नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in भटकंती
2 Dec 2015 - 12:23 pm

हरिश्चंद्रगड म्हणजे ट्रेकर्स लोकांची पंढरी . कधीही जा गडावर १००-१५० लोक सापडणारच .ठाणे,पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर असणारा हा गड म्हणजे माळशेज घाटाचा मुकुट मणीच म्हणायला हवा.हरिश्चंद्र गडावर जाणाऱ्या अनेक वाटा आहेत. राजूर-पाचनईमार्गे आणि खुबीफाटा -खिरेश्वर-टोलारखिंड मार्गे येणाऱ्या वाटा जास्त प्रचलित आहेत तर बेलपाडा किवा वल्हिवळे मार्गे नळीची वाट,माकड वाट किवा नाफ्ता डोंगराच्या बाजूने केळवंडे गावातून येणारी वाट या वाटा जर अवघड श्रेणीतल्या आणि म्हणून कमी वापरल्या जाणाऱ्या आहेत.
पाचनई आणि खिरेश्वर मार्गे आधी हरिश्चंद्रगड बघून झालेला असल्याने यावेळी अवघड अशा नळीच्या वाटेने जाण्याचा बेत ठरला.आमच्या ग्रुप मधील काही लोकांचे गडावरच्या तुकाराम भोइरशी जुने संबंध आहेत.त्यामुळे त्याच्याशी सगळे बोलणे झाले होते.पुण्याहून आम्ही फक्त ४ जण आणि बाकी ग्रुप कल्याणचा असल्याने आम्ही पुणेकरांनी ३.३० ची डेक्कन एक्स्प्रेस पकडली आणि ६.३० च्या सुमारास कल्याण एसटी स्थानकावर येउन थांबलो. तिथेच आम्हाला बाकीचे लोक भेटले. कल्याण-मुरबाड-मोरोशी असा प्रवास करून रात्री दहाच्या सुमारास मोरोशीला पोचलो. वाटेत टोकावडेला जेवण करायचा विचार होता पण उशीर झाल्याने सर्व हॉटेल बंद झाली होती आणि बसही फारवेळ थांबली नाही.मोरोशीला पोचल्यावर एक बरेसे हॉटेल बघून जेवणाची ऑर्डर दिली.मस्त चांदणे पडले होते.सुखद आश्चर्य म्हणजे जेवण चांगले होते.
op
जेवण होईतो बेलपाड्यातून आम्हाला घ्यायला जीप आलीच. १५ कि.मी. प्रवास करून बेलपाड्यात पोचलो. २०-२५ घरांचे छोटेसे टुमदार गाव. मुरबाड हून एक एसटी मुक्कामी आलेली दिसली.मस्त शेणाने सारवलेली घरे,पुढे तशीच सारवलेली अंगणे,तुरळक झाडे यांनी गाव सजले होते.शुभ्र टिपूर चांदण्यात समोर दिसणारे नाफ्ता ,रोहिदास ,कोकणकडा हे सगळे बघून उद्याचा ट्रेक जबरदस्त होणार ह्याची खात्रीच पटली.गप्पा टप्पा करत सगळ्यांनी पथाऱ्या पसरल्या आणि एक एक करत सगळ्यांचे डोळे मिटले.
hj
रात्री अजून २ ग्रुप आले त्यामुळे अधे मध्ये गडबड ऐकायला येत होती पण दिवसभराच्या श्रमाने एकूण गाढ झोप लागली.पहाटे पाचला कोंबड्याच्या आरवण्याने जाग आली.अंधारातच सकाळचे कार्यक्रम आवरले .चहा नाश्ता झाला. थोड्या वेळाने पुन्हा बाहेर येउन पाहतो तर समोर कोकणकड्या अडून झुंजूमुंजू झाले होते.
७ वाजले आणि मग मात्र सर्वांनी पाय उचलले आणि वाटाड्या बरोबर चालायला सुरवात केली.ऐन नळीच्या वाटेवर फार उन लागू नये अशीच सगळ्यांची इच्छा होती पण त्यासाठी आत्ता झटपट पाय उचलणे भाग होते.
qw
थोड्याच वेळात गावाचे शिवार संपले आणि ओढ्याची खडबडीत वाट सुरु झाली.दगड धोंडे आणि खाचखळगे सांगत होते कि पावसाळ्यात इथे पाण्याचा किती जोर असेल.
c
पण त्याचबरोबर समोरून जवळ जवळ येणारा कोकणकडा जणू आम्हाला आलिंगन द्यायला हात पसरून उभा होता आणि आमचा उत्साह वाढवत होता.
h
दोन सात आठ फुटी सोपे रॉक चढून एका ठिकाणी विश्रांती आणि पाणी भरून घेण्यासाठी थांबलो. इथे साधारण ९ वाजले होते.आणि पुढच्या चढाईला सुरुवात झाली.आता वाट थोडी डावीकडे वळत होती आणि आम्ही कोकणकड्या च्या उजव्या कुशीत शिरत होतो.
g

