य करतो असेही नाही हे सहज समजण्यासारखे आहे. आयुष्यभर आपण ज्यांना आपले आई-वडील म्हणतो, त्यात आपल्या कडे कोणता असा प्रत्यक्ष पुरावा असतो? दोन व्यक्ति लहानपणापासून आपल्यावर प्रेम करतात, आजू-बाजूचे लोक वेगवेगळी कौटुंबिक नाती जोडतात, आपल्याला त्यांची सवय होते. थोडं कळायला लागल्यावर आपल्याला समजते की आपली जन्म तारीख – जन्म वेळ अमुक-अमुक आहे आणि याचं ‘प्रमाण’ म्हणजे आपला जन्माचा दाखला! जो दाखला पालिकेच्या कुणी एका क्लार्क ने कुण्या डॉक्टर-नर्स च्या सांगण्यावरून बनवलेला असतो, ज्याला आपण ओळखत नसतो. स्वत:चा जन्म याच आई-बापाच्या पोटी झाला याचा प्रत्यक्ष पुरावा आपल्या कडे नसतो. पण व्यवहारात याने काही फरक पडत नाही. आई-बापाचं निर्व्याज प्रेम आणि कुटुंबाची मायेची ओढ यातून आपल्याला आपण कुटुंबाचा भाग आहोत ही ‘समज’ आपल्याला असते आणि ती पुरेशी असते. व्यवहारात आपण आपल्या आई-वडिलांची काळजी घेतो आणि वडिलोपार्जित संपत्तीचा उपभोग घेतो. आपण याच आई-बापाच्या पोटी जन्मलो याचा ‘प्रत्यक्ष’ पुरावा आपल्या कडे नसतानाही आपलं आयुष्य सुरू असतं कारण ‘हेच माझे आई-वडील याचं ज्ञान स्वस्थापित असते’, त्याला दुसऱ्या ‘प्रमाणा’ची गरज नसते. याचा अर्थ एव्हढाच की, ‘प्रत्यक्ष’ प्रमाण हे परिपूर्ण प्रमाण नाही आणि त्याचा हट्ट धरणे म्हणजे कोणत्याही विषयाचे क्षुल्लकीकरण करणे.

गीतेत भगवंत म्हणतो - यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः । न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम्‌ ॥ १६-२३ ॥तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ । ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि ॥ १६-२४ ॥, अर्थात, ‘जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसे वागतो, त्याला सिद्धी मिळत नाही, परम गती मिळत नाही आणि सुखही मिळत नाही. म्हणून तुला कर्तव्य आणि अकर्तव्य यांची व्यवस्था लावण्यात शास्त्रच प्रमाण आहे, असे जाणून तू शास्त्रविधीने नेमलेले कर्मच करणे योग्य आहे.’

इतिश्री ॐ नमो नारायणाय

प्रतिक्रिया

अहिरावण's picture

7 Mar 2024 - 10:50 am | अहिरावण

#पिटेगासाला

कॉमी's picture

7 Mar 2024 - 11:14 am | कॉमी

वैज्ञानिक विचार (scientific temperament) हा आधुनिकतेचा एक विशिष्ट वरकरणी देखावा असावा अशी सध्याची अवस्था आहे. यातून परंपरेतून आलेल्या सर्व गोष्टींना कचऱ्याची टोपली दाखवायची सोय होते. कोणत्याही मुद्द्याला ‘सायंटिफिकली सिद्ध करा’ असा पवित्रा घेता येतो पण खरा उद्देश युरोपियन विचारानुसार जे सायन्स निर्माण झालं आहे त्यातल्या कुणी याला सिद्ध केलं आहे का हे शोधणे हा हेतू असतो.

नाही. वैज्ञानिक पुरावा हवा असे काही नाही. Any proof. कोणत्याही प्रकारे कर्म फल, संचित वैगरे काल्पनिक गोष्टींचा पुरावा दाखवा. तसे म्हणाल्यावर तुम्हीच काय उत्तर दिले आहे बघा -

थोडा विचार केला तर, ‘प्रत्यक्ष’ प्रमाण हे काही भरवशाचे (reliable) प्रमाण नाही आणि आपण सर्व गोष्टी ‘प्रत्यक्ष’ प्रमाणाने मान्य करतो असेही नाही हे सहज समजण्यासारखे आहे. आयुष्यभर आपण ज्यांना आपले आई-वडील म्हणतो, त्यात आपल्या कडे कोणता असा प्रत्यक्ष पुरावा असतो? दोन व्यक्ति लहानपणापासून आपल्यावर प्रेम करतात, आजू-बाजूचे लोक वेगवेगळी कौटुंबिक नाती जोडतात, आपल्याला त्यांची सवय होते. थोडं कळायला लागल्यावर आपल्याला समजते की आपली जन्म तारीख – जन्म वेळ अमुक-अमुक आहे आणि याचं ‘प्रमाण’ म्हणजे आपला जन्माचा दाखला! जो दाखला पालिकेच्या कुणी एका क्लार्क ने कुण्या डॉक्टर-नर्स च्या सांगण्यावरून बनवलेला असतो, ज्याला आपण ओळखत नसतो. स्वत:चा जन्म याच आई-बापाच्या पोटी झाला याचा प्रत्यक्ष पुरावा आपल्या कडे नसतो.

असे भ्रामक उत्तर दिले जाते. माझे आई वडील माझे आई वडील आहेत हे मला माहिती आहे कारण
-१. जन्माचा दाखला
२. मी इतर मुलांचा जन्म होताना बघतो, आणि त्यांचे जन्माचे दाखले तयार होताना बघतो. त्यावरून मला माहिती आहे की पालिकेच्या क्लार्क ने केलेला दाखला विश्वसनीय आहे.
३.जनुकीय चाचणी मी मला शंका असल्यास करू शकतो. थोडक्यात हा तपसण्यायोग्य आणि खोटे सिद्ध होऊ शकेल असा दावा आहे. (Falsifiable)
आणि "प्रत्यक्ष पुरावा" म्हणजे काय तुमचे तुम्हाला माहित. कर्म संचीताला प्रत्यक्ष काय, कसलाच पुरावा नाही.
कर्म आणि संचित सगळे ढगावर बांधलेले मनोरे आहेत.काडीचाही पुरावा नाही. खेरीज, सगळे काल्पनिक आहे आणि unfalsifiable पण आहे. Unfalsifiable म्हणजे क्लेम असा करायचा की तपासायला आणि खोटे पाडायला काही मार्गच राहणार नाही. सगळे काल्पनिक, न तपासता येण्याजोगे.ज

‘हेच माझे आई-वडील याचं ज्ञान स्वस्थापित असते’, त्याला दुसऱ्या ‘प्रमाणा’ची गरज नसते.

उद्या कोणी मुकेश अंबानी गेले की अनंत दादांकडे जाऊन त्यांच्या संपत्तीतला हिस्सा मागतील. पुरावा ? अहो हे ज्ञान माझे माझ्यात सत्यापित आहे, काय पुरावा आणि कसले काय.
खोखोखोखो. अश्या वेळेस बरोब्बर काय पुरावा लागेल आणि का लागेल सगळे सुचेल. तोवर काल्पनिक मुद्दे सिद्ध करायला सगळे ढगात चालते, खऱ्या आयुष्यात मात्र पुरावे लागतातच.

कर्मविपाकातून वर्णव्यवस्थेचा पुरस्कार आणि सामाजिक न्याय हा तर म्हणजे भलताच बहकलेला विषय आहे. त्यावर वेगळे लिहावे लागेल.

अजिबात बहकलेला विषय नाहीये. श्रीकृष्ण खुद्द गीतेत स्त्रिया, शूद्र आणि वैश्य ह्यांना पापयोनी, अर्थात, ज्यांच्या जन्माचे कारण पाप आहे, असे म्हणतो. गीतेवरील आदी शंकराचार्यांचे भाष्य वाचा. त्यात ते स्पष्टपणे कर्म संचित कसे ह्या जनमीच्या वर्णामागे आहे सांगतात. पुरिचे शंकराचार्य थेट जन्माधारित जाती आणि वर्ण व्यवस्थेचा पुरस्कार करतात, ह्याच काल्पनिक संचिताचा आधारावर. धर्मग्रंथांमध्ये वर्णव्यवस्था ही काल्पनिक, न मोजता येणारे गुण (सत्व, तम आणि रज)- जे प्राकृतिक, जन्मतः असतात - ते आणि मागल्या जन्माचे कर्म, पूर्वसंचित हे वर्ण ठरवतात. गुण सुध्दा न मोजता येणारे (काल्पनिक) आणि पुनर्जन्म सुद्धा काल्पनिक. त्यामुळे कृपया बहकलेला विषय वैगरे लिहून gaslighting करू नका. Be honest.

आता पाप-पुण्याचा विषय सुरू झाला की लगेच, ‘ते कुठं जमा होतं’, ‘त्याचा हिशोब कोण ठेवतं’ वगैरे प्रश्न सुरू होतात. कारण आपण आपली अशी समजूत करून घेतो की जणू काही मासिक/वार्षिक जमा-खर्च ताळेबंदासारखा एखादा तक्ता आपल्याला ‘प्रत्यक्ष’पणे पाहायला, तपासायला मिळेल आणि या एकमेव निकषावर जर कर्म विपाक सिद्धांत खरा ठरला तरच तो खरा, नाहितर थोतांड म्हणायला आम्ही मोकळे!

अर्थातच ! हे सगळे अत्यंत valid प्रश्न आहेत. संचित इत्यादी जर क्लेम असतील तर हे प्रश्न येणारच.

‘कर्मविपाक सिद्धांत आणि त्या अनुषंगाने पुनर्जन्म, पाप-पुण्य हे विषय केवळ मोजमाप करून सिद्ध करू म्हटले तर सिद्ध करता येत नाहीत किंवा नाकारू म्हटले तर नाकारताही येत नाहीत.’ हे मीच मूळ लेखात मांडलेले आहे. तुम्ही ज्याला unfalsifiable म्हणता तेच. पण ‘कर्मविपाक, पुनर्जन्म, पाप-पुण्य सिद्ध करता येत नाही’ म्हणून त्याचा उपयोग नाही हा विचार चुकीचा आहे हा मूळ मुद्दा आहे. तसेच कर्म फल, संचित-प्रारब्ध, त्रिगुण याला ‘पुरावे’ मागणे ही पद्धत सुद्धा चुकीची आहे. यातून मनुष्याच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी फायदा होत नाही उलट आडकाठी होते हे समजणे महत्वाचे आहे. सुख-दु;ख हे बऱ्याच प्रमाणात वैयक्तिक स्वरूपात असते त्यामुळे त्यातून मनुष्य आपल्या आयुष्याचा अर्थ कसा काढतो आणि त्यात सनातन विचार मदत करतो की नाही हे समजून घेणे महत्वाचे आहे. कर्मविपाक, पुनर्जन्म, पाप-पुण्य या गोष्टी काल्पनिक आहेत ही म्हणणे जितके चूक आहे तितकेच यांच्या आड लपून कर्मठ पणा करणे हेही चुकच!

