कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ९
आधीचा भाग:
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ८
"आजची ही आमची गोव्यातली शेवटची रात्र होती, उद्या सकाळी पणजीत थोडीफार निरुद्देश भटकंती आणि 'रिस मागोस' किल्ला पाहून पुढे कुडाळला जाण्याचा कार्यक्रम ठरवला होता त्यामुळे सकाळी लवकर उठण्याची घाई नव्हती पण आज दिवसभरात केलेल्या किल्लेदर्शनाने थोडे दमायला झाल्याने झोप यायला लागली होती म्हणून फारवेळ टाईमपास न करता अकराच्या आसपास झोपी गेलो..."
आजच्या दिवसात विशेष काही भटकंती करायची नसल्याने सकाळी चांगली दहा -सव्वा दहा पर्यंत झोप काढल्यावर चहा पिऊन अंघोळी-पांघोळी उरकून ताजेतवाने होईपर्यंत अकरा वाजले. भाऊजी निरोप वगैरे घेण्याची औपचारीकता पूर्ण करण्यासाठी आमची झोपमोड न करता नऊ वाजता ऑफिसला गेले होते, आणि ही दोन ढोणकुरे आज लवकर उठणार नाहीत ह्याची खात्री असल्याने बहिणीनेही नाश्ता बनवण्याच्या भानगडीत न पडता सरळ जेवणच लवकर बनवायला घेतले होते.
सुकं खोबरं घालून बनवलेली कार्ल्याची सुकी भाजी, फुलके, चटणी, कोशिंबीर आणि तिची स्पेशालिटी असलेला 'नारळी भात' असा सुटसुटीत मेनू होता. आलम दुनियेत अशा चवीचा नारळी भात तिच्याशिवाय अन्य कोणी बनवू शकत नाही ह्या गोष्टीवर आम्हा तमाम कुटुंबियांची-नातलगांची गाढ श्रद्धा आहे! गुळाच्या पोळ्यांसाठी 'संक्रांतीची' आणि नारळी भातासाठी 'नारळी पौर्णिमेची' वाट बघण्याची आमच्याकडे पद्धत नाही. हे पदार्थ त्या दोन विशिष्ट दिवसांसहीत वर्षभरात अधून-मधून केव्हाही बनवून आवडीने खाल्ले जातात आणि ज्या घरात, जिने कोणी हा घाट घातला असेल ती मावशी/ मामी/ आत्या/ काकू/ बहीण/ वहिनी हि तिच्याकडूनच घेतलेली लिखित रेसिपी समोर असतानाही प्रत्येकवेळी नारळीभात बनवताना ह्या बहिणीला फोन करून त्रास देण्याच्या परंपरेचे कसोशीने पालन करतात. अर्थात तयार झालेला नारळीभात उत्तम होतो ह्यात शंका नाही पण तरीही त्याला ती विशिष्ट चव मात्र येत नाही, हि कदाचित आमची अंधश्रद्धा असेल 😀
असो, आवडीच्या पदार्थांचा समावेश असलेले जेवण करून साडेबाराच्या सुमारास आम्ही बहिणीचा निरोप घेऊन पणजीच्या दिशेने निघालो. वीस-पंचवीस मिनिटांत पणजीला पोचल्यावर भावाला त्याच्या पाच वर्षांच्या मुलासाठी थोडेफार गोवा स्पेशल कपडे आणि खेळणी घ्यायची हुक्की आली म्हणून बांदोडकर मार्गावर बाईक पार्क करून आम्ही चालत पणजी मार्केटकडे आमचा मोर्चा वळवला.
