एलापुराचलगताद्भूतसन्निवेशं यदीक्ष्य विस्मित्विमानचरामरेन्द्रा: |
एतद्स्वयंभुशिवधाम न कृत्रिमे श्रीर्दुष्टे दृश्यन्ति सततं बहु चर्चयन्ति ||
भूयस्तथाविधकृतौ व्यवसायहानेरेतन्मया कथमहो कृतमित्यकस्मात् |
कर्तापि यस्य खलु विस्मयमाप शिल्पीतन्नाम कीर्त्नमकार्यत येन राज्ञा ||
विमानातून जाताना एलापूर येथील पर्वतावर बांधलेले अद्भुत देवालय पाहून देव विस्मित झाले. ते आपल्याशीच म्हणू लागले, की हे देवालय स्वयंभू असावे, कारण इतके सुंदर देवालय कृत्रिम असणे शक्यच नाही. ज्या शिल्पीने हे देवालय बांधले, तो तर विस्मयाने याहीपेक्षा जास्त थक्क झाला, तो म्हणाला हे परम अद्भुत आहे, हे माझ्याने कसे बांधवले हेच माझे मला कळत नाही.
(राष्ट्रकूट कर्क याच्या इस ७३४मधल्या ताम्रपटावरुन)
दंतिदुर्गाने पाहिलेल्या स्वप्नाला कृष्णाने साकार केले आणि ध्रुवाच्या कारकिर्दीत हे जवळपास पूर्णत्वाला पोहोचले, असा याचा अगाध महिमा. दंतिदुर्गाने येथेच तळ ठोकला होता आणि दशावतार लेणे खोदवून घेतले असावे, येथील ह्याच लेण्यात असलेल्या त्याच्या शिलालेखावरून दिसते.
ज्ञानेश्वरीचा अठरावा अध्याय कथित करताना माउलींच्या दृष्टीसमोर वेरुळचे कैलास लेणेच असावे, असे स्पष्टपणे दिसते.
जी गीतारत्नप्रासादाचा । कळसु अर्थचिंतामणीचा ।
सर्व गीतादर्शनाचा । पाढाऊं जो ॥
लोकीं तरी आथी ऐसें । जे दुरूनि कळसु दिसे ।
आणी भेटीचि हातवसे । देवतेची तिये ॥
कैलास लेण्याची तुलना त्यांनी गीतेच्या राजप्रासादाशी केलेली दिसते.
मी कळसु याचि कारणें । अठरावा अध्यायो म्हणें ।
उवाइला बादरायणें । गीताप्रासादा ॥
नोहे कळसापरतें कांहीं । प्रासादीं काम नाहीं ।
तें सांगतसे गीता ही । संपलेपणें ॥
- ज्याप्रमाणे मंदिराचा कळस सर्वोच्च असतो, त्याचप्रमाणे हा अठरावा अध्याय या गीतारूपी प्रासादाचा कळस आहे. कळसाचे काम झाल्यावर मंदिरास पूर्णत्व येते, त्याच प्रकारे ह्या अठराव्या अध्यायामुळेच गीतेस संपूर्णत्व प्राप्त होत आहे.
तेथ त्रिवर्गाचा अणुआरु । आडऊ निघाला जो अपारु ।
तो महाभारतप्राकारु । भोंवता केला ॥
- हा गीताप्रासाद खोदताना धर्म, अर्थ, काम ह्या त्रिवर्गांचा जो चुरा निघाला, त्याच स्थानाभोवती हा महाभारतरूपी प्राकार बांधत आहे.
गीताप्रासादाची उपमा देताना माउली प्रासाद, ग्रीवा, ध्वज, प्रदक्षिणापथ यासारख्या वेरुळच्या कैलास लेण्यात दिसणार्या स्थापत्यशास्त्रीय शब्दांचा चपखल वापर करताना दिसतात.
उपरी सोळावा अध्यायो । तो ग्रीवघंटेचा आवो ।
सप्तदशु तोचि ठावो । पडघाणिये ॥
तयाहीवरी अष्टादशु । तो अपैसा मांडला कळसु ।
उपरि गीतादिकीं व्यासु । ध्वजें लागला ॥
- जणू १६वा अध्याय ही ह्या गीतामंदिराची ग्रीवा आहे, तर १७वा अध्याय ह्या ग्रीवेवरील आमलक आहे, तर त्याच्यावर जणू कळस असलेला हा अठराचा अध्याय आहे, त्याच कळसावर हा गीतानामक व्यासांचा ध्वज फडकत आहे.
अमृतानुभवात माउली अद्वैत मत प्रतिपादताना म्हणतात -
देव देऊळ परिवारु । कीजे कोरुनि डोंगरु ।
तैसा भक्तीचा व्यवहारु । कां न व्हावा ? ॥
- ज्याप्रमाणे देव, देऊळ आणि देवतांच्या परिवारातील मूर्ती आपणांस वेगळ्या दिसतात, स्वतंत्र दिसतात मात्र त्या एकाच खडकातून खोदून काढलेल्या आहेत, त्याचप्रमाणे हा भक्तीचा व्यवहार म्हणजेच देव, भक्त, प्रार्थना हे वेगवेगळे नसून एकच का न व्हावा.
