2 जूनला संध्याकाळी ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यामधल्या बहानगा बाजार रेल्वे स्टेशनवर एक मालगाडी आणि दोन प्रवासी रेल्वेगाड्यांचा विचित्र आणि भीषण अपघात झाला. त्या अपघातात 288 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 1,100 च्या वर प्रवासी जखमी झालेले आहेत. अलीकडच्या काळातला हा सर्वात भीषण रेल्वे अपघात ठरला असून विविध देशांकडून भारताला शोकसंदेशही पाठवण्यात आले आहेत.
नेहमीप्रमाणेच भीषण अपघात झाल्यावर त्याचं वार्तांकन आणि चर्चा आपल्याकडच्या सगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये सुरू झाल्या आहेत. त्यात, सर्वात आधी Ground Zero वरून आमचे वार्ताहर कसं सटीक वार्तांकन करत आहेत, हेही सांगितलं जाऊ लागलं. त्याचवेळी हा अपघात कशामुळे झाला आहे, याचा निष्कर्षही ग्राफिक्समधून काढण्याची स्पर्धा या प्रसारमाध्यमांमध्ये सुरू झाली. त्या निष्कर्षांमध्ये सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे एकाच मार्गावर दोन गाड्या येऊन त्या आदळल्याचं, मानवी चूक असल्याचं वगैरे वगैरे सांगितलं जाऊ लागलं. तसंच कोरोमंडलला आधी हिरवा सिग्नल दिला होता, पण तो अचानक तिचा सिग्नल लाल केला गेला आणि त्यामुळं ती गाडी शेजारच्या लूप लाईनवर उभ्या असलेल्या मालगाडीला जाऊन धडकली असंही एक तथ्यहिन कारण सांगितलं जाऊ लागलं. माध्यमांमध्ये सांगितलं जात असल्याप्रमाणं अचानक सिग्नल लाल झाल्यानं कोरोमंडलनं इतक्या वेगानं मालगाडीला लूपवर जाऊन मागून धडक दिली असण्याची शक्यता वाटत नाही.
संध्याकाळी 6.55 ला कोरोमंडल बहानगा बाजार स्थानक ओलांडणार होती आणि बेंगळुरूहून हावड्याला जाणारी सुपरफास्ट एक्सप्रेसही हे स्थानक ओलांडणार होती. त्यामुळे तिलाही डाऊन मेन लाईनचा होम सिग्नल हिरवा मिळाला होता. एकाचवेळी या गाड्या विरुद्ध दिशेनं हे स्थानक ओलांडणार असल्यामुळे स्टेशन मास्तर आणि पॉईट्समन आपापल्या नियोजित जागांवर हिरवे सिग्नल हातात घेऊन दोन दिशांना उभे होते. दरम्यान, स्थानकात शिरल्यावर लगेचच कोरोमंडल रुळावरून घसरली होती, तेवढ्यात विरुद्ध दिशेनं हावडा एक्सप्रेस वेगानं स्थानक सोडत होती. यामध्ये हावडा एक्सप्रेसला थांबवण्यासाठी स्टेशन मास्टरला क्षणभरही वेळ मिळाला असण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळं ती गाडी कोरोमंडलच्या घसरलेल्या डब्यांवर जाऊन आदळली.
रेल्वेगाड्यांमध्ये न बसवल्या गेलेल्या कवच या धडकविरोधी यंत्रणेचाही मुद्दा प्रसारमाध्यमांनी लावून धरला आहे. पण या दोन्ही रेल्वेगाड्यांमध्ये कवच यंत्रणा जरी बसवलेली असती, तरी अशा प्रकारचा अपघात ती टाळू शकली असती असं वाटत नाही.
सिग्नल यंत्रणेतील बिघाड किंवा कवचचा अभाव यापेक्षा रुळांच्या, विशेषत: सांध्यांच्या नियमित देखभालीतील अभावामुळे झाला असावा असं वाटत आहे. हा अपघात झाला तो मार्ग दक्षिण-पूर्व रेल्वे विभागाच्या अखत्यारित येतो. या विभागात भारतामधली सर्वाधिक मालगाड्यांची वर्दळ होत असते आणि प्रवासीगाड्यांचीही संख्या लक्षणीय आहेच. त्यामुळे लोहमार्गांच्या देखभालीसाठी आवश्यक असलेला मोकळा वेळ अतिशय कमी मिळत असतो. त्याचा परिणाम रेल्वेच्या सुरक्षित वाहतुकीवर होत आहे. रेल्वेतून प्रवास करत असताना सांध्यांवर गाडी कशी हेलकावे खाते ते बऱ्याचदा मलाही प्रवास करताना जाणवतं. अलीकडच्या काळात रुळांची, इंजिनं-डब्यांच्या देखभालीपेक्षा, आधुनिकीकरणापेक्षा चकचकीतपणा आणि अनावश्यक बाबींवरील खर्चाचं महत्व वाढलेलं आहे. त्याचा परिणाम अशा प्रकारच्या अपघातांमधून दिसत आहे. गेल्या वर्षभरात गाड्या रुळावरून घसरून झालेल्या अपघातांची संख्या एकूण अपघातांमध्ये 77 टक्के राहिली आहे.
लिन्क
https://avateebhavatee.blogspot.com/2023/06/blog-post.html
प्रतिक्रिया
4 Jun 2023 - 4:33 pm | Trump
लिन्क = दुवा.
लेखाबरोबर बरेचदा सहमत आहे. कवचमुळे हा अपघात टाळता आला नसता. कोरोमंडल एक्स्प्रेस ही चुकीमुळे लुप लाइन मध्ये घुसल्याने हा अपघात झाला. जरी गतिरोधक (ब्रेक) दाबले तरी रेल्वे तीच्या गतीनुसार काही किलोमीटर अंतर पुढे जाते. जर ते अंतरामध्ये कोणतेही अडथळे असतील तर नसेल तर कवचसुध्दा काहीही करु शकणार नाही.
