दिवाळी अंक २०२३ - सहल दार्जिलिंग-सिक्कीमची

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in दिवाळी अंक
12 Nov 2023 - 12:00 am

आमच्या कौटुंबिक हिवाळी ग्रूपची सुरुवात २०१४ ला होऊन पंधरा जणांची पहिली हिवाळी सहल केरळ-कन्याकुमारीला रवाना झाली होती. यानंतर उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश अशा सहली करत करत उजाडले साल २०१९ आणि या वेळी सहल ठरली दार्जिलिंग-सिक्कीमची आणि तीही चांगली १४ दिवसांची. जाण्यायेण्याचा प्रवास सोडला, तर नऊ रात्री व दहा दिवसांची सहल होणार होती. सहलीसाठी अगदी उत्साहात सोळा जणांची नावे नोंदवली गेली.

सहलीचे सदस्य मुंबईपासून ते जळगावपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणांहून सहलीत सामील होणार होते. त्याामुळे प्रवासासाठी रेल्वेच सोईस्कर ठरणार होती. मुंबईहून जळगाव मार्गे दार्जिलिंग/सिक्कीम जाण्याकरिता टिळकनगर-कामाख्या AC रेल्वे चांगली. संपूर्ण गाडी AC असल्याने जनरल डब्यातील गर्दी आपल्या डब्यात येण्याची शक्यता नसते.

सहलीच्या चार महिने आधी आरक्षण सुरू झाल्या झाल्या याच गाडीची जाण्या-येण्याची तिकिटे बुक करून टाकली. रेल्वेचे ऑनलाइन बुकिंग करताना जास्तीत जास्त सहा जणांचे मिळून एक तिकीट काढता येते. आम्हाला तर चार वेगवेगळ्या ठिकाणांहून बसणाऱ्या लोकांची तिकिटे काढायची होती. एकाच डब्यात एवढ्या जणांचे आरक्षण मिळणे कठीण.. तरीही एकाच डब्यात सर्व तिकिटे मिळवण्यात यशस्वी झालो.

एकदा जाण्या-येण्याचे दिवस निश्चित झाल्यावर इतर चौकशी सुरु केली. कोणकोणती ठिकाणे बघायची, हॉटेल ठरविणे, जवळच्या रेल्वे स्टेशनवर उतरल्यापासून ते सहल संपून परत रेल्वे स्टेशनवर येईपर्यंत भटकंतीसाठी गाड्या ठरवणे इ. सर्व तपास केला.

प्रत्येक हॉटेलचे वेगवेगळे बुकिंग करणे, गाडी ठरवणे, आयत्या वेळी एखादी गाडी नादुरुस्त झाली, लहरी वातावरणामुळे प्लॅन बदलावा लागला किंवा हॉटेल बदलावे लागले तर काय करायचे, तसेच काही ठिकाणांना भेट देण्यासाठी विशेष परवाना काढावा लागतो वगैरे बाबी लक्षात घेता तेथील एखाद्या स्थानिक पर्यटन कंपनीतर्फे बुकिंग केल्यास सोईस्कर होईल, असे वाटल्याने तसा शोध घेतला व थोडी आगाऊ रक्कम पाठवून सहल निश्चित केली.

अशी ठरली सहल

* रेल्वेने 'न्यू जलपायगुडी' रेल्वे स्टेशनला उतरून दार्जिलिंग येथे जाणे. दार्जिलिंग येथे एक मुक्काम.
* दार्जिलिंगहून गंगटोक. गंगटोक येथे दोन मुक्काम (पूर्व सिक्कीम)
* गंगटोक ते लाचेन (उ. सिक्कीम). लाचेन एक मुक्काम
* लाचेन ते लाचुंग (उ. सिक्कीम). लाचुंग एक मुक्काम.
* लाचुंग ते गंगटोक. गंगटोक दोन मुक्काम.
* गंगटोक-नामची-रावन्ग्ला-पेलिंग. पेलिंग येथे दोन मुक्काम (दक्षिण,पश्चिम सिक्कीम)
* न्यू जलपायगुडी रेल्वे स्टेशनला येऊन परतीचा प्रवास सुरु करणे.

सिक्कीम हे भारताच्या ईशान्येकडील (उत्तर-पूर्वेकडील) छोटेसे राज्य. दार्जिलिंग व सिक्कीमच्या बहुतेक भागांतून हिमालयीन पर्वतरांगांचे दर्शन सतत होणार होते. सहल नोव्हेंबरअखेरीस असल्याने कडाक्याची थंडी असणार होती. त्यामुळे आवश्यक गरम कपडे सोबत घेतले. सामान वाढले तरी विशेष काळजी नव्हती. जलपायगुडी स्टेशनला उतरल्यापासून सहल संपल्यावर परत जलपायगुडी स्टेशनला येईपर्यंत तीन XYLO गाड्या सतत बरोबर असणार होत्या.

सकाळी आठ वाजता टिळक नगरहून रेल्वे प्रवास सुरू झाला.

ठरल्याप्रमाणे ठाणे, नाशिक, जळगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणांहून इतर लोक सहलीत सामील झाले. नाशिकहून येणाऱ्यांनी दुपारचे जेवण आणले होते, तर जळगावकरांनी संध्याकाळचे व दुसऱ्या दिवसाचेही जेवण आणले. वांग्याचे भरीत, भाकरी, मिरच्यांचा ठेचा, तिळाची चटणी, भाज्या, गोड -तिखट दशम्या, लोणचे, पापड, कढी, खिचडी अशी खान्देशी जेवणाची चंगळ होती.

३६ तासांचा प्रवास गाडी उशिरा पोहोचल्याने ४२ तासांचा झाला, पण गप्पा-गोष्टी, पत्ते, इतर बैठे खेळ यामुळे अजिबात कंटाळवाणा झाला नाही. दुसऱ्या दिवशी रात्री तीन वाजता न्यू जलपायगुडी येथे पोहोचलो. रेल्वे स्टेशनला IRCTCच्या रूम बुक केलेल्या होत्याच. चकाचक नसल्या तरी जुजबी सुविधा असलेल्या या खोल्या सामान घेऊन इकडे तिकडे हॉटेल शोधत फिरण्यापेक्षा आणि थोडा वेळ आराम करण्यासाठी निश्चितच चांगल्या.

स्टेशनच्या आसपास फेरफटका मारून यावे म्हटले, तर खोलीच्या दरवाजांना कुलुपच नाही. विचारले तर स्वतःचे कुलूप लावा असे सांगितले. रेल्वे स्टॉलवर जाऊन कुलपे विकत घेऊन लावावी लागली. सगळेच लिहीत बसले, तर आठ-दहा लेखांची मालिका नक्कीच होईल, त्यामुळे जास्त काही न लिहिता फोटोंमधूनच सिक्कीम दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. इतक्या दिवसांचे फोटोही खूप. एका लेखात इतके फोटो कसे द्यायचे.. तो मोठा प्रश्नच. त्यातले काही फोटो निवडले, तरी दोन-अडीचशे सहज होत होते. मग दोन-चार फोटोंचा कोलाज करून संख्या बरीच कमी केली. बघा प्रयत्न जमलाय का. कोणत्या ठिकाणी साधारण काय काय बघता येईल, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास लागणारा वेळ, वाटेत लागणारी ठिकाणे इ. माहिती पुढील सहल आखणाऱ्यास काही प्रमाणात तरी उपयोगी पडावी, हा लेखनामागील उद्देश.

