माझे बँकेतील नोकरीसाठी गेल्या काही वर्षांपासून मुंबई मध्ये वास्तव्य आहे. घर सोडून मुंबई मध्ये येताना मला काही वाटले नव्हते. उलट मुंबईमध्ये जाणार या गोष्टीचे एक एक्साइटमेंट होते. बॅग उचलली आणि निघालो. मुंबई घरापासून किती पान दूर असली तरी आपली आहे असे काहीसे वाटत होते. ते खरे ही झाले. इतक्या वर्षांत एकदापण मुंबई ने परके वाटू दिले नाही.
परंतु जसे बुद्धाने बदल हाच कायम असतो असे काहीसे म्हटले आहे त्यानुसार माझी दिल्लीला बदली झाली. विनंती, रडारड, वगैरे सगळे करून पण जेव्हा दुसरीकडे बदली होणार नाही हे माहीत झाले आहे तेव्हापासून मी मग गिळून जायच्या तयारीला लागलो आहे. निदान ५-६ वर्षे तरी राहायचा योग दिसतोय. दिल्ली बद्दल धाकधूक वाटायचे कारण खूपदा वाईट गोष्टींसाठीच दिल्लीचे नाव बातम्यांमध्ये जास्त येते.
आता जाणे ठरलेच आहे तर आता थोडी माहिती मिळाली तर बरी या विचाराने हा लेख प्रपंच. ही जिलबी प्रश्नोत्तरी मध्ये मला Access Denied दाखवत असल्याने काथ्याकूट मध्ये टाकत आहे. कृपया संपादक महोदयांनी धागा योग्य ठिकाणी हलवावा ही विनंती.
दिल्ली नाव घेतल्यावर मला लोकांनी दिल्लीबद्दल चांगल्या वाईट गोष्टी सांगितल्या. हिमालयापासून जवळ/ उत्तम खाद्यसंस्कृती/ फिरायला जास्त जागा/ फुकट वीज इत्यादि चांगल्या गोष्टी झाल्यावर खालील गोष्टी लोकांनी माझ्या डोक्यात टाकल्या.
१. उन्हाळ्यातली धुळीची वादळे
२. हिवाळ्यातली कडक थंडी
३. प्रदूषण
४. वाईट लोक (?)
विदर्भातला असल्याने कडक उन्हाळा आणि मुंबईमध्ये राहून असल्याने घाम आणि उकाडा पाहून झाले आहे. दिल्लीमध्ये याहून वाईट काही असेल असे वाटत नाही. परंतु कडक हिवाळा कधीच बघितला नाही, कधी बर्फ पण बघितले नाही, म्हणून दिल्लीतला हिवाळा + पंजाब, हरियाणा मधून येणारे हिवाळी प्रदूषण किती सहन होईल आणि त्यापासून कसा बचाव करावा हे काही माहीत नाही. तसेच मुंबई मध्ये कामाशी काम ठेवणाऱ्या आणि नम्र लोकांची सवय असल्याने दिल्ली किंवा उत्तर भारतातल्या भांडकुदळ अशी प्रसिद्धी झालेल्या लोकांशी कसे डिल करावे याचा मला मुळीच अंदाज नाही.
दिल्लीस जाऊन आलेल्या अथवा दिल्ली मध्ये वास्तव्य असलेल्या मिपाकरांनी कृपया यावर मला मार्गदर्शन केले तर फार मदत होईल.
प्रतिक्रिया
12 Jun 2023 - 7:22 pm | गवि
प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक.
दिल्लीस कामानिमित्त किंवा फिरण्यासाठी ज्या वाऱ्या झाल्या त्यानुसार दिल्ली खूपच आवडली होती.
चांगले काय वाटले?: रुंद रस्ते, हिवाळ्यात तरी का होईना अति थंड हवा. खाणे पिणे रेलचेल. पटकन हिमालयातील पर्यटनाच्या ठिकाणी पोचण्याची सोय. तऱ्हेवाईक असले तरी दिलदार लोक. त्यांचे आपल्या वाहतूक यंत्रणा उर्फ मेट्रोवरील प्रेम.
काय वाईट(मुख्यत: ऐकण्यात, वाचण्यात आलेले). स्त्रियांसाठी असुरक्षित, भांडकुदळ पब्लिक आणि थोडका वाद विकोपाला जाणे. प्रदूषण. जनरल मद्यपान अतिरेक. उद्दाम attitude (विशेषत: तिकडून येणाऱ्या टुरिस्ट बद्दल अन्य राज्यातले लोक)
प्रत्यक्ष बघितलेले: ट्रॅफिक मध्ये अत्यंत बेशिस्त, सिग्नल , लेन अशी बेसिक शिस्तदेखील न पाळणे आणि त्यात कोणालाही काडीचेही वावगे न वाटणे.
