सप्टेंबरची सकाळ, शहर कॅलगरी. रात्री पाऊस पडून गेल्यामुळे वातावरण एकदम कुंद-धुकट होते. कोंबडं झाकलं तरी उगवायचं काही राहत नाही अशी म्हण आहे पण कॅनडात हिवाळा असला तर कोंबडं झाकायचीही गरज भासत नाही. सप्टेंबर मध्ये मात्र हे अपेक्षित नव्हते. धुक्यातून वाट काढत बस शहरातून बाहेर पडली तरीसुद्धा धुक्याचा वेढा काही फुटला नाही. मोजके अनोळखी प्रवासी आणि बसच्या काचांवर लागलेला धुक्याचा पडदा यामुळे आतल्या आत विचार करू लागलो. मी इथे का आणि कसा आलो.
खिशात चार सुट्ट्या आणि चार पैसे खुळखुळले की माळ्यावरच्या अडगळीत टाकून दिलेल्या इच्छा खाली डोकावतात. त्यातलीच ही एक. वीस वर्षांपूर्वी "कोई मिल गया" चित्रपट बघण्यात आला आणि माझ्यावर जादू करून गेला (आणि हो, मी त्यातल्या परग्रहावरून अवतरलेल्या मती-मंद, निळ्या "जादू" या पात्राबद्दल बद्दल बोलत नाहीये तर आपल्याच ग्रहावरच्या अद्भुत जादुई निळाईबद्दल बोलतोय). बर्फाळ शिखरांनी वेढलेले मोरपंखी निळे तलाव आणि दाट हिरव्यागार जंगलांच्या पार्श्व-भूमीवर प्रीती आणि ह्रितिक सारखे "स्टार्स" निस्तेज आणि आऊट ऑफ फोकस झाल्यासारखे वाटले. गूगल मॅप्स आणि माझ्याकडचे नॅशनल जिओग्राफिक चे जुने अंक चाळून ह्रितिक-प्रीती सारखा मीही त्या ठिकाणी (आभासी पातळीवर का होईना) फिरून आलो. पण “सगळ्याच मनोकामना काही पूर्ण होत नाहीत बेट्या!” असं सांगून मनाने ही इच्छा सुद्धा इतर इच्छांच्या अडगळीत ढकलून दिली. अर्थात काही गोष्टी आपण ठरवून होत नाहीत. माझ्या कुंडलीतल्या ग्रहांचं भ्रमणमंडळच मला एक दिवस अलगद कॅनेडियन रॉकीज मध्ये फिरायला घेऊन आलं.
कॅलगरी सोडून आता पाऊण-एक तास झाला असेल आणि अचानक कॅनेडियन रॉकीज ची शिखरं धुक्यामागून डोकावू लागली. एका-मागून एक आणि दोनही बाजूंनी...आजवर जितक्या पर्वतशृंखला बघितल्या त्यात ही वेगळीच.
मन परत भूतकाळात गेलं. शाळेत असताना पानगळीच्या जंगलांच्या सातपुड्यात हिंडलो. कॉलेजात शिकायला पुण्यात आलो तेव्हा काळ्याकभिन्न सह्याद्रीतल्या गड-कोटांतून कित्येकदा इतिहासाच्या सफरीवर जाऊन आलो. नोकरी-धंदा करून थकलेलं-तापलेलं डोकं हिमालयाने बोलावून वेळोवेळी थंड केलं. पुढे परदेशी जायचा योग आला तेव्हा फक्त हॉलिवूड चित्रपटात बघितलेली लाल-बुंद ग्रँड कॅनिअन तसंच ओमानच्या वाळवंटातली करडी जबेल-अखदर भटकता आल्या. यातली सगळ्यात जास्त कुठली आवडली असं विचारलं तर चटकन नाही सांगता येणार.