आज खऱ्या अर्थाने सहलीचा पहिला दिवस

ठरवलेल्या तिन्ही गाड्या सकाळी सातला स्टेशनबाहेर येऊन उभ्या होत्या. दोन-तीन तास आराम झाल्याने प्रवासाचा थकवा बराच दूर झाला होता. आज दार्जिलिंगला पोहोचून तेथली पर्यटन स्थळे पाहणे व नंतर संध्याकाळी हॉटेलला पोहोचणे असे ठरले. त्या दृष्टीने कपडे वगैरे बदलून गाड्यांमध्ये बसलो. बरोबर साडेसातला दार्जिलिंगसाठी रवाना झालो. दार्जिलिंग समुद्रसपाटीपासून साधारण ६७०० फूट उंचीवर असून, न्यू जलपायगुडीपासून अंतर ८० कि.मी., तर वेळ साधारण तीन तास लागणार होता. दार्जिलिंगचा डोंगर चढायला सुरुवात झाल्यावर एके ठिकाणी गाड्या थांबवून नाश्ता केला व पुढे निघालो.

बतासिया लूप आणि वॉर मेमोरियल:

दार्जिलिंगपासून पाच कि.मी.वरील हे ठिकाण म्हणजे घूम रेल्वे स्टेशननंतर गाडी ३६० अंशात वळविण्यासाठीचा एक मोठा लूप. आजूबाजूने सुंदर बगिचा बनवला आहे. मध्यावर एक युद्धस्मारक आहे, जे देशासाठी प्राण देणाऱ्या गूरखा सैनिकांना समर्पित आहे. मध्यभागी गुरखा सैनिकाचा कांस्य धातूचा पुतळा आहे.

घूम मठ (यिगा चोलींग)

खूप जुना असा हा मठ असून मठात १५ फूट उंचीची मैत्रेय बुद्धाची मूर्ती आहे.

तेनझिंग नोर्गे रॉक
येथे रॉक क्लाइम्बिंगचा थरार अनुभवता येतो.

चहाचे मळे

येथील डोंगराच्या उतारावर चहाचे मळे दिसतात. चहा विक्रीसाठी रस्त्याच्या बाजूने अनेक स्टॉल आहेत. तिथे चव घेतलेला चहा अप्रतिम होता, पण विकत आणलेली चहा पावडर मात्र तितकीशी चांगली नव्हती.

हिमालयन माउंटेनियरिंग इन्स्टिट्यूट

सर एडमंड हिलरी व एव्हरेस्ट सर करणारे तेनसिंग नोर्गे यांनी १९५३ मध्ये या इन्स्टिट्यूटची स्थापना केली. पर्वतारोहण करण्यासाठी मोहिमांसाठी उपयुक्त माहिती देणारे संग्रहालय असून संस्थेतर्फे पर्वतारोहण प्रशिक्षण केंद्रही चालवले जाते.

पद्मजा नायडू हिमालयन प्राणिसंग्रहालय

प्राण्यांचे संवर्धन आणि प्रजनन या दोन्ही गोष्टींना मदत व्हावी, या उद्देशाने सन १९५८मध्ये या संग्रहालयाची स्थापना करण्यात आली. रेड पांडा, अस्वल, हरीण, हिमबिबट्या, तसेच अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी येथे पाहावयास मिळतात.

लाजाळू रेड पांडा

शांती पॅगोडा
सर्व वंशांच्या व पंथांच्या लोकांना शांततेच्या शोधात एकत्र येण्यास मदत व्हावी, या उद्देशाने याची स्थापना झाली. यात मैत्रेय बुद्धासह बुद्धाचे चार अवतार असून पॅगोडा दार्जिलिंग शहरात जलपहार डोंगरांच्या उतारावर वसलेला आहे.

दिवसभराची भटकंती आटोपून संध्याकाळी हॉटेलवर आलो. हॉटेल बाजारपेठेत होते व रस्तेही छोटे त्यामुळे गाड्या थोड्या लांबच उभ्या कराव्या लागल्या. परंतु तिन्ही चालकांनी सर्व सामान हॉटेलपर्यंत उचलून आणले व पुढे हॉटेल कर्मचाऱ्यांनी थेट रूममध्ये पोहोचवले, त्यामुळे आमचा बराच त्रास वाचला.

आजचे हॉटेल 'न्यू मांडला (Hotel New Mandala)
खोल्या,जेवण, नाश्ता, सेवा सर्व गोष्टी चांगल्या वाटल्या.

आज सहलीचा दुसरा दिवस

पहाटेच पाच वाजताच दार्जिलिंग येथील टायगर हिलसाठी निघालो. टायगर हिल येथून पहिल्या सूर्यकिरणांनी उजळणारी कांचनजंगाची पर्वत शिखरे बघावयाची होती. अंधार असतानाच तेथे पोहोचलो. लवकर निघूनसुद्धा आमच्या आधी बरीच गर्दी जमलेली होती व मोक्याच्या जागा पकडून सूर्योदयाच्या प्रतीक्षेत उभी होती. जसा उजेड होऊ लागला, तशी शिखरे चंदेरी रंगात चमकू लागली. थोड्याच वेळात सूर्याची पहिली किरणे शिखरांवर पडू लागली आणि ती सोनेरी रंगात चकाकू लागली. ते सारे क्षण नजरेत साठवून घ्यायचा प्रयत्न केला, तर काही क्षण कॅमेऱ्यात बंद केले व परत हॉटेलवर निघालो.

आज दार्जिलिंग ते गंगटोक असा प्रवास होता. वाटेत सिक्कीमच्या दोन प्रमुख नद्या 'तिस्ता' व 'रंगीत' यांचा संगम एका व्ह्यू पॉइंटहून बघावयास मिळाला. पॉईंटचे नाव होते 'Lovers Meet View Point.'

येथून थोडे पुढे गेल्यावर रिव्हर राफ्टिंगचा थांबा आला. थंडी खूप होती त्यामुळे सुरुवातीला कोणी नदीत येईल का याची शंकाच होती; पण एक, दोन करता करता अकरा जण तिस्ता नदीत राफ्टिंगचा अनुभव घेण्यास सज्ज झाले. एकात पाच व एकात सहा जण अशा दोन राफ्ट केल्या व पुढचा एक तास राफ्टिंगचा थरारक अनुभव घेतला.

पाण्यातून बाहेर आल्यावर गरम गरम मोमोज खाल्ले आणि गंगटोकसाठी निघालो.

मोमोजवर जी चटणी दिसते, ती सिक्कीममधील 'डल्ले खुरसानी' (Fireball Chilli) या आकाराने गोल आणि लालभडक मिरचीची. ही मिरची जगातील अत्यंत जहाल मिरच्यांपैकी एक. सिक्कीममध्ये ठिकठिकाणी या मिरच्या विक्रीस दिसल्या. मीसुद्धा थोड्याशा मिरच्या आणल्या होत्या, त्यातील काही सुकवून निघालेले बी बाल्कनीत कुंडीत टाकले होते. रोपे उगवून त्याला छान मिरच्या लागल्या होता. यातल्याच हा चेरीसारख्या लालबुंद दिसणाऱ्या मिरच्यांचा एक फोटो.

वाटेत चुंगथांग येथील तिस्ता नदीवरचे एक धरण व ऊर्जा प्रकल्प लागला. येथे थोडे थांबून संध्याकाळी सातला गंगटोकला मुक्कामी पोहोचलो.