कोरोमंडल एक्स्प्रेसचे डबे हावडा एक्प्रेसच्या डब्यांना लागले हा एक योगायोग आहे. जर हावडा एक्प्रेस जर तिथे १ मिनीट असती तर बरीच हानी टळली असती.
7 Jun 2023 - 12:30 pm | Trump
मी रेल्वेचालक (लोको पायलट) चुक लक्षात (जर लक्षात आली तर !!!) आल्यानंतर रेल्वे थांबायला किती वेळ लागेल त्याचे अंदाजे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला.
वापरलेली माहीती:
१. रेल्वेची गती १२६ किमी प्रतितास
२. मंदन (deceleration): कवचः १.१ मीटर/सेंकद२, आणिबाणी: १.५ मीटर/सेंकद२. (मला ह्या संख्या आंतरजालावरुन मिळाल्या आहेत, अधिक विश्वासार्ह माहीती असेल तर कृपया द्यावी.)
३. प्रतिक्रिया वेळ : ५ सेकंद
थांबण्याचे अंतर
कवचः ७३२ मीटर
आणिबाणी: ५८३ मीटर
एवढे मोठे अंतर त्या रेल्वेला उपलब्ध नसणार. त्या लुप लाईनची लांबी ७५० मीटर असते त्यावर ती मालगाडी उभी होती, तीने पुढे आणि मागे जागा सोडली असणार.
त्यामुळे त्या एक्स्प्रेसला थांबण्यासाठी ५० ते १५० मीटर अंतर शिल्लक होते, ते लागणार्या अंतरापेक्षा कमी आहे. त्यामुळे हि धडक टाळणे त्या चालकाला केवळ अशक्य होते.
त्या गाडीचे डबे दुसर्या विरुध्द दिशेने जाणार्या गाडीला धडकले तो निव्वळ योगायोग होता.
गृहीतके: जेव्हा रेल्वे मार्गजोडणी (Interlocking ) वरुन जाते तेव्हा रेल्वेची गती कमी असायला हवी, १२६ किली प्रतितास गतीला ती कदाचित रुळावरुन घसरु शकते. ती घसरणार नाही असे येथे गृहीत धरले आहे. तसेच आणिबाणीचे गतिरोधक वापरल्यामुळे गाडी घसरणार नाही, असे येथे गृहीत धरले आहे.
संदर्भः
Kavach Breaking Algorithm https://rdso.indianrailways.gov.in/uploads/files/Braking%20Algorithm%20A...
https://www.johannes-strommer.com/en/calculators/stopping-distance-accel...
https://en.wikipedia.org/wiki/Railway_brake
4 Jun 2023 - 5:18 pm | वामन देशमुख
या धाग्यावर या / इतर रेल्वे अपघातांवर चर्चा व्हावी, धाग्याच्या केरळ होऊ नये ही अपेक्षा.
4 Jun 2023 - 5:38 pm | कॉमी
तुम्ही सोडून इतरांनी प्रयत्न करायचा का ?
4 Jun 2023 - 5:29 pm | मनो
माझा अंदाज असा आहे की लूप लाईनवरील मालगाडीचे डबे पूर्णपणे लूप लाईनवर गेले नसावेत, त्याचा शेवटचा भाग जर मेन लाईनवर राहिला असेल तर असा अपघात होऊ शकतो. दुसरी शक्यता अशी की मालगाडी खूप उशिरा लूप लाईनवर गेली आणि सांधे बदलण्याच्या आत पुढची गाडी पूर्ण वेगाने आल्याने ती लूप लाईनवर जाऊन मालगडीला मागून धडकली. या शक्यतेत एक्स्प्रेस गाडीला हिरवा सिग्नल सांधे बदलण्याच्या आत मिळाला कसा, हा तांत्रिक दोष असू शकतो. तुम्हाला काय वाटते?
4 Jun 2023 - 8:12 pm | पराग१२२६३
तुमच्या पहिल्या अंदाजाविषयी
तसं शक्य नाही.
दुसऱ्या अंदाजाविषयी
हे फक्त कोरोमंडलच्या इंजिनाचे ब्रेक निकामी झाले असते, तरच शक्य होतं.
4 Jun 2023 - 10:47 pm | मनो
The Railway Board, while detailing the sequence of events leading to the train tragedy in Odisha’s Balasore district, said that the Coromandel Express was “not over-speeding” and received the green signal to enter a loop line on which a goods train was stationary.
चुकीचा सिग्नल दिला गेला.
5 Jun 2023 - 5:21 am | कंजूस
सिग्नल कंपनी (बहुतेक सिमेन्स?) हे मान्य करणार नाही. सिग्नल लॉक झालेले असतात.
5 Jun 2023 - 3:37 pm | बोका
माझ्या माहितीनुसार सीमेन्सची यंत्रणा न्हवती. सिग्नल लॉक झालेले असतात हे बरोबर.
4 Jun 2023 - 5:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
घडलेला अपघात दुर्दैवी आणि दु:खदायक आहे. अजूनही रेल्वेचा प्रवास देवाच्याच भरवशावर चालू आहे, असे वाटले. रेल्वेचा प्रवास सुरक्षीत आणि अधिकाधिक अत्याधुनिक तंत्रज्ञानात प्रगती होऊन बदलांचे प्रत्यक्ष 'कवच' प्रवाशांना लाभले पाहिजेत. मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटूंबियांच्या दु:खाबाबत सहवेदना आहेच, जखमींवर उपचार मिळून लवकर ते लवकर बरे व्हावेत.