कर्मविपाक का महत्वाचा आहे हे पुन्हा सांगतो - सनातन विचाराच्या चौकटीत कर्म विपाक, पुनर्जन्म आणि पाप-पुण्य मनुष्याला जबाबदार (accountable) बनवतात. यातून दुर्दैवी, दुर्धर आणि दु:खी परिस्थिती बदलत नाही पण मनुष्याला स्थिरचित्त राहून संकटाला सामोरे जाण्याचे बळ देतो. कर्मविपाक हा सर्वांना एकसारखा लागू होतो. आणि त्यामुळे न्याय्य आहे. हा विश्वास मनुष्याला सनातन विचाराच्या चौकटीत मिळतो. पुनर्जन्म न मानता कर्मविपाकाचा विचार केला तर असा विश्वास निर्माण होणे शक्य नाही. पाप-पुण्याचा विचार मनुष्याला कर्तव्य करण्यास भाग पाडतो आणि मनुष्य धार्मिक बनतो. धार्मिक मनुष्य कुटुंबाला आणि समाजाला हवा असतो कारण त्यातूनच कुटुंबाची आणि समाजाची सकस वृद्धी होते याची प्रचिती येत असल्यामुळे सनातन धर्मातली ही मूल्ये आजही उपयुक्त आहेत.

प्रत्यक्ष पुरावा म्हणजे – मनुष्य आपल्या पाच इंद्रियांद्वारे जे ज्ञान मिळवतो ते direct perception.
धूर दिसत असेल तर अग्नि असला पाहजे – याला ‘अनुमान’ – inference म्हणतात.

‘जन्माचे दाखले पाहता येतात’ म्हणजे ते दाखले तयार करणाऱ्या process/method वर विश्वास आहे आणि कागदावर लिहिलेल्या शब्दावर विश्वास आहे तर हजारो-शेकडो वर्षापासुन जे परंपरेने चालत आले आहे त्याचे का वावडे असावे. शेवटी सनातन परांपरेतही संत-ज्ञानी मंडळींनी स्व-अनुभूती घेवून लिखाण केलेलंच आहे. स्व-अनुभूतीच्या process/method ही सर्वांना शिकता/शिकवता येतेच. त्याचा वापर करावा आणि स्वत: अनुभूती घ्यावी. परंपरेतल्या संकल्पना परंपरेबाहेर राहून नाकारणे ही चूक आहे.

‘श्रीकृष्ण खुद्द गीतेत स्त्रिया, शूद्र आणि वैश्य ह्यांना पापयोनी, अर्थात, ज्यांच्या जन्माचे कारण पाप आहे, असे म्हणतो.’
अहो सर्व सजीवांचा जन्म काहीनाकाही पाप शिल्लक आहे म्हणूनच होतो हेच तर कर्मविपाक सांगतोय, ज्यावर आपण चर्चा करतोय. त्यामुळे पाप हा मुद्दा नाही. तुम्हाला वर्णव्यवस्था अन्यायकारक वाटते आणि अन्यायकारक बनलेली व्यवस्था श्रीकृष्णाने गीतेत सांगितली हा तुमचा मुद्दा आहे. त्यासाठी तुम्ही शंकराचार्यांचे दाखले देत आहात. हा युक्तिवाद अपेक्षित होता म्हणूनच त्यावर वेगळं लिहून चर्चा करावी लागेल असं मी आधीच लिहिलं. ते मी जेंव्हा लिहीन तेंव्हा लिहीन पण सध्या ही काही उदाहरणे पहा.
१. हिंदू धर्माचे पवित्र ग्रंथ – वेद-उपनिषदे-महाभारत-पुराणे लिहिण्याचा/संकलित करण्याचे कार्य वेद व्यासांनी केले हे सनातन परंपरा सांगते. रामायण वाल्मिकीने लिहिले असं सांगते. वेद व्यास आणि वाल्मिकी हे वर्णव्यवस्थेनुसार जन्माने कुठं ‘ब्राहमण’ होते. वेदव्यास मत्स्यगंधेच्या – जिचा वर्ण काढायचा तर तो शूद्र ठरतो – पोटी जन्मले आणि वाल्मिकी यांचा वर्ण काढायचा तर तो शूद्र ठरतो. व्यास आणि वाल्मिकी जर वर्णांने ‘ब्राहमण’ नाहीत म्हणून वजा केले तर हिंदू धर्मात काय शिल्लक राहिल?
२. भागवत पुराणात जेंव्हा कृष्ण द्वारकेला परत जाण्याचे ठरवतो तेंव्हा त्याने आपल्याला सोडून जावू नये म्हणून महाराणी कुंती जे विवेचन करते त्यात उपनिषदांचे आणि भक्तीचे सर्व सार आहे. महाराणी कुंती स्त्री आहे आणि विधवा देखील...
३. महाभारत आणि भागवत पुराण या दोन्ही कथा उग्रश्रवस नावाचा सूत करतो अशा महाभारत आणि भागवत पुराणातच नोंदी आहेत. शौनक ऋषी जे वर्णाने ‘ब्राहमण’ आहेत, ते या सूताला विनंती करतात की, ‘तूच आम्हाला श्रीकृष्णाची कथा ऐकव.’ हा उगरश्रवस सूत वर्णांने ब्राहमण’ नाही तर शूद्र आहे.
४. छांदोग्य उपनिषदात असलेला रैक्व जो जनश्रुति नामक राजाला ब्रह्मज्ञान देतो तो वर्णांने ब्राहमण’ नाही. तो रैक्व वर्णांने ‘ब्राहमण’ नाही तर शूद्र आहे.
५. आदि शंकराचार्य आणि मंडणमिश्र यांच्या वादाचा निर्णय देणारी देवी भारती ही स्त्री आहे आणि मंडणमिश्र यांची पत्नी आहे. या दोन महान तत्वज्ञांच्या चर्चेत निर्णय घेण्याचा मान असलेली स्त्री ज्ञानी होतीच. पापयोनि म्हणून तिची हेटाळणी कुणीही केलेली नाही.
६. बृहदारण्यक उपनिषदात याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्रेयी जे प्रश्न विचारते त्याला उत्तर म्हणून याज्ञवल्क्य ऋषी ब्रह्मज्ञानाची चर्चा करतात. असे मूलगामी प्रश्न विचारणारी मैत्रेयी ज्ञानी होतीच. केवळ स्त्री म्हणून तिची उपेक्षा केली गेली नाही.
७. महाभारतात महात्मा विदुर त्यांच्या विदुर नीती साठी प्रसिद्ध आहेत. दुर्योधन विदुरांचा सूतपुत्र म्हणून अपमान करतो, तेंव्हा महात्मा विदुर जे मत व्यक्त करतात आणि वागतात त्यावरून त्यांणा धर्माची किती सूक्ष्म जाणीव होती हे लक्षात येते. विदुर वर्णांने ‘ब्राहमण’ नाहीत.

त्यामुळे सरसकट स्त्रिया आणि शूद्र यांच्या आड लपून वर्णव्यवस्थेच्या नावाखाली सनातन धर्म बदनाम करू नये हा मूळ मुद्दा आहे. याचा अर्थ हिंदू धर्मात दोष नव्हते आणि शोषण झाले नाही असा नाही. दोष निर्माण झालेच पण सनातन परंपरेने ते दूर केले आणि पुढेही ही परंपरा अशीच सुरू राहिल हे समजून घेणे महत्वाचे आहे. दोष निर्माण झाले म्हणून सनातन धर्म cancel करण्याचा प्रयत्न वैज्ञानिक-आधुनिक-सामाजिक न्याय या नावाखाली होतो त्याला विरोधे केला पाहिजे. जे दोष आहेत ते परांपरेतून आलेल्या विचारांचा वापर करूनच संपवले पाहिजेत कारण हीच सनातन धर्माची मूळ ओळख आहे.

‘कर्मविपाक सिद्धांत आणि त्या अनुषंगाने पुनर्जन्म, पाप-पुण्य हे विषय केवळ मोजमाप करून सिद्ध करू म्हटले तर सिद्ध करता येत नाहीत किंवा नाकारू म्हटले तर नाकारताही येत नाहीत.’ हे मीच मूळ लेखात मांडलेले आहे. तुम्ही ज्याला unfalsifiable म्हणता तेच. पण ‘कर्मविपाक, पुनर्जन्म, पाप-पुण्य सिद्ध करता येत नाही’ म्हणून त्याचा उपयोग नाही हा विचार चुकीचा आहे हा मूळ मुद्दा आहे. तसेच कर्म फल, संचित-प्रारब्ध, त्रिगुण याला ‘पुरावे’ मागणे ही पद्धत सुद्धा चुकीची आहे. यातून मनुष्याच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी फायदा होत नाही उलट आडकाठी होते हे समजणे महत्वाचे आहे. सुख-दु;ख हे बऱ्याच प्रमाणात वैयक्तिक स्वरूपात असते त्यामुळे त्यातून मनुष्य आपल्या आयुष्याचा अर्थ कसा काढतो आणि त्यात सनातन विचार मदत करतो की नाही हे समजून घेणे महत्वाचे आहे. कर्मविपाक, पुनर्जन्म, पाप-पुण्य या गोष्टी काल्पनिक आहेत ही म्हणणे जितके चूक आहे तितकेच यांच्या आड लपून कर्मठ पणा करणे हेही चुकच!

मग बेसिस काय राहिला तुमच्या दृष्टिकोनातून ? कशावरही विश्वास ठेवायचा का, जर पुराव्यांची गरजच नाही ? आध्यात्मिक बाबींमध्ये सगळे अधांतरी चालते का ? आणि काल्पनिक म्हणणे चूक कसे ? ज्या गोष्टींचा पुरावा नाही त्या गोष्टी काल्पनिक नाहीत का ?

कर्मविपाक का महत्वाचा आहे हे पुन्हा सांगतो - सनातन विचाराच्या चौकटीत कर्म विपाक, पुनर्जन्म आणि पाप-पुण्य मनुष्याला जबाबदार (accountable) बनवतात. यातून दुर्दैवी, दुर्धर आणि दु:खी परिस्थिती बदलत नाही पण मनुष्याला स्थिरचित्त राहून संकटाला सामोरे जाण्याचे बळ देतो. कर्मविपाक हा सर्वांना एकसारखा लागू होतो. आणि त्यामुळे न्याय्य आहे. हा विश्वास मनुष्याला सनातन विचाराच्या चौकटीत मिळतो. पुनर्जन्म न मानता कर्मविपाकाचा विचार केला तर असा विश्वास निर्माण होणे शक्य नाही. पाप-पुण्याचा विचार मनुष्याला कर्तव्य करण्यास भाग पाडतो आणि मनुष्य धार्मिक बनतो. धार्मिक मनुष्य कुटुंबाला आणि समाजाला हवा असतो कारण त्यातूनच कुटुंबाची आणि समाजाची सकस वृद्धी होते याची प्रचिती येत असल्यामुळे सनातन धर्मातली ही मूल्ये आजही उपयुक्त आहेत.

