भारताबाहेरचा भारत -अंदमान ४

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in भटकंती
26 Jun 2023 - 3:35 pm

मागचे भाग

भारताबाहेरचा भारत -अंदमान १

भारताबाहेरचा भारत -अंदमान २

भारताबाहेरचा भारत -अंदमान ३

काल दमून भागून हॉटेलवर परतल्यावर अर्थातच अजून काहीही करायची इच्छा उरली नव्हती. वातावरणही पावसाळी होते, त्यामुळे उरलेला दिवस आराम केला आणि रात्री लवकर जेवून गॅलरीत गप्पा मारत बसलो. मग गुडूप झोपलो. आज सकाळी लवकरच पुन्हा जेट्टीवर पोचायचे होते आणि पोर्ट ब्लेअरला जाणारी बोट पकडायची होती. शिवाय दिवसही लौकरच उजाडत असल्याने जागही लवकर येत होती. वेळ न घालवता आवरून घेतले आणि नाश्ता केला.सामान आवरलेलेच होते, त्यामुळे टेन्शन नव्हते. ७.३० पर्यंत गाडी येऊन उभी राहिली आणि १० मिनिटात आम्ही जेट्टीवर पोचलो सुद्धा.

b

बोट येऊन उभी होती पण कर्मचारी अजून आले नव्हते. त्यामुळे निवांत धक्क्यावर फिरत होतो. खाली पाण्यात पहिले तर मोजकेच मासे आणि जेलीफिश नितळ पाण्यात पोहत होते. डोक्यात एक कल्पना आली. पिशवीतला बिस्किटाचा पुडा काढला आणि बिस्किटे थोडी थोडी चुरून पाण्यात टाकू लागलो. आणि काय आश्चर्य? काळ स्नॉर्केलिंग करताना दिसले त्यापेक्षा जास्त विविध रंगी मासे झुंडीने ,येऊ लागले. चुरा खाण्यासाठी त्यांच्यात जणू स्पर्धाच सुरु झाली. हजार रुपयांच्या ट्रीपमध्ये जे पहिले दहा रुपयांच्या बिस्किटांनी सुद्धा केले होते. फक्त इथे आम्ही पाण्यात नव्हतो तर १५-२० फूट वरती उभे होतो. उरलेला चुरा खायला भरपूर चिमण्या गोळा होऊ लागल्या. थोडा वेळ हा खेळ चालला , मात्र आता बोटीचा कर्मचारीवर्ग आल्याने दरवाजे उघडले आणि आम्ही लगबगीने सामान घेऊन बोटीत स्थानापन्न झालो. थोड्याच वेळात बोट भरली आणि सुटली. खानपान सेवा सुरु झाली. एकीकडे टॉम अल्टर ची कुठलीतरी जंगल मुवि पडद्यावर दिसत होती. अर्थात टॉम अल्टर बद्दल मला आदरच आहे. पण गम्मत वाटली की ज्या ब्रिटिशांच्या कब्जातून अंदमान सोडवायला भारतीय स्वातंत्र्य सेनानी धडपडले त्यातीलच एक ब्रिटिश अंदमानला या म्हणून जाहिरात करतो आहे. काव्यगत न्याय कि काय म्हणतात ते हेच असावे.

२ तासात पोर्ट ब्लेअरला पोचलो. आज फक्त सायंकाळी कॉर्बिन कोव्ह बीचला भेट देणे आणि खरेदी इतकाच कार्यक्रम होता. त्यामुळे दिवस तास मोकळाच होता. मग आम्ही कार्यक्रमात थोडा बदल केला आणि रॉस बेट बघायचे ठरवले. हे बेट सेल्युलर जेल आणि आसपास फिरताना समोरच दिसत राहते. असे म्हणतात की ब्रिटिश लोकांनी प्रथम रॉस बेटावरच वस्ती केली आणि तिथून ते पोर्ट ब्लेअरला ये जा करत (कारण पोर्ट ब्लेअर हे मुख्यतः जेल म्हणून वापरले जायचे). नंतर मात्र काही कारणाने रॉस बेट मागे पडले आणि पोर्ट ब्लेअरच प्रमुख सत्ता केंद्र झाले.

