मिझोरम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा ह्या पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुकांची प्रक्रिया चालू आहे. मिझोरम, छत्तीसगड, मध्य प्रदेश येथे मतदान पूर्ण झाले आहे. राजस्थान मध्ये आज म्हणजे २५ नोवेंबर ला मतदान पार पडले आहे. तेलंगणा मध्ये ३० नोवेंबरला मतदान होईल. ३ डिसेंबरला मतगणना होईल. त्या आधी म्हणजे ३० नोवेंबरला संध्याकाळीच एक्झिट पोलचे अंदाज बाहेर पडतील.
हे सगळे आपल्याला माहीत आहे.
मला व्यक्तिशः ह्या निवडणुकांत काडीचाही रस नाही. पण ज्या ठिकाणी गर्दी जमलेली असते तिथे जाऊन डोकावण्याची खोड लहानपणापासून आहे. म्हणजे रस्त्यावरचे जादुगार, माकडवाले,(हे हल्ली दिसत नाहीत), डोंबार्यांचे खेळ, कडकलक्षुमि, नंदीबैलवाले, सालन्मिसरी सफेद मिसरी, पोपटज्योतिषी, घोरपडीचे तेल, शिलाजित अशा गोष्टींचे अति आकर्षण! काला जादू, मूठ मारणे, लिंबू फिरवणे, भानामती, बगाड, जिभेत त्रिशूळ खुपसून काढलेल्या मिरवणुका, निखार्यावरून पळणारे भक्त आणि अखेर प्लान्चेट! पैकी रस्त्यावरचे जादुगार माझे फेवरीट. लहानपणी शरदबाबूंची (चट्टोपाध्याय) पुस्तके वाचत असे. त्यातल्या श्रीकांत ह्या व्यक्तिमत्वाचा परिणाम असेल. तर ह्या जादूच्या प्रयोगावर एक लेख लिहायचा आहे.
बागेश्वर धाम सरकार!
ह्या भारत वर्षात काय काय आश्चर्ये दडली आहेत. कल्पना शक्तीला आव्हान देणारी. ह्या छतरपूर जिल्ह्यात अनेक महाराज आहेत उदाहरणार्थ बागेश्वर धाम सरकार! ह्यांचा दिव्य दरबार. ह्या तरुणाचे मूळ नाव आहे धीरेंद्र कृष्ण शास्त्री. उमद्या व्यक्तिमत्वाची जन्मजात देणगी, खणखणीत शुद्ध वाणी. मूळचे हे कथावाचक. म्हणजे रामायण (बहुतेक तुलसी रामायण) हे खुलवून खुलवून सांगणारे. आता रामायणाची मोहिनी काय वर्णावी. ही कथा म्हणजे मानव जातीचा अमोघ ठेवा.
पण महाराज प्रसिद्धीच्या झोतात आले, यू ट्यूबवर व्हायरल झाले ते दुसऱ्या कारणा मुळे. त्यांच्या “दिव्य दरबार” मुळे. न्या दरबारात “संसारतापामुळे बहु शिणलेले” लोक हजेरी लावतात. जगी सर्व सूखी असा कोण आहे? कुणाच्या घरात कटकटी आहेत, धंद्यात तोटाच तोटा, मुलीचे लग्न अडले आहे, मुलगा मंदबुद्धी, शिक्षणात गती नाही, बायको पळून गेली आहे, नोकरी मिळत नाहीये, कुणी कँसरग्रस्त ... बापरे बाप. कुणाचे काय तर कुणाचे काय. पण ज्या कुणी ह्या दुःखांची निर्मिति केली आहे त्याने त्यावर इलाजही योजले आहेत.
“जा वत्सा जा, फलाणा धीकाना महाराजांच्या चरणी मिलिंदायमान हो. तुजप्रती कल्याण असो.”
हे महाराज लोक पृथ्वीवर देवाचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. त्यांना देवाने अमोघ शक्तींचे वरदान दिले आहे. काय आहेत त्या शक्ती?