-दिलीप बिरुटे
4 Jun 2023 - 7:34 pm | कंजूस
वरवर रेल्वे कर्मचाऱ्यांची चूक दिसत नाही. बाजबाजूच्या रुळांवरून जाणाऱ्या गाड्या घसरल्या आहेत. तिथे रेल मार्ग सरळ असल्याने गाड्या वेगात जातात आणि साधारण एकाच वेळी हावडा कडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्या तिथे येतात हे ओळखून रुळावर घातपात केला असावा. संशयित तिथे आला, पटकन दोन्ही लाईन्सवर काही गडबड करून निघून गेला असणार. आजुबाजूच्या ठिकाणी चौकशी करावी लागेल. अपघाताने रूळच उखडले गेल्याने त्यातून काही कळणार नाही. ड्रायवरच काही प्रकाश टाकू शकतात. किंवा पुढच्या डब्यांत दाराशी उभे राहिलेले जखमी सापडले तर.
4 Jun 2023 - 8:16 pm | पराग१२२६३
कोरोमंडलचे दोन्ही चालक, LP आणि ALP आणि मालगाडीचा गार्ड या अपघातात मृत्यूमुखी पडल्याची बातमी काल होती.
5 Jun 2023 - 4:30 pm | भागो
The condition of injured engine driver Gunanidhi Mohanty and his assistant Hajari Behera, who are undergoing treatment at AIIMS Bhubaneswar, is stable, officials said.
4 Jun 2023 - 11:51 pm | Trump
रेल्वेमध्ये सिग्नल कसे दिले जातात, रेल्वे लुप लाईन वर कशी टाकली जाते ह्याबद्दलची माहिती.
Rail Signalling Working Model - XI (Calling on signal - how & why it is used explained)
https://www.youtube.com/watch?v=6dVgBkUHgL0
5 Jun 2023 - 2:51 am | साहना
२०२३ मध्ये अश्या प्रकारचे १९९०-८० ची आठवण करून देणारे अपघात घडू शकतात असे मला तरी वाटले नव्हते. कारणे शेवटी तांत्रिक असली तर रेल्वेची सुरक्षा यंत्रणा भरवशाची नाही हेच सिद्ध झाले आहे.
5 Jun 2023 - 5:31 am | कंजूस
असं असतं तर रेल्वेची प्रगती झालीच नसती.
गाडी रुळावरून दीड,तीन किलोमीटर पुढे गेल्याशिवाय मागचे सिग्नल पिवळे,हिरवे बदलत नाहीत. ही योजना स्वयंचलित असते. त्यासाठी तेवढ्या अंतरावर केबल जोडलेल्या असतात. ती केबल कुणी काढली असेल. किंवा आणखी काही घातपात. दोन गाड्या कशा घसरतील? मालगाडीचा गार्डन काही सांगू शकेल. गाडी घसरून बाजूच्या उभ्या मालगाडीवर आपटली आहे. या दोन गाड्या पास झाल्यावरच मालगाडी त्या रुळावर येणार होती.
5 Jun 2023 - 7:18 am | प्रदीप
आपण येथे नेहमीचा 'विदा, विदा, विदा...' खेळ खेळूयात.
म्हणजे १९९० साली किती कि.मी. ची रेल्वे लाईन होती. वर्षभरात किती प्रवाशांची वाहतूक त्या साली झाली. त्यांतून किती माणसे रेल्वे अपघातामुळे (इथे अर्थात, गाड्या रूळांवरून घसरणे, एकमेकांवर आपटणे, नदीत/ समुद्रांत पडणे इत्यादी कारणांचाच फक्त समावेश आहे. रूळ ओलांडतांना अथवा गाडीला लटकून जातांना मृत्यूमुखी पडलेल्यांचा समावेश नाही). म्हणजे प्रति किमी. किती माणासे अपघातामुळे मृत्यूमुखी पडली. आणि आता २०२२ साली हेच आकडे किती होते? (२३ साल अपूर्ण असल्याने केव्ळ ते धरत नाही आहे).
जाता जाता, असाच अपघतांचा विदा आपण यू. एस. ए. बद्द्दलही २०२४ मध्ये जमा करूयांत का? अर्थात, प्रवाशींच्या ऐवजी काही दुसरे परिमाण वापरावे लागतील-- जसे अपघातामुळे त्या ठिकाणाच्या परिसरांतील किती भूमी बाधिर झाली. त्यांत फेब्रुवारी २०२३ मध्ये ओहायोत झालेल्या भीषण अपघाताचाही समावेश करता येईल.
काही घटना घडल्यावर, पटकन त्याविषयी काही टिपण्णी करण्यार्यांचे मला मनापासून कौतुक वाटते.
5 Jun 2023 - 10:06 am | साहना
मेह ! ३००+ मृत्यू आणि ९०० पेक्षा अधिक जखमी असा अपघात मागील १० वर्षांत जगांत कुठे झाला असेल ? मला तरी ठाऊक नाही. रेलवे अपघातांत रिकॉर्ड सध्या रशियाचा आहे ज्यांत ६०० लोक मृत्युमुखी पडले होते (१९८९). २०२३ मध्ये भारत त्याच्या बराच जवळ आला आहे. बाब खूपच दुर्दैवी आहे , करणे काहीही असोत.
ओहिओ रेलवे घसरणीत शून्य लोक मेले किंवा जखमी झाले.
5 Jun 2023 - 10:24 am | प्रदीप
तुम्ही भारतांतील १९९० च्या वेळची रेल्वे अपघातांची परिस्थिती आणि आताची परिस्थिती ह्यांची तुलना केलीत. तेव्हा विदा- विदा त्याच फ्रेमवर्कमधे खेळला जावा ना?