कॅनडा सारख्या अवाढव्य देशाला साजेसा असा कॅनेडियन रॉकीज, कॅनडासारखाच विस्तीर्ण आहे. बर्फाच्छादित शिखरं, दाट जंगलं, हिरवीगार कुरणं, शेकडो हिमनद्या आणि असंख्य निळीशार तळी यांनी समृद्ध आहे. कॅनडातल्या अनेक राष्ट्रीय उद्यानांपैकी रॉकीज मधले "बँफ राष्ट्रीय उद्यान" हे सगळ्यात जुने.
बस बँफ मध्ये शिरली तेव्हा डोंगरगर्दीत वसलेले हे लहानसे गाव नुकत्याच पडून गेलेल्या सरींमुळे अधिकच टवटवीत दिसत होते. साडे-दहा वाजून गेले असले तरी सूर्य-प्रकाश अजूनही कोवळाच होता. चहू-बाजूंनी लक्ष ठेऊन असेलेले कॅस्केड माऊंटन, माऊंट रुंडल, सल्फर माउंटन आणि माऊंट नॉर्क्वे सारखे उंच पर्वत आणि विचारपूस करत जाणारी निळीशार "बो" नदी. कदाचित...कदाचित कशाला, नक्कीच बँफ हे कॅनडातले सगळ्यात सुंदर गाव असावे.
पाठीवरची जड सॅक माझ्या बॅकपॅकर्स हॉस्टेल मध्ये ठेवली आणि भटकायला बाहेर पडलो. शाळांच्या सुट्या संपल्या असल्याने पर्यटकांचे बरेच तांडे एव्हाना परतले होते. बँफ ऍव्हेन्यूच्या दुतर्फा असलेली छोटी छोटी सुवेनर्स शॉप्स, एक छोटेसे चर्च, एक पर्यटक माहिती केंद्र, एक लहानसा मॉल, बरीचशी लहान-मोठी रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स हाच काय तो एक-दिड किमी चा पट्टा थोडाफार गजबजलेला होता. उरलेले बँफ गाव शांत होते.
दुपार झाली. पोटात भूक होती आणि आज योगायोगाने माझा वाढदिवस होता. बँफ ऍव्हेन्यू वाकून बघणाऱ्या एका रेस्टोरेंटच्या सज्जात स्वतःच स्वतःला ग्लास उंचावून चीअर्स केले आणि विचार करू लागलो. काय काय बघावे ?
आजच्या माहितीच्या आणि आभासी जगात तर सगळं काही घरबसल्या मोठ्ठया स्क्रीन वर बघता येतं. कुठल्याश्या नवीन ठिकाणाची एखाद्यानं यू-ट्यूब वर माहिती टाकायचा अवकाश, पुढच्या काही दिवसात - महिन्यात तिथे उत्साही लोकांचं मोहोळ उठतं आणि अजून तसेच शेकडो व्हिडिओ बघायला मिळतात. दोन वर्षांपूर्वी एका नामांकित कंपनीचा "व्हर्चुअल रिऍलिटी हेडसेट" घेतला. कॅनडातला नायगरा फॉल्स, रशियातला लेक बेकल, यूरोपातला आल्प्स, दक्षिण अमेरिकेतला जगातला सर्वात उंच धबधबा अंजेल फॉल्स असा कुठे कुठे घरबसल्या फिरून आलो. वाटलं अरे हे तर फारच मस्त आणि स्वस्त आहे. पंधरा-वीस हजारात कुठलीही तोशीस न लागताच जगप्रवास घडला. मग स्वतःहून कुठे जाण्याचा एवढा खटाटोप कशासाठी?
पण नुसतं बघणं आणि अनुभवणं यातला फरक फार मोठा आहे. तेव्हा म्हटलं लेक लुईसचा खरा रंग स्वतः जाऊन बघितल्याखेरीज उमजणार नाही, मोरेन लेक ची निळाई प्रत्यक्षात जाऊन पडताळल्याशिवाय अस्सल वाटणार नाही आणि खूप पायपीट करून थकल्यानंतर सल्फर माऊंटनवरच्या गरम झऱ्यात डुंबायचं सुख हे काही घरबसल्या मिळणार नाही.
