हट्टी व्यक्ती, समुह किंवा संस्थेची समजूत काढणे कठीण जाते तेव्हा आग्रहाची जागा हट्टाने घेतली असे म्हणता येऊ शकते का? आधी ऊस तोडून मागणार आणि तुटलेला ऊस आधीसारखा करून हवा म्हणून हट्ट धरल्यामुळे, राज हट्ट, स्त्री हट्ट आणि बाल हट्ट या पैकी बाल हट्ट अवघड कसा याची आपण सर्वांनीच कथा ऐकलेली असते. हट्ट आणि हट्ट करणार्यांचे हे तीनच प्रकार आणि उपप्रकार असतात की आणखीही?
या चर्चेचा उद्देश कोणत्याही विशीष्ट हट्टाचे नकारात्मक मूल्य जोखण्याचा (value judgement) किंवा हट्ट केलेल्यांच्या हट्टांना कमी लेखण्याचा नाही तर केवळ हट्टांचे प्रकार शक्य तेवढे स्थल- काल- परिस्थिती निरपेक्षपणे लक्षात घेण्याचा आहे. (अर्थात कुणालाही दुखावण्याचा उद्देश्य निश्चितपणे नाही त्यामुळे त्यामुळे कोणत्याही विशीष्ट हट्टाबदल चर्चा घसरून हायजॅक होणार नाही याची काळजी घेण्याचे सहकार्याचे आवाहन आहे.)
* राज हट्ट
* न्याय संस्था हट्ट
* कायदा हट्ट वेगळा असतो कि राज-न्याय संस्था हट्टाचा प्रकार असतो? याचे शब्द-प्रामाण्य आणि ग्रंथ प्रामाण्याशी नाते काय असते?
** कर्मठता हट्ट वेगळा की हट्टाचेच वेगळे नाव? लकीर के फकीर असणारा कर्मठता-हट्ट वेगळा कि शब्द-प्रामाण्य, ग्रंथ प्रामाण्य आणि कायदा हट्टाशी निगडीत असतो? (# कर्मठता शब्दात केवळ धार्मिक नव्हे तर धर्मेतर बाबतीतील कर्मठता ही गृहीत धरल्या आहेत)
* उपद्रवमुल्य-दर्शन हट्ट असतात तसे शांतता-दर्शन केवळ आग्रह असतो की समजूत न घालता येणार्या हट्टाचीही जागा घेऊ शकतो?
* भांडवलशहांचे हट्ट असं काही असते असे तुम्हाला वाटते का? असेल तर काही उपप्रकारही शक्य आहेत का?
* मध्यवर्ती बँका (आरबीआय, आयएमएफ) च्या आग्रहांना हट्ट म्हणावे का?
* समुह हट्ट किंवा जनहट्टाचे किती उपप्रकार असू शकतील? जसे की संघटनांनी धरलेले हट्ट अजून काही सुचततात का?
* व्यक्ती हट्टांचे कोणकोणते उपप्रकार असू शकतील? नेतृत्व हट्ट, बॉस हट्ट हे एकच की वेगवेगळे? गुरुजन हट्टांना व्यक्ती हट्टात धरावे कि संस्था हट्टात? संस्थासंचालक हट्ट व्यक्ती हट्टाचा प्रकार की संस्था हट्टाचा? कुटुंब प्रमुख किंवा टिम लिडर हट्ट हा संस्थात्मक हट्ट कि व्यक्तीगत हट्ट असतो?
** पितृ हट्ट, मातृहट्ट, मोठ्या भावा बहीणीचे हट्ट लहान भावा बहींणंचे हट्ट, जावई हट्ट सासूहट्ट सूनहट्ट सासराहट्ट पतिहट्ट पत्नी हट्ट, पुत्रहट्ट, कन्याहट्ट,
** भाई-दादा-डॉन हट्ट
* न्यायाधिश, स्थानिक नागरी संस्था विधान सभा ते लोक-राज्य सभांच्या अध्यक्ष सभापतींचे हट्ट हे व्यक्ती हट्टाचे प्रकार की संस्था हट्टाचे?
* व्यक्ती हट्ट, संस्था हट्ट आणि समुह हट्टांचे नाते कसे असते?