७० डिग्रीचे खडे चढ आणि मोठमोठाल्या शिळा आता दमछाक करू लागल्या. नळीच्या वाटेचा थरार आता जाणवू लागला होता.पण आमच्यातील उत्साही फोटोग्राफर लोक त्यावरही मात करून २-३ किलोचे कॅमेरे बाळगून फोटोग्राफी करत होते.त्याचबरोबर उनही वाढू लागले होते.म्हणता म्हणता पहिला रॉक क्लाइम्ब आला
u
पण तो फार अवघड वाटला नाही आणि रोप न लावताच सगळे वर जाऊ शकले.
t
दुसरा रॉक पॅच मात्र जर अवघड श्रेणीतला वाटला तो अशासाठी की शेवटच्या टप्प्यात डावा पाय ठेवायला ग्रीप मिळत नव्हती आणि शरीर हातावर पेलून वर चढायला लागत होते.
s
तरीही सॅक आधी वर पाठवून एक एक करत सर्वजण चढू शकले.इथेही रोपची गरज पडली नाही.
आता आम्ही चांगलीच उंची गाठली होती.समोरच्या बाजुला रोहिदास शिखरावर निघणारी माकडवाट दिसत होती.
t

दोन्ही बाजूने कडे असल्याने उन जास्त लागत नव्हते.सतत चढणं मात्र चालू होती आणि त्यामुळे दमछाक होत होती.साधारण १२ च्या सुमाराला तिसरा टप्पा आला तिथे मात्र रोप आधीच लावला होता.
कारण ग्रीप घ्यायला दगडात काहीच खाचा नव्हत्या ,मात्र इथून थेट खाली दरीत पडण्याचा धोका नव्हता.केवळ रोपला लटकून आणि पायांचा वापर करत वर चढायचे होते.तेही आव्हान एक एक करत सगळ्यांनी पार केले आणि नळी संपली.
इथे तुकाराम आम्हाला घ्यायला आला होता. आधीच्या वाटाड्याला रजा दिली आणि तुकाराम बरोबर चालू लागलो . आता आम्ही ज्या डोंगरावर होतो त्याला डावीकडे ठेवून एका वळसा मारला आणि नळीच्या बाहेर आलो.
v
पुन्हा एक छोटा रॉक पॅच चढून वर आलो आणि आता दुसऱ्या बाजूचे म्हणजे नाफ्ता आणि केळवंडे वगैरे दृश्य दिसू लागले. उजवीकडे वळून पंधरावीस मिनिटात कोकणकड्याजवळ आलो.
s
x
सुमारे २ वाजले होते.इथून मंदिराजवळ जायला अजून अर्ध्या तासाची वाट चालायची होती.
y
पण त्याचे आता काही वाटत नव्हते .अवघड अशी नळीची वाट आम्ही यशस्वीरीत्या चढून आलो होतो.एक जबराट अनुभव पदरी पडला होता.
z
------------------------------------------------------------------------
जाता जाता --तुकाराम आसपासच राहतो .खिरेश्वर गावातच शिकला आणि गडाची त्याला बरीच माहिती आहे.आपण न विचारताच अनेक गमती जमती तो सांगत असतो.