पंधरा-वीस मिनिटांत त्याची खरेदी आटपेल असा माझा प्राथमिक अंदाज होता पण दुकानात शिरल्यावर जेव्हा त्याने बायकोला व्हिडीओ कॉल करून फोन मुलाला द्यायला सांगितले आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून दुकानातले विविध कपडे दाखवत रंग आणि डिझाईन विषयी त्याच्याशी लाडी-लाडी चर्चा सुरु केली तेव्हा मला समोरचा धोका स्पष्ट दिसून आला! आता ही खरेदी कितीवेळ चालेल आणि कितीवेळ आपल्याला हे कौतुक सहन करत उभे राहावे लागेल किंवा किती दुकाने फिरत तंगडतोड करावी लागेल ह्याचा नेम नाही ही गोष्ट लक्षात आल्यावर मी तिथून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आणि बाईकची चावी त्याच्याकडे सुपूर्द करून इथून निघाल्यावर 'रिस मागोस' किल्ल्यावर जाण्याआधी आम्ही थोडावेळ 'बसण्यासाठी' ठरवलेल्या ठिकाणी जायला पुढे निघालो.
लांबवर दिसणारा मांडवी नदीवरचा नवा पूल
दुपारची वेळ असल्याने मोकळ्या ढाकळ्या बांदोडकर मार्गावरून काही फोटो काढत छोटीशी पदयात्रा करून मी मांडवी नदी किनाऱ्यावरील 'वॉटरमार्क' ह्या फ्लोटिंग लाउंज & बार मध्ये प्रवेशकर्ता झालो आणि विशाल नदीपात्राचा जास्तीत जास्त भाग दृष्टीस पडेल असे टेबल निवडून त्यावर स्थानपन्न झालो.
ह्या ठिकाणी कॉकटेल्स छान मिळतात पण टळटळीत दुपार असल्याने हार्ड-ड्रींक मागवण्याचा प्रश्नच नव्हता त्यामुळे एक माईल्ड बिअर ऑर्डर करून तिचा आस्वाद घेत, काही वेळासाठी लाभलेला एकांत एन्जॉय करत आजूबाजूचा परिसर न्याहाळत असताना मन एकदम भूतकाळात गेले आणि सुमारे अडीच दशकांपूर्वी म्हणजे विसाव्या शतकाची अखेरची पाच वर्षे आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीची दोन वर्षे, आम्ही तीन मित्रांनी सलग सात वर्षे प्रतिवर्षी गोव्यात होणाऱ्या आमच्या पंधरा-वीस दिवसांच्या वास्तव्यात केलेल्या अनेक गमती-जमती, अनुभवलेले सुवर्णक्षण, त्यातून मिळालेले व्यवहारज्ञान आणि आलेले वास्तवाचे भान अशा अनेक गोष्टी चित्रपटातील फ्लॅशबॅक प्रमाणे डोळ्यांसमोर तरळू लागल्या.
***
बहुरंगी, बहुढंगी आणि बहुभाषिक असा आमचा कॉलेजचा ग्रुप बऱ्यापैकी मोठा होता, त्यात बरीचशी मुले आणि थोड्याफार मुली असे सगळे मिळून सुमारे बावीस जण. "बाळाचे पाय पाळण्यात दिसतात" ह्या म्हणीची सत्यता आपापल्या आई-बाबांना पटवून देण्यासाठीच जणू ज्यांचा जन्म झाला असावा अशा सगळ्या मुलांचा त्यात भरणा! कुठलीही गोष्ट किंवा कृती करण्याआधी काही विचार करायचा असतो अथवा एखादी गोष्ट/कृती केल्या नंतर होणाऱ्या परिणामांचा तरी विचार करायचा असतो वगैरे गोष्टी तेव्हा आमच्या गावीच नव्हत्या. "आली लहर.... केला कहर" म्हणतात तसे सगळेच त्या टाईपचे.
तर अशा ह्या आमच्या ग्रुपने एके दिवशी आमच्या कॉलेजच्या एका प्राध्यापकांना भर वर्गातून मारत-झोडत खाली मैदानात आणून त्यांनी परिधान केलेल्या 'सफारी'च्या पार चिंध्या करून त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्याचा प्रताप करून कॉलेजमध्ये प्रचंड तणावग्रस्त परिस्थिती निर्माण केली होती.