२०१३ साली स्पेनमधे एक रेल्वे अपघात होऊन ७७ माणासे मृत्यूमुखी पडली होती. पण मग स्पेनमधील रेल्वे कि.मी. तसेच एकंदरीत प्रवाशांची संख्या इत्यादी सर्व बाबी लक्षांत घेतल्या पाहिजेत ना? (स्पेनला मधेच आणणे हाही, रशियाची तुलना करण्यासारखाच मूव्हिंग गोलपोस्ट आहे, हे मान्य. पण तुमच्याच तर्काला थोडे एक्ट्रापोलेट केले आहे, एव्हढेच).
ओहायोत माणसे मेली नाहीत कारण तो प्रवासी गाडीचा अपघात नव्हता. पण त्या अपघातांत फ्युएल जळाले, आजूबाजूचा बराचसा प्रदेश बेचिराख झाला. आणि ह्या अपघाताच्या तीव्रतेची बातमी देण्यास स्थानिक सरकारने पत्रकारांवर बरेच निर्बंध आणले. ते का म्हणून?
5 Jun 2023 - 11:24 am | कॉमी
ओहायो अपघातानंतर ओबामा आणि ट्रम्पच्या डीरेग्युलेशन /रेल्वे लॉबी वर कच खाऊन गरजेची सेफ्टी रेग्युलेशन न आणण्याच्या धोरणावर बरीच टीका झाली.
5 Jun 2023 - 7:23 am | प्रदीप
काल मी हे पराग ह्यांना खरडवहीतून कळवले होते. आता येथे त्याविषयी चर्चा सुरू असल्याने, तेच इथेही डकवत आहे.
"येथे एक simulated animation सविस्तर दाखवण्यात आलेले आहे.. मला ते समजले नाही. तुमचा हा विशेष प्रांत असल्याने येथे दुवा देत आहे. पाहा काही अर्थबोध होतो आहे का. तसा तो झाल्यास कृपया समजावून सांगावा.
https://twitter.com/rajtoday/status/1664846649607290881
हे बरेचसे अगम्य आहे, ह्याचे मुख्य कारण ते अॅनिमेटेड आहे. श्री. पराग ह्यावर टिपण्णी करतीलच. पण इथे रोख असाच दिसतो की एक प्रवासी गाडी चुकून मालगाडी उभ्या असलेल्या लूपलाईनवर वळवण्यांत आली. ओव्हर तो श्री. पराग.
5 Jun 2023 - 8:47 am | पराग१२२६३
प्रदीप, तुम्ही पाठवलेल्या दुव्यावर रेल्वेचा कंट्रोल पॅनल दाखवलेला आहे. प्रत्येक स्टेशनच्या स्टेशन मास्तरसमोर तो असतो. त्यावरून एखाद्या गाडीला मार्ग, सिग्नल तो देत असतो. या simulated animation मध्ये एखाद्या स्टेशनमध्ये येण्याची प्रक्रिया दाखवलेली आहे. मधल्या दोन अप आणि डाऊन मेन लाईन आणि त्यांच्या शेजारच्या लूप लाईन्स. लूप लाईन्स लाल रंगाच्या झाल्या आहेत कारण त्यावर गाड्या उभ्या आहेत. पिवळ्या रेषा म्हणजे मेन लाईनवरून जात असलेल्या गाड्या आहेत. त्या गाड्यांना जसे सिग्नल मिळत आहेत, तशा जात आहेत, त्या पुढे जात आहेत, त्यानुसार त्यांच्या मागचं सिग्नल आपोआप बदलत आहेत हे या simulated animation मध्ये दाखवलेलं आहे. पिवळी रेषा पुढे सरकल्यावर मागं लाल रंगाची रेषा होत आहे, ती line closed दाखवत आहे आणि मागचा सिग्नल लाल होत आहे. मागून येणारी गाडी त्या सिग्नलजवळच थांबेल.
5 Jun 2023 - 8:58 am | पराग१२२६३
प्रवासीगाडी चुकून मालगाडी उभ्या असलेल्या लूप लाईनवर वळवली गेली, असं होतं नाही. चुकूनही होऊन नये यासाठी काळजी घेतलेली असते. यात एक शक्यता मला वाटते, ती म्हणजे मेन लाईनच्या रुळात निर्माण झालेला दोष.
5 Jun 2023 - 11:45 am | गवि
विमानन क्षेत्रात चरखी दादरी कांड झाले होते. केवळ communication गॅपमुळे. त्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या. आता इथे काय केले जाते बघायचे.
अन्यथा रेल्वे प्रवास रामभरोसे करावा लागेल. मा. रेल्वमंत्री यांनी सर्व डबे हटवून वाट मोकळी करून पाहिली ट्रेन पुन्हा सुरू झाल्याचे जाहीर केले. त्यांनी या ट्रेनपुढे हात जोडून नमस्कार केला. भावना चांगली असेल. पण तरी ते बघताना भयंकर वाटते आहे एका अर्थाने. अशा गोष्टी देवा हाती किंवा दैवा हाती सोपवू नयेत..!
5 Jun 2023 - 11:40 am | गवि
याबाबत फारसे ज्ञान नाही. अपघाताच्या भीषणतेने हादरायला झाले आहे. रेल्वेसारख्या (रुळरुपी फिजिकली restricted movement वर आधारित) व्यवस्थेत एखादी ट्रेन दुसरीवर न आदळणे हे कोण्या स्टेशन मास्तरने एखादी कळ वेळेत दाबली की नाही यावर अवलंबून असेल तर भयानक आहे हे. कोणीतरी प्रकाश टाकावा माहीत असेल तर.
5 Jun 2023 - 3:34 pm | बोका
रेल्वे सिग्नल व्यवस्थेला अनेक दशकांचा इतिहास आहे. ती विचारपूर्वक सुरक्षित बनवलेली आहे. सिग्नल यंत्रणा बनवणाऱ्या काही कंपन्या शतकभर या व्यवसायात आहेत. स्टेशन मास्तरने एखादी कळ वेळेत दाबली की नाही यावर गाड्यांची सुरक्षितता नक्कीच अवलंबून नाही
तांत्रिक भाषेत बोलायचे तर ही एक safety Integrity Level 4 दर्जाची सेफ सीस्टीम आहे.
