बदामी १: चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास आणि बदामी लेणी
बदामी २: बदामी किल्ला, मंडप, धान्यकोठारे आणि शिवालये
बदामी ३: भूतनाथ, मल्लिकार्जुन मंदिरे, विष्णूगुडी आणि सिदलाफडीची प्रागैतिहासिक गुहाचित्रे
ऐहोळे १ - जैन लेणे आणि हुच्चयप्पा मठ
ऐहोळे २: त्र्यंबकेश्वर मंदिर, जैन मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर समूह
ऐहोळे ३ - दुर्ग मंदिर संकुल
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मंदिरनिर्मितीची प्रयोगशाळा असणार्या ऐहोळे गावात सुमारे सव्वाशे मंदिरं आहेत, मात्र पुरेशा वेळेअभावी मोजकीच मंदिरं पाहता आली. इथलं सर्वात महत्वाचं दुर्ग मंदिर संकुल जे आपण मागच्याच भागात पाहिलं, ह्या संकुलाच्या समोरच अजून एक मंदिर संकुल आहे ते मात्र न पाहता आम्ही इथून जवळच असलेल्या एका गुहामंदिराकडे जाण्यास निघालो ते आहे रावणफडी.
रावणफडी
रावणफडीची रचना ऐहोळेतच असलेल्या जैन लेणीसारखीच आहे. मात्र हे आहे शैवलेणे. वेरुळ येथील रामेश्वर लेणीची प्रेरणा ऐहोळेतल्या रावणफडीवरुनच घेतलेली असावी असे मानण्यास पुरेसा वाव आहे इतके साधर्म्य ह्या दोन लेणींमध्ये आहे. अर्थातच तसेही राष्ट्रकूटांनी केलेली बरीचशी बांधकामे बदामीच्या चालुक्यांच्या स्थापत्यावरुनच प्रेरित आहेत. काळानुसार स्थापत्यशैलीही विकसित होते जाते, ऐहोळेतील सुरुवातीच्या काळात हळूहळू विकसित होत असलेली स्थापत्यशैली आपल्याला पट्टदकलमध्ये पूर्णपणे विकसित झालेली आढळते तर नंतरच्या राष्ट्रकूटांनी वेरुळच्या कैलास मंदिराद्वारे ह्या शैलीला अद्वितिय केले.
साधारण सहाव्या शतकात खोदली गेलेले हे रावणफडीचे शैवलेणे बदामीच्या चालुक्यांच्या कालखंडात कोरले गेले. एकाच पाषाणात खोदले गेलेले हे लेणे लहानसे असले तरी ते परिपूर्ण आहे ते येथील मूर्तीकलेमुळे. हे येथील सर्वात जुने लेणे, पुलकेशी पहिला ह्याच्या कालखंडात इकडील भव्य पाषाणखंड कोरुन ह्या लेण्याचे निर्माण करण्यात आले.
समोर भव्य पटांगण असलेल्या ह्या लेणीच्या सुरुवातीलाच एक स्तंभ आहे आणि लेणीच्या मुख्य द्वाराच्या पुढ्यात एक नंदी आहे, त्याच्यापाशीच कळसाचा एक आमलक पडलेला आहे मात्र तो ह्या लेणीतील नसून जवळपासच्या एखाद्या मंदिराचा असावा हे नक्की. प्रवेशद्वाराच्या आजूबाजूला लहानसे उपमंडप किंवा उपमंदिरे आहेत. लेण्यांचे प्रवेशद्वार फक्त चारच खांबांवर तोललेले आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना कुबेरमूर्ती आहेत. ह्यापैकी एका बाजूस आहे तो कमळ हाती घेतलेला पद्मनिधी तर दुसर्या बाजूस आहे तो शंख हाती घेतला शंखनिधी. कुबेर हा देवांचा खजिनदार अर्थातच निधी.
रावणफडी
रावणफडी प्रवेशद्वार (पद्मनिधी आणि शंखनिधी)
लेण्यात आत प्रवेश केल्यावर भव्य सभामंडप आणि सभामंडपाच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या ओवर्यांत शिल्पपट आहेत तर समोर गर्भगृहात शिवलिंग आहे. छतावर सुरेख नक्षीकाम आहे.
