रास्तों पर निगाह रखने वाले, मंज़िल कहाँ देख पाते हैं|
सफर तो ताउम्र हैं, दरमियाँ सुकून के दो-पल कमाने है|
घड्याळाच्या काट्याला बांधलेलं आयुष्य स्वीकारून आता उणीपुरी दोन दशके सरायला झालीत. प्रवास सुरु आहे आणि राहील ही, रस्ता पायाखाली तर आहे पण पोहोचणार कुठे व कधी याचा काहीचं अदमास अजूनही लागलेला नाही. त्यामुळेच एखाद्या अनवट वळणावर वाट थोडी वाकडी करून, चाकोरीबद्ध जगण्याला हुल देण्याची लागलेली खोडं काही जाता जात नाही.
सह्याद्री आणि समुद्र म्हणजे चाकोरीला मोडण्यासाठी नेहमीच आव्हान देणाऱ्या जागा. वाट वाकडी करून उतरायचं असेलच तर याशिवाय दुसऱ्या पर्यायाचा विचार मी सहसा करत नाही.
हया वेळेस वाकडी केलेली वाट मला "वेळणेश्वर" या छोट्याशा पण नितांतसुंदर गावाला घेऊन गेली. अपार निसर्गसौंदर्याने नटलेली कोकणची भूमी, माडा-पोफळी, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडे, डोंगरउतारांवरील खाचरांची नक्षी आणि पार्श्वभूमीला समुद्राची घनगंभीर गाज...... निसर्गाचा वरदहस्त या अपरांतक प्रदेशाला लाभला आहे.
गुहागर-तवसाळ रस्त्यावरून डाव्या हाताला वळून सड्यावरून जाणारा सपाट रस्ता संपला की मग तीव्र उतारांचा वळणा-वळणांचा रस्ता उतरून गावात प्रवेश होतो. वळणावरून गाडी पास होतांनाच समोर अथांग सिंधू-सागराचं अमोघ दर्शन होतं.
वेळणेश्वर हे गुहागरपासून साधारण १५ किलोमीटरवर, वेळणेश्वर-महादेवाच्या साथीने सुमारे १२०० वर्षांपुर्वीपासून जागते-राबते गाव, सभोवताली नारळ-पोफळीच्या बागा, अर्धचंद्राकृती, सुरक्षित आणि स्वच्छ समुद्रकिनारा. किनाऱ्यावरून डाव्या हाताला दिसणारा जिंदाल औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्प आणि उजव्या हाताला सुरू होऊन मागे जाणारी टेकडी, झाडांच्या गर्दीतून माना उंचावणारी घरे, रिसॉर्ट्स असा इथला परिसर.
कोकणातील अनेक घराण्यांचं कुलदैवत असणाऱ्या इथल्या वेळणेश्वर महादेवाच्या मंदिराचा परिसर तर अक्षरक्ष: भुरळ पाडणारा आहे. प्रशस्त मंदिर आवार, साधारण १० फुट उंचीची दीपमाळ, घुमटाकार शिखराचा सभामंडप, बाहेर पितळी ओटा, त्यावर चारही बाजूने एकमुखी मुखवटे आणि त्यावर पाच फन्यांचा नाग आहे. गाभाऱ्यात अडीच -तीन फुटी लांबीची पिंड असून पिंडीच्या मागे कोनाड्यात पार्वती आणि गणपतीच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्याबाहेर कालीमाता , महिषासुरमर्दिनी , गोपाळकृष्ण यांच्या पंचधातूच्या तर विठ्ठल-रखुमाईची पाषाणातील मुर्त्या आहेत. मुख्य मंदिराला लागुनच काळभैरव, गणपती, लक्ष्मीनारायण अशी मंदिरे आहेत.
तसेच गावराखा, भुताई या ग्रामदैवतांचं ही एकमंदिर मुख्य मंदिराला लागूनच आहे. संपुर्ण मंदिर परिसर आकर्षक रंगसंगतीमध्ये रंगवला आहे व कटाक्षाने स्वच्छ राखला जातो. मन प्रसन्न करणारी ऊर्जा इथे जाणवत राहते.