भारतीय रेल्वेवर अशी यंत्रणा बसवण्या अगोदर RDSO या संस्थेकडून सुरक्षितता प्रमाणपत्र मिळवावे लागते. हे मिळवणं किचकट आणि वेळखाऊ असते.
5 Jun 2023 - 3:51 pm | गवि
धन्यवाद.
Given that, हा घातपात असेल अशी शक्यता जास्त असे म्हटले तर वावगे ठरू नये.
5 Jun 2023 - 6:02 pm | बोका
सध्या उपलब्ध माहितीनुसार घातपाताची शक्यता ...
१. लोको पायलटला जबरजस्तीने वेगात सिग्नल तोडायला भाग पाडून गाडी आदळवणे. --- रेल्वे आधिकाऱयांच्या मुलाखती पाहिल्यावर असे दिसते की सिग्नल हिरवा होता. त्यामुळे ही शक्यता बाद.
२. रुळावर अडथळा निर्माण करून गाडी घसरवणे - -- ज्या प्रकारे कोरोमंडलचे इंजिन मालगाडीवर धडकले / चढले आहे ते पाहून आधी धडक झाली आणि मग इतर डबे घसरले असे अनुमान काढता येते. त्यामुळे ही शक्यता बाद.
३. सिग्नल यंत्रणेला गंडवून सिग्नल हिरवा करणे . ---- हे करण्यासाठी तांत्रिक ज्ञान आवश्यक . जसे ९/११ मध्ये विमान उडवण्यास शिकणे. तांत्रिक ज्ञान मिळावल्यानंतर या ठिकाणाचे Drawing मिळवणे , विविध उपकरणांच्या चाव्या मिळवणे वगैरे ... .. ----- अशक्य नाही, परंतु अवघड .
माझे वैयक्तीक मत .. घातपात नसावा.
8 Jun 2023 - 1:06 pm | तर्कवादी
बोका यांच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे तो घातपात नसावा असेच मलाही वाटते , पण तरी काही शक्यता असल्यास तपासाअंती पुढे येईल अशी आशा करुयात. काल याबाबत भाजपच्या एका नेत्याने तृणमूल काँग्रेसचा घातपातामागे हात असावा असा आरोप केल्याचे वाचनात आले. अजूनपर्यंत असे कोणतेही धागेदोरे हाती आले नसतील तर राजकीय नेत्यांनी असे गंभीर आरोप करणे टाळावे. जे काही निष्कर्ष असतील ते तपास समितीने वा सक्षम अधिकार्याने योग्य त्या प्रकारे जनतेसमोर आणले पाहिजेत आणि जर घातपात आहे हे सिद्ध झाले तर दोषींवर आणि त्यांना साथ देणार्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
बाकी safety Integrity Level 4 सुरक्षेबद्दल मला माहिती नाही पण अपघात झाला हे खरे , २८८ लोक मरण पावलेत हे ही खरे. मग त्यामुळे एक सामान्य माणूस म्हणून रेल्वेची सुरक्षा यंत्रणा पुरेशी सक्षम नाही असेच मला वाटते. afterall results matter.. .आणि अशा अपघातात इतके जास्त लोक मरण पावतात तेव्हा सामान्य माणूस व्यथित होतो.. त्यावेळी त्याला अपघातांची, मृतांची टक्केवारी, प्रगत देशांशी तुलना, विकसनशील देशांशी तुलना ई ई करण्यात रस नसतो.
आणि अपघात नसून हा घातपातच होता हे जरी सिद्ध झाले तरी त्याचा अर्थही रेल्वेची सुरक्षा यंत्रणा पुरेशी सक्षम नाही असाच होतो. काही महिन्यांपुर्वी मी पुणे- कल्याण असा प्रवास वंदे भारत एक्स्प्रेसने केला. स्थानकात वा ट्रेनमध्ये जाताना कुठेच सामानाची वा माझी सुरक्षा तपासणी झाली नाही (जशी विमानतळावर होते). सुरक्षा व्यवस्था सक्षम नसेल तर घातपाताची शक्यता टाळणार कशी ?
8 Jun 2023 - 1:59 pm | प्रदीप
मी जे काही वाचले आहे, त्यानुसार यी सेफ्टी लेव्हल 'कवच' ला लागू आहे. व इथे कवच अद्यापि 'बांधलेले' नाही.
8 Jun 2023 - 4:38 pm | तर्कवादी
कवच बद्दल तांत्रिक माहिती कुणी सांगू शकेल काय ? ( युट्युब वर शोधले नाही मी. इथेच कुणी दिली तर वाचायला आवडेल)
9 Jun 2023 - 9:57 am | सुबोध खरे
स्थानकात वा ट्रेनमध्ये जाताना कुठेच सामानाची वा माझी सुरक्षा तपासणी झाली नाही (जशी विमानतळावर होते). सुरक्षा व्यवस्था सक्षम नसेल तर घातपाताची शक्यता टाळणार कशी ?
13 million passengers Indian Railways serve every day. It manages the fourth largest national railway system in the world by size, with a total route length of 68,043 km (42,280 mi), running track length of 102,831 km (63,896 mi) and track length of 128,305 km (79,725 mi) as of 31 March 2022..
रोजच्या रोज १.३ कोटी प्रवाशांचे सामान कुठे आणि कसे तपासणार?
६८ हजार किमी रुळांवर कोणी घातपात करत नाही यावर लक्ष कसे ठेवायचे?
एकीकडे ३६ पैसे/ किमी या दराने भारतीय रेल्वे हि जगात सर्वात स्वस्त रेल्वे म्हणून प्रसिद्ध आहे.