सभामंडप
सभामंडपाच्या उजवीकडे शिवतांडव अर्थात नटेशाचे सुरेख शिल्प आहे. नृत्य करणार्या शिवाने हाती नाग, डमरु, त्रिशूळ आदी धारण केले असून एका बाजूस पार्वती तर दुसर्या बजूस गणेश आहे. नागबंधन असलेल्या शिवाचे कमरेचे गजचर्म विलक्षण नजाकतीने कोरलेले आहे, त्याच्या चुण्या खूपच सुरेख दिसतात.
नटराज आणि सप्तमातृका
शिवतांडव
नटराजाच्या दोन्ही बाजूस सप्तमातृका आहेत. विशेष म्हणजे हा मातृकांचा पट एकत्रित नसून एका बाजूस चार तर दुसर्या बाजूस तीन असा आहे. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या मातृका बसलेल्या नसून उभ्या आहेत शिवाय त्यांची विशिष्ट लांच्छने येथे नसल्याने त्या नेमक्या कोण हे ओळखणे चामुंडा आणि वाराहीशिवाय अवघड आहे.
मातृका
ब्राह्मणी (कमंडलू धारण केलेली), माहेश्वरी, कौमारी आणि भयप्रद दिसणारी चामुंडा
तर ह्यांच्या समोरील बाजूस आहेत वाराहमुखी वाराही, वैष्णवी आणि ऐन्द्राणी
गर्भगॄहाच्या दोन्ही बाजूस शैवद्वारपाल आहेत तर एक हरिहराची मूर्ती देखील आहे.
शैव द्वारपाल आणि हरिहर
सभामंडपाची दुसरी बाजू म्हणजे नटराजाच्या शिल्पपटासमोरील बाजू मात्र अर्धवट राहिलेली आहे.
गर्भगृहात प्रवेश करताना एका बाजूच्या कोनाड्यात पृथ्वीस तोलून धरलेल्या नरवराहाची सुरेख मूर्ती आहे.
तर ह्याच्या समोरील बाजूच्या कोनाड्यात महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे.
गर्भगृहात मध्यभागी शिवलिंग एका पीठावर स्थापित झाले असून एकपाषाणी आहे.
प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस म्हणजेच सभामंडपातून परत बाहेर पडताना द्वाराच्या दोन्ही बाजूस सुरेख मूर्तीपट आहेत. त्यापैकी एक आहे अर्धनारीश्वर
शिवपार्वतीची ही संमीलनमूर्ती. शिवाच्या अर्ध्या बाजूस जटामुकुटावर चंद्रकोर आहे तर पार्वतीचा मुकूट भरजरी आहे. शिवाने हाती त्रिशूळ आणि नाग धारण केला असून पार्वतीने बांगड्या परिधान केल्या आहेत. शिवाने चुणीदार गजचर्म परिधान केले असून पार्वतीने नक्षीदार कटीवस्त्र नेसलेले आहे. शिवाचे पाय अनावृत्त असून पार्वतीने पायात नक्षीदार कंकणे घातलेली आहेत.
अर्धनारीश्वर
तर प्रवेशद्वाराच्या आतील दुसरे बाजूस आहे तो गंगावतरणाचा देखावा
आपल्या शापित पूर्वजांना गंगेच्या तर्पणाने मुक्ती मिळावी म्हणून हाडांचा सापळा झालेला भगीरथ एका पायावर उभा राहून शिवाची घनघोर तपश्चर्या करत आहे. शिवाच्या उजव्या बाजूस पार्वती उभी आहे तर शिवाच्या पायांच्या खालचे बाजूस पाताळात भस्मीभूत होऊन पडलेले सगरपुत्र मुक्तीची याचना करीत आहेत तर बाजूला शिवगण आहेत. प्रकट झालेली गंगा आपल्या तीन मुखांनी पृथ्वीवर येण्यासाठी तयार झाली आहे. ही तीन मुखे म्हणजे गंगा, भागीरथी आणि अलकनंदा. गंगेच्या ह्या त्रिरूपास त्रिपथगा असे म्हणतात म्हणजे तीन पथांनी मार्गस्थ झालेली. त्रिपथगेचा जोरदार प्रवाह आपल्या मस्तकावर अडवून संथ करण्यासाठी शिव उभा आहे.