खरंतर ताबडतोब कॉलेजमधून आमची हाकालपट्टी करण्याची आमच्या प्राचार्येची तीव्र इच्छा होती आणि "I don't want rowdies like you in my college" अशा स्पष्ट शब्दांत त्याचे सूतोवाचही आपल्या दाक्षिणात्य ॲक्सेन्ट मध्ये त्या मोहतरमांनी केले होते, पण प्रकरण थोडे वरच्या लेव्हलला गेले आणि ज्या मुलीमुळे हा प्रसंग उद्भवला होता, केवळ तिनेच नव्हे तर आमच्या आणि दुसऱ्या डिव्हिजन्समधल्या अनेक विद्यार्थिनींनी त्या प्राध्यापकांच्या गैर वर्तणुकीचा पाढा कॉलेजच्या मॅनेजमेंट कमिटीसमोर वाचल्याने ते आणखीन नं ताणता त्यावर पडदा टाकण्याचा 'योग्य' निर्णय त्यावेळी घेण्यात आला होता.
तोपर्यंत बाहेर केलेल्या उपदव्यापांतल्या बहुतांश गोष्टी कधीच घरापर्यंत पोहोचू न देण्याची क्षमता आणि खबरदारी आम्ही बाळगून असलो तरी कॉलेजच्या ज्या दोन पिउन्सवर प्रत्येकाच्या घरी जाऊन पालकांना कॉलेजमध्ये बोलावणे करणारी नोटीसरुपी आमंत्रण पत्रिका देण्याची जवाबदारी सोपवली होती, त्यांनी आधी आम्हाला भेटून त्याबद्दलची कल्पना देत त्यांच्या मजबुरीविषयी सांगत एकप्रकारे अभय मागितले होते, त्यावरून आणि एकंदरीत बाकीचे विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या तसेच टीचिंग/नॉन टीचिंग स्टाफच्या नजरा आणि देहबोलीवरून घडल्या प्रसंगाने त्यांच्या मनावर आलेले दडपण किंवा आमच्यामुळे निर्माण झालेली दहशत स्पष्टपणे जाणवली असली तरी ती बाब गौण ठरावी असा आमच्याबद्दलचा धसका खुद्द आमच्या सर्वांच्या घरच्यांनी घेतला होता.
आजही समोर आले तर ज्यांच्या पायांवर आदराने डोके टेकवावे असे वाटणारा शिक्षकवृंद तोपर्यंत लाभला असल्याने पवित्र समजल्या जाणाऱ्या शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या त्या प्रध्यापाकांबरोबर आम्ही केलेल्या प्रकाराबद्दल ना कुठली खंत त्यावेळी वाटली होती ना कुठला पश्चाताप झाला होता, ना आजही त्या कृतीबद्दल कुठली खंत वाटते ना कुठला पश्चाताप होतोय पण... आज इतक्या वर्षांनी त्या प्रसंगाबद्दल लिहिताना आम्हा सर्वांच्याच अतिशय सरळमार्गी जीवन जगणाऱ्या पालकांची त्यावेळची मनस्थिती काय झाली असेल? त्यांच्या मनाला त्यावेळी किती यातना झाल्या असतील? ह्याचा नुसता अंदाज लावतानाही अंगावर शहारे आले.
असो... त्या प्रसंगातून "जे होते ते चांगल्यासाठीच" ह्याची प्रचिती आम्हाला पुढे यायची होती!
***
मित्र-मैत्रिणींच्या अशा मोठ्या ग्रुप्समध्ये सहसा सब-ग्रूप्स असतात त्याप्रमाणे आमचा सहा जणांचा एक सब-ग्रूप होता. त्यातही पुन्हा तीन घनिष्ठ मित्रांचा असा आमचा एक कोअर ग्रुपही होता. त्यातल्या एका मित्राचे वडील पूर्वी कळव्याच्या 'मफतलाल' कंपनीत 'सांस्कृतिक आणि पर्यटन' विभागाची जवाबदारी सांभाळत होते. साडेतीन हजार कामगार काम करीत असलेली ही मोठी कंपनी १९८९ साली बंद पडल्यावर त्यांनी इतरत्र नोकरी न शोधता स्वतःचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरु करून आपला पूर्वानुभव, कठोर परिश्रम आणि कल्पकतेच्या जोरावर पाच-सहा वर्षांत तो भरभराटीलाही आणला होता.