आजचे हॉटेल "Le Primula'. नाश्ता, जेवण, राहण्याची उत्तम व्यवस्था होती.
उद्या सकाळीच नाथू ला खिंड पाहण्यास जायचे असल्याने आमच्या सहल आयोजकांनी परवान्यासाठी फॉर्म भरून घेतले. परवानगीचे काम त्यांच्याकडेच असल्याने आम्ही जेवण वगैरे आटोपून झोपी गेलो.

आज सहलीचा तिसरा दिवस
आज भारत-चीनच्या सीमेवरील 'नाथू ला खिंड' पाहावयाची होती.

नाथू ला गंगटोकपासून ५५ कि.मी. असून तिबेटशी जोडणारी ही खिंड १४१४० फूट उंचीवर आहे. येथे जाण्यासाठी माउंटेनिअरिंग डिव्हिजन व पोलीस मुख्यालय गंगटोक यांच्याकडून परवाना घ्यावा लागतो. सोमवार व मंगळवार हे दोन दिवस पर्यटकांसाठी बंद असतात, हे लक्षात ठेवावे. १९६७ साली चिनी सैन्य भारतात घुसले, तेव्हा तुंबळ युद्ध करून भारताने आपली सीमा सुरक्षित ठेवली. परदेशी पर्यटकांना येथे प्रवेश नाही.

काही पायऱ्या चढून सीमेपर्यंत पोहोचावे लागते. ऑक्सिजनची थोडी कमतरता येथे भासू शकते. सोबत बांधून घेतलेला कापूर अधूनमधून हुंगल्याने बरे वाटते, असा अनुभव आहे.

येथून परतीच्या प्रवासात आम्ही 'त्सोमगो लेक (छांगू सरोवर)' येथे थांबलॊ.
गंगटोक ते नाथू ला ररस्त्यावर नाथू लाच्या अलीकडे १२४०० फूट उंचीवर अतिशय सुंदर सरोवर आहे. सरोवर लंब गोलाकार आहे. डोंगर खोदून याच्या काठाने फिरण्याचा रस्ता बनवला आहे. जानेवारी ते एप्रिल या काळात हे संपूर्ण गोठलेले असते. सरोवराच्या काठावर शंकराचे मंदिर आहे.सरोवराच्या बाजूने सजवलेल्या याकवरून फेरी मारता येते. हौस म्हणून सिक्किमी पोशाख घालून याकबरोबर फोटो काढले.

बाबा मंदिर :
नाथू लाच्या जवळच बाबा हरभजनसिंह यांचे मंदिर आहे.

४ ऑक्टोबर १९६८ रोजी घोड्यांचा काफिला घेऊन जात असताना पाय घसरून दरीत पडल्याने त्बाबा हरभजनसिंह यांचा मृत्यू झाला. काही दिवसानंतर हरभजनसिंह सहयोगी मित्राच्या स्वप्नात आला व त्याने काही महत्त्वाची माहिती दिली, तसेच आपल्या शवाचा ठावठिकाणा सांगितला व घटनास्थळी स्मारक बांधावयास सांगितले. अजूनही हरभजनसिंह वेळोवेळीआपल्या सैन्यास महत्त्वाची माहिती देत असतात, असे सांगितले जाते. आजारी व्यक्तीच्या नावे मंदिरात पाण्याची बाटली भेट दिल्या जाते व नंतर ती परत नेऊन त्या आजारी व्यक्तीस दिल्यास ती बरी होते, असा समज आहे.

भूक लागली होती. एका ढाब्यावर जेवण घेतले. दुपार असली, तरी थंडीने कुडकुडत होतो. पण जेवायच्या ठिकाणी चांगली व्यवस्था होती. टेबलाखाली शेगडी पेटवून टेबल चादरीने झाकले होते. चादरीतून आत पाय सरकवले की छान ऊबदार वाटत होते.

सूर्य अस्ताला जात होता. दरीतून ढग वर येत होते. पिंजलेला कापूसच जसा.

हॉटेलला परत येईपर्यंत संध्याकाळ झाली. बरेच थकलो होतो. जेवणाआधी केक कापून सहलीतील एका जोडप्याचा लग्न वाढदिवस साजरा केला. थोडा वेळ गप्पागोष्टी करूनसगळे झोपायला गेले.

सहलीचा चौथा दिवस
आज उत्तर सिक्कीममधील गुरुडोंगमर सरोवर पाहण्यासाठी लाचेन येथे मुक्कामी जायचे आहे. दोन दिवसांनी परत याच हॉटेलला येऊन मुक्काम करायचा असल्याने फक्त जरुरी सामान बरोबर घेतले. बाकीचे येथेच दोन खोल्यांमध्ये ठेवले. नाश्ता करून गंगटोकचे हॉटेल सोडले. गंगटोक ते लाचेन अंतर १३० कि.मी.चे असून सहा तासाचा प्रवास आहे. पण लाचेनला पोहोचून आज फक्त आरामच करायचा असल्याने आम्ही रमतगमत प्रवास केला व चांगले नऊ तास घेतले.
निघाल्यावर लगेच गंगटोक येथीलच 'ताशी व्ह्यू पॉइंट'ला भेट दिली. येथून कांचनजंगाचे सुंदर दर्शन होते. सिक्किमी वेष भाड्याने घेऊन फोटो काढले.

उत्तर सिक्कीममध्ये पाण्याच्या पातळ बाटल्या बाळगण्यास मनाई आहे. त्यामुळे गाडी चालकाने सर्वाना तशा प्रकारच्या बाटल्या असतील तर काढून टाकण्यास सांगितले. सापडल्यास रु.५०००/- दंड होऊ शकतो, असे समजले. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या बाटल्या विकत घेऊन पाणी भरून घेतले.
वाटेत अनेक ठिकाणी धबधबे आहेत. काही ठिकाणी थांबून बघितले, तर काही गाडीतूनच.

हॉटेलहून निघताना रोज पोटभर नाश्ता असायचा, त्यामुळे दुपारी विशेष भूक नसायची. वाटेत ढाब्यावर मिळेल ते थोडे खाऊन घ्यायचे आणि त्याबरोबर घरून आणलेला खाऊ असायचाच. यामुळे खाण्याच्या बाबतीत कुठेच हाल झाले नाहीत. संध्याकाळी सातला लाचेन येथे पोहोचलो. गरम कपडे, स्वेटर असूनही हुडहुडी भरत होती. जाकीट आवश्यक होते, नाहीतर सकाळी १४००० फुटांवर पोहोचताना थंडीने हाल होणार होते. सकाळी लवकरच निघायचे असल्याने रात्रीच जाकिटची व्यवस्था होणे आवश्यक होते. इकडे पाच वाजताच अंधार होतो व सात वाजता तर सगळीकडे अगदी सामसूम. लाचेनसारख्या छोट्या गावात जी काही थोडीफार दुकाने होती, ती बंद झाली होती. शेवटी हॉटेलवाल्याच्या मदतीने ग्रूपसाठी काही जाकिटे भाड्याने मिळवण्यात आली. आता काळजी नव्हती. जेवण आटोपून लवकरच झोपी गेलो. आजचे हॉटेल 'Pardon De'. हॉटेल नवीनच होते. राहण्या-खाण्याची चांगली व्यवस्था होती.