तर आम्ही ड्रायव्हरला सांगितले की तू आमचे सामान हॉटेलवर नेऊन टाक, आणि वाटेत आम्हाला रॉस बेटावर जाणाऱ्या बोटी मिळतात तिथे सोड. जाऊन येऊन साधारण ३-४ तास लागणार होते त्यामुळे आम्ही दुपारी जेवणाच्या वेळेपर्यंत परत येणार होतो. या नवीन योजनेनुसार ड्रायवरने आम्हाला रॉस बेटाकडे जाणाऱ्या बोटीच्या धक्क्यावर सोडले आणि तो सामान घेऊन निघून गेला. आम्ही बोटीची तिकिटे काढली आणि बोटीत बसलो. ही बोट काही लोकांना रॉस बेटावर सोडून पुढे नॉर्थ बे ला जाणार होती. नॉर्थ बे मुख्यतः वॉटर स्पोर्ट साठी प्रसिद्ध आहे. पण ते आम्ही आधीच केलेले असल्याने आम्हाला नॉर्थ बे ला जायचे कारण नव्हते. १५-२० मिनिटात आम्ही रॉस बेटावर उतरलो. उतरल्यावर सगळ्यात पाहिले आश्चर्याचा धक्का बसला तो म्हणजे २ हरिणे जणू प्रवाशांचे स्वागत करायला उभी होती.

b

जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांकडून ती मजेत हात लावून घेत होती, खाणे स्वीकारत होती आणि फोटोला पोझही देत होती. आम्हीही त्यांचे जरा लाड करून पुढे झालो आणि बघतो तर पुढे जवळ जवळ १००-१५० हरणांचा कळप फिरत बागडत होता. रॉस बेटावर इतकी हरणे कुठून आली असावीत बरे? असा विचार करतच आम्ही पुढे झालो. पण सगळीच हरणे काही माणसाळलेली नव्हती, त्यामुळे त्यांच्या शिंगांपासून काळजी घ्यावी लागत होती, पण एकूणच सगळी मोकळीच फिरत होती.

b

b

रॉस बेट साधारण ०.३ वर्ग कि.मी इतके आहे. पण उंच सखल असल्याने चालत फिरणे थोडे दमणूक करणारे ठरते त्यामुळे आम्ही सरळ विजेच्या गाडीचा पर्याय निवडला . ही गाडी तुम्हाला बेटावरील मुख्य ठिकाणे दाखवते आणि उच्चतम बिंदुला नेऊन सोडते.

b

b

तिथून तुम्हाला पायऱ्या उतरून मागच्या बाजूला असलेले दीपगृह बघून परत यावे लागते आणि मग तीच गाडी तुम्हाला परत आणते. एका गाडीचे भाडे ६०० रुपये.

b

तूनळीवर आधीच पहिल्या प्रमाणे इथे अनुराधा राव नावाच्या एक मराठी बाई वस्तीला आहेत आणि त्या हरणांशी बोलतात. त्यांनी बोलावले की हरणे जवळ येतात असे बघितले होते. पण त्या आम्हाला कुठे दिसल्या नाहीत.

b

b

तर आम्ही गाडीतून बेटावरच्या मुख्य इमारती बघत बघत उच्चतम बिंदूवर पोचलो. आता जवळपास दोनशे पायऱ्या उतरून मागच्या बाजूला खाली जायचे होते. बेटाचा शेवटचा बिंदू म्हणजे दीपगृह आम्हाला खुणावत होता आणि त्याच्या मागचा उसळता समुद्र भुरळ घालत होता.

