शेअर बाजार २०२४: नियोजन, चर्चा, अंदाज

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in काथ्याकूट
18 Dec 2023 - 8:17 am
गाभा: 

इशारा: सदर धागा लेखक अर्थतज्ज्ञ, गुंतवणूक तज्ज्ञ, बाजार सल्लागार इ. नाही. हा लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचून कुणी गुंतवणूक केल्यास व त्यातून आर्थिक किंवा इतर नुकसान झाल्यास हे संस्थळ, सदर लेखक, प्रतिसादक इ. जबाबदार असणार नाहीत.

---

बाजारात सध्या तेजीचा बैल चौखूर उधळतोय. महिन्याभरातच सुमारे ९ टक्क्यांनी वाढून मागच्या आठवड्याच्या शेवटी निफ्टी २१,४५६.६५ वर बंद झालाय. अर्थातच, रिलायन्स, एचडीएफसी बँक, आइसीआइसीआइ बँक, इन्फी, टीसीएस सहित सगळ्याच प्रमुख कंपन्यांनी या आठवड्यात पाच टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली आहे. अदानींचे स्टॉक्स हिंडेनबर्गच्या ग्रहणातून बाहेर पडू लागलेत.

या पार्श्वभूमीवर या आठवड्यात (१८ डिसेंबर २०२३) या महिन्यात, पुढच्या तिमाहीत आणि मुख्यतः २०२४ या वर्षात बाजाराचे चित्र कसे असेल, व्यापाराचे, गुंतवणुकीचे दिशा आणि धोरण काय असावे याची चर्चा मिपावर व्हावी या हेतूने हा धागा काढत आहे.*

स्फूट नोंदी:

इरेडा आइपीओची वर्गणी भरली होती. एकच लॉट मिळाला. ३२ च्या भावाने मिळालेल्या ४६० स्टॉक्सपैकी ८५ च्या भावाने १७३ स्टॉक्स विकून टाकले आणि भांडवल मोकळे केले. सध्या २८७ स्टॉक्स आहेत. १२३ पर्यंत गेलेला भाव सध्या ११० च्या खाली आलाय.
ऍक्सेंट मायक्रोसेल आइपीओची वर्गणी भरली होती. एकही लॉट मिळाला नाही.
नेट अवेन्यू आइपीओची वर्गणी भरायची होती, तिसऱ्या दिवशी पेमेंट करणे झाले नाही. १८ चा भाव ३४ वर गेलाय.
प्रेस्टनिक इंजिनीअरिंग, डॉम्स इंडस्ट्रीज आइपीओची वर्गणी भरली आहे.

सुतोवाच करण्यासाठी काही प्रश्न:

सुझलॉन वर्षभरात थोडा थोडा करून सरासरी १४ वर घेतला होता, मध्यंतरी ३० वर थोडा विकला होता, आज अजून ३८ वर घ्यावा असा विचार सुरु आहे. दसरा-दिवाळीपर्यंत पन्नाशी पार करेल का?
येसबँक या वर्षाच्या सुरुवातीला १६ वर घेतला होता, अजून ठेवला आहे. २०२५ च्या सुरुवातीपर्यंत पन्नाशी पार करेल का?
मार्चमध्ये चाळीशीच्या खाली असलेला बँकनिफ्टी काळ अट्ठेचाळीशीवर गेला, येत्या मार्च-जूनपर्यंत पन्नाशी पार करेल का?
रेल्वेला सेवा / उत्पादने पुरविणाऱ्या कंपन्यांत सहा महिन्यांसाठी गुंतवणूक करावी का?
भारत सरकार अपारंपारिक ऊर्जा क्षेत्राला उत्तेजन देत आहे. त्यांतील कंपन्यांत वर्ष-सहा महिन्यांसाठी गुंतवणूक करावी का?
अमेरिकेच्या बाजाराचे चित्र पुढच्या तिमाहीत कसे असेल?
२०२४ लोकसभा निवडणुकांपर्यंत अडाणीचे स्टॉक्स वधारतील का?

* 'बाजारात काहीही निश्चित नसते' वगैरे ढिसक्लेमर्स धरून / बाजूला ठेऊन मिपा तज्ज्ञांनी योगदान द्यावे ही विनंती. चर्चेतून झालाच तर मिपाकरांचा फायदा होईल आणि अजून वर्ष-सहा महिन्यांनी आपापले अंदाज किती बरोबर-चूक ठरले याची पडताळणी करून पाहता येईल. मिपावर राजकीय धुळवंड सुरु नाहीय, आर्थिक लठ्ठालठ्ठी सुरु करायला काय हरकत आहे? आखाडा सुरु झाल्यावर चार-दोन गुद्दे देता-घेता येतील ;-)

चूभूदेघे.

---

सध्या तरी बाजारात "काठोकाठ भरू द्या प्याला फेस भराभर उसळू द्या" अशी स्थिती आहे; एवढ्यातच "मानस का बधिरावे हे? बघतसे खिन्न जगता" असे होऊ नये ही श्री वेंकटेश्वर स्वामी चरणी प्रार्थना.

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Dec 2023 - 3:41 pm | राजेंद्र मेहेंदळे

उत्तम धागा आणि माझे २ पैसे

फेब्रुवारीत हिंडेन्बर्गने अदानीला ग्रहण लावले आणि ४१०० चा शेअर(अदानी एंटरप्राईस) १३०० पर्यंत घसरला. यथावकाश आरोप प्रत्यारोप झाले आणि तो २००० पार करुन वर वर येउन आता ३००० ला आहे. जरी मार्केट मधे आता थोडे करेक्शन अपेक्षित असले तरी माझ्यामते येत्या वर्षभरात किवा आधीच हा शेअर पुन्हा ४१०० पातळी गाठेल.

एल आय सी/आय आर सी टी सी सध्या बरे चालले आहेत. फायद्यात असल्यास विकुन टाकावेत. सेम विथ अदर सरकारी शेअर्स.

पॉवर आणि आय टी चे शेअर्स नेहमी वाढतच जातात, ते लाँग टर्म ठेवावेत.

रेल्वे सक्षम/मॉडर्न करण्याचे सरकारी प्रयत्न बघता रेल्वे शी संबंधित शेअर्स घ्यावेत( टिटागढ्/गॅब्रिएल).

एकुणच ईन्फ्रास्ट्रक्चर गुंतवणुक कोविडनंतर वाढत आहे त्यामुळे ते घ्यावेत( एल अँड टी वगैरे)

बँकनिफ्टीला माझा पास.

२ पैसे समाप्त.

वामन देशमुख's picture

3 Jan 2024 - 3:08 pm | वामन देशमुख

अदानींचे स्टॉक्स हिंडेनबर्गच्या ग्रहणातून बाहेर पडू लागलेत.

अदानी हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.
https://www.moneycontrol.com/news/business/adani-hindenburg-case-verdict...

अदानींच्या सर्वच कंपन्यांचे स्टॉक्स दहा-बारा टक्क्यांनी चढून सात-आठ टक्क्यांवर स्थिरावले आहेत.

https://www.moneycontrol.com/news/business/markets/adani-group-stocks-cl...

अमरेंद्र बाहुबली's picture

3 Jan 2024 - 7:33 pm | अमरेंद्र बाहुबली

हिंडेनबर्गचा आणखी एक अहवाल येईल.

आता हिंडनबरर्गचा नाही.. दुस-या कोणत्यातरी नावाने येईल
काँग्रेस धुरळा उठवेल, मोदी शहा अदानी आणि सामान्य जनता शांत राहील
मार्केट प्लेअर्स धुरळा बराच उठला की अदानीचे शेअर्स घेतील
नंतर धुरळा खाली बसला की शेअर्स वर जातील, मार्केट प्लेअर्स विकून टाकतील

५०-६० च्या दशकात टाटा बिर्ला
८०-९० च्या दशकात अंबानी
आता सध्या अदानी

मोडस ऑपरेंडी एक समान

पाडा... घ्या.... वर आला... काढा... पैसा छापण्याचे कायदेशीर तंत्र

सुबोध खरे's picture

12 Jan 2024 - 11:37 am | सुबोध खरे

आमचं असं का होतं ते कळत नाही आणि कळलं तरी वळत नाही.

१) आम्ही एखादा शेअर उत्तम आहे म्हणून विकत घेतला कि सुरुवातीला तो थोडा चढतो मग आम्ही अजून थोडे विकत घेतो. मग तो परत थोडा चढतो म्हणून आम्ही अजून थोडे शेअर विकत घेतो. यानंतर तो शेअर जो पडतो तो काही परत वर येत नाही

२) एखादा चांगला शेअर घेतलेला असतो तो पडायला लागला कि आम्ही स्टॉप लॉस लावतो. स्टॉप लॉस च्या किमतीला आल्याबरोबर सर्व शेअर विकले जातात आणि आपले नुकसान कमी झाले या समाधानात असतो तर त्यानंतर हा शेअर चढत जातो आणि त्यात पैसे गुंतवलेल्याना दाम दुपटीपेक्षा जास्त नफा देतो.

३) यामुळे आम्ही एखादा शेअर पडलेला असताना विकत घेतो आणि शांत बसून राहतो. हा शेअर चढत चढत जातो दुप्पट होतो तिप्पट होतो म्हणून खुशीत येऊन आम्ही तो विकून चांगला नफा पदरात पडला म्हणून खुश होतो तर हा शेअर चढत चढत दसपटीपेक्षा जास्त जातो, वर एकास एक बोनस देतो.

