संदर्भ
https://www.google.com/amp/s/www.hindustantimes.com/india-news/sanskrit-...
वरील भाषणानंतर कौतुक आणि द्वेष दोन्ही सुरु झाले आहे. आता बाजूने बोलणारे अमुक शोधाची मूळे भारतात कशी होती हे सांगू पाहतायत. उदा.
https://www.linkedin.com/posts/kalyangullapalli_science-in-ancient-india...
तर एकूणच संस्कृत , हिंदू धर्म , भारत याबद्दल द्वेष असणारेही येत्या काही दिवसात वरील भाषणाची ओढूनताणून पिसं काढण्याचा प्रयत्न नक्की करतील.
चर्चा अशी व्हावी की भारतीय तत्वज्ञानात आजच्या विज्ञानाची मूळे सापडतीलही. पण ती पुराव्यांनिशी सिद्ध कशी करणार? पूर्वी असा एक प्रयत्न यशस्वी झालाय. गुलेल्मो मार्कोनीने रेडिओ लहरींचा शोध लावला नसून ते त्याने जगदीशचंद्र बोस यांच्या संशोधनावरुन चोरुन आपल्या नावे खपवले असल्याचे आता सिद्ध झाले आहे.
हे असं किती संशोधनांबाबत भारतीयांना सिद्ध करता येईल?
प्रतिक्रिया
27 Aug 2023 - 10:52 pm | प्रसाद गोडबोले
काहीही सिध्द करायची गरज नाही....
आम्हीच आमच्या अन्य लेखात लिहिल्याप्रमाणे :
बाकी त्यांना "संघर्ष करा" असाच सल्ला मिळालेला असल्याने ते संघर्षच करत रहाणार , वादावादी करत रहाणार.
आपल्याला " तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै।।" हा सल्ला मिळालेला आहे आपण ते करत राहु ! आपल्याला काहीही सिध्द करायची गरज नाही. तुम्ही सर्वांना समजावे म्हणुन , सर्वांच्या हितासाठी म्हणुन सिध्द करायला म्हणुन जाल , सोप्पे करुन लिहायला म्हणुन जाल अन तुम्हालाच टीकेचे धनी व्ह्यायला लागेल . अहो खुद्द ज्ञानेश्वर माऊली सुटले नाहीत ह्यातुन , त्यांचा उल्लेख महाराष्ट्रातील एका सुप्रसिध्द समाजसुधारकाने "धूर्त देशस्थ आळंदीकर ज्ञानोबा" असा केलेला आहे, आणि ते पुस्तक कोणी ऐर्यागैर्याने प्रकाशित केलेले नसुन खुद्द महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले आहे , अर्थात महाराष्ट्र शासनालादेखील ते लेखन मान्य आहे !
जिथं इतके प्रेमळ हिताचे अन संपुर्ण स्वार्थशुन्य वृतीने लिहिणार्या माऊलींची ही अवस्था आहे तिथें आर्यभट्ट, सुश्रुत , केरला स्कुल मधील सुप्रसिध्द गणितज्ञ माधवा , आपले भास्कराचार्य , वराहमीहीर वगैरे लोकांची काय अवस्था होईल विचार करा!
आपण आपल्या समाधानापुरते अभ्यास करु, अन आपले हित साधुन घेऊ. इतिहास, विज्ञान, गणित , तत्वज्ञान , अर्थशास्त्र , साहित्य आणि अध्यात्म वगैरे सर्वच बाबतीतीत . आपल्याला कोणासाठीही म्हणुन काहीही सिध्द करायची गरज नाही.
ॐ शांति: शांति: शांति: ||
29 Aug 2023 - 11:39 pm | उपयोजक
मार्कस् _/\_
30 Aug 2023 - 2:43 am | चित्रगुप्त
उत्तम, नेमक प्रतिसाद.
28 Aug 2023 - 12:00 am | चामुंडराय
भारतीय समाज एकंदरीतच कलह प्रिय आहे की काय न कळे.
चांद्रयान मोहिमेपूर्वी हे सद्गृहस्थ फारसे कोणाला माहीत असतील असे वाटत नाही परंतु आता प्रसिद्धी मिळाल्यावर त्यांच्या पूर्वेतिहासाचे उत्खनन करून असे व्हीडिओ समाज माध्यमांमध्ये फिरत आहेत.
