बदामी १: चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास आणि बदामी लेणी
बदामी २: बदामी किल्ला, मंडप, धान्यकोठारे आणि शिवालये
बदामी ३: भूतनाथ, मल्लिकार्जुन मंदिरे, विष्णूगुडी आणि सिदलाफडीची प्रागैतिहासिक गुहाचित्रे
ऐहोळे १ - जैन लेणे आणि हुच्चयप्पा मठ
ऐहोळे २: त्र्यंबकेश्वर मंदिर, जैन मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर समूह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
दुर्ग मंदिर हे ऐहोळेतले सर्वात प्रसिद्ध मंदिर. ऐहोळेला येणारे जवळपास ९९% लोक केवळ फक्त याच मंदिरसमूहाला भेट देऊन निघून जातात आणि ऐहोळेतील इतर सर्वच मंदिरे दुर्लक्षित राहतात. अर्थात हे दुर्ग मंदिर संकुल आहे तितकेच प्रेक्षणीय यात काहीच शंका नाही. ऐहोळेतील सव्वाशे मंदिरांपैकी फक्त ह्याच मंदिरसंकुलात प्रवेशासाठी तिकिट आहे. माणशी २५ रुपयात हे संपूर्ण मंदिर संकुल आतमध्येच असणार्या पुरातत्त्व खात्याच्या संग्रहालयासकट बघता येते. हे संग्रहालय न चुकवण्याजोगेच. हे मंदिर संकुल ऐहोळेतील सर्वात मोठे. मुख्य दुर्ग मंदिर, सूर्यनारायण मंदिर, शिव मंदिर (लाडखान मंदिर), गौडरगुडी, चक्रगुडी, बडिगरगुडी आणि कुटिर अशी सात मंदिरे येथे आहेत, ती देखील भिन्न भिन्न शैलींत.
चला तर मग आता ह्या मंदिरसमूहाच्या सफरीला.
दुर्ग मंदिर
दुर्ग मंदिर हे सामान्यपणे दुर्गा मंदिर अर्थात दुर्गादेवीचे मंदिर असे चुकीचे ओळखले जाते. मूळात हे मंदिर सूर्य किंवा विष्णूचे आहे. गर्भगृहात आज मूर्ती नसल्याने नेमके सूर्याचे की विष्णूचे हे ठामपणे सांगता येत नाही मात्र एकंदरीत मंदिराच्या बाह्यभिंतीवर वैष्णव शिल्पे अधिक प्रमाणात आहे. मंदिराचे दुर्ग मंदिर हे नाव ह्या मंदिरसमूहाभोवती असणार्या दगडी तटबंदीवरुन पडले. जणू एखाद्या किल्ल्यात-दुर्गात हे मंदिर आहे. मात्र पुढे अपभ्रंश होऊन आज ते सर्वसामान्यपणे दुर्गा मंदिर म्हणूनच ओळखले जाते जे चुकीचे आहे.
ह्या मंदिराच्या प्रवेशद्वारात असलेल्या शिलालेखानुसार ह्याचे निर्माण विक्रमादित्य द्वितीय (इस. ७३३-७४४) कारकिर्दित कोमारसिंग नाम व्यक्तीने केले. हा विक्रमादित्य द्वितीय हा विजयादित्याचा मुलगा. हे मंदिर पहिले भारतातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक (साधारण पाचवे/सहावे शतक) मानले जात होते मात्र शिलालेखामुळे ह्याचा काळ आता सातव्या/आठव्या शतकातला मानला जातो. ह्या मंदिराची शैली एकदम आगळीवेगळी. ह्याचे साधर्म्य बौद्ध चैत्यगृहांशी आहे. गजपृष्ठाकार आकार असलेल्या ह्या मंदिराचे शिखर आज भग्न आहे मात्र त्याचे अवशिष्ट शिखर नागर शैलीत आहे. संसदभवनाचा आराखडा ह्याच मंदिरावरुन प्रेरीत होता असे म्हणतात. हे मंदिर पूर्वी प्राकाराने बंदिस्त असावे असे वाटते. आज मात्र फक्त प्रवेशद्वार शिल्लक राहिले असून बाजूचा कोट पूर्ण भग्न झालेला असावा. मंदिराच्या शिखराभोवती पूर्वी विटांचे बांधकाम होते असे संग्रहालयातील जुन्या छायाचित्रांवरुन समजते. आज मात्र ह्या विटा अस्तित्वात नसून फक्त शिखरभाग आहे. शिखरावरील आमलक हा मंदिराच्या बाजूलाच पडलेला आहे.