४) असाच एखादा शेअर वर वर चढत असताना सर्वत्र त्याचे गुणगान चालू असते म्हणून मग fomo होऊ नये म्हणून आम्ही तो विकत घेतो त्यानंतर तो थोडासा चढतो आणि मग इतका गडगडतो कि ५ % सुद्धा मूल्य हातात येत नाही

५) एखादा शेअर दहा पट चढला म्हणून आम्ही तो विकून टाकतो आणि त्यानंतर त्याचा बोनस शेअर निघतो. परत आम्ही हात चोळत बसतो

६) आम्ही एखादा शेअर फारच स्वस्त आहे म्हणून भरपूर विकत घेतो आणि तो एके दिवशी मल्टी बॅगर होईल म्हणून गाजरे खात असतो. पण एके दिवशी या शेअरला लोअर सर्किट लागते आणि आम्हाला विकायचा असला तरी कोणीच घेत नाही आणि एक दिवशी शेअरची बाजारात खरेदी विक्रीच बंद होते आणि प्रत्येक वेळेस बाजारातून येणाऱ्या समाभागांच्या सूचित शेअर खरेदी विक्री बंद आहे म्हणून नोंद आम्हाला खिजवत राहते.

७) या सगळ्याला कंटाळून आम्ही शेवटी बाजारातून नुकसान सोसून बाहेर पडतो आणि आपला पैसे सुरक्षित अशा बँकेच्या मुदत ठेवीत जमा करतो.
यानंतर बाजार चढतच जातो आणि आम्ही विकलेले प्रत्येक समभाग आम्हाला वाकुल्या दाखवत राहतात. याशिवाय बँकेत ठेवलेल्या मुदतठेवी १० % कर कापून व्याज खात्यात जमा करतात ते पाहून हसावे कि रडावे कळत नाही

आमचं असं का होतं ते कळत नाही आणि कळलं तरी वळत नाही.

यातले एक किंवा अनेक अनुभव आपल्यापैकी सर्वाना कधीना कधी आलेले आहेतच.

राजेंद्र मेहेंदळे's picture

12 Jan 2024 - 1:49 pm | राजेंद्र मेहेंदळे

कितीही फंडामेंटल अ‍ॅनालिसिस करा किंवा अजुन काही!! मार्केट कोणाच्या xx लाही कळलेले नाही.

ऐकीव माहीतीनुसार- मोजके १०-१२ ग्रुप्स मार्केट फिरवत असतात आणि एका मर्यादेनंतर तुम्हाला होणारा नफाही कंट्रोल करत असतात.

तेव्हा सुरक्षित रहायचे असेल तर म्युचुअल फंड्मध्ये गुंतवणुक करा किंवा मोजक्या ए ग्रुप कंपन्यांचे शेअर्स बाळगुन रहा (कमीत कमी ५ वर्षे किंवा अधिक).

नपेक्षा दर महीन्याला ठराविक सोनाराकडुन काही ग्रॅम सोने घेउन डालडाच्या डब्यात टाकत रहा. कधीच नुकसान होणार नाही, लिक्विडीटी ची गॅरंटी, कुठल्याही देशात विकु शकता---फक्त बाळगायची जोखीम आहे(चोरी वगैरे)

अमरेंद्र बाहुबली's picture

12 Jan 2024 - 2:21 pm | अमरेंद्र बाहुबली

+१

विअर्ड विक्स's picture

13 Jan 2024 - 10:25 am | विअर्ड विक्स

बहुतांशी सहमत . पुढील प्रतिसाद हा माझ्या गुंतवणुकीच्या अनुभवावर आधारित आहे , चान्गले नि वाईट दोन्ही अनुभव नोंदवत त्यामुळे लोकांचा फायदा होवो.

शेअर - कोणतीही गुंतवणूक सुरक्षित नसते. नफा आणि नुकसान हे धंद्यात होतेच तसे शेअर बाजारात होते हे उमगले तर धक्का बसणार नाही. राहिली गोष्ट मोजक्या A ग्रुपची, तर इंडेक्स चा अभ्यास यावर एक झी business वर स्टोरी पहिली होती . ११९३ ला सेन्सेक्स मधले फक्त ६ शेअर आता च्या सेन्सेक्स मध्ये आहेत. टाटा पॉवर , lnt , RIL नि अजून काही. ITC नि RIL हे शेर किती वर्ष एका रेंज मध्ये अडकले होते याचा अभ्यास करा. ( मी स्वतः यांचा भागधारक आहे ) सत्यम , येस बँक ( यातून वेळीच बाहेर पडलो ), DHFL , किंगफिशर, जेट असे कितीतरी डार्लिंग शेर आता कुठं आहेत ते अभ्यासा. याउलट आयएफबी, सीमेन्स नि सेरा अशा मिडकॅप नि धुवाधार वाढ झालीये ( गुंवणूक कालावधी १०वर्षे +). त्यामुळे शेअर मध्ये सुद्धा डिव्हर्सिफिकेशन असावे या मताचा मी आहे . वाईट अनुभव - बुडीत खात्यात समजून HCC मध्ये गुंतवलेत अजून मुद्दलसुद्धा रिकव्हर झालेली नाही .

सध्या अनेक इन्फ्लूअसर MF सिप वर टीका करताना दिसतात पण स्टॉक सिप वर कोणी टीका करतांना दिसत नाही , कारण समजून घ्या. MF मध्ये गुंतवणूक हि कमी धास्तीची असते पण १००% सुरक्षित नसते. मी सेक्टरल MF ( तो पण IT वाला ) यात पैसे गमावलेत. त्यामुळे large ,फ्लेक्सि नि हायब्रीड scheme गुंतवणूक कमी धास्तीची ठरते थोडा कमी परतावं मिळाला तरी हि.

कोणी कितीही झापडबंद म्हणाले तरी पुढील ठोकताळ्यावर NPS चालते
१. वयानुसार डिव्हर्सिफिकेशन ( यातही पर्याय आहे ज्यांना पाहिजे ते पूर्णतः इक्विटी मध्ये गुंतवू शकता )
२. एक्सपेन्स रेशो सर्वात कमी ( प्रत्येक हफ्त्यावर किती पैसे कापतात हे स्पस्ट लिहिलेले असते. माझी गुंतवणूक टायर १ नि टायर २ दोहोंत आहे . पण टायर २ चा उपयोग मी पूर्णतः अजूनही करू शकलेलो नाही

हेच ठोकताळे वापरून आपण MF नि Share मध्ये पैसे गुंतवू शकता .

सोने - सुचवलेला पर्याय चांगला आहे पण बँक दागिन्यांवर लोन देते . २४ केरट वर नाही . त्यामुळे २४ केरट सोने घेऊन मोडीत काढण्याचा अनुभव नाही त्यामुळे सोनार व सावकार असे सोने घेत असल्यास अनुभव सांगावा. SGB हा lumpsum गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे . गोल्ड mf व etf मध्ये गुंतवायचा विचार आहे, अनुभव नाही ,कोणी केले असल्यास अनुभव सांगावा

NCD /कॉर्पोरेट FD/P२P - चांगले नि वाईट दोन्ही अनुभव आहेत . DSK नि हेलिओस मॅथोस मध्ये अडकले आहेत . बाकी सर्व ठिकाणी पैसे मिळाले वेळेत. क्रिसिल रेटिंग बघून गुंवणूक करावी . P२P सध्या पहिल्यांदा गुंतवणुक केलीय , अनुभव सांगेन वर्षानंतर

CRYPTO / BLOCKchain /कमोडिटी - माझा पास

PPF नि NSC - माझी गुंतवणूक शून्य . पण पर्याय चांगले आहेत जर आपणास गुंवणूकीचा श्रीगणेशा करायचा असेल तर व उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर :)

रिअल इस्टेट - यावर्षी म्हणजे गेल्या वर्षी या क्षेत्रातील शेअर नि चांगला रिटर्न दिला . माझी गुंतवणूक शून्य आहे या क्षेत्रातील स्टोकमध्ये पण यावर्षी ancillary मध्ये गुंतवण्याचा विचार आहे . गोदरेज प्रोपर्टी मध्ये गुंतवण्याचा विचार होता पूर्वी पण आता हा स्टोक खूपच पळालंय.( असे watchlist मध्ये असणारे अनेक स्टॉक मी फक्त watch च करत राहिलो याचे दुःखच आहे ;) ). घर घेण्यापेक्षा ultratech सिमेंट शेअर घ्या ;)

नि हो महत्वाचे राहिले - मी टाटा टेकनॉलॉजि नि IREDA , व रेल्वे नि डिफेन्स PSU वर वॉच ठेऊन गुंतवणूक करणार आहे .

एवढेच लिहून थांबतो सध्या ,

साधक बाधक चर्चा अपेक्षित आहे

त्यामुळे २४ केरट सोने घेऊन मोडीत काढण्याचा अनुभव नाही त्यामुळे सोनार व सावकार असे सोने घेत असल्यास अनुभव सांगावा>>>

जे मोठमोठे सोनार आहेत जसे की अष्टेकर, गाडगीळ वगैरे ते तुम्हाला काउंटर वर सोने घेऊन कॅश देत नाहीत. सोने घेऊन चेक देतात. मला बहुतेक ओरिजनल पावती मागितली नाही. टॅक्स बसतो.

जे छोटे सोनार आहेत त्यांच्याकडे कॅश व्यवहार होतात. ओरीजनल पावती लागते. बार्गेनिंग करता येते.

दोन्हीकडे मोडीचाच भाव लागतो.

काही सोनार कॅश्/चेक काही देत नाहीत, बिस्कीटे/नाणी जे काही असेल ते मोडून दागिनेच करुन घ्यावे लागतील असे सांगतात.

सुबोध खरे's picture

13 Jan 2024 - 12:01 pm | सुबोध खरे

मी लॉन्ग टर्म बद्दलच लिहिलंय. मी शॉर्ट टर्म करतच नाही आणि फ्युचर ऑप्शन्स तर नाहीच नाही.