* संस्था हट्टांचे स्वरूप आणि उपप्रकार काय असतात?
* तुम्हाला अजून काही हट्टांचे प्रकार-उपप्रकार सुचतात का?
* उद्देश्य विषयास धरून अभ्यासपूर्ण चर्चेचा आहे.
* व्यक्तिगत आणि समुह टार्गेट करणार्या टिका, विषयास धरुन नसलेल्या आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी आभार.
प्रतिक्रिया
13 Feb 2024 - 8:14 pm | अहिरावण
>>>उद्देश्य विषयास धरून अभ्यासपूर्ण चर्चेचा आहे
चर्चेस फाटे फोडणारे फाटेहट्टी समजावे काय?
काही करुन हिंदूंना बदनाम करणारे पुरोगामी द्वेष्टेहट्टी समजावे काय?
13 Feb 2024 - 8:19 pm | माहितगार
:) चर्चा रंग भरण्याची शक्यता दर्शवणारा प्रतिसाद एवढा लगेच? :))
14 Feb 2024 - 9:43 am | अमरेंद्र बाहुबली
पुरोगांमींना ओढूनताणून कशातही आणून बदनाम करण्याच्या हट्ट्ाला मनूहट्ट म्हणायचे का? की सनातनी हट्ट?
14 Feb 2024 - 10:37 am | अहिरावण
गुरुची विद्या गुरुला !!
13 Feb 2024 - 9:26 pm | चित्रगुप्त
आपली निर्मिती/सृजन/सादरीकरण उत्कृष्टतम (सर्वोत्तम नव्हे) व्हावे असा स्वतःशीच हट्ट धरून, सर्वस्व पणाला लावून काम करणारा कलावंत/लेखक/अभिनेता/गायक/चित्रपट दिग्दर्शक/खेळाडू इ. इ. चा हट्ट.
( - उदाहरणार्थ गेल्यावर्षी दोन महिने काम करून मी एक तैलचित्र बनवले. त्यात परिपूर्णता यावी असा स्वतःचाच हट्ट आणि प्रयास होता. हे चित्र फक्त घरच्या मंडळींनीच बघितलेले आहे. फेसबुक वगैरेवर ते मी टाकणार नाही, किंवा विकणार नाही. ते माझ्यासाठी नितांत वैयक्तिक असे आहे आणि त्यातून मिळालेले समाधान हेच पुरेसे आहे).
14 Feb 2024 - 10:47 am | माहितगार
चित्रगुप्तजी, 'उत्कृष्टतेबद्दलचा स्वहट्ट' या आपल्या एका प्रतिसादाने चर्चा धागा काढण्याचा उद्देश्य भरून पावला. अर्थात 'उत्कृष्टतेबद्दलचा हट्ट' जसा स्वहट्ट असू शकतो तसा इतरांकडून अपेक्षा करणारा उत्पादकाचा त्याच्या कर्मचार्यांचा किंवा ग्राहकाचाही असू शकतो.
14 Feb 2024 - 9:19 am | कंजूस
हट्ट सामाजिक असतात. एक दोन किंवा अधिक व्यक्ती आपल्या हट्टाकडे लक्ष देणार आहेत हे जाणून केले जातात. कुणीच नसेल तर तो /ती/ ते गाशा गुंडाळून चालू पडतो.
माझंच म्हणणं /करणं बरोबर हे सांगण्याचा हट्ट. त्यात सातत्य ठेवतात.
घेतलेली वस्तू दुकानदाराला परत घेण्याचा हट्ट.
14 Feb 2024 - 10:56 am | माहितगार
हट्टपुरवणारा/री किंवा सहानुभूतीठेवणारा/री उपलबअसेल तरच हट्ट करता येतो हि एक मह्त्वाची सामाजिक बाजू आहे.
>>घेतलेली वस्तू दुकानदाराला परत घेण्याचा हट्ट.
हा चित्रगुप्तांनी निर्देशीत केलेल्या उत्कृष्टता हट्टाचाच समकक्ष भाग म्हणता येईल का?
14 Feb 2024 - 11:05 am | कंजूस
नाही. चित्रगुप्तांनी निर्देशीत केलेला वेगळा.