दुर्ग मंदिराचे प्रवेशद्वार
गजपृष्ठाकार दुर्ग मंदिर
दुर्गमंदिर समोरील बाजूने
गजपृष्ठाकर आकार असलेले हे मंदिर एका अधिष्ठानावर उभे असून अर्धमंडप, स्तंभयुक्त सभामंडप, त्यावरील विविध शिल्पे, अंतराळ,अर्धवर्तुळाकार गर्भगृह आणि सभामंडप व मंदिराचा बाह्यभाग ह्यांच्या मधल्या भागात असलेल्या प्रदक्षिणापथाने युक्त आहे.
मंदिराच्या द्वारस्तंभांवर विविध युगुलशिल्पे आहेत. त्यातीलच एक आहे तो अर्धनारीश्वर.
--
--
मी आधीच्या लेखांत म्हटल्याप्रमाणे ऐहोळेला आल्यावर छतावर नजर टाकायला अजिबात विसरु नये. दुर्ग मंदिरातही छतावर अद्भूत नक्षीकाम केले आहे. छतावर एक चक्र खुबीने कोरलेले आहे. चक्रातील आरे लक्षपूर्वक पाहिल्यास ते मत्स्य आकृतींनी बनल्याचे पाहण्यात येईल. बदामीच्या प्रथम क्रमांकाच्या गुहेतील ओसरीतील छतावरदेखील असे नक्षीकाम आहे.
चक्र
ह्याच्याच पुढे आदिशेषाची एक अतिशय देखणी मूर्ती आहे.
तर अंतराळाच्या प्रवेशद्वारावर दोन्ही हातांत नाग पकडलेल्या गरुडाची मूर्ती आहे. यावरुनच हे मंदिर विष्णूचे असावे असा तर्क सहज करता येतो.
द्वारावरील मूर्ती प्रेक्षणीय आहेत.
--
गर्भगृहात पीठासन असून आतमध्ये मूर्ती नाही. आता आपण गजपृष्ठाकर प्रदक्षिणामार्गातून फेरी मारण्यास सुरुवात करु. मंदिराचे सौंदर्य सामावले आहे ते ह्या मार्गावरील मूर्तींमध्ये. बदामी, ऐहोळे पट्टदकल येथील मंदिरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथील विविध आकार असलेल्या खिडक्या. त्याला दुर्गमंदिरही अपवाद नाही. प्रदक्षिणापथावर जागोजागी स्वस्तिकाकार,जाळीदार, चक्राकार अशा विविध प्रकारच्या खिडक्या आहेत.
--
--
प्रदक्षिणापथावर विविध देवतांच्या मूर्ती आहेत. सर्वात पहिली येते ती शिवाची.
अष्टभुज असलेल्या शिवाने हाती नाग, डमरु, अक्षमाला, फळ आदि धारण केले असून नंदीच्या मस्तकाचा त्याने आधार घेतला आहे. शिवाने येथे व्याघ्रचर्म परिधान केले असावे त्याच्या कमरेजवळच्या वाघाच्या मुखाच्या आकृतीने ते सहज स्पष्ट होते. एका शिवगणाने नंदीची शेपटी हातात धरली आहे.
ह्या नंतर येथे ते नृसिंहाची मूर्ती. बदामी परिसराचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथील उभ्या असणार्या केवल नृसिंहाच्या मूर्ती. येथे विदारण नृसिंह त्यामानाने अगदी कमीच दिसतात. कमरेवर हात ठेवलेल्या नरसिंहाने हातात शंख आणि चक्र धारण केले आहे. इतर दोन हात भग्न आहेत मात्र गदा आणि पद्म असावेत हे नक्की.
ह्यानंतर येते ती विष्णूची भव्य मूर्ती. शंख, चक्र धारण केलेल्या विष्णूच्या एका बाजूस लक्ष्मी आहे तर पुढ्यात सारथी गरुड आहे.
येथे काही देवकोष्ठांमधील मूर्ती गायब आहेत, त्या बहुधा भग्न झाल्या असाव्यात किंवा ब्रिटिशांनी परदेशी नेल्या असाव्यात, असेच मंदिराच्या गर्भगृहाच्या मागील वर्तुळाकार भागाच्या पुढे वराहमूर्ती आहे. हा विष्णूचा तिसरा अवतार. नरवराहाने हिरण्याक्ष्याने अपहरण केलेल्या पृथ्वीदेवीची सुटका केली असून तिला आपल्या मजबूत बाहूंच्या आधारावर तोललेली आहे. खालच्या बाजूस आदिशेषाची मूर्ती आहे.