Derivatives time bomb
The term is credited to the famous investor Warren Buffett, who has also called derivatives "financial weapons of mass destruction.

एवढं सगळं होऊनही मी गेली १६ वर्षे बाजारात आहे आणि साधारण १०-१२% CAGR कमावत होतो. गेल्या एक वर्षातील नफा पहिला तर तो १७-१८ % पर्यंत गेला आहे.

पण आज मितीस ( या फुगवटा असलेल्या बाजारात) बाजार किती चढेल आणि किती आपटेल, आपले किती टक्के आणि कोणते समभाग विक्री करावी याचे गणित कोणीही महापंडित सांगू शकलेले नाही.

निफ्टी च्या ५० पैकी २८ समभाग थोड्या थोड्या प्रमाणात माझ्या खात्यात जमा आहेत. त्याचा अर्थ पंडितांच्या दृष्टीने माझी गुंतवणूक फार वाईट नाही.

गमतीची गोष्ट म्हणजे यातील सर्वात जास्त नफा मी २०२० च्या पडत्या बाजारात घेतलेल्या उत्तम समभागातून मिळताना दिसतो आहे. उदा टीसी एस १६०० ते १८०० च्या आसपास घेतला होता तो आज ३८०० आहे एस बी आय १६० चा ६३३ आहे, टाटा मोटर्स ९० ला घेतलेला ८३३ ला आहे. एल अँड टी ८००-९०० ला घेतला होता तो आता ३५०० च्या वर आहे.

पण यातले कुठले समभाग केंव्हा विकावे हे कोणीहि पंडित सांगत नाहीत.

याच अनुभव मला २००८ च्या पडत्या बाजारात आलेला आहे.

लोकांनी दिलेल्या टिप्स आणि बातम्यांमुळे माझे १०० % नुकसानच झालेले आहे यात माझे नातेवाईकही आहेत. गमतीची गोष्ट म्हणजे यात त्यांचे स्वतःचे नुकसानही झालेले आहे.

यामुळे गेली पाच वर्षे मी कुणाचाहि सल्ला ऐकत नाही. जो काय नफा होईल तो माझा स्वतःचा असेल आणि बुडालो तरी मी स्वतःच्या हाताने.

खुप दिवसानी मिपा वर आलो आनि हा धाग पाहिला.

चांगले वाटले.

नुकताच OPTIONS चा AI BOT लिहिला आहे मित्रा बरोबर. OPTIONS मध्ये रोज एक हजार नुसार ५ महिन्यात १ लाख कमवले पण त्यात मज्जा नाहि. स्ट्रेस आणि वेळ खुप्प्च जात असल्याने OPTIONS सोडले. पैसे जाण्याचे हि चान्स आहेतच म्हणुन पण सोडले.बॉट मित्राला दिलाय , इन्टीग्रेशन त्याचे असल्याने तोच चालवेल. मला नको.

आणि मी मात्र पुन्हा लॉन्ग टर्म अभ्यासा कडे वळालो २४ डिसेंबर २०२३ पासुन.
या १५ दिवसात, काहि पैसे चांगल्या कंपणी मध्ये गुन्तवले .
खुप सारा अभ्यास केला, करतो आहे .. हायड्रोजन , पॉवर, ईन्फ्रा, त्याच बरोबर फर्टीलायझर , केमिकल , मिनरल्स, खाणी, शिप्पिंग रेल आयटी. अश्या अनेक सेक्टर चा अभ्यास करतोय रोज.
PE/ ROCE ROE PROFIT, CAPEX , PLAN , GROWTH, SALES, DEBT and all other factors असा रोज अभ्यास चालु आहे.
२०२० पेक्शा या वेळेस खुप वेगवेगळ्या पद्धतोने अभ्यास चालु आहे

लाँग टर्म अभ्यासात आणि आता थोड्याश्या प्रोफिट मध्ये हि जास्त आनंद आहे, जो ऑप्शन्स मध्ये कधी हि नव्हता.

ACCENTURE COMPANY मध्ये दर महिन्याला १५००० (१५% सुट मिळते) या प्रमाणे युएस चा शेअर घेतोय ...
दर महिन्याला येथुन पुढे २५००० - ३०००० लाँग टर्म मध्ये टाकुन ५-७ वर्षात २५-४० लाखाचा पोर्ट्फोलिओ बनवणार आहेच.

याच बरोबर , घराचे जे लोण १५ वर्ष राहिले होते ते गेल्या वर्षी हप्ता डबल करुन ५ वर्षावर आणले आहे, ते महत्वाचे . आणी मग ५ वर्षांनी पुन्ह पोझिशनलकडे थोडे वळेल.

लाँग टर्म मध्ये जास्त पैसे टाकता येतिल घराचे हप्ते संपल्या वर.

अभ्यासाचे तर मी विचार केलेला माझा जुना धागा पुन्हा पुढे लिहावा .. पण यावेळेस वेळ खुपच कमी आहे, त्यात हेल्थ सेक्टर मध्ये बिझिनेस चालु केल्याने जास्तच बिझी झालोय..

पण मध्ये आधे येत जाईन हा धागा वाचेनच .. वयक्तिक तर कधी ही बोलत राहिनच

फास्ट लिहिल्याने, शुद्धलेखना नसल्या बद्दल माफी असावी

गणेशा

विअर्ड विक्स's picture

13 Jan 2024 - 10:27 am | विअर्ड विक्स

अरे वाह ...

आम्हाला पण गृहपाठ देत जा थोडा , आनंदाने करू.

निवडलेले सेक्टर चांगले आहेत .

मिपा वर आजकाल कमी येणे होते, त्यामुळे सातत्य नाही राहणार.. So येथे नाही देता येणार.. मागे मी long term चा अभ्यास कसा करावा हे खुप थोडक्यात येथे सांगितले होते एका माझ्या share market ची बाराखडी ह्या धाग्यात..

तसेच वयक्तिक मला माझ्या सर्व मित्रांनी पण long term गुंतवणूक करावी वाटली.. कारण ५ वर्षांनी माझ्याकडे २५-३० लाख झाल्यावर त्यांना मी कसे भारी केले हे सांगण्या पेक्षा आधीच आपण असे करू आणि सोबत राहू आणि जर ५ वर्षात माझे मित्र बरोबर असतील तर आनंद जास्त आहे, या माध्यमातून closed whats app group वर add करून अभ्यासा सहित मी गुंतवलेले शेअर सांगितले आहे..

त्याच बरोबर जो मी current affair cha अभ्यास केला ते सांगतोच आहे.

मी दर महिन्याला २५ k टाकणार आहे, आणि सुरुवातीलाच माझे जवळ जवळ वर्षाचे पैसे गुंतवले गेले :).

मी घेतलेले shares.

Infra -
Oil gas pipeline -Likhita
Welspun enterprizes
Ircon international

Oil - OIL

IT
wipro खुप खालच्या level ला.
Adsl जो ६०% वाढला एका महिन्यात.
Explesol

Fertilizer
- gujarat state fertilizer

Mining -
Hindustan copper आणि tata steel.

Wire -
Msumi wiring

Engineering and technology.
tata technology, AZHAD
Praj for ethenol plant

Electronics - BEL

DEFENSE SHIPPING आणि BANKING NEXT MONTH मध्ये ADD करतोय

वामन देशमुख's picture

13 Jan 2024 - 4:19 pm | वामन देशमुख

याच बरोबर , घराचे जे लोण १५ वर्ष राहिले होते ते गेल्या वर्षी हप्ता डबल करुन ५ वर्षावर आणले आहे, ते महत्वाचे .

मतभिन्नतेच्या आदरासहित:

माझे राहत्या घराचे गृहकर्ज मी मागच्या दोन वर्षात मुदतपूर्व फेडून टाकले. त्यामागे. "आपल्या डोईवरचे छप्पर तरी पूर्णतः आपल्या मालकीचे असावे" असा माझा आणि अर्धांगिनीचा निव्वळ भावनिक विचार होता. अर्थातच तो माझ्या अर्थव्यवस्थापन पद्धतीविरुद्ध होता. इतर गृहकर्ज सुरु आहेत आणि ती मुदतपूर्व फेडण्याचा अजिबात विचार नाही.

गृहकर्ज सर्वात कमी व्याजदराने उपलब्ध असतात. ती फेडण्याऐवजी तीच रक्कम इतर योग्य ठिकाणी (बँक ठेवी, पीपीएफ वगैरे सोडून), सोने, स्टॉक्स, अजून स्थावर मालमत्ता वगैरे यांत गुंतवावी*. इतर गरजा उदा. लॅपटॉप, फोन, वगैरेसाठी कर्ज घेण्याऐवजी ती रक्कम खर्च करावी. गृहकर्ज सोडून इतर सर्व कर्जे महाग असतात.
---

*त्याव्यतिरिक्त disposable रक्कम उरत असेल तर पर्यटन वगैरे मौजमजा करावी ;-)

गणेशा's picture

27 Jan 2024 - 10:34 am | गणेशा

:).

Share market शी अवांतर :

मला वाटते माझे विचार असेच होते आधी.. पण वयानुसार बदल होत जात असावा बहुतेक..

कारण तिशी तुन चाळीशी कडे आल्यावर, आपल्याकडे राहिलेला वेळ हा जास्त महत्वाचा असे वाटू लागते, मग किती पैसे साठवतो किंवा गुंतवतो या पेक्षा priority हि, आपण कर्ज विरहित राहून कुठल्या हि ओझ्याखाली न राहता मुक्त रहावे -फिरावे असे वाटू लागले.

ते आर्थिक दृष्ट्या चूक असेल, नव्हे हे माझ्याच जुन्या विचारांच्या विरुद्ध आहे, पण किती पैसे आपल्याकडे राहतील यापेक्षा आपण तणाव मुक्त आहोत काय, job गेला किंवा घरी बसलो तरी व्यवस्थित राहू शकेल ना, या विचारातून मग विचार बदलत गेले..

