काल जागतिक मातृदिन होता. “जो जे वांछील ,तो ते लाहो||प्राणिजात ||” असे समस्त विश्वासाठी पसायदान जिथे मागून साऱ्या विश्वाची ‘माऊली’ झालेल्या ज्ञानेश्वरांच्या पैस या खांबाला भेट दिली.उणापुरा तीन फुट कातळ खांब ,जरासा एकटाच! डाव्या बाजूला सूर्य चंद्र हे पैस म्हणजे अवकाश यांच चिरंतर प्रतिक आहे.प्राकृत मराठी जिथे नवतरुण युवकाच्या असीम विद्येतून जिथे आकार घेत होती,ज्ञानेश्वरीचे अमृत जिथे पाझरले तिचा साक्षीदार हा पैस!पैसाभोवती वारकरी सांप्रदाय आजही परंपरा जपत आहे ,याचे मुल्य कित्येक पिढ्या चुकवू शकत नाही.दोन क्षण पैसवर डोके टेकवले असता,काळ गळून पडावा आणि माउली प्रगटावी.अमृताचे बोल कानी पडत आहे,समस्त जग आजूबाजूला बसून तल्लीन व्हावे असे वाटले.दुर्गाबाईंचे ‘पैस’ हे ललित पुस्तक प्रसिद्ध आहे.त्यात बाई म्हणतात “पैसच्या वरचे जग आजही पैशावरच तोलले आहे.”पण तरीही ज्ञानेश्वरी ज्याने अनुभवली त्याने अनेक कोनापैकी एक जीवन कोन नक्कीच जाणला आहे.
१५ व्या शतकापर्यंत करवीरेश्वर हे महादेवाचं मंदिर अस्तित्वात होते.पण नंतर क्षतीग्रस्त झाले.याचे काहे अजून दोन जुने खांब आवारातल्या दत्त मंदिरात दिसले.यावरून हे मंदिर किती जुने हे मला नाही समजले पण तो भाग पुरातत्व विभागाचा आहे.मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यानी मला जेव्हा दहा वर्षापूर्वी आले होते तेव्हाही भुरळ घातली होती आणि आजही!पण इतक्या वर्षात मनाच्या प्रदेशातील उलथापालथ जाणवली. पण मराठीशी नाळ जोडलेली कायमचीच आहे. तेव्हा कवितेच्या आधाराने पैसची नजरेला ओढ आणि आज जरा अवकाश विस्तारलेली आत्मिक नजरेची ओढ जाणवली.पसायदान गाऊन पुढे निघाले,आणखीन एक ‘अमृतानुभव’ पाहायला.
नेवासमध्ये विष्णू अवतारांपैकी एक अर्धनारीनटेश्वर ‘मोहिनिराज’ अवताराचे मंदिर आहे.ह्या मंदिराचे सुव्यवस्थित बांधकाम पाहून मी थक्कच झाले.साधारणत: सतराव्या शतकात यांचे पुर्नबांधणी अहिल्यबाई होळकर यांच्या काळात झाली. प्रवेशद्वाराशीच आकर्षक द्वारपाल-भालदार ,चोपदार मूर्ती आहेत.मंदिराच्या छतावरील विविध वाद्ये धारण केलेली शिल्पे मोहक आहेत. भारवाहक यक्ष अगदी मोजावेत इतकी भरपूर होते.मंदिराच्या चौकटीवर विष्णू अवतार कोरलेले आहेत. मोहिनीराजाच्या मूर्ती शेजारी लक्ष्मीदेवीची मुर्ती आहे. पण मंदिर भर वस्तीत आहे,गाभाराही अनेक माणसांना ,कार्यक्रमांना सामावून घेण्याइतपत मोठा नाही त्यामुळे जास्त काळ थांबू शकले नाही.मंदिराचे बाह्यरूप केवळ अप्रतिम आहे. हेमाडपंथी बांधकाम,होळकर काळातील मंदिरांप्रमाणे आकर्षक कळस.काही शिल्पे या कोरलेली पाहायची राहिली बहुतेक.
