एलियन आणि मराठी

साहना's picture
साहना in काथ्याकूट
26 Jul 2023 - 12:41 pm
गाभा: 

कुणीतरी हल्लीच हा प्रश्न कन्नड भाषेविषयी काढला आणि माझ्या मनात मराठी चा विचार आला.

तर प्रश्न असा आहे कि परग्रहावरून काही लोक आले आणि त्यांनी सांगितले कि मराठी भाषा आणि तिची उत्क्रांती समजण्यासाठी आम्हाला दहा मराठी पुस्तके द्या तर आपण कुठल्या पुस्तकांची निवड कराल ?

* पुस्तके विविध काळांतील असावीत. म्हणजे माझ्या मते ह्या यादीत पहिले नाव हे ज्ञानेश्वरीचे असेल.
* विविध कलाप्रकाराची असावीत म्हणजे ऐतिहासिक, काल्पनिक, कथासंग्रह, चरित्र, कविता संग्रह, नाटक इत्यादी.
* एका लेखकाचे एकच पुस्तके असावे.
* जुन्या काळांतील कमी आणि आधुनिक काळांतील जास्त पुस्तके असली तरी चालेल कारण लोकसंख्या मागील १०० वर्षांत जास्त वाढली आहे.

कृपया पुस्तक आणि त्याचा काळ सुद्धा द्यावा. माझी यादी.

* ज्ञानेश्वरी ( वर्ष १२९०)
* एकनाथी भागवत (१३००+)
* तुकाराम गाथा ( १६५०)
* मोल्स्वर्थ चा शब्दकोश १८३०
* केसरीचे अग्रलेख - १८९०
* किचकवध - १९१०
* श्यामची आई (१९५० च्या आधी. )
* पु ल देशपांडे ह्यांची बटाट्याची चाळ
* केशवसुत ह्यांच्या कविता.

मागील २० वर्षांत ना घेण्यासारखे एकही पुस्तके आले नाही असे मला वाटते पण हे माझे अज्ञानाचे मत आहे, जाणकार वाचकांनी आपले मत द्यावे.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

26 Jul 2023 - 1:21 pm | प्रचेतस

त्यांनी सांगितले कि मराठी भाषा आणि तिची उत्क्रांती समजण्यासाठी आम्हाला दहा मराठी पुस्तके द्या तर आपण कुठल्या पुस्तकांची निवड कराल ?

१. हाल सातवाहनाने संपादित केलेली गाहा सत्तसई (इस. २०० च्या आसपास)
रूढार्थाने ही मराठीत नाही तर महाराष्ट्री प्राकृतात आहे, आज ह्या गाथा वाचल्या तर त्याचा अर्थ प्राकृत माहिती असल्याशिवाय आपल्याला लागूच शकत नाही इतक्या त्या अगम्य आहेत, मात्र कोठेतरी मराठीची अत्यल्प सुरुवात म्हणून हा ग्रंथ ग्राह्य धरावा.
२. खर्‍या अर्थाने मराठीतला आद्यग्रंथ म्हणजे मुकुंदराजाचा विवेकसिंधू (सन ११८८)
३. महानुभवांच्या लीळाचरित्र गृहित न धरता आपण पुढे जाऊच शकत नाही (१२६३)
मग ज्ञानेश्वरांच्या आसपास असलेल्या केशवराजाचा सूत्रपाठ हा मराठी गद्य ग्रंथ आणि मग नंतर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा, दासबोध व तदनंतरचे कोणतेही साहित्य घेऊ शकता. फादर स्टिफनचे क्रिस्तपुराणही त्यातच आले.

चित्रगुप्त's picture

26 Jul 2023 - 11:05 pm | चित्रगुप्त

ख्रिस्तपुराणाबद्दल गुगलून बघता १६१४ साली ख्रिस्तपुराण लिहून तयार झाले आणि १६१७ साली प्रकाशित झाले. ख्रिस्तपुराण पाच भागांत विभागले आहे – आदिपुराण (जुना करार), सर्ग, प्रतीसर्ग, वंश, मन्वतराणी, आणि वंशनुचरिता. ही माहिती मिळाली. याची भाषा कशी आहे, हे जाणण्याची उत्सुकता आहे. पैकी 'जुना करार' वाचायला मिळाला तर बरे. जालावर आहे का ?

तुषार काळभोर's picture

27 Jul 2023 - 6:32 am | तुषार काळभोर

तारांमध्ये बारा रासी| सप्तवारांमाजी रविशसी||
यां दिपिचेआं भासांमधे तैसी| बोली मराठिया||

अनेक आभार.
ख्रिस्तपुराणातील 'जुन्या करारा'तले डेविड, सोलोमन, सॅमसन, मोझेस, अब्राहम, नोहा वगैरें विषयीचे श्लोक उपल्ब्ध आहेत का ?

जालावर बहुधा नाहीये मात्र हा एक प्रबंध मिळाला. तसेही क्रिस्तपुराण लिहिताना मात्र लॅटिन लिपीत लिहिले गेले होते, भाषा मात्र मराठी आहे.