हे वयक्तिक आहे पण हे असे घडले, भावनिक असे नाही.

पण यामुळे एक मात्र चांगली गोष्ट झाली, मी नव नविन उत्पन्न सोर्स वाढवण्याचा प्रयत्न केला, आणि सर्वात यश आले ethically राहून insurance मध्ये planner झाल्याचा.. गेल्या वर्षी माझे extra उत्पन्न हे ३० k per month पेक्षा जास्त आले.

असे होत रहाते, प्रत्येक निर्णयाला काही चांगली, किंवा काही वाईट झालर जोडली जाते.. फक्त निर्णय आपले पाहिजेत आणि ते घेता आले पाहिजेत..

आणि तुम्ही बिनधास्त बोला आदर तर कायम राहिनच.. Disclaimer ची गरज नाही

आग्या१९९०'s picture

12 Jan 2024 - 6:09 pm | आग्या१९९०

लाँग टर्म अभ्यासात आणि आता थोड्याश्या प्रोफिट मध्ये हि जास्त आनंद आहे, जो ऑप्शन्स मध्ये कधी हि नव्हता.
छान!
सध्या असा आनंद घेणारे फार कमी लोकं आहेत.. गेली ३० वर्षे मी हा आनंद घेत आहे. लाँग टर्म equity गुंतवणुकीमुळे भरपूर नफा मिळाला आहे. लोकांना लाँग टर्म equity गुंतवणुकीबद्दल कितीही जीव तोडून सांगितले तरी ते अमलात आणत नाही हा माझा अनुभव आहे.

राघव's picture

12 Jan 2024 - 7:51 pm | राघव

स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवणे आणि धीर धरणे हा फार महत्त्वाचा गुण आहे.

अर्थात् असे म्हणायचे नाहिये की आपला अभ्यासच सर्वात चांगला किंवा आओअण कधी चुकणारच नाही.
पण जसं एखाद्या व्यापारात कुणा एखाद्याला पैसा द्यायचा असला भांडवल म्हणून तर आपण काही बेसिक माहिती घेऊच; पण नियमितपणे सगळं कसं काय चाललंय याचीही माहिती ठेऊ, तसंच हे आहे. जर नियमित नीट चालत नसेल तर त्यातून होऊ शकणाऱ्या तोट्याचा अंदाज बांधून तशी तरतूद आपल्या बजेट मधे करणे क्रमप्राप्त आहे. अशी तरतूद करतांना बरोबर समजते की हे भांडवल काढून घेतले पाहिजे किंवा नाही. त्याप्रमाणे निर्णय घेणे हा ही गुंतवणुकीचाच एक महत्त्वाचा भाग आहे.

हे इतक्या जणांना डोकेफोड करून सांगितलंय पण तुम्ही म्हणता तसे ते कुणीच मनावर घेत नाहीत!

आंद्रे वडापाव's picture

14 Jan 2024 - 12:15 pm | आंद्रे वडापाव

या फायनान्शिअल वर्षात (अजून वर्ष पूर्ण होण्यास दोन अडीच महिने आहे ).. मी काही लक्ष , शॉर्ट टर्म कॅपिटल गेन मिळवलाय.
हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन हा ( माझ्या फ्रेशर म्हणून पहिली नोकरी केली त्यावेळच्या सी टीसी पेक्षा ४ पट जास्त आहे. )
( तसेच आता पर्यंत मी गेल्या १४-१५ वर्ष्याच्या एकूण शेअर मार्केट प्रवासात, माझ्या फ्रेशर म्हणून नोकरी पहिली केली त्यावेळच्या सी टीसी एव्हडा, तोटाही केला आहे. )
पण तोटा आणि नफा गुंणोत्तर माझं १: १० आहे . म्हणून मी माझे दोन पैसे इथे मांडतो.

स्वतःचे पैसे , "सुशिक्षित" लोकांनी स्वतः (अभ्यास करून) गुंतवले पाहिजे.
"अभ्यास " या पैलूला तुम्हाला सुट्टी देऊन चालणार नाही . तुम्हाला अमृत हवे असेल तर समुद्रमंथनाचे श्रम हे तुम्हाला घ्यावेच लागेल.
अमृताच्या शोधात कधी प्रथम तुम्हाला विष मिळालं , तर ते तुम्हाला प्राशन करण्याचे धैर्य हि हवेच..
अमृताच्या शोधात कधी प्रथम तुम्हाला विष मिळालं, तर , "चल हॅट , हे सगळं बकवास आहे , समुद्र मंथनाची प्रोसेस ही मॅच फिक्सिंग च आहे , समुद्र मंथन हा एक सट्टा आहे " असं म्हणून रणांगण सोडून चालणार नाही.

मी एक रिटेल इन्व्हेस्टर आहे आणि मला इतर वाचक रिटेल इन्व्हेस्टर ना, माझी काही सूत्र मला इथे मांडावीशी वाटतात ..

१. फंडामेंटली स्ट्रॉंग, प्रॉफिट मेकिंग कंपन्या मधेच गुंतवणुक केली पाहिजे ( गेली ५ वर्षे कंपनीचा सेल्स, प्रॉफिट, प्रॉफिट मार्जिन किंचित का होईना पण वाढत जाणारेच हवे, कंपनीवर कमी कर्ज हवे (अर्थ क्षेत्रातील कंपनींना हे 'कर्ज' अट लागू नाही)

२. जेंव्हा काही शंका येईल तेव्हा नियम १ परत पाहावा व समजून घ्यावा

३. शेअर केव्हा घ्यायचा हे जसं महत्वाचे , तितकेच तो केव्हा विकावा हे हि आधी आपल्याला माहिती पाहिजे .
शेअर घेतला आहे आणि पडून आहे कुठेतरी कोपऱ्यातप, असे होऊ नये. शेअर अंडर वॅल्यूड किंवा फेअरली व्हॅल्युएड असेल तर खरेदी करावा. ओव्हर व्हॅल्युएड झाल्यास विकून नफा पदरात पाडून घ्यावा.

४. फ्युचर आणि ऑप्शन्स हे विषासमान आहे , कुठल्याही परिस्तिथी मध्ये रिटेल गुंतवणूक दारांनी त्याच्या वाटेला जाऊ नये.

५. आय पी व च्या फंदात कधीही पडू नये ( पहा नियम १)

६. गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या ह्या पाच पैसे का होईना पण नेहमी प्रॉफिट मधेच असणाऱ्या असाव्यात ( पहा नियम १)

७. नवख्या गुंतवणूकदारांनी इंडेक्स इ टी एफ मध्ये पैसे लावावे आणि इंडिविज्युअल शेअर हे पेपर एंट्री ठेवाव्यात
या पेपर एंट्री जर निदान १ वर्ष , कागदोपत्री जर फायदा दाखवत असतील, आणि आपल्या अंदाजाच्या जवळपास शेअर हालचाल करत असेल
(निदान दिशा तरी सेम येत असेल ) तेव्हा हळू हळू इंडिविज्युअल शेअर मधील गुंतवणूक वाढवत न्यावी.

८. शॉर्ट सेलिंग करू नये. कमी भावात डिलिव्हरी घेणे आणि जास्ती भावात विकणे हेच साधे सूत्र रिटेल गुंतवणूकदाराने ठेवावे.

वामन देशमुख's picture

15 Jan 2024 - 10:11 am | वामन देशमुख

शॉर्ट सेलिंग करू नये. कमी भावात डिलिव्हरी घेणे आणि जास्ती भावात विकणे हेच साधे सूत्र रिटेल गुंतवणूकदाराने ठेवावे.

शंभर टक्के सहमत

वामन देशमुख's picture

15 Jan 2024 - 10:10 am | वामन देशमुख

रच्याक,

स्टॉक मार्केटमध्ये स्कालपिंग, डे, स्विंग, पोजिशनल वगैरे ट्रेडिंग करून महिन्याला किमान दोन लाख रुपये कमाविण्याचा अनुभव कुणा मिपाकरांचा आहे का?

त्यासाठी किती भांडवल लाजेल?

आंद्रे वडापाव's picture

15 Jan 2024 - 11:52 am | आंद्रे वडापाव

जनरली,
पगारा प्रमाणे प्रती महिना २ लाख नफा असं कोणालाही मिळत नाही...

९९% टक्के पेक्षा जास्त ट्रेडर्स हे तोट्यात असतात, किंवा त्यांचे रिटर्न एफ डी पेक्षा खुप कमीच असतात...

आंद्रे वडापाव's picture

15 Jan 2024 - 12:05 pm | आंद्रे वडापाव

तुम्ही जर जवळ जवळ सुमारे ३.६ कोटी , ३० लाख प्रती महिना, १२ महिन्यांच्या मुदतीचे ट्रेजरी बिल्स, सलग १२ महिने घेवून ठेवले
(१२ टप्प्यात) आणि १३ व्या महिन्याला (१२ महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या ) १० लखावरील व्याज बाजुला काढून, परत ते १० लाख पुढील १२ महिन्यासाठी ट्रेजरी बिल्स मध्ये गुंतवले.
असा गांधीजींचा चरखा चालू ठेवला, तर शेअर्स मधील रिस्क न घेता, कमी जोखमीचे नियमित उत्पन्नाचे साधन होईल...

पगार अश्या नियमित गोष्टी सारखी सातत्यता
शेअर बाजारात नसते...