मनात विचार आला एक ऐहिक अमृतपान आणि एक आत्मिक अमृतपान अनुभवलेले हे नशीबवान ठिकाणच आहे.
आणि हो नेवासातील शनी शिंगणापूर ही पाहिले.येताना जातांना गुलमोहराचे लाल झुंबर आणि बहावाची सोनेरी झुंबर निसर्गाची ग्वाही अधोरेखित करत राहिली.
-भक्ती
पैस
मोहिनीराज
बहावा
रसप्रिया
प्रतिक्रिया
15 May 2023 - 3:26 pm | Bhakti
हा आणि मागचा पारनेर -३ लेख भटकंती मध्ये समाविष्ट करावा ही संपादकांना विनंती.
बहावा नाही बहवा पाहिजे.
15 May 2023 - 4:14 pm | कुमार१
चांगली माहिती.
15 May 2023 - 5:37 pm | कंजूस
तुम्ही लवकरच या छंदात पडलात, लेकीलाही दाखवता.
दुर्गाबाईंचं पैसे वाचलंय. त्यांचं ऋतू वाचलंय. झाडांची बारा महिन्यांतील वर्णने. तर लेखात दोन्हीही आलं. फोटोही आले. थोडक्यात लक्षवेधक.
संभाजीनगर, नगर, ज्ञानेश्वर उद्यान, वेरूळ,अजंठा असं एसटी/रेल्वेने थोडं थोडं वेगळं पाहिलं. पण मधली ठिकाणं सुटतात.
15 May 2023 - 5:51 pm | चौथा कोनाडा
जागतिक मातृदिन निमित्त माऊली बद्दल लिहिणं ... सुंदर कल्पना आहे.
खुप छान लिहिलंय !
मोहिनीराज मंदिराची माहिती आणि प्रचि सुंदर !
इतर दोन प्रचि झकासच !
15 May 2023 - 6:14 pm | कर्नलतपस्वी
भटकंती आवडली.
मोहिनीराज कुलदैवत असल्यामुळे नेवासे येथे बरेच वेळा जाणे होते.या मंदिराचा जीर्णोद्धार होळकरांचे दिवाण गंगोबा तात्या चंद्रचूड यांनी केला.तत्कालीन सरन्यायाधीश यांचे पुर्वज आणी पेशवाईतील एक बडे प्रस्थ. कनेरसर, हे चंद्रचूड यांचे मुळगाव. तीथे यांचा मोठा भुईकोट किल्लयासारखा वाडा आहे. प्रथमदर्शनी याची बनावट शनिवारवाड्या सारखी दिसते. बरेच वेळा या वाड्यात जाण्याचा योग आला.
भक्ती,याच रस्त्यावर , नेवासा पासून दहा बारा कि मी वर,गंगापूर येथे भव्य व सुदंर दत्त संस्थान आहे. हायवेवर गंगापूर फाटा,पाच कि मी आत मधे. येथील पेढे व नारळ बर्फी खुपच चविष्ट आहे. जाल तर जरूर खाऊन बघा. अर्थात दत्त मुर्ती सुद्धा
खुप सुदंर आहे.
बहावा एक सुंदर वृक्ष आहे व त्याचा फोटो सुद्धा मस्त आहे. कवयित्री इंदिरा संत यानी खुप सुदंर याचे वर्णन केले आहे.किती सुंदर कवीता ...