माउलींच्या एका अभंगात तर कैलास लेण्याचे वर्णन स्पष्टपणे आलेले दिसते.
चिंचेच्या पानि एक शिवालय
उभविलें आधि कळसु मग पायारे ।
देव पूजों गेलें तंव देउळ उडालें
प्रसिध्द सदगुरुराया रे ॥
अगदी अशाच आशयाचा माउलींचा आणखी एक अभंग आहे.
वडाच्या पानीं एक उभविलें देउळ
आधिं कळसु मग पायाहो ।
देव पुजों गेलों तंव देउळ
उडालें पान नाहीं तेथें वडुरे ॥
माउली आपल्या एका कूट अभंगात म्हणतात -
देउळा आधीं कळसु वाईला ।
पाहोनि गेलो आपुले दृष्टी ॥
ज्याप्रमाणे आधी कळस खोदून मग मंदिर बनविले, त्याप्रमाणे ह्या देहाच्या आधी परमार्थरूपी आत्म्याचा अनुभव येतो.
माउलींनी रचलेल्या ह्या पायावर संत एकनाथ म्हणतात -
चिंचेच्या पानावर देऊळ रचियले
आधी कळस मग पाया रे ॥
ज्ञानेश्वरांच्या अभंगांत रूपकांतून पुढे येणारे वेरुळच्या लेण्यांचे उल्लेख मात्र मुक्ताबाईंव्ह्या आणि नामदेवांच्या अभंगांतून प्रत्यक्षपणे येतात.
पाहिली गे माय पूर्वभूमि आपुली । बहुत सन्मानिली वैष्णवांनीं ॥
चैत्रमास शिवरात्र उत्सव आगळा । जावें पां वेरुळा घृष्णेश्वरा ॥
दशमीचे दिवशीं निघाले बाहेर । उठावले भार वैष्णवांचे ॥
वेरूळ नगर असे पुरातन । विश्वकर्मा यानें कीर्ति केली ॥
अगाध तें पुण्य बोलताती ऋषि । जावें वेरुळासी नामा म्हणे ॥
नामदेव पुढे म्हणतात,
वेरुळाचा महिमा सांगे हृषीकेषी । जना आगळी काशी म्हणोनिया ।
वेरुळाची यात्रा केली यथासांग । मग पांडुरंग निघते झाले ।।
- देवशिल्पी विश्वकर्म्याने वेरुळसारख्या प्राचीन नगरीत अद्भुत मंदिर घडवून भूलोकी कीर्ती केली. ह्याच अभंगात घृष्णेश्वर मंदिराचादेखील स्पष्ट उल्लेख येतो. घृष्णेश्वराची व्युत्त्पत्ती ही गुह्येश्वर अर्थात गुहेतील देऊळ किंवा कृष्णेश्वर अर्थात कृष्णराजाने निर्मिलेली लेणी अशा दोन भिन्न अर्थांवरून आली असावी. यादव कालखंडात वेरुळचे कैलास लेणे मंदिर असतानाही घृष्णेश्वराची निर्मिती झाली ती बहुधा सर्वसामान्यांसाठी, असे मानता यावे.
ह्याशिवाय महानुभवांच्या लीळाचरित्रात तर अनेक लीळांत वेरुळच्या लेण्यांचे वर्णन आले आहे.
महादेवोरावो ठाणेया कटकै गेला होता: तो सिंनरा आला: हे नगर बरवे: तरि एथ गोसावी असति
महादेवराय यादव हा कटकी (वेरुळ येथील सैन्याच्या स्थळी) गेला होता तो सिन्नर नावाचा देखण्या नगरात चक्रधरांच्या दर्शनासाठी आला.
ह्याचेच संस्कृत रूपांतर रत्नमाळा स्तोत्रात आले आहे.
एळापुराद्गतो राजा प्रजासंस्थामिषेण वै
स्वामिनो दर्शनोत्कंठ्या यथा धनगतः पुमान्||
लीळाचरित्रात वेरुळविषयी माणकेश्वर असा उल्लेख येतो, तो निर्विवादपणे कैलास लेण्याविषयी असावा. कारण कैलास लेण्यातील शिवलिंग हिरेमाणकांनी मढवलेले होते, हे आपल्याला जुन्या ताम्रपटांवरुन ज्ञात आहे. मात्र ह्या नावाशिवाय कैलासास 'इसाळुवाचां लेणे' असाही उल्लेख आपल्याला येथे मिळतो.