आम्हाला सुरक्षितता १०० टक्के हवी आणि शक्य तितक्या लोकांना सवलतीच्या दरात प्रवास ही करायचा आहे.
दरवाढ केली कि रेल्वेच्या नावाने बोंबा मारायला आपण मोकळे
आणि मग अशा अचाट आणि अफाट अपेक्षा कि सर्व प्रवाशांचे सामान तपासले गेले पाहिजे. उच्च दर्जाची सुरक्षा पाहिजे रेल्वेची सेवा जागतिक दर्जाची हवी.
आपण लोक महा दांभिक आहोत हेच खरे.
10 Jun 2023 - 8:35 pm | मुक्त विहारि
माझ्याकडे तरी, इतका वेळ नाही...
काही लोकांना प्रत्युत्तर न देणेच उत्तम ...
एक साथी गोष्ट आहे, डोंबिवली सारख्या जागतिक मध्यवर्ती ठिकाणी देखील, ही व्यवस्था नाही, मग इतर ठिकाणी ही व्यवस्था कशी असेल?
ते पण जाऊ द्या,
गेला बाजार, तानशेत किंवा शेलू, सारख्या अति कमी प्रवाशी संख्या असलेल्या लोकल प्रवासी ठिकाणी देखील ही व्यवस्था नाही
-----
फालतू तर्क लावायचा असेल तर, कसाही लावता येतो ...
....
बाकी नेहमी प्रमाणेच.....
कुणाला प्रतिसाद द्यायचा आणि कुणाला नाही, हा माझा वैयक्तिक अधिकार आहे ....
5 Jun 2023 - 6:49 pm | कर्नलतपस्वी
अशी बातमी आज टि व्ही वर बघीतली.
घडलेला अपघात हा घातपात की अपघात यावर ते प्रकाश टाकू शकतील.
मृत,जखमी यांच्या बद्दल संवेदना.
अपघातात मधे चुक मानवीय असण्याची शक्यता किंवा तांत्रिक हे लवकरच कळेल.
कितीही जरी तंत्रज्ञान पुढे गेले तरी झीरो एरर सिंड्रोम हे अशक्य वाटते.
अशा घटना सर्वत्र होतात. पण त्या इथे झाल्या की भारत किती मागासलेला आहे हे बोलण्याची संधी काही लोकं लगेच साधतात.
5 Jun 2023 - 7:19 pm | सर टोबी
हे शहाणपण फक्त आपल्या आवडत्या सरकारच्या बाबतीत दाखवले जाते त्या बाबतीत आपले काय मत आहे?
5 Jun 2023 - 7:51 pm | कर्नलतपस्वी
असे काहीच नाही.
मलाही हेच म्हणायच आहे. अपघात सर्व कालीन व सर्वत्र होत असतात.
6 Jun 2023 - 12:26 am | साहना
> अशा घटना सर्वत्र होतात.
नाही होत. ३०० लोक मृत्युमुखी पडावेत अश्या घटना होत नाहीत. पण त्याहून "अश्या घटना सर्वत्र होतात" हा अटीट्युड च मुळांत चुकीचा आहे. त्याशिवाय ह्याचा संबंध सरकार, रेलवे मंत्री इत्यादींशी जोडणे सुद्धा पूर्णतः चुकीचे आहे.
असे अपघात अत्यंत गांभीर्याने घेतले पाहिजेत, त्यांच्या चौकशीचे रिपोर्ट सार्वजनिक केले पाहिजेत आणि ह्या अपघातातून काय धडा घेतला आणि असे अपघात पुन्हा घडणार नाहीत ह्यासाठी काय केले हे सुद्धा सार्वजनिक केले पाहिजे. थोडक्यांत ज्यापद्धतीने आम्ही हवाई दुर्घटनांना पाहतो त्याच दृष्टिकोनातून रेलवे दुर्घटनांना पाहणे गरजेचे आहे. भारतात तर हे आणखीन महत्वाचे आहे कारण आमच्या ट्रेन मध्ये फार लोक आणि बहुतांशी गरीब लोक असतात.
8 Jun 2023 - 11:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत.
-दिलीप बिरुटे
8 Jun 2023 - 12:17 pm | शलभ
सहमत म्हणालात पण त्यात ही ओळ पण आहे. "त्याशिवाय ह्याचा संबंध सरकार, रेलवे मंत्री इत्यादींशी जोडणे सुद्धा पूर्णतः चुकीचे आहे."
:)
5 Jun 2023 - 7:13 pm | डँबिस००७
बालासोर जिल्ह्यातील बडागाम बाजार स्टेशनचा उप स्टेशन मास्तर फरार झालेला आहे.
5 Jun 2023 - 7:20 pm | डँबिस००७
क. तपस्वी,
अगदी बरोबर!
रेलवेचा सर्वांंगीण विकास न करता फक्त रेल्वेची मालमत्ता विकुन रेल्वेला फायद्यात दाखवणारे लालु प्रसाद ह्या लोकांचे हिरो.
वंदे भारत सारखी प्रगत रेल्वे मेक ईन भारत अंतर्गत भारतात आणावी त्यामुळे भारता बाहेरच्या भारत विरोधी लोकांच्या मनात द्वेष आहे, ते त्यांच्या डोळ्यात सलत आहे,
5 Jun 2023 - 7:55 pm | कर्नलतपस्वी
पराग आणी अपघाताच्या कारणांवर प्रकाश टाकणाऱ्या प्रतिसादकांचे आभार.
6 Jun 2023 - 11:11 am | कॉमी
अपघाताची वेगवेगळ्या रिपोर्ट्स आणि मुलाखतीतून मांडलेली समरी
https://youtu.be/0pktiIEax9w
7 Jun 2023 - 2:05 pm | वामन देशमुख
सदर रेल्वे घातपात हा दहशतवादी हल्ला आहे असे असू शकते.