१. भक्तांच्या समस्या भक्ताने तोंड उघडायच्या आधीच त्यांना अंतर्ज्ञानाने समजतात. समजतात म्हणजे काय ते एकदम रायटिंगमध्येच देतात. रे मूर्ख, तुझे नाव हे आहे, तुझ्या बापाचे सॉरि पित्याचे नाव हे आहे. तुझी समस्या अमुक अमुक आहे. जा देवाचे नामस्मरण कर. वर्ष सहामासी तुझ्या कटकटी संपतील. आशीर्वाद आहे. हे सगळे ते पी ए सिस्टीमवर वाचून दाखवतात. ह्या कागदाला “पर्ची” असे संबोधले जाते. (म्हणून पर्चीवाले बाबा). आपला डॉक्टर पण आपल्याला तपासून आपल्याला विचारतो काय प्रॉब्लेम्स आहेत? आपण त्याला आपले डायग्नॉसीस सांगतो. तो ते इंग्रजीत लिहितो आणि आपल्याला “पर्ची” देतो. त्याला आपण प्रिस्क्रिप्शन म्हणतो जी फक्त दुकानदार त्यांच्या दिव्य दृष्टीने वाचू शकतात. महाराजांचे टीकाकार हेच म्हणतात कि त्यांचे हस्ताक्षर तेच वाचू जाणोत. असो. भक्त गदगदून माना डोलावतात. पाया पडतात. लाख एक भक्त एकमुखाने दोनी हात वर करून जय जय कार करतात, “@#$ की जय!” आता पुढच्या भक्ताची पाळी.
“देखो, पीछे कोई युवा टी-शर्ट और जीन्स पहनकर खडा है. बुलाव उसको. उसकी पर्ची हमने लिखी है. नाम है...”
असा दरबार रंगतो.
अनेक बाबा आहेत. त्यांचा धावता परिचय, उल्लेख केला नाही तर त्यांच्यावर अन्याय होईल.
पंडोखर महाराज. भक्तांच्या मते हे बागेश्वर महाराजांपेक्षा जास्त पॉवरफुल आहेत. बागेश्वर महाराजांच्या दरबारात गुण आला नाही असे लोक येथे पोचतात. येथे गुण नाही आला तर? कुट्टी महाराज! महाराजांची कोई कमी नाही. एक धुंडो, हजार मिल जायेंगे.
एक बेटी रडत रडत आपली समस्या सांगते.
“बेटी, रो नाही. तू दरबारमे आई हो. यहा रोते नाही हसते है. अच्छा बोलो शमश्या क्या है?”
४५-५० वर्षाची बेटी आसू पोछकर आपली “शमश्या” सांगते.
“बेटी, सवेरे नाश्तेमे क्या खाया?”
“सामोसा, गुरुजी.”
“साथमे चटणी?”
“वो ही. लाल चटणी.”
“येही तेरे शमश्याका जड है. कलसे हरी चटणीबरोबर खाव.”
“नेक्स्ट?”
महाराज आणि बाबा ह्यांचे आणि राजकारणी लोक ह्याचे अतूट नाते आहे. दोघानाही एकमेकांची गरज आहे. ह्या बागेश्वर सरकारच्या चरणी मध्य प्रदेशातील बडे बडे नेते मंडळी माथा टेकवून गेली. काँग्रेस तसेच बीजेपी पण. एव्हढेच नव्हे तर आपले “हे” पण तिकडे जाऊन दर्शन घेऊन आणि देऊन आले.
त्याच्यामुळे काय कि कुणास ठाव प्रेरित होऊन महाराजांनी नागपूरला कथा वाचनाचा कार्यक्रम केला. छान. मला वाटतंय सात किंवा नौ दिवस. (हा थोडा वादाचा विषय आहे. तूर्तास आपण तो बाजूला ठेऊ या.)
मग महाराजांनी दोन दिवसांच्या दिव्य दरबाराची घोषणा केली. इथच मुसळ केरात गेले. श्याम मानव –नाम तो सुनाही होगा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अग्रणी. त्यांनी ह्यावर आक्षेप घेतला. तक्रार नोदवण्यात आली. कार्यक्रम रद्द झाला. मानव ह्यांचा कथावाचनावर आक्षेप नव्हता तर दिव्य दरबारावर होता.
दिव्य दरबारामध्ये महाराज “भूतप्रेत समंधादि रोगव्याधी समस्तही” वर इलाज करतात. मानव ह्यांच्या मते हा कायद्याचा भंग आहे. त्यांनी महाराजांनी आपले प्रयोग कंट्रोल्ड इंव्हायरॉनमेंटमधे करून दाखवावेत, दहा स्वयंसेवकांची माहिती महाराजांनी सांगावी. जर ते ह्या परिक्षेत पास झाले तर त्यांना तीस लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल आणि -हे महत्वाचे आहे- मानव आपला पराभव मान्य करून महाराजांच्या चरणी “घालीन लोटांगण. वंदिन चरण, भावे ओवाळीन रूप तुझे” करतील. बागेश्वर महाराजांनी हा चॅलेंज स्वीकारला नाही. म्हणजे नाही असे नाही. उलट ते म्हणाले कि तुम्ही माझ्या दरबारात या. तेथेच दुध का दुध पाणी का पाणी होईल.