एक दीं उदीयांचा पुजाअवस्वरू जाला : गोसावीं माणिकेस्वराचेया ' लेणेयासि वीहरणासि बीजें केलें तीए लेणां वीवर तेणें वीवरें गोसावीं बीजें केलें : बाइसी म्हणीतलें : "हें काइ बाबा : आपण कें जाइजत असिजें ?" सर्वज्ञे म्हणीतलें : "भीया नको बाइ 'मग पुढां गोसावी : मागां बाइसें : मग एरामागें " एर: गोसावीयांचा फुटा बाइसीं धरिला : बाइसांचा पालउ भगतिजनीं धरिला : एरएरातें धरूनि ऐसीं भगति नें अवघींचि कासे लागलीं : वीवरेंवीवरें गोसावी बीजें करिताति : तवं एकी ठाई भगकरि उजीएडु पडिला : पुढां एकु घटू मांडिला असे : घटाभवंती डोइया गुंडुंगुडुं बैसलीं असति: सर्वज्ञे भगतिजनातें म्हणीतलेंः "उगीयांचि असा : काहीँ बोलों नको" म्हणौनि पुढारें बीजें केलें : बाइसीं पुसिलें : "बाबा : हें ऐसें काइ ?" सर्वज्ञे म्हणीतले "बाइ: हा यांचा आगमसमोः " "बाबा : आगमसमो म्हणिजे काइ ?" सर्वज्ञे म्हणीतलें : ‘'बाइः हा सीधसंकेतु " गोसावीं पुढारें बीजें केलें तें वीवर इसाळुवाचां लेणां उसासलें : तेथ बाळाणें होतें तेथ गोसावीयांसि आसन जालें : चरणक्षाळण जालें : तवं एळापुर देखिलें : बाइसीं पुसिलें : "बाबा : हें कवण नगर ?" "बाइ हें एळापुर" : '” "हें काइ बाबा इतुकी वाट' आलों आणि हें एळापुरचिः:. "बाइ हा अवघा डोंगरू दीढा गाउंवांचेनि मानें अव्हा चौरासु पोकळु केला असे: एथिचा रीगावा नीगावा कव्हणीचि नेणे जेणें केलें तो जाणे : कां एथौनि जाणिजे:
गोसावी (चक्रधरांनी) माणकेश्वरात राहण्यासाठी मुक्काम केला. येथे लेण्यातील गुहांना विवरदेखील म्हटल्याचे दिसून येते. बाईसा सर्वज्ञांना (चक्रधरांना म्हणते हे कोणते नगर, तर बाई हे एळापूर, हा अवघा डोंगर दिढ गाऊचे न माने (एक गाऊ म्हणजे साधारण मैलभराचे अंतर) हे असा दीड मैल - म्हणजे सुमारे ६ मैल इतका परीघ असलेला हा चौरसाकृती डोंगर संपूर्ण पोखरून पोकळ केला. हे कसे केले, हे ज्याने केले तोच जाणे.
चक्रधरांना शोधण्यासाठी यादव राजा (हा बहुधा कृष्ण यादव - रामदेवरायाचा पिता असावा) आला पण एकूण एक लेण्यांत शोधून स्वामी त्यांना भेटलेच नाहीत, ह्या प्रसंगाचे वर्णन करणारी एक लीळा आहे. तेव्हाची एक लीळा आहे.
लेणेंनि लेणे सोधिले : परि ने भेटतीचि |
चक्रधर देवगिरीवरून वेरुळला आले व ते घाट उतरून आले व राजवेहारी ह्या लेण्यात तीन दिवस थांबले. येथे ते बाईसासोबतच्या संवादात म्हणतात,
हे लेणें एक कोकसवाढ्याचे लेणे |
हा कोकस म्हणजे ह्या लेण्याचा मुख्य स्थपती मानला जातो. हा पैठणचा होता. वेरुळ शिवालय माहात्म्यात ह्याच्याविषयी आणखी नोंद येते. कोकसाने सात हजार सहकारी सोबत घेऊन हे लेणे कोरले. अर्थात हे उल्लेख कैलासाच्या निर्मितीनंतर सुमारे ३०० वर्षांंनंतरचे आहेत, तेव्हा ब्राह्मी लुप्त झाली होती, मराठी बाळसे धरीत होते, तेव्हा कोकस हाच मुख्य स्थपती हे खातरीपूर्वक सांगणे कठीण आहे.
वेरुळच्या कैलास लेण्यात म्हणजेच माणकेश्वरात चोरी झाल्याची नोंदही लीळाचरित्रात येते.
एक-दोन गोसावीं माणिकेस्वरासि बीजें केलेंः चौकीं आसन जालेंः मग तैसेंचि वीवरापासि बीजें केलें: सर्वज्ञे म्हणीतलेंः "एथौनिः गातः वातः पेखणें चोरीं नेलें: " वीवर दाखवीलेंः ।
- एक दोन गोसाव्यांनी माणकेश्वरास मुक्काम केला, मोकळ्या जागी ठाण मांडले, मग तसेच विवरापाशी मुक्काम केला मात्र चोरांनी विवरात (गुहेत) शिरून चोरी केली, ते विवर गोसाव्यांनी सर्वज्ञांना दाखवले.