पर्यटकांसाठी गावात घरगुती तसेच जवळपास काही हॉटेल्स-रिसॉर्ट्स मध्ये सोय होते. वेळणेश्वर भक्त निवासही उपलब्ध आहे.
जेवणाबद्दल बोलायचं तर मत्स्यप्रेमींची थोडी निराशा होते कारण पापलेट-सुरमई सारख्या माशांची इथे वानवा आहे. आधी सांगून ठेवलं तरच सोय होऊ शकते. इतर शाकाहारी-मांसाहारी जेवण मात्र अप्रतिम मिळते. MTDC रिसॉर्टचं लोकेशन तर एकदम लाजवाब आहे.
समुद्रकिनारा अजिबात गर्दी नसलेला, कुठल्याही प्रकारच्या वॉटर स्पोर्ट्सचा गोंगाट नसलेला, पांढऱ्या शुभ्र वाळूचा आहे. किनाऱ्यावरून छोट्या मासेमारी बोटी अतिशय सुंदर दिसतात. या ठिकाणावरून आम्ही पाहिलेल्या सूर्यास्ताचं वर्णन करण्यास तर शब्द ही थिटे पडावे अशी गत.....
असो, दोन दिवस निवांत घालवावे अशी ही सुंदर जागा सदोदित अशीच राहो ही वेळणेश्वर चरणी प्रार्थना !!!
#कोकण
#वेळणेश्वर
#रत्नागिरी
#गुहागर
प्रतिक्रिया
24 May 2023 - 12:38 pm | गोरगावलेकर
वेळणेश्वर सुंदरच. वेळणेश्वर बरोबर आजूबाजूच्या परिसरातील हेदवीचा दशभुजा गणेश, जयगड, जयगडला जातांना तवसाळ जेट्टीहून प्रवास सर्वच सुंदर.
माझे लेखन वेळणेश्वर लेखापासूनच सुरु झाले होते ते आठवले.
24 May 2023 - 12:52 pm | चौथा कोनाडा
24 May 2023 - 12:53 pm | चौथा कोनाडा
सुंदर !!!
अ ति श य सुंदर लेखन आणि अप्रतिम प्रचि !
💞
वेळणेश्वराला जायचा योग आला होता, तीन चार तासच तिथे होतो, मोठी भुरळ घातली या जागेने. पुन्हा आलो तर मुक्कामालाच येवू , दोन तीन दिवस इथं शांतपणे घालवू असं ठरवलं .... पण तो योग अजुन आला नाहीय !
24 May 2023 - 2:10 pm | नचिकेत जवखेडकर
मस्त! वेळणेश्वरला खूप वर्षांपूर्वी जाणे झाले होते. हेदवी, वेळणेश्वर हा परिसर खूपच छान आहे.
24 May 2023 - 2:15 pm | अनिंद्य
सुंदर परिसर. गुहागर-हेदवी-वेळणेश्वर अजून थोडे 'पर्यटकमुक्त' आहेत ते एक बरेय. एकदोनदा भेट देण्याचे सौभाग्य लाभले आहे.
समुद्रकिनाऱ्याची चित्रे फारच छान.
24 May 2023 - 2:17 pm | राजेंद्र मेहेंदळे
वेळणेश्वर, हेदवी, बामण घळ ,तवसाळ-जयगड, मालगुंड, गणपतीपुळे, आरे-वारे,ढोकमळे, रत्नागिरी अशी ३-४ दिवसाची मुंबई-पुण्याहुन मस्त सहल होते. वेळणेश्वर आणि पुळ्याला एम टी डी सी रिसॉर्ट मस्त. अधिक वेळ असल्यास अजुन खाली सुद्धा उतरु शकता(कोस्ट्ल कर्नाटक)
24 May 2023 - 5:47 pm | कंजूस
आवडलं.
24 May 2023 - 8:39 pm | श्रीगणेशा
छान लिहिलंय.
खरं आहे!
इसवी सन २०१७ मधे, कर्देहून गणपतीपुळेला जाताना वेळणेश्वरला काही तास थांबलो होतो, फक्त मंदिर पाहता आलं:
https://www.misalpav.com/node/49912
24 May 2023 - 8:43 pm | श्रीगणेशा
छान लिहिलंय.