कोकण कड्याजवळ खालच्या बाजूला एक न सापडेल अशी गुहा आहे.त्याला कोंड्यानवल्याची गुहा म्हणत.हा कोंड्यानवल्या गडाखाली काहीतरी गुन्हे करून पोलिसांचा ससेमिरा चुकवायला तिथे येउन राहायचा.तिकडे एक जातेसुद्धा आहे.तुकारामच्या आजोबांनी अरुण सावंत ,हिरा पंडीत अशा लोकांना ती गुहा दाखवली आहे.
तसेच खिरेश्वर गावातून येताना डाव्या हाताच्या डोंगरावर जे नेढं दिसतं त्याला गावकरी म्हातारीचा डोलारा (डोळा ?) म्हणतात कारण शिवाजी महाराजांच्या काळात तिकडे एक म्हातारी बसून कायम टेहळणी करीत असे. बालेकिल्ल्यावर राजांनी केलेली काही बांधकामे आहेत.शिवाय गडावर शिवकालीन नाणी सापडली आहेत.
पूर्वी गडावर हरिश्चंद्र ,रोहिदास आणि तारामतीच्या सोन्याच्या मूर्ती होत्या त्या काळाच्या ओघात चोरीला गेल्या.तसेच हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या बाजूच्या कुंडावर जे कोनाडे आहेत त्यातील दगडी मूर्ती चोरायचा प्रयत्न झाल्यावर पुरातत्व विभागाला जाग आली आणि त्यांनी तिकडच्या मूर्ती हलवून एका ठिकाणी बंदिस्त केल्या.
साधले घाटाच्या पायथ्याला शिवकाळात घोड्यांचा मोठा बाजार भरे आणि देशीविदेशी घोडे तिकडे विकायला येत.गडावरही पूर्वी घोडे येत असत. जुन्नर ही मोठी बाजारपेठ होती आणि समुद्र मार्गे येणारे परकीय व्यापारी आपला माल सुरत,नालासोपारा(शूर्पारक) ,ठाणे(श्रीस्थानक ), मुंबई अशा बंदरातून उतरवून पुढे कल्याण मुरबाड नाणेघाट मार्गे जुन्नर ला आणत असत.
टोलार खिंडीच्या आधी एक पाण्याचा एक स्त्रोत आहे तिथे राजा पाटणकर नावाच्या व्यक्तीने पैसे देऊन एक चौरस टाके खोदून घेतले आहे.त्यामुळे आता तिथे बरेच पाणी राहते अन येणाऱ्या जाणार्या ट्रेकर्स ची तहान भागवते.
बदलणाऱ्या काळानुसार आता तुकारामला त्याच्या व्यवसायात इतर लोकांची स्पर्धा झाली आहे आणि त्याला फक्त कॉल आणि एसेमेस च्या पुढे जाऊन व्हॉट्स अप वापरता येईल असा मोबाईल घ्यायचा आहे.असो.

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

2 Dec 2015 - 12:42 pm | वेल्लाभट

लई भारी! राजेंद्र
मस्त खुसखुशीत वर्णन आणि फोटो.

ह.चं.ग. _/\_
चला; पाय शिवशिवायला लागलेच.

मस्त! कोकणकड्याचा फोटो भारी आहे!

नीलमोहर's picture

2 Dec 2015 - 12:52 pm | नीलमोहर

सर्व फोटो आणि माहिती उत्तम.

बघू इकडच्या वाटेने कधी जमते ते.गाइड,जीपवगैरे चांगलेच फिक्सिंग करावे लागते असं दिसतंय.मोरोशी ते बेलपाडा १५ किमी ?बरेच दूर आहे.
वर्णन आणि फोटो आवडले.