ह्याशिवाय शंकरेश्वर ह्या आणखी एका लेण्याचा उल्लेख लीळाचरित्रात येतो.
एकु दीसु गोसावीयांसि उदीयांचा पुजाअवस्वरू जालेयांअनंतरें वीहरणासी संकरेस्वराचेया' लेणेयासि' बीजें केलें: बाइसा' पुसिलेंः “बाबाः या लेणेयांचा एसणा दारवठा काइसा ?' सर्वज्ञे म्हणीतलेंः "ए देवतेसि हस्तीवरि बोणें गाः " ।।
- एका दिवशी गोसाव्यांचे पूजापाठ झाल्यानंतर शंकरेश्वर लेण्यात (२९ क्रमांकाचे धुमार लेणे) मुक्कामासाठी गेले, असा साधा अर्थ पहिल्या ओळीचा, मात्र बाईसाच्या प्रश्नाचा अर्थ मला लागला नाही. बहुधा लेण्यांच्या प्रवेशद्वाराविषयी किंवा पाणीसाठ्याविषयी असावे. सर्वज्ञ अर्थात चक्रधर उत्तर देताना म्हणतात, ह्या देवतेस हत्तीवरून बोणे (बोणे-अर्थ लागत नाही)
एकदा कुण्या एका चांगदेव भटास चक्रधरांनी लेण्याचे कवतिक दाखवले, त्यासंबंधीची एक लीळा रोचक आहे.
गोसावीं वीहरणा एका लेणेयासि ' बीजें केलें : चांगदेओभटातें कांटेवसैये पाठवीलें : सर्वज्ञे म्हणीतलें : "बटीका : तुम्हीं पैला लेणेयां जा : " चांगदेओभट गेले : तवं एरांचे पाए एरांकडे एकांची रूंडें: एकांचीं मुखें टकमकां वास : पाहातें : एकें वाजतें : कुंथते: परीयेंदेतें एन्हवीं तरि जड़ें: परि चेतनें ऐसीं वाटति : तैसें देखौनि भीयाले : ते माघौतें गोसावीयांपासि आले : दंडवत घातलें: श्रीचरणां लागले : सर्वज्ञे म्हणीतलें : कां गा बटिका : गेलेति : मां काइ " देखिलें ?" तेहीं जैसें देखिलें तैसी अवघी वेवस्ता गोसावीयांपासि सांघीतली : सर्वज्ञे म्हणीतलें : “बोलवीतेति तरि बोलती : साउमां मार्ग पुसतेति तरि सांघतीः साउमे जातेति तरि आणीक आश्चर्ये देखतेति :
- गोसाव्यांनी विहारासाठी एका लेण्यात मुक्काम केला, चक्रधर म्हणाले, चांगदेव भटा, तुम्ही आधी काटेवसई (जैन) लेण्यांत जा, तेव्हा त्यांना लेण्यांत अद्भूत मूर्ती दिसल्या. काहींचे पाय काहींकडे, काहींची मुखे जणू टकमका पाहत होती, जणू काही हलत आहेत, वाजत आहेत, ह्या मूर्ती अचेत, पण त्यांत चेतना आहे असेच त्यांना वाटले, ते बघून भिऊन गेले, चक्रधरस्वामींना दंडवत घालून श्रीचरणी लागले. तेव्हा स्वामी म्हणाले, का रे भटा, काय पाहिलेस? तेव्हा जे काही पाहिले ते भटांनी सांगितले, सर्वज्ञ म्हणाले, असे अद्भुत इकडे आहे. मूर्ती बोलतात, मार्ग विचारल्यावर ते सांगतात, आणखी पुढे गेला असतात तर आणखी आश्चर्ये बघायला मिळाली असती.
हा चांगदेवभट म्हणजेच नाथ संप्रदायातला प्रसिद्ध चांगदेव हाच, हे येथे सांगणे कठीण आहे. मात्र तो बहुधा नसावा, हे त्याच्या भट नामामुळे.
ह्याशिवाय लीळाचरित्रात एका आडदंडीनाथ नामक एक नाथपंथीय सिद्धाचे लेण्याच्याच परिसरामध्ये वास्तव्य असल्याची नोंद मिळते. ह्यावरुन वेरुळ लेण्याच्या निर्मितीनंतर सुमारे ४०० वर्षे वेरुळ नांदते असल्याचे स्पष्टपणे समजते. म्हणूनच मुक्ताबाई विश्वकर्मा आणि ह्याने वेरुळास कीर्ती केली असे त्याचे गौरवास्पद वर्णन करतात.