आंद्रे वडापाव's picture

15 Jan 2024 - 12:07 pm | आंद्रे वडापाव

दुरुस्ती

१० लखावरील व्याज बाजुला काढून, परत ते १० लाख पुढील १२ महिन्यासाठी ट्रेजरी बिल्स मध्ये गुंतवले.
असा गांधीजींचा चरखा चालू ठेवला,

३० लखावरील व्याज बाजुला काढून, परत ते ३० लाख पुढील १२ महिन्यासाठी ट्रेजरी बिल्स मध्ये गुंतवले.
असा गांधीजींचा चरखा चालू ठेवला,

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Jan 2024 - 2:18 pm | राजेंद्र मेहेंदळे

पण मुळात माझ्याकडे साडेतीन कोटी नगद असतील, तर हे सगळे कुटाणे करायची गरजच काय? बँकेत ठेवुन दरमहा १ टक्का जरी व्याज मिळाले तरी डोक्यावरुन पाणी.

आंद्रे वडापाव's picture

15 Jan 2024 - 2:53 pm | आंद्रे वडापाव

परतावा
बँकेपेक्षा, मुदतठेव मध्ये जास्त...
मुदत ठेवी पेक्षा ट्रेजरी बिल्स जास्त..

आता तुम्ही महिना २ लाख नियमित उत्पन्न
मिळवायचे असेल, आणि तुमचे भांडवल पण सुरक्षित ठेवायचे असेल तर
मला तरी ट्रेजरी बिल्स सुचवावेसे वाटले...

बाकी साधारणपणे महिना २ लाख कमावण्यासाठी (भांडवल सुरक्षित आणि कमीत कमी जोखीम) तुम्हाला ३.६ कोटी साधारण पणे गुंतवावे लागतील.

जर तुमच्याकडे ३.६ कोटी गुंतवणे करिता नसतील...

तर तुमच्या कडील उपलब्ध निधी अनुसार तुम्हाला, तुमच्या मासिक नियमित उत्पन्न बाबतीतील, तुमच्या आपेक्षा अप्रॉप्रियटली
योग्य वास्तविक पातळीवर आणून ठेवाव्या लागतील...

धर्मराजमुटके's picture

16 Jan 2024 - 3:33 pm | धर्मराजमुटके

पॉलीकॅब इंडिया मधे साधारण १०००० करोड ची टॅक्स चुकवेगिरीची बातमी आल्यावर शेअर जवळपास २८% ने खाली आला. माझी यावर अचानक नजर गेली. बातम्या विरोधात असताना देखील कंपनीच्या व्यवसायाचे आकडे पाहता यात पैसे गुंतविण्याचा निर्णय घेतला.
११ जानेवारी खरेदी किंमत : रु. ३९०३.१०
१६ जानेवारी ची किंमत रु. ४३४५.००

काही पत नामांकन संस्थांनी हा शेअर ८००० पर्यंत जाईल असा अंदाज वर्तवला आहे. १८ जानेवारीला त्यांच्या ३ र्या तिमाहीचे आकडे येतील. उत्सुकांनी यावर नजर ठेवावी.

धर्मराजमुटके's picture

17 Jan 2024 - 11:22 pm | धर्मराजमुटके

आज हा शेअर (पॉलीकॅब) रु. ४४३९.०० इतका वाढला. उद्या ३ र्‍या तिमाहीचे आकडे आल्यावर पाहू काय होते ते.

वामन देशमुख's picture

18 Jan 2024 - 8:58 am | वामन देशमुख

उत्सुकांनी यावर नजर ठेवावी.

सक्रिय लक्ष ठेवून आहे.
;-)

वामन देशमुख's picture

17 Jan 2024 - 10:51 pm | वामन देशमुख

बाजारात आज सगळीकडे मोठी पडझड झाली;
पण आठवड्याभरात recovery होईल असा अंदाज आहे.

ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी आज खरेदी करायला हवी होती. एकाच आठवड्यात कमीतकमी ५% नफा घेऊन बाहेर पडता आले असते.

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Jan 2024 - 11:45 am | राजेंद्र मेहेंदळे

पण एकुण चर्चा किवा सूर असा आहे की इतक्या बुलिश मार्केट नंतर मार्केट मध्ये किमान १०% पडझड अपेक्षित होतीच/आहे. शिवाय आता फेब्रुवारीत बजेट्चे वारे वाहु लागतील, मग निवडणुका आहेत. त्यामुळे मार्केट नरम गरम राहील, मात्र स्थिर सरकार मिळाले तर जून नंतर मार्केट पुन्हा वरची दिशा पकडेल हे नक्की. तेव्हा ५-६ महीने कळ काढायची तयारी असल्यास नक्की गुंतवणुक करावी.

होय, साधारण एवढे करेक्शन अपेक्षीत आहेच. त्यावेळेस पैसा असल्यास गुंतवणे सगळ्यात फायद्याचे. पण मार्केटचा अंदाज हा भल्याभल्यांना येत नाही.
जसं- सर्वसाधारणपणे दिवाळीनंतर एक ते दीड महिना मार्केट नरम असतं. पण यावेळेस सप्टेंबर पासूनच बुल रन चालू झालाय त्याचं करेक्शन आत्ता येतंय!

लाँगटर्म गुंतवणुकी साठी मी एक पद्धत वापरतो.
- डिटेल अभ्यास करून झाला आणि ठरले की अमुक स्टॉक मधे गुंतवणूक करायची, की त्या स्टॉकच्या सद्यभावाच्या हिशोबात किती पैसे आपण यात पुढील दोन वर्षांत गुंतवू शकू याचा अंदाज काढायचा. त्याचे साधारण दहा भाग करायचे.
- एवढे झाले की त्या स्टॉकचा फक्त एक शेअर आधी खरेदी करायचा. आपल्याला त्याचा उतार-चढाव आपल्या खरेदी किंमतीच्या तुलनेत बघता येतात. जेव्हा जेव्हा थोडा डिप येईल तेव्हा तेव्हा आपण केलेल्या दहा भागांपैकी एकेका भागाचे पैसे गुंतवत जायचे.
यामुळे अ‍ॅवरेज होऊन आपली खरेदी किंमत बऱ्यापैकी खाली येते असा अनुभव आहे.

मला वाटतं, निवडणुका/बजेट यांचा परिणाम तेव्हा होतो जेव्हा त्यांचा ठोस अंदाज बांधता येत नाही. सद्यस्थिती किमान निवडणुकांपुरती तरी तशी नाही. त्यामुळे त्याचा फार परिणाम मार्केटवर होईल असं वाटत नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Jan 2024 - 12:52 pm | अमरेंद्र बाहुबली

मार्केट आज पण पडलंय. काय घेऊ?? नफा/तोट्याची जूबादारी माझी. तुम्ही फक्त सांगा.

वामन देशमुख's picture

18 Jan 2024 - 1:31 pm | वामन देशमुख

मार्केट आज पण पडलंय.

बाजाराने जरी चांगले-वाईट झटके दिले तरी व्यापाऱ्याने संयम बाळगावा; थोडीबहुत रिस्क घ्यायला हरकत नाही पण व्यापार-पद्धतीतील सातत्य सोडू नये, असे मला वाटते.

हा गुंतवणूक सल्ला नाही.

अदानींचे स्टॉक्स् मागच्या वर्षी पडल्यापासून अदानी एन्टरप्राइजेस, अदानी ग्रीन, अदानी एनर्जी, अदानी पोर्ट्स यांत व्यापार + गुंतवणूक करत आहे. ११ महिन्यांत त्या व्यापारामधून चांगला नफा मिळालाय. तो अदानी एन्टरप्राइजेस मध्येच वरचेवर गुंतवत आलोय. जूनपर्यंत अदानी एन्टरप्राइजेस ४५०० पार करेल असा माझा अंदाज आहे. अदानी विल्मर बद्धल निश्चित मत नाही.

भारत सरकार अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात मोठी चालना देत आहे. त्यांतील कंपन्या उदा इरेडा, सुझलॉन यांत मी गुंतवणूक वाढवत नेत आहे.

माझ्या काही वैयक्तिक मतांमुळे बँक स्टॉक्समध्ये फार जास्त गुंतवणूक करत नाही, उगी तोंडी लावण्यापुरती करतो.

बाकी इन्फ्रा, आइटी, धातू, खनिजे ही आवडती क्षेत्रे.

मुक्त विहारि's picture

19 Jan 2024 - 8:17 pm | मुक्त विहारि

अदानींना , विरोध करतील आणि तिथे गुंतवणुक पण करतील...

दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे...

वामन देशमुख's picture

19 Jan 2024 - 8:30 pm | वामन देशमुख

राजकीय आणि आर्थिक मते वेगवेगळी असणार, त्यांत काही नवीन नाही.

मुक्त विहारि's picture

19 Jan 2024 - 9:12 pm | मुक्त विहारि

Enron, समुद्रात बुडवणार , असे ऐकिवात होते... आणि मग अचानक Enron तरली...

असो,

व्यक्ती पूजा करणारी जनता, अशीच भुलल्या जाते..

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Jan 2024 - 9:30 pm | अमरेंद्र बाहुबली

बैलगाड्यांवर यात्रा काढून कोम्प्यूटर ली विरोध करत होते तेच आता चिन्मय तन्मय ला कोम्प्यूटर इंजिनीअर बनवून अमेरीकेत पाठवताहेत.
असो.
व्यक्ती पूजा करणारी जनता, अशीच भुलल्या जाते..

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Jan 2024 - 8:57 pm | अमरेंद्र बाहुबली

अदानींना , विरोध करतील आणि तिथे गुंतवणुक पण करतील... अदानीला सपोर्ट करतील. पण तिथए गुंतवणूक करनार नाहीत असेही काही नग असतात.
(टीप- मी अदानीत एक कवडीही गुंतवली नव्हती नी गुंतवनार नाही. सरकारी यंत्रणांचा गैरफायदा घेऊन श्रीमंत होणारे जास्त काळ श्रीमंत राहत नाहीत.)