म्हणून मी त्या रस्त्यावरच्या जादुगाराला मानतो. आपल्या हंडीबागाची जीभ कापून रक्ताच्या ओघळात त्याला झोपवून त्याच्यावर जादूची काळी चादर टाकतो. बघ्यांनी गर्दी केली आहे. सर्कल थोडे मोठे करण्यासाठी जादुगार हातात एका अजगराची शेपूट धरून डमरू वाजवत गर्दीवरून फिरवतो.
“बच्चे लोग, एक कदम पीछे.”
पाठी नाही गेलात तर तो अजगर चुम्मा घेईल. भीतीने सर्वे मागे सरकतात.
“बच्चे लोग, एक बार जोरदार तालीया हो जाय. जो तालीया नही बजायेगा उसकी मा दो दिनमी मर जायेगी.”
बच्चे लोग टाळ्या वाजवतात!
त्या वक्ताला मी पण थोडा मोठा बच्चू होतो. मी काय करतो दोनी हात मागे घेऊन इकडे तिकडे बघून एक टाळी टाकतो. एकच हा. उगाच कशाला रिस्क घ्या.
“ए साले, सो गया क्या रे.”
“नही जादुगार, सोयेगा कैसे? तूने मेरी जीभ काटी. वो दर्द...”
“अबे तेरी तो, जीभी ही काटी ना. वो तो नाही काटा ना.”
पब्लिक खदखदून हसतेय. मी नाही हसलो. कारण त्या वयात तो जोक समजला नव्हता. आता हसतो.
“इधर देख, अबी यहासे गाडी गुजरी. नंबर क्या था?
“६६६६”
“अबे ओ छक्के. तेरा बाप छ... तेरी मा छ...”
“जादुगार तू भी... जैसा सवाल वैसे जवाब.”
“फिरसे एक बार बोल गाडीका नंबर क्या?”
“८५१६.”
पब्लिक मान गयी.
शेवटी जादूगार एक एक रुपयाला जादूचे ताईत विकतो. काही नाही त्याला फक्त दर गुरवारी उदबत्ती “दाखवाय ची.” मी पण खाऊच्या पैशातून एक ताईत विकत घेतला. त्या वर्षी वार्षिक परिक्षेत माझा सातवा नंबर आला. आई बाबा आश्चर्यचकित!
“बेंबट्या लेका काय कॉपी बिपी केलीस कि काय?”
तो ताईत अजून मी जपून ठेवला आहे. माझा लकी चार्म.
तर असे हे रस्त्यावर खुले आम जादू दाखवणारे जादूगार. असो.
नागपूरच्या पोलीस कमिशनरने मानव ह्यांच्या तक्रारीची दाखल घेतली. त्यांनी खुद्द स्वतः ह्या केसचा अभ्यास केला आणि ते निर्णयाप्रत आले की, श्री बागेश्वर महाराजांनी कुठल्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाहीये. अशी क्लीन चीट दिली. यावर श्याम मानव ह्यांची काय प्रतिक्रिया झाली ते त्यांनी एका इंटरव्हूमाशे सांगितले आहे. त्यांच्या मते त्या कामिशनाराला कायदा समाजाला नाही. श्याम मानव म्हणाले कि त्या कायद्याचे ते स्वतः एक शिल्पकार आहेत. ते पोलिसांना ह्या कायद्यावर पोलीस अकादेमी मध्ये व्याख्यान देतात. त्यांना कायदा समजतो कि पोलीस कामिशनरला?
माझ्या मते श्याम मानव यांचीच चूक आहे. कशी ते पहा.
महाराज एक गोष्ट कटाक्षाने सांगतात. कि मी माझ्या मनाने काही लिहित नाही. बालाजी माझ्या हातून लिहून घेतात. इथे बालाजी म्हणजे जय बजरंगबली,
म्हणजे याचा अर्थ असा झाला कि खटला करायचा असेल तर त्याच्यावर करा.