महानुभव साहित्यात वेरुळच्या लेण्यांची नोंद विविध लेण्यांमध्ये येते, ती अशी -
माणकेश्वर - कैलास
शंकरेश्वर - धुमार लेणे
राजवेहारी- तीन ताल-लेणी क्र. १३
जलसेनाचे लेणे - लेणी क्र ७
दुसरा राजवेहार - दोन ताल-लेणी क्र. १२
कोकसवाढ्याचे लेणे - चैत्यगृह - क्र. १०
काटेवसई - जैन लेणी - इंद्रसभा - क्र. ३२
मल्हारवसई - जैन लेणी जगन्नाथसभा - क्र. ३३
ह्याशिवाय तत्कालीन ग्रंथात वेरुळविषयी कित्येक उल्लेख असतील, पण ते शोधून येथे देणे आवाक्याबाहेरचेच.
यादवकालाच्या अस्तापर्यंत नांदत्या असलेल्या वेरुळला पुढे मात्र इस्लामी आक्रमणांचे ग्रहण लागले, वेरुळ हळूहळू बेवसाऊ होत गेले. मालोजीराजे भोसल्यांना वेरुळची जहागिरी मिळाल्यावर ते थोडे फुलले असेल. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही ते औरंगजेबाच्याच्या ताब्यात असल्याने भाग्योदयापासून दूरच राहिले. मात्र नंतर त्या थोर राजाने केलेल्या पायाभरणीमुळे पुढे अहल्याबाईंच्या काळात वेरुळचे भाग्य उजळू लागले, ते पुन्हा नांदते झाले ते आज अखेरपर्यंत.
कलचुरींनी प्रारंभिक निर्माण केलेल्या ह्या संकुलात दंतीदुर्गाने स्वप्न पाहिलेल्या आणि कृष्ण राष्ट्रकूटाने निर्माण केलेल्या ह्या परम अद्भुत कैलास मंदिरावर ध्रुवाने कळस चढवला आणि अमोघवर्षाने सरस जैन लेणी बांधून ह्या निर्मितीची सांगता केली.
संदर्भ -
लीळाचरित्र
ज्ञानेश्वरी
स्थानपोथी - एक पुरातत्त्वीय अभ्यास (डॉ. अरुणचंद्र पाठक)
प्रतिक्रिया
13 Nov 2023 - 9:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अतिशय सुंदर लेखन. संशोधन पत्रिकेत छापून यावा असा संशोधनपर लेख. मला या लेखाचं खुप महत्व आहे. एक तर, माझ्या गावाजवळ आणि अनेकवेळा संदर्भासाठी अशी नवनवीन माहिती आवश्यक असते तेव्हा पहिलेछुट तुमचं अभिनंदन आणि मनापासून आभार की प्रत्येक लेखात एक नवी माहिती असते.
वेरुळ लेण्यांचे उल्लेख असलेले ग्रंथात ते संदर्भ शोधायचे म्हणजे सगळं बाड वाचावं लागतं. कोलत्याचं लिळाचरित्र नुसतं संग्रही आहे, कधी वाचायचो आम्ही. एक तर भाषा कठीण. '' बीजे केले. सर्वज्ञ म्हणतीले. बाईसे, देखिले, पायपुसिले. प्रचेतसबाबा : ग्रीवा म्हणिजे काइ ? प्राडॉ पुसिते'' सगळंच भारी आणि त्यातून वेरुळचे संदर्भ शोधायचे म्हणजे महाकठीण काम तेव्हा स्टँडींग ओव्हेशन फ्रॉम मी.
घृष्णेश्वराची व्युत्त्पत्ती ही गुह्येश्वर अर्थात गुहेतील देऊळ किंवा कृष्णेश्वर अर्थात कृष्णदेवराय अर्थात यादव काळात हे सगळं घडून आलं की काय त्याचा शोध आवडला. हिरेमाणकांनी मढवलेले होतं ते माणकेश्वर ते घृष्णेश्वराविषयीही असावे असे मला वाटते. आपण म्हणता, तो कारण कैलास लेण्यातील शिवलिंगाविषयीच असावा हे आपले मत मान्यच करावे लागते. कारण आपला अभ्यास.
चांगदेवभटाने पाहिलेल्या लेण्या, नामदेवांनी केलेले उल्लेख, चक्रधरस्वामींनी सांगितलेल्या आठवणी, ज्ञानेश्वर माऊलींच्या रचनेतील वेरुळ उल्लेख. लेख पुन्हा पुन्हा वाचावा असा जबरा नंबर एक. आवडला. मित्रा लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
13 Nov 2023 - 10:06 am | प्रचेतस
धन्यवाद सर.
ग्रीवा म्हणजे मान: प्रचेतस उत्तरिले| म्हणितले ती मंदिरनिर्मितीचेयी अंगे: उपरिया कलश मग आमलक असती: : तदनंतर ग्रीवा मागूनी स्कंध आलेया| मंडोवर, जंघा आणि खालते अधिष्ठान अशीया हे मनुष्यरूपक म्हणितले प्रचेतस
बाकी तो कृष्ण यादव राजा म्हणजे कृष्णदेवराय नव्हे, कृष्ण राजा किंवा कण्ह म्हणून तो यादवांत प्रसिद्ध होता.
13 Nov 2023 - 10:41 am | कंजूस
चांगला एकत्र संदर्भ देणारा लेख झाला आहे.