बाकी प्रत्यक्ष तिथे राहिलेले लोक, उदा चित्रगुप्त, इरसाल आणि इतर कोणी हे अधिक ग्राउंड रिॲलिटी सांगू शकतील.
12 Jun 2023 - 8:36 pm | कर्नलतपस्वी
दिल्ली दिलवालोंकी है...
प्रत्येक जागेची एक विशेषता असते. खुप चांगल्या व काही वाईट गोष्टी असतात. बरेचसे स्वतःवर आवलंबून असते.
चांगल्या गोष्टी
बडा शहर,बडे लोग,बडी बडी बाते.
सुखसोई भरपुर.
मेट्रो मुळे प्रवास सुखकर.
इतर राज्ये,शहरे हवा,जमीन व लोहमार्गाने जोडले असल्यामुळे सुट्टीवर येणे जाणे खुप सोईस्कर.
ऐतिहासिक, राजकीय शहर आसल्याने देशातील सर्व ठिकाणचे लोक रहातात.
पाच महाराष्ट्र मंडळे आहेत. सर्व ठिकाणी तात्पुरती, राहाण्याची सोय आहे.
नवी दिल्ली रे स्टे समोर पहाडगंज येथे मोठे महाराष्ट्र मंडळ आहे.
छोट्या अंतरावर जाण्यासाठी दुचाकी ठिक पण दुर जाण्यासाठी चारचाकी अथवा पब्लिक ट्रान्सपोर्ट .
खाण्यापिण्याची चंगळ आहे,विकांतासाठी मनोरंजनाची साधने भरपूर.महागाई इतर शहरांसारखीच थोडी कमी थोडी जास्त. मुंबईच्या इतकी धावपळ नाही. आरामशीर आहे. हवामान एकदम विषम पण त्याचीही आपली एक खासियत आहे. लिहीत बसलो तर खुप मोठा प्रतिसाद होईल.
असे बरेच लिहीता येईल पण दिल्ली मधे पाच वर्ष वास्तव्य आणी बरेचवेळा येऊन जाऊन असल्याने चांगले शहर वाटले.
सावधानी तर सगळी कडेच बाळगावी लागते. अपराधी व क्राईम रेट जरी असला तरी शक्यतो त्याच्या पाठीमागे काही कारणे असतात.
थोडक्यात थोडे चिमणराव,थोडे गुंड्याभाऊ सारखे राहीलात तर दिल्ली तुम्हालाही चांगली वाटेल.
नातेवाईक नाहीत म्हणून सहकर्मीच नातेवाईक. चांगले संबध असतील दिवस मजेत जातील.जाण्यापूर्वी त्यांच्याकडून सुद्धा माहीती घ्या. शक्यतो कामाच्या जागे जवळच घर घ्यावे. भाषा खडीबोली पण माणसे स्वभावाने चांगली वाईट दोन्ही प्रकारची. माणसे ओळखून वागा.
12 Jun 2023 - 8:44 pm | कर्नलतपस्वी
आणी पुरानी दिल्ली मधे फरक आहे. खुप जास्त टेन्शन नका घेऊ. नोकरीत बदली होणे म्हणजे नववधू सारखे किवां पहिलटकरणी सारखे.
बुजुर्ग म्हणून धीर देतोय. सगळं काही ठिक होईल.
12 Jun 2023 - 10:07 pm | धर्मराजमुटके
दिल्ली !!
विमानातून दिल्लीच्या विमानतळावर उतरलो आणि बाहेर पडलो की पहिल्या नजरेत जाणवते ती दिल्लीची घाणेरडी आणि धुराने भरलेली हवा. प्रदुषणाच्या सगळ्या नियमांची ऐशी की तैशी करुन टाकल्यामुळे दिल्लीचे हवामान येत्या १०० वर्षात तरी सुधरणार नाही.
दुसरया नजरेत जाणवतो तो गचाळपणा. पण हा केवळ दिल्लीचा गुण नव्हे, जसजसे उत्तरेकडे जावे तसतसा गचाळपणा वाढत जातो.
बोलण्याचालण्यात कमालीची (खोटी) आदब !