ह्यानंतर येते ती महिषासुरमर्दिनीची देखणी मूर्ती. वाघावर आरुढ अष्टभुजा महिषासुरमर्दिनीने शंख, चक्र, घंटा, ढाल, खड्ग, पाश आदि आयुधे धारण केलेली असून हाताता त्रिशूळ पूर्णरूप असलेल्या महिषाच्या गळ्यात ती खूपसत आहे.
ह्यानंतर येते ती अष्टभुज हरिहराची मूर्ती. विष्णूचा मुकूट भरजरी आहे आणि शिवाचा जटायुक्त असून त्यावर अर्धचंद्र आहे. विष्णूच्या भागात लक्ष्मी असून शिवाच्या बाजूला शिवगण आहे. विष्णूच्या बाहूंवर दागिने असून शिवाच्या बाहूंवर रुद्राक्षमाला आहेत.
येथे आपली प्रदक्षिणापथावरुन प्रदक्षिणा पूर्ण होते. मंदिराभोवती बाहेरुन प्रदक्षिणा मारतानाही गर्भगृहाच्या एकदम पाठीमागच्या भागात एक युद्धपट जगतीवरील आयताकार दगडावर कोरलेला आहे. शिल्पपट विदिर्ण झाल्यामुळे आज तो नीट ओळखता येत नाही मात्र महाभारत किंवा रामायण यापैकी एक असावा किंवा देवासुर संग्रामाचा असावा असे दिसते.
विदिर्ण शिल्पपट
दुर्ग मंदिर बाहेरील बाजूने
ह्या दुर्गमंदिराच्या बाजूलाच आहे ते कुटिर मंदिर
कुटिर मंदिर
हे अगदी लहानसे उतरत्या छपरांचा आकार असलेले झोपडीसारखे दिसणारे मंदिर. व्हरांडा, मुखमंडप, सभामंडप आणि गाभारा अशी ह्याची रचना. ह्याच्या खांबांची शैली बदामीतील भूतनाथ मंदिरातल्या स्तंभांशी साधर्म्य असलेली. बाहेरुन जरी अगदी लहानसे दिसत असले तरी आतमध्ये शिरल्यावर ते प्रशस्त वाटते. ह्याचे शिखर आज पूर्णपणे भग्न झालेले आहे. ह्याच्या बाजूलाच एक देखणी पुष्करिणी आहे.
ह्याच्या बाजूलाच आहे सूर्यनारायण मंदिर
सूर्यनारायण मंदिर
अर्धमंडप, सभामंडप आणि गर्भगृह ह्यांनी साकार झालेल्या ह्या सूर्यनारायण मंदिराचे शिखर द्राविड आणि नागर अशा मिश्र शैलीत आहे. द्वारशाखांवर गंगा आणि यमुनेची शिल्पे कोरलेली आहेत जी येथील परिसरावर मंदिरांत बहुतांशी दिसतात. आठव्या शतकात निर्मिलेल्या ह्या मंदिरात सूर्यनारायणाची एक भव्य मूर्ती आहे. पूर्णपणे ग्रॅनाइटमध्ये कोरलेली ही मूर्ती मूळची ह्या मंदिरातली वाटत नाही, ती येथे आणून ठेवल्यासारखी दिसते. कदाचित ती दुर्गमंदिरातील प्रमुख मूर्ती असावी असेही वाटते.
सूर्यनारायण मंदिर
दोन्ही हातात कमळे धारण केलेल्या सूर्याच्या दोन्ही बाजूस उषा आणि निशा आहेत. पायापांशी सात अश्व कोरलेले आहेत आणि मध्ये सारथी अरुण दिसतो.