ऑन द फ्लिप साइड जी सद्य परिस्थिती आहे ती सर्व न्याय्यच आहे असे ही थियरी सांगते, जसे मी मागे effecient market theory चे उदाहरण देत मांडले होते . कोणाला सामाजिक उणीवांमुळे तयार झालेली परिस्थिती ही तुमच्याच काल्पनिक संचितांमुळे झाली असे सांगणे चुकीचे आहे. परिस्थिती बदलता येत नाही, आपले सर्वोत्तम प्रयत्न करा असे सांगण्यासाठी "तुमची जन्मतः परिस्थिती तुमच्याच कर्माचे फळ आहे" असे सांगणे चुकीचे आहे,आणि गरजेचे सुद्धा नाही. आणि ह्या काल्पनिक संचितांचा वापर असलेल्या सामाजिक उणीवा तश्याच ठेवायसाठी होतो. आणि, कर्मसंचित थियरी नुसार शेवटी हा वैश्विक न्याय आहे. त्यात ढवळाढवळ करणारे बाकीचे कोण ?
बाकी सकस वृद्धी म्हणजे काय आणि कोणत्या धार्मिक समाजाची अशी सकस वृद्धी आजवर झाली आहे ? कर्मसंचितांच्या accountability मुळे गुन्ह्यांचे प्रमाण घटले का, अश्या विश्वास जास्तीत जास्त असणाऱ्या प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था सर्वोत्तम होती का, आहे का ? नाही, तसा काही स्पेशल इफेक्ट दिसत नाही. त्यामुळे पुनर्जन्म, संचित ह्यांवर इतका विश्वास असूनही अशी काही वेगळी सामाजिक accountability तयार झाली असे सुद्धा म्हणता येणार नाही.

‘जन्माचे दाखले पाहता येतात’ म्हणजे ते दाखले तयार करणाऱ्या process/method वर विश्वास आहे आणि कागदावर लिहिलेल्या शब्दावर विश्वास आहे तर हजारो-शेकडो वर्षापासुन जे परंपरेने चालत आले आहे त्याचे का वावडे असावे. शेवटी सनातन परांपरेतही संत-ज्ञानी मंडळींनी स्व-अनुभूती घेवून लिखाण केलेलंच आहे. स्व-अनुभूतीच्या process/method ही सर्वांना शिकता/शिकवता येतेच. त्याचा वापर करावा आणि स्वत: अनुभूती घ्यावी. परंपरेतल्या संकल्पना परंपरेबाहेर राहून नाकारणे ही चूक आहे.

दाखला लिहिण्याची प्रोसेस observable आहे. याउलट कर्मवीपाकाची प्रोसेस कशी होते, नोंदी कुठे होतात असे प्रश्नच चुकीचे आहे असे तुम्हीच म्हणता. हा स्पष्ट फरक आहे. बाकी, स्व अनुभूती ज्याने घेतली आहे त्याने विश्वास ठेवावा. असे किती आहेत ? त्यांना खरेच काही अनुभूती आली की नाही हे बाहेरचे तरी कसे सांगणार ? त्यामुळे त्यांची अनुभूती त्यांच्यापुरतीच. तुम्हाला अशी अनुभूती आली आहे का ? असल्यास तुम्ही अवश्य विश्वास ठेवावा. ज्यांना नाही आली त्यांनी काय बेसिस वर ठेवावा ?

जन्माधारीत वर्णव्यवस्था अन्यायकारकच आहे. व्यास, वाल्मिकी ही पात्रं ब्राम्हण नव्हती म्हणून व्यवस्था बदलत नाही. बाकी, ह्या दोहोन्च्या ब्राम्हण नसण्याबाबत शन्का आहे. कथेनुसार सत्यवती स्वतः राजाची आणि अप्सरेची मुलगी होती. शूद्र नाही. पराशर ब्राम्हण होतेच. व्यास जन्मतः तपोबल असलेले होते असे वर्णन आहे.
वाल्मिकी तर ब्राम्हणच होते. ते शूद्र होते ह्याला कसलाही आधार माझ्या वाचनात आला नाहीये. स्कंद पुराण, पद्म पुराण, विष्णु पुराण वाल्मिकी ब्राम्हण होते असेच म्हणते असे दिसते. खुद्द वाल्मिकी रामायणात तर वाल्मिकि स्वतःला १०वा प्रचेतस म्हणतात- प्रचेता (ब्रम्हाचा ?) दहावा मुलगा.

'मग बेसिस काय राहिला तुमच्या दृष्टिकोनातून ? कशावरही विश्वास ठेवायचा का, जर पुराव्यांची गरजच नाही ? '
पुन्हा सांगतो माझा मुद्दा. वेद, महाभारत, रामायण, उपनिषदं, पुराणं आणि विविध ग्रंथ हे हिस्टरी, भूगोल, समाजशास्त्र आणि कुठले कुठले आधुनिक सायन्स ची पुस्तके वाचल्यासारखे वाचल्यामुळे सनातन धर्माकडे fact वा fiction असा प्रश्न निर्माण होतो. माझा मुद्दा आहे की, वेद ही हिस्ट्री आणि भूगोल नव्हेत. सनातन धर्माचे ध्येय मनुष्याने आपल्या आयुष्यात शांती आणि समाधान साधण्यासाठी मार्गदर्शन करणे हे आहे. शेकडो-हजारो वर्षांच्या स्वअनुभूतीच्या जोरावर आपल्या ऋषी, मुनी, गुरु आणि संत मंडळींनी यावर कार्य केलं आहे. हा भारतीय संस्कृतीचे फलित आहे. जगातल्या इतर कोणत्याही संस्कृतीत इतकी दीर्घकालीन वैचारिक उत्क्रांती झालेली नाही. ४०० वर्षांपासून जे आधुनिक ज्ञान निर्माण झाले आहे ते या संस्कृतीने नाकारलेले नाही. त्यातून परंपरेने शिकवलेला ‘समन्वय’ करण्याचा मार्ग इथेही अवलंबला जात आहे. ‘धर्म व मोक्ष यांच्या चौकटीत अर्थ आणि काम साध्य करणे’, हा मूळ गाभा न बदलता नवे ज्ञान परंपरेशी जुळवून घेत सनातन संस्कृती नित्यनूतन होत आहे. सनातन चा अर्थच नित्यनूतन असा आहे. त्यामुळे fact किंवा fiction यांच्या पलीकडे जावून सनातन विचार पुन्हा समजून घ्यावा लागतो. आता पलीकडे म्हणजे काय? ‘वेद वाक्याची गुरुने शिकवलेल्या युक्तीने (साधन मार्गाने) स्वत:साठी अनुभूती निर्माण करणे’, म्हणजे ‘श्रद्धेने’ सनातन धर्माच्या मार्गावर चालणे. यात मार्गात जर प्रश निर्माण झाले तर ते परंपरेची साधने वापरूनच त्यातून मार्ग काढणे.

'आध्यात्मिक बाबींमध्ये सगळे अधांतरी चालते का ? आणि काल्पनिक म्हणणे चूक कसे ? ज्या गोष्टींचा पुरावा नाही त्या गोष्टी काल्पनिक नाहीत का ?'
काही अधांतरी चालत नाही. व्यवस्थित मार्ग पद्धती आहेत, ज्या सर्वांना accessible आहेत आणि या आध्यात्माच्या मार्गाने कित्येक हिंदूना शांती आणि समाधान मिळत आहे म्हणूनच शेकडो-हजारो वर्षे हा धर्म टिकला आणि वाढला. पुढेही हेच होईल.

'ऑन द फ्लिप साइड जी सद्य परिस्थिती आहे ती सर्व न्याय्यच आहे असे ही थियरी सांगते, जसे मी मागे effecient market theory चे उदाहरण देत मांडले होते . कोणाला सामाजिक उणीवांमुळे तयार झालेली परिस्थिती ही तुमच्याच काल्पनिक संचितांमुळे झाली असे सांगणे चुकीचे आहे. परिस्थिती बदलता येत नाही, आपले सर्वोत्तम प्रयत्न करा असे सांगण्यासाठी "तुमची जन्मतः परिस्थिती तुमच्याच कर्माचे फळ आहे" असे सांगणे चुकीचे आहे,आणि गरजेचे सुद्धा नाही. आणि ह्या काल्पनिक संचितांचा वापर असलेल्या सामाजिक उणीवा तश्याच ठेवायसाठी होतो. आणि, कर्मसंचित थियरी नुसार शेवटी हा वैश्विक न्याय आहे. त्यात ढवळाढवळ करणारे बाकीचे कोण ?'
कर्मविपाकात कर्म स्वातंत्र्य आहेच. अहो त्याशिवाय का कोणी दुर्योधन बनतो आणि कोणी अर्जुन बनतो. मनुष्यच धार्मिक अथवा अधार्मिक कृत्य निवडतो म्हणूनच कर्मफलाची चर्चा करावी लागते.

'दाखला लिहिण्याची प्रोसेस observable आहे. याउलट कर्मवीपाकाची प्रोसेस कशी होते, नोंदी कुठे होतात असे प्रश्नच चुकीचे आहे असे तुम्हीच म्हणता. हा स्पष्ट फरक आहे. बाकी, स्व अनुभूती ज्याने घेतली आहे त्याने विश्वास ठेवावा. असे किती आहेत ? त्यांना खरेच काही अनुभूती आली की नाही हे बाहेरचे तरी कसे सांगणार ? त्यामुळे त्यांची अनुभूती त्यांच्यापुरतीच. तुम्हाला अशी अनुभूती आली आहे का ? असल्यास तुम्ही अवश्य विश्वास ठेवावा. ज्यांना नाही आली त्यांनी काय बेसिस वर ठेवावा ?'
समजा तुम्ही कॉलेज मध्ये शिकत आहात आणि अकाऊंटिंग हा विषयाचा अगदी पहिलं लेक्चर सुरू झालंय. प्रोफेसर शिकवायला सुरुवात करणार तेव्हढयात तुम्ही उठून ‘याला पुरावा काय, ही सगळं काल्पनिक आहे’ असा दंगा घालून वर्ग सोडून जात नाही. का जात नाही? तर, शिकवणारे प्रोफेसर, त्यांनी घेतलेलं पुस्तक यावर तुमची ‘श्रद्धा’ यासाठी असते. ती ‘श्रद्धा’ असती ती ही की – पुस्तकात लिहिलेलं ज्ञान अकाऊंटिंगचं आहे, समोर असलेले प्रोफेसर या विषयात निष्णात आहेत आणि सर्वात महत्वाचे – जर मी प्रोफेसर जे शिकवतायंत ते व्यवस्थित शिकलो तर मलाही अकाऊंटिंग हा विषय समजू शकतो हे मनाशी ठरवून तुम्ही जेंव्हा शिकता तेंव्हा एके दिवशी बॅलेन्सशीट टॅली होते आणि तुम्हाला अकाऊंटिंग हा विषय समजायला लागतो. याला म्हणतात, trust pending verification म्हणजे श्रद्धा. शिकवण्याची पद्धत ज्यांनी बनवली त्यांना हा विषय समजलेला होता म्हणूनच ते शिकवू शकले आणि तुमच्या श्रद्धा असेल तर तुम्ही शिकू शकाल. तर अनुभूती आल्यावर मी विश्वास ठेवीन हे चूक, मी श्रद्धा ठेवली तर अनुभूती मिळेल हे बरोबर. रेने देकार्त म्हणाला होता ‘I think, there I am!’ पण खरं तर ‘I am, therefore I think!’
दुसरं म्हणजे पाण्यात पडला तरच मनुष्य पोहायला शिकतो, काठावरच बसून नुसतंच ‘मला मी पोहेन याचा पुरावा द्या’, म्हटलं तर असा मनुष्य कोरडाच राहणार आणि कधीच शिकणार नाही.

'जन्माधारीत वर्णव्यवस्था अन्यायकारकच आहे.'
यावर स्वतंत्र चर्चा करू. मी तुम्हाला इतकी उदाहरणं दिलीत ज्यांनी ‘पापयोनि’त जन्म घेतला पण त्यांच्या ज्ञानामुळे ते परंपरेला वंदनीयच आहेत.