वामन देशमुख's picture

19 Jan 2024 - 8:33 pm | वामन देशमुख

आजचा बाजार पाहून रेल्वे, पायाभूत सुविधा आणि संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे असावं वाटते.

चूभूदेघे.

---

चाचणी तत्वावर, उद्या (शनिवार) बाजार काही काळ सुरु राहणार आहे!

आग्या१९९०'s picture

19 Jan 2024 - 9:06 pm | आग्या१९९०

आजचा बाजार पाहून रेल्वे, पायाभूत सुविधा आणि संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे असावं वाटते.

हो, बरोबर

आग्या१९९०'s picture

19 Jan 2024 - 11:09 pm | आग्या१९९०

काय बिनडोकपणा चाललाय? सोमवारी शेअर मार्केट बंद राहणार, उद्याचे special session रद्द करून नेहमीसारखे पूर्णवेळ मार्केट चालू राहील. सोमवारच्या वायदे expiry उद्या होणार. सगळाच गोंधळ.

वामन देशमुख's picture

24 Jan 2024 - 10:58 pm | वामन देशमुख

एचडीएफसी बँकेत दर आठवड्याला गुंतवणूक करत राहण्याची ही योग्य वेळ आहे असे वाटते.

---

Track all markets on TradingView

{
"autosize": true,
"symbol": "NSE:HDFCBANK",
"interval": "D",
"timezone": "Asia/Kolkata",
"theme": "dark",
"style": "1",
"locale": "in",
"enable_publishing": false,
"allow_symbol_change": true,
"support_host": "https://www.tradingview.com"
}

वामन देशमुख's picture

31 Jan 2024 - 8:17 am | वामन देशमुख

साधारणतः अर्थसंकल्पाच्या दिवशी आणि त्या पूर्वी एक-दोन दिवस शेअर बाजार काहीसा अस्थिर असतो. काल निफ्टी २१५ अंशांनी कोसळला.

नवशिक्या उत्सुकांनी आज-उद्या बाजारावर खास लक्ष ठेवून असावे.

धर्मराजमुटके's picture

31 Jan 2024 - 12:08 pm | धर्मराजमुटके

आजची वेळ निघून गेली. बाजारावर लक्ष ठेवण्यासाठी सकाळी ९ ते ११ ची वेळ निवडावी. दोन-तीन दिवस आपटलेले Railtel / Bajaj Finance / Indraprashtha Gas / L&T मालामाल करुन गेले. मला Intraday / Logterm जास्त रस नाही. त्याऐवजी BTST किंवा Short Term चांगले वाटतात.

विअर्ड विक्स's picture

31 Jan 2024 - 11:42 am | विअर्ड विक्स

ट्रेडिंग व्यू वा तत्सम वेबसाईट वापर कसा करायचा यासंबंधी कुठे लेख आहे का ? मी कोडींगच्या बाबतीत शून्य आहे म्हणून विचारतोय .

तर तो टॅक्स वाचवायचा म्हणून मी शेअर्स माझ्या पत्नीच्या डीमॅट मध्ये गीफ्ट करून मग विकायचा विचार करतोय.
>>
याचा काही फायदा होईल असे वाटत नाही. तुम्हाला नाहीतर पत्नीला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेलच.
शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स वाचवता येत नाही.
लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स वाचवता येतो - जर त्या पैशांनी घर विकत घेतले अथवा ठराविक बॉण्ड्समध्ये गुंतवणूक केली तर.

***
STCG आणि LTCG विषयी विस्तृत चर्चा येथे व्हावी, अशी अपेक्षा..

जर पत्नीचे इतर उत्पन्न नसेल तर ३,००,००० रुपये बेसिक एक्सेंप्शन अधिक १,००,००० पर्यंत लाँग टर्म कॅपिटल गेन एक्सेंप्शन, एकूण ४,००,००० ₹ कॅपिटल गेन वरचा टॅक्स वाचू शकला असता. आणि त्यापुढे, बेसिक स्लॅब रेट २०%/३०% न लागता १०%/५% लागेल ही गोष्ट निराळी.

शॉर्ट टर्म असता तर ३,००,००० पर्यंत बेसिक एक्सेंप्शन आहेच.

पण इतके सोपे नाही, कायद्याला चालत नाही हे खाली प्रतिसादात दिले आहे.

बाँड गुंतवणूक फक्त घर आणि जमिनीसाठी आहे. शेअर साठी बाँड गुंतवणुकीचा पर्याय नाही.

कॉमी's picture

31 Jan 2024 - 6:44 pm | कॉमी

आणि त्यापुढे, बेसिक स्लॅब रेट २०%/३०% न लागता १०%/५% लागेल ही गोष्ट निराळी

हे इग्नोर मारा. Equity capital गेन बद्दल बोलत असल्याने slab रेट चा प्रश्न येत नाही.

कॉमी's picture

31 Jan 2024 - 6:25 pm | कॉमी

१,००,००० पर्यंत LTCG लागत नाही. लाँग टर्म equity वर टॅक्स रेटही २०% नसून १०% आहे.

एक उपाय म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओ मधले इतर लाँग टर्म शेअर (एक वर्षापेक्षा जास्त ठेवलेले) जर लॉस मध्ये असतील तर ते शेअर विका आणि लॉस बुक करून पुन्हा आहे त्या भावाने एंटर करा.

कायदेशीर दृष्ट्या बायकोला शेअर गिफ्ट करण्याचा उपाय बिनकामी आहे. Section 64 (1) V मध्ये clubbing provision आहे.
If any individual transfers any asset to his or her spouse without consideration or for inadequate consideration then income from such asset is received by spouse but tax on such income is paid by transferor assessee. If the asset transferred is sold by transferee then capital gain is treated as income and shall be clubbed.
आता हे तुम्ही असे केले हे IT DEPT ला समजेल की नाही हा भाग वेगळा, पण कायदेशीर दृष्ट्या इतक्या सहजासहजी कॅपिटल गेन चुकत नाही. त्यामुळे हा मार्ग above the books नाहीये हे ध्यानात घ्या.

अमरेंद्र बाहुबली's picture

31 Jan 2024 - 11:03 pm | अमरेंद्र बाहुबली

बायकोचं काहीही ऊत्पन्न नाही. त्यामुळे तिला गिफ्ट करून ३ लाखा पर्यंतच्या एक्सम्पशन मध्ये काहीही टॅक्स लागणार नाही ना?? मी हिंदाल्को ३९१ चा भावाने ४०० घेतले होते. आता त्यावर जवळपास ७५ हजार नफा आहे. मी विकले तर २० टक्के टॅक्स लागेल. ५०० ते हजार खर्चय गिफ्टला. मेहेंदळे सरांनी सांगीतल्याप्रमाणे दुसर्या डीमॅटला ट्रांसफर करता येईल पण शेवटी माझ्याच खात्यात पडून असतील. आज ना ऊद्या टॅक्स लागणारच.

कॉमी's picture

1 Feb 2024 - 8:13 am | कॉमी

नाही, तिथेच तर गोम आहे. बायकोला फुकट शेअर किंवा इतर काहीही दिले तर त्यातून मिळणारे उत्पन्न तुमचाच नावावर taxable होते. ह्याला clubbing म्हणतात टॅक्स भाषेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Feb 2024 - 8:42 am | अमरेंद्र बाहुबली
कॉमी's picture

1 Feb 2024 - 9:03 am | कॉमी

बाहुबली, ह्या व्हिडिओ मधला मॅटर वेगळा आहे. व्हिडिओ बरोबरच आहे, की पत्नीला शेअर दिल्यावर गिफ्ट रकमेवर बायकोला टॅक्स लागत नाही, हे तर बरोबरच आहे. मी सुद्धा गिफ्ट केलेल्या शेअरच्या रकमेबाबत बोलत नाहीये. मी तुमच्या पत्नीने शेअर विकून आलेल्या कॅपिटल गेन बद्दल बोलतोय.

पत्नी किंवा मुलांना एखादी गोष्ट गिफ्ट दिली, आणि ती विकल्यावर कॅपिटल गेन झाला तर clubbing provision नुसार ते उत्पन्न तुमच्या उत्पन्नात वाढवले जाते. लॉजिक हेच की नुसते दाखवायला शेअर किंवा प्रॉपर्टी दुसऱ्याच्या नावावर करून कॅपिटल गेन वाचवता येत नाही.

राजेंद्र मेहेंदळे's picture

31 Jan 2024 - 6:27 pm | राजेंद्र मेहेंदळे

दुसर्‍या तुमच्या आवडीच्या डीमॅट अकाऊंट मधे शेअर्स ट्रान्स्फर करा. एन एस डी एल च्या /सी डी एस एल च्या वेबसाईटवर ती प्रोसेस मिळेल असे मला कोणीतरी म्हटले आहे. मी अजुन करुन पाहीले नाही. (मलाही ते करायचे आहे.)

इन्फ्लेशन, टॅक्स आणि ब्रोकरेज यातुन कोणीही वाचले नाहीये. म्हणुन नफ्याचे गणित मांडताना हे नेहमीच वजा करावेत. थोडक्यात कुठलीही गुंतवणुक साधारण १०-११ टक्क्यापेक्षा जास्त वार्षिक परतावा देत असेल तरच त्यात मजा आहे. नाहीतर तुमचे पैसे वाढण्यापेक्षा कमीच होतील.

आग्या१९९०'s picture

31 Jan 2024 - 7:16 pm | आग्या१९९०

मला ह्या वर्षी बर्यापैकी प्रोफीट आहे होल्डींगवर. ते शेअर्स जर विकले तर त्यावर २० टक्के टॅक्स हे सूलतानी सरकरा घेईल

बऱ्यापैकी नफा होत असेल तर सरकार टॅक्स घेणार असेल तरी हरकत नाही. टॅक्स वाचवण्यासाठी उगाचच भलतिकडे जास्त गुंतवणूक करावी लागते. टॅक्स भरायचा आणि शेअर मध्येच पैसे गुंतवावे. शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक कधीही योग्य.