सूर्यनारायणाच्या मंदिराच्या बाजूलाच दुर्ग संकुलातील दुसरे प्रसिद्ध मंदिर आहेत ते लाडखान मंदिर
लाडखान मंदिर (शिव मंदिर)
इस्लामिक काळात येथे कुणीतरी मुसलमान सरदार राहिल्यामुळे ह्या मंदिराला लाडखान हे नाव पडले व तेच आज रूढ आहे, वास्तविक ह्याला शिवमंदिर म्हणूनच ओळखले जायला हवे. हे मंदिर प्रसिद्ध आहे ते ह्याच्या मंडप पद्धतीच्या शिखरशैलीसाठी. चौकोनी आकारातील स्तंभयुक्त सभामंडप आणि चौकोनी आकारतल्याच गर्भगृहाने युक्त असलेल्या ह्या मंदिरात शिवलिंग स्थापित आहे. काही संशोधकांच्या म्हणण्यानुसार येथील शिवलिंग नंतरचे असून येथे आधी कोणी दुसरी देवता असावी. मंदिराच्या चौकोनी शिखरभागाच्या भिंतींवर विष्णू, सूर्य आणि अर्धनारीश्वराच्या प्रतिमा आहेत. तर मंडपातील भिंतींवर गंगा, यमुना आणि युगुलशिल्पे आहेत. लाडखान मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील छपरावर असणारे दगडी ओंडके, तसे हे येथे सर्वत्र दिसतात पण येथे त्यांचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवते.
लाडखान मंदिर, एका बाजूस गंगा तर दुसर्या बाजूस यमुना आहे.
शिखरावरील विष्णूप्रतिमा
मंदिराच्या बाह्यभिंतीवर युगुलशिल्पे आहेत, त्यातील डावीकडील आहे ते रती मदनाचे, इक्षुदण्ड धारण केलेला मदन अगदी सहज ओळखू येतो.
मंदिराच्या भिंतीवर वेगवेगळ्या नक्षीची जालवातायने आहेत.
आतून त्यांचे सौंदर्य अधिकच खुलते
--
गर्भगृहातील शिवलिंग
लाडखान मंदिराच्या बाजूला आहे ते गौडर मंदिर
गौडर मंदिर
हे बहुधा ऐहोळेतील सर्वात जुने मंदिर. हेही मंडप शैलीतले. आयताकार सभामंडप आणि आतील चौकोनी गर्भगृह. ह्या मंदिराचे शिखर आज अस्तित्वात नाही मात्र लाडखान मंदिरासारखेच ते असावे असे ह्याच्या उर्वरित भागावरुन दिसते. ह्याच्या भिंतीवर असलेल्या शिलालेखावरुन हे मंदिर दुर्गा देवीचे असावे हे स्पष्ट होते. गौडर मंदिराला लागूनच एक भव्य पुष्करिणी आहे.
गौडर मंदिर
गौडर आणि लाडखान मंदिरे
ह्याच्या जवळच आहे ते चक्र मंदिर
चक्र मंदिर
रेखानागर शैलीतले हे मंदिर त्याच्या सुस्पष्ट नागर शैलीमुळे अगदी झटक्यात ओळखता येते. सभामंडप, रेखानागर पद्धतीचे शिखर आणि त्यावरील आमलक अशी ह्याची रचना. नवव्या शतकातले ह्या मंदिरावर फारसे अलंकरण नाही.
चक्र मंदिर
सभामंडप-चक्र मंदिर
ह्याच्याच बाजूला अगदी एका कोपर्यात आहे ते अगदी लहानसे बडिगेरा मंदिर
बडीगेरा मंदिर
फांसना पद्धतीचे शिखर असलेले हे ९ व्या शतकातले मंदिर सूर्यनारायणाचे असावे. मुखमंडप, सभामंडप अशी याची रचना. शिखराचा वरील भाग आज नष्ट झालेला आहे. छपरावर दगडी ओंडके आणि शिखराच्या भागावरील देवकोष्ठात सूर्याची मूर्ती आहे.
बडीगेरा मंदिर
येथे आपली दुर्ग संकुलातील सफर पूर्ण होते. ह्या संकुलातील प्रत्येक कोनांतून येथील मंदिरांचे नयनरम्य दर्शन होत असते त्याचीच काही प्रकाशचित्रे पाहूयात
ऐहोळेत आल्यावर हे दुर्ग संकुल तर सर्वजण पाहतातच मात्र येथील वस्तुसंग्रहालय पाहणे न चुकवण्याजोगे आहे. आतमध्ये चालुक्यकालीन मातृकांच्या अत्यंत भव्य प्रतिमा, आज त्यांची प्रचंड मस्तकेच येथे दिसतात, तसेच इतर कित्येक मूर्ती, मकरतोरणे, देवी देवता, शिखरशैलींच्या प्रकाराची ओळख, मंदिरांच्या जीर्णोद्धाराच्या आधीची छायाचित्रे तसेच येथील परिसराच्या नकाशाचे प्रारुप येथे आहे. दुर्ग मंदिर ते सांग्रहालय येथील आवारातही उघड्यावर येथे कित्येक मूर्ती ठेवलेल्या आहेत. त्यापैकी काही आपण येथे पाहू.