7 Jun 2023 - 6:01 pm | डँबिस००७
कृती शब्दांहूनी बोलकी!
२ जूनच्या सायंकाळी ओडिशातील बालासोरमध्ये उगवलेला चंद्र जणू दुस-या दिवशीच्या पौर्णिमेच्या तयारीत असावा, इतका सुंदर दिसत होता.
परंतू त्या चंंद्राच्या अगदी समोरच मानवी जीवनावर मृत्यूचे काळे वादळ घोंगावत येत होते. श्वासांच्या चंद्राला ग्रहण लागताना आकाशातील चंद्र हताश होऊन पहात होता! काहीच क्षणांमध्ये खग्रास अवस्था झाली आणि काळोख पसरला. किंकाळ्यांनी आसमंत थरथरून गेलेला असताना त्याला सावरायला कुणीतरी धावून यायला हवं होतं......आणि तसं कुणीतरी धावत आलंच!
दत्तात्रय भाऊसाहेब शिंंदे त्यांचं नाव. जीवघेण्या रेल्वे अपघाताची खबर मिळाल्याक्षणापासून केवळ चाळीस-पंचेचाळीस मिनिटांत जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी,भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी श्री.दत्तात्रय भाऊसाहेब शिंंदे दुर्घटनास्थळी पोहोचले! घटनास्थळाकडे वेगाने जात असताना जसजशी त्यांना घटनेच्या गांभिर्याची माहिती मिळत गेली तसतसे त्यांनी आपलं प्रशासकीय आणि संपर्क कौशल्य पणाला लावून योजना आखल्या. तीन पैकी दोन रेल्वेगाड्या प्रवासी वाहतूक करणा-या...याचा अर्थ जिवितहानी मोठ्या प्रमाणावर असेल,याचा अंदाज बांधून साहेबांनी परिसरातील थोड्याथोडक्या नव्हेत, तर शंभरपेक्षा अधिक रूग्णवाहिका उपलब्ध करून घेतल्या. जवळच्या सर्वच्या सर्व रूग्णालयांना हाय अलर्टवर आणले. उपलब्ध असलेले सर्व वैद्यकीय अधिकारी कार्यक्षेत्रात कार्यरत असतील,अशी तजवीज केली. संपूर्ण बालासोर जिल्हा प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लावली. घटनास्थळी पोहोचताच परिस्थितीचा आढावा घेतला आणि भारतीय सेनेकडे मदत मागितली. एका रेल्वेगाडीत अडकून पडलेल्या बी.एस.एफ.च्या दहा जवानांनी स्वत: जखमी असूनही प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी कंबर कसली!
अशावेळी बघ्यांची गर्दी उपद्रवक्षम असते. पण याच गर्दीला शिंदे साहेबांनी मोठ्या कौशल्याने प्रोत्साहित करून कामाला लावले. जखमींना रूग्णालयात पोहोचवण्याला सर्वाधिक प्राधान्य दिले. मृतदेह सरकारी रूग्णालयांंत हलवण्यात वेळही गेला असता आणि जखमींना घेऊन जाण्यासाठी रूग्णवाहिका कमी पडल्या असत्या. गेलेल्यासाठी शोक करीत न बसता राहिलेल्यांसाठी सर्व ताकद वापरण्यावर भर दिला. जवळच्याच एका शाळेच्या इमारतीत उपलब्ध असलेल्या जागेत सर्व मृतदेह व्यवस्थित ठेवण्याची सूचना दिल्या. मृतदेहांची उत्तरीय तपासणी ही आत्यंतिक महत्त्वाची प्रक्रिया असते. तज्ज्ञ डॉक्टरांसाठी उत्तरीय तपासणीची सर्व व्यवस्था त्याच ठिकाणी केली गेली. अपघाताच्या तीव्रतेमुळे मृतदेहांची अवस्था अत्यंंत शोचनीय झालेली असल्याने आणि ओळख पटविणे कायद्याच्या दृष्टीने योग्य व्हावे यासाठी मृतदेहांची डी.एन.ए.नमुने घेण्याचे आदेशही लगोलग दिले गेले. शिंंदे साहेब बालासोर मधील माणसांना 'माझी' माणसं,माझ्या रक्ताची माणसं असं संबोधतात. याच रक्ताला त्यांनी आवाहन केलं आणि अपघातात वाहून गेलेल्या रक्तापेक्षा थेंबभर जास्तच रक्त दान केलं गेलं.....इतकं की रक्त साठवण क्षमता संपुष्टात आल्यानं रक्तदात्यांना माघारी पाठवावं लागलं. अपघातग्र्स्तांसाठी सर्व रुग्णालयांत,सर्वच रूग्णांवर मोफत उपचार होतील,अशा स्पष्ट सूचना दिल्या गेल्या. हे सर्व नियोजन आणि अंमलबजावणी करत असताना वृत्तवाहिन्यांचा ससेमिरा, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटी सुरू झाल्या. त्याचेही नियोजन करावे लागते. माहिती नेमकी जमा करून घ्यावी लागते. बहुतेक वेळा याच कामांत प्रशासनाची बरीचशी शक्ती नाहक खर्च होत असते. परंतू मदत आणि माहिती या दोन्ही पातळींवर शिंंदेसाहेब आणि त्यांचा प्रशासकीय वर्ग सारखाच यशस्वी ठरताना दिसला. अपघातात किती लोक दगावले या आकडेवारीत आजच्या मिडीयाला खूपच स्वारस्य दिसते. त्यांना थोडंसं रोखलं की लगेच मृतांचा आकडा लपवला जातोय,अशी ओरड होते. म्हणून या घटनेच्यावेळी मदतकार्यात अडथळा येऊ नये अशा पद्धतीने वृत्तवाहिन्या,बातमीदारांना घटनास्थळी त्यांचे काम करू देण्यात आले.