टर्मीनेटर's picture

31 Jan 2024 - 8:11 pm | टर्मीनेटर

+१
अजुन एक आगंतुक सल्ला देता येइल पण अबांचा मराठी बाणा त्याआड येउ शकतो त्यामुळे जाउदे... 😀

आग्या१९९०'s picture

31 Jan 2024 - 9:29 pm | आग्या१९९०

असेही शेअर्स वरील दीर्घकालीन नफ्यावर १० % इतका कमी टॅक्स लागतो, एक लाख नफा असेल तर शून्य टॅक्स! अजून काय हवे?
सरकारला टॅक्स द्यायचाच नसेल तर घरातील प्रत्येक व्यक्तीच्या नावाने एक खाते उघडा आणि प्रत्येक खात्यात समान गुंतवणूक करा. प्रत्येकाला एक लाख नफ्यावर शून्य टॅक्स लागेल.
( प्रत्येकाचा इन्कम सोर्स दाखवायची वेळ आल्यास तशी पूर्वतयारी ठेवणे.)

अहिरावण's picture

31 Jan 2024 - 2:34 pm | अहिरावण

>>>>... त्यावर २० टक्के टॅक्स हे सूलतानी सरकरा घेईल व वरून मला काहीही सोयी सुविधी देणार नाही, असो.

मिपावरील आजवरचे उत्कृष्ट विधान.

सरकार काहीही सुविधा देत नाही असे सांगण्याची सोय सुद्धा काही देशांत नाही हे जाणवून जीव हरखला.

अमरेंद्र बाहुबली's picture

31 Jan 2024 - 3:00 pm | अमरेंद्र बाहुबली

सरकार काहीही सुविधा देत नाही असे सांगण्याची सोय सुद्धा काही देशांत नाही हे जाणवून जीव हरखला. आणी काही “लोकशाही” असलेल्या देशांत सरकार अत्यूत्तम सुविधा देतं ह्याकडे दुर्लक्ष करतो का तो एकांगी जीव?

अहिरावण's picture

31 Jan 2024 - 7:46 pm | अहिरावण

>>>आणी काही “लोकशाही” असलेल्या देशांत सरकार अत्यूत्तम सुविधा देतं ह्याकडे दुर्लक्ष करतो का तो एकांगी जीव?

आमच्या देशात सरकार आणि सेबी टी+० आणि तत्काळ शेअर्स जमा करण्याची जगातील कोणत्याही लोकशाही, हुकुमशाही, अराजन, निर्नायकी सरकारांनी न दिलेली सुविधा देण्याच्या विचारात असतांना अशा तथाकथित देशांतील काही लोक खोडा घालत आहेत.

वामन देशमुख's picture

31 Jan 2024 - 4:49 pm | वामन देशमुख

एक जिज्ञासू बाजार गुंतवणूकदार या नात्याने सदस्यांना कळकळीची विनंती -

या धाग्यावर असंबद्ध राजकीय चर्चा करू नये. वाद होतील अशी विषयाशी असंबंधित विधाने करू नयेत.

सुदैवाने चर्चा चांगली सुरु आहे, वाचकांना काही ना काही तरी गुंतवणूक clues मिळत आहेत. त्यामध्ये खंड पडेल असे काही करणे टाळावे.

टर्मीनेटर's picture

31 Jan 2024 - 7:42 pm | टर्मीनेटर

सुदैवाने चर्चा चांगली सुरु आहे, वाचकांना काही ना काही तरी गुंतवणूक clues मिळत आहेत. त्यामध्ये खंड पडेल असे काही करणे टाळावे.

+१
धागा फॉलो करतोय. प्रतिसादात अनुभवाधारीत लिहिण्यासारखे बरेच काही आहे पण वाचकांना 'यशोगाथा' वाचण्यात रस असतो 'अपयशाची गाथा' कशाला कोण वाचेल असा विचार करुन ते टाळत आलो 😀

सर्व प्रतिसाद वाचले. त्यातल्या सुबोध खरेंच्या "आमचं असं का होतं ते कळत नाही" आणि आंद्रे वडापाव ह्यांच्या "या फायनान्शिअल वर्षात (अजून" ह्या दोन आणि अन्य प्रतिसादांशी बहुतांशी सहमत असल्याने त्यांचा उल्लेख करतोय, पण ह्याचा अर्थ असा नाही की बाकिच्यांचे प्रतिसाद पटले/आवडले नाहीत. पण तशा प्रकारचे व्यवहार केले/करत नसल्याने (आणि करण्याची इच्छाही नसल्याने) त्यावर वैयक्तिक मतप्रदर्शन करणे योग्य ठरणार नाही.

उद्बोधक चर्चा अशीच सुरु रहावी...

वामन देशमुख's picture

31 Jan 2024 - 9:06 pm | वामन देशमुख

वाचकांना 'यशोगाथा' वाचण्यात रस असतो 'अपयशाची गाथा' कशाला कोण वाचेल असा विचार करुन ते टाळत आलो

यशोगाथेतून काय करावे हे कदाचित कळेल, अपयशगाथेतून मात्र काय करू नये हे नक्की कळेल.

टर्मिनेटर भौ,

तुमचे लिखाणांच्या अनेक पंख्यांमध्ये मी पण आहे. ल्हिवा, मिपा आपलाच असा.

"यशोगाथेतून काय करावे हे कदाचित कळेल, अपयशगाथेतून मात्र काय करू नये हे नक्की कळेल."

😊 +१

१९९४ साली कॉलेज शिक्षण सुरु असताना घडलेल्या एका घटनेतून शेअर बाजाराविषयी निर्माण झालेले आकर्षण - पुढे कमवायला लागल्यावर 'किरकोळ गुंतवणूकदार' म्हणून ट्रेडींगला केलेली सुरुवात - त्यापुढे एका सब-ब्रोकिंग फर्ममध्ये 'सायलेंट पार्टनर' बनण्यातून मिळालेल्या अमर्याद 'मार्जीन'च्या जोरावर केलेली बेफाम 'सट्टेबाजी', आणि त्या मूर्खपणातून स्वतःचे करून घेतलेले मोठे आर्थिक नुकसान - त्यानंतर शेअर बाजाराला ठोकलेला 'राम राम' अशा पहिल्या अपयशी इनिंग नंतर पुढे बाजारात हयात घालवलेल्या काही गुरुतुल्य व्यक्तींचे लाभलेले मूल्यवान मार्गदर्शन आणि पूर्वी केलेल्या घोडचुकांचे सिंहावलोकन केल्यावर 'आता पुन्हा नव्याने सुरुवात करावी' अशा निर्णयावर येऊन पोचलो आणि जवळपास दीडेक दशकाच्या 'मार्केट संन्यासाला' तिलांजली देत साधारण तीन वर्षांपुर्वी बहीण आणि बायको अशा कुटुंबातील दोन व्यक्तींचा 'सल्लागार' म्हणून पुनरागमन करत सुमारे दोन वर्षांपासून ट्रेडिंगच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली आहे.

पुर्वाश्रमीच्या चुकांची पुनरावृत्ती कटाक्षाने टाळत वाटचाल सुरु असल्याने अद्याप तरी काही नुकसान झाले नसून फायदाच दिसतोय पण "मार्केट कोणाच्या बापाला कळलेले नाही" ही वस्तुस्थिती विसरून चालणार नसल्याने सेकंड इनिंग यशस्वी ठरली आहे वगैरे विधान करणे घाईचे ठरेल. त्यामुळे गेल्या जवळपास तीन दशकांत आलेले 'मार्केटचे' बरे-वाईट अनुभव, 'BOLT'* वर भेटलेल्या काही 'व्यक्ती आणि वल्ली' (आणि त्यांच्याकडून खरंतर शिकण्या सारख्या, पण त्यावेळी दुर्लक्ष केलेल्या काही गोष्टी), त्यांच्या गमती-जमती वगैरे गोष्टी टप्प्या-टप्प्यांत सवडीने खाली प्रतिसादांत लिहितो, त्यातून नवीन लोकांना तुम्ही म्हणाल्या प्रमाणे (तुमच्या मूळ वाक्यात थोडा बदल करून 😀) "अपयशगाथेतून मात्र काय करू नये हे कदाचित कळेल."

* BOLT हा शब्द BSE शी निगडित असला आणि फर्मच्या ऑफिसमध्ये BSE पेक्षा NSE वरच सर्वाधिक व्यवहार होत असले तरी हा शब्दच तोंडवळणी पडला असल्याने ह्या आणि पुढच्या प्रतिसादांतही तोच शब्द वापरणार आहे, आणि हो... ह्या आणि भावी प्रतिसादांत काही अवांतर वाटल्यास आगाऊ क्षमस्व!

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Feb 2024 - 7:05 pm | अमरेंद्र बाहुबली

हाहाहा. सहमत. मी देखील कोल ओप्शनमध्ये बरेच गमावून बसलोय. आता इक्विटीत बरेच काढलेत.
हिंदाल्को ३९१ ला ४०० घेऊन ठेवलेत. नी जे पी पावर ७ च्या भावाने आठ दहा हजार गोळा केलेत, हडफक, रिलायन्स, नी आयच्याआयचीआय मध्ये प्रोफीट असला तरी अपेक्षीत परतावा नाही. सूझलोन ४ ला घेऊन ८ ला फूकल्या गेले नाहीतर आज सूझलोन चा मालक असतो. (खी खी, विनोद हं)

Bhakti's picture

1 Feb 2024 - 11:18 am | Bhakti

चांगली चर्चा!
म्या स्वयंपाक घरातील पामराने,रचनाताई रानडे यांना गुरू करतं, महिन्याची सिप ,वर्षात दोन लमसम म्युच्युअल फंड करायचं व्रत घेतलं आहे.तेव्हा समस्त गृहिणी भगिनींनी या धाग्यातून बोध घेत, उन्नती करावी असं आवाहन करीत खाली बसते!