दोन वर्षांपेक्षाही जास्त काळ उलटून गेल्यावर डोंगर चढायची वेळ होती. स्वतःची ताकद आजमवावी म्हणून जवळच्या आणि सोप्या अश्या "टनेल माउंटन" ची वाट धरली. "आधी नीट तयारी करून ये !" असं म्हणत त्याने पाऊस पाडून लगेच परत पाठवलं. बँफ ऍव्हेन्यू वरच्या एका दुकानात "पॉन्चो" (एक ढगळ पण उपयुक्त असा रेनकोट) घेतला आणि परत एकदा धापा टाकत डोंगर चढू लागलो. मनातल्या आदर्श गावाच्या व्याख्येत बँफ अगदी चपखल बसलं. आटोपशीर गाव, गावाला लागून असलेली फार उंच नसली तरी सर्व गाव दाखवणारी एक लहानशी टेकडी, छोटीशी टुमदार घरं, एक लहानसं सुबक रेल्वे स्टेशन आणि या सगळ्याला वळसा घालून जाणारी एक नदी. नशीबवान असलात तर या हिरव्या-निळ्या कॅनव्हॉस वर रंगीबेरंगी डब्यांची नक्षी काढत जाणारी कॅनेडियन रेल्वेसुद्धा दिसेल.
टनेल माऊंटन विनातक्रार सर करून छाती थोडी फुगल्यावर (धापा टाकून नव्हे) पायात थोडं अधिक बळ आलंच होतं, त्यात लेक लुईस च्या काठावरची "सेल्फी-गर्दी" बघून पावलं आपोआप तिथूनच थोड्या उंचावर असलेल्या लेक ऍग्नेसकडे वळली. तिथे एक लहानसे कॉफी-हाऊस आहे पण तिथल्या कॉफीची हौस तिथे बाहेर लागलेली लांबलचक रांग बघूनच फिटली. अर्थात इथे थकवा दूर करायला विकतची कॉफी कशाला लागतेय? लेक ऍग्नेसची साधी झलकही त्यासाठी पुरेशी आहे.
लेक ऍग्नेस मध्ये डोकावून बघणारा "डेव्हील्स थम्ब" आपल्याला अंगठा उंचावून चिअर अप करतो का तळ्यात पडलेल्या प्रतिबिंबातून "थंब्स डाऊन" करतो हे पुढची चढाई सर केल्याशिवाय कळत नाही. पण त्याआधी जवळच असलेल्या बिग बी हाइव्ह डोंगरावरच्या गझीबो मध्ये टेकून जरा श्वास घ्यावा, ओणवे होऊन गर्द झाडीतला मिरर लेक न्याहाळावा आणि ताज्या दमाने डेव्हिल्स थम्ब कडे निघावे.
इथल्या पाऊलवाटेवरून दिसणारं दृश्य अफाट आहे. माउंट लेफ्रॉय तर कैलास-पर्वताची आठवण करून देतो. थोडा वेळ इथंच एखाद्या पाषाणावर बसून समोरचं विराटपर्व बघत बसावं. काही क्षण स्थल-कालाचं भान नाहीसं होतं.
नावाला साजेसा डेव्हील्स थम्ब चालायला थोडा भीतीदायकच. दोन-एक फुटांच्या खोल भेगा असलेला तो डोंगरमाथा काळजीपूर्वक ओलांडून कड्याच्या पार टोकावर पोहोचलो की एखाद्या जहाजाच्या सुकाणूवर उभे असल्याचा भास होतो. सुकाणूच्या डावीकडे गडद निळा लेक ऍग्नेस, उजवीकडे वेगळ्याच निळाईचा लेक लुईस आणि पलीकडे लांबच लांब पसरत जाणाऱ्या डोंगर-लाटा.
आजवर केवळ कल्पनातीत असलेले ते निसर्गवैभव पाहून तृप्त झालो आणि तुकारामांचा अभंग आठवला.
