आंबोली

चक्कर_बंडा's picture
चक्कर_बंडा in भटकंती
13 Jul 2023 - 4:29 pm

सह्याद्रीतील पावसाळा हा सह्याद्रीला जणू काही स्वर्गाचंच रुपडं बहाल करतो. हिरवे गालीचे आणि फेसाळणाऱ्या जलप्रपातांच्या आडून, धुक्याच्या गच्च आच्छादनाखाली लपून सह्याद्री भटक्यांना खुणावू लागला की मग त्याच्या भेटीला निघण्यावाचून दुसरा पर्याय नसतो.

समुद्रसपाटीपासून साडेसहाशे मीटर उंचीवर, घनदाट अरण्याने वेढलेला आणि जैववैविध्यतेचा शालू पांघरलेल्या हिरव्यागार टेकड्यांनी कवेत घेतलेला आंबोलीचा चैतन्यमयी परिसर म्हणजे विधात्याने वेळात-वेळ काढून घडवलेलं एक वेगळंच नंदनवन आहे.भौगोलिकदृष्ट्या घाटमाथ्यावर पण प्रशासकीयदृष्ट्या घाटाखालच्या सावंतवाडीत मोडणाऱ्या आंबोलीत, ढगांचा मार्ग रोखणाऱ्या अजस्त्र सह्यकड्यांच्या कृपेने भरभरुन पाऊस कोसळतो व मग पुर्ण पावसाळाभर व पुढे अगदी डिसेंबरपर्यंत येथील दर्‍याखोर्‍यातून सगळीकडे शुभ्र तुषार उडवत शेकडो छोटे-मोठे धबधबे, जलप्रवाह सक्रिय राहतात. जूनच्या मध्याला इथल्या सड्यांवर मुरणारा पाऊस झऱ्यांना जिवंत करू लागला की आंबोली कात टाकते व भटक्यांच्या स्वागताला सज्ज होते.

Farm

कोसळत्या पाऊसधारात, इथल्या दर्‍याखोर्‍यातून मुक्तपणे भटकत, धुक्याच्या चादरीआडून डोकावणाऱ्या विस्तीर्ण घाटरांगा न्याहाळत, विलोभनीय निसर्गरूपे डोळ्यांत साठवताना अवर्णनीय आनंद मिळतो. अंगावर शहारे आणणाऱ्या काळोखातून, चावरे कीटक, रक्त शोषणाऱ्या जळवा, सरपटणारे प्राणी यातून वाट काढत इथली जैवविविधता अनुभवत जंगलातून केलेली भटकंती एक वेगळाच जीवनानुभव देते.

याशिवाय डोंगर भटक्यांना साद घालणारी अनेक ठिकाणं आंबोली आपल्या अंगाखांद्यावर बाळगून आहे ज्यांना पाय लागण्याची संधी मिळणे म्हणजे तशी थोरचं गोष्ट असते.

Chatrapati

हिरण्यकेशी उगमस्थान -:

अगदी नावापासूनच वेगळेपण जपणारे, आंबोली बस स्थानकापासून साधारण ४ किलोमीटर अंतरावर वसलेले हे पवित्र तिर्थक्षेत्र. गर्द वनराईने वेढलेल्या या परिसरात वाहनतळापासून समोर येणाऱ्या हिरण्यकेशीच्या प्रवाहावरील एक सुंदर सेतू ओलांडत व मग पुढे नदी डाव्या हाताला ठेवत ५ मिनिटांची बांधून काढलेली पायवाट आपल्याला हिरण्यकेशी नदीच्या उगमस्थानाकडे घेऊन जाते. हिरण्यकेशी म्हणजे हरणाच्या त्वचेसम सोनेरी केस असणारी, माता पार्वतीचेचं हे एक नाव आहे, माता पार्वतीचे, हिरण्यकेशी स्वरूपात मंदिर याठिकाणी आहे, जोडीला, अर्थातचं शंकर भगवान ही हिरण्यकेश्वर रुपात विराजमान आहेत.

Temple1

एका टेकडीखालून, गुहेसदृश्य जागेतून प्रसवणाऱ्या जलधारांच्या रुपात हिरण्यकेशी नदी येथे उगम पावते. भगवान शंकराने ही जलगंगा (हिरण्यकेशी नदी) माता पार्वतीसाठी याठिकाणी अवतीर्ण केली अशी मान्यता आहे.