तुम्ही फॅक्ट किंवा फिक्षन ह्यापालिकडे बघत असाल. पण एकंदर सामाजिक विश्वास पुनर्जन्म, संचित ह्या गोष्टींकडे fact म्हणून बघतात. अश्या वेळेस काय आधारावर fact समजता आहात हे विचारणे अत्यावश्यक आहे. वर्णव्यवस्था ही अध्यात्मिक नाही, तर १००% भौतिक आहे. ह्या सगळ्या चर्चा फक्त अध्यातमापुरत्या असत्या तर इतरांनी डोके घालण्याचे फारसे कारण उरले नसते.

अश्या वेळेस काय आधारावर fact समजता आहात हे विचारणे अत्यावश्यक आहे.

तुम्ही (वैयक्तिक नव्हे पण आधुनिक विचार या नावाखाली) ज्या पद्धतीने (method) fact मागता, त्याला विरोध आहे. आधुनिकतेच्या (modern) नावाखाली सश्रद्ध समाजाची परंपरेची समज fictional आहे अशी ज्यांची विचारसरणी आहे, त्यांच्यासाठी - 'फॅक्ट किंवा फिक्षन च्या पलीकडे हा विषय समजून घ्या', हे सांगणे आहे.

वर्णव्यवस्था ही अध्यात्मिक नाही, तर १००% भौतिक आहे. ह्या सगळ्या चर्चा फक्त अध्यातमापुरत्या असत्या तर इतरांनी डोके घालण्याचे फारसे कारण उरले नसते.

आध्यात्मिक आणि भौतिक हा फरक मूळ वर्णव्यवस्था या संकल्पनेत नाही. किंबहूना, भौतिक आयुष्यात श्रेयस आणि प्रेयस यांत योग्य मेळ घालून आध्यात्मिक प्रगती कशी साधावी यासाठी, वर्ण-कर्म-गुण या संकल्पना परंपरेनुसार शिकवल्या गेल्या पाहिजेत, म्हणजे सोशल जस्टीस च्या नावाखाली सनातन धर्माचे नुकसान करण्याचे प्रयत्न किती प्रमाणात होत आहेत हे समाजाला समजेल. हिंदू धर्मात आणि व्यवस्थेत दोष होते, आहेत आणि पुढे ही नवे प्रश्न निर्माण होतील तेंव्हा त्या अनुषंगाने नवे दोष दिसतीलच. जाती व्यवस्थेतून निर्माण झालेले शोषण हा दोष आहे आणि तो कोणीही नाकारत नाही. वाद आहे तो असे दोष कसे नष्ट करायचे या पद्धतीवर. आधुनिकतेच्या विचारानुसार हिंदू धर्मच नष्ट करा हा मार्ग प्रचलित झालेला आहे, त्याला विरोध करून परंपरेने शिकवलेल्या मार्गाने बदल करणे हा मार्ग प्रचलित करायला हवा हा मुद्दा आहे.

कंजूस's picture

7 Mar 2024 - 11:44 am | कंजूस

विपाक अनुभवाला येत नाही म्हणून प्रश्न पडतात.

आम्हाला विपाक अनुभवाला येतो म्हणून प्रश्न पडतात हे थांबवायचे कसे?

(शेवटी काय प्रश्न कुणालाच सुटत नाही. विपाक माना वा ना माना. फार प्रश्न पडतात तुला... पाखंडी आहेस. एका नाथपंथीयाने चिमटा मारु का असा अभिनय करुन म्हटले होते.)

नठ्यारा's picture

8 Mar 2024 - 12:04 am | नठ्यारा

अभिषेक,

मर्मग्राही लेखाबद्दल आभार. आता 'बाप स्त्रीसंग करतांना दिसला नाही, म्हणजे तो आपला बापंच नव्हे', असं तर्कटही रचणारे महाभाग आहेत. त्यांच्यासाठी हा लेख नाही.

-नाठाळ नठ्या

कॉमी,

तुमचा इथला संदेश वाचला. माझी मतं सांगतो.

१.

कशावरही विश्वास ठेवायचा का, जर पुराव्यांची गरजच नाही ? आध्यात्मिक बाबींमध्ये सगळे अधांतरी चालते का ?

तुम्हांस भूक लागलीये याचा पुरावा सादर करता येईल काय? अमुकेक स्वप्न पडल्याचा पुरावा दर वेळेस मिळतोच का? काही विशिष्ट प्रसंगीच मिळतो.

२.

.... काल्पनिक म्हणणे चूक कसे ? ज्या गोष्टींचा पुरावा नाही त्या गोष्टी काल्पनिक नाहीत का ?

इलेक्ट्रॉन अस्तित्वात आहे का? असल्यास कुठे आहे? त्याला वस्तुमान आहे का?

३.

कोणाला सामाजिक उणीवांमुळे तयार झालेली परिस्थिती ही तुमच्याच काल्पनिक संचितांमुळे झाली असे सांगणे चुकीचे आहे.

सामाजिक उणीव म्हणजे काय? आणि तिला उणीव का म्हणायचं? जरी ती संचितामुळे उत्पन्न झालेली असली, तरी ती बदलायचे मार्ग वेगळे असणारेत ना? उदाहरणार्थ अमुकेक सार्वजनिक ठिकाणी घाण पडलेली असते. ती तशी पडण्यापासून लोकांना परावृत्त करणे हा एक मार्ग झाला. झालेली घाण साफ करणे हा दुसरा मार्ग झाला. दोन्ही मार्ग परस्परपूरक आहेत. तद्वत परिस्थिती बदलण्यासाठी मानवी व दैवी दोन्ही प्रयत्न करावे लागतात. दैवी सहाय्य मिळवण्यासाठी कर्मसिद्धांताचा उपयोग केला तर काय बिघडलं?

४.

कर्मसंचित थियरी नुसार शेवटी हा वैश्विक न्याय आहे. त्यात ढवळाढवळ करणारे बाकीचे कोण ?

ज्याला तुम्ही कर्मसंचित थियरी म्हणता त्यास कर्मसिद्धांत असं अधिकृत नाव आहे. त्यानुसार मनुष्यास क्रियमाण हे ही उपलब्ध आहे. क्रियमाण म्हणजे इंग्रजीत Free Will. हे क्रियमाण वापरून कर्मे करायची असतात व ती करतांना फलाशा ठेवायची नसते. अनासक्त सेवाभावाने की कर्मे करायची असतात. कर्मसिद्धांतानुसार वागणे म्हणजे आळशासारखे बसून राहणे नव्हे. क्रियामाणाचा सुयोग्य विनियोग ही फार मोठी जबाबदारी कर्मसिद्धांताने माणसावर टाकलेली आहे.

५.

बाकी सकस वृद्धी म्हणजे काय आणि कोणत्या धार्मिक समाजाची अशी सकस वृद्धी आजवर झाली आहे ?

भारतावर राज्य करण्यासाठी अतोनात बुद्धिवान अशा इंग्रजी युवांची गरज आहे असं दस्तुरखुद्द मेकॉले म्हणतोय. ही निकड दर्शवण्यासाठी त्याच्याच शब्दांत केलेलं भारतीय समाजाचं वर्णन : .... the average of intelligence and virtue is very high in this country, ....

संदर्भ : https://hansard.parliament.uk/Commons/1833-07-10/debates/bf333819-5f71-4...

आजूनेक संदर्भ : https://nla.gov.au/nla.obj-447061304/image?WID=792

सकस वृद्धी म्हणजे काय यावर मी सध्यातरी इतकंच सांगू शकतो.

६.

कर्मसंचितांच्या accountability मुळे गुन्ह्यांचे प्रमाण घटले का, अश्या विश्वास जास्तीत जास्त असणाऱ्या प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था सर्वोत्तम होती का, आहे का ? नाही, तसा काही स्पेशल इफेक्ट दिसत नाही.

कर्तव्याचं भान येणे म्हणजे गुन्हा टळणे नव्हे. ते गुन्ह्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे.

७.

यामुळे पुनर्जन्म, संचित ह्यांवर इतका विश्वास असूनही अशी काही वेगळी सामाजिक accountability तयार झाली असे सुद्धा म्हणता येणार नाही.

सामाजिक आणि वैयक्तिक कर्तव्यभान वेगवेगळे असतात. एकाची फुटपट्टी दुसऱ्यास कशी चालावी ? मात्र असं असलं तरीही तुमचा मुद्दा बिनतोड आहे. वैयक्तिक सद्गुणांचं प्रतिबिंब सामाजिक सद्गुणांत का दिसंत नाही. माझ्या मते भ्रष्ट शासन हे एक कारण आहे.

८.

दाखला लिहिण्याची प्रोसेस observable आहे.

इलेक्ट्रॉन निरीक्षणीय नाही. तरीपण विद्युतप्रवाह कसा वाहतो बरे?

९.

तुम्हाला अशी अनुभूती आली आहे का ? असल्यास तुम्ही अवश्य विश्वास ठेवावा. ज्यांना नाही आली त्यांनी काय बेसिस वर ठेवावा ?

जग विश्वासावर चालतं. समजा तुमच्या पोटांत दुखतंय म्हणून तुम्ही डॉक्टराकडे गेलात. तुम्ही काय वा डॉक्टरांनी काय, तुमचे हृदय, फुफ्फुस, जठरादि अवयव प्रत्यक्षांत पाहिलेले नाहीत. तरीही तुम्ही डॉक्टरांवर विश्वास ठेऊन औषध घेता ना? दर वेळेस तुमच्या अंगाची कापाकापी करून प्रत्यक्ष अवयव बघून नंतरच निर्णय घ्यायचा का?

ज्याप्रमाणे तुम्ही डॉक्टरांवर विश्वास टाकता त्याप्रमाणे अध्यात्मिक उन्नतांवर विश्वास टाकून साधना करायची असते.

१०.

जन्माधारीत वर्णव्यवस्था अन्यायकारकच आहे.

आहेच मुळी. म्हणूनंच कर्मानुसार वर्ण पाडले आहेत.

११.

व्यास जन्मतः तपोबल असलेले होते असे वर्णन आहे.

करेक्ट. जरी ते कोळीणीचे अनौरस पुत्र असले तरी ते जन्मत:च तपोबलमंडित होते. आपलं तपोबल त्यांनी जगाला दाखवलं म्हणूनंच त्यांच्या जन्माचे दाखले कोणी मागितले नाहीत.

असो.

तुमची एकंदरीत भाष्यं वाचली की वाटतं की तुमच्यावर जन्मामुळे अन्याय झालाय. तसंही पाहता जन्मास येणे हा सृष्टीने जिवावर केलेला एक प्रकारचा अन्यायंच आहे. त्यामुळे तुम्हांस माझी पूर्ण सहानुभूती आहे. जरी तुम्हांस माझ्या सहानुभूतीची गरज नसली तरीही.

-नाठाळ नठ्या

कॉमी's picture

9 Mar 2024 - 8:19 am | कॉमी

तुम्हांस भूक लागलीये याचा पुरावा सादर करता येईल काय? अमुकेक स्वप्न पडल्याचा पुरावा दर वेळेस मिळतोच का? काही विशिष्ट प्रसंगीच मिळतो.