b

घनदाट झाडांमधून रस्ता खाली उतरत होता. त्यामुळे ऊन जाणवत नव्हते. सरते शेवटी रस्ता संपला आणि उथळ समुद्रात उभारलेले खांब आणि त्यावर टाकलेले लाकडी पूल पार करून आम्ही शेवटच्या बिंदूवर पोचलो.
b
इथून पुढे रस्ता नव्हता आणि दीपगृह तर अजून लांब होते. पण हाती असलेल्या वेळेत एक अजून जागा बघितल्याचे समाधान मनात घेऊन आम्ही परतलो. सर्वोच्च बिंदूवर आलो तर तिथे नुकतेच एक झाड पडले होते, सुदैवाने काही जीवित हानी झाली नव्हती.

b

पण त्यामुळे परतीची गाडी पकडायला जास्त चालावे लागणार होते. यथावकाश गाडी पकडून परत आलो आणि दुसऱ्या महायुद्धात बांधलेला एक जपानी बंकर पाहून परतीच्या बोटीत बसलो.
b

पोर्ट ब्लेअरला परतून ग्रीन पार्क मध्ये जेवलो आणि हॉटेलवर आलो.

भरपूर दमणूक झालेली असल्याने थोडा वेळ मस्त झोप काढली. झोपेतून उठून बाहेर पाहिले तर संध्याकाळ उतरली होती. मुलांनी तर आधीच गुगलवर बघून बीच बोअरिंग असल्याचे जाहीर केले होते आणि दांडी मारली होती. ड्रायव्हरचा फोन आला तेव्हा क्षणभर मनात आले की इथेच आराम करूया किंवा खरेदीला बाहेर पाडूया. कशाला मरायला कॉर्बिन कोव्ह बीचला जायचे? पण आळसावर मात केली आणि एक कडक चहा पिऊन गाडीत बसलो. ७-८ कि.मी प्रवास करून गाडीने आम्हाला बीचवर सोडले आणि २ तासाने परत येतो सांगून निघून ड्रायव्हर गेला. कुठल्याही बीचसारखा साधारण बीच , फिरायला लांबलचक , थोडेफार खाण्यापिण्याचे स्टॉल , वॉटर स्पोर्टच्या सोयी वगैरे होते. गप्पा मारत मारत बीचला एक फेरी मारली.मग थोडे खाल्ले.

b

पाण्यात पाय सोडून बसलो आणि आजूबाजूची वर्दळ बघत बसलो. आज ट्रिपचा शेवटचा दिवस होता. उद्या सकाळी परतीचा प्रवास. त्यामुळे निवांतपणा होता.

b

संध्याकाळ हळूहळू उतरत चालली होती. सूर्य मावळत होता आणि अंधार पसरू लागला होता.

b
हळूहळू लोक कमी कमी होऊ लागले, तसे आम्हीसुद्धा आवरते घेतले आणि ड्रायव्हरला फोन लावला .