पिवळ्या आणि लाल रंगसंगतीमध्ये रंगवलेल्या छोट्याशा मंदीरासमोर एक छान असं बांधुन काढलेल टाकं आहे. त्यात गोमुखातुन पाणी पडण्याची व्यवस्था करून इतर भागात फरशी टाकलेली आहे. पावसाळ्यात संपुर्ण मंदीर परिसर कमीत कमी एक-दीड फूट व पाऊस भरात असताना अगदी त्यापेक्ष्याही जास्त, सततच्या वाहत्या पाण्यात असतो, एक बांधीव यज्ञकुंडही इथे दिसते. दत्तगुरुंची संगमरवरी मुर्ती व गाईचं एक शिल्प ही लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या छतावर शिवलिंगाची प्रतिमा आहे. वाहत्या पाण्यात सतत निथळत असलेले हे मंदिर अतिशय सुंदर दिसते. एक वेगळीचं ऊर्जा या ठिकाणी जाणवते. भान हरपून आपण समोरील दृश्य मनात कायमचे साठवण्याचा प्रयत्न करीत राहतो व हिरण्यकेशीही अविरत झिरपत राहते...प्रवाहात ही आणि मनाच्या गाभाऱ्यातील एखाद्या खोल कप्प्यातही....

नांगरतास धबधबा-:

बेळगाव-आंबोली रस्त्यावर, आंबोलीच्या अलीकडे आठ किलोमीटर अंतरावर, धनगर समाजाच्या एका छोटेखानी मंदिराच्या मागच्या बाजूला, अगदी रस्त्याला लागून एक सुंदर धबधबा आहे जो नांगरतास या नावाने ओळखला जातो.

Nagartaas

संततधार पाण्याचा प्रवाह महाकठीण काळ्या कातळालाही कापून मार्ग कसा काढतो याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे नांगरतास धबधबा. साधारण २०० फूट थेट खाली पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने इथला कातळ नांगराने काढलेल्या तासासारखा कापला गेला आहे आणि त्या अडीच-तीन फुटाच्या भेगेतून पाणी वेगाने पुढे सरकते.

खोल घळीत कोसळणारा हा धबधबा बघुन छातीत धडकी भरल्याशिवाय राहत नाही. रौद्रभीषण सौंदर्य म्हणजे काय ते दाखवणारा हा धबधबा. पर्यटन विभागाने इथे दोन गॅलरीज बांधल्या आहेत, त्याद्वारे अगदी समोर उभे राहून हा धबधबा अनुभवता येतो. खाली पाण्याजवळ जाण्याचा निव्वळ विचारही जीवघेणा आहे त्यामुळे त्या वाटेला न जाता निसर्गाचा हा ताकदवान आविष्कार सुरक्षित अंतरावरून पाहणे हेच उत्तम.....हिरण्यकेशीचं झरझर झरणारं पावित्र्य तर नांगरतासचा आडदांड, बेमुर्वत, बेफिकीर जोरदार प्रवाह... एकाच गर्भातुन प्रसवणाऱ्या प्रवाहाची परस्परविरोधी रूप पाहताना निसर्गाबद्दलचा आदर पुन्हा दृढ होतो.

कावळेसाद धबधबा -

आंबोली एसटी स्टॅंडपासून साधारण सात किलोमीटर अंतरावर, येळे गावच्या हद्दीत, कावळेसाद या वैशिष्ट्यपुर्ण नावाचा जलप्रपात आहे. कोकणात दुर्मिळ असलेलं दृश्य म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा असलेली ऊस शेती इथे जातानाच्या रस्त्यावर दिसते. तसेच तोरणा किल्ल्याच्या वाटेवर दिसणारी तोरण झुडपे ही धबधब्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दिसतात. परिसरातील छोट्याशा पठारावर एकत्रीत होणारे पावसाचे पाणी, वाहत जाताना पाहताना थोड्यावेळासाठी मढे घाटाचा धबधबा प्रवाही करणाऱ्या स्त्रोताची आठवण आल्याशिवाय रहात नाही.

Kavale

धुक्याने भरलेल्या दरीत अदृश्य होणारा जलप्रपात व वाऱ्याने धुक्याची चादर थोड्यावेळासाठी बाजूला केल्यावर अतिशय भयावह दिसणाऱ्या दरीचं विहंगम दृश्य इथं दिसतं. उजव्या हाताला धुक्यात हरवलेल्या खाली कोसळणाऱ्या अनेक जलप्रपातांच स्वर्गीय दर्शन होत. समोरून दरीत खालून वर धडकणाऱ्या वाऱ्याच्या जोराने धबधब्याचे पाणी उलटे फेकले जाऊन मोत्याच्या दाण्याप्रमाणे दिसणारे जलतुषार अंगावर झेलायला मजा येते.