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Dec 2015 - 3:10 pm | राजेंद्र मेहेंदळे

पण बेलपाड्यात एक मुक्काम करावा लागेल तरच सकाळी ट्रेक लवकर चालु करता येइल. तेच लोक जीप पाठवतील, नाहीतर १५ कि.मी. तंगडतोड होईल उगीच.
गाईडशिवाय पण चालेल. पण आम्ही गडावर आधीच तुकारामला सांगितले असल्याने त्यानेच गाईड दिला. तुम्हाला पाहीजे असल्यास नंबर देउ शकतो.

हम्म. त्या मुक्कामी एसटीची वेळ मिळवतो.सकाळी फोटो दिसत होते आता गायबले.कुठल्या साइटची लिंक आहे?

स्वच्छंदी_मनोज's picture

2 Dec 2015 - 4:13 pm | स्वच्छंदी_मनोज

कंजूसजी,
माझ्या गेल्या वर्षीच्या माहीतीवरून - बेलपाडा वाल्हीवरेची मुक्कामी बस संध्याकाळी ७ च्या दरम्यान टोकावडेला येते आणी पुढे बेलपाड्याला जाते.
पण जर का बस मिळालीच नाही तर माळशेज घाटाच्या दिशेनेजाण्यार्‍या बसने सावर्ण्यात उतरायचे आणी उत्तरेकडाचा एक डोंगर पार केला की आपण १.५ तासात बेलपाड्यात पोचू शकतो.

टवाळ कार्टा's picture

2 Dec 2015 - 12:55 pm | टवाळ कार्टा

फोटो भारीयेत

बाबा योगिराज's picture

2 Dec 2015 - 1:34 pm | बाबा योगिराज

वो मामा,
आमाले फोटुच दिसनात की वो...
कै तरी करा की वो...

बाबा योगिराज's picture

2 Dec 2015 - 1:34 pm | बाबा योगिराज

वो मामा,
आमाले फोटुच दिसनात की वो...
कै तरी करा की वो...

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Dec 2015 - 2:09 pm | राजेंद्र मेहेंदळे

दुरुस्ती केली आहे.

स्वच्छंदी_मनोज's picture

2 Dec 2015 - 2:15 pm | स्वच्छंदी_मनोज

दिसले दिसले.. फोटो सकट लेख वाचताना जास्त थरार जाणवतो आहे.

मस्त लेख आणी भ्रमंती. असेच अजून भटकत रहा आणी आम्हाला अश्या लेखांची मेजवानी द्या.

सूड's picture

2 Dec 2015 - 2:16 pm | सूड

भारी!!

बॅटमॅन's picture

2 Dec 2015 - 2:17 pm | बॅटमॅन

अफाट, अप्रतिम!!!!

प्रसाद गोडबोले's picture

2 Dec 2015 - 2:19 pm | प्रसाद गोडबोले

मिपाकंपु घेवुन एकदा हा ट्रेक करायचा आहे !

टवाळ कार्टा's picture

2 Dec 2015 - 2:21 pm | टवाळ कार्टा

तुम्चा पण कंपू आहे याची झैरात का ही =))

स्वच्छंदी_मनोज's picture

2 Dec 2015 - 2:25 pm | स्वच्छंदी_मनोज

+१००.
चला तर मग. नक्कीच करायला हवा.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Dec 2015 - 4:23 pm | अत्रुप्त आत्मा

फोटू कुठ्ठायत?

चांदणे संदीप's picture

2 Dec 2015 - 6:41 pm | चांदणे संदीप

हेच म्हणतो! :(

फोटो दिसले नाहीत. पण काही माहिती व वर्णन रोचक आहे. आवडले.

रच्याकने, तो 'सादडे' घाट आहे. आजकाल अशा खर्‍या नावांऐवजी वेगळीच नावे वापरायचा प्रघात पडला आहे असे दिसते. उदा. सिंहगडाजवळचा 'अडकित्ता' नावाचा दगड हल्ली 'पोटॅटो पॉईंट' म्हणून प्रसिद्ध झाला आहे! :-(

प्रचेतस's picture

2 Dec 2015 - 8:20 pm | प्रचेतस

सहमत आहे. तिथे असणाऱ्या अर्जुनसादड्याच्या झाडांमुळे घाटाला सादडे घाट हे नाव मिळाले.