बोला आहे कुणाची हिंमत? आता जरा दिव्य दरबार बद्दल. इथे बहुतांश स्त्रिया हजेरी लावतात. अशा उन्मन होऊन देहभान विसरून बेदुंध नाचणार्या स्त्रिया बघितल्या कि काळजाचे पाणी पाणी होते. बिचाऱ्या मानसिक रोगाने पछाडलेल्या यांना वैद्यकीय उपचारांची गरज आहे ना कि वैदिक उपचारांची. खर तर या प्रकारांचे चित्रीकरण करण्यास बंदी असायला पाहिजे.
मग बाबा त्यांच्या अदृश्य सेनापतीला सांगतात, “मारो उसको.” मग ती स्त्री गगनभेदी किंकाळी फोडते. अजून नाही वर्णन करवत.
मला माहित आहे कि काही लोक म्हणणार आहेत कि तुम्ही बरे हिंदुन्वरच टीका करता. असे नाही. मुस्लीम, ख्रिश्चन धर्मातही असे प्रकार सर्रास चालतात. त्याच्याही चित्रफिती तुम्हाला पाहायला मिळतील. मला खात्रीने ठिकाण आठवत नाही पण एका दर्ग्यात असे मनोरुग्ण येतात. मौलवी झाडपूस करतात. त्या दर्ग्याधीपतीला एका सेवाभावी संस्थेने त्यांच्याशी संपर्क साधून त्या जागेतच एक चिकित्सालय सुरु करण्याची परवानगी मिळवली. पण अशी उदाहरणे विरळाच. कुणाला ह्या स्थळाचे नाव माहित असेल तर प्लीज इथे लिहा.
माझा नेट प्रवास चालूच होता. त्यातून मग मेंटॅलिस्ट ह्या प्रकारच्या जादूगारांचे प्रयोग पाहिले. त्या मध्ये सुहानी शहा ही तरुणी प्रमुख होती. अजूनही आहेत. हे जादुगार जे प्रयोग करतात त्यापुढे पर्चीवाले बाबा म्हणजे कीस झाड कि पत्ती. हे तुमच्या मनात काय विचार चालले आहेत ते अचूक ओळखतात. तुमची जन्मतारीख सांगू शकतात. पण ते एक गोष्ट निक्षून सांगतात कि ही एक कला आहे. ज्यांना ह्यात रुची आहे ते अभ्यास करून ही कला साध्य करू शकतात. ही काही दैवी किंवा अतिंद्रिय शक्ति नाही.
आता बाबांनी सनातन धर्माची धुरा खांद्यावर घेतली आहे. अखंड भारत, हिंदू राष्ट्र, घर वापसी इत्यादी शब्द ते चपखलपणे वापरतात. तुम्हाला हि बातमी माहित असेलच कि जोशी मठ हळू हळू खचत चालले आहे. हे खचणे थांबवा अशी कळकळीची विनंती त्या ठिकाणच्या जगद्गुरू शंकराचार्यांनी महाराजांना केली आहे. निसर्ग वगैरे असे थातूर मातुर कारण सांगून महाराजांनी हात वर केले. आज एव्हढे बस. अजून बरेच लिहायचे आहे.
बाबा.
गाभा:
प्रतिक्रिया
26 Nov 2023 - 10:29 pm | भागो
अरेरे!
संपादक माझी चूक झाली. कृपया हा लेख "लेख" विभागात हलवावा. उपकार होतील.
26 Nov 2023 - 11:20 pm | अमरेंद्र बाहुबली
लोक मुर्ख मुर्ख होत चाललेत. असाच एक बाबा धुळे मालेगाव भागात फिरतोय. शिव महापुराण कथा सांगत. सध्या नाशिकला चाललीय म्हणे. महाराज सांगतो ” एक लोटा जल, समस्या का हल“ लोटा घेऊन पिंडीवर पाणी चढवलं की मूलं पास होतात, पळून गेलेले घरी परत येतात, आजारा लोक बरे होतात, बेरोजगार लेकांना नोकर्या लागतात. (ह्या महाराजाचा स्वतचा पोरगा आठवा नापास झालाय मध्य प्रदेशात)
27 Nov 2023 - 5:13 am | कंजूस
मनातलं ओळखणारे जादूगार परदेशांतही आहेत.