मजकडे क्रिस्तपुराण नाही पण त्यालाच समकालीन असलेले 'येशूच्या वधप्रसंगीचे विळाप' हे पुस्तक आहे. संध्याकाळी त्यातील काही विळापांचे श्लोक येथे देतो.

चित्रगुप्त's picture

27 Jul 2023 - 9:46 am | चित्रगुप्त

येशूला वधस्तंभावर चढवण्यासंबंधी अनेक महान चित्रकारांनी निर्मिलेल्या अनेक उत्तमोत्तम कलकृती बघितलेल्या असल्याने हे विळापाचे शोक वाचण्याची खूपच उत्सुकता आहे. अवश्य द्यावेत. वाटल्यास पुस्तक स्कॅन करून द्यावे म्हणजे त्या जुनाट पुस्तकाची एक झलक पण मिळेल.

तुम्ही दिलेल्या दुव्यात पुष्कळ दुर्मिळ, ऐतिहासिक माहिती दिलेली दिसते. ते सर्व वाचेनच. खिस्तपुराण लॅटिन लिपीत लिहिले असल्याचे प्रथमच समजले. मग त्याकाळच्य भारतियांना ते कसे वाचता यायचे ? असा प्रश्न पडला आहे. कदाचित चर्चमधे पादरीच वाचून दाखवत असतील. असो. विळापाच्या प्रतिक्षेत. (आणखीही काही उल्लेखनीय 'विलाप' आहेत का ? कोणते ? महाभारतात नक्कीच असतील असे वाटते)

पुस्तक स्कॅन करण्याचा प्रयत्न करतो, कॉपीरआईट मुक्तच आहे, विळाप मात्र अवश्य देईन. पादरीच वाचून दाखवत आणि धर्मप्रसार घडवत.
बाकी महाभारतातले स्त्रीपर्वातले विलाप मुळातुन वाचण्यासारखेच आहेत. गांधारीचा मृत राजांविषयीचे विलाप उल्लेखनीय आहेत, याखेरीज वेळोवेळी इतर अनेक दुख:दायक प्रसंगीचे विलाप देखील महाभारतात आहेत. रामायणात रामाने केलेला सीताहरणानंतरचा विलाप देखील नोंदवण्याजोगा.

प्रचेतस's picture

27 Jul 2023 - 6:14 pm | प्रचेतस

नागपूर विद्यापीठामधील स्नातकोत्तर विभागांतील मराठी विषयाचे प्रपाठक डॉ. वि. बा. प्रभुदेसाई यांनी संपादित केलेल्या 'क्रिस्ताच्या वधस्तंभारोहण प्रसंगीचे विळाप' या काव्याला मराठीतर भाषिक ख्रिस्ती धर्मी कवीने लिहिलेले काव्य म्हणून महत्त्व आहे. मराठी काव्यांत एका करुणोत्कट भक्तिभावपूर्ण विलापिकेची भर या काव्यामुळे पडत आहे.

अमराठी साहित्यिकांनी केलेल्या मराठी रचनेचा विचार केल्याशिवाय मराठी वाङ्मयाचा इतिहास पुरा होऊं शकत नाहीं. या साहित्यिकांच्या निर्मितीचा मराठी वाङ्मयनिर्मितीवर काय परिणाम झाला हा स्वतंत्र विचाराचा विषय आहे. तथापि त्यांतील विषय, कथा, रचनापद्धति यायोगे त्यांनी मराठी काव्यांत चांगली भर घातली, त्यामध्ये वैविध्य आणले हे निःसंशय. यांतील बऱ्याच रचनेमागें जरी ख्रिस्तीधर्म- प्रसाराची प्रेरणा असली तरी तें केवळ प्रचारकी न होतां त्यांत साहित्यगुणांचाहि प्रत्यय येतो. या कवींनीं आपला आशय, आपल्या कथा सांगण्यासाठी मराठी साहित्यरीतीचा अवलंब केला हेही लक्षणीय आहे. मराठी साहित्याशीं त्यांनी जुळविलेले हे नाते तपासून घेण्यासारखे आहे. धार्मिक वा पंथीय प्रचारासाठीं त्या प्रवृत्तींतून निर्माण झालेली अशी रचना, तिच्या पूर्ण आकलनासाठींच, त्या संदर्भापासून पूर्णतः तोडतां येत नाहीं हें खरें, तथापि आज कालांतराने त्यामागील प्रासंगिक रचना हेतू लुप्त झाला असून निव्वळ एक काव्यकृति म्हणूनच ती उरलेली असते. आज अशा रचनेचा आस्वाद निरपेक्षपणे घेतां यावयास हवा. साहित्याचा आस्वाद धर्म-पंथनिरपेक्ष, स्थल-कालनिरपेक्ष, नवेजुने द्वंद्वातीत शुद्ध रसिकतेनें घ्यावयाला हवा. भिन्न भिन्न प्रवृत्तींच्या साहित्याचा आस्वाद घेतांना रसिकताही अधिक बहुमुखी, उदार, स्वागतशील होत जाते. यातील कवी मात्र अज्ञात आहे.