खरं आहे!
इसवी सन २०१७ मधे, कर्देहून गणपतीपुळेला जाताना वेळणेश्वरला काही तास थांबलो होतो, फक्त मंदिर पाहता आलं:
https://www.misalpav.com/node/49912
25 May 2023 - 5:45 pm | चक्कर_बंडा
दोन्ही भाग लगेच वाचले, खरं म्हणजे पाहिले म्हणावं लागेल .. प्रकाशचित्रे अतिशय सुंदर.....
24 May 2023 - 8:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छायाचित्र सुंदर, वेळणेश्वर वृत्तांत भारी.
-दिलीप बिरुटे
25 May 2023 - 8:55 am | Bhakti
सुंदरच!
25 May 2023 - 11:36 am | कर्नलतपस्वी
कुठेही,केव्हांही मस्तच.
सह्याद्रीमधील घाट रस्त्यांची विविध रूपे (सहा ऋतू मधली)बघताना खुप आनंद येतो. बरेचसे घाट रस्ते बघून झाले पण एकोणीसशे सत्तर मधे बघितलेले खंबाटकी व कोयना घाट आता माझ्यासारखेच मवाळ झाले आहेत असे वाटते.
नुकताच गगनबावडा ओलांडून गेलो तो मात्र ययाती सारखा चिरतरुण वाटला. अंबेनळी कडून परत येणार होतो पण रस्त्यात एका चहाच्या टपरीवर स्थानिक, चहा घेत असलेल्या ग्राहकांनी सांगीतले की परिस्थिती वाईट आहे. तेव्हा अर्ध्या रस्त्यातून परत फिरलो.
पाळंदे व मालगुंड हे किनारे खुप आवडतात वर्षा दोन वर्षांत एकदा तरी जातोच. आता तारर्कर्ली बॅक वाॅटर बघितल्यावर तो एक अधिक.
वेळणेश्वर,गुहागर बहुतेक या वर्षात होईल.
भटकंती आवडली.
25 May 2023 - 5:38 pm | चक्कर_बंडा
कोयना म्हणजे कुंभार्ली घाटच ना ? २००९ ला पहिल्यांदा पाहिला त्यावेळी उतरताना दिसलेला पहिल्या वळणावरचा नजारा अजूनही आठवतो. यावेळेस बराच फरक पडलेला जाणवला.
आंबेनळी आणि वरंधा दोन्ही घाट रस्ते बहुतांशवेळा खराबंच असतात.
२०१५ ला गुहागरचा किनारा पाहिला तेव्हा त्याच्या प्रेमातच पडलो होतो. यावेळी गेलो तेव्हा उगाच आलो, जुन्या आठवणीतला कैक पटीने सुंदर होता असे थोड्यावेळासाठी वाटून गेले.
25 May 2023 - 6:34 pm | कर्नलतपस्वी
वरांधा पावसाळ्यांत भारी वाटतो. घाट चढून गेल्यावर मिळणारी गरम भजी आणी गरमागरम चहा आहाहा.
वाहन चालवण्याचे वेड वेगळेच.
25 May 2023 - 5:04 pm | चक्कर_बंडा
सर्वांचे आभार
26 May 2023 - 8:37 am | मदनबाण
आज परत त्याच जुन्या दिवसात रमुन आलो.... :)
जाहिरात :- चित्रमय कोकण दर्शन (भाग ४) गुहागर समुद्र दर्शन.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- SHOORVEER 3 - A Tribute to छत्रपति शिवाजी महाराज | Rapperiya Baalam Ft. Shambho I Meetu Solanki
30 May 2023 - 5:27 am | पर्णिका
भटकंती आवडली.
फोटोही सुरेख, सहावा विशेष आवडला.
सुखद बदल... :)
2 Jun 2023 - 7:13 pm | MipaPremiYogesh
मस्त वर्णन , आमची २० वर्ष पूर्वी केलेली ट्रिप आठवली.
13 Jul 2023 - 4:35 pm | चक्कर_बंडा
हा धागा भटकंती सदरात हलवावा ही विनंती...