सहलीचा पाचवा दिवस

सकाळी सहालाच गुरुडोंगमार सरोवरासाठी निघायचे असल्याने पाचलाच उठून तयार झालो. तापमान दोन अंश सेल्सिअसच्याही खाली होते. बरोबर सहाला आमच्या गाड्या निघाल्या. लाचेन सोडल्यावर थोड्याच वेळात सगळीकडे बर्फाची सफेद चादर अंथरलेली दिसू लागली. ही या वर्षीची पहिली बर्फवृष्टी होती. आणखी पुढे गेल्यावर तर प्रत्यक्ष बर्फवृष्टीचा अनुभव यायला लागला. आणखी पुढे गेल्यावर एका चेकपोस्टवर पुढे जाणे धोक्याचे आहे असा इशारा मिळाला. काही ठिकाणी बर्फवृष्टीमुळे रस्ता बंद आहे असे कळले. अजून जास्त बर्फवृष्टी झाली तर तिकडेच अडकून पडावे लागले असते, म्हणून आहे तिथेच उतरून बर्फवृष्टीचा आनंद घेतला. बर्फात मनसोक्त खेळलो व परत निघालो.

हॉटेलवर येऊन जेवण उरकल्यावर 'लाचुंग' येथे जाण्यासाठी निघालो. सरोवर बघणे रद्द झाल्याने आज थोडा जास्त वेळ हाताशी होता. त्यामुळे वाटेत तिस्ता नदीच्या काठावर थांबून त्याची कसर भरून काढली.

अंधार होता होता लाचुंगला पोहोचलो. आजचे हॉटेल 'Norling dzimkhang '. सर्वच्या सर्व महिला कर्मचारी. येथेही जेवण, खोल्या सर्वच चांगले.

सहलीचा शावा दिवस - झिरो पॉइंट व युमथांग व्हॅली
आज लाचुंगपासून उत्तरेला साधारण ५० कि.मी.वरील झिरो पॉइंट बघून परतीच्या प्रवासात युमथांग व्हॅली बघण्याचे ठरले.
हॉटेलच्या रूममधील ऊबदार बेडमुळे (इलेक्ट्रिक) रात्री मस्त झोप झाली होती.

आज पारा शून्यापर्यंत घसरला होता. सकाळी ६ वाजताच आमच्या हॉटेलवाल्यांनी सगळ्यांसाठी ब्रेड-जॅम-बटर व उकडलेली अंडी असा नाश्ता बांधून दिला, तो बरोबर घेतला. लाचुंग सोडल्यावर थोड्याच वेळात एक पोलीस चेकपोस्ट लागते, तेथे टूरिस्ट परमिट दाखवावे लागते.

थोडे पुढे गेल्यावर ग्रूपमधील एकाला उलट्यांचा त्रास व्हायला लागला, त्यामुळे त्याने तेथेच थांबण्याचा निर्णय घेतला. बाजूलाच लष्करी तळ असल्याने काळजी करण्याचे कारण नव्हते, म्हणून आम्हीही त्याला सोडून निर्धास्तपणे पुढे निघालो. पुढे रस्ता अरुंद व खडकाळ असला, तरी बऱ्या स्थितीत होता. दोन्ही बाजूंना बर्फाच्छादित डोंगर, उंच झाडे व त्यामधून जाणारा वळणावळणाचा रस्ता. खूपच छान वाटत होते. वाटेत युमथांग व्हॅली लागली, पण ती तिथे आम्ही परतीच्या प्रवासात थांबणार होतो.

झिरो पॉइंट म्हणजे येथे भारताच्या हद्दीतील मानवनिर्मित रस्त्याचा शेवट. पुढे चीनची सीमा आहे. वाटेत काही ठिकाणी बंकर दिसत होते.

झिरो पॉइंटला आजूबाजूला सगळीकडे बर्फाच्छादित डोंगर आहेत. जमिनीवर बर्फाचा पातळ थर सगळीकडे पसरलेला दिसत होता. गाडीतून उतरून थोडा वेळ बर्फात फिरायची मजा अनुभवली, फोटो काढले व परत गाडीत येऊन बसलो. प्राणवायूच्या कमतरतेमुळे १० मिनिटांच्या वर थांबू नका असे सांगितले होते, तरी चांगले २०-२५ मिनिटे आम्ही येथे थांबलो होतो.

एका गाडीतील लोकांनी थंडीपासून बचाव करण्याकरिता गाडीतील हीटर चालू करून प्रवास केला होता, त्यांना मात्र गाडीतून उतरल्याबरोबर लगेच वातावरणातील फरकामुळे त्रास जाणवला व परत गाडीत जाऊन बसावे लागले.

आता परतीच्या प्रवासात युमथांग व्हॅलीला थांबायचे होते. तासाभरात थेथे येऊन पोहोचलो. युमथांग व्हॅली म्हणजे सिक्कीमची 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स', ऱ्होडोडेंड्रॉन वृक्षाची लालचुटुक फुले व इतर अनेक रानफुले इथे एप्रिल ते जून या काळात बघावयास मिळतात. आम्ही व्हॅलीतील नदी व बाजूच्या उथळ भागात फिरून इथले स्वच्छ वातावरण अनुभवले.

येथून थोड्याच अंतरावर गरम पाण्याचा झरा आहे. थंडी व झिरो पॉइंटला झालेली थोडीशी मळमळ व डोकेदुखीमुळे येथे जास्त कोणी गाडीतून उतरले नाही. गरम पाण्याच्या कुंडाकडे जायला एक लोखंडी पूल पार करावा लागतो. पुढे काही पायऱ्या चढून गेल्यावर एका झोपडीवजा खोलीत कुंड आहे. खोली बंद असल्याने कुंडातून एका पाइपमधून बाहेर पडणारे गरम पाणी बघून दोघे परत आले. हॉटेलवर परत यायला दुपारचे १२ वाजले.

गरम गरम जेवण तयारच होते. ते आटोपून लगेच गंगटोकसाठी निघायचे होते. सकाळचा ४-५ तास प्रवास झालेला होता आणि अजून पुढे १३० कि.मी, सहा तासांचा प्रवास होता. खूप कंटाळवाणे होईल असे वाटत होते, पण वातावरण एव्हडे आल्हाददायक होते की प्रवाससुद्धा सुखद झाला आणि आम्ही साधारण ७ वाजता परत गंगटोक मुक्कामी आलो.

सहलीचा सातवा दिवस - गंगटोक स्थानिक भटकंती

आज संपूर्ण दिवस स्थानिक भटकंतीसाठी राखीव आहे. गेले २-३ दिवस भल्या पहाटे उठून सहलीची सुरुवात होत होती. आज मात्र आरामात म्हणजे नाश्ता वगैरे आटोपून नऊ-साडेनऊला बाहेर पडलो.

सर्वप्रथम पोहोचलो गंगटोक शहरापासून सात कि.मी.वरील 'बन झाकरी' धबधब्याला. बन झाकरीचा अर्थ जंगल मांत्रिक/पुजारी असा आहे. १०० फूट उंचीवरून पडणाऱ्या या धबधब्याच्या पायथ्याशी दोन एकरात वसवलेले एक सुंदर उद्यान आहे. यात एक कृत्रिम तलाव असून त्यात ड्रॅगन बनवलेला आहे. पायऱ्या असलेल्या एका लोखंडी माचीवरून आजूबाजूचा रम्य परिसर न्याहाळता येतो.