नकळत येती ओठावरती
तुला पाहता शब्द वाहवा,
सोनवर्खिले झुंबर लेउन
दिमाखात हा उभा बहावा ।
-
लोलक इवले धम्मक पिवळे
दवबिंदूतुन बघ लुकलुकती,
हिरवी पर्णे जणू कोंदणे
साज पाचुचा तया चढवती ॥
-
कधी दिसे नववधू बावरी
हळद माखली तनु सावरते
झुळुकीसंगे दल थरथरता
डूल कानिचे जणू हालते ।
-
युवतीच्या कमनीय कटीवर
झोके घेई रम्य मेखला,
की धरणीवर नक्षत्रांचा
गंधर्वांनी झुला बांधला ॥
-
पीतांबर नेसुनी युगंधर
जणू झळकला या भूलोकी,
पुन्हा एकदा पार्थासाठी
गीताई तो सांगे श्लोकी ।
-
ज्या ज्या वेळी अवघड होई
ग्रीष्माचा तुज दाह सहाया,
त्या त्या वेळी अवतरेन मी
बहावा रुपे तुज सुखवाया ॥
- *इंदिरा संत.*
17 May 2023 - 8:04 am | Bhakti
कर्नल काका
मस्तच माहिती दिली.कविता वाचून सुंदर वाटलं.
बहुतेक तुम्ही देवगड म्हणत असावेत,ते खुपदा पाहिले आहे.
शिंगणापूरला पण नारळबर्फी मिळते एकदम छान असते.
18 May 2023 - 7:17 am | प्राची अश्विनी
वाह! प्रतिसाद आणि माहिती आवडली.
एकच सांगायचंय, ही कविता दिपाली ठाकूर यांची आहे.
18 May 2023 - 8:49 am | गवि
+१
दिपाली ठाकूर म्हणजे खुद्दही मिपाकर आणि आपले जुने मिपाकर गणपा यांच्या सौभाग्यवती.
येथे पहा:
https://youtu.be/-tAcwxDAR-Y
या मुलाखतीत देखील त्यांनी ही कविता म्हटली आहे.
18 May 2023 - 9:14 am | कर्नलतपस्वी
माहितीबद्दल धन्यवाद.
खरोखरच सुंदर कवीता आहे. माझा माहितीचा सोर्स अंतरजालावरून.
15 May 2023 - 6:20 pm | nutanm
छान , माहिती वर्णन अजून विस्ताराने हवे होते असे वाटल्यावाचून रहात नाही.अध्यात्माच्या दृष्टीकोनातून लिहिलेले .
16 May 2023 - 1:34 am | हणमंतअण्णा शंकर...
यांच्या त्या अद्वितीय पुस्तकामुळे पैसाचा खांब ही माझ्यासाठी खूप हृद्य गोष्ट आहे. तो जसा दुर्गाबाईंना अनुभवता आला तशी तर आपली लायकीच नाही तरीही नेवाश्याला गेलो की तिकडे जाणे होतेच.
एकच गोष्ट खटकते.
मंदीर व्यवस्थापनाला सुद्धा तक्रार करून झाली आहे तरीही त्या मद्दड लोकांच्या डोक्यात हे काही शिरत नाही.
पैसाचा खांब ते सरळ सरळ पैशाचा खांब करून टाकतात.
ज्या खांबाला टेकून माऊलींना वैश्विक पसायदान मागितलं, त्या खांबाशेजारी दानपात्राची ती गलिच्छ पेटी ठेऊ नका अशी माफक अपेक्षा आहे. म्हणजे बघा, हा माऊलींचा अपमान आहे. अमूल्य ज्ञानाची गंगा माऊलींनी या खांबाजवळ महाराष्ट्रात वाहती केली. मराठीला, मराठी संस्कृतीला जे वैभव माऊलींनी दिले, त्याचे मोल कसे करू शकतो आपण? मग अशी अलौकिक, अनमोल घटनेचा प्रत्यक्ष साक्षी आहे त्याशेजारी आपली कुबडी दानत दाखवायला दानपेटी ठेऊन भीक मागणे जरातरी शोभते काय? तेही अगदी खांबाला खेटून. कशी बुद्धी चालते अशी?
असो. माऊलींना वंदन आणि दर्शनाचा लाभ दिला त्यामुळे तुमचे आभार.
16 May 2023 - 4:43 am | कंजूस
समाजात बदल नाही.
17 May 2023 - 8:07 am | Bhakti
अण्णा
अगदी सहमत!कधी निर्णय घेतील काय माहित?