आणि खरंच हे असे असेल तर "सत्यमेव जयते" ह्या न्यायाने कधीतरी सिद्ध होईलच.
28 Aug 2023 - 12:02 am | साहना
> चर्चा अशी व्हावी की भारतीय तत्वज्ञानात आजच्या विज्ञानाची मूळे सापडतीलही.
हे सर्व सिद्ध करण्याचा उपाय अगदी सोप्पा आहे. पुढील १० वर्षांत जे शोध "दुष्ट विदेशी ताकत" लावणार आहेत ते शोध आजच आम्ही लावले तर ?
28 Aug 2023 - 4:20 pm | विवेकपटाईत
आपले धर्मग्रंथ वेद उपनिषद गीता इत्यादीचे पंधरा हजार वर्षांपूर्वी पासूनचे चालत आलेले ज्ञान तर्क आणि विज्ञानावर आधारित आहे.
28 Aug 2023 - 5:37 pm | भागो
पंधरा हजार वर्षांपूर्वी?
मला वाटत तुम्हाला २५०००० वर्षांपूर्वी अस म्हणायचे असेल.
एक शून्य कमी पडलाय? मग लावा अजून एक.. शून्याचा शोध आपणच लावला आहे.
31 Aug 2023 - 9:11 am | विवेकपटाईत
सरस्वती नदीचे पंधरा हजार वर्षांपूर्वी दक्षिणी समुद्रा पर्यंत पोहोचणे बंद झाले. त्यामुळे पंधरा हजार वर्षांपूर्वी वैदिक सभ्यता होती हा पुरावा आहे. ऋग्वेद काळात सरस्वती नदी दक्षिण समुद्र अर्थात आजचा अरेबियन समुद्र.
28 Aug 2023 - 5:05 pm | उग्रसेन
31 Aug 2023 - 8:05 pm | अहिरावण
वरील चित्रातील ब्राह्मणाने जानवे उलटे का घातले आहे? कोणाचे श्राध्द घालत आहे तो?
31 Aug 2023 - 8:06 pm | अहिरावण
वरील चित्रातील ब्राह्मणाने जानवे उलटे का घातले आहे? कोणाचे श्राध्द घालत आहे तो?
28 Aug 2023 - 6:47 pm | मूकवाचक
वानगीदाखल सांगायचे झाले तर समजा प्राचीन ग्रंथात पनीर सदृश पदार्थ नानाविध मसाल्यांचा वापर केलेल्या पाककृतीमधे समाविष्ट करून तत्कालिन लोक खात असत असे उल्लेख असतील, तर ते वाचून कुणी पनीर बटर मसाला किंवा पनीर टिक्का मसाला ही पाककृती कशी तयार करू शकेल? पनीर बटर मसाला किंवा तत्सम पाककृतीची माहिती झाल्यावर अशाच प्रकारच्या काही पाककृतीचा उल्लेख जुन्या साहित्यात आहेत असा कयास बांधणेच काय ते शक्य होईल. असो.
28 Aug 2023 - 9:35 pm | चित्रगुप्त
वेदकालीन पाकशास्त्र/पाककृती असा धागा काढावा कुणीतरी.
31 Aug 2023 - 3:25 pm | कंजूस
जे आपल्याला सापडले आहे ते मांडावे. त्याचा काळ ठरवायचा प्रयत्न करावा. ते वेदकालीन होते का अगोदरचे हा प्रश्न टीकाकार सोडवतील किंवा प्रयत्न करतील. त्यांचा कार्यक्रम ते ठरवतील. कारण वेदांचाच काळ अजून ठरला नाही. आपलं काम आपल्या पुराव्याचा काळ ठरवणे आहे. यश लाभेल. पण एक विनंती की सापडलेले बी इकडे मोकळ्या रानात भिरकावा. पाऊस पडून त्यांचे झाड होईल. वाटसपच्या बटव्यात टाकल्यास दुसराच कुणी त्याच्या नावावर दुसरीकडे प्रसरवेल. मुक्त प्रसिद्धी आवश्यक आहे.
31 Aug 2023 - 7:33 pm | कॉमी
एखाद दुसरे उदाहरण द्या जरा. की बुवा हे बघा हे आपल्याला आधीच माहीत होते हे आम्हाला इतरांनी सांगितल्यावर नंतर माहीत झाले असे...