b

पण फोन लागेचना. बरेचदा प्रयत्न केले पण यश नाही. मग ट्रिप को ऑर्डिनेटरला फोन केला. तो म्हणाला काळजी करू नका मी बघतो. ५ मिनिटात त्याचा फोन आला की ड्रायव्हरला चिडिया टापू नावाच्या ठिकाणी पाठवले आहे, तिथे रेंज नसल्याने फोन लागत नाही. पण तो थोड्याच वेळात पोचेल. तुम्ही तिथेच थांबा. आम्ही थांबलो. अजून १५-२० मिनिटे गेली. अंधार झाला. २-४ रिक्षा होत्या. काही गाड्या होत्या. तितक्यात एक बस समोर येऊन उभी राहिली. ती शहरात जाणारी होती , साधारण नावावरून हॉटेलजवळ जाईल असे वाटत होते. पुन्हा को ऑर्डिनेटरला फोन केला आणि बसने जाऊ का? म्हणून विचारले, पण त्याचे आपले एकाच. थोडे थांबा गाडी येईलच. इकडे बस निघून गेली. अंधार वाढला, रिक्षा कमी झाल्या. लोकही तुरळक राहिले. आता मात्र माझी सटकली आणि मी किमान १५ व्या वेळी को ऑर्डिनेटरला फोन केला आणि त्याला शिव्या घातल्या .त्यानंतर त्याच्या दिल्लीच्या मुख्य ऑफिसात फोन करून तिथल्या बाईला झापले आणि गुगलवर तुमचा रिव्ह्यू माझ्या हातात आहे म्हणू धमकावले. ही मात्रा बरीक लागू पडली आणि तिने बिनशर्त माफी मागून समोर दिसेल ती रिक्षा पकडा, पैसे मी देते म्हणू सांगितले. अर्थात माझा मुद्दा तो नव्हताच मुळी. इतके पैसे खर्च केल्यावर शंभर दोनशे साठी कोण वाद घालतोय? पण गैरसोय झाल्याचा राग होता. तणतणत समोर दिसेल ती रिक्षा पकडली. किर्रर्र अंधारात रिक्षा वळण वळणाच्या रस्त्याने धावू लागली. उजवीकडे समुद्र साथ करत होता. पण आता तो मागास एव्हढा छान वाटत नव्हता. तुरळक एखादी गाडी बाजूने जात होती, पण बाकी सुनसान होते. १० मिनिटे अशीच तणावात गेली आणि रिक्षाने एक वळण घेतले मात्र अचानक कायापालट झाल्याप्रमाणे किंवा नाटकात जसा फिरता रंगमंच असतो त्याप्रमाणे दृश्य बदलले आणि आम्ही शहराच्या गजबजलेल्या भागात आलो. इथे समुद्रकिनारा तटबंदी करून सुशोभित केला होता .इतकी सुंदर दिवाबत्ती केली होती आणि रंगीबेरंगी कपडे घातलेले लोक फिरत होते, की १० मिनिटापुरवी आपण किती तणावात होतो हे आठवून माझे मलाच हसू आले. कदाचित रिक्षावाल्याला सुद्धा माझ्या भावना पोचल्या असाव्यात. तो जरा मोकळा झाला आणि म्हणाल "साहेब, काळजी करू नका, अंदमान एकदम सुरक्षित जागा आहे, इथे पर्यटक बिनधास्त फिरू शकतात, घाबरायचे कारणच नाही." यथावकाश त्याने आम्हाला हॉटेलवर सोडले आणि आमचा जीव भांड्यात पडला. आम्ही हॉटेलवर पोचलो मात्र थोड्याच वेळात फोन वाजू लागले आणि एक एक जण भेटायला येऊ लागला. थोडक्यात दिल्ली ते अंदमान चाव्या फिरल्या होत्या आणि आम्हाला झालेल्या त्रासाबद्दल माफी मागायला लोक भेटू इच्छित होते. पण चूक कोणाची हि चर्चा करत बसण्यापेक्षा झालेगेले विसरून जाण्यातच शहाणपणा होता. त्यामुळे मी सौम्य शब्दात एकेकाची हजेरी घेतली आणि प्रकरणावर पडदा टाकला. एकुणात ट्रिपचा शेवट लक्षात राहील असा झाला. पण ५ दिवसांचा एकूण हिशोब मांडायचा तर ५ टक्के त्रास आणि ९५ टक्के मजा असे धरून ट्रिप छानच झाली होती. वातावरण चांगले होते, लोक चांगले भेटले, खूप गैरसोय, कोणी आजारी पडणे असले काही झाले नाही. एक सुंदर अनुभव पदरी पडला. हॉटेलवरच जेवण मागवले आणि सामानाची आवरा आवरी केली. आता उद्या सकाळी पोर्ट ब्लेअर ते चेन्नई आणि तिथून पुणे. (समाप्त)

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

26 Jun 2023 - 10:11 pm | राघवेंद्र

छान झाली ट्रिप. तुमच्या लेखनामुळे आमची पण झाली.
पुढील सहलीसाठी शुभेच्छा !!!