नंतर पोहोचलो येथून जवळच असलेला या 'रांका मोनेस्टरी' हा बौद्ध मठ बघायला. (गंगटोकपासून २० कि.मी.) अत्यंत निसर्गरम्य व विस्तीर्ण परिसरात हा मठ आहे. मठाच्या दोन माजली इमारतीत अनेक वर्ग आहेत, जेथे तरुण भिक्षू आपले शिक्षण घेतात. मुख्य प्रार्थनागृहात बुद्धाची भव्य मूर्ती आहे. प्रार्थनागृहाच्या बाहेरील गच्चीतून आजूबाजूचा सुंदर परिसर पाहावयास मिळतो.

नंतर भेट दिली 'न्यामग्याल इन्स्टिटयूट ऑफ तिबेटॉलॉजी'ला. तिबेटी भाषा आणि संस्कृती यावर अभ्यास करणारी ही अतिशय प्रसिद्ध संस्था आहे. तळमजल्यावर तिबेटी व हिमालयीन गोष्टींचा वारसा असलेले छोटेसे वस्तुसंग्रहालय येथे आहे. पहिल्या मजल्यावर दस्तऐवज आणि साहित्य असलेले ग्रंथालय आहे. सिक्कीमचे राजा स्व. ताशी न्यामग्याल यांनी संस्थेची जागा दान केलेली असून त्यांचेच नाव संस्थेला देण्यात आले आहे. संस्थेपासून अगदी जवळच दो-द्रुल चोरटेन स्तूप आहे. या भव्य स्तूपाचा कळस सोनेरी आहे व तो गंगटोकच्या बऱ्याच भागातून नजरेस पडतो. स्तूपाच्या चोहो बाजूनी मंत्रचक्र असून त्यांची संख्या १०८ इतकी आहे. आजूबाजूला आणखी काही छोटे स्तूप इथे दिसतात.

संस्थेच्या जवळच असलेल्या देवराली येथे रोपे वेचे स्थानक आहे. येथून साधारण एक कि.मी.ची (जाऊन-येऊन २ कि.मी.) रोप वेची फेरी आपण करू शकतो. केबल कारमध्ये बसण्याची सोय नाही. हिची क्षमता २४ लोकांची असली, तरी एका वेळी १६ लोक यातून नेतात. यातून प्रवास करताना आपल्याला गंगटोक शहर, रस्ते, बाजार, कांचनजंगा शिखरे याचे मनोहार दर्शन होते.

नंतर पाहिले रिज पार्क व फुलांचे प्रदर्शन. येथे विविध प्रकारची फुले पाहावयास मिळाली.

त्यानंतर हस्तकला प्रदर्शनही पहिले. ते विशेष काही आवडले नाही. एक फेरी मारून लगेच बाहेर पडलो.

दुपारचे चार वाजून गेले होते.आता राहिला होता आम्हा महिलांसाठीचा महत्त्वाचा भाग 'शॉपिंग'. ग्रूपमधील ज्यांना खरेदीत रस नव्हता, ते हॉटेलवर परत गेले व बाकीचे एम.जी. रोडला. एम.जी. रोड हा गंगटोकचा मुख्य बाजार असून रोडच्या १ कि.मी. परिसरात वाहनांना बंदी आहे. रस्त्याच्या दुतर्फा कपडे, बूट, हॉटेल, भेटवस्तू अशी सगळ्या प्रकारची दुकाने आहे. परिसरात कुठेही कचरा दिसत नाही. रस्त्याच्या मधोमध अनेक बाक ठेवले आहेत. जेथे बसून आपण येथली मजा बघू शकतो किंवा आराम करू शकतो.

येथली बहुतेक दुकाने चकाचक व ब्रँडेड वस्तूंची दिसत होती. येथे काहीच खरेदी केली नाही. रस्ता ओलांडून पुढे उतरतीवर असलेल्या 'लाल मार्केट'मध्ये पोहोचलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी छोटी छोटी व स्वस्त दराची भरपूर दुकाने आहेत. भेट देण्यासाठीच्या वस्तू, कपडे, अशी भरपूर खरेदी करूनच हॉटेलवर परत आलो.

सहलीचा आठवा दिवस : गंगटोक-नामची -रवांगला (रबॉन्गला)-पेलिंग

सकाळी नऊला गंगटोकहून नामची येथे जाण्यास निघालो आणि साधारण १२च्या सुमारास नामची येथे येऊन पोहोचलो. दक्षिण सिक्कीमच्या नामचीजवळील सोलोफोक डोंगरामाथ्यावर जवळजवळ २७ हेक्टर जागेवर हे चारधाम मंदिर वसवले आहे. यालाच 'सिद्धेश्वर धाम' असेही म्हणतात. येथे शंकराचे १०८ फूट उंच मंदिर असून त्याच्यावर आणखी ८७ फूट उंची बैठी मूर्ती आहे. मंदिरात शिवलिंग असून खूप मोठा सभामंडप आहे. सभामंडपाच्या चहू बाजूंनी भगवान शंकराबद्दल माहिती देणारी भित्तिचित्रे आहेत. शिव मंदिराकडे तोंड करून एक भव्य नंदीही आहे. शिव मंदिराच्या सभोवताली १२ ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती आहेत. याशिवाय ज्यांना चारधाम यात्रा करणे शक्य होणार नाही, त्यांच्याकरिता बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथ व रामेश्वरम मंदिर यांच्याही प्रतिकृती आहेत, जेणेकरून चारधाम यात्रा केल्याचे समाधान मिळू शकते.

मंदिराच्या बाहेरच असलेल्या हॉटेलमध्ये जेवण घेतले व रवांगला येथील बुद्ध पार्कला येऊन पोहोचलो. दुपारचे ४ वाजून गेले होते. थोड्याच वेळात अंधार पडणार होता. त्यामुळे घाई करून मंदिर पाहावयाचे होते. सन २००६ साली बुद्धजयंतीचे निमित्त साधून या तीर्थक्षेत्राची निर्मिती करण्यास सुरुवात झाली. २०१३पर्यंत याचे काम सुरु होते. मध्यवर्ती भागात काही पायऱ्या चढून गेल्यावर १३० फूट उंचीची बुद्धाचीअत्यंत सुंदर मूर्ती निर्माण करण्यात आलेली आहे. सभोवताली सुंदर उद्यान निर्मिती करण्यात आली व २५ मार्च २०१३ रोजी दलाई लामा यांच्या हस्ते बुद्धमूर्तीचे अनावरण करण्यात आले.

बुद्धमूर्तीच्या खाली चिंतनगृह असून बाजूने भिंतीवर बुद्धाच्या जीवनातील घटना चित्रित केलेल्या आहेत. दोन मजल्यांपर्यंत चक्राकार मार्गाने चढत जात आपल्याला त्या बघता येतात. संपूर्ण परिसर बघून होईपर्यंत काळोख व्हायला सुरुवात झाली होती. (सिक्कीमला ५ वाजताच अंधार व्हायला सुरुवात होत होती.) त्याच वेळी बुद्धाच्या मूर्तीवर प्रकाशझोत टाकणारे दिवे प्रज्वलित होण्यास सुरुवात झाली. आणि थोड्याच वेळात सुवर्ण प्रकाशाने मूर्ती उजळून निघाली. दिवसाच्या उजेडात व रात्रीच्या काळोखातअशा दोन्ही रूपांत मूर्तीचे देखणे रूप पाहण्याची संधी आम्हाला लाभली.