31 Aug 2023 - 8:14 pm | कॉमी
माहीत असणे आणि कुठेतरी लिहिले असणे ह्यात फरक केला आहे का ?
उदा. अणूच्या गाभ्यात आणखी लहान कण असतात. त्या कणांचे गुणधर्म अमुकतमुक असतात, हे वैज्ञानिकांनी माहीत करून घेतले आहे. म्हणजे, तसे का, ह्याचे कारण त्यांच्याकडे आहे, काही बाबी सिद्ध केल्या आहेत, काही बाबींचे निरीक्षण केले आहे.
आता.
फक्त कुणीतरी हे किंवा असाच अर्थ काढता येईल असे अनेक वर्षांपूर्वी लिहिले होते म्हणून ते त्या पुरातन काळातल्या व्यक्तीला किंवा त्या समाजाला ही बाब माहीत होती असे म्हणता येईल का?
उदा -
अटलास श्रगड ह्या पुस्तकात कोणत्याही उर्जेशिवाय चालणारी मोटर एक पात्र बनवतो. म्हणून पुस्तकाच्या लेखिकेने अश्या मोट्रीचा "शोध" लावला म्हणता येईल का?
31 Aug 2023 - 10:52 pm | सर टोबी
प्रचलित असणारे विज्ञान अगोदरपासूनच आहेत हा दावा वरवर दिसतो तेव्हडा सरळ नसतो बरे का. ते काही तरी कोड्याच्या स्वरूपात असते म्हणे. म्हणजे मातीच्या घटांवर कुठलासा लेप लावून त्यावर मोराची मान फिरवली तर वीज निर्माण होते अशा अर्थाचं काही तरी लिखित स्वरूपात आहे म्हणे. यातील मोराची मान म्हणजे मोरचूद!
आता शोधांना मान्यता देणाऱ्या संस्था अशा कूट नीतीला शास्त्रीय शोधाचा दर्जा शक्य आहे का? नाही. मग असे झाले कि त्यांना भारत विरोधी ठरवायचं.
31 Aug 2023 - 11:04 pm | कॉमी
असे दावे ऐकले आहेत. व्हॉट्सॲप वर फिरत असतात.
31 Aug 2023 - 11:20 pm | कॉमी
Do the disbelievers not realize that the heavens and earth were ˹once˺ one mass then We split them apart?1 And We created from water every living thing. Will they not then believe?
काय ते लोक ज्यांनी (प्रेषिताचे म्हणणे ऐकण्यास) नकार दिला आहे, विचार करीत नाही की हे सर्व आकाश व पृथ्वी परस्पर एकसंघ होते, नंतर आम्ही त्यांना विभक्त केले, आणि पाण्यापासून प्रत्येक सजीव निर्माण केला? काय ते (आमच्या या निर्मितीस) मानत नाहीत?
(२१:३०)
उदा. कुराण मधले हे वाक्य वाचून त्या वेळीच बिग बँग थियरी, सिंग्युलेरिटी परमेश्वराने उघड केली होती असे मान्य करायला तुम्ही तयार व्हाल का ? नसेल तर का नाही ?
उत्तर नक्की लिहा, रोचक चर्चा होईल.