हे मजकडे असलेले पुस्तक

IMG-20230727-174555

त्यातील काही विळाप येथे देत आहे. येशूला वधस्तंभावर चढवतानाचे प्रत्ययकारी वर्णन येथे कवीने केले आहे.

परतुनी आणिला जेजू किस्ता देखोनियां पिलातु, अक्रांदळासे' जिविं, देखोनी जुदेवांचा आकांतु, सोडावेया कारणें मनिं आठवी जुदेवांची रितु, मागा तुमि बारीबास, कि जेजू मागा हो " म्हणतु.

तवं आघवे हाक देती; बारीबास मागती, जेजसि मारि म्हणती, जोडुनियां कृसिं.

अगे ? पिलातें कंटिन' देखुनिं जुदेवांचे मन, अहो ? साटवेरि' मारावेया दिधलें फर्माण, अहो ! धांउनी आले दूत जेजूसि काडिला राजांगणां, अगे ? नग्नु" केला माजेआ गुरुनिधानां.

सेळिये पिलं लेवं' कापितां वोगुलेंचि राये, जेजू आंगिचिं वस्त्रे काडितां नबोले खिंचित काए, लज्या थोरि नग्नं केला, खांबि बांदिले हातपाये, साट" फार बापावेया आंग हालावेया नजाये.

करकमळ ताणिले; बांदपास' त्राटिले, दोरां मौंशा रिघलिं; फुगलिया गे सिरा.

अहो ? सैन्यामाजि दुत निवाडिले माहा बळि, अहो ! स्त्रंखळ" साट घेउनि पातले जवाळे, अहो ? आपुलीं वस्त्रे सरसाउनिं तेयां वेळि, अहो ? जेरबंद' मारुं

कवी पुढे म्हणतो

अहो ? आघवे सभेमाजें कवणु नाहिं मला, अहो ! जेजूची दया करुणां करुनि हे काळा, अहो ! तेयाची मजति वसा " करावेया संखला, अहो ! स्वजन इस्ट सिशांचा झमां दडपला.

यतुकआ पिलातु बैसला मनसुभे ' सदावार, बांदुनिं जेजू किस्ता नेला पिलाता-सामोरिं, देखुनियां फार मार लोळे रक्ताचेया झरी, सर्वांगिं जाहालासे जैसा कोस्टिय - रोगिया सरी.

मकुटु कंटकांचा बिळिं; ' रौद्र वाहे बोंबाळं तें पगळे जाउनिं डोळिं; खांदि थपथपे.

अहो ! पिलातु मनिं खंचला देखुनिं जेजू क्रिस्ता, अहो ? वस्त्र परुतें काडोनिं जुदेवां दाविता, “ अहो ? जुदेवांचा राजा म्हणितला हो" काए ता, अहो ? कस्टभरि दिसे पाहे पां हेआ मनुशा"

हाक देउनि बोबांटी जुदेव क्रुसि मारि म्हणती, पिलातु म्हणे, " करा तुमि जें येइल आपले निती,

येआचा अपराधु कवणु खिंचित' नदिसे माजां चितिं, " जुदेव बोब देउनिं म्हणती " हो पाहे नृपती"

काव्याच्या शेवटी आपले नाव न देता कवी स्वतःला फक्त ख्रिस्ताचा चरण सेवक म्हणवून घेतो.

अहो करुणां भाखुनिं तेया मागा काकुळति, अहो
अहो तेया कारणें होउनि मरिये मातेची मजति,

अहो जिवित्व जल्मि देइल स्वस्त", आणी अंतीं मुक्ति

अहो चरण' सेवकु सकळकां करितों विनती

चित्रगुप्त's picture

28 Jul 2023 - 7:13 am | चित्रगुप्त

.

Artist: Gabriel Metsu (1629–1667)
या चित्रातील अन्य व्यक्ती: Virgin Mary, John the Evangelist, Mary Magdalene
यातील मेरी मादेलीन हे एक रहस्यमय व्यक्तित्व आहे. याबद्दल एक उत्कृष्ट माहितीपटः
Who Was The Real Mary Magdalene? Art's Scarlet Woman (Waldemar Januszcsak Documentary) https://www.youtube.com/watch?v=SV6M0MxPGM0

'विळाप' सावकाशीने वाचून त्याबद्दल पुन्हा लिहेन.

श्री प्रचतेस, दुव्याबद्दल धन्यवाद.

श्री प्रचतेस, दुव्याबद्दल धन्यवाद.

जालावरचे माहिती नाही . पण ना.वा.टिळक हे एक नंबर होते. यांनी मराठीमध्ये ख्रिस्ती पदं रचली.
archive.org मध्ये पुस्तक मिळतील.

माझ्याकडे एक (इंग्रजी) बायबल होते आठशे पानांचे. जुना आणि नवा करार यांचे पद्यमय भाषांतर. केंब्रिज अधिक ऑक्सफर्ड मधील विद्वानांनी केलेले. आता ते पुस्तक कुणाला तरी दिले,.