सप्तमातृका
ब्राह्मणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी आणि चामुंडा
--
वीरगळ
पुरुष पुरुष उंचीचे भले प्रचंड वीरगळ येथे आहेत.
----
गणेशाच्या विविध प्रतिमा
मकरावर बसलेला वरुण
हा प्रसंग नक्की कळत नाहीये, भृंगी, की शिवगण की भैरव?
खड्ग आणि ढाल हाती धारण केलेला वीरभद्र, डाव्या बाजूस खाली बकर्याचे मस्तक लावलेला प्रजापती दक्ष तर दुसरे बाजूस गणेश आहे.
येथे अगदी असंख्य मूर्ती आहेत मात्र विस्तारभयास्तव येथे अधिक छायाचित्रे न देता ह्या भागाची इथेच सांगता करतो. बदामी, ऐहोळे येथील यापूर्वीच्या भागातही मी आधी सांगितले तेच परत येथेही सांगतो. येथे मंदिरे पाहण्यासाठी टॉर्च अत्यंत आवश्यक. मोबाईलच्या फ्लॅशलाईटच्या इथल्या गडद, अंधार्या गर्भगृहांमध्ये उपयोग नाही. आधी सांगितल्याप्रमाणे ऐहोळेत जेवण्याची व्यवस्था शक्यतो होत नाही मात्र दुर्ग मंदिराच्या बाहेर नारळपाणी, फळे, तसेच इडली वगैरे देणारे काही स्टॉल्स आहेत. तेथे पोटभर जरी नाही तरी थोडेसे काही नक्कीच मिळू शकते. पायपिटीमुळे पाणी अवश्य जवळ ठेवावे. आता ह्यापुढील भागात आपण रावणफडी, हुच्चीमली मंदिर आणि मेगुती टेकडी पाहून ऐहोळेतून बाहेर पडूयात.
क्रमशः
प्रतिक्रिया
12 Jun 2023 - 10:00 pm | गवि
सुंदर.
केवल नृसिंह आणि विदारण नृसिंह म्हणजे काय? पोट फाडणारा का?
काही निरीक्षणे:
१. दगडांचे दोन रंग दिसतात
२. काही कोरीव काम अगदी फारच सुस्थितीत, टवकाही न उडालेले आणि काही अगदीच भग्न झिजलेले दिसते.
३. वीरगळावर आपल्या महाराष्ट्रातील वीरगळांपेक्षा खूपच जास्त तपशीलवार कोरीवकाम आहे.
13 Jun 2023 - 8:43 am | प्रचेतस
केवल नरसिंह म्हणजे नृसिंहाची एकल मूर्ती. तर विदारण नरसिंह म्हणजे नृसिंहाची हिरण्यकश्यपूचे पोट फाडतानाची मूर्ती. स्थौण नृसिंह म्हणजे खांबातून प्रकट झालेल्या नृसिंहाची मूर्ती यात हिरण्यकशयपूबरोबत युद्ध सुरु असताना दिसते, लक्ष्मी नृसिंह, योग नृसिंह असेही काही प्रकार आहेत.
इकडील दगडांचा पोत वेगळा आहे, लाल, गुलाबी, तांबूस, करडे, काळसर असे विविध रंग दिसतात. वालुकाश्म असल्याने कोरणे अतिशय सोपे जाते मात्र हा दगड ठिसूळ असल्याने बाह्य वातावरणामुळे ह्यांची झीजही लवकर होते त्यामुळे काही मूर्ती सुस्थितीत तर काही झिजलेल्या दिसतात. शिवाय इकडचे वीरगळ राजाश्रयाखाली कोरले गेलेत शिवाय वालुकाश्म असल्यामुळे त्यामुळे ह्यांवर लेख आणि निगुतीने केलेले कोरीवकाम आढळते तर महाराष्ट्रातील वीरगळ हे कठीण बसाल्ट दगडात कोरले गेले असल्यामुळे रेखीवता तुलनेने कमी प्रमाणात आढळते.
13 Jun 2023 - 8:48 am | गवि
_/\_
12 Jun 2023 - 11:01 pm | तुषार काळभोर
मागील लेखांत प्रतिसाद दिले होते , तसेच इथेही. प्रचंड सुंदर मंदिरे. नजरेला जाणवणारी स्वच्छता. आणि (ही गर्दी असणारी मंदिरे आहेत, तरीही) गर्दी जाऊद्या, शोधून शोधून दिसणारी अपवादात्मक माणसे. असे फोटो घेणे, खरंच विशेष कौशल्य आहे.