1 Sep 2023 - 6:37 pm | उपयोजक
भाजप सरकार आल्यानंतर एका विज्ञान संमेलनात बरीच कल्पनांची विमाने उडवली गेली त्यानिमित्ताने 'लोकमत' साठी लिहिलेला लेख
‘लुप्त’ होऊ शकते ती ‘विद्या’च नव्हे
आपले पूर्वज कसे होते यात आपले कर्तृत्व काहीच नसते. तो अभिमानाचा किंवा शरमेचा विषय करणे चूकच असते. ‘आपले म्हणून चांगले,’ ही भूमिका सोडून ‘चांगले म्हणून आपले’ ही भूमिका घेण्यानेच आपण, सत्याकडे वा श्रेयाकडे वाटचाल करू शकतो. वांशिक/भौगोलिक वारसदारीपेक्षा ‘वृत्ती’मधील वारसदारी सांगून स्फूर्ती घेतली पाहिजे. जो सिद्धांत कोणीही पडताळून पाहू शकतो व त्यातून तो खोटाही पडू शकतो (पण अद्याप खोटा पडलेला नाही) तोच वैज्ञानिक सिद्धांत होय. या परंपरेचा प्रतिनिधी म्हणजेच, ‘अरिस्टॉटलसुध्दा चुकू शकतो’ हे म्हणण्याची हिम्मत दाखवणारा, गॅलिलिओ होय. तो जर माझे स्फूर्तीस्थान असेल, तर तो कोणत्या भूमीत जन्मला व मी कोणत्या भूमीत, याने काय फरक पडतो? हे लक्षात घेता प्राचीन भारतात उच्च तंत्रज्ञान होते की नव्हते? या प्रश्नाचा भावनिक बडेजाव व्यर्थ ठरतो. तरीही प्राचीन भारताबाबत व अगदी आत्ताच्या काळातही जेव्हा निरनिराळे ज्ञान-दावे केले जातात, ते कसे पारखून घ्यावेत, याचे काही सामान्य निकष निश्चित करायलाच हवेत. नाहीतर वाद-मुद्दे एकमेकांना न भिडणारे ‘स्क्यू’ मांडले जाऊन ते गोल गोल फिरत रहातात. एक निकष असा की एखाद्या क्षेत्रातील साध्या सोप्या गोष्टी सापडण्या आधीच सोफेस्टिकेटेड गोष्ट सापडणे शक्य नसते. दुसरा असा की ज्या तंत्राचे उपयोजन रुळते ते लुप्त होऊच शकत नाही.
अचाट दाव्यांची तपासणी
पुष्पक हे खरोखरीचे विमान, धृतराष्ट्राला कथन करणारा संजय म्हणजेच दूरदर्शन, गांधारीच्या गर्भाचे शंभर तुकडे म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी, गणपतीला हत्तीचे मुंडके बसविणे म्हणजे प्लास्टिक सर्जरी, अशी अनेक समीकरणे सध्या उफाळून आली आहेत. स्वप्नरंजन करून कल्पना सापडणे म्हणजे वस्तू बनविता येणे नव्हे. ज्यूल व्हर्नची कादंबरीतील पाणबुडी पुढे वास्तवात आली. पण म्हणून असे कोणीही म्हणत नाही की पाणबुडी बनवण्याचे तंत्र ज्यूल व्हर्नने शोधले. मिथकापुरता अर्थसुध्दा नेमका राखला पाहिजे. उदाहरणार्थ ‘मारुतीचे उड्डाण’ ही लांब-उडी असे, उडणे नव्हे. किती लांब? हा अतिशयोक्ती अलंकार झाला. पण हे उड्डाण दाखवताना आजचे फिल्मवाले, तो उगाचच पोहल्यासारखे पाय हलवतोय, असे दाखवतात. हा मिथकाचाही विपर्यास आहे. विमानाचे वेगाने पुढे जाणे हेच तिरकस पंखांखाली हवेचा जास्त दाब निर्माण करून त्याला उचलते/तोलते. हेलिकॉप्टर चक्क वरून खाली झोत मारून स्वतःला तोलून धरते. त्याचे तरंगणे हे त्याच्या ‘जाण्या’च्या गतीवर अवलंबून नसते. त्यामुळेच हेलिकॉप्टर सर्वाधिक इंधन खाते. प्रचंड ऊर्जा खर्ची पडते. ऊर्जास्रोत कोणता आणि गुरुत्वाकर्षणावर मात करणारा उलटा दाब नेमका कसा निर्माण होतो, हे सांगितल्याशिवाय ‘विमान’ हा शब्द वापरण्याचा अधिकार मिळत नाही. पारा आणि अभ्रक यांच्या संयोगाने तळपदे यांचे विमानही उडते आणि रसेश्वर दर्शनातील मोक्षही मिळतो! प्रत्यक्षात पारा आणि अभ्रक यांच्यात आंतरक्रियाच होत नाही! “न्यायमूर्ती रानडे तेव्हा उपस्थित होते.” अशा दाव्यांनी, तळपद्यांचे विमान उडाले असे सिद्ध होत नाही. कोणीही पारा आणि अभ्रक यापासून ऊर्जा उत्पन्न करून दाखवावी, प्रश्न संपला! विमान ही फार पुढची गोष्ट झाली. पुराणातदेखील, ज्याला घोडे लागत नाहीत असा रथ तरी आढळतो काय? युधिष्ठिराचा जमिनीपासून दोन बोटे वर चालणारा रथ (हॉवरक्राफ्ट?)असला तरी त्याला घोडे लागतातच. गेला बाजार पवनचक्कीतले, शिडांमधले, पतंगांमधले एअरोडायनॅमिक्स जर मांडले गेले असते तर पुढे विमानाची बात!