इकडे काय होतं की दुकानदार सांगतो की एकदा घेतलेली वस्तू परत घेणार नाही तरीही ती वस्तू परत करायला जाणे आणि हटून बसणे.
14 Feb 2024 - 11:45 am | माहितगार
हो असेही ग्राहकवर्तन बर्याचदा आढळून येते खरे.
14 Feb 2024 - 11:43 am | माहितगार
चित्रगुप्त आणि कंजूस यांच्या उत्कृष्टता हट्टा बद्दलचे प्रतिसाद वाचून हट्टांचे दोन आणखी प्रकार सुचले.
* अनुरूपता (conformity) हट्ट आणि गैर-अनुरूपता (non-conformity) हट्ट
अनुरूपता (conformity) हट्टात एखादे स्टँडर्ड उत्कृष्ट गृहीत धरून अनुरुपता हट्ट धरला जातो. गैर-अनुरूपता (non-conformity) हट्ट हा अमुक एकच स्टँडर्ड उत्कृष्ट आहे ह्या गृहीतकालाच आव्हान देत असतो. (माझ्यालेखी तथाकथित) शुद्धलेखन हट्ट किंवा एखादा (खाद्य)पदार्थ अमुक पद्धतीचा स्टँडर्डचा असावा हे अनुरूपता (conformity) हट्टात मोडतात. अनुरूपता (conformity) हट्टाची मर्यादा लक्षात न घेतल्यास त्याची प्रगती कळत नकळत कर्मठता हट्टाकडे होऊ शकते किंवा कसे.
14 Feb 2024 - 1:15 pm | माहितगार
* स्वहीत/ स्वकीयहीत हट्ट (यात संपत्ती, जोडीदार, सत्ता, नाविन्य आणि चकाकत्या वस्तुंचे हट्ट, fixation हट्ट विषयक हट्टांच्या उपप्रकारांचाही समावेश व्हावा) - परहीत हट्ट
* लौकीक जीवन हट्ट - पारलौकीक जीवन हट्ट
#fixation - an obsessive interest in or feeling about someone or something. ला मराठीत काय म्हणता येईल?
14 Feb 2024 - 1:18 pm | माहितगार
एखाद्या उद्दीष्टासाठी त्याग हट्ट
14 Feb 2024 - 1:22 pm | माहितगार
जीवनशैली हट्ट
14 Feb 2024 - 1:24 pm | माहितगार
याचक हट्ट, अतिथी हट्ट
14 Feb 2024 - 1:52 pm | माहितगार
वचनपुर्ती हट्ट
14 Feb 2024 - 1:34 pm | अहिरावण
प्रतिसाद हट्ट
लेख हट्ट
14 Feb 2024 - 1:45 pm | माहितगार
>> प्रतिसाद हट्ट - असा हट्ट अनुभवास येतो खरा म्हणजे दोन्ही प्रतिसाद हवा असण्याचा आणि प्रतिसाद देण्याचा दोन्ही
* लेखन हट्ट - लेखन कला अवगत नव्हती त्या काळात? मला वाटते लेखन हट्ट हा 'व्यक्त होण्याच्या हट्टाचा' उपप्रकार असावा.
>> चर्चेस फाटे फोडणारे फाटेहट्टी समजावे काय?
असाच फाट्यावर मारण्याचा हट्टही असतो याला इंग्रजी कॅन्सल कल्चर असा काहीसा शब्द आहे.