13 Jun 2023 - 9:10 pm | प्रचेतस
इथं खरं तर कायमच गर्दी असते, सतत बस भरून ट्रिपा येत असतात, शालेय विद्यार्थ्यांच्या तर सतत चालू होत्या, इतर लोकंही सतत येतंच होती, मात्र फोटो काढण्यासाठी पेशन्स ठेवला, गर्दी जरा हटली की काढले फोटो असे प्रकार केले, ऐहोळेत फक्त हेच मंदिर वगळता इतरत्र सर्वत्र निवांत असते.
12 Jun 2023 - 11:08 pm | कंजूस
ओळख फार आवडली. दुर्ग मंदीराचे जोते भक्कम उंचावर आहे. खांबही जाडजूड आहेत. जाळ्यात अजूनही सुस्थितीत आहेत हे पाहून बरं वाटतं. कारण सातव्या शतकातली कला आहे.
महिषासुरमर्दिनीची देखणी मूर्ती- बदामीच्या बऱ्याच हॉटेलात याचे फोटो आहेत.
यांच्याशी मूर्ती बोलतात.
13 Jun 2023 - 7:01 am | Bhakti
एकाहून एक सरस मंदिर आणि मूर्ती!
एकाच भागात वेगवेगळ्या शैलीचे मंदिर वेगवेगळ्या कालखंडात (? बरोबर ना) बांधल्यामुळे वैविध्य, समरसता वाढत गेली आहे.
-टाईममशीन पाहिजे होती त्या काळात फिरून आले असते :)
13 Jun 2023 - 9:12 pm | प्रचेतस
हो, काही वेळा भिन्न कालखंडात तर काही वेळा एकाच कालखंडात ह्या भिन्न भिन्न शैलींची मंदिरे उभारली गेली.
13 Jun 2023 - 10:17 am | कर्नलतपस्वी
नवीन माहीती. सर्व फोटो मधे एकही पर्यटक दिसत नाही कसे काय?
अर्थात त्यामुळेच मंदिराचे सौंदर्य निट बघावयास मिळत आहे.
13 Jun 2023 - 6:28 pm | कंजूस
बऱ्याच आयोजित सहली असतात. फक्त दुर्गमंदिर पाहा आणि परत या अर्ध्या तासात असं गाईड सांगतो. म्हणजे सगळीकडे असंच असतं.
अगोदरच नाश्ता करून आलेले पर्यटक त्यामुळे इकडे फक्त पेरू,शहाळी मिळतात.
13 Jun 2023 - 9:13 pm | प्रचेतस
सहली भरभरून चालू असतात पण लोकं नुसते मंदिर पाहिल्यासारखे करून पटापट पुढे सरकत असतात.
13 Jun 2023 - 11:00 am | राजेंद्र मेहेंदळे
या लेखाची बरेच दिवस वाट बघत होतो.
वल्लींचे लेख म्हणजे डोळ्यांना मेजवानीच-- आणि माहितीचा खजिना. वाचायलाही मजकूर भरपुर त्यामुळे मजा आली. असेच फिरते आणि लिहीते रहा आणि आमच्या ज्ञानात भर टाकत रहा.
13 Jun 2023 - 5:31 pm | गोरगावलेकर
मंदिर संकुलाचे माहितीपूर्ण वर्णन आवडले. फोटो भारीच.
13 Jun 2023 - 8:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखन नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण आहे, त्यातली छायाचित्रेही सुंदरच आली आहेत. पुलेशु.
-दिलीप बिरुटे
14 Jun 2023 - 6:23 am | चित्रगुप्त
अप्रतीम छायाचित्रे आणि माहिती. साष्टांग दंडवत वल्लीभौ.
14 Jun 2023 - 3:04 pm | टर्मीनेटर
सुं द र . . . 👍
वेगवेगळ्या शैलीतील मंदीरे, देखण्या मुर्त्या, नक्षीदार जाळ्या, मंदीर संकुलाचे फोटो, माहिती सगळंच अप्रतिम!
10 Jul 2023 - 12:30 pm | सौंदाळा
हा भाग बघायचा आणि वाचायचा राहूनच गेला होता. सुंदर फोटो.
खिडक्यांवरची नक्षी भारीच आणि गर्भगृहाचा पाठीमागून काढलेला फोटो पण सुंदर.