गंगावतरण
सभामंडपातून दिसणारा बाह्य देखावा
इथे आपली रावणफडी लेण्याची सांगता होते. ऐहोळे-बदामी परिसरातले सर्वात जुने असलेले हे लेणीमंदिर सर्वात जुने असल्याने ऐहोळे येथे न टाळता येणार्या मंदिरांपैकी एक आहे.
आता आपण जाऊयात ते येथून अगदी जवळच असलेल्या अजून एका जुन्या मंदिराकडे, ते म्हणजे हुच्चीमल्ली मंदिर
हुच्चीमल्ली मंदिर
ऐहोळेला येणारे कित्येक पर्यटक हे शिवमंदिर पाहात नाहीत, एकतर हे मंदिर ऐहोळेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे तसेच रस्त्याच्या काहिश्या आत असल्याने चटकन दिसत नाही, मात्र रावणफडी बघायला आल्यास तेथून हे मंदिर सहजच नजरेस भरते ते त्याच्या रेखानागर पद्धतीच्या शिखरामुळे. एका उंच अधिष्ठानावर निर्मित हे मंदिर हे साधारण सातव्या शतकातले आहे आणि मुखमंडप, रंगमंडप अथवा सभामंडप आणि गर्भगृह ह्यांनी परिपूर्ण आहे. पश्चिमाभिमुखी असलेल्या ह्या मंदिरात संध्याकाळच्या वेळी सूर्यकिरणे थेट आतमध्ये प्रवेश करतात आणि मंदिर अगदी झळाळून निघत असते. मलप्रभा नदीकाठापासून हे मंदिर लांब असल्याने दुर्गामंदिर संकुलाप्रमाणेच ह्या मंदिराच्या पुढ्यात एक सुरेखशी बांधीव पुष्करिणी आहे.
रावणफडीपासून दिसणाअरे हुच्चीमल्ली मंदिर
मंदिराच्या पुढ्यात असणारी पुष्करिणी व त्यावरील विविध देवतांची शिल्पे
मंदिराचे शिखर रेखानागर पद्धतीचे असून शिखरावर आमलक आहे. नागर शैलीचे वैशिष्ट्य म्हणजे कळसाच्या खाली आमलक असणे हे तर आपल्याला आता माहितच आहे. शिखरावर शिवतांडवाची मूर्ती आहे. मंदिराला लागूनच अजून एक उपमंदिर आहे ज्याचे शिखर फांसना शैलीत आहे.
हुच्चीमल्ली मंदिर
हुच्चीमल्ली मंदिराचे मुखदर्शन व शेजारील लहान मंदिराची फांसना शिखरशैली
मी मागेच सांगितल्याप्रमाणे ऐहोळे, बदामी आणि पट्टदकल येथील मंदिरे बघताना छतावर नजर टाकण्यास अजिबात विसरायचं नाही. हुच्चीमल्ली मंदिराच्या मुखमंडपातील छतावर देखील एक अद्भूत मूर्ती आहे ती म्हणजे कार्तिकेयाची. मयुरावर आरूढ कार्तिकेय राक्षसांचा संहार करताना दाखवलेला आहे. साथीला त्याचे पार्षद गण आहेत. कार्तिकेयाच्या अशा गतिमान मूर्ती तशा दुर्मिळ आहेत.
कार्तिकेय
मुखमंडपातून आत गेल्यावर रंगमंडप आणि आतमध्ये अंतराळ आणि गर्भगृह आहे जे प्रचंड अंधारात आहे. हुच्चीमल्ली मंदिर अगदी सुरुवातीच्या मंदिरांपैकी एक असल्याने येथेही प्रदक्षिणापथ हा सभामंडपातून गर्भगृहाभोवती फेरी मारतो. गर्भगृहाच्या ललाटबिंबावर गरुडमूर्ती आहे. तसेच द्वारावर गंगा यमुना आणि द्वारपाल आहेत.
अंतराळ, गर्भगृह आणि प्रदक्षिणापथ
कूर्मारुढ यमुना
मकरारूढ गंगा
प्रदक्षिणापथावरुन फिरताना गर्भगृहाच्या बाह्य भिंतींवर असणारी असंख्य शिल्पे प्राणी पक्षी, नक्षी, देवता आदी नजरेस दिसतात. मंदिरांछ्या बाह्यभितींवर मात्र शिल्पांचे प्रमाण कमी आहे. ऐहोळेतील इतर मंदिरांप्रमाणेच ह्या मंदिरावरही शिलालेख आहेत.