आणखी दोन तासांचा प्रवास करत पेलिंग येथे मुक्कामी पोहोचायचे होते. प्रवास सुरू केला व सात-साडे सातच्या दरम्यान पेलिंग मुक्कामी पोहोचलो. आजचे हॉटेल 'Golden Sunrise'. सर्व व्यवस्था चांगली.

सहलीचा नूवा दिवस - पेलिंग व आजूबाजूचा परिसर भटकंती.

ऑरेंज गार्डन व रिम्बी नदी - आज सर्वप्रथम भेट दिली ऑरेंज पार्कला. रस्त्यालगतच संत्र्याचा बगिचा व इतर काही फळांची-फुलांची सुंदर बाग आहे. ताजी संत्री, पेरू बागेत काही छोट्या दुकानांवर विक्रीला उपलब्ध होते. पेरू, अननस यापासून बनवलेला ज्यूस छोट्या प्लास्टिक बाटल्यांमधून किंवा ग्लासमधून विक्रीला ठेवलेला होता. एक नवीन प्रकारची फळभाजीही दिसली. तिला इसकूस किंवा इस्कस म्हणतात, असे समजले. थोडे खाली उतरून गेले की रिम्बी नदी लागते. नदीतील खडकांवर बसून व आजूबाजूला फिरून डोंगर, झाडी बघायला खूप छान वाटते.

खेचेओपलरी सरोवर - पेलिंगपासून सुमारे २७ कि.मी.वर हे पवित्र मानले जाणारे सरोवर आहे. वाटेत रिम्बी धबधबा पाहून येथे पोहोचलो. धबधब्याला पाणी कमी होते व गेल्या ८-१० दिवसांत इतके धबधबे पहिले होते की यात नवीन काही विशेष वाटले नाही. येथे आल्यावर ५-१० मिनिटांच्या पायवाटेने सरोवरासाठी पोहोचता येते. वाटेच्या दोन्ही बाजूंनी जंगल असून मंत्रध्वज फडकताना दिसतात. येथे एक छोटेसे मंदिर असून बाजूलाच सरोवराकडे जाणारा रस्ता आहे. सरोवराच्या बाजूला असणाऱ्या कठड्यांहून तलावातील माशांना खाद्य देता येते. खाद्य फेकले की क्षणात असंख्य मासे पाण्यातून वर उसळी मारून ते संपवतात.

येथूनच पुढे कांचनजंगा धबधबा बघायचा होता, पण कंटाळा केला व दुसरी ठिकाणे बघायला परत फिरलो.

चेनरेझिग पुतळा (अवलोकितेश्वर) व स्काय वॉक - १३७ फूट उंचीचा चेनरेझिग पुतळा २०१८मध्ये पर्यटनकांसाठी खुला करण्यात आला. बुद्ध पार्क, रावांगलाप्रमाणेच येथेही मूर्तीच्या खाली असलेल्या तीन मजल्यांमध्ये भिंतीवर बौद्ध कथा रेखाटली आहे. पुतळ्याच्या बाजूस सुवर्ण मंत्रचक्र आहेत

पुतळ्याच्या समोरच पारदर्शक काचेचा स्काय वॉक आहे. यावरून आजूबाजूचा रमणीय प्रदेश न्याहाळता येतो.

पुढील प्रवासात वाटेत एक हेलिपॅड दिसले. मात्र पर्यटकांसाठी येथे हेलिकॉप्टर सुविधा नाही. आजूबाजूचा परिसर मात्र येथून सुंदर दिसतो.

आता दोन पर्याय होते - एक म्हणजे येथील बौद्ध मठ 'Pemayangtse Monastery' पाहणे किंवा सिक्कीमची प्राचीन राजधानी पाहणे. सहलीत इतर ठिकाणी बौद्ध मठ पहिले होते, त्यामुळे थोडी पायपीट करून दुसरा पर्याय पाहणे पसंत केले.

रबडेन्त्से रुइन्स (रबडेन्त्से राजवाडा) - येथे प्रवेश शुल्क भरून आधी पक्षी अभयारण्य पाहता येते व पुढे जंगलातून पायवाटेने जवळपास दोन किमी चालत गेल्यावर हे राजवाड्याचे अवशेष पाहता येतात. रबडेन्त्से ही सन १६७० ते १८१४ या काळात सिक्कीमच्या पूर्व साम्राज्याची राजधानी होती. येथील राजवाडा आक्रमणामुळे उद्ध्वस्त झाला असून आता फक्त काही अवशेष उरले आहेत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागातर्फे याचे संवर्धन व देखरेख केली जात आहे.

सहलीचा दहावा दिवस - सिंगशोर पूल व परतीचा प्रवास

आज सहलीच्या भटकंतीचा शेवटचा दिवस. वास्तविक मूळ कार्यक्रमानुसार आज सकाळी हॉटेल सोडून पेलिंग ते न्यू जलपायगुडी असा सहा तासांचा प्रवास करून दुपारीच रेल्वे स्टेशनला पोहोचायचे होते. पण आमचे आरक्षण तर रात्री ३ वाजताच्या गाडीचे होते. म्हणून आज भटकंतीत आणखी अर्धा दिवस वाढवून रात्री रेल्वे स्टेशनला पोहोचायचे ठरवले व त्यानुसार शिंगशोर ब्रिज हे भेट द्यायचे ठिकाणही ठरवले.

सिन्गशोर ब्रिज - हा सस्पेन्शन पूल सिक्कीममधील सर्वात उंच तर आशिया खंडातील दोन नंबरचा उंचावरील पूल आहे. दोन घाटांना जोडण्यासाठी मधल्या दरीवरील हा पूल खालील नदीपासून १०० मीटर उंचीवर व साधारण २०० मीटर लांबीचा आहे. पुलावरून आजूबाजूचे घनदाट झाडीने वेढलेले डोंगर व खोल दरीचे दृश्य थक्क करणारे आहे.

पुलावरून होणारी रहदारी तुरळक स्वरूपाची असल्याने अगदी रमतगमत आम्हाला हा नजारा बघत आला व भटकंतीचा पुरेपूर आनंद घेता आला. यातच एक सिक्किमी मुलगा मोटरसायकल घेऊन येथे पोहोचला. थोडीशी ओळख झाल्यावर पुरुष डळींनी या अनवट ठिकाणी बुलेटस्वारीचा अविस्मरणीय अनुभव घेतला.

आम्ही पुलाच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाऊन परतीसाठी चालायला सुरुवात केली. मागे वळून पाहतो, तर पुरुष मंडळी दिसेना. पुलाच्या तोंडाशीच असलेल्या छोट्याशा झोपडीसारख्या दुकानात त्यांना त्यांचे आवडते पेय मिळाले होते आणि तिथल्याच टेबलवर त्यांनी बैठक मांडली होती. सिक्कीममध्ये अशी पेय खूप स्वस्त आणि अगदी छोट्या छोट्या ठिकाणीही मिळतात.. जेथे अर्धा-पाऊण तास वेळ द्यायचा तिथे चक्क दीड तास घालवला. आजचा मोकळा वेळ त्यांनी त्यांच्या दृष्टीने सत्कारणी लावला होता.

एका महिला सदस्याला सकाळपासूनच उलट्या, डोकेदुखीचा भयंकर त्रास होत होता. तोंडावाटे दिलेली औषधी पोटात राहतच नव्हती. वाटेत एक प्राथमिक आरोग्य केंद्र लागले.