बृहन्मुंबई महापालिकेचा (BMC) मोठ्या संख्येने असलेला कर्मचारी/अधिकारीवर्ग आणि विक्रोळी स्थित 'गोदरेज' ह्या बड्या कंपनीचे काही हजारांच्या संख्येत असलेल्या कामगार/कर्मचाऱ्यांचे मोठे ग्रुप्स आणि त्या सर्वांची मित्रमंडळी/नातेवाईक हे त्यांच्या पर्यटन व्यवसायाचे प्रमुख आधारस्तंभ होते. काश्मीर पासून कन्याकुमारी आणि कलकत्त्या पासून जैसलमेर पर्यंत, थोडक्यात उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम अशा जवळपास संपूर्ण भारतभरात वर्षभर आयोजित होणाऱ्या पॅकेज टूर्सची कुठलीही छापील जाहिरात न करता देखील केवळ 'माऊथ पब्लिसिटी' च्या बळावर त्या सर्व टूर्सचे बुकिंग फुल होत असे.
पुढे त्यात एका नामांकित शिक्षण संस्थेची भर पडल्याने मुंबई-ठाणे परिसरातल्या अनेक उपनगरांत शाखा असलेल्या त्यांच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या वार्षिक सहलींच्या व्यवस्थापनाचे काम त्यांच्याकडे आले होते. त्यातल्या आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांसाठी जानेवारीत असलेल्या 'गोवा' आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातल्या 'दिल्ली-आग्रा-फतेहपुर सिक्री' अशा दोन्ही सहलींना भरघोस प्रतिसाद मिळत असे.
व्यवसायाच्या वाढत्या व्यापाबरोबरच काकांना (म्हणजे मित्राच्या वडिलांना) मनुष्यबळाची कमतरता जाणवू लागली असतानाच्या सुमारासच उपरोल्लिखित 'प्रताप' आम्ही केला होता. आम्हा सर्वांचे चिंताक्रांत पालक आपापल्या परीने त्या परिस्थितीवर उपाय शोधण्याच्या प्रयत्नात असताना ह्या काकांना एक कल्पना सुचली आणि त्यांनी एका रविवारी आम्हा दोन उर्वरित मित्रांच्या घरी येऊन ती आमच्या आई-बाबांसमोर मांडली,
"आपली मुलं हुशार आहेत पण त्याचबरोबर थोडी चक्रम आणि बेजवाबदार पण आहेत. त्यांचा फावला वेळ आणि ऊर्जेला योग्य दिशा मिळाली नाही तर उद्या आपल्या डोक्याचे ताप ती खात्रीने वाढवतील, तेव्हा त्यांच्या कॉलेजला सुट्ट्या असताना त्यांना माझ्यासोबत टूर्सवर घेऊन जाईन, त्यातून मलाही व्यवसायात मदत होईल आणि फिरण्याबरोबरच त्यांनाही दोन पैसे मिळतील व थोडी जवाबदारीही येईल."
त्या परिस्थितीत इतका चांगला प्रस्ताव आमच्या घरच्यांना अमान्य होण्याचा प्रश्नच नव्हता आणि आम्हा 'द थ्री मस्केटीअर्स' साठी तर हि छ्प्परफ़ाड ऑफर होती. भटकंतीची आम्हाला भरपूर आवड असली तरी तोपर्यंत घरच्यांबरोबरच्या लांबच्या कौटुंबिक सहली, एखाद दुसरा चार-पाच दिवसांचा अपवाद सोडता मित्र-मैत्रीणींबरोबरच्या एखाद-दोन दिवसीय पिकनिक्स आणि ट्रेक्स एवढ्यापुरती ती मर्यादित होती, पण आता आमच्या भटकंतीचा कॅनव्हास विस्तारणार होता!