मंदिराच्या बाह्यभिंतीवरील शिल्पे
शिलालेख
मंदिराचे एका आगळ्या कोनातून होणारे सुरेख दर्शन
मंदिराच्या समोरील बाजूस कल्याण चालुक्यांच्या काळातील एक मंदिरवजा मंडप आहे मात्र आत काहीही नाही.
येथे आपले हुच्चीमल्ली मंदिर संपूर्ण पाहून होते व आम्ही आता निघतो ते आमच्या ऐहोळेतील शेवटच्या ठिकाणाकडे ते म्हणजे मेगुती टेकडीवरील मंदिरांकडे त्याविषयी पुढच्या भागात,
क्रमशः
प्रतिक्रिया
5 Nov 2023 - 11:27 am | मदनबाण
वाह्ह...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Thaai Kelavi - Official Video Song | Thiruchitrambalam | Dhanush | Anirudh | Sun Pictures
5 Nov 2023 - 11:55 am | गवि
नेहमीप्रमाणेच उत्तम. अभ्यासपूर्ण. पॅशन म्हणतात ती ही.
हे कसे कळते?
बाय द वे...
हे बघून बोरिवली कान्हेरी गुंफा आठवली. कान्हेरीत जरा अधिक नीट कोरीव काम असते तर असेच दिसले असते. तिथे उरकून टाकल्यासारखे सपाट काम आहे.
5 Nov 2023 - 6:48 pm | प्रचेतस
पट्टदकलची मंदिरे प्रामुख्याने विजयादित्याच्या कालावधीतील आणि चालुक्यांच्या सुवर्णकाळातील आहेत. ऐहोळेतील प्राचीन मंदिरे तुलनेने साधी आहेत आणि त्यांत मंदिरनिर्मितीचे वेगवेगळे प्रयोग झाल्याचे त्यांच्या विभिन्न पद्धतीच्या शिखरांवरुन स्पष्टपणे कळून येते. पट्टदकलची मंदिरे मात्र अतिशय भव्य आहेत. मंदिरांच्या बाह्यभिंतींवर तसेच अंतर्भागातही विपुल शिल्पपट, पंचतंत्र, रामायण, महाभारतातील कथा, दिक्पाल, विविध प्रकारच्या शिवमूर्ती, विष्णूमूर्ती, इतर देवतांच्या मूर्ती विपुल प्रमाणात दिसून येतात ज्या ऐहोळेत कूप्च कमी प्रमाणात आहेत. लोकेश्वर महादेवी आणि त्रैलोक्य महादेवीने बांधलेली अनुक्रमे विरुपाक्ष आणि मल्लिकार्जुन मंदिरे तत्कालीन काळाच्या खूप पुढे होती आणि ती आख्ख्या भारतातील तेव्हाची आणि आजचीची सर्वोत्तम मंदिरे असावीत. उत्तर भारतातील तेव्हा अस्तित्वात असलेली मंदिरे तेव्हा कशी होती ह्याची कल्पना आज आपल्याला ती इस्लामिक आमदानीत तोडली गेल्यामुळे आज आपल्यासमोर पट्टदकलच्या मंदिरांचेच उदाहरण समोर उभे राहते.
5 Nov 2023 - 1:13 pm | कर्नलतपस्वी
बघाव्यात याचे आकलन तुमच्या लेखां मधून कळते.
महिन्याच्या शेवटी वेरुळ ला जाईन तेव्हां कदाचित बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल. बघू किती आकलन होते.
नेहमीच्याच फांसना शैलीतला लेख. ( वाचकांना शब्दांत आडकवणारा )
5 Nov 2023 - 1:48 pm | कंजूस
उत्तम लेख आणि फोटो.
दोन वेळा गेलो आहे. आता उजळणी झाली. तिथे लेणी राखायला कुणीही नसते. आजुबाजुला कुणी पर्यटकही नसतात. हजार वर्षे अशीच लेणी राखणाऱ्या सर्व लोकांचे आभार.
रावणाफणी खोदीव लेणी आहे आणि इतर सारी बांधीव देवालये आहेत.