स्वतःला हम म्हणणे / दुसर्याला आप म्हणणे/ जी, जी, रं जी जी, हांजी हांजी सरजी / मुझे आपका बडा भाई, छोटा भाई समझो / कोई नही सरजी इ.इ. वाक्यप्रचारांचा मुक्त वापर . औकात वर आल्यावर भकार, मकार युक्त शिव्यांचा मुक्त संचार (आई / बहिणीवरुन दिलेल्या शिव्या नाहि म्हटले तरी आपल्या कानावरुन गेलेल्या असतात. मात्र इथे कन्यारत्नांचा ही वापर शिव्या देण्यासाठी केला जातो. अधिक माहितीसाठी उत्तर भारतातील कोणत्याही शहरावर आधारलेली वेब सिरीज पाहावी.)
अनेक प्रकारचे पराठे, छोले भटूरे म्हणजे दिल्ली. (नॉन भेज चा माझा अभ्यास नसल्यामुळे पास)
स्वस्त इंधनाची नगरी म्हणजे दिल्ली .
हवामान थंड असो की गरम, कोट घालणार्या लोकांचे शहर म्हणजे दिल्ली . इथे चपराशी कोण आणि साहेब कोण हे लवकर ओळखता येत नाही. मग मी मुंबईत आजमावतो तीच युक्ती तिथे आजमावतो. ज्याचा मोबाईल जास्त भारी, कपडे झकपक तो शक्यतो ऑफीसचा चपरासी असतो. (इथे मुंंबईत मला कोणी कोट घालून दिसला की मी त्याला हटकून 'आप दिल्ली से आये हो क्या ?' असे विचारतो :)
उडदामाजी चांगले वाईट असतात तशीच चांगली वाईट माणसे दिल्लीतही आढळतात. त्यामुळे घाबरण्याचे काम नाही. इथले लोक बोलता बोलता शिव्या घालतात आणि पुढच्या वेळेस गळ्यात गळे घालतात. आपल्याला मराठी बाण्यामुळे थूंकून चाटायची सवय नसते त्यामुळे थोडे दिवस त्रास होतो पण नंतर आपोआप अंगवळणी पडते.
आपल्याला तेथील वास्तव्यासाठी शुभेच्छा !
अवांतर : तुम्ही सरकारी बँकेत कामाला असाल तर आतापर्यंत तुमची कातडी गेंड्यासारखी झालेली असायला हवी. त्यामुळे तुमच्यावर दिल्लीचा परिणाम होणार नाही.
( डिस्क्लेमर : हा विनोद आहे. रागावू नये)
13 Jun 2023 - 12:31 am | साहना
प्रदूषण हलके में घेऊ नका. मुंबईत सुद्धा तुम्हाला प्रदूषण सहन करण्याचा अनुभव असला तरी दिल्लीची गोष्ट वेगळी आहे. राहण्याच्या ठिकाणी आणि ऑफिस मध्ये एअर प्युरिफायर असणे आवश्यक आहे.
13 Jun 2023 - 3:27 am | चित्रगुप्त
मी १९७७ ते २०२२ दिल्लीत वास्तव्य केले (वय वर्षे २६-७१) परंतु एवढ्या दीर्घ काळात दिल्लीविषयी आत्मीयता कधीच निर्माण झाली नाही. सुरुवातीच्या काळात नवी दिल्ली छान वाटायची, सायकलने खूप भटकंती करायचो. पैशांची चणचण असली तरी उत्साह, जोम (आणि आशा-) खूप असल्याने तिथल्या न आवडणार्या गोष्टी सुद्धा पचवता आल्या. पुढे उत्तरोत्तर दिल्लीतली वाहने, गर्दी आणि प्रदूषण वाढू लागले तसतसे नकोसे वाटू लागले, शेवटी २०२२ मधे दिल्ली सोडून इंदौरला (मूळगावी) स्थानांतरित झालो.
काही बाबतीत मराठी लोकांपेक्षाही पंजाबी, जाट हे चांगले असतात असाही अनुभव आहे. उदाहरणार्थ काही वर्षांपूर्वी माझ्या एका मराठी मित्राच्या नात्यातील दोन वृद्ध बहिणींचा त्यांच्या रहात्या घरात दिवसाढवळ्या खून झाला. फक्त मराठी (शंभर) कुटुंबे रहात असलेल्या 'आनंदवन' सोसायटीत त्या रहात होत्या. बातमी कळल्यावर माझा मित्र पहुचला. शववाहिनीत मृतदेह ठेवायला मदतीसाठी एकही मराठी व्यक्ती आली नाही. सगळे आपापल्या बंद घरातून पडद्याआडून बघत होते. हेच एकाद्या मिश्र सोसायटीत घडले असते तर पंजाबी-जाट मदतीला आले असते.