अमेरिकन मिशनरी इथे (नगरला) आले आणि दीन दुबळ्यांना पंखाखाली घेतले. विठ्ठलराव घाटे यांनी चांगली माहिती दिली आहे त्यांच्या पुस्तकात.

चलत मुसाफिर's picture

26 Jul 2023 - 2:22 pm | चलत मुसाफिर

मराठी उपग्रह वाहिन्यांवर आजकाल बोलले जाणारे मराठी ऐकून तेथील सर्व लेखक, कलाकार व निवेदक परग्रहावरून आले आहेत की काय असाच संशय येतो

चलत मुसाफिर's picture

26 Jul 2023 - 2:23 pm | चलत मुसाफिर

कोसला, बिढार सामील करावेत.

धर्मराजमुटके's picture

26 Jul 2023 - 2:28 pm | धर्मराजमुटके

गोनिदां आणि थोरली पाती, धाकटी पाती माडगूळकर बंधू यांचे एकही पुस्तक यादीत नसलेले पाहून आश्चर्य वाटले. असो.

चित्रगुप्त's picture

26 Jul 2023 - 3:01 pm | चित्रगुप्त

गेल्या हजारेक वर्षातल्या मराठी साहित्यातून फक्त दहा पुस्तके निवडणे अशक्यप्राय वाटते. किमान शंभर तरी हवीत.
बाकी प्रचेतस यांच्या प्रतिसादातला एकही ग्रंथ वाचलेला नसलेल्याने काय बोलायचे ?
-- त्याखेरीज वामन पंडित-मोरोपंत वगैरेंपैकी 'पंत साहित्य, लक्ष्मीबाई टिळकांचे 'स्मृतिचित्रे', जी एंचे 'पिंगळावेळ', नेमाडेंचे 'कोसला', डॉ. गणपुले यांचे मानसोन्नती (बहुतेक आता अनुपलब्ध), शद्चंद्र वासुदेव चिरमुले यांचे लेखन, शिरीष कणेकरांचे सिनेसंगीताविषयीचे लिखाण ... असे बरेच काही आत्ता आठवते आहे (तथाकथित 'विद्रोही साहित्याविषयी माहिती नाही) परंतु 'मराठी भाषा आणि तिची उत्क्रांती समजण्यासाठी दहा मराठी पुस्तके' हा निकष लावून निवड करण्याएवढी विद्वत्ता आणि अभ्यास आमचेकडे नाही, हे खेदाने नमूद करून खाली बसतो.

सदर लेखाचा विषय 'मला आवडणारी दहा मराठी पुस्तके' हा नसून तो 'मराठी भाषा आणि तिची उत्क्रांती समजण्यासाठी दहा मराठी पुस्तके' असा असल्याने यावर मिपावरील जाणते विद्वान आणि विदुषी काय लिहीतात, हे समजून घेण्याची उत्सुकता आहे.
-- तसेच या प्रकारचे काही लेख जालावर उपलब्ध असल्यास कृपया त्यांचे दुवे द्यावेत.

कविता संग्रह (वर्ष सांगता येणार नाही,पण हे कवी युगप्रवर्तक मानले जातात)
बालकवी -निसर्ग कविता
ना.घ.देशपांडे-अभिसार
बा.सी.मर्ढेकर-काही कविता
बहिणाबाईंची गाणी-खाणदेशी ओवी प्रकार लोकप्रिय केला.
कुसुमाग्रज -विशाखा
सुरेश भट-एल्गार(मराठी गझल प्रकार लोकप्रिय केला)
ग्रेस-संध्याकलच्या कविता (गूढ कविता लोकप्रिय केल्या)
ना.धो.महानोर-रानतल्या कविता,अजिंठा(निसर्ग कविता)
संदिप खरे-मौनाची भाषांतरे
चंद्रशेखर गोखले-मी माझा
(संगणक आयटी क्षेत्र सुरू असताना तरूणाईला मराठीच्या प्रेमात पाडले)

वि.स.खांडेकर-ययाति(कादंबरी प्रकार लोकप्रिय)
दुर्गा भागवत -ऋतूचक्र( मराठी ललित लेखन चालना)
वीणा गवाणकर -एक होता कार्व्हर(मराठी वैज्ञानिक लेखन)
गोनिदा -मोगरा फुलला(संतांची ओळख सुंदर शैलीत)
रा.चि.ढेरे यांची साहित्य -लोकपरंपरा सांगड असलेली पुस्तकं

लिखित माहिती नाही पण गदिमांचे 'गीत रामायण' पद्य प्रकाराचा उल्लेख करेन.त्या पिढीला सुंदर रामायणाची ओळख झाली.
बहुतेक रेडिओवर प्रसारित व्हायचे."लाजली सीता स्वयंवराला पाहुनी रघुनंदन सावळा"माझी आजी इतकं सुंदर गायची हे गीत की रामसीता या जोडीने मला तेव्हापासून भुरळ पाडली.
आणि
रामदासकृत दासबोध,मनाचे श्लोक शालेय जीवनात यांचं महत्त्व आहे.म्हणजे मराठीच्या जवळ नेण्यात.
अनंत फंदी -फटकाप्रकार,शाहीर?
शाहीरांचा अभ्यास नाही पण हेही मराठीचे शिलेदार!