पुन्हा पुन्हा जावंसं वाटणारं ठिकाण.
5 Nov 2023 - 4:29 pm | तुषार काळभोर
सुंदर फोटो.
पण त्यांच्यासोबत असलेलं विवेचन.... जबरदस्त!!
5 Nov 2023 - 6:58 pm | Bhakti
वाह !
मूर्ती शिल्पकला सौंदर्य तुमच्या लेखांमुळे समजते.सर्व अखंड मोठ्या सुबक मुर्ती आहेत.
6 Nov 2023 - 10:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रावणफडी आवडली. पाण्यातील बोटीसारखा आकार त्या रावणफडीचा दिसतो. सगळेच फोटो फारी. मला बाह्यभिंतीवरील शिल्पात लज्जागौरी दिसतेय. कार्तिकेय, हुच्चीमल्ली, गंगावतरण, अर्धनारीश्वर, नटराज आणि सप्तमातृका, शिवतांडव, सगळेच फोटो आणि माहिती नंबर एक आहे.
शिल्पकलेच्या माहितीमुळे शिल्प ओळखायला आपले लेखन मदत करतात, शिकवतात. बाकी, सर्व लेखांचं पुस्तक करा तेवढं मनावर घ्या. लिहिते राहा भावा.
-दिलीप बिरुटे
6 Nov 2023 - 10:54 am | सौंदाळा
सुंदरच आहे रावणफडी
स्वगत : बरं झाले हा भाग आताच आला, मला वाटले वल्लीशेठ आता पुढचा भाग दिवाळी अंकात प्रसिध्द करतात की काय
6 Nov 2023 - 11:24 am | टर्मीनेटर
हा बहुप्रतीक्षित भागही झकास! नेत्रसुखद आणि माहितीपूर्ण 👍
अवांतर:
गेल्या कित्येक वर्षांत अनेक प्राचीन लेणी, गुफा आणि मंदिरे बघतली असली तरी त्यातल्या शिल्पांचे प्रकार काही माहिती नव्हते, फक्त शिल्पकलेचा बरा-वाईट, सुबक-ओबडधोबड जो काही असेल तो प्रकार/नमुना फक्त पाहूनच आनंद घेत होता. तुमचे लेख वाचल्यावर त्या शिल्पांचे, शैलींचे वेगवेगळे प्रकार समजू लागले.
सप्तमातृकापट हा देखील त्यातूनच समजलेला एक शिलाप्रकार! नुकत्याच घडलेल्या नेपाळभेटीत 'अष्टमातूका'पटांची काही अप्रतिम काष्ठशिल्पे, चित्रे पाहायला मिळाली. आपल्याकडे सप्तमातृका पूजतात तशा तिथे अष्टमातूका पूजतात हे त्यावरूनच समजले 😀
पुढील भागाच्या प्रतीक्षेत...
6 Nov 2023 - 1:41 pm | श्वेता व्यास
तुमचे लेख वाचल्यावर त्या शिल्पांचे, शैलींचे वेगवेगळे प्रकार समजू लागले.
+१
अप्रतिम छायाचित्रे आणि ओघवती माहिती.
6 Nov 2023 - 2:37 pm | राजेंद्र मेहेंदळे
वरती सगळ्यांनी म्हटले आहे त्याप्रमाणेच--देर आये पर दुरुस्त आये.
प्रचेतस शैलीतील अजून एक जबरदस्त लेख. उत्तम प्रचि आणि त्याजोडीने चित्राला पूरक अशी माहिती यामुळे लेखाला चार चांद लागले आहेत.
यदा कदाचित पुढे ऐहोळे ला जाणे झालेच तर नकीच या लेखाचा उपयोग होईल. लिहिते रहा. पुभाप्र
6 Nov 2023 - 6:39 pm | रंगीला रतन
जिओ
8 Nov 2023 - 12:26 pm | गोरगावलेकर
मंदिरे, शिल्पांचे फोटो आवडले. सभामंडपातून दिसणारा बाह्य भागाचा फोटोही मस्तच.
जोडीला ओघवती माहिती.
10 Nov 2023 - 12:44 pm | अत्रुप्त आत्मा
___/\___
केवळ नयनरम्य शिल्पफोटो आणि अप्रतिम माहीतीपूर्ण !