प्रचेतस's picture

27 Jun 2023 - 8:44 am | प्रचेतस

मस्त झाली अंदमानची सफर, रॉस बेटावरचा समुद्र एकदम खडकाळ दिसतोय. तुमच्या ओघवत्या वर्णनामुळे आम्ही देखील तुमच्यासोबत अंदमानची सफर करतोय असे वाटले.

टर्मीनेटर's picture

27 Jun 2023 - 4:52 pm | टर्मीनेटर

छान झाली सफर, फोटोजही सुंदर 👍
ह्या मालिकेमुळे अनेक आठवणींना उजाळा मिळाला!

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Jun 2023 - 6:38 pm | राजेंद्र मेहेंदळे

सर्व वाचकांचे धन्यवाद!! _/\_

गोरगावलेकर's picture

29 Jun 2023 - 10:03 am | गोरगावलेकर

सर्व ठिकाणांची आपण करून दिलेली ओळख व आपण अनुभवलेले क्षण वाचतांना प्रत्यक्ष सहलीचा आनंद मिळाला.
भविष्यात येथे जायचे झाल्यास या लेखमालेचा निश्चितच उपयोग होईल.

राजेंद्र मेहेंदळे's picture

30 Jun 2023 - 2:21 pm | राजेंद्र मेहेंदळे

पण अंदमानला गायडेड टूर घ्यायची असेल तर हा पर्याय चांगला आहे.
https://www.youtube.com/watch?v=2whNm-__6ig

मोदक's picture

30 Jun 2023 - 8:47 pm | मोदक

झकास सफर आणि फोटो..

कोणकोणत्या हॉटेल मध्ये मुक्काम केला त्यांची नांवे आणि तेथे कोणत्या रूम घ्यायच्या याच्या विशेष टिप्स देता येतील का?

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Jul 2023 - 1:39 pm | राजेंद्र मेहेंदळे

पोर्ट ब्लेअर ला फारशी छान हॉटेल्स दिसली नाहीत मला तरी. मी राहीलो "Grand paradise" मध्ये. आणि हॅव्ह लॉक बेटावर Shangri las beach resort
मध्ये.

कदाचित बुकिंग.कॉम्/अगोडा/ट्रिप अ‍ॅड्व्हायझर्/मेक माय ट्रिप यावर अजुन चांगले पर्याय मिळु शकतील. पण शेवटी रात्री पाठ टेकण्यापुरता किती खर्च करायचा हे आपण ठरवायचे. जितके महाग हॉटेल तितके बजेट वाढेल.

कर्नलतपस्वी's picture

2 Jul 2023 - 1:01 pm | कर्नलतपस्वी

मस्त फोटो,मस्त वर्णन पण एक मात्र नक्कीच झाले बकेट लिस्ट मधे नाव खुप वर आले. विचार पक्का झालायं आता फक्त मुहूर्त केव्हां लागतो तेव्हढेच.

Nitin Palkar's picture

5 Aug 2023 - 5:50 pm | Nitin Palkar

माझी अंदमान सहल काही ना काही कारणांमुळे रखडलीये आता लवकरच करेन.
लेख मालेत तुम्ही गुंफलेले फोटोज अतिशयच सुंदर आहेत त्या बद्दल तुमचे विशेष कौतुक.

विवेकपटाईत's picture

7 Aug 2023 - 9:36 am | विवेकपटाईत

सर्व लेख आवडले. अंदमानला जायचं विचार करतो आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

7 Aug 2023 - 9:45 am | राजेंद्र मेहेंदळे

सर्व वाचकांचे धन्यवाद!!

पराग१२२६३'s picture

7 Sep 2023 - 5:21 pm | पराग१२२६३

सगळे लेख मस्त आणि अतिशय माहितीपूर्ण.