चलत मुसाफिर's picture

27 Jul 2023 - 4:56 pm | चलत मुसाफिर

हे गाणे गदिमांच्या गीतरामायणातले आहे??

Bhakti's picture

27 Jul 2023 - 6:19 pm | Bhakti

क्षमस्व!
हीच चुकीची माहिती लहानपणापासून लक्षात राहीली.आता गुगल केलं ,गीत रामायणातील हे गाणं नाही.
ते "स्वयंवर झाले सीतेचे " गाणं होतं.स्वयंवर हा प्रसंग लक्षात होता गीत रामायणातील...पण गीतरामायण मराठीतील अध्याय होता.

कंजूस's picture

26 Jul 2023 - 7:42 pm | कंजूस

शेवटी
तुंबाडचे खोत.

छान प्रतिसाद, बहुतेक पुस्तके जी आपण लोक निवडत आहात त्यांची नवे सुद्धा मी ऐकली नव्हती.

धन्यवाद

रंगीला रतन's picture

27 Jul 2023 - 9:24 pm | रंगीला रतन

१० पुस्तके खूप जास्ती आहेत. मी फक्त मोकलाया दाहि दिश्या वाचायला देईन एलीयन्सला. ही कविता आणि प्रतिसाद वाचले की मराठी भाशेची ऊत्क्रांती त्याना समजेल :=)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jul 2023 - 8:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गाहा सत्तसई
तुकाराम गाथा
मराठी व्याकरण- मो.रा.वाळिंबे
पण लक्षात कोण घेतं- ह.ना.आपटे
बनगरवाडी-व्यंकटेश माडगुळकर.
टीश्यू पेपर- रमेश रावळकर.

-दिलीप बिरुटे

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

28 Jul 2023 - 6:42 pm | हणमंतअण्णा शंकर...

क्लासिक पुस्तकांव्यतिरिक्त ही पुस्तकेही सुचवेन. कारण शेवटी ते एलियन आहेत. चार मिनिटांत संपवतील वाचून.

- अ. द. मराठे

  • मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार

- अनंत सामंत

  • एम टी आयवा मारू

- अनिल अवचट

  • आप्त
  • कार्यरत
  • स्वतःविषयी

- अनिल साबळे

  • पिवळा पिवळा पाचोळा

- अंबिका सरकार

  • एका श्वासाचं अंतर
  • शांतवन

- अभय बंग

  • माझा साक्षात्कारी हृदयरोग

- अरुण कोलटकर

  • अरुण कोलटकरच्या कविता
  • चिरीमिरी
  • भिजकी वही

- अरुण खोपकर

  • गुरुदत्त : तीन अंकी शोकांतिका
  • चित्रव्यूह, चलत्‌ चित्रव्यूह
  • काळकल्लोळ

- अरुण टिकेकर

  • स्थल-काल

- अरुण साधू

  • मुखवटा

- अरुणा ढेरे

  • काळोख आणि पाणी

- अशोक केळकर

  • वैखरी: भाषा आणि भाषाव्यवहार

- आनंद विंगकर

  • अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

- आनंद विनायक जातेगावकर

  • श्रीमंत गोपिकाबाईची बखर

- आनंद साधले

  • आनंदध्वजाच्या कथा

- आसाराम लोमटे

  • आलोक
  • इडा पिडा टळो
  • धूळपेर
  • तसनस
  • वाळसरा

- आरती प्रभू

  • दिवेलागण
  • नक्षत्रांचे देणे

- इरावती कर्वे

  • आमची संस्कृती
  • युगान्त
  • संस्कृती

- उद्धव शेळके

  • धग

- उर्मिला पवार

  • आयदान

- कमलाकर सारंग

  • बाइंडरचे दिवस

- कल्पना दुधाळ

  • धग असतेच आसपास

- किरण गुरव

  • जुगाड
  • बाळूच्या अवस्थांतराची डायरी
  • राखीव सावल्यांचा खेळ
  • श्रीलिपी

- गो. नी. दांडेकर

  • कुण्या एकाची भ्रमणगाथा
  • जैत रे जैत
  • दुर्गभ्रमणगाथा
  • पडघवली
  • माचीवरला बुधा

- गौरी देशपांडे

  • अरेबिअन नाइट्स (एक हजार रात्री आणि एक) १६ खंड
  • आहे हे असं आहे
  • एकेक पान गळावया
  • दुस्तर हा घाट आणि थांग

- ग्रेस

  • संध्याकाळच्या कविता

- चिं. वि. जोशी

  • वायफळाचा मळा

- जयंत नारळीकर

  • यक्षांची देणगी

- जयंत पवार

  • काय डेंजर वारा सुटलाय
  • फिनिक्सच्या राखेतून उठला मोर
  • मोरी नींद नसानी होय
  • वरनभात लोंचा कोन नाय कोंचा