निःसंशय, कावळेसाद ही आंबोलीतील एक उत्कृष्ट जागा आहे. वाऱ्याचा वेग जेव्हा जास्त असतो त्यावेळी, येथे दरीत भिरकावलेली कोणतीही वस्तु खाली न जाता परत वर येते. पर्यटन विभागाने येथे भक्कम रेलिंग्ज तथा एक दर्शनी गॅलरी बनवलेली आहे. वाऱ्याचा राक्षसी वेग पाहता रेलिंग्जचा आधार प्रत्येकाला घ्यावाच लागतो.

आंबोली धबधबा-:

आंबोली ते सावंतवाडी असा अंदाजे वीस किलोमीटर लांबीचा सुंदर वळणावळणाचा घाट, या घाटात अनेक लहान मोठे धबधबे उंच डोंगरावरून खाली कोसळतात. यातील अगदी रस्त्याला लागून असणारा आणि सर्वात मोठा धबधबा म्हणजे आंबोली धबधबा. आकारमानात बराच मोठा परिसर व्यापणारा हा धबधबा म्हणजे एक मोठं आकर्षण.

Amboli

धुक्यात हरवलेलं वरचं टोक पाणी जणू आभाळातून खाली प्रचंड वेगाने दगडावर येऊन आदळतय अशी अनुभूती देतं. सुंदर, उत्कंठावर्धक तितकाच भीतीदायक असा हा प्रचंड धबधबा येथे येणाऱ्या प्रत्येकाच्या आकर्षणाचे केंद्र ठरतो. एकटक, वरून पडणारं पाणी भान हरपून पाहताना, सभोवतालीच्या गोंगाट-गर्दीचं अस्तित्व त्यात आपसुक विरघळून जातं व एका वेगळ्याचं समाधी अवस्थेची अनुभूती येते. निसर्गाचं असं विराट रूप पाहिलं की एकुणच जगरहाटीचं, जगण्याच्या व्यवहाराचं खुजं रूप प्रकर्षाने समोर येतं. आपल्या यकश्चित अस्तित्वाची जाणीव अशी निसर्गरूपे आपल्याला करून देतात.

तसं पाहता यासर्वां-व्यतिरिक्तची आंबोली ही अतिशय सुंदर आहे. कोकणी बाजाची शेवाळलेली छोटी-छोटी घरे, शेतं, गोठे, मांगर यांच्या आजूबाजूला खळाळत वाहणारे छोटेमोठे प्रवाह, भातशेतीच्या खाचरांची रांगोळी, नितळ डांबरी सडक आणि चिंब पाऊलवाटा, निथळणारी झाडे, हिरवी कुरणे, सभोवताली पसरलेले घनगर्द अरण्य आणि यासर्वांवर धुक्याच्या चादरीआडून चंदेरी पाखर घालणारा धुंद पाऊस......

जगण्याच्या बहुतांश रुक्ष वाटचालीत काही सुंदर क्षणांचे मोती वेचण्याची संधी सह्याद्रीतील पाऊस आपल्याला देत असतो. ती संधी मिळेल तेव्हा अगदी दोन्ही हाताने ती स्वीकारली पाहिजे व सह्याद्रीच्या अनवट वाटांवरची माती पावलांवर दागिन्यांप्रमाणे मिरवलीचं पाहिजे. ☺️☺️

1

2

3

5

6

7

8

9

#आंबोली
#Amboli

प्रतिक्रिया

हा धागा भटकंती सदरात हलवावा ही विनंती...

अनन्त्_यात्री's picture

13 Jul 2023 - 5:02 pm | अनन्त्_यात्री

प्रचि व लेखन

आलो आलो's picture

13 Jul 2023 - 5:28 pm | आलो आलो

झक्क मारतेय कि वो तुमचं त्यें स्वित्झर्लंड कि काय म्हणतात त्ये ह्याच्याफुडं !

कंजूस's picture

13 Jul 2023 - 6:51 pm | कंजूस

आपलं वाहन हवं धबधबे पाहण्यासाठी.

खूपच सुंदर ठिकाण. पूर्वी म्हणजे खूप वर्षांपूर्वी या ठिकाणी दर पावसाळ्यात न चुकता जंगल भटकंती ठरलेली असे.