'मिडीया'त बहुतांशी अभद्र घटनाच दाखवत असले तरी कुठलेही बहुतांश लोक सज्जन असतात असा अनुभव आहे. दिल्लीतील अमराठी शेजारी-पाजारी, दुकानदार वगैरेंशी लोकांशी अवश्य चांगले संबंध ठेवावेत असे सुचवतो. आपली वागणूक नम्र, बोलणे गोड, हसतमुख आणि मदतीला तत्पर राहिले तर तिथे रहाणे सुगम होईल.
आपले मिपाकर विवेक पटाईत हे अगदी खास दिल्लीकर असून जन्मापासून त्यांचे दिल्लीतच वास्तव्य आहे. त्यांना विनंती की त्यांनी गेल्या सहा-सात दशकात दिल्लीत जे बदल घडत गेले, त्यावर प्रदीर्घ लिखाण करावे.
18 Jun 2023 - 5:54 pm | विवेकपटाईत
मी हिंदीत पुरानी दिल्ली की यादे नवभारत रीडर ब्लॉग मध्ये १४ भाग लिहले आहे. मराठी आणि वाद लवकरच लिहणार.
13 Jun 2023 - 3:45 am | चित्रगुप्त
माझ्या वरील प्रतिसादात मी लिहीले आहे : "आपली वागणूक नम्र, बोलणे गोड, हसतमुख आणि मदतीला तत्पर राहिले तर तिथे रहाणे सुगम होईल".
-- हे माझे इतक्या वर्षांच्या अनुभवातून शेवटी आलेले शहाणपण आहे. सुरुवातीच्या काळात तरूणपणाचा कैफ, रग, जिथे-तिथे कायदेशीरपणाचा आग्रह, आपल्याला फार समजते, आपण कधीच चुकत नाही वगैरे 'मराठी बाण्या'पायी स्वतःच्याच चुकांमुळे त्रासही भोगावा लागला आहे. त्यामुळे नव्याने रहायला जाणाराने 'सावधपण सर्वविषयी' ठेवावे, हे उत्तम. बाकी गोष्टींची होईल सवय हळुहळू.
17 Jun 2023 - 7:34 am | शशिकांत ओक
रुळाल हळूहळू,
बहुतेक सर्व उपनगरात मराठी समाज हजारात आहे. शिवाय बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वतीने दसऱ्याच्या आधी नाटकांच्या स्पर्धा आयोजित असतात. तिथे आवडीनुसार जावे.
17 Jun 2023 - 4:18 pm | चित्रगुप्त
बृहन्महाराष्ट्र नाट्य-स्पर्धा बंद झाल्यात बहुतेक. आठ-दहा वर्षांपूर्वी बघायला गेलो होतो तेंव्हा अगदी कमी प्रेक्षक होते, तेही सगळे म्हातारे. आयोजकही सगळे वृद्ध झालेले. ट्रॅफिक, गर्दी वगैरेमुळे या सगळ्या मंडळींना आता स्वतंत्रपणे मंडळापर्यंत पहुचणेही शक्य राहिलेले नाही. दिल्लीतील बहुतांश मराठी तरुणांना मराठी बोलताही येत नाही, ते काय नाटके बघणार. सगळी वाताहात झालेली दिसली. (अगदी आजची परिस्थिती माहीत नाही).
13 Jun 2023 - 7:08 am | कर्नलतपस्वी
हे बघा तुम्ही काही दिल्लीत स्वखुशीने, सेटल होण्यास जात नाही.तुमचे पोट तुम्हाला घेऊन चालले आहे.तेव्हा ,जैसा देश वैसा भेस अन उरफाटं लुगडं नेस.
लोकसंख्येत वाढ झाली की बकालपणा येतोच.पुणेकर, लहानपणी मंगळवारपेठ ते स्वारगेट शाळेत पायी जायचो.आज काय परिस्थीती आहे ते सांगायला नको.
नऊशे अधुनिक झोपड्यांच्या वस्तीत रहातो.परवाच एक वृद्ध यमसदनाला गेले. तीन हजार लोकातील तीस सुद्धा हजर नव्हते.भावनांक(eq) खुप खाली गेलाय तेव्हा असेच घडणार.
प्रदुषण, विषम हवामान ट्रॅफिक, टेंपरामेंट, टाॅलरन्स याचा अनुभव कमीजास्त प्रमाणात सर्वच ठिकाणी येतो.
माणूस हा परिस्थीतीनुसार स्वताला वातावरणाशी एडजेस्ट करतो,पर्याय नसतो. एकदा जुळले की मग तेच चांगले वाटते.
जायचे नसेल व पर्याय असेल तर टाळा.पर्याय नसेल तर जावेच लागेल तर खुशीत जा रहाणे असह्य होणार नाही. सर्व ठिकाणी रेड कार्पेट मिळत नाही एवढेच लक्षात घ्या.