डॉक्टरांना काय त्रास होतो ते सांगितले व आम्ही पर्यटक असून रात्री लांबचा प्रवास करायचा आहे हेही सांगितले. त्यांनी तत्परतेने रुग्णाला भरती करून घेतले व सलाइन, इंजेक्शन वगैरे उपचार सुरु केले. तासाभरात पेशंटला तरतरी आली . डॉक्टरांनी पुढे काय काळजी घ्यायची ते समजावून सांगितले व आमचा पुढचा प्रवासाचा मार्ग मोकळा झाला. या मधल्या एक तासातही महिलावर्ग जवळच्याच स्थानिक मार्केटमध्ये सटकला होता.

पुढे मात्र ताशी ४० कि.मी.च्या वेगाने सुसाट निघालो (हो. सिक्कीमच्या घाट वळणांच्या रस्त्यांवर ४० कि.मी.चा वेग म्हणजे सुस्साटच!) व रात्री ८ वाजता न्यू जलपायगुडी येथे पोहोचलो. रेल्वेच्या ६ रिटायरिंग रूम आधीच आरक्षित केलेल्या असल्याने आता पहाटे तीनपर्यंत आराम.

रात्रीचे दिसणारे सिक्कीम स्टेशन

सहल खर्चाबाबत - रेल्वेचा ३ AC रेल्वे प्रवास, न्यू जलपायगुडीच्या स्टेशनला उतरल्यापासून परत स्टेशनला येईपर्यंत भटकंतीच्या सर्व १० दिवसांसाठी गाडी, नाश्ता, जेवण, नाथू ला पास जाण्यासाठी वेगळ्या गाडीचा खर्च, सर्व ठिकाणची प्रवेश फी, रोप वे वगैरे व इतर किरकोळ खर्च मिळून १४ दिवसांचा संपूर्ण खर्च रु.३५०००/- प्रत्येकी.

संपूर्ण सहलीत सिक्कीमचे मनोहर दर्शन झाले. विशेष आठवणीत राहिले ते म्हणजे निसर्गाला जपणारे आणि स्वच्छतेची काळजी घेणारे येथील लोक, घरांच्या खिडकीत, बाल्कनीत, रस्त्यावर दोन्ही बाजूंनी जेथे जागा मिळेल तेथे दिसणाऱ्या फूलबागा, बहुतेक ठिकाणी दिसणारा महिला कामकारिवर्ग व त्यांची काम करतानासुद्धा टापटीप राहण्याची सवय, आजारी व्यक्तीकडे केवळ रुग्ण म्हणून न बघता राज्याचे अतिथी म्हणून वागणूक देणारे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर आणि कर्मचारी, दुर्गम भागात रस्ता देखभालीचे काम करणारे BROचे जवान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बलाढ्य शत्रूपासून सीमा रक्षण करणारे येथील सैनिक.

खालील फोटोत :
आमच्या भटकंतीसाठी मिळालेल्या तीन गाड्या
आमच्या सहल आयोजनास ज्यांची मदत झाली ते Travelzone कंपनीचे मालक श्री. अरुण भगत (फोटोत तळाला उजव्या कोपऱ्यातील उंच उंच व्यक्ती). अत्यंत साधे व चांगले व्यक्तिमत्त्व. आमचे गंगटोकचे हॉटेल व भटकंतीसाठी असलेल्या गाड्याही यांच्याच मालकीच्या .
आमचे तीन सारथी. (तळाचा डाव्या बाजूचा फोटो) अत्यंत कुशल व सहलीतील सर्व पर्यटन स्थळांची माहिती असलेले. दहा दिवसात आम्ही अनेक ठिकाणी चहा, नाश्त्यासाठी थांबलो, पण एकदाही त्यांनी आम्हाला त्यांचा चहापाण्याचा खर्च करू दिला नाही, तसेच मुक्कामाच्या ठिकाणी कधी पैसेही मागितले नाहीत .

ग्रुपमधील सर्व जण लहान, मोठा वगैरे मानपान न ठेवता मित्रत्वाच्या भावनेने वागले व सहलीत आनंद भरला, त्यामुळे सगळ्या ग्रूपचे अभिनंदन व आभार.


प्रतिक्रिया

अथांग आकाश's picture

13 Nov 2023 - 12:08 am | अथांग आकाश

मस्त प्रवासवर्णन! धन्यवाद!!

रात्रीचे चांदणे's picture

13 Nov 2023 - 9:06 am | रात्रीचे चांदणे

नेहमप्रमाणेच सुरेख प्रवास वर्णन आणि फोटो.
एक दुरुस्ती, माझ्या माहितप्रमाणे चुंगथांग धरण गंगटोक ते उत्तर सिक्कीम रस्त्यावर आहे.

कंजूस's picture

13 Nov 2023 - 12:49 pm | कंजूस

उद्बोधक.

तुषार काळभोर's picture

13 Nov 2023 - 12:57 pm | तुषार काळभोर

प्रवास वर्णनाला सगळ्या फोटोंनी चार चंद्र लावलेत!

कर्नलतपस्वी's picture

13 Nov 2023 - 5:18 pm | कर्नलतपस्वी

मिपावर काही भटक्यांचे प्रवास वर्णन एक मेजवानीच असते त्यात तुमचे नाव खुपच वर आहे.

भन्नाट भटकंती आणी भन्नाट फोटो एवढेच म्हणेन.

सहा ऋतूंचे सहा सोहळे प्रमाणे नऊ दिवसांचे भटकंतीचे नवरात्र बसवले असते तर आणखीनच मजा आली असती.

धन्यवाद.

छान प्रवासवर्णन आणि त्याला सुंदर फोर्टोंची जोड 👍
तिसऱ्या फोटोतली 'युनेस्को जागतीक वारसा स्थळ' घोषीत 'दार्जिलिंग टॉय ट्रेन' माझ्या अतिशय आवडीची, तिचे एका सुंदर फोटोतुन पुन्हा दर्शन घडवलेत त्यासाठी विशेष आभार!

गोरगावलेकर's picture

15 Nov 2023 - 7:41 am | गोरगावलेकर

@अथांग आकाश, कंजूस, तुषार काळभोर प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.

@रात्रीचे चांदणे:चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. घाईघाईत कच्च्या लिखाणातून कॉपी करून पेस्ट करताना चुकीच्या जागी पेस्ट केल्या गेले. पण आता संपादन करता येत नाही

@कर्नलतपस्वी:आपला प्रतिसाद सुखावून गेला. धन्यवाद.

@टर्मीनेटर:आम्ही येथे असतांनाच टॉय ट्रेन झोकात वळण घेत आमच्यासमोरून गेली. आम्हाला तो क्षण टिपता आला हे आमचे नशीबच.

रंगीला रतन's picture

15 Nov 2023 - 11:35 am | रंगीला रतन

भारी वर्णन आणि फोटो.

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Nov 2023 - 4:35 pm | राजेंद्र मेहेंदळे

सिक्कीम दार्जिलिंग सहल करायची आहे. एजंटचे डिटेल्स मिळतील का?
रेल्वेचे बुकिंग/हॉटेल्स बुकिंग्/लोकल ट्रॅव्हल्स या व्यतिरिक्त अजुन काही विशेष काळजी किवा नियोजन करावे लागले का?