त्या हिरण्यकेशी उगमाच्या छोट्याशा तळ्यात एक मासा (माश्याची प्रजाती) जगात प्रथमच शोधून काढली गेलीय. ती या तळ्यातच सापडते. बहुधा श्री. उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र या शोध मोहिमेत होते . चूक भूल द्यावी घ्यावी.

https://en.m.wikipedia.org/wiki/Schistura_hiranyakeshi

A

गवि's picture

13 Jul 2023 - 9:50 pm | गवि

The fish has only been found in large numbers in the temple pond of Amboli, near the source of the Hiranyakeshi river.[4] The area has been declared a biodiversity heritage site by the state government.

जगात ही (उप)जात फक्त या तळ्यातच सापडते. याचा अर्थ ही शाखा त्या जागीच स्वतंत्रपणे निर्माण / उत्क्रांत झाली असणार.

कंजूस's picture

14 Jul 2023 - 10:44 am | कंजूस

बऱ्याच धार्मिक ठिकाणच्या तळ्यात,नदीत लोक घरातल्या फिश ट्यांकांतले नको असलेले मासे आणून टाकतात. मग ते मासे इथल्या स्थानिक माशांशी साटंलोटं करतात आणि नवीन खेचर जाती पैदा होत असतील. आता हा मासा फक्त याच तळ्यात सापडतो आणि इतर नद्या,ओढ्यात नसतो म्हणजे साटंलोटंची शक्यता अधिक वाटते. शिवाय तो दिसतोही फिश ट्यांकांमध्ये पाळल्या जाणाऱ्या 'फाइटर' माशासारखा. जास्वंदीची फुलं जशी पाचशे वर्षांपूर्वी इथे येऊन बंगालात जबाकुसुम झाली,कोकणात गणेशप्रिया झाली तसं.

हा अँगल रोचक आहे. अर्थात याबद्दल शास्त्रीय मत देण्यास असमर्थ.

ही उपजात जगभरात कुठे कुठे अन्यत्र आढळणाऱ्या एका मुख्य गटाशी साम्य असलेली आहे पण पाळीव पैकी नसावी. तरीही तुम्ही म्हणता ती शक्यता रोचक आहे हे पुन्हा एकदा म्हणतो.

चक्कर_बंडा's picture

16 Jul 2023 - 10:40 am | चक्कर_बंडा

संशोधकांचा आंबोलीत सतत राबता असतो असं स्थानिक सांगतात.

बेडकांचे काही दुर्मिळ प्रकार, चापडा तसेच हरणटोळ साप हे विशेष... शिवाय वाघ आणि हत्ती दिसल्याचं सांगितलं जातं.

सौंदाळा's picture

14 Jul 2023 - 10:25 am | सौंदाळा

सुंदर लेख आणि फोटो.
खूप वेळा वरील बहुतांश ठिकाणी गेलो आहे पण आंबोलीत मुक्काम कधी झालाच नाही.
कुंबवड्याचा 'बाबा' धबधबा पण प्रसिध्द आहे. आपण गुहेत थांबायचे आणि धबधब्याचे पाणी आपल्या समोरुन दरीत पडते.
कोकणातल्या भटकंतीचे कितीही लेख आले तरी वाचायला आणि फोटो बघायला नेहमीच मज्जा येते.

छान लिहिलंय एकदम. फोटोही मस्त. आंबोलीला अजून गेलो नाहीये.

कंजूस's picture

14 Jul 2023 - 11:53 am | कंजूस

तिकडे गाईड मिळतात. रात्रीच्या वेळी रानात फिरवून बेडूक(इथे विशेष आहेत म्हणे), उडणारे सरडे दाखवतात पावसाळ्यात.

सुंदर सह्याद्रीतील पाऊस भटकंती!

आंबोलीतील घनदाट सदाहरित रेनफॉरेस्टमध्ये प्राणी आणि वनस्पती जीवनाचे अद्भुत नमुने बघायला मिळतात. आंबोली मध्यंतरी काही काळ चेरापुंजीला मागे टाकून देशातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण बनले होते. इथल्या कातळाला कायम पावसाने धुवून धुवून एक धुपल्या सारखा लुक असतो.

पावसाळ्यात आंबोली कोरडी कधीच नसते. आणि धुकं कधी सरत नाही.