हेल्मेट ची जाहीरात आठवा,आखिर सर है तुम्हारा.
मुबंईत मोठ्या हाॅस्पीटल मधे मोठ्या पदावर ,सर्व सुखसोईनी उपलब्ध नोकरी मिळाली. मुबंई आवडत नाही,पर्याय होता नोकरी नाकारली. लोकांनीच काय घरातल्यांनी वेड्यात काढले. ऐकावे जनाचे करावे मनाचे.
कळमोडी ते कॅलिफोर्निया अशी यशस्वी भरारी मारलेला रघुनाथराव
13 Jun 2023 - 8:45 am | आनन्दा
विवेक पटाईत काकांशी संपर्क करावा.
ते दिल्लीत स्थायिक असतात माझ्यामते.
13 Jun 2023 - 12:29 pm | राजेंद्र मेहेंदळे
पण कामानिमित्ताने दिल्लीत जाणे-येणे खुप झाले(गुरगाव्/नॉयडा).
उधारीची अदब सरजी/हांजी वगैरे असतेच. अरेरावी/ट्रॅफिकचे नियम तोडणे/दबंगगिरी,तुझे पता नही मै कौन हुं, फुकटचे गोडबोलेपणही आहेच. ऋण काढुन सण करण्याची वृत्तीपण आहे. पण त्याच बरोबर दिल दरीया प्रवृतीची माणसेही खुप भेटतात. दिल्लीवाले पुण्यात आल्यावर मी त्यांच्यासाठी वीकेंड खर्च करुन पुणे दर्शन कधी केले नाही. पण मी तिकडे गेल्यावर स्वतःहुन "चल वीकेंडला फिरायला जाउ" म्हणणारे भेटले. त्यामुळे कधी हरिद्वार, निमराणा फोर्ट, तर कधी दिल्ली दर्शन(चांदणी चौक वगैरे) झाले.
रात्री अपरात्री एकटे/दुकटे न फिरणे, खिसा,पाकीट सांभाळणे , स्वतःची अनावश्यक माहीती न देणे हे तर आता सगळी कडेच करावे लागते. ओला/उबेर्/स्विगी/झोमॅटो/बिग बास्केट/अमेझॉन्/अर्बन कंपनी हे सगळीकडे सारखेच बिन चेहर्याचे असतात, त्यामुळे वेगळे सांगत नाही. मोठ्या संकुलात राहिलात तर शेजारी पाजारी हा विषयच येणार नाही. छोट्या वस्तीत राहिलात तर शेजारी/पाजारी संपर्क ठेवा.
13 Jun 2023 - 12:51 pm | विअर्ड विक्स
दिल्ली दिलवालोंकी कि ठगोंकी ?
२०१६ साली मी सुद्धा या अवस्थेतून गेलो आहे( ३ वर्षे राहिलोय दिल्लीत ). दिल्ली म्हटले कि, असुरक्षिततेची भावना पहिली डोक्यात येते. परंतु शक्ती मिल प्रकरण किंवा ताजी घटना मीरा भाईंदर ची या सगळ्या घटना मुंबईत सुद्धा घडलेल्या आहेत. त्यामुळे जेव्हा माझा स्थलांतरणाचा प्रसंग आला , तेव्हा मी या सगळ्या नकारात्मक भावना बाजूला ठेऊन एक नव्या शहरात राहायला मिळणार म्हणून उत्सुक होतो. (तसाही प्रकल्प अभियंता असल्याने भारत भ्रमंती भरपूर केलेली आहे त्यामुळे प्रवासाचा थकवा नि जेवणाचे चोचले हे प्रकार मला माहित नव्हते.)
दिल्लीत गेलात कि पहिली गोष्ट लागेल ती म्हणजे
१. ऋतुमानाप्रमाणे कपडे - स्त्री असो वा पुरुष ऐटीत राहण्याला महत्व आहे. साधी राहणी उच्च विचारसरणी असल्या मराठमोळ्या कल्पनाविश्वात ते राहत नाहीत. आलेला दिवस मजेत घालवायचा (नि रात्र पिऊन घालवायची थंडी असल्यामुळे चालून जातंय ).
२. दिल्ली हे मुंबईसारखे शहर नाही जिथे काम से काम मतलब असणारे लोक मिळतील. कोणतेही काम असेल तरी आधी पाच-दहा मिनिटे शिळोप्याच्या गप्पा मारून मग मुद्द्याला हात घालणे. ( सरकारी वा बिनसरकारी सगळीकडे हाच मामला , नोकरशाही सगलीकडे रुजलेली आहे)
३. ९ वा ८ तास इतक्यापुरताच मी कंपनीचा नोकर आहे , बाकी तास माझे हि तीव्र भावना !