सर्वांनी भूक ह्या संकल्पनेचा अनुभव घेतला आहे. आपण भूक कशी लागते हे तपासू शकतो. झालेच तर शरीराच्या विविध रासायनिक पातळींशी संबंध जोडून भुकेचा पुरावा सदर केला जाऊ शकतो. कोणीही संचित ह्या मेकानिझमला तपासू शकत नाही. कोणीही संचिताचा वेगळा अनुभव असा घेतला नाही, उलट लॉजिक असल्याने जो काही अनुभव आला तोच संचीतामुळे असे दाबून म्हणायचे इतकेच.

इलेक्ट्रॉन अस्तित्वात आहे का? असल्यास कुठे आहे? त्याला वस्तुमान आहे का?

इथे अवांतर करण्याची इच्छा नाही. तुम्हाला इलेक्ट्रॉन काल्पनिक मानायचे असल्यास खुशाल माना.

सामाजिक उणीव म्हणजे काय? आणि तिला उणीव का म्हणायचं?

सामाजिक आणि उणीव हे दोन शब्द माहीत असल्यास सामाजिक उणीव ही संज्ञा स्वयंस्पष्ट आहे असे वाटते. शब्द माहीत नसल्यास शब्दकोशात पहावेत. उदाहरण म्हणून - गरीबी, वर्णव्यवस्था/जातीव्यवस्था, गुलामगिरी इत्यादी. ह्या गोष्टी मानवी दुःखात भर घालतात म्हणून ह्यांना उणीव म्हणतो.

परिच्छेदाचा संदर्भ पाहता मेकॉले इंग्लंड बद्दल बोलत आहे. असो, मेकॉलेचे पासिंग मधले वाक्य तसेही पुरेसे काऊंटर अर्ग्यूमेंट नाहीये. त्यामुळे त्यावर चर्वितचर्वण करण्याची गरज वाटत नाही. तुम्ही नीट वाचून संदर्भ समजून घ्या.
तसेही, जरी संदर्भ बरोबर असता, तरी कोणी म्हणले म्हणून बाबा वाक्यम प्रमाणम असे चालत नाही.
(तुम्ही तर ह्या मेकॉलेला सारख्या शिव्या देत असता आणि आता त्याचाच संदर्भ देत आहात, हे कसे ?)

कर्तव्याचं भान येणे म्हणजे गुन्हा टळणे नव्हे. ते गुन्ह्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे.

मग काय उपयोग ? सगळे काल्पनिकच काय ? संचित काल्पनिक, उपयोग काल्पनिक, फक्त त्यावर खऱ्याखुऱ्या समाजरचना करायच्या काय ?

जग विश्वासावर चालतं. समजा तुमच्या पोटांत दुखतंय म्हणून तुम्ही डॉक्टराकडे गेलात. तुम्ही काय वा डॉक्टरांनी काय, तुमचे हृदय, फुफ्फुस, जठरादि अवयव प्रत्यक्षांत पाहिलेले नाहीत. तरीही तुम्ही डॉक्टरांवर विश्वास ठेऊन औषध घेता ना? दर वेळेस तुमच्या अंगाची कापाकापी करून प्रत्यक्ष अवयव बघून नंतरच निर्णय घ्यायचा का?

काहीही. ह्यात विश्वासाचे काही नाही. फुप्फुसाशिवाय किंवा यांत्रिक मदतीशिवाय कोणी जिवंत राहूच शकत नाही. काहीही उदाहरणे देऊ नका.

म्हणूनंच कर्मानुसार वर्ण पाडले आहेत.

चूक. गुण आणि कर्म(संचित) ह्यावरून वर्ण ठरतात. ह्यातले गुण (सत्व, तम, रज) आणि संचित दोन्ही काल्पनिक आहेत. त्यामुळे जन्मावरूनच.

तुमची एकंदरीत भाष्यं वाचली की वाटतं की तुमच्यावर जन्मामुळे अन्याय झालाय.

असे काही नाही. मी (जन्मापासून) चांगला टुणटुणीत आहे.

तसंही पाहता जन्मास येणे हा सृष्टीने जिवावर केलेला एक प्रकारचा अन्यायंच आहे.

जीव जन्माला येतो आणि मरतो. ह्या आधी किंवा नंतर जीवाचे अस्तित्व होते असे मानायला काहीही पुरावा नाही.

चित्रगुप्त's picture

9 Mar 2024 - 5:28 am | चित्रगुप्त

खरेतर इथल्या चर्चेचा विषय वेगळा आहे, परंतु 'पुरावा ग्राह्य धरणे' यावरचे माझे दोन अनुभव इथे लिहीतो:
१. गेले सहा-सात महिने माझ्या डाव्या पायाचा पोटरीकडील भाग दुखत होता. मुलगा फिजियोथेरपिस्ट असल्याने त्याने सांगितलेले व्यायाम -(त्यापैकी काही यूट्यूबवरील प्रसिद्ध तज्ञांनी सांगितलेले सुद्धा) करून काहीही फायदा झाला नाही. सुमारे एका आठवड्यापूर्वी झोपेतून जाग येता येता मला सहजच एक अतिशय सोपा व्यायाम (खरेतर अगदी साधी पायांची हालचाल) सुचला, आणि केवळ काही मिनिटे ते केल्यावर दुखणे बरे झाले. आता रोज आठवेल तेंव्हा मी दोन- तीन मिनीटे ती हालचाल करतो. दुखणे पूर्णपणे नाहीसे झालेले आहे.
२. दुसरा अनुभव म्हणजे काही वर्षांपूर्वी सुमारे एक आठवडा केवळ ताजा रस ( फळे आणि भाज्यांचा) घेऊन माझी मूळव्याध आणि फिस्टुला दोन्ही कायमची बरी झाली, तो अनुभव. (यावर मिपावर लिहीलेला लेख अनेकांनी वाचलाही असेल)
-- या दोन्हीबद्दल माझ्या वाचण्या-बघण्यात कधीही काहीही आलेले नाही, उदा. प्रत्यक्ष डॉक्टर किंवा ऋजुता दिवेकर, बाबा रामदेव, डॉ. एरिक बर्ग , बॉब अँड ब्रॅड, आणि अन्य तज्ञांनी याबद्दल काहीही सांगितलेले आढळले नाही.
-- थोडक्यात म्हणजे याबद्दलचा पुरावा म्हणून फक्त माझाच अनुभव आहे. माझ्यापुरता तो अर्थातच मला पुरेसा आहे. पण माझ्याखेरीज अन्य करोडो लोक तो मान्य करणार नाहीत. मग याला 'ग्राह्य पुरावा' म्हणावे किंवा कसे ?

नठ्यारा's picture

9 Mar 2024 - 7:29 pm | नठ्यारा

स्वत:प्रमाण की परत:प्रमाण हा वाद अनादि असून अनंतकाळापर्यंत चालू राहील असे दिसते.

चौकस२१२'s picture

12 Mar 2024 - 6:05 am | चौकस२१२

पण माझ्याखेरीज अन्य करोडो लोक तो मान्य करणार नाहीत. मग याला 'ग्राह्य पुरावा' म्हणावे किंवा कसे ?

हि आपली चाचणी जरी अगदी व्यवस्थित नोंद ठेवून तुम्ही केली असेल असे जरी धरले तरी "ग्राह्य पूरावा " धरण्यासाठी मला वाटते एकूण चाचणीतील संख्या ( सॅम्पल साईझ ) बरीच जास्त लागत असणार ( चाचणी कशी कारवी याची शास्त्रीय पद्धत काय आहे त्याप्रमाणे )

मेक्सिको मधे ज्यूसिंग- थेरॅपी केंद्र आहे, असे ऐकले आहे. एक अतिशय वृद्ध बाई ते चालवते. मुळात हे केंद्र अमेरिकेत होते परंतु तिथून हाकालपट्टी करण्यात आल्याने मेक्सिकोत जावे लागले म्हणे. जास्त माहिती हवी असेल तर मिळवता येईल.
अमेरिकेत अनेक विचित्र गोष्टी आहेत, त्यातली ही एक.

धर्मराजमुटके's picture

9 Mar 2024 - 9:55 am | धर्मराजमुटके

शुश्क वेदांती चर्चा करुन बुद्द्धीचा कंड शमत असेल कदाचित पण व्यवहारात आपल्याला जो अनुभव आला त्याला पुरावा मानून पुढे कालक्रमणा करणे हेच योग्य .
जिथे स्वानुभाव येऊ शकत नाही तिथे त्या त्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तीचे म्हणणे ग्राह्य मानावे.

विज्ञान आणि अध्यात्म एकमेकाला कधीही पुरुक होऊ शकत नाही.
अध्यात्मावाले अध्यात्मात कसे विज्ञान ठासून भरलेले आहे हे सांगण्याचा प्रयत्न करताना दिसतात आणि तिकडेच त्यांचे आणि आधुनिक विचारवाल्यांचे खटके उडतात.

विज्ञानवाल्यांनी आपल्याला (अध्यात्म वाल्या मंडळींना) अंधश्रद्धाळू समजू द्या. त्याने काय फरक पडतो ? दोघांनीही आपापल्या मार्गाने चालावे.

जिथे स्वानुभाव येऊ शकत नाही तिथे त्या त्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तीचे म्हणणे ग्राह्य मानावे.

सहमत!

विज्ञानवाल्यांनी आपल्याला (अध्यात्म वाल्या मंडळींना) अंधश्रद्धाळू समजू द्या. त्याने काय फरक पडतो ? दोघांनीही आपापल्या मार्गाने चालावे.

सहमत.
हिंदू विचाराने विज्ञान नाकारलेले नाही. उलट अध्यात्म मार्ग हा विज्ञानाच्या विरोधात आहे हा सो-कॉल्ड विज्ञानवाल्यांचा मुद्दा आहे. भारतातली सामाजिक सुधारणांची चळवळ (social reforms movement) सनातन विचारांच्या विरोधात जन्मली, वाढली आणि सनातन विचार संपावा हेच तिचे मूळ उद्दिष्ट आहे. याला वैचारिक विरोध करणे गरजेचे वाटते.

विवेकपटाईत's picture

10 Mar 2024 - 9:29 am | विवेकपटाईत

भगवद्गीतेत वर्णव्यवस्था ही कर्मानुसार आहे हे अठराव्या अध्यायातील ४१ ते ४४ श्लोकांत सांगितले आहे.
वर्ण व्यवस्था कर्मानुसार होती जन्मानुसार नाही.

कॉमी's picture

10 Mar 2024 - 3:22 pm | कॉमी

चूक.

अहिरावण's picture

11 Mar 2024 - 12:09 pm | अहिरावण

कसे काय?

(दोघेही अधिकारी पुरुष चर्चा करत असले की मधेच असे प्रश्न विचारायास लाजू नये. ज्ञान वाढते.)

त्यांनी दिलेत ते श्लोक वाचले तरी समजेल. सोबत आदी शंकराचार्यांचे भाष्य वाचले तर आणखी चांगले समजेल. सगळे इंटरनेटवर फुकट उपलब्ध आहे. शंकराचार्य स्पष्ट शब्दात सांगतात. आदी शं. असोत किंवा आजचे मॉडर्न शं. असोत, दोघेही मॉडर्न वर्ण म्हणजे तुमचे काम काय त्यावरून ठरते ही थियरी नाकारतात.