वेरूळ लेण्यांतील शिल्पे ही दगड कच्चा निघाल्याने तुटली आहेत. मुसलमानांचा जैनांना विरोध नव्हता. जैन लेण्यांमुळे सर्वच शिल्पे तोडफोडीतून वाचली असावीत असा माझा तर्क.
13 Nov 2023 - 1:30 pm | तुषार काळभोर
वेरूळ लेणी, कैलास मंदिर आणि घृष्णेश्वराचे इतके यादवकालीन दाखले आहेत, म्हणजे ते त्यावेळीदेखील सुप्रसिद्ध असावे. पैठणच्या इतक्या समीप असल्याने ही निर्मिती झाली असावी का?
13 Nov 2023 - 5:32 pm | कंजूस
लिळाधर स्वामी लेणी क्र ११,१२ दोन ताल तीन तालमध्ये राहून प्रवचन देत. तो चौथरा आहे अजून.
(वेरुळचे शिल्पवैभव - राधिका टिपरे यांंच्या पुस्तकातून)
13 Nov 2023 - 9:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वेरुळचे शिल्पवैभव - राधिका टिपरे हेच पुस्तक आमच्या संग्रही आहे. पण हे पुस्तक अपूर्ण आहे, फार माहिती नाही त्यात.
आपल्या वल्लीने पुस्तक केलं तर, याहीपेक्षा भारी होईल. असे मत आहे.
-दिलीप बिरुटे
16 Nov 2023 - 10:14 am | कर्नलतपस्वी
माझा सुद्धा हाच आग्रह आहे.
25 Nov 2023 - 8:58 pm | चौथा कोनाडा
+१
अनुमोदन.
14 Nov 2023 - 7:10 pm | प्रचेतस
धन्यवाद.
येथे तसा पैठणचा काही संबंध नाही. अमोघवर्ष हा राष्ट्रकूट राजाच्या कारकिर्दीत वेरुळ येथील जैन लेण्यांची निर्मिती झाली, त्याच्या मृत्यूनंतर दोन तीन पिढ्यांत राष्ट्रकूट सत्ता क्षीण होऊन कल्याणीचे चालुक्य सत्तेवर आले आणि त्यानंतर त्यांचे मांडलिक यादव स्वतंत्र होऊन देवगिरीच्या सिंहासनावर राज्य करू लागले. ह्या इतक्या काळात वेरुळची लेणी कधीही लुप्त झाली नाहीत, देवगिरीच्या नजीक तसेच डोंगराच्या पायथ्याशी असल्याने ती कायम नांदती राहिली. देवगिरीच्या आसपासचा प्रदेश तर कायम 'कटक' अर्थात सैन्याचा तळ म्हणून प्रसिद्ध होता. पूर्वीच्या औरंगाबादचे निजामकालीन नाव हे कटक-कटकी- खडकी म्हणूनच प्रसिद्ध होते.
13 Nov 2023 - 10:29 pm | चौथा कोनाडा
अ ति श य सुंदर अभ्यासपुर्ण लेख. संशोधन करुन लिहिलेले तपशिल थक्क करणारे आहेत!
प्रचेतसवल्ली यांचा लेख म्हणजे जबरद्स्त मेजवानी असते. या दिवाळीत ही मेजवानी बघुन तृप्त झालो !
वल्लींच्या सखोल अभ्यासपुर्ण लेखनाला सलाम !
14 Nov 2023 - 11:57 am | कर्नलतपस्वी
प्रचेतस यांचे लेख माहितीपूर्ण, ओघवते आणी काही नवीन सांगुन शिकवून जाणारे. जसा हुकमाचा एक्का.
धन्यवाद.
14 Nov 2023 - 1:53 pm | अथांग आकाश
वाचनखुण साठवली! या अभ्यासपूर्ण लेखासाठी अनेक आभार!!
14 Nov 2023 - 3:43 pm | टर्मीनेटर
डॉ. प्रचेतस ह्यांचा आणखीन एक संग्रहणीय लेख!
कसं काय जमतं अशा क्लिष्ट भाषा वाचायला आणि त्याचे आमच्यासारख्या त्या भाषांचा गंधही नसलेल्या लोकांना समजेल अशा भाषेत लिहायला हा अजूनही अनुत्तरित प्रश्न आहे माझा!
14 Nov 2023 - 7:18 pm | मुक्त विहारि
वाखुसा...
14 Nov 2023 - 7:20 pm | स्नेहा.K.
तुमच्या सर्वच लेखणाप्रमाने संदर्भ म्हणून वापरता येईल असा अभ्यासपूर्ण लेख!
एका मोठ्या कालखंडात हा सर्व परिसर महाराष्ट्राचे सांस्कृतिक केंद्र होता हे नक्की. राष्ट्रकूट - चालुक्य - यादव कालखंडात महाराष्ट्रातील इतर मोठी आणि प्रसिद्ध केंद्रे कोणती होती? कल्याण, नाशिक, जुन्नर, पैठण, इतर काही?