यांच्याशी संपर्क साधा
Travel zone, Gangtok
Mr. Arun Bhagat
Mob: 098320 13211

अतिशय विश्वासार्ह . तुम्ही फक्त किती दिवसाची सहल करायची आणि कुठल्या भागात करायची ते ठरवा. आपल्याला हवा तसा व्यवस्थित प्लान बनवून देतील. हॉटेल, भटकंतीसाठी गाडी, पोलीस परवाना इ. सर्व व्यवस्था करतात.
शक्यतो 4-5 जण मिळून जा. गाडी खर्चात खूप बचत होते.

त्यांच्याकडून मिळालेल्या काही सूचना जशाच्या तश्या

Should carry original Id proof,carry a pair of woollen clothes,@ present weather is pleasant, carry dimox medicine for high altitude .

Sikkim Tourism Department in Gangtok / Police Check Post. You will need photo ID proof like Passport / Voters Card/ Adhaar Card (PAN card is not accepted) and two passport size photos each.

They have stopped aadhaar card too, birth certificate and driving licence will do and child below 18 yrs aadhaar will do
Government departments Id card proof will also do

विमानप्रवासविषयी माझी माहिती शून्य.
आपल्याकडे वेळ असेल आणि रेल्वे प्रवास श्यक्य असेल तर 4 महिने आधीच आरक्षण करा.

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Nov 2023 - 7:13 pm | राजेंद्र मेहेंदळे

माहीतीबद्दल धन्यवाद!!

मुक्त विहारि's picture

15 Nov 2023 - 6:52 pm | मुक्त विहारि

फोटो पण मस्त आहेत

मित्रहो's picture

22 Nov 2023 - 11:17 am | मित्रहो

खूप छान प्रवास वर्णन आणि फोटो सुद्धा खूप सुंदर. फोटोमुळे खूप मजा आली.

आमचे संपूर्ण कुटुंब (मी वगळून) मे २०२२ मधे सिक्किमला गेले होते (१२ जण होते) तेंव्हा हे फोटो बघताना त्यांचे फोटो आठवत होते. ती मंडळी लाचेन आणि दार्जिलिंगला गेली नव्हती. पेलिंग, गंगटोक, लाचुंग, नथु ला पास हे सर्व केले.

चारधाम मंदिराविषयी फार चांगला फिडबॅक नव्हता. बहुतेकांना उलट्यांचा त्रास झाला. सिक्किम प्रवास करताना याची माहिती असावी.

वामन देशमुख's picture

23 Nov 2023 - 7:05 am | वामन देशमुख

(पर्यटन हा माझा आवडीचा प्रांत; म्हणून की काय,) चित्रमय प्रवासवर्णन आवडले.

यांतील काही ठिकाणांना मी गेलेलो आहे, त्या ठिकाणांची पुनःप्रचीती आली.

---

अवांतर: 'डल्ले खुरसानी' (Fireball Chilli) या मिरच्यांना "भूत झलकीयां" म्हणतात. आकाराने अगदी लहान पण तिखटपणात अगदी जहरी जहाल!

गोरगावलेकर's picture

3 Dec 2023 - 8:24 pm | गोरगावलेकर

'भूत झोलोकिया' या मिरच्या नुकत्याच केलेल्या मेघालय-आसाम सहलीत गुवाहाटीच्या बाजारात मिळाल्या. या मिरच्या आकाराने अगदी गोल नसून थोड्याशा निमुळत्या आहेत. भाव पाच रुपयाला एक किंवा ७०० रु. किलो असा मिळाला. मी पाव किलो घेतल्या पण बंद पॉलिथिन पिशवीत ठेवल्याने घरी येईपर्यंत सडून वाया गेल्या.

गोरगावलेकर's picture

3 Dec 2023 - 8:29 pm | गोरगावलेकर

फोटो देत आहे

प्रचेतस's picture

27 Nov 2023 - 6:56 am | प्रचेतस

लेख विस्तृत असूनही सलगपणे वाचून काढला, अत्यन्त ओघवते वर्णन व नेटके लेखन. तुम्ही सर्व कौटुंबिक सदस्य पर्यटनाची आवड जपून आहात हे नेहमीच भावते. शिवाय कुठं नेमके काय पाहायचे ह्याचे नियोजन नेहमीच अचूक असते.

सिक्कीम दार्जिलिंग परिसरात जाणे अजून झाले नाही पण कधी गेलोच तर तुमच्या ह्या लेखाचा खूपच उपयोग होईल.

नमस्कार. या वर्षाच्या हिवाळी सहलीवर असल्याने आणि नेटवर्क मिळत नसल्याने मिपा वर फिरकणे होत नाही.

@मुक्त विहारि: अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

@मित्रहो: अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
चारधाम हे उत्तर सिक्कीमच्या लाचेन, लाचुंग पेक्षा खूप कमी उंचीवर आहे. त्यामुळे उंचीपेक्षा घाट वळणाच्या रस्त्यांमुळे उपट्यांचा त्रास झाला असावा असे वाटते. अन्यथा मंदिर परिसर खूप सुंदर आहे.

@वामन देशमुख: या मिरच्यांना "भूत झलकीयां" म्हणतात हे माहीत नव्हते. माहितीबद्दल धन्यवाद.

@प्रचेतस:प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. बऱ्याचवेळा इतर लोकांशी मिळवून घेणे सोपे असते परंतु कौटुंबिक लोकांशी मिळवून घेणे खूप कठीण असते. माझे भाग्य की मी आज परिवारासोबत दशकपूर्तीची सहल करीत आहे.

चौथा कोनाडा's picture

5 Dec 2023 - 5:45 pm | चौथा कोनाडा

खूप सुंदर भटकंती वर्णन आणि त्याला साजेशे समर्पक फोटो.
sder45tfgr
हे तपशील वाचून इथली सर आयोजित करताना हाच भागा पुन्हा वाचावा लागणार याची कल्पना आली.
खूप छान छान बारकावे आणि संदर्भ दिले आहेत
दार्जिलिंग-सिक्कीमची ही आगळी सहल घडवल्याबद्दल मनापासून धन्यवाद !

श्वेता व्यास's picture

18 Dec 2023 - 4:19 pm | श्वेता व्यास

छान वर्णन आणि फोटो.
मोठा ग्रुप होता तर नक्कीच धमाल आली असणार!
सिक्कीम दार्जिलिंग सहलीसाठी खूप उपयुक्त माहिती आहे.

एक_वात्रट's picture

21 Dec 2023 - 7:57 pm | एक_वात्रट

लेख नेहमीप्रमाणेच ओघवत्या भाषेत लिहिलेला आणि भरपूर छायाचित्रांमुळे देखणा झालेला आहे. तुमची आणि श्री टर्मीनेटर यांची प्रवासवर्णने वाचायला आम्हा सगळ्यांनाच खूप आवडतात.

बाकी तुम्ही एवढ्या लोकांसोबत प्रवास करता ही एक खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे. माझी कमाल मर्यादा चार, अगदीच जास्तीत जास्त ६. याहून जास्त लोकांसोबत मी प्रवास करूच शकत नाही!

फिरते रहा!

गोरगावलेकर's picture

25 Dec 2023 - 12:07 am | गोरगावलेकर

@ चौथा कोनाडा, श्वेता व्यास, एक_वात्रट
आपल्या सगळ्यांचेच प्रतिसाद उत्साहवर्धक आहेत. खूप खूप धन्यवाद.