तुमच्या क्रेडिट/एटीएम कार्डाचा नंबरही सांगतात. शिवाय बॅलन्सही वाढवून दाखवतात. अमेरिका गॉट टॅलेन्ट कार्यक्रमातही जादुगार असले विशेष खेळ दाखवतात. दोन तीन वेळा जादुगारच विनर (पहिले)झाले आहेत.
पण तिकडचे पब्लिक वेगळे आहे. त्यांना बाबा बनवत नाहीत.
बाकी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा काय आहे?
27 Nov 2023 - 7:38 am | भागो
आपण मंगळ ग्रहावर स्वारी करत आहोत. पण इकडे मंगळी तरुण तरुणीची लग्न अडली आहेत. बिच्चारे. कठीण आहे.
27 Nov 2023 - 11:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेख भावनेशी सहमत आहे. आधुनिक विचारांचा, विज्ञानवादी, नव्या दृष्टीचा समाज निर्माण करण्याऐवजी समाज असा भोंदरट राहावा असेच प्रयत्न होतांना दिसतात. सरकारच अशा भोंदु लोकांना प्रोत्साहन देत असतील तर, आपली वाटचाल आपण समजून घ्यायची की देशाला आपण कुठे घेऊन जात आहोत. आमच्या संभाजीनगरात मागे ते 'एक लोटा जल, समस्या का हल' वाले प्रदीप मिश्रा महाराज येऊन गेले. नंतर, एक दोन महिने मंदिरात ते 'बेलाचं पान आणि महादेवाच्या मंदिरात महिलांची गर्दी' दिसली. नंतर, केंद्रीय मंत्री मा.भागवतजी कराड साहेब यांच्या सौजन्याने आमच्या संभाजीनगरात दिव्य दरबारवाले धिरेंद्रशास्त्री येऊन गेले. सगळा अंधश्रद्धेचा धुर आणि नुसता भक्तांचा पुर. अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांनी पोलिसांना निवेदन दिले आणि बाबावर कारवाईची मागणी केली होती. आपल्याकडे हेच नव्हे, कंबलवाले बाबा, फटके देणारे बाबा. असे काय नी किती तरी दिसतात. हे सगळे आवरले पाहिजे.
मानवी जीवनातील सर्व समस्या समुळ नष्ट व्हाव्यात यासाठी माणसांची धडपड हेच मुख्य यामागे कारण त्यासाठी माणूस वाट्टेल ते करायला तयार होतो इतकेच यामागचे कारण असावे असे वाटते.
-दिलीप बिरुटे
27 Nov 2023 - 12:07 pm | कंजूस
सहमत.
मानवी जीवनातील सर्व समस्या समुळ नष्ट व्हाव्यात यासाठी माणसांची धडपड हेच मुख्य यामागे कारण त्यासाठी माणूस वाट्टेल ते करायला तयार होतो इतकेच यामागचे कारण असावे असे वाटते.
संसारी माणसाची समस्या संन्यासी सोडवू शकतात ही एक श्रद्धा.
27 Nov 2023 - 12:12 pm | कंजूस
संन्यासी म्हणजे मठाधिपती संन्यासी.
.
.
दुसरे नव्हेत.
चार संन्यासी साधू वैष्णोदेवी आणि इतर गुहांच्या आसऱ्याने राहात असत १९८५ पूर्वी. काश्मिरात '९२ ला राडा होऊन पर्यटन बंद झाल्यावर टॅक्सीवाल्या़नी वैष्णोदेवी -शिवखोरी चानेल चालू केला. आता किती मठाधिपती आणि हॉटेलपती आले पाहा. कोण कोणाला पावतो?
27 Nov 2023 - 1:05 pm | भागो
महाराजांनी नुकतीच पुण्याला भेट दिली. त्यावर एक फेसबुक पोस्ट आहे . कुणाला माहित असेल तर इथे टाकू शकाल का?
माझा अकौंट नाहीये म्हणून विनंती.
27 Nov 2023 - 7:48 pm | Bhakti
मला एकजण म्हणाले "पुण्यात ...बाबा आले आहेत,जा तुम्ही"मी म्हटलं "कोण?काय करतात ते?"ते तुच्छतेने हसायला लागले.मुळात मी अनेक पौराणिक कथा ,थेअरी सांगत असते त्यामुळे त्यांना वाटलं मी देवभोळी आहे ;)मला खरंच 'हे' प्रकरण माहिती नव्हतं पण सध्या चांगलच गाजतय.भोंदूगिरीचा कायम निषेध आहेच.