प्रचंड आकाराची मशरूम्स, रात्री चमकणारे, उजळणारे विविध कीटक आणि अळ्या, अति दाट जंगलात घुसल्यास जळवा..

पक्षी भरपूर, खूप वैविध्य पण पावसाळ्यात ते दिसणे अवघड. अगदी जवळून उडत गेला तरच दिसतात. एरवी व्हिजीबिलिटी अगदी वाईट.

आंबोलीत शिरणे म्हणजे एका अद्भुत धूसर जादुई विश्वात शिरणे आणि तिथून बाहेर पडणे म्हणजे आपल्या नेहमीच्या जगात परत आल्याची तीव्र जाणीव. असे होते तिकडे जाता येता.

आता मात्र हॉटेले, गर्दी, मॅगी स्टॉल्स, कमर्शियल activity सर्व वाढले आहे खूप. गावच्या विकासाच्या दृष्टीने चांगलेच. पण मूळ ठिकाणाचे रूप बदलले आहे बरेच.

तिथे राहायला चांगले व्हिसलिंग वूड्स ना?

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Jul 2023 - 12:38 pm | राजेंद्र मेहेंदळे

सुंदर लेख आणि कातील फोटो. मजा आली वाचताना.
आंबोलीत पहील्यांदा पावसाळ्यातच गेलो होतो. तेव्हा बघितलेली ही सर्व ठिकाणे अजुनही छान वाटतात, पण पावसाळ्याची सर नाही. सदाशिवगडापासुन सुरु होणारी आंबोली, आंबोली धबधब्यापाशी संपते. पुढे घाट उतरुन टुमदार सावंतवाडी,रेडीचा खाणीतला गणपती करुन उत्तर गोंयात मुक्काम, कशें?

पुढे घाट उतरुन टुमदार सावंतवाडी,रेडीचा खाणीतला गणपती करुन उत्तर गोंयात मुक्काम, कशें?

जळवू नका.

शिवाय, वाटेत लंच साधले मेस किंवा भालेकर खानावळ.

यापैकी साधले मेस ही सात्विक आणि नेहमीची वाटेत थांबून जेवण्याची जागा. हल्ली जरा बदलत चाललीय ती जागा देखील. आणि भालेकर खानावळ माझ्या वैयक्तिक मतानुसार ओव्हर रेटेड आहे. अति गर्दी आणि त्या मानाने नॉर्मल चव. पोटभरीचा प्रकार. गर्दीमुळे घाईने आवरणे असेच असते बहुतांश वेळा.

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Jul 2023 - 5:31 pm | राजेंद्र मेहेंदळे

साधले मेस आणि भालेकर खाणावळीबद्दल सहमत!!

गोरगावलेकर's picture

15 Jul 2023 - 5:42 pm | गोरगावलेकर

सावंतवाडीला जाणे झाले होते पण हा भाग पहिला नाही अजून.
लेख आणि प्रतिसादांमधूनही बरीच माहिती मिळाली

चक्कर_बंडा's picture

16 Jul 2023 - 8:11 am | चक्कर_बंडा

सर्वांचे मनापासून आभार...

चक्कर_बंडा's picture

16 Jul 2023 - 10:58 am | चक्कर_बंडा

पुण्यावरून, सातारा, कोल्हापूर, निपाणी मार्गे, निपाणी ओलांडल्यावर गोवा फाटा - उत्तूरमधून, गडहिंग्लज- आजरा रस्त्याने आंबोली जाणे उत्तम....गडहिंग्लज-आजरा रस्त्यावर ठिकठिकाणी रस्तेबांधणीचं काम सुरू आहे, हा साधारण 15-20 किलोमीटरचा पट्टा सोडला तर पुर्ण रस्ता उत्तम आहे.

सर्व बजेट्समध्ये, होम-स्टे आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत. वीकेंडसला जाणार असाल तर आगाऊ आरक्षण गरजेचे.

व्हीसलिंग वुडस छान आहे पण शक्य तितक्या आधी आरक्षित करावं. MTDC रिसॉर्टचं- ग्रीन व्हॅलीही ठीकठाक.

ट्रेकच्या मानसिकतेने जाऊन सगळीकडे पायी फिरणं सर्वोत्तम ठरेल.

कर्नलतपस्वी's picture

16 Jul 2023 - 7:01 pm | कर्नलतपस्वी

तीन्ही ऋतूत सह्याद्रीमधील सौंदर्य नेहमीच आवडते.
तुमचे लेख मस्तच असतात.