- जयवंत दळवी

  • आणखी ठणठणपाळ
  • आत्मचरित्राऐवजी
  • निवडक ठणठणपाळ
  • बॅरिस्टर
  • सारे प्रवासी घडीचे

- जी. ए. कुलकर्णी

  • रक्तचंदन
  • काजळमाया
  • पिंगळावेळ
  • बखर बिम्मची
  • मुग्धाची रंगीत गोष्ट
  • माणसे: अरभाट आणि चिल्लर
  • रमलखुणा

- डॉ. अनिल पाटील

  • गावगाडा शतकानंतर

- डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर

  • डॉक्टर म्हणून जग(व)ताना

- तारा वनारसे

  • श्यामिनी

- ताराबाई शिंदे

  • स्त्री-पुरुष तुलना

- त्रिं. ना. आत्रे

  • गाव-गाडा

- द. मा. मिरासदार

  • मिरासदारी

- दया पवार

  • बलुतं

- दि. बा. मोकाशी

  • आनंद ओवरी

- दि. य. देशपांडे

  • विवेकवाद

- दिवाकर मोहनी

  • शुद्धलेखनाचें तत्त्वज्ञान

- दुर्गा भागवत

  • ऋतुचक्र
  • व्यासपर्व
  • बाणाची कादंबरी
  • जातककथांचे अनुवाद समग्र

- नंदा खरे

  • अंताजीची बखर
  • उद्या
  • दगडावर दगड विटेवर वीट
  • नांगरल्यावीण भुई
  • बखर अंतकाळाची
  • संप्रति

- नरहर कुरुंदकर

  • छत्रपती शिवाजी महाराज जीवनरहस्य
  • मागोवा
  • जागर
  • शिवरात्र

- नामदेव ढसाळ

  • गोलपीठा

- नारायण सुर्वे

  • माझे विद्यापीठ

- निरंजन घाटे

  • वाचत सुटलो त्याची गोष्ट

- नीतीन रिंढे

  • पासोडी
  • लीळा पुस्तकांच्या

- पद्मजा फाटक

  • आवजो
  • गर्भश्रीमंतीचं झाड
  • माणूस माझी जात
  • रत्नांचं झाड
  • सोनेलूमियेर
  • हसरी किडणी

- पद्मजा फाटक, माधव नेरूरकर

  • बाराला दहा कमी

- पु. ल. देशपांडे

  • गोळाबेरीज
  • मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास
  • व्यक्ती आणि वल्ली
  • हसवणूक

- पु. शि. रेगे

  • मातृका
  • सावित्री

- प्रकाश नारायण संत

  • झुंबर
  • पंखा
  • वनवास
  • शारदा संगीत

- प्रभाकर बरवे

  • कोरा कॅन्व्हास

- बा. सी. मर्ढेकर

  • मर्ढेकरांची कविता

- भाऊ पाध्ये

  • बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर
  • भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा
  • वासूनाका

- भारत सासणे

  • चिरदाह

- भालचंद्र नेमाडे

  • कोसला
  • जरीला
  • झूल
  • तुकाराम
  • बिढार
  • साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण
  • हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ
  • हूल

- भास्कर चंदावरकर

  • भारतीय संगीताची मूलतत्त्वे
  • चित्रभास्कर
  • रंगभास्कर

- म. वा. धोंड

  • जाळ्यातील चंद्र
  • ज्ञानेश्वरीतील लौकिक प्रतिमासृष्टी

- मकरंद साठे

  • चौक
  • मराठी नाटकाच्या तीस रात्री - खंड १,२, ३
  • सांस्कृतिक अस्मिता आणि जागतिकीकरण

- मनोहर तल्हार

  • माणूस

- मल्लिका अमर शेख

  • मला उद्ध्वस्त व्हायचंय

- महेश एलकुंचवार

  • मौनराग
  • युगान्त

- माधव आचवल

  • किमया
  • पत्र

- माधव वझे

  • श्यामची आई, आचार्य अत्रे, आणि मी

- माधुरी पुरंदरे

  • लिहावे नेटके - भाग १, २, ३ व पुरवणी

- मीना प्रभू

  • माझं लंडन

- मेघना पेठे

  • आंधळ्याच्या गायी
  • हंस अकेला

- मोरो केशव दामले (संपा. कृ. श्री. अर्जुनवाडकर)

  • शास्त्रीय मराठी व्याकरण

- रंगनाथ पठारे

  • टोकदार सावलीचे वर्तमान
  • नामुष्कीचे स्वगत

- रा. चिं. ढेरे

  • लज्जागौरी
  • श्री विट्ठल एक महासमन्वय
  • तुळजाभवानी
  • दक्खनचा लोकदेव खंडोबा

- राजीव नाईक

  • नाटक: एक पडदा आणि तीन घंटा
  • लागलेली नाटकं
  • मोकळा

- लक्ष्मीबाई टिळक

  • स्मृतिचित्रे

- ल. म. कडू

  • खारीच्या वाटा

- वि. का. राजवाडे

  • भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

- वि. ज. बोरकर

  • नागडा

- वि. वा. शिरवाडकर

  • कल्पनेच्या तीरावर

- विजय तेंडुलकर

  • घाशीराम कोतवाल
  • तेंंडुलकरांचे ललित लेखन
  • नाटक आणि मी
  • हे सर्व कोठून येते?