रेल्वेप्रशासन,रेल्वे पोलिस,स्थानिक पोलिसदल,आरोग्ययंत्रणा,वाहतूक विभाग,भारतीय सैन्य दल,मिडीया या सर्वांमध्ये समन्वय राखण्यासाठी एक सुव्यवस्थित प्रशिक्षण झालेलं सक्षम मन असावं लागतं. पुस्तकांतून वाचलेल्या अनेक गोष्टी अशावेळी प्र्त्यक्ष अंमलबजावणीत आणाव्या लागतात. The hour throws the man....असं म्हटलं जातं...अर्थात तो क्षण एक असा सक्षम माणूस निवडतो आणि त्याला लढण्याची प्रेरणा देतो. असंच काहीसं झालं शिंदे साहेबांच्या बाबतीत. क्षणाने अगदी योग्य माणूस निवडला होता....हे दिसून आले! या महाकाय कार्यात दत्तात्रय शिंंदे साहेब काही एकटेच नव्हते हे साहजिक असले तरी नेतृत्व म्हणून जो काही गुण असतो,त्याचं महत्त्व असतंच. किंबहुना अचूक आणि तात्काळ निर्णय हे जीवनमरणातील सीमारेषा ठरवत असतात. प्रशासन हा आपल्या या समाजाचा कणा आहे. तो जितका कणखर आणि ताठ तेव्हढी आपत्तींची तीव्रता कमी. कारण आपत्ती संपूर्णपणे टाळता येत नसतात.....त्यांचं निवारण मात्र करता येतं. हेच शिंदेसाहेबांनी आणि त्यांच्या बालासोरवासियांनी दाखवून दिलेले आहे. आपल्यासाठी यातील एक सुखावह बाब म्हणजे हे मराठी रक्त आहे.....ओडिशासारख्या दूरच्या राज्यात एक मराठी नाव आपल्या कर्तृत्वाने झळकते आहे, हे आपल्याला अभिमानास्पद असायला हवे. नगर जिल्ह्यातल्या एका छोट्या गावातून येऊन, आपल्या कष्टाच्या जोरावर राष्ट्रीय प्रशासकीय सेवेत प्रवेश करणे आणि प्रसंग पडताच ज्यासाठी देशाने नेमणूक केली आहे,ते काम धीरोदात्तपणे अंमलात आणणे...याला अद्वितीय धाडस लागते...की जे श्री.दत्तात्रय भाऊसाहेब शिंदे यांनी करून दाखवलेले आहे! एका काल्पनिक कथेतील एक पात्र साधारणत: अशा आशयाचं एक वाक्य म्हणतं....It is not important who I am underneath....what I do is important! अर्थात मी वरून कसा दिसतो किंवा आतून कसा आहे यापेक्षा मी प्रत्यक्षात काय कृती करतो...ते सर्वाधिक महत्त्वाचे आहे! श्री.शिंंदे साहेबांनी जे काही केलं ते सर्व त्यांच्या कर्तव्याचा एक भाग होते,असे जरी असले तरी हे कर्तव्य करत असताना त्यांनी दाखवलेली समयसूचकता,निर्णयक्षमता अतिशय वाखाणण्याजोगी आहे,यात दुमत असण्याचं काही कारण नाही. कुणी पाहो न पाहो....जग आपल्या कृतींकडे पहात असते....त्या नजरेस आपण पात्र असलो की बाकी कशाचं काहीही महत्त्व रहात नाही,हे खरेच. या भयावह प्रसंगात मदतीचा हात पुढे केलेल्या सर्वांना परमेश्वर दीर्घायुरारोग्य देवो,ही प्रार्थना. मराठी मातीने देशाला एक कर्तृत्ववान सेवक दिला आहे,याचा एक मराठी भारतीय म्हणून आपल्यालाही अभिमानच वाटेल. लिहिताना अभिमानाच्या भरात एखाद-दोन बाबी जास्तीच्याही लिहिल्या गेल्या असतील. पण आताच्या जगातील नकारात्मक अन्वयार्थाच्या काळ्या आभाळात श्री.दत्तात्रय भाऊसाहेब शिंदे यांच्या त्रिगुणात्म्क कार्याचा चंद्रप्रकाश सर्वांनाच सकारात्मक ऊर्जा देऊन जाऊ शकेल असं वाटलं...म्हणून हा लेखनप्रपंच. या लेखाच्या शेवटी वापरलेलं चंद्राचं छायाचित्र बहुदा स्वत: श्री.शिंंदे साहेबांनीच काढलेलं असावं....ते त्यांच्या ट्वीटर हॅंडलवर दिसले! लेखातील माहिती अर्थातच विविध माध्यमांतून,बातम्यांतून जशी समजली तशी लिहिली आहे. तपशील प्रत्यक्ष काहीसा वेगळाही असू शकतो...याबद्द्ल दिलगीर आहे. चला, आपल्या मराठी पोराचं तोंडभरून कौतुक करूयात....वचनं कीं दरिद्रता?
क्रिकेटमधला सूर्या किती दूरवर षटकार मारतो त्यापेक्षा हा आपला हा चंद्र किती उंचीवर पोहोचला आहे याची चर्चा सारा देश करेल...तो सुदिन! सदर रेल्वे दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या जीवांना श्रध्दांजली आणि जखमी असणा-यांना लवकर बरे वाटावे अशी सदिच्छा.
12 Jun 2023 - 11:10 am | इपित्तर इतिहासकार
लेखक - संभाजी बबन गायके. (मोबाईल नंबर पण आहे तो मुद्दाम देत नाहीये)
7 Jun 2023 - 8:47 pm | पराग१२२६३
धन्यवाद हे शेअर केल्याबद्दल.
8 Jun 2023 - 11:08 am | कर्नलतपस्वी
डॅबिस भौ धन्यवाद.