याजसाठी केला होता अट्टाहास । शेवटाचा दिस गोड व्हावा॥
आतां निश्चितीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया॥
इथून परत फिरताना पावलं जड झाली .... पण पायथ्याशी येईस्तोवर पोटऱ्या, गुडघे आणि मांड्या सगळंच जड झालं. अभंगातल्या शेवटच्या दोन ओळींचा आतापर्यंत विसर पडला होता. म्हणून परत त्याची उजळणी करायला एका छानश्या ब्रूवरी मध्ये तृष्णा भागवली आणि पुन्हा एकदा तृप्तीची नव्याने अनुभूती झाली.
दिवसभराच्या कामगिरीसाठी बक्षीस म्हणून संध्याकाळी बँफ ऍव्हेन्यू वरच्या ग्रिझली हाऊस मध्ये जेवायला गेलो. इतकं भटकूनही वाटेत नं दिसलेला कॅरिबू (एक दुर्मिळ हरीण) मेनू कार्ड मध्ये दिसला. तो किती दुर्मिळ आहे याची खात्री तो ताटात (खरं सांगायचं तर लहानश्या बशीत) समोर आल्यावर लगेचच पटली. ग्रिझली हाऊसचं मेनू कार्ड बसल्या बसल्याच जंगलात शिकार करायला घेऊन जातं. धाडसी असलात तर कॅरिबू, एल्क, बायसन, शहामृग, जंगली डुक्कर एवढंच नाही तर ऍलीगेटर आणि रॅटल स्नेक आदी प्राण्यांची शिकार करू शकता. घाबरट लोकांसाठी कोंबड्या आणि मासे अश्या सोप्या शिकारीची सोय आहे.
ताटातली जंगल-सफारी उरकली आणि सिक्स-पॅक घेऊन माझ्या हॉस्टेलवर परतलो (अर्धा डझन बिअर-कॅन्सला सिक्स पॅक म्हणतात. पोटाच्या सिक्स पॅकचा आणि माझा आजवर कधीही संबंध आला नाही. अनोळखी लोकांबरोबर सहजपणे मिक्स व्हायला मात्र बिअरचा हा सिक्स पॅक फार उपयुक्त आहे).
बॅकपॅकर्स हॉस्टेल म्हणजे एक मजेशीर अनुभव असतो. एका खोलीत चार ते सहा बंक बेड्स आणि त्यावर पूर्णपणे अनोळखी व्यक्ती. लहानपणी शाळेच्या एका सहलीला गेलो असताना शिडी लावलेले बंक बेड्स प्रथमच बघितले. शिडी चढून वरच्या बेड वर झोपताना तेव्हाही मजा वाटली आणि अजूनही वाटते. एकाच खोलीत किती तऱ्हेची लोकं भेटावीत? नुकताच कॉलेज संपवून फिरायला म्हणून बाहेर पडलेला क्युबेकचा उत्साही गॅब्रिएल, व्हॅन्कुव्हरचा पन्नाशी उलटलेला थोडासा चिडचिडा प्रोफेसर क्रेग, तिशीत असलेली चेक-रिपब्लिकहून तब्बल सहा महिन्यांच्या लांबलचक सफरीवर निघालेली चुणचुणीत मॅगी, बाईकवर स्वार होऊन अमेरिका-खंडाच्या स्वारी वर निघालेला चाळिशीतला स्वर्णेश. स्वभाव, वय,शैक्षणिक-व्यावसायिक पार्श्वभूमी असल्या अनावश्यक मर्यादा न राहता आपण फक्त "प्रवास" या एकाच गोष्टीने सहज कनेक्ट होतो.
रामदास सांगून गेलेत... ब्राम्हणू हिंडता बरा! त्यामुळे गात्रांना रात्रीची थोडी विश्रांती मिळाली की उजाडल्यावर शुचिर्भूत होऊन लगोलग बाहेर पडावे. फार लांब जायचे नसेल तर बो नदीच्या काठाकाठाने बो-फॉल पर्यंत फेरफटका मारावा, नाहीतर जवळच्याच पाणथळीवरच्या लाकडी केबिन मध्ये आरामात बसून थोडे पक्षी निरीक्षण करावे आणि परत बँफ ऍव्हेन्यू वर येऊन न्याहारी करावी.