16 May 2023 - 8:58 am | प्रचेतस
सुरेख लिहिलंय. नेवासेतील मोहिनीराज मंदिर पाहिले आहे मात्र पैस खांब नव्हता पाहिला.
16 May 2023 - 10:38 am | राजेंद्र मेहेंदळे
प्रचेतस यांनी न बघितलेले काहीतरी आहे तर!!
16 May 2023 - 9:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान माहितीपूर्ण लेखन आवडले. पहिल्याछूट, अण्णांच्या मतांशी सहमती व्यक्त करतो. 'खांबाला समोर करुन, पैशाचा पेटी बघवत नाही. ज्ञानेश्वरांचं महत्त्व समजायला पाहिजे लोकांना. श्री ज्ञानेशांच्या पवित्र चरणांनी पावन झालेली ही नगरी आहे. ज्ञानेश्वरांनी या खांबाला पाठ टेकून लेखन केले तो काळ आणि ते भगवद्गीतेचं ज्ञान सामान्यांना व्हावं, या हेतूने ते केलेलं लेखन आहे, नेवासे हे ज्ञानेश्वरीचं लेखनस्थळ आहे. नेवासा नगरीचं कौतुक ज्ञानेश्वरीतच आहे. पावित्र्य जपलं पाहिजे.
ऐसे युगी वरी कळी । आणि महाराष्ट्र मंडळी
श्री गोदावरीच्या कुळी | दक्षिणिली
तेथ महेशान्वय संभृते । श्रीनिवृत्तनाथ
केले ज्ञानदेव गीते । देशीकार लेणे (ज्ञा.अ. १८ वी ओवी)
गाव जवळ असल्यामुले नेवाशाला जाणे येणे असते. नदीमुळे विभागल्यामुळे दोन नेवासे पूर्वी होते. मोहनीराजाचे नेवासेही म्हणून नेवासे प्रसिद्ध होते. लीळाचरित्रातही नेवाशाचा उल्लेख येतो. चक्रधरस्वामी नेवाशाला यायचे. नेवाशाबद्दल सविस्तर लेखन आलं पाहिजे. खांबावरील लेखन संस्कृत आहे, तेलवाती सुरु राहीली पाहिजे. आणि शेवटी, शापाशिर्वाद आहेत. ( वल्ली काय रे सगळं सविस्तर लिहिणे) बाकी, 'ज्ञानियांचा राजा'स नमस्कार करुन थांबतो.
-दिलीप बिरुटे
16 May 2023 - 12:25 pm | प्रचेतस
वाचन हुडकायला बरेच संदर्भ तपासावे लागले. देव, तुळपुळे, माटे यांच्या ग्रंथात ह्या लेखाचा उल्लेख नाही मात्र श्री. महेश तेंडुलकरांच्या 'शिलालेखांच्या विश्वात' ह्या ग्रंथात ह्याचे वाचन आढळले ते याप्रमाणे
ओन्नम : [कर] वीरेश्वराय । पिता
महेन यत्पूर्व [दत्तं] षट्कं जगद्गुरोः [जगद्गुरो]
अखंडवर्त्ति तैलार्थ प्र
तिमासं सदा हि तत् । [रूपका]
णां षट्क संख्या देया आचंद्रसू
र्यकं । [ यः स्वी] करोति दुष्टः [सः ] तस्य
पूर्वे व्रजंत्यधः । मंगल महाश्रीः ।।
१. अर्थ : ॐ करवीरेश्वरास नमस्कार असो. पूर्वी माझ्या पितामहाने [ वडिलांनी] जगद्गुरूस दरमहा अखंड तेलवातीसाठी [नंदादीप सतत तेवत ठेवण्यासाठी] जे सहा रुपये दिले तेच सहा रुपये [आकाशात] चंद्रसूर्य असेपर्यंत देण्यात यावेत. जो त्यांचा अपहार करील तो दुष्ट होय, त्याचे पूर्वज नरकात जातील. महाश्री [मोहनीराज ] मंगल करो...