पण तुम्ही 'वैदिक' आणि 'सनातन' हे शब्द ज्याप्रकारे इथे वापरले आहेत ते आवडलं नाही.तुमच्या विज्ञान कथेवरून तुम्हाला या गोष्टीं अद्वैताशी निगडित आहे,हे उमगत असावं असं अपेक्षित होतं.असो सर्वांना आपापली मतं मांडण्याचा अधिकार आहे.
28 Nov 2023 - 11:28 am | भागो
मी सनातन शब्द एकदाच वापरला आहे. सनातन हा
त्यांचाच शब्द आहे. मी स्वतःला हिंदू मानतो. जर
कोणी सनातन धर्माची व्याख्या केली तर मी सनातन
आहे की नाही ते मला ठरवता येईल. स्टालिनच्या
मुलाने जेव्हा हा शब्द उच्चारला तेव्हापासून हा शब्द
राजकारणात व्हायरल झाला. कुठल्याही धर्माची चेष्टा
करण्यासाठी हा लेख लिहिलेला नाही.
वैदिक. आपण वैदिक मॅथ्स हा वाक्प्रचार ऐकला
असणार. त्यात वैदिक काय होते? महाराजांच्या
म्हणण्यानुसार महाबली हनुमानजी त्यांच्या कडून परची
लिहून घेतात. त्याला वैदिक का म्हणू नये?
पंडोखर महाराजांची एक क्लिप आहे. त्यात ते काही
मंत्र म्हणतात, ताबडतोब उन्मत्त झालेले मनोरुग्ण
शांत होतात. हे मंत्र वैदिक नाहीत काय?
मी कथा लिहितो त्यात द्वैत अद्वैत असे काही नसते.
हे तत्वज्ञान समजण्या इतकी माझी कुवत नाही. प्लीज
गैरसमज नसावा.
एका क्लिप मध्ये कुट्टी महाराज, हिंदू समाजातले
धर्मगुरू, साध्वी, महामंडलेश्वर आणि काही मेंटॅलिस्ट
जादुगार आमने सामने आले असताना कुट्टी महाराजांनी
चमत्कार करून दाखवण्याचा प्रयत्न केला. तो फसला.
तेव्हा साध्वी खूप अपसेट झाल्या त्यांनी महाराजांना
खडसावले. म्हणाल्या ह्या असल्या महाराजांमुळे धर्म
बदनाम होतो.
पण त्यांनी ठासून सांगितले कि मंत्रांनी अश्या शक्ती
सिद्धी प्राप्त होऊ शकतात, असे सिद्ध आजही आहेत.
आपण मराठी सुदैवी आहोत. आपल्या हाताशी संत
ज्ञानेश्वर माउलीची ज्ञानेश्वरी, तुकारामबुवांची गाथा
आणि समर्थांचा दासबोध आहे. ह्या उपर काय पाहिजे?
27 Nov 2023 - 10:12 pm | राजेंद्र मेहेंदळे
बाबा पुण्याला येऊन गेले काय? च्च च्च, जाऊन याचि देही दर्शन घ्यायला हवे होते. पण नुकताच प्रोजेक्ट बदललाय. हा नवीन क्लायंट अस्सा आहे ना? रात्री २ -२ वाजेपर्यंत जागवत ठेवतो (ती सवय बरेच वर्षे मोडली होती गडे:) मग दिवसा काढा झोपा. कुठला बाबा न काय?
28 Nov 2023 - 8:53 am | कर्नलतपस्वी
मनापासून वाचले आणी अंगीकार केले तर कुठल्याच बाबाची लागण होणार नाही.
बाकी,दासबोध, ज्ञानेश्वरी,कबीर,व तत्सम साहीत्य वाचल्यास उत्तमच. हे बाबा या रोगावरचे इम्युनिटी बुस्टर आहे.
आयुष्यात सुख दुख आली पुढेही येत रहातील पण कुठल्याही बाबा,बाई,माॅ च्या मदतीशिवाय पार केली.
आता तर ,
काळ देहासी आला खाऊ आम्हीं आनंदे नाचू गाऊ
किवां...
जब होवे उमर पूरी, जब छूटे हुकम हजूरी,
यम के दूत बड़े मरदूद यम से पड़ा झमेला।
दास कबीर हरि के गुण गावे बाहर को पार न पावे,
गुरु की करनी गुरु जाएगा चेले की करनी चेला।
जर असेच असेल तर, बाबा अपनी करनी का फल भुगतेगा और मै अपनी करनी का.....