४. दिल्लीला स्वतःचे असे कल्चर नाही , सगळीकडून विविध राज्यांनी वेढलेली आहे त्यामुळे सगळेच उपरे आहेत त्यामुळे हि जाणीव ठेवून बोलणे . गुजर , पंजाबी, जाट , उत्तर प्रदेशीय ,बिहारी सर्व प्रकारचे लोक आप आपला आब राखून आहेत त्यामुळे प्रत्येकाचा dilect वेगळा आहे हे सगळॆ पहा नि आत्मसात करा.
५. मेट्रो नेटवर्क उत्तम आहे. कार्यालयाजवळ नि घराजवळ मेट्रो स्टेशन असेल तर उत्तम. अन्यथा स्वतःची गाडी बाळगा. ओला उबेर आहेत पण आपल्याकडे कोणती गाडी आहे हा तिकडचा मोठा स्टेटस सिम्बॉल आहे.
६. नोएडा नि गुरगाव वाळीत टाकलेले एरिया नाहीत . कार्यालयाजवळचा पॉश लोकॅलिटी हुडका . पेइंग गेस्ट सोय आरामात होते , कुटुंब घेऊन शिफ्ट होणार असाल तर गेटेड कॉम्म्युनीटी पहा. फिरतीची जॉब असेल तर शक्यतो दक्षिण दिल्लीत राहा . दिल्ली अवाढव्य आहे , कार्यालय पत्ता माहित असता तर लोकेशन सांगितले असते . तरी गुरगाव सायबर सिटीच्या आसपास ऑफीस असेल तर DLF फेस ३ (महाग आहे पण मस्त आहे, बजेट नसेल तर फेस १ नि २). ऑफिस दक्षिण दिल्लीत असेल तर चांदीच चांदी ( कालकाजी , लजपत नगर ( मेट्रो स्टेशन लजपत नगर ३ जवळ आहे मी तेथेच राहायचो ). नि अजून स्वस्त हवे असेल तर तर गेला बाजार फरिदाबाद नि नोएडा लाईनची एकदम लास्ट मेट्रो स्टेशन पकडा
७. इथे ac उन्हाळ्यापुरता भाड्याने मिळतो , त्यामुळे ac रूम ची गरज नाही नि तुम्ही भाड्याने घेऊ शकता . गुरगाव तर start - up ची सिटी आहे मिळेल ती गोष्ट भाड्याने मिळते . explore करा
८. कडी चावल, राजमा चावल , पराठे (अंडा पराठा तर बेस्ट ) असे अनेक नवे स्ट्रीट फूड चाखायला मिळतील. मजा करो
९. पर्वत भ्रमंतीची आवड असल्यास उत्तराखंड , हिमाचल सर्व वन नाईट जर्नी आहे.
१०. यमुना एक्सप्रेस हायवेचा अनुभव घ्या . मथुरा आग्रा आता एकदम जवळ आहे .
११. कार्यालयीन कामानिमित्त मी पूर्ण उत्तरप्रदेश फिरलेलो आहे. त्यामुळे भय काय असते याची जाणीव आहे पण योगी आल्यापासून स्थितीत भरपूर सुधारणा आहे.
१२. मेरठ , मुज्जफर नगर करत सरळ हरिद्वार गाठा , पापक्षालनाकरता ! दिल्लीत राहिल्यावर भरपूर होतील :)
बाकी शुभेच्छा दिल्ली वास्तव्यासाठी !!!
13 Jun 2023 - 2:42 pm | कर्नलतपस्वी
भेटू शकतात.
स्थळ पुणे स्टेशन
वर्ष मे १९७५
लखनऊ वरून पुण्याला आलो होतो. बरोबर सामान होते. शिवाजीनगरला जायचे होते. सामान जास्त असल्याने टांगा,रिक्षा शोधत होतो. एक माणूस आला विचारपूस केली.चला म्हणाला डोक्यावर सामान ठेवले तो पुढे मी मागे. वाटले रिक्षा स्टॅन्ड वर गाडी असेल पण महाशय सरळ शिवाजीनगरच्या दिशेने पायी चालू लागले. गाडी कुठयं विचारले तर म्हणाला पायीच नेतो.भांडण केले तर पैसे मागू लागला. शेवटी पोलीस स्टेशन मधे घेऊन गेलो. पोलीसांनी भांडण सोडवले म्हणाले द्या त्याला दहा पैसे चहा प्यायला. वर सागीतले हा माणूस आसाच फसवतो लोकांना.