कॅनेडिअन रॉकीज च्या एवढ्या मोठ्ठया पसाऱ्यात बघायचं काय आणि किती. नुसते बँफ नाही तर जॅस्पर, कूटनी आणि योहो ही अजून तीन राष्ट्रीय उद्याने आणि लहान मोठी तर कितीतरी. यात जॅस्पर हे तर बँफच्या दुप्पट विस्तार असलेले. एखाद्या उत्तम रेस्टोरेंट मधला सर्वच्या सर्व मेनू काही आपण एकाच भेटीत संपवू शकत नाही. तेव्हा आपल्याला एका वेळी जेवढं झेपेल तेवढंच मागवावं आणि चवी-चवीने खावं. त्यातल्या त्यात तिथली प्रसिद्ध डिश चाखावी. पण प्रत्येक वेळी प्रसिद्ध ते चांगलं असतंच असंही नाही. अशावेळी थोडा अभ्यास आणि स्थानिक लोकांशी संवादही आवश्यक असतो. इथली प्रसिद्ध ठिकाणं तर निःसंशय सुंदर होतीच पण थोड्या आडवाटेवरची लहानशी तळी, फारशी वर्दळ नसलेल्या पायवाटा वेगळाच आनंद देऊन गेल्या. थोडं अंतर राखून चालणारा पण तसा निर्धास्त एल्क, सतत पोटपूजेत मग्न असलेले आणि आपल्या उपस्थितीची फारशी दखल न घेणारे बिग-हॉर्न शिप्स, स्वतःच्याच तंद्रीत डुलत डुलत जाणारा पण आपल्याला मात्र धडकी भरवणारा आडदांड ग्रिझली हे सर्व याच आडवाटांवर भेटले.
कॉन्सोलशन लेकच्या काठाने एकटाच फिरत असतांना आस्थेने चौकशी करणारा छोटा मित्र
बँफहून कॅलगरीला जाणाऱ्या परतीच्या बस मध्ये बसलो. कधी-काळी असलेलं कुठलसं एक मनोरथ अचानक पूर्ण झालं आणि भूतकाळातही गेलं. सहज विचार आला, मी इथे परत येऊ शकेन (किंवा येईन) का ? प्रथमदर्शनी प्रेमाला- द्वितीय दर्शन उतारा असतो हे जर खरं असलं तर बँफ मला दुसऱ्या भेटीतही इतकेच आवडेल? पण याचं उत्तर हवं असलं तर परत यावंच लागेल.
... आणि नशिबानं मला तसं परत येता आलं. बँफ ओलांडून कॅनेडिअन रॉकीजच्या पार उत्तर टोकावर जॅस्पर मध्येही भटकता आलं. त्याची गोष्ट नंतर कधीतरी.
प्रतिक्रिया
30 Jun 2023 - 6:30 am | कर्नलतपस्वी
खरयं.
बो नदीच्या स्वच्छ सुदंर प्रवाहात सारखेच लेखन. फोटो मस्तच आहेत पण साईज प्रपोरशनेट असती तर आणखीनच सुदंर दिसले असते.
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
आवडले
30 Jun 2023 - 6:46 am | किल्लेदार
स्क्रीन horrizontal ठेवली तर नीट दिसतात. काय घोटाळा आहे कळत नाही.
30 Jun 2023 - 6:51 am | राजेंद्र मेहेंदळे
२ वेळा कॅलगेरीला पाय लावुन पुढे गेलो. पण हे बघायचे राहुन गेले आहे बघा. बकेट लिस्ट मध्ये बँफ आणि कॅलगेरी आहेच. लेख वाचुन आणि फोटो बघुन दुधाची तहान ताकावर भागवली सध्यापुरती.