जी सत्ये चिंतनगम्य असतात त्यांचे आकलन कदाचित कोणत्याही काळात होऊ शकेल. भूमितीची प्रमेये ही एकदाही निरीक्षण न घेता सिद्ध होतात. अशा सिद्धांतांना व्यवहाराची जोड लागत नाही. पायथागोरसच्या अगोदर आम्ही! ही निदान सैद्धांतिक शक्यता तरी आहे. पण कॉम्प्रेसरचा मागमूस नसताना रेफ्रिजरेशन हे असूच शकत नाही. माठ, म्हणजे बाष्पीभवनाने थंडावा, म्हणजे फक्त उष्णता खर्ची पाडून घटविणे, जे जिभेवर श्वासांचा मारा करून कुत्रासुध्दा करतो! कमी तापमानावरून जास्त तापमानाकडे उष्णता पंप करणे हे कॉम्प्रेसरविना अशक्य आहे.
आपण शब्द कोणता वापरतोय आणि संकल्पना कोणती वापरतोय यात हळूच बदल करणे ही केवळ ‘तोंड-चलाखी’ असते. टेस्ट ट्यूब बेबीचा बीजसंयोग जरी टेस्ट ट्यूबमध्ये झाला तरी गर्भपोषण हे नाळेद्वारेच होते. गर्भाशय व नाळेविना गर्भाला ऑक्सिजन व सर्व जीवनद्रव्ये पुरवण्याचे तंत्र पाश्चात्यांनाही(अजूनतरी) सापडलेले नाही. गांधारीच्या एम्ब्रियोचे शंभर तुकडे, तुपाने गच्च भरलेल्या डेऱ्यांमध्ये सीलबंद करून वर्षभर ठेवले, अशी महाभारतात स्पष्ट नोंद आहे. नुसत्या तुपातून त्यांना ऑक्सिजनादि सर्व काही कसे मिळाले? आणि सत्त्वगुणाचा महामेरू असे जे तूप, त्यातून तामसी/आसुरी असे कौरव कसे काय निपजले? हा एक ‘भारतीय’ प्रश्न आहेच. कशालाही काहीही म्हणणे ही सहेतुक बेशिस्त हे अशा दाव्यांचे एक वैशिष्ट्यच आहे. मुंडके-रोपण म्हणजे प्लास्टिक सर्जरी नव्हे. प्लास्टिक सर्जरी त्याच शरीराच्या त्याच टिश्यूने फक्त बाह्यात्कारी केली जाते. अगदी आजच्या काळातही मुंडक्याच्या लंबमज्जेतील सर्व तंतू, तुटलेल्या मज्जारज्जूला तसेच शिरेला-शीर धमनीला-धमनी वगैरे जोडणे शक्य नाही. सख्या भावाचा अवयवही परका म्हणून रिजेक्ट होऊ शकतो. एखाद्या पेशीच्या जीनोममध्ये किंचित बदल झाला तरी कॅन्सरची भीती असते. हत्तीचा जीनोम आणि माणसाचा जीनोम म्हणजे काय होईल याची दावा करणाऱ्यांना कल्पना तरी आहे का? “आंघोळीला गेले आहे. आत येऊ नये.” एवढी पाटी लावण्याची किंवा दाराला कडी घालण्याची ‘टेक्नॉलॉजी’ नसताना, मुंडके-रोपणाची होती, असे निदान पंतप्रधानांनी तरी म्हणू नये.
आयुर्वेदिक औषधात जी गुणकारी आहेत त्यांच्यात नेमका कोणता रेणू गुणकारी आहे हे सापडले की ते औषधशास्त्र बनते. उष्ण-थंड, कफ-वात-पित्त अशा सबगोलंकारी संज्ञांनी सैद्धांतिक व्यूह बनत नसतो. असिडीटीला पित्त म्हटले जाते पण पित्त हे अल्कलाइन असते! पोटातला गॅस आणि सांध्याच्या द्रवातील बुडबुडे हाही गॅसच, अशी साम्ये एकाच विकाराची(वात) मानण्याला कार्यकारणभाव म्हणणे कठीण आहे. पाणिनीच्या व्याकरणाचा संगणकप्रणाली बनविताना नेमका काय उपयोग केला हे विजयशास्त्री भटकर यांनी एकदा तरी प्रकाशित करावेच. नुसता उल्लेख करून मोकळे होता येणार नाही.