आता बोला.
13 Jun 2023 - 2:46 pm | कर्नलतपस्वी
रिक्षा भाडे साठ पैसे होते.
विश्वास बसणार नाही पण माझा स्वतःचा अनुभव आहे.
16 Jun 2023 - 1:30 am | साहना
पण साठ पैसे द्यायचे कसे ? ५० - १० पैश्यांची नाणी ?
दहा पैश्यांची नाणी होती ?
16 Jun 2023 - 3:24 am | चित्रगुप्त
पैकी अठन्नी म्हणजे ५० पैसे (मूळ : दुवन्नी: दोन आणे, चवन्नी:चार आणे, अठन्नी: आठ आणे. सोळा आण्यांचा एक रुपया. आमदनी अठन्नी, खर्चा रुपैय्या असे एक गाणे होते)
16 Jun 2023 - 6:20 am | कर्नलतपस्वी
चित्रगुप्त यांनी सविस्तर प्रतिसादले आहे. साठच्या दशकातले भाव जर सांगीतले तर मुलं,नातवंड वेड्यात काढतात.
13 Jun 2023 - 6:15 pm | विजुभाऊ
दिल्लीत रहायचे असेल तर तिथली बस सर्व्हीस चांगली आहे.
इथले लोक काम असेल तर खूप गोड बोलणारे आहेत. आणि भांडखोरही आहेत.
कर देंगे जी , हो जायेंगा जी अशा कोणत्याही आश्वसानांवर विश्वास ठेवून इथे कामे होत नाहीत.
बिनदाढीवाल्या पंजाबी माणसाशी व्यवहार जरा जपून कर असा सल्ला मला एका दिल्लीकरानेच दिला होता.
नॉईडा मधे रहात होतो त्यावेळेस कम्पनीनेच आम्हाला संध्याकाळी आठ नंतर बाहेर फिरू नक असा सल्ला दिला होता.
महिलांसाठी हे शहर सुरक्षीत नाही.
16 Jun 2023 - 3:31 am | चित्रगुप्त
गोविंदा, जूही चावला, तब्बू वगैरेंचा मजेदार विनोदी सिनेमा :
https://www.youtube.com/watch?v=o7wQIe8v1Gw
17 Jun 2023 - 5:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दिल्ली दिलवालो की आहे म्हणतात. इंजॉय करा. आणि तपशीलवार वृत्तांत लिहा सहा महिन्यांनी. मला आवडलं असतं दिल्लीत नौकरी करायला. तीन-चार वेळा युजीसीत काम असल्यामुळे दिल्लीत आलो-गेलो इतकीच आपली दिल्लीची ओळख. दिल्लीतली थंडी आठवते, बेक्कार होती. दिल्ली इंजॉय करा. बाकी, प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत.
-दिलीप बिरुटे
18 Jun 2023 - 5:57 pm | विवेकपटाईत
दिल्ली राहण्यासाठी उत्तम जागा आहे. स्वस्त आहे, खाण्यापिण्याची विविध प्रकार मिळतात. लोक वाईट नाही. डॉ
18 Jun 2023 - 11:23 pm | सांरा
चित्रगुप्त, कर्नलतपस्वी, विअर्ड विक्स, राजेंद्र मेहेंदळे, धर्मराज मुटके आणि विवेक पटाईत यांनी सविस्तर माहिती दिली त्यांचे आणि इतर मिपाकरांनी उपदेशाचे दोन शब्द आणि अनुभव सांगितल्याबद्दल आभार.
सध्या काही महिन्यांसाठी दिल्ली जाणे टळले आहे त्यामुळे थोडी मनाची तयारी करायला वेळ मिळाला आहे आणि आधी वाटणारी धाकधूक थोडी कमी झाली आहे.
मला वाटते की हिवाळ्यामध्ये दिल्ली जायचे फायनल होईल. त्यासाठी मित्रांनी बॉडी वॉर्मर, जॅकेट्स आणि रूम हिटर इत्यादींची यादी देऊन ठेवली आहे. ते गेल्या गेल्या खरेदी करून ठेवीन.
ऑफिस संसद भवनाच्या पुढे मागे कुठे तरी आहे त्यामुळे तिकडेच कुठे तरी घर भाड्याने घ्यायचा विचार आहे. परंतु तो प्राईम भाग असल्याने थोड दूर पण घ्यावं लावू शकतं असं वाटतंय. मुंबई ला जाणे येणे मिळून रोजचे 3 तास तसे पण जातात, त्यातले किती वाचतात ते बघू.