वामन देशमुख's picture

2 Feb 2024 - 11:41 am | वामन देशमुख

सुझलॉन वर्षभरात थोडा थोडा करून सरासरी १४ वर घेतला होता, मध्यंतरी ३० वर थोडा विकला होता, आज अजून ३८ वर घ्यावा असा विचार सुरु आहे. दसरा-दिवाळीपर्यंत पन्नाशी पार करेल का?

हा धागा काढला तेव्हा ३८ वर असलेल्या सुझलॉनने आज पन्नाशी पार केलीय!

https://www.google.com/finance/quote/SUZLON:NSE

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Feb 2024 - 12:25 pm | राजेंद्र मेहेंदळे

यावर सध्या माझे लक्ष आहे
१. एच डी एफ सी आणि रिलायन्स ईंडस्ट्री हे नेहमीच मार्केट लीडर राहीले आहेत. हे २ शेअर्स मार्केट वरखाली नेत असतात. सध्या एच डी एफ सी बँक आणि होम लोन्स च्या विलिनीकरणामुळे नेट प्रॉफिट कमी दिसत आहे म्हणुन शेअर ची किम्मत घसरली आहे असे तज्ञ सांगताहेत. पण एन पी ए वगैरे फंडामेंटल मजबूत असल्याने काळजी नको. नेस्ले १:१० स्प्लिट झाला आहे म्हणुन घ्यायचा विचार आहे. सहसा कोणताही शेअर स्प्लिट झाला की बेंचमार्क बदलतो आणि नंतर किंमत पुन्हा वाढायला लागते असा अनुभव आहे.

२. पॉवर सेक्टर तसाही जोमात असतो पण सुझलॉन कमी पैशात जास्त युनीट्स मिळतात (टाटा पॉवर वगैरे पेक्षा)

३. बँकांमध्ये स्वस्त आणि मस्त सेंट्रल बँक मस्त धावतोय (सध्या रुपये ६० च्या आसपास) हजारेक घ्यायला हवेत थोडे थोडे करुन

४.पैसालो नावाचा एक शेअर आहे(बहुतेक एन बी एफ सी आहे). लोकसत्ता मध्ये दर सोमवारी एक शेअर्स सुचवतात , त्यात होता. सध्या रु.१२५ . एक महिन्यात ३०% /६ महिन्यात ६०% /९ महिन्यात ९०% परतावा दिलाय.

५. पटेल इंजिनीयरिंग हा सुद्धा मस्त धावतोय. सध्या रु. ७० १ महिन्या १२%/ ३ महिन्यात ४४% /६ महिन्यात ५२ % परतावा

६. हॅपिएस्ट माईंड काहीतरी करा हो ह्याला. कंपनी चांगली आहे. मी एक अ‍ॅव्हरेज धरुन बसलोय. पण १००० च्या वर जातच नाहीये. कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा.

वामन देशमुख's picture

2 Feb 2024 - 9:58 pm | वामन देशमुख

अरेच्चा! सेंट्रल बँकेकडे कसे लक्ष गेले नाही! हा स्टॉक तर सातत्याने वाढत आहे!

https://www.google.com/finance/quote/CENTRALBK:NSE

या अणि इतर स्टॉक्सचा थोडा अभ्यास करून विचार करेन.

सुबोध खरे's picture

2 Feb 2024 - 8:25 pm | सुबोध खरे

हवशे नवशे आणि गवशे चढत्या बाजारात भरपूर पाहायला मिळतात.

बाजार उतरू लागला हे सर्व गायब होतात असे मी बाजाराच्या तीन आवर्तनात पाहिले आहे. तेंव्हा आजच्या चढत्या बाजारात नफा केला म्हणून खूष होणारे अनेक लोक बाजार खाली आला कि दृष्टीआड होतील हेही माहिती आहे

माझा पहिला अनुभव नजर लागण्यासारखा आहे. पॅन्टलूनचे समभाग (१९९३ च्या आसपास) १० रुपयाला at par घेतलेले शेवटी त्यावर मिळणाऱ्या बोनस समभागासकट (२००३) विकले असता नक्त नफा २ लाख ३७ हजार झाला होता. हा पैसा माझ्या सर्वोच्च न्यायालयातील लढाईसाठी कामास आला होता.

यानंतर २००६ मध्ये लष्करातून निवृत्त झाल्यावर आलेले भविष्य निर्वाह निधी चे पैसे साफ बुडाले असे गृहीत धर ( तुला दोन वेळच्या जेवणाची कधीही ददात पडणार नाही हि हमी देऊन) असे पत्नीला सांगून मी बाजारात गुंतवले.

म्हणून असा अनुभव परत येणार नाही हे १०० % सत्य आहे

तेंव्हा पासून बाजारात अतिरिक्त पैसे गुंतवत आलो आहे. साधारण १४-१५ % वार्षिक या दराने मला नफा मिळाला आहे. यात मी संपूर्ण समाधानी आहे.
आता या गुंतवणुकीवर आयुष्यभर बसून खाता येईल अशी स्थिती आहे.

हे सर्व पैसे केवळ गुंतवणूकीतुन मिळालेले आहेत. यात सट्टा ट्रेडिंग ऑप्शन्स इ कधीही केले नाही.

माझे अनेक समभाग गेल्या एक वर्षात १०० % नि वाढलेले आहेत( हि सूज आहे असे माझे मत आहे).

त्यातील काही समभाग फार उच्चि वर असल्याने मी अर्धे विकले आहेत.

मी कोणत्याही गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याचा विपरीत वागत आलो आहे. माझ्या खात्यात एकंदर १४० वेगवेगळ्या कंपन्यांचे समभाग आहेत. यात दारू आणि सिगरेट विकणाऱ्या कंपन्या नाहीत. एवढ्या समभागांवर लक्ष ठेवता येत नाही हा गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला मी साफ धुडकावून लावतो. आपण आपली क्षमता पाहावी.

बहुसंख्य गुंतवणूक सल्लागार हे झापडबंद सल्ला देत असतात असे मी बऱ्याच वेळेस सहज सिद्ध करून दाखवलेले आहे.

मी कोणालाही कसलाही सल्ला देत नाही. आणि जवळच्या लोकांचा सल्ला अमलात आणल्याने केवळ नुकसानच झाले असे लक्षात आल्यावर कुणाचाही सल्ला अमलात आणत नाही.

वामन देशमुख's picture

2 Feb 2024 - 10:07 pm | वामन देशमुख

हवशे नवशे आणि गवशे चढत्या बाजारात भरपूर पाहायला मिळतात.
बाजार उतरू लागला हे सर्व गायब होतात

---

मतभिन्नतेच्या आदरासहित:

एखादा विशिष्ट स्टॉक म्हणजे काही आपली लग्नाची बायको* नाही. नांदते आहे तोपर्यंत नांदावायची, नाहीतर...

एकूणच बाजार म्हणजे आपले कार्यक्षेत्र; कधी वर कधी खाली होतंच असते, ते सोडून कसे चालेल?

हा ट्रेडरचा दृष्टिकोन आहे. अर्थातच गुंतवणूकदाराचा दृष्टिकोन भिन्न असतो याची कल्पना आहे.

---

* मी पुरुषाच्या दृष्टिकोनातून असे लिहीत आहे. एखादी स्त्री काय लिहील याची कल्पना नाही.

अतरंगी's picture

9 Feb 2024 - 10:03 am | अतरंगी

साधारण १४-१५ % वार्षिक या दराने मला नफा मिळाला आहे >>>

हे लिहिल्याबद्दल धन्यवाद.

सोशल मिडईयावर शेअर्स बद्दल लिहिणार्‍या अनेक गुंतवणूकदारांना मी त्यांना मिळालेल्या CAGR विशयी विचारले. कोणालाही कधीच हे आकडे सांगता आले नाही.

रचनाने बजेटनुसार पर्यटन, सौरऊर्जा, डिफेन्स,रेल्वे विभागातले stock सांगितले आहेत.यूट्यूब चानैलचा comment विभागही बघा अजून stock समजतील.
https://youtu.be/zYftky9E7yE?si=BCb_vao1o3gAE33J

CA Rachana Ranade(Marathi)असा तिचा व्हाटसपवर चानैल आहे.

वामन देशमुख's picture

8 Feb 2024 - 8:07 pm | वामन देशमुख

आज निफ्टी २१२ व बँकनिफ्टी ८०४ अंशांनी खाली आले आहेत.

उद्या आठवड्याचा शेवटच्या दिवशी अजून १०० व २०० अंशांनी खाली येतील का?

---

रिझर्व्ह बँक गव्हर्नर दास - "सगळ्या शुल्कांसह कर्जाच्या संपूर्ण किंमतीबद्दल कर्जदारांना माहिती देणे बँकांना बंधनकारक होणार". हे एक समजले. गव्हर्नर अजून काय म्हणाले ते एखाद्या मिपाखराने सोप्या भाषेत समजावून सांगावं ही अपेक्षा.

वामन देशमुख's picture

29 Apr 2024 - 7:45 pm | वामन देशमुख

मार्चमध्ये चाळीशीच्या खाली असलेला बँकनिफ्टी काळ अट्ठेचाळीशीवर गेला, येत्या मार्च-जूनपर्यंत पन्नाशी पार करेल का?

बँकांच्या चढत्या आलेखामुळे आज बँकनिफ्टी पन्नाशीच्या घरात गेलाय!

बातमी
बँकनिफ्टी
निफ्टी