- विंदा करंदीकर

  • अजबखाना
  • आदिमाया
  • पिशीमावशीची भुतावळ
  • मृद्गंध
  • राणीचा बाग
  • स्वेदगंगा

- विश्राम बेडेकर

  • रणांगण

- विलास सारंग

  • एन्कीच्या राज्यात
  • सोलेदाद

- विश्वास पाटील (पानिपत वाले नव्हेत)

  • झुंडीचे मानसशास्त्र

- शकुंतला परांजपे

  • काही आंबट काही गोड

- शशांक ओक

  • अमुकचे स्वातंत्र्य

- शांता गोखले

  • त्या वर्षी
  • निर्मला पाटील यांचे आत्मकथन
  • रिटा वेलिणकर

- शिरीष कणेकर

  • गाये चला जा
  • मी माझं मला

- श्याम मनोहर

  • कळ

- श्री. ना. पेंडसे

  • तुंबाडचे खोत : खंड एक व दोन
  • रथचक्र
  • लव्हाळी
  • श्री. ना. पेंडसे : माणूस आणि लेखक

- सई परांजपे

  • हरवलेल्या खेळण्यांचे राज्य

- सचिन कुंडलकर

  • कोबाल्ट ब्लू

- संजय संगवई

  • नद्या आणि जनजीवन

- सतीश काळसेकर

  • पायपीट
  • वाचणाऱ्याची रोजनिशी

- सतीश तांबे

  • राज्य राणीचं होतं

- संतोष शिंत्रे

  • गुलाबी सिर - द पिंक हेडेड डक

- सत्यपालसिंग राजपूत

  • काळ्या जादूचे अवशेष

- संपादित

  • इतिहासलेखन मीमांसा (निवडक समाजप्रबोधनपत्रिका)
  • जी. एं. ची निवडक पत्रे (खंड १, २, ३, ४)

- संपादित (ले. नरहर कुरुंदकर)

  • निवडक नरहर कुरुंदकर - खंड १, २, ३

- समीना दलवाई

  • भटकभवानी

- सरोज देशपांडे

  • बाग एक जगणं

- सानिया

  • अवकाश
  • आवर्तन
  • स्थलांतर

- सुनीता देशपांडे

  • आहे मनोहर तरी
  • प्रिय जीए
  • सोयरे सकळ
  • मण्यांची माळ

- सुभाष अवचट

  • स्टुडिओ

- सुमा करंदीकर

  • रास

- सुलभा ब्रह्मनाळकर

  • गोफ जन्मांतरीचे

शंकर रामाणी

  • पालाण
हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

28 Jul 2023 - 6:51 pm | हणमंतअण्णा शंकर...

कदाचित नेमाड्यांची सगळी पुस्तके वाचून एलियन्स परत जाण्याची शक्यता आहे.

एलियन्सना मराठी भाषेची उत्क्रांती सम्जून घ्यायची असेल तर पुस्त्कांची गरज लागणार नाही. कारण त्यांना टाईम बेंड करता येतो.

पण एकंदरीत मराठीत साहित्य साहित्य म्हणून काय शिजतंय हे कळण्यासाठी पुस्तके लागतील. त्यात ज्ञानेश्वरी वाचून 'भूता परस्परे जडों' वगैरे वाचून भलताच गैरसमज करून घेण्याची शक्यता आहे. मैत्र तर सोडाच, (भारत) भू वर इश्वरनिष्ठांच्या मांदियाळीने काय दिवे लावलेत हे कळण्यासाठी त्यांना बरंच खावं लागेल.

चांदणे संदीप's picture

28 Jul 2023 - 9:08 pm | चांदणे संदीप

लायब्ररीत शिरल्यासारखे वाटले.

सं - दी - प

चलत मुसाफिर's picture

30 Jul 2023 - 8:11 pm | चलत मुसाफिर

यादी तुम्ही परिश्रमपूर्वक बनवली आहे यात वाद नाही. पण येणारे एलियन हे सैनिकपेशातील असण्याची अधिक शक्यता आहे (आठवा: हवाईदल अधिकारी राकेश शर्मा). मराठी संस्कृतीची ओळख होण्यासाठी इतकी पुस्तके वाचावी लागतील हे कळले तर ते या मोहिमेतून काढता पाय घेतील.

@ हणमंतण्णा: प्रत्येक मराठीप्रेमी वाचकासाठी उपयुक्त यादी आहे.
-- यात 'सांजशकुन' आणि 'चिमणरावाचे चऱ्हाट' राहून गेले की काय ?