लोक कसे वागतात ते बघावे लागेल. तसा मी कुणाच्या अध्यात मध्यात नसतो आणि उगाच भांडण करायला वा वाढवायला जात नाही. थोडं हसू आणून आणि कमी बोलून एखाद्याला मार्गी लावण मला जमत. जसे लोक मिळतील तसं काही शिकायला मिळेल असा वाटतंय.
बाकी सुरक्षिततेच्या बाबतीत मला तरी अडजस्ट करणे कठीण जाईल असा वाटतंय. कारण बिनधास्त रात्री उशिरा कुठे पण फिरणे मला दिल्लीत करणे होणार नाही. मुंबई मध्ये कुठल्याही रस्त्याने किंवा गल्ली मध्ये फिरताना, रात्री 12 ला पण कधीच असुरक्षित वाटल नाही.
19 Jun 2023 - 6:42 am | कर्नलतपस्वी
ऑफिस आहे मग तुम्ही नारायणा,जनकपुरी सारख्या ठिकाणी घर घ्या. थोडे स्वस्त आणी राजीव गांधी चौक पर्यंत मेट्रो सुद्धा डायरेक्ट आहे. पालम एअरपोर्ट जवळच आहे.
बाकी सहकर्मचारी व पटाईत यांचा सल्ला मदत घ्या.
20 Jun 2023 - 12:46 pm | विअर्ड विक्स
अर्रे वा ! मस्त एरिया आहे . वोईलेट मेट्रो लाईन ची स्टेशन पाहून मेट्रो स्टेशनजवळ घर बघणे . लजपत नगर उत्तम. गेला बाजार कंटाळा आला तरी ३-४ किमी चालत येऊ शकाल उनाड संध्याकाळी थंडीत ;). १५ ऑगस्ट नि २६ जानेवारी चांगला एन्जॉय करता येईल.
थंडी आजकाल पर्यावरणीय बदलामुळे कमी झालीये, पण जर इथे मुंबई पुण्यातल्या थंडीत स्वेटर घालायची वेळ येत असेल तर ३ लेअर ड्रेस सर्वोत्तम . वॉर्मर , शर्ट नि वर स्वेटर वा कोट . कोट नेहरू प्लेस वा लजपत नगर ला बंदी विकल्यासारखे विकतात रस्त्यावर . नोकरीतील हुद्दा बघून वेशभूषा ठरवणे . नोकरी prime एरियात आहे त्यामुळे लोकॅलिटी सुद्धा prime बघा .
थंडीचा प्रभाव दिल्ली शहराच्या परिघावर राहणाऱयांना चांगला जाणवतो , तेहेत प्रदुषण कमी असते.
18 Jun 2023 - 11:26 pm | सांरा
एकच प्रतिसाद पुन्हा पुन्हा प्रकाशित झाला आहे. कृपया एक ठेवून बाकी उडवावे ही विनंती.
20 Jun 2023 - 10:02 am | कंजूस
ही त्रासदायक वाटली नाही मला. एकदाच २००५ डिसेंबरमध्ये गेलेलो. तापमान सहा अंश. पण ओली थंडी. दमटपणा फार. सकाळी सगळीकडे दवाचा थपथपाट असतो. टेबले,खुर्चा,मोटारींचे पत्रे यावर पाणी. हाडं गोठवणारी नाही..
23 Jun 2023 - 7:27 am | इपित्तर इतिहासकार
मुंबई >>> दिल्ली विषय समाप्त.
27 Jun 2023 - 3:09 pm | इपित्तर इतिहासकार
दिल्लीचा अनुभव तितकासा आल्हाददायक नाही. लोकं , जेवण, वातावरण अन् एकंदरीत सामाजिक सौहर्द्र कुठल्याच बाबतीत आवडला नाही तो अनुभव.
अर्थात तुम्हाला हतोत्सहित करण्याचा मानस नाही, त्यामुळे नको ते बोलण्यापेक्षा गप बसतो कसा.
7 Oct 2023 - 11:47 pm | सांरा
सुदैवाने अथवा दुर्दैवाने माझी दिल्ली बदली टळलेली आहे आणि त्या बदल्यात जयपुरचा ऑप्शन दिला आहे. उत्तर भारत काही टळणार नाही त्यामुळे लगेच हो बोलून टाकले. यावर्षीच्या अंती मी मार्गस्थ होईन. जयपूरचा फीडबॅक तसा चांगला आहे. तशी दिल्लीची मनाने तयारी केली असल्याने जयपूर थोडे सोपे जाईल असे वाटते. नागपूरला राहून असल्याने थंडी वा उष्णता मॅनेज होऊन जाईल.