पॉप्युलर गैरसमज असा आहे की कर्म म्हणजे प्रोफेशनल काम, ह्यावरून वर्ण ठरतो. हे साफ चूक आहे. कर्म म्हणजे संचित (काल्पनिक), आणि गुण (जे मोजण्याचा काही मार्ग नाही. गुण म्हणजे स्किल नव्हे. गुण म्हणजे सत्व, तम, आणि रज हे काल्पनिक गुण.) गुण हे प्राकृतिक आहेत - जन्मतः, ते शिकून तयार करायचे नाहीत. कर्म - गुण यांवरून तुमचा वर्ण ठरतो. तुमच्या वर्णावर मग पुढे तुमचे प्रोफेशन ठरते. तुम्हाला तुमचे वर्ण - काम (धर्म) चांगले जमत नसेल, आणि दुसऱ्याचे वर्ण - काम उत्तम प्रकारे जमत असेल तरीही तुम्ही तुमचेच वर्ण - काम करत राहावे. तुमचा धर्म चिखलाच्या पणत्या बनवणे असेल, आणि तुम्ही जर अत्यंत सुंदर सोन्याचे दागिने घडवू शकत असला तरी तुम्ही कश्या का असेना मातीच्या पणत्याच घडवत रहा. आपल्या वर्णाचे सोडून दुसऱ्याचे काम करणे हे भयावह आहे. थोडक्यात, talent, किंवा आजकालचा हॉट शब्द merit हा निकष कुठेही येत नाही.

कॉमी's picture

11 Mar 2024 - 12:34 pm | कॉमी

:
संचित जर खरेच असते तर वर्ण व्यवस्था कर्मावर आधारित आहे असे म्हणता आले असते. पण संचित काल्पनिक असल्याने वर्ण व्यवस्था निव्वळ जन्माधारित आहे.

>>तुमचा धर्म चिखलाच्या पणत्या बनवणे असेल, आणि तुम्ही जर अत्यंत सुंदर सोन्याचे दागिने घडवू शकत असला तरी तुम्ही कश्या का असेना मातीच्या पणत्याच घडवत रहा.

समजले. समजले.
पण एक प्रश्न चिखलाच्या पणत्या बनवणा-याला सोन्याचे दागिने घडवता येण्याचे कौशल्य त्या काळात कुणी दिले असेल?

अहिरावण's picture

11 Mar 2024 - 12:07 pm | अहिरावण

#कायठरलंमग

अभिजीत's picture

12 Mar 2024 - 10:46 am | अभिजीत

आमचं तर ठरलंय - #आधुनिकतासोडासनातनीव्हा! :-)

माहितगार's picture

11 Mar 2024 - 12:24 pm | माहितगार

कदाचित नीटसे लक्ष केंद्रीत करता आले नसेल, मला लेखक महोदयांना नेमके काय म्हणायचे आहे हे नीटसे समजले नाही. अगदी असंख्य विज्ञान तंत्रज्ञानाच्या अभ्यासकांनाही गेल्या काही शतकात विज्ञानाने साधलेल्या प्रगतीने पारंपारीक तत्वज्ञान क्षेत्रांसमोर कोणती नवी आव्हाने निर्माण केली हे लक्षात येत नाही. अजून चेतना (कॉशीयसनेस) हा विषय अद्याप आव्हान आहे पण, शरीर विज्ञान आणि द्रव-वायू-रसायन शास्त्र इतपत पुढे गेले आहे की आत्म्याचे (सोल) अस्तीव सीद्ध करणे अवघड झाले आहे. शरीराचा अलमोस्ट प्रत्येक भाग, त्यातील द्रव-वायू-रसायने यांची चिकित्सा करता येते आणि आत्मा कुठेच आढळून येत नाही.

वादळ-वारे, जलचक्र-पर्यावरण आणि भूकंप-ज्वालामुखी अशा अनेक गोष्टी ईश्वर किंवा सुपर नॅचरल गोष्टींचा संबध लावला जात असे पण या गोष्टी सुपर नॅचरलच्या सहभागा शिवाय कशा काम करतात हे आधुनीक विज्ञानाला बर्‍यापैकी नेमके सांगता येते.

सृष्टी आणि आंतराळाचा इतपत शोध घेतला गेला आहे की स्वर्ग नर्क या गोष्टींच्या अस्तीत्वाची शक्यता खूपच धूसर झाली आहे. एखादी दुर्धर व्याधी (जसे कि पोलीओ, देवी, प्लेग किंवा महारोग, बाल-मृत्यू इत्यादी) ग्रस्त व्यक्ती इश्वराची अवकृपा किंवा पुर्वजन्माचे कर्माचा परिणाम समजले जात असे. आधुनिक वैद्यकाने अशा गोष्टींना कह्यात आणण्यात एवढे यश मिळवले आहे कि पुर्वजन्माच्या कर्मफलीताचा संबंध आता दाखवता येत नाही. समजा अमुक एका वाईट कर्माचे फळ म्हणून अमुक एक मंडळींना अमुक व्याधीयूक्त किंवा अमुक समुदायात जन्म मिळायचा असेल तर ते फळ आता देता येत नाही कारण अनेक व्याधींचे निर्मुलन झाले आहे, ज्या समुदायांना पुर्वी प्रतिष्ठा नाही समजले जायचे त्यांच्या कडे प्रतिष्ठा आहे. कुटूंब नियोजनाच्या साधनांमुळे अमूक एका पॅरेंटच्या घरी तमुक जन्म घेणार/ घेतला असेही फलीत दाखवता येत नाही.

मानवी व्यक्ती आणि समष्टी पुढे आदर्श मुल्य आणि भरकटणार्‍यांवर वचक ठेवण्याची गरज असते हे खरेच, पण एखाद्या गोष्टीची गरज त्यावरून आत्मा स्वर्ग नर्क आणि मागच्या जन्मीच्या कर्माच्या फलनाचा सिद्धांत सिद्ध होतो किवा कसे. मानवी व्यक्ती आणि समष्टी पुढे आदर्श मुल्य आणि भरकटणार्‍यांवर वचक ठेवण्यासाठी जिथे तत्वज्ञान पुरेसे ठरत नाही त्याबाबतीत कालानुरुप नवे तत्वज्ञान बदल गरजचे असू शकतात. उदाहरणार्थ पुर्नजन्म हा भाग बाजूस ठेऊन सामाजिक-कर्माचा सिद्धांत पुढे ठेवता येऊ शकेल का? म्हणजे 'व्यक्ती आणि समष्टीच्या क्रिया आणि निष्क्रीयताही एकुण सामाजिक-कर्मावर प्रभाव घडवतात ज्याची चांगली वाईट फळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पुढच्या पिढीस भोगावी लागू शकतात ' असे आपण म्हणू शकतो का?

अभिजीत's picture

12 Mar 2024 - 10:49 am | अभिजीत

माहितगार जी, तुमच्या प्रतिक्रियेवर लिहिलेले उत्तर खाली गेलेले आहे.

राघव's picture

11 Mar 2024 - 4:15 pm | राघव

चांगली चर्चा. आपण मांडलेले मुद्दे खूप सविस्तर आणि चांगले आहेत अभिजीत.

कर्मविपाक हा अ‍ॅक्सेप्टन्स साठी आहे. जे जसे आहे, ते तसे स्वीकारता यावे यासाठी आहे.
त्याचा पडताळा घेत बसणे गरजेचे नाही. आणि जी परिस्थिती आहे त्यात बदल करण्यास कर्मविपाक नाही म्हणत नाही. ते मनुष्याच्याच हातात आहे. प्रत्येकाला अध्यात्मिक उत्थानाची समान संधी आहे.
धर्म म्हणजे केवळ जीवनपद्धती नव्हे. धर्म मनुष्याला त्याचे उद्दिष्ट सांगतो. जसे, चांगले जगावे ही जीवनपद्धती. चांगले का जगावे हे सांगतो तो धर्म.

काही लोकांनी आपल्या हिशोबानं अर्थाची मोडतोड केली, म्हणून मूळ सिद्धांत चूक ठरत नाही. उदा.:

ठाकुर म्हणतात, "जतो मत, ततो पथ". जसं ज्याचं मत, तसा त्याचा मार्ग! माउली म्हणतात, "जो जे वांछिल तो ते लाहो".
आता याचा अर्थ म्हणजे कुणी असा घेतला की हे एखाद्याचा खून करण्याचं समर्थन आहे, तर ते हास्यास्पदच ठरणार ना?
त्यांचा काय हेतू असणार ते बघीतल्यानंच त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचा अर्थ नीट लावता येतो. आणि ठाकुरांची काय किंवा माऊलींची काय, ईच्छा काय राहणार? सर्वांची अध्यात्मिक उन्नती हेच त्यांचे उद्दीष्ट. तेव्हा त्यांनी सांगीतलेल्या गोष्टीही त्याच दृष्टीकोनातून बघीतल्या पाहिजेत.

तुम्ही म्हणता ती नित्यनूतनताच हिंदू धर्माचं आभूषण आहे असं म्हणणे संयुक्तिकच ठरेल!

अभिजीत's picture

12 Mar 2024 - 10:46 am | अभिजीत

धन्यवाद राघव जी!

उच्चवर्णीयांना फार आवडतो यात नवल ते काय ? काहीही श्रम न करता जन्मजात मिळालेले श्रेष्ठत्व कुणाला नको वाटेल ?

राघव's picture

12 Mar 2024 - 1:17 am | राघव

कोण श्रेष्ठ?

अहिरावण's picture

12 Mar 2024 - 10:34 am | अहिरावण

अगदी बरोबर.

>>उच्चवर्णीयांना फार आवडतो यात नवल ते काय ?
फक्त कालाच्या ओघात उच्चवर्णीय कोण हे बदलत जात असते असे तज्ञ सांगतात असे ऐकले आहे.

>>काहीही श्रम न करता जन्मजात मिळालेले श्रेष्ठत्व कुणाला नको वाटेल ?
नेमके. वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या जातींना श्रेष्टत्व मिळाले आणि त्यांच्या बहराच्या काळात त्यांनी त्यातून मिळणारे "लाभ" वाटण्यास नकार दिला. ज्यांना ते "लाभ" मिळत नव्हते त्यांनी त्यासाठी "खटपटी" केल्या. बहराचा काळ संपल्यावर श्रेष्ट होते जे आता श्रेष्ट नाही राहिले ते समानतेच्या बाबी करु लागले. पिचलेले श्रेष्ट झाले त्यांनी आता त्यातून मिळणारे "लाभ" वाटण्यास नकार दिला.

चक्र चालू राहिले.

कर्मफल त्या व्यक्तिलाच भोगावे लागते असे नाही. वंशजांना, जातींना, धर्मांना, देशांना सुद्धा भोगावे लागते.

हिंदू धर्म नष्ट व्हावा यासाठी ख्रिश्चन पद्धती लादून भारत ख्रिश्चन बहुल करण्याची इच्छा बाळगणा-यांच्या वंशजांना हिंदू पंतप्रधान सहन करावा लागला.

कालाय तस्मै नमः

नठ्यारा's picture

12 Mar 2024 - 12:38 am | नठ्यारा

कॉमी,

तुमचा इथला प्रतिसाद वाचला. तिथली एकेक विधानं चर्चेस घेतो.

१.

सर्वांनी भूक ह्या संकल्पनेचा अनुभव घेतला आहे.

तरीपण मी अट्टाहासाने खोटं बोलून भूक न लागल्याचा हेका धरू शकतो. फार काय भुकेची संकल्पना नाकारूनही खाणं खाऊन जिवंत राहू शकतो. तद्वत तुम्ही कर्मसिद्धांत न मानता कर्मजन्य न्यायाची अपेक्षा करीत आहात. कर्मसिद्धांत हे समर्थन नसून केवळ स्पष्टीकरण आहे.