सुंदर वर्णन केलय आणि सुरेख फोटो आलेत. निळ्याशार तळ्याकडे बघुनच निवांत वाटतेय. पण बँफ हे कॅनडातील सगळ्यात सुंदर गाव म्हणत असाल तर मला वाटते तुम्हाला अजुन एक्स्प्लोर करायला हवे. व्हँकुव्हर(व्हिसलर गाव आणि सी टू स्काय हायवे), व्हिक्टोरिआ बेट, आणि पुर्वेकडे माँट्रिअल, न्यु फाउंडलंड किवा लॅब्रेडोर अशी अनेक ठिकाणे ती सुद्धा प्रत्येक ऋतुमध्ये वेगवेगळी दिसतील. जास्त कशाला--आमच्या फ्लॅट लँड सास्काच्वेन मधली उन्हाळ्यातील गवताळ कुरणेसुद्धा सोनेरी उन्हात वेड लावतात.
30 Jun 2023 - 7:30 am | इपित्तर इतिहासकार
फारच सुंदर लेखन अन् प्रकाशचित्रे आहेत. सफर आवडली अन् त्यामागचे मनोगत तर अजूनच आवडले.
पु.ले. शु.
30 Jun 2023 - 7:45 am | Bhakti
मस्तच!
सुंदर ओघवत वर्णन आणि अप्रतिम फोटो.
30 Jun 2023 - 8:38 am | प्रचेतस
अहा, सुंदर फोटो, डोळे निवले.
30 Jun 2023 - 11:37 am | कंजूस
सुंदर गाव.
बहार.
30 Jun 2023 - 12:26 pm | सौंदाळा
भटकंतीचा उत्कृष्ट लेख.
डोंगर दर्या, तळी, कुरणे, इंद्रधनुष्य, प्राणी, खानपान आणि जोडीला सुरेख वर्णन मस्तच.
30 Jun 2023 - 5:26 pm | किल्लेदार
@ राजेंद्र मेहेंदळे - अजून सुंदर गावंही असतील कदाचित. गूगल वर बघितले तेव्हा व्हिसलर फारसे आवडले नाही. कधी योग आला तर प्रत्यक्ष बघावे लागेल. कॅनडातली इतरही गावं बघितलीत पण समुद्राकाठच्या गावापेक्षा डोंगरातलेच गाव मला जास्त भावले.
@ इपित्तर इतिहासकार,भक्ती, प्रचेतस, सौंदाळा - धन्यवाद.
30 Jun 2023 - 5:45 pm | मुक्त विहारि
लेखन आणि फोटो, दोन्ही आवडले...
30 Jun 2023 - 5:53 pm | मोदक
सुंदर लेखन आणि फोटोज..
30 Jun 2023 - 7:47 pm | अनन्त्_यात्री
पुढील लेखनाची प्रतिक्षा
30 Jun 2023 - 8:04 pm | कपिलमुनी
लिहित राहा
30 Jun 2023 - 8:23 pm | कॉमी
मस्त लेख आणि फोटो!
1 Jul 2023 - 7:05 pm | किल्लेदार
मुक्त विहारि, मोदक, अनन्त्_यात्री, कपिलमुनी, कॉमी - धन्यवाद
2 Jul 2023 - 11:01 am | टर्मीनेटर
निसर्गवैभव पाहून तृप्त झालो!
लेखन आणि फोटोज खुपच सुंदर 👍
2 Jul 2023 - 3:33 pm | निशाचर
सुंदर वर्णन आणि फोटोज!
फोटो टाकताना लांबी आणि रुंदी दोन्ही देण्याऐवजी एकच काहीतरी (शक्यतो width) द्यायला हवी होती. संपादन केल्यास उत्तम! शिवाय एवढे मस्त फोटो थोडे मोठे टाकल्यास अजून छान दिसतील.
2 Jul 2023 - 8:46 pm | किल्लेदार
टर्मीनेटर - फोटो डकवायच्या मार्गदर्शनासाठी आभार. आता व्यवस्थित दिसताहेत.
निशाचर - धन्यवाद. आता व्यवस्थित दिसताहेत.