ना कफन मे जेब है ना कबर में अलमारी
काहे करे तू कसरत और फोकट की मगजमारी.
-कसरत
28 Nov 2023 - 9:45 am | गवि
यातील अनेक (बहुतांश) संतांबाबत देखील लोकांनी चमत्कार कथा बनवल्या आहेतच. कोणाला जिवंत करणे, कोणाचे घर धनाने भरणे, कोणाचा रोग स्पर्शाने बरा करणे. संतांची मूळ मते बाजूलाच.
28 Nov 2023 - 9:55 am | गवि
असे बाबा काही मेंटलिजम वगैरे करत नाहीत. तसे म्हटल्याने त्यांना एक बऱ्यापैकी स्किल अवगत आहे असे उगाच मत होते. मेंटलिजम वगैरे बाबत शाह आणि कंपनी जी मते आणि मुलाखती देतात त्याही अतिरंजित असतात. मेंटलिजम किंवा बॉडी लँग्वेज इत्यादि अभ्यासून काही गोष्टी साध्य करता येतात पण क्लेम केलेल्या सर्व नव्हे.
तुम्ही नीट निरीक्षण केले तर लक्षात येईल की भक्त आला की आगोदर त्याला प्रश्न विचारला जातो. माहिती ऐकल्यावर मग कागद वाचला जातो. आणि तो वाचत असताना खाली बसलेल्या भक्तास न दिसेल असा तिरका स्वतःकडे धरुनच वाचला जातो. मग चमत्कार टाळ्या झाल्या की शेवटी कागद देण्यापूर्वी त्यात उपाय लिहिणे या निमित्ताने पुढे बरेच लिहिले जाते.
ही क्रोनीलोजी नीट बघा. असे कधीही होत नाही की भक्त आला आणि बाबांनी आधीच थेट त्याच्या मनातला प्रश्न आणि उत्तर आगोदर सांगून / वाचून दाखवून कागद थेट भक्ताच्या हातात ठेवला. ते उत्तर तर आधीच लिहिलेले होते ना?
याखेरीज सोशल मीडिया (तुझी एक बहिण आहे? स वरून नाव आहे? तुमचे भोपाळ येथे घर आहे?, नुकतीच तुम्ही पूजा केली..), सोशल इंजिनियरिंग + समूहभक्तीचा प्रचंड दबाव हे सर्व एकत्र येऊन यश लाभते. अधे मधे कोणीतरी शंका उपस्थित करणारे लोक आणून त्यांची पार फटफजिती करून दाखवणे असेही करावे लागते.
No need to invoke even mentalism.
28 Nov 2023 - 2:11 pm | कंजूस
ज्यांचे सर्व चांगले चालले आहे .......
ते कशाला बाबाकडे जातील?
जातात....
कारण ते समाधानी नसतात....
त्यांना आणखी बरेच काही मिळवायचे असते...
ऐहिक सुखात उच्चपदावर..
1 Dec 2023 - 9:32 am | योगी९००
मला वाटले की वडीलांवर काहीतरी लेख आहे म्हणून उत्सुकतेने उघडला. पण लेख व प्रतिक्रिया वाचून मजा आली.
"बेंबट्या, कुंभार हो, गाढवांची कमी नाही"... या प्रमाणे ही बाबा लोकं गाढवं जमा करत जातात. बाकी यातून काहींना मानसिक शांती मिळतही असेल तर ती गोष्ट बरीच ना?
बाकी हे श्याम मानव वगैरे लोकं इतर धर्मातल्या अंधश्रद्द्धांविषयी का नाही बोलत? वसईत का कुठे तरी एक पाद्रीबुवा "रा रा रा ..." करत लोकांना बरे करत होता त्याचा व्हीडीओ काही वर्षांपुर्वी फेमस होता. त्यावेळी ही लोकं कुठे होती?
1 Dec 2023 - 4:53 pm | भागो
"शीशेके घरमे रहनेवाले दुसरोंके घरपे फत्तर नही फेका करते, चिनॉय सेठ!"
आणि हे महत्वाचे कि हिंदू धर्माच्या तत्वज्ञानाचा आणि बुवाबाजीचा काहीही संबंध नाही. बाबा मुद्दामहून तसं भासवण्याचा प्रयत्न करतात.