14 Feb 2024 - 1:56 pm | माहितगार
लेख कविता हट्टाला खास मिपा शब्दही आहे जिलेबी हट्ट :)
14 Feb 2024 - 1:49 pm | माहितगार
नफा-फायदा हट्ट खरेतर भांडवलशहांपुरता मर्यादीत नसतो सर्वसामान्यांमध्येही दिसून येतो
14 Feb 2024 - 2:00 pm | माहितगार
सरकार अल्पमत किंवा त्रिशंकु स्थितीत असेल तेव्हाचे लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या नेत्यांचे हट्ट, घराणेशाही हट्ट हळू हळू अजून हट्टांचे प्रकार सुचताहेत
14 Feb 2024 - 2:34 pm | अनन्त्_यात्री
स्वतःच प्रतिसाद देऊन वर काढण्याचा हट्ट :)
14 Feb 2024 - 6:30 pm | माहितगार
:)) हा असा हट्ट करणे मला स्वतःलाही भारी आवडते. :))
14 Feb 2024 - 3:14 pm | टर्मीनेटर
कंफर्ट (comfort) हट्ट…
हा माझा हट्ट पुरवला जाण्यासाठी मी अत्याग्रही असतो 😀
(कंफर्ट साठी मला अभिप्रेत असलेला मराठी प्रतिशब्द सापडला नाही! दिलासा, आराम, समाधान हे प्रतिशब्द अपेक्षीत नसुन त्यापेक्षा व्यापक अर्थाचा शब्द अभिप्रेत आहे. कृपया जाणकारांनी तो सुचवावा अशी नम्र विनंती)
14 Feb 2024 - 6:12 pm | कंजूस
सुसह्य असणे. प्रवासात कुणाला उशिरा उठून जमेल तेवढे साध्य करायचे असते. रात्री उशिरापर्यंत झोपले तरी चालते. कुणाला बसप्रवास सुसह्य वाटतो तर कुणाला रेल्वेचा. कपडे, जोडे, त्यांचा प्रकार कापड याबाबत सुसह्यपणा अत्यावश्यक. असे कपडे घातल्याने कुणाला काय वाटेल यापेक्षा आपल्याला सुसह्य असण्यात आग्रही असणे.
14 Feb 2024 - 6:56 pm | माहितगार
कंफर्ट हट्ट = आरामदायी सुविधांसाठीचा हट्ट? मी आधीच्या एका प्रतिसादातून जिवनशैली हट्टचा उल्लेख केला आहे. जिवनशैली हट्टात प्रामुख्याने आरामदायी सुविधांसाठीचा हट्टांचा समावेश असला तरी आरामदायी जीवनशैली पासून दूरची जीवनशैली जाणीवपुर्वक पत्करणारे जीवनशैली हट्टही दिसून येतात.
मला वाटते सुविधासाठींचा हट्ट हा मूळ प्रकार असावा. ज्यांच्याकडे प्राथमिक सुविधांचा अभाव असतो ते प्राथमिक सुविधांसाठीचे आग्रह धरतात, प्राथमिक सुविधांची तरतुद झालेले आरामदायी सुविधांचा हट्ट धरतात, आरामदायी सुविधा प्राप्त झालेले उच्चभ्रू जीवनशैलीसाठी हट्ट करतात.
ज्या सुविधा हट्ट आधी स्वतःसाठी तो भागला कि स्वकीयांसाठीच्या हट्टांची सुरवात होते आधी सुविधा पुढच्या पिढ्यांनाही उपलब्ध रहावी म्हणून हट्ट, मग परिवारासाठी सुविधा उपलब्धता हट्ट ते झाले की मग स्व-समुहासाठी हट्ट, मग स्व-प्रादेशिक, स्व-भाषिक, मग स्वदेशीयांसाठी हट्ट मग सर्व विश्वासाठी हट्ट. काही त्यागहट्टी मंडळी हे क्रम मागेपुढे करतात.
14 Feb 2024 - 3:41 pm | चित्रगुप्त
वर वेगवेगळे हट्ट जे लिहीले आहेत, त्यात एक समान धागा दिसतो, तो म्हणजे माझ्या (किंवा आमच्या) इच्छेप्रमाणे (इच्छा/ लहर/सोय/मागणी/आग्रह/मत/ कल्पना/विचार/अपेक्षा/बेत ... इत्यादि प्रमाणे- ) इतरांनी वागावे/करावे असा हट्ट.
असा हट्ट धरणाराला तो उचित वाटत असला तरी समोरच्याला तसे वाटत नसेल तेंव्हा समस्या निर्माण होत असते.
14 Feb 2024 - 6:06 pm | कंजूस
या हट्टाचे कमी अधिक सौम्य प्रकार असतात. पाच दहा जण एकत्र पर्यटनास गेले की याचा अनुभव येतो.
14 Feb 2024 - 6:58 pm | माहितगार
सहमत आहे.