प्रचेतस's picture

2 Dec 2015 - 8:18 pm | प्रचेतस

गणेशा झालाय.
फोटो हापिसातुन आणि घरातूनही दिसत नाहीयेत.

सकाळी फोटो पाहिले पण आता दिसत नाहीत.
ट्रेक चे वर्णन आणी फोटो उत्तम. --/\--

स्वच्छंदी_मनोज's picture

2 Dec 2015 - 9:20 pm | स्वच्छंदी_मनोज

सकाळी सगळे फोटो दिसले आता निम्मेच दिसताहेत..

कोंड्यानवल्या ची गोष्ट नविनच कळली.
बाकी नळीची वाट म्हणजे मस्तच अनुभव आहे.

- हरिश्चंद्रगडाचा पंखा

पद्मावति's picture

3 Dec 2015 - 12:15 pm | पद्मावति

फारच मस्तं!!

पैसा's picture

3 Dec 2015 - 12:24 pm | पैसा

छान लिहिलंय पण फोटो दिसत नाहीयेत.

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Dec 2015 - 3:36 pm | राजेंद्र मेहेंदळे

गूगल ड्राईव्ह वर फोटो टाकुन अपलोड केलेत. आता दिसायला पाहीजेत.

चांदणे संदीप's picture

3 Dec 2015 - 5:07 pm | चांदणे संदीप

इल्ले!! :(

राजेंद्र मेहेंदळे's picture

8 Dec 2015 - 12:53 pm | राजेंद्र मेहेंदळे

फोटो फायनली दुरुस्त झाले आहेत. :)

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Dec 2015 - 1:54 pm | बिपिन कार्यकर्ते

फोटो दिसणार नाहीत. तुम्ही ते तुमच्या खाजगी ड्राइव्हमधून इथे लिंकले आहेत. ते दिसणार नाहीत. पिकासावर टाका आणि लिंक द्या. किंवा फ्लिकरवरून तरी.

पाटील हो's picture

11 Dec 2015 - 5:18 pm | पाटील हो

फोटो दिसत नाहीयेत.

एकेकाळी दर वर्षी किमान दोन ते तीन वेळा हरिश्चंद्रगडावर फेरी व्हायची. २००८ मध्ये तर वर्षभरात तब्बल ६ खेपा झाल्या होत्या.

नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड चढणं हा एक मस्तं अनुभव आहेच, पण त्यापेक्षाही नळीच्या वाटेने तो उतरुन येणं हा जास्तं भन्नाट प्रकार आहे.
हा आचरटपणाचा उपद्व्याप आम्ही विशेषतः पावसाळ्यात केला होता. उत्साहाच्या भरात निघालो आणि बेलपाड्याला उतरुन येईपर्यंत अक्षरशः हातभर फाटली होती!

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Dec 2015 - 12:32 pm | राजेंद्र मेहेंदळे

_/\_ स्वीकारा!!

राजेंद्र मेहेंदळे's picture

13 Dec 2015 - 5:30 pm | राजेंद्र मेहेंदळे

बिकांच्या सुचनेप्रमाणे फ्लिकरवरुन फोटो डकविले आहेत.

तिमा's picture

13 Dec 2015 - 9:09 pm | तिमा

आता फोटो व्यवस्थित दिसत आहेत. जबरी अनुभव.उत्तम फोटो.
कोकणकडा जरा म्हातारा झाल्यासारखा वाटतो आहे.

अर्पित's picture

14 Dec 2015 - 11:53 am | अर्पित

लय भारी !!

मला पन जायचेय एक् वेळ पन जमतच नाहिय

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Dec 2015 - 12:31 pm | राजेंद्र मेहेंदळे

प्र.के.घाणेकर एका पुस्तकात म्हणतात त्याप्रमाणे
कोणतेही गड बघायला प्रथम एक गड सर करावा लागतो, तो म्हणजे उंबरगड (घराचा उंबरठा)

Bhakti's picture

18 Jan 2024 - 12:43 pm | Bhakti

अगदी
भारीच! थरारक वाटले वाचतांना.