२.

कोणीही संचित ह्या मेकानिझमला तपासू शकत नाही. कोणीही संचिताचा वेगळा अनुभव असा घेतला नाही, ...,

ही अध्याहृत यंत्रणा ( implied mechanism ) आहे. प्राण्यांच्या जगात ही नसते. तिथे जंगलराज चालतं. माणसांना हे चालेल काय ?

३.

....उलट लॉजिक असल्याने जो काही अनुभव आला तोच संचीतामुळे असे दाबून म्हणायचे इतकेच.

माझ्यासाठी लॉजिक म्हणजे तर्क हे एक साधन आहे. संकल्प आणि सिद्धी यांतील अंतर मिटवण्याचं साधन आहे. उद्दिष्ट निश्चित असल्याखेरीज तर्क लढविणे निरुपयोगी आहे. कर्मसिद्धांत हा कुठल्याही सामाजिक उद्दिष्टासाठी लढवलेला तर्क नव्हे.

४.

तुम्हाला इलेक्ट्रॉन काल्पनिक मानायचे असल्यास खुशाल माना.

हेच मी तुम्हांलाही म्हणू शकतो. तुम्हाला कर्मसंचित काल्पनिक मानायचे असल्यास खुशाल माना.

५.

.... सामाजिक उणीव ही संज्ञा स्वयंस्पष्ट आहे असे वाटते.

मान्य. अगदी याच धर्तीवर स्वयंसिद्ध सत्य नावाची काहीतरी वस्तू अस्तित्वात आहे, असं म्हणता येईल. माणूस तिचाच एक भाग आहे. ते अनुभवण्यासाठी यथोचित कर्म करावं लागतं, जेणेकरून कर्मसिद्धांत अनुकूल राहील. पण तुम्हांस कर्मसिद्धांतच मान्य नाही.

६.

तुम्ही तर ह्या मेकॉलेला सारख्या शिव्या देत असता आणि आता त्याचाच संदर्भ देत आहात, हे कसे ?

मी कसा विशाल मनाचा व गुणग्राहक आहे हे दाखवण्याची संधी का बरं सोडू?

७.

मग काय उपयोग ? सगळे काल्पनिकच काय ? संचित काल्पनिक, उपयोग काल्पनिक, फक्त त्यावर खऱ्याखुऱ्या समाजरचना करायच्या काय ?

सगळंच काल्पनिक म्हंटलं तर समाज ही संज्ञाही काल्पनिक ठरंत नाही काय? त्यापेक्षा द्विपादांचा कळप म्हणूया का?

८.

ह्यात विश्वासाचे काही नाही.

विश्वास नसेल तर दुसरं काय आहे?

९.

चूक. गुण आणि कर्म(संचित) ह्यावरून वर्ण ठरतात. ह्यातले गुण (सत्व, तम, रज) आणि संचित दोन्ही काल्पनिक आहेत. त्यामुळे जन्मावरूनच.

गीतेत श्रीकृष्णाने गुणकर्मविभागश: अशी शब्दयोजना केली आहे. तुमच्या मते जर गुण व कर्म दोन्ही काल्पनिक आहेत, तर मग वर्णही काल्पनिकंच झाला ना? मग तो जन्मावरून कसाकाय ठरेल?

१०.

जीव जन्माला येतो आणि मरतो. ह्या आधी किंवा नंतर जीवाचे अस्तित्व होते असे मानायला काहीही पुरावा नाही.

पुनर्जन्माच्या अनेक कथा डॉक्टर इयन स्टेव्हनसन यांनी त्यांच्या पुस्तकात मांडल्या आहेत : https://www.amazon.co.uk/Children-Remember-Previous-Lives-Reincarnation-...

-नाठाळ नठ्या

कर्नलतपस्वी's picture

12 Mar 2024 - 5:49 am | कर्नलतपस्वी

सांप्रत आणी भूतकाळात काही मिपाकरांनी तत्सम विषयावरील लेख वाचले पण फार काही समजले नाही.

कर्मविपाक सिद्धांत आणि त्याचा परिपाक असलेला पुनर्जन्म! या दोन कल्पना समाज नियंत्रण आणी कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यास मानसिक आधार या साठीच असव्यात.

कबीरदास या धारणेचा उपयोग सामान्य लोकांना घाबरवून आपला स्वार्थ साधण्या साठी, पांडित्य सिद्ध करण्या साठी किंवा दक्षिणा जमा करण्यासाठी करीत नाहीत. ते या तत्त्वाचा उपयोग केवळ प्रबोधना साठीच करतात. माझ्या पडत्या काळात याच विचारांचा मला फायदा झाला व अतीशय कठीण परिस्थितीतून मी बाहेर पडलो व प्राप्त परिस्थितीला पावलो.त्यांच्या एका प्रसिद्ध दोह्यात ते म्हणतात :-

करता था तो क्यों रहा, अब करी क्यों पछताए,
बोये पेड बाबुल का, अंबुवा कहा से पाए?

कर्मविपाक वर संत कबीर दास यांनी सटीक टिप्पणी केली आहे. कर्म कांड,पुनर्जन्म,प्रारब्ध आणी कर्म फल याला सरळ नाकारले आहे. जे काही आहे ते इथेच आणी प्रत्येक गोष्टीला मनुष्य स्वतःच जबाबदार आहे असे सांगीतले. ते म्हणतात,

कौन मरे कौन जन्मे भाई।
सरग नरक कौने गति पाई।।

पंचतत अविगत थें उत्पना, एकै किया निवासा।
बिछुरे तत फिरि सहजि समाना, रेख रही नहीं आसा।।
आदे गगना,अन्ते गगना मधे गगना भाई।
कहै कबीर करम किस लागे, झूठी सनक उपाई।।

स्वर्ग नर्क फक्त कल्पना आहे. पंचमहाभूतांनी बनलेले शरीर पुन्हा पंचमहाभूतात विलीन होते.या काल्पनिक गोष्टींचा उपयोग फक्त समाजातील दुर्बळ घटकांना भिती आणी शोषण करण्यासाठी उपयोगात आणल्या आहेत. कोणाला माहित आहे की स्वर्ग,नर्क कुठे आहे?जे गेले त्यांनी काही संदेश पाठवला आहे का! रंभा,उर्वशी सहीत बहात्तर हुर कुणाला भेटल्याचे काही प्रमाण आहे का?

मन तू पार उतर कहाँ जैहो।
आगे पंथी पन्थ न कोई,
कूच मुकाम न पैहो।।
नहिं तहं नीर,नाव न खेवट,
न गुन खैंचन हारा

चलन चलन सब कोई कहत है,
ना जाने बैकुंठ कहाँ है।
जोजन एक परमिति नहिं
जाने, बातन ही बैकुंठ बखाने।
बहुरि नहिं आवना या देस।
जो जो गए बहुरि नहिं आए,
पठवत नहिं संदेस।।

ते म्हणतात, तुच तुझा शिल्पकार आहेस. "जैसी करणी वैसी भरणी", हेच खरे आहे.

तेरा साईं तुझ में हैं, ज्यों पहुन में बास ।
कस्तूरी का हिरण ज्यों, फिर-फिर ढूँढ़त घास ।।

केव्हां माणूस सुख दु:खा पासून विरक्त होतो.

चाह गई, चिंता मिटी, मनुवा बेपरवाह।
जिनको कछू न चाहिए, सो जग साहन साह।।

जो आला तो जाणार त्यात भेदभाव नाही.

आए हैं सो जाएंगे, राजा रंक फकीर ।
एक सिंहासन चढ़ि चले, एक बंधे जंजीर ॥

कबीर दास म्हणतात आजपर्यंत किती मेले. प्रत्येक मरणारा स्वर्गातच गेला असेच म्हणतात. खरे काय खोटे काय कोणास ठाऊक.कबीरदास म्हणतात जे काही आहे ते इथेच स्वर्ग आणी नर्कही इथेच.

वहाँ न दोजख, बहिस्त मुकामा।
यहाँ ही राम, यहॉँ ही रहमाना।।

माहीत नाही स्वर्ग, नर्क ही कल्पना कशी आणी कुणी मांडली, समाजात रूजवली.

कितने भी मानव मरे, कहे स्वर्ग को जाय।
पता नहीं किस मूरख(मुर्ख) ने, दिया नरक बनाय।।

तेव्हां माझ्या दृष्टीकोनातून कर्मविपाक वगैरे काही नाही. जे काही आहे ते स्वतःच केलेले कर्म आणी त्यातून मिळालेले फळ आहे.इच्छित फळ मिळण्या साठी सर्वच प्रयत्न करतात. कुणाचे सफल तर कुणाचे विफल होतात इतकेच.त्याचे पुनरावलोकन केल्यास कदाचित कुठे चुकले,कुठे कमी पडले याची प्रचीती येवू शकते.

असे सिद्धांत दुसर्यांना सांगायला बरे वाटतात.

अहिरावण's picture

12 Mar 2024 - 11:44 am | अहिरावण

>>>असे सिद्धांत दुसर्यांना सांगायला बरे वाटतात.

जितकी मने तितकी मते. त्यामुळे प्रत्येक जण त्याला पटलेले मत दुस-याला सांगतो. काहींना पटते काहींना पटत नाही. पण सांगणे सुटत नाही.

आता, तुम्ही सुद्धा नाही का तुम्हाला जे पटले तेच सांगितले.

अगदी तसेच.

अभिजीत's picture

12 Mar 2024 - 10:43 am | अभिजीत

अगदी असंख्य विज्ञान तंत्रज्ञानाच्या अभ्यासकांनाही गेल्या काही शतकात विज्ञानाने साधलेल्या प्रगतीने पारंपारीक तत्वज्ञान क्षेत्रांसमोर कोणती नवी आव्हाने निर्माण केली हे लक्षात येत नाही.

गेल्या काही शतकात विज्ञानाने साधलेल्या प्रगतीने पारंपारीक तत्वज्ञान क्षेत्रांसमोर – यांत आपण सनातन विचारांचा प्रामुख्याने विचार करू. सनातन म्हणजे ज्यात हिंदू (विविध परंपरा आणि पंथ), बौद्ध आणि जैन विचार येतात. अहिंदू परंपरांचा – अब्राहमीक (ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम) वा इतर – साठी वेगळी चर्चा करावी लागेल. विज्ञानाने सनातन विचारापुढे कोणती नवी आव्हाने निर्माण केली आहेत या प्रश्नावर तुम्ही तुमच्याच पुढच्याच वाक्यात याचे एक उत्तर आहे – ‘अजून चेतना (कॉशीयसनेस) हा विषय अद्याप आव्हान आहे.’ आधुनिक विज्ञानाने तीन महत्वाचे प्रश्न सनातन विचारापुढे उभे केले आहेत. अर्थात सनातन विचारांच्या खोली आणि व्याप्तीत या तीनही प्रश्नांची उत्तरे विविध दर्शनांचा विकास होता होता दिली गेलेली आहेत. परंतु सनातन विचाराची नाळ तुटल्यामुळे व ऐतिहासिक तत्कालीन कारणांमुळे आधुनिक विज्ञान आणि सामाजीक न्याय यात सनातन विचार केवळ अंधश्रद्धा, मागासलेपणा आणि त्याज्य बनला.