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

1 Aug 2023 - 4:49 pm | हणमंतअण्णा शंकर...

बहुतेक! आता अपडेट करायला वाव नाही!

छान यादी आहे ! आपला व्यासंग अत्यंत दांडगा आहे

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

1 Aug 2023 - 4:48 pm | हणमंतअण्णा शंकर...

धन्यवाद साहना!

एकच खंत आहे ती म्हणजे या यादीत दसादशे १ टक्केही वाढ होत नाही आहे :(

रीडर's picture

30 Jul 2023 - 4:38 pm | रीडर

माझा प्रवास - गोडसे

वरील यादी छानच आहे , बर्या पैकी काळानुसार व लेखकांची सारया परिपूर्णता गाठणे. झालेय फक्त नंतर चित्रगुप्त. यांनी सुचवल्याप्रमाणे ची.वि जोशींची तिसरे‌. चिमणराव, चौथे चिमणराव यांचाही समावेश हवा होता. व गौरी देशपांडे , सानिया यांची जास्त पुस्तकांची नावं. हवी होती तसेच बाबूराव‌. अरनाळकरांची. झुंजार व काळापहाडचया पुस्तकांचा उल्लेख हवा होता , मला काळापहाडची "चोरांची दुनिया " सर्वात आवडलेले‌. व बाबूराव अरनाळकरांची काळापहाड वरचे climax असलेले‌ पुस्तक वाटते.मस्त एक वेगळ्या काल्पनिक दुनियेची सफर माझ्या पौगंडावस्थेतील वयात 12/14 च्या झाली होती . बहुतेक परिपूर्ण यादी गाठायचा सर्व तर्हेची व सर्व काळातील प्राचीन काळ सोडून गाठायचा ते‌आधुनिक काळ गाठायचा छान प्रयत्न ‌ झालाय , धन्यवाद ही पुस्तके साधारण बालपण त्यानंतरचे वय अंदाजे 12/16 ,16/25,25/40, नंतर. 40/50,50/65 वयापर्यंत साततयाने नोकरी ,घर ,संसार संभाळून व इतर हिंडणे फिरणे सिनेमे ,नाटके कमीतकमी बघून वाचत राहिल्यास. सहज वाचून होतात , निदान माझा तरी अनुभव आहे हा.

संसार म्हणजे स्वैपाक म्हणायचे मला ,कारण घरात आपणच जुने पारंपारिक व. सणाप्रमाणे ठरलेले खाद्यपदार्थ केले‌ नाही तर मुलांना कसे कळणार व. करता येणार म्हणून थोडा. किंवा पुष्कळ त्रास घेऊनही मलाच घरी करावे‌ लागले ,कारण मधल्या काळी आम्ही काही वर्षें अशा ठिकाणी रहात होतो की तिथे अर्धा पाऊण तास लांब गेल्या शिवाय काहीही चांगले मिळत नसे आयते व पारंपारिक सणांचे गोड पदार्थ जे आम्ही आवडीने त्या त्या दिवशी तरी‌ तेव्हा खायचो, बदल व सण म्हणून. असो‌ गेले ते जेवण खाणे न‌ मिळायचे दिवस आता मात्र अशा ठिकाणी आहोंत की सर्व काही‌ पाच मिनिटांच्या अंतरावर‌ व खूप काही. घरपोच आणून‌. देणारेही मिळतात व दर्जा ही बर्या पैकी असतो त्यामुळे छान वाटते पण मुख्य मुंबई शहरापासून बरेच लांब व फार सर्व सोयी मुंबईतल्या नसलेले आहे. व प्रवासाच्या कमीतकमी सोयी आहेत.बंबई नगरी बडा. बाॅंकां. ची सोय नाही. व मजा नाहीं.जी मधे आम्ही मुंबईत
मजा केली ़़

चौकस२१२'s picture

31 Jul 2023 - 9:45 am | चौकस२१२

हा 'विळाप' वाचून मनात आलेला विचार ... हे प्रभू जर त्यावेळच्या हुच्च शिक्षित "धर्मांतर वाद्यानी " अशी हुच्च भाषा"च " वापरली असती तर फार कमी धर्मांतर झाले असते ... हे असेल ऐकून लोक ख्रिस्त स्वीकरणाय ऐवजी पळून गेले असते ...
प्रभुणे त्यांना नाही तरी मूळ ख्रस्ती पादर्यांना विहिरीत बिस्कुटे टाकण्याची नामी युक्ती दिली

असो विषयांतर केलं
मराठी भाषेचा अभ्यास म्हणून रोचक आहे
आधुनिक काळात इस्राईल मधील मराठी जूनचे "मायबोली" वाचले तेवहा पण अशीच "मौज " वाटली होती
असो

मिपावरील मराठीप्रेमी अभ्यासकांनी भाषा हळू हळू कशी बदलत गेली ते दाखवणारे विविध 'वेचें' इथे द्यावेत असे सुचवतो.

वाचू आनंदे- बाल गट १,२ आणि कुमार गट १,२ ही पुस्तके निवडीन.