14 Nov 2023 - 10:43 pm | शशिकांत ओक
प्रचेतस यांनी महानुभाव पंथी, ज्ञानेश्वरी यांचे चपखल संदर्भ दिले. चक्रधरांच्या काळातील प्राकृत? काव्यमय लेखनाचे अर्थ सांगितल्यामुळे लेख बहारदार झाला आहे.
15 Nov 2023 - 9:27 am | उग्रसेन
अतिशय उत्तम लिहिलंस रे. मराठवाडा ही संतांची भूमी. ज्ञानेश्वर आणि भावंडे, संत एकनाथ, संत नामदेव,संत मन्मथ स्वामी, कवी मुकुंदराज संत दासोपंत,संत जनाबाई, संत गोरा कुंभार किती तरी नावे आठवतात त्यांच्या रचनेत वेरुळ शोधायला अभ्यास लागेल. चक्रधर स्वामींच्या लीळात आणि संतश्रेष्ठ माऊलींच्या रचनेत शोधलेस मोठं काम केलंस. लिळाचरित्रात जागोजागी 'यळापुरी' उल्लेख येतो. यळापुरी राजविहारी अवस्थान|| गोसावी यळापुरा बीजे केले. चक्रधर स्वामी मराठवाडाभर फिरले. गावांची नावे देवळे याची माहिती लिळाचरित्र पूर्वार्धात येते. छान माहिती.
दीपावलीच्या शुभेच्छा रे.
15 Nov 2023 - 7:29 pm | राजेंद्र मेहेंदळे
लेख एकदा वाचुन काम होणे नाही, पुन्हा पुन्हा वाचायला हवा. ईतके सगळे संदर्भ कुठुन कुठुन शोधता बुवा तुम्ही? ज्ञानेश्वरी ,लीळा चरीत्र शिवाय कलचुरी,चालुक्य,राष्ट्रकूट्,यादव आणि काय काय. यादी वाचुनच दमलो. तुमच्या अभ्यासाला सलाम. पुस्तक किवा तूनळी चॅनल यापैकी काहीतरी मनावर घ्याच _/\_
रच्याकने--फोटो अजुन टाकता आले असते तर मजा वाढली असती. (काही केल्या समाधान नाही :) )
15 Nov 2023 - 7:33 pm | राजेंद्र मेहेंदळे
"स्थानपोथी - एक पुरातत्त्वीय अभ्यास (डॉ. अरुणचंद्र पाठक)" हे कल्याणला आमच्या जवळच राहात. वडीलांचे मित्र होते. एकदा रतनगड ट्रेकविषयी बोलत असताना प्रवरा नदीच्या उगमा संबंधाने काहीतरी माहीती गोळा करण्यासाठी बरोबर यायचे म्हणत होते,पण पुढे ते काही जमले नाही.
16 Nov 2023 - 7:13 am | Bhakti
मिपारत्न प्रचेतस यांचा अभ्यासपूर्ण लेख अनुभवाने ही एक पर्वणीच असते.खरोखर एक अचाट अद्भुत शक्तीच्या सामर्थ्याने हे वेरूळ घडविले गेले आहे. संतांचे हे लेण्यांबद्दलचे वर्णन या वास्तूबरोबर एकरूप करून घेत आहे.
(स्वगत -लीळाचरित्र अभ्यासले पाहिजे :)
16 Nov 2023 - 8:20 am | शेखरमोघे
नेहेमीसारखीच सुन्दर "कलाकृती" !! खासकरून ३६० अन्शातले सखोल आणि चौफेर वर्णन - फक्त वेरूळचे नव्हे तर त्याबद्दलच्या अनेकान्च्या लिखाणाचेही.
"यादवकालाच्या . . . पुढे मात्र इस्लामी आक्रमणांचे ग्रहण लागले" च्या सन्दर्भात एका लेखात बहामनी सुल्तानाच्या आगमनाच्या निमित्ताने वेरूळच्या आजुबाजूचे रस्ते तयार केल्याचा आणि साफसफाई केल्याचा उल्लेख सापडला. (https://asi.nic.in/Ancient_India/Ancient_India_Volume_17/article_3.pdf)
17 Nov 2023 - 11:33 am | अमरेंद्र बाहुबली
प्रचेतस सरांच्या इतर लेखांप्रमाणे हाही मस्त लेख. पुस्तक लिहाच.
17 Nov 2023 - 12:58 pm | गोरगावलेकर
वाचायलाही अवघड अशा शब्दांची आमच्या सारख्यांना समजेल अशा साध्या सरळ शब्दांत माहीती.
धन्यवाद.
23 Nov 2023 - 5:51 pm | सौंदाळा
अप्रतिम लेख.
वेरुळची लेणी एखाद्या चमत्काराहून कमी नाहीत.
बेवसाऊ म्हणजे काय? हा शब्द पहिल्यांदाच वाचला.