तीन महत्वाचे प्रश्न-
१. कॉनशियसनेस (चेतना - consciousness)-
आधुनिक विज्ञान कॉनशियसनेस (चेतना - consciousness) सोडून फक्त स्थूलाचा विचार करते. Consciousness वस्तूचा गुणधर्म आहे म्हणजे स्थूल वस्तूंच्या समच्चयातून निर्माण होते. निर्जीव वस्तूत चेतना नसते आणि सजीवात ती मेंदूतल्या नुरॉन्स मुळे येते. मेंदूवर आणि नुरॉन्सवर अजून संशोधन केले की Consciousness चा शोध विज्ञानाला लागेल असा सध्याचा वैज्ञानिक विचार आहे. काही शास्त्रज्ञ Consciousness विज्ञानाच्या कक्षेत येणार नाही या मार्गाने विचार करत आहेत. सनातन विचारात ‘सर्व सृष्टीच्या मुळाशी एकच चैतन्य आहे आणि सर्व सृष्टी या चैतन्याचेच नाम-रुपआहे’ असा विचार करते. चार्वाक सिद्धांत इथे समर्पक आहे. मनुष्य आणि आत्मा याचा विचार करताना चार्वाकांचे आवडते उदाहरण म्हणजे – पान खाल्लयावर जीभ लाल होते. पानात लाल रंग नसतो पण पान खाल्ल्यावर जशी जीभ लाल होते तशी सजीवात चैतन्याची निर्मिती होते. सजीव मेल्यावर चैतन्य नष्ट होते. आधुनिक विज्ञान जे मोजता येते त्याचाच विचार करू शकते. आणि हीच विज्ञानाची मर्यादा (limitation) आहे. न्यूरोसायन्सचा अभ्यास आकारून consciousness कधीच समजता येणार नाही कारण चैतन्य मोजता येण्यासाठी, चैतन्य म्हणजे वस्तू नव्हे.

२. साक्षात्कार (revelation)
आधुनिक विज्ञान हे प्रत्यक्ष आणि अनुमान या दोन ज्ञान मिळवण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. प्रत्यक्ष म्हणजे – जे ज्ञान पंचेद्रियांद्वारे मोजता येते किंवा यथार्थता तपासता येते. अनुमान म्हणजे – दोन प्रत्यक्ष प्रमाणातून निर्माण होणारे ज्ञान. यांत पुढे – एका शास्त्रज्ञाने केलेला प्रयोग तो जसाच्या तसा जर दुसऱ्याने केला आणि दुसऱ्याचे निष्कर्ष जर पहिल्याच्या निष्कर्षाशी जुळले तर तो प्रयोग शास्त्रीय मानला जातो. विज्ञानाचे आणि सनातन विचार या दोन्हीचे ध्येय ‘मनुष्यात दु:ख निवृत्ती करणे’ हे असले तरी दृष्टिकोनात मूलभूत फरक आहे. सनातन धर्मातील उपनिषदांच्या मते, ‘तत्वमसि’, हा मार्ग आहे. ऋषींना या ज्ञानाचे साक्षात्कार झाले आणि या ऋषींनी मानवजातीच्या कल्याण्यासाठी कारुण्यपूर्ण वृत्तीने उपनिषदे लिहिली. उपनिषदांना आपण परंपरेने ‘अपौरषेय’ म्हणतो. ‘अपौरषेय’ म्हणतो कारण मनुष्य स्वबुद्धीने ‘सर्व सृष्टीच्या मुळाशी जे एकच चैतन्य आहे तेच माझे स्वस्वरूप आहे’ या अनुमानापर्यन्त पोहोचू शकत नाही, त्यामुळे हे ज्ञान मनुष्यबुद्धीच्या पलीकडे ‘अपौरषेय’ आहे. आता हे मनुष्याने का स्वीकारावे? कारण मनुष्याने जर उपनिषदांनी शिकवलेल्या मार्गाने अभ्यास केला तर ‘सर्व सृष्टीच्या मुळाशी जे एकच चैतन्य आहे तेच माझे स्वस्वरूप आहे’ ही अनुभूती येते आणि दु:ख निवृत्ती होवून परमानंद प्राप्ती होते. त्यामुळे उपनिषदे जरी revelation या प्रकारची असली तरी त्यातले ज्ञान स्वस्थापित आहे. स्वस्थापित म्हणजे – जागेपाणी ‘मी आहे’, ही जाणीव मनुष्यात स्वस्थापित असते, त्याला दुसऱ्या कोणत्याही पुराव्यांची गरज नसते. अर्थातच, आधुनिक विज्ञानात revelation प्रकारचे ज्ञान स्विकारण्याची कोणतीही तरतूद नाही आणि असे ज्ञान कसे हाताळायचे याची method नाही. आधुनिक विज्ञान विकसित होण्याच्या प्रक्रियेत युरोपात बायबलच्या revelations ना यशस्वी पणे नाकारण्यात आले. तेच तत्व सनातन धर्माच्या बाबतीतही खरेच असले पाहिजे या अनुमानामुळे सनातन धर्मातील उपनिषदांचे ज्ञान नाकारले जाते.

३. श्रद्धा
सनातन विचारात श्रद्धा म्हणजे – ‘मला वैयक्तिक अनुभूती येत नाही तो पर्यन्त मी वेदवाक्य आणि गुरु यावर विश्वास ठेवणार (trust pending verification).’ जेंव्हा शास्त्रज्ञ गृहीतक (hypothesis) मांडतात तेंव्हा ते गृहीतक सिद्ध होईपर्यंत प्रयोग करीत राहतात. वैज्ञानिक विचारांवरची हीच trust pending verification (till hypothesis is proven or not). परंतु, आधुनिक विज्ञानाला revelations कशी हाताळायची हेच माहीत नसल्याने सनातन धर्मातली ‘श्रद्धा’ आपोआप ‘अंधश्रद्धा’ बनते.

हे लिहायचा उद्देश हा की आधुनिक विज्ञान आणि सनातन धर्म यांच्या मूळ धारणा वागल्या आहेत, प्रारूपे वेगळी आहेत आणि विचारपद्धती (methods, world-views) वेगळे आहेत. सनातन धर्माने विज्ञानाला नाकारलेले नाही परंतु आधुनिक विज्ञान सनातन विचाराला सतत नाकारत राहते हा मुख्य दोष आहे. यामुळे भारतीय समाजात परांपरेबद्दल नकारात्मक मत वाढत राहते आणि परंपरेच्या ज्ञानापासून भारतीयच दुरावललेले राहतात.

सृष्टी आणि आंतराळाचा इतपत शोध घेतला गेला आहे की स्वर्ग नर्क या गोष्टींच्या अस्तीत्वाची शक्यता खूपच धूसर झाली आहे.

प्रत्येक धर्मात (religion या अर्थी) स्वर्ग आणि नरक यांची कल्पना करण्यात आलेली आहे. अर्थात प्रत्येक धर्मात यांचे अर्थ, जाण्याचे-येण्याचे नियम वगैरे अशी बरीच विहंगम आणि चमत्कृतीपूर्ण वर्णने आहेत. अब्राहमीक धर्मांतल्या स्वर्ग किंवा नरक या जागा कशा आहेत तर - मनुष्याने एका आयुष्यात केलेल्या कृत्याचा गॉड/अल्ला पुढे जबाब द्यावा लागतो आणि त्यानुसार जीवाची रवानगी eternal life किंवा eternal damnation या पैकी एकांत होते, ज्यातून जीवाची सुटका नाही. सनातन धर्माचा स्वर्ग – पुण्याचा उपभोग घेण्यासाठी मिळतो. पुण्य विविध यज्ञ-याग करून आणि धार्मिक कृत्याने मिळते. जसे प्रारब्धाने जीवाला विविध योनीत जन्म मिळतो तसंच प्रारब्धाच्या जोरावर स्वर्ग आणि नरक. मर्त्य जगात किंवा स्वर्गात जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंतच जीव राहू शकतो. या कल्पनेवर होणारी टीका आधुनिक काळात प्रथमच होत आहे असे नाही. आधुनिक काळात ‘स्वर्ग-नरक कुठे आहेत’ अशी पुरावा मागणारी टीका होते परंतु स्वर्ग आणि मनुष्याच्या स्वर्गाला जाण्याच्या इच्छेवर उपनिषदांनी जोरदार टीका केली आहे. गीतेत २.४२ व २.४३ या श्लोकांत श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मयोग शिकवताना अशीच टीका करतात. आदि शंकराचार्य, वेदवाक्यांचा अर्थ केवळ कर्मकांड असा अर्थ करून जे कर्मठ बनतात आणि मूळ भावार्थ विसरतात त्यांच्यावर टीका करतात. गीतेत श्रीकृष्ण अशांना ‘अविपष्चित’ – अविवेकी म्हणतात. त्याचप्रमाणे ईश्वर-मोक्ष वगैरे काही नाही असे म्हणणाऱ्या नास्तिकांनाही अविवेकामुळे वेदवाक्याचा अर्थ समाजात नाही आणि ज्ञानप्राप्ती होत नाही.
तात्पर्य काय तर, सनातन धर्मातच स्वर्ग या कल्पनेवर दीर्घ, धारदार आणि समर्पक टीका/चर्चा झालेली आहे. इथे सनातन धर्माची विचारपद्धती समजून घेता येते. उपनिषदांनी स्वर्ग या कल्पनेवर टीका करताना वेदांच्या पूर्व भागातले कर्मकांड नाकारले नाहीत. मनुष्याच्या आयुष्यात कर्मकांडांची गरज आहे पण ती स्वर्ग वागैरे साठी न वापरता ‘चित्तशुद्धी’ साठी वापरावीत आणि मोक्षमार्गावर चालावे हा ‘समन्वय’ उपनिषदांनी केला आहे. नवा विचार आला की समन्वय कसा करावा ही सनातन धर्माची विचारपद्धती आहे म्हणून सनातन धर्म नित्यनूतन (relevant to contemporary times) राहतो. आधुनिक विचार ‘स्वर्ग’ या कल्पनेवर टीका करताना हिंदू धर्मावरच घाला घालतात आणि याला आमचा आक्षेप आहे.

'व्यक्ती आणि समष्टीच्या क्रिया आणि निष्क्रीयताही एकूण सामाजिक-कर्मावर प्रभाव घडवतात ज्याची चांगली वाईट फळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पुढच्या पिढीस भोगावी लागू शकतात ' असे आपण म्हणू शकतो का?

नक्कीच. गीतेत १६.८ आणि १६.९ मध्ये भगवंत अशा आसुरी प्रवृत्तीकडे निर्देश करतात. जे या विश्वात ब्रह्म-आत्मा याअर्थी सत्य याचा आधार नसलेले आणि म्हणून ईश्वररहित आहे असे समजतात (यांत आधुनिकही येतात), आणि या विश्वाच्या मुळाशी काम्य बुद्धी आहे, असे लोक असुर असतात. ही लोक उग्रकर्म (क्रूर) करतात, जगाचा क्षय करतात आणि जगाचे अहित होते. इथे क्रूर कर्म म्हणजे केवल मनुष्याच्या भौतिक सुखासाठी निसर्गाला ओरबडण्याची जी आधुनिक विज्ञानाने सोय होते, ते सर्व.

कर्म प्रधान विश्व रचि राखा ।
जो जस करहि सो तस फल चाखा ॥