अर्थात हा लेख कालोल्लेखविहिन आहे. श्री गुप्ते यांनी याचे वाचन केले. मात्र त्यांनी रुपका हा तिथे नसलेला शब्द तिथं नष्ट झालेला असल्याने ठशांच्या आधारे अंदाजे दिला आहे मात्र त्याचा अर्थ रुपया लावला आहे तो त्यानुसार हा लेख बहुधा पेशवेकालीन असावा असे दिसते किंवा रुपका म्हणजे रुपये नसून चांदीची नाणी असावीत असेही असू शकते.
16 May 2023 - 12:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> वाचन हुडकायला बरेच संदर्भ तपासावे लागले.
आवर्जून संदर्भ पाहुन प्रतिसादाबद्दल आभार.
माझ्याकडेही एक लेख 'वाचन' संदर्भ आहे, पण तो काळ संदर्भ पाहतां चांदीची नाणी हेच योग्य वाटते.
-दिलीप बिरुटे
17 May 2023 - 8:17 am | Bhakti
प्रचेतस
ओन्नम : [कर] वीरेश्वराय । पिता
महेन यत्पूर्व [दत्तं] षट्कं जगद्गुरोः [जगद्गुरो]
अखंडवर्त्ति तैलार्थ प्र
तिमासं सदा हि तत् । [रूपका]
णां षट्क संख्या देया आचंद्रसू
र्यकं । [ यः स्वी] करोति दुष्टः [सः ] तस्य
पूर्वे व्रजंत्यधः । मंगल महाश्रीः ।।
हा श्लोक पैस खांबावर कोरलेला आहे.इथे तो समाविष्ट व्हायलाच हवा होता.खुप खुप धन्यवाद!
17 May 2023 - 6:21 pm | कर्नलतपस्वी
सर्वांचे आभार. गेली पन्नास वर्षात कित्येक वेळा नेवाश्याला गेलो असेन. दर वेळेस कुलदैवत, साडीचोळी,धोतर,फळफळावळ, यथाशक्ती दान एवढेच अंधानुकरण होत होते. माऊलीचे ते पवित्र स्थान कित्येक वेळेस बघीतले. आता बर्याच नवीन गोष्टी कुठल्या.
सर्वांचे धन्यवाद.
17 May 2023 - 8:12 am | Bhakti
बिरूटे सर
होय ते मंदिरही आहे तिथे आणि खंडोबाची सासूरवाडीही नेवासाच,म्हाळसा मंदिरही आहे.
रचक्याने प्रवरासंगम पाहूया असा प्रस्ताव मांडला होता पण अनुमोदन नाही मिळालं!
मागच्या आठवड्यातही औरंगाबादला जाताना प्रवरासंगम ने लक्ष वेधले होतं पण सातच्या आत घरी पोहचायचय होतं.सुंदर ठिकाण आहे, मस्तच!
16 May 2023 - 10:14 am | टर्मीनेटर
छोटेखानी भटकंती लेख आवडला 👍
सध्याच्या रखरखीत उन्हात पिवळ्याजर्द फुलांनी लगडलेला बहावा वृक्ष पाहणे हि पर्वणीच वाटते!
16 May 2023 - 10:39 am | राजेंद्र मेहेंदळे
लेख आवडला
17 May 2023 - 8:01 am | Bhakti
धन्यवाद मंडळींनो!
कुमारजी,कंजूसकाका,नूतनताई, चौकोनी, टर्मिनेटर, राजेंद्रजी,_/\_
17 May 2023 - 8:31 am | Bhakti
18 May 2023 - 7:14 am | प्राची अश्विनी
मातृदिन माऊलींची भेट ही कल्पना किती सुंदर आहे!
सुरेख वर्णन. एकदा गेलं पाहिजे इथं असं प्रकर्षाने वाटतंय.
18 May 2023 - 3:44 pm | Bhakti
:)
21 May 2023 - 12:03 pm | गोरगावलेकर
छान माहिती
22 May 2023 - 1:58 pm | Bhakti
धन्यवाद :)