24 Nov 2023 - 9:50 am | प्रचेतस
बेवसाऊ म्हणजे वस्ती उठून उजाड होणे.
25 Nov 2023 - 10:02 pm | चौथा कोनाडा
बे-वसाऊ .... शब्दावरुन वसवण्यास योग्य नसलेले.
बेकायदा : कायदेशिर नसलेले
बेफीकिर : फिकिर नसलेला
बेपर्वा : पर्वा नसलेला
बे-वसाऊ : वसऊण्यास (वसवण्यास) योग्य नसलेले.
बरोबर का/ ना ?
23 Nov 2023 - 11:03 pm | सांरा
>महादेवोरावो ठाणेया कटकै गेला होता: तो सिंनरा आला: हे नगर बरवे: तरि एथ गोसावी असति
ही कोणती लिळा आहे सांगू शकाल? लिळाचरित्र पूर्वार्ध मध्ये १८०-२४० पर्यन्त वेरूळ च्या लिळा आहेत बूट ही लिळा नाही सापडली. माझ्याकडे कोलते संपादन आहे.
24 Nov 2023 - 9:55 am | प्रचेतस
ही लीळा नेने ह्यांनी संपादित केलेल्या लीळाचरित्रातून घेतलेली आहे (पान. क्र. ४९). ह्याबद्द्ल अधिक माहिती घेत असताना कोलते ह्यांनी संपादित केलेल्या लीळाचरित्रात हीच लीळा थोड्या जास्त शब्दांत सापडली.
लीळा क्र. २३७, पूर्वार्ध-
माहादेओराओ तैसाचि एळापुरावरौनि ठाणैया कटके गेला होता : तो एतएतां श्रीनगरावरौनि आला. तव तेथ ऐसें आईकलें : ना एळापुरि जे पुरुख होते ते एथ असति.
25 Nov 2023 - 9:31 am | सांरा
मला फक्त कोलते यांचे संपादन (ज्यावर सध्या बंदी आहे) आणि महानुभाव पंथाचे अधिकृत संपादन एवढेच माहीत आहेत. माझ्याकडे जी पीडीएफ आहे त्यात पूर्वार्ध २३७ मध्ये खालील सुरुवात आहे.
>महादेओ राओ तैसाची एळापुरावरौनि ठाणेयां महीबा कटकै गेला होता तो एतएता श्रीनगरावरौनि आला तव तेथ ऐसें आईकिलें : ना एळापुरि जे पुरुख होते ते एथ असति.
अन शब्दार्थात माहीबा म्हणजे माहीम अन ठाणे म्हणजे ठाणे असा दिलं आहे. जे जास्तच दूर वाटतं. बाकी लिळा मस्त आहे. आपण फक्त मराठीलाच इतिहास आहे अस असल्यासारखं वागतो पण या लिळेत गुजराती सुद्धा आहे.
25 Nov 2023 - 10:34 am | प्रचेतस
हा अर्थ निश्चित असू शकतो, किंबहुना हेच योग्य असावे. महादेवराय यादव हा वेरुळातून निघून ठाणे माहीम च्या सैन्यतळावर गेला आणि तिथून सिन्नरला आला. ठाणे-माहीम वेरुळपासून दूर असूनही ह्यांचे उल्लेख येणे सहज शक्य आहे कारण महादेवाने उत्तर कोकणच्या शिलाहारांवर स्वारी केली होती. पश्चिम किनाऱ्यावरील अरब मांडलिकांची मदत घेऊन त्याने उत्तर कोकणचा शेवटचा शिलाहार राजा सोमेश्वर ह्याचे राज्य समुद्रात बुडवले. सोमेश्वराने घारापुरी बेटावर आश्रय घेतला होता पण महादेवाने पुरी काबीज केली आणि ह्या शिलहारांची राजवट संपूर्ण संपली. बोरीवलीतील एकसर गावी असलेल्या वीरगळांवर ह्या नाविक युद्धाचे चित्रण आले आहे.
27 Nov 2023 - 11:44 am | सस्नेह
अभ्यास आणि व्यासंग ओळींमध्ये जाणवत आहे...
... नेहमीप्रमाणे :)
30 Nov 2023 - 4:25 pm | पाषाणभेद
एखादी गृहीणी ज्या निगूनेते एखादा पदार्थ कुटूंबासाठी करते अन खाऊ घालते त्याच निगुतेने हा लेख लिहील्याचे जाणवते.
कैलास लेणे अद्भुत शैलीने नटलेले आहे. हे लेणे प्रत्यक्ष देवांनीच खोदले असावे असे पदोपदी जाणवते. त्याचा अभ्यास आम्हाला तुम्ही सोप्या पद्धतीने करून दिलात.
22 Dec 2023 - 5:37 pm | श्वेता व्यास
कैलास लेण्यांबद्दल इतका सुंदर लेख पहिल्यांदाच वाचनात आला.
खूप उच्च दर्जाचा लेख आहे. वाखूसा.