भारताचे हुकले कोठे?
या कशाचीही उत्तरे मिळत नाहीत कारण आमच्यात म्हणे डॉक्युमेंटेशनची पद्धतच नव्हती! मग ज्योतिषशास्त्राचे डॉक्युमेंटेशन इतके चोख कसे? मंत्रांसारखा परिमाण देणारी ‘यंत्रे’ या आकृत्या काढता येतात मग उपकरणांच्या आकृत्या का काढता आल्या नाहीत? ज्याचे उघड उघड अप्लिकेशन होते त्याचे मौखिक का होईना पण डॉक्युमेंटेशन होतेच. शेतीतले, कारागीरीतले ज्ञान त्यातील सर्वांना पोहोचत होतेच. एखादी गोष्ट करता येणे आणि तिची रीत सांगता येणे यात प्रचंड फरक असतो. आपण सगळेच सहजगत्या सुरगाठ बांधतो. कागदावर सुरगाठीची रीत लिहून पहा म्हणजे सिद्धी आणि विद्या यातला फरक कळेल. सिद्धी ही नुसती सु-श्रुत असून पुरते. विद्या ही मात्र सु-नोंदित आणि हस्तांतरणीयच असली पाहिजे.
‘सिद्धी’ प्राप्त होणे ही गोष्ट, स्वरूपतःच वैयक्तिक असते. विद्या ही सार्वत्रिक असते. फक्त शुक्राचार्यांनाच जी प्राप्त असते ती सिद्धी. म्हणूनच ‘संजीवनी’ ही विद्या म्हणणे चूक आहे. वैयक्तिक, साक्षात्कारी आणि अपवादात्मक उपलब्धी म्हणजे विद्या नव्हेच आणि विद्या देण्यात जो कृपण/आखडू असतो तो गुरूच नव्हे. आज पेटंट घेण्याची सक्ती आहे. ते पाडून ठेवणे व इतराना मात्र न मिळू देणे यावर बंदी आहे. मर्यादित कालावधीत मानधन घेतल्यावर ते ज्ञान सर्व मानवजातीचे होतेच. हे पेटंटचे खरे सार आहे. सार्वत्रिकीकरण हे आधुनिक विज्ञानाचे प्राणतत्त्व आहे. कृपणता, गुप्तता, ज्ञान-अनधिकार ही जिज्ञासा-द्रोहाची लक्षणे आहेत. “कोणालाच नाही मिळाले आणि माझ्या बरोबर सरणावर गेले” तरी चालेल पण बिनवशिल्याच्या शिष्याला, कुळा-बाहेरील, जाती-बाहेरील, ‘परक्या’ला मिळू देणार नाही, ही खत्रूड वृत्ती म्हणजे गुरुमहिमा आणि पेटंट म्हणजे धंदेवाईकपणा, असे म्हणून आपण आपलेच नुकसान करून घेत आलो आहोत.
भारतातील तत्त्वचिंतन मोक्ष-पुरुषार्थासाठीच झाले. इतर पुरुषार्थ, तत्कालीन संकेतांवर आणि धुरीणांवर सोडले गेले. नित्य तेच सत् अनित्य ते असत्, या आग्रहापायी आपण ‘फरक कसा पडत नाही’ हे सिद्ध करत राहिलो व पाश्चिमात्य ‘फरक कसा पडतो’ हे शोधत राहिले. वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था यातील अन्यायाचा मुद्दा क्षणभर बाजूला ठेवला तरी अमूर्त-चिंतन आणि मूर्त-हस्तकौशल्य या दोहोत संबंध न उरणे या गोष्टीमुळे ‘विज्ञाना’च्या गर्भधारणेतच अडसर उत्पन्न झाला हे निश्चित.
1 Sep 2023 - 8:18 pm | स्वधर्म
नेमक्या वेळी येथे डकवल्याबद्दल उपयोजक यांचे आभार!
लेख आवडला हे वेगळे सांगायला नकोच.
1 Sep 2023 - 8:57 pm | कॉमी
उत्तम लेख.
4 Sep 2023 - 8:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडला लेख. अशा प्रबोधनात्मक विचार ही काळाची गरज आहे.
-दिलीप बिरुटे