3 Jul 2023 - 8:10 pm | राघव
आता नवीन काही शब्द शोधून काढावे लागतील कौतुक करण्यासाठी.. ते सुंदर, अप्रतीम, क्लास वगैरे सगळे अनेकदा वापरून झालेत आता..
बाकी, किल्लेदार साहेबांची तोफ (कल्पक फोटोग्राफी) ही एक निराळीच गोष्ट आहे!
ही तोफ धडाडली की मनावरची मरगळ निघून उल्हसित व्हायला होतं!
Rejuvenate ( मराठी?) करण्याची ताकद असणाऱ्या तोफेला त्रिवार नमन! _/\_
5 Jul 2023 - 8:01 pm | राजेंद्र मेहेंदळे
गुगल प्रमाणे "कायाकल्प" पण साध्या भाषेत तरतरीत किवा टवटवीत म्हणु शकतो
10 Jul 2023 - 9:52 pm | किल्लेदार
खरंय. Rejuvinate चा प्रतिशब्द सापडत नाहीये पण साध्या भाषेत
१. ताजेतवाने करणारी
२. टवटवी आणणारी
३. तरतरी आणणारी
हे शब्दप्रयोग बरोबर वाटतील.
4 Jul 2023 - 8:45 am | वामन देशमुख
फोटोज् आणि वर्णन अप्रतिम!
5 Jul 2023 - 4:29 pm | अथांग आकाश
अप्रतिम निसर्गसौन्दर्य! वर्णनही छानच!!
5 Jul 2023 - 5:16 pm | MipaPremiYogesh
अहाहा काय अप्रतिम फोटो आणि ओघवते लेखन , मजा आला तुमच्या बरोबर आमची पण ट्रिप झाली. अजून प्रवास वर्णने येऊ द्या..
8 Jul 2023 - 5:22 pm | श्रीगणेशा
छान फोटो आणि प्रवासवर्णन!
खरं आहे, असं कोषातून बाहेर पडलं की मग खरा "प्रवास" सुरू होतो!
8 Jul 2023 - 11:59 pm | Grishma B.
सुंदर वर्णन आणि सुंदर फोटो
9 Jul 2023 - 2:04 am | बाजीगर
कसला भन्नाट विचार करता हो किल्लेदार-जी !
आणि काय बहारदार लिहीता,फोटोज....फार भारी.
मी वाचून अतिप्रसन्न झालोय.
एका संवेदनशील मनावर उठलेले भावतरंग जशा कुणी हायटेक सेंसर ने टिपून आमच्याकडे आँखो देखा हाल पोचवल्यासारखे वाटले.
धन्यवाद.
10 Jul 2023 - 12:23 pm | गोरगावलेकर
वर्णनही ओघवते. खूप आवडले
10 Jul 2023 - 10:08 pm | किल्लेदार
राघव - तुम्हाला लेखामुळे ताजेतवाने वाटले यातच भरून पावलो आणखिन स्तुती कशाला.
वामन देशमुख, अथांग आकाश, MipaPremiYogesh, Grishma B., गोरगावलेकर - धन्यवाद.
श्रीगणेशा - खरंय.
बाजीगर - तुम्हाला आवडलं हे वाचून मीही प्रसन्न झालो :). वाटलं तसं लिहायचा शक्य तितका प्रयत्न करतो. मराठी लिहायचे-वाचायचे प्रसंग कमीच येतात त्यामुळे नेमके शब्द सापडणंही कठीण वाटतं.
11 Jul 2023 - 6:03 pm | चौथा कोनाडा
अ ति श य सुंदर !
क्या बात ! झकास भटकंती वर्णन आन अप्रतिम प्रचि !
हे प्रचि तर बेहद्द आवडले !
वाह, मजा आया !
14 Jul 2023 - 11:17 pm | किल्लेदार
:)
2 Apr 2024 - 3:02 pm | पाटीलभाऊ
अतिशय सुंदर फोटो आणि वर्णन तर अप्रतिम...!
15 Apr 2024 - 5:37 am | किल्लेदार
:)