सुरुवातीला शनिवार-रविवार जोडून काही हौसिंग सोसायट्यांच्या 'अलिबाग-किहीम-नागांव बीच' अशा एक रात्र मुक्कामाच्या आणि पावसाळ्यात 'माळशेज घाट' अशा छाट-छुट, एक-दोन दिवसीय सहलींतून सहल व्यवस्थापनाचे प्राथमिक धडे गिरवल्यावर मग १९९५ च्या ऑक्टोबर महिन्यात ऐन दिवाळीत झालेले 'खग्रास सूर्यग्रहण' बघण्यासाठी खास 'खगोल मंडळाच्या' सुमारे २५० सभासदांसाठी आयोजित केलेल्या बुंदेलखंड (उ.प्र.) मधील हमीरपूर आणि दिल्ली- आग्रा-फतेहपुर सिक्री-लखनौ अशा सात रात्री, आठ दिवसांच्या सहलीवर काका आम्हाला घेऊन गेले होते त्यावेळी अत्याधुनिक उपकरणांतून निसर्गाचा अद्भुत खेळ अर्थात 'खग्रास सूर्यग्रहण' पाहण्याचे भाग्य आणि त्याच बरोबर पर्यटकांचा आकाराने मोठा ग्रुप हाताळण्याचा अनुभवही मिळाला होता.
त्या ट्रीप वरून परतल्यावर महिन्या-दिड महिन्याने, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आम्हा तिघांना काकांनी त्यांची नवी कोरी 'टाटा सुमो' आणि ड्रायव्हर देऊन एका 'विशेष मोहिमेवर' गोव्याला पाठवले होते.
वर उल्लेख केलेल्या शिक्षण संस्थेच्या विविध उपनगरांतील शाळांच्या आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या 'गोवा' सहली जानेवारी महिन्यात दहावीच्या प्रिलिम्स सुरु झाल्यावर एका पाठोपाठ एक अशा पाच बॅचेस मध्ये होणार होत्या. प्रत्येक बॅच मध्ये जवळपास १०० ते १५० विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि त्यांचे वर्गशिक्षक. ह्या सर्वांच्या प्रवास, निवास आणि खानपानाच्या चोख व्यवस्थेची पूर्वतयारी म्हणून गोव्यातल्या स्थानिक ट्रॅव्हल एजंट्सशी फोनवर केलेली प्राथमिक बोलणी ॲडव्हान्स देऊन पक्की करण्याआधी त्या व्यवस्थेसाठी त्यांच्याकडून मिळालेल्या सर्व पर्यायांची प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा अहवाल काकांना देण्याची कामगिरी आम्हाला बजावायची होती, एकप्रकारे ती आमची परीक्षाच होती म्हणा ना!
त्यावेळी म्हापश्यातल्या शिरसाट लॉजमध्ये आमचा मुक्काम होता. पुढचे दोन दिवस स्थानिक एजंट्सनी सुचवलेल्या म्हापसा आणि पणजीतल्या ट्रान्सपोर्टर्सच्या ऑफिसना भेट देऊन त्यांच्या बसेसची कंडिशन पाहणे आणि हॉटेल्स मध्ये जाऊन त्यांच्या रूम्स, तिथल्या सोयी-सुविधा आणि स्वच्छता, एवढ्या जणांसाठी चहा, नाश्ता आणि जेवण बनवण्यासाठी ते देऊ करत असलेल्या स्वयंपाकघराची पाहणी आणि अखंडित एलपीजी गॅस सिलेंडर्सच्या पुरवठ्याची खातरजमा करण्यात गेले.
प्रत्यक्ष पाहणीअंती ह्या सर्व गोष्टी आम्हाला अजिबात समाधानकारक वाटल्या नव्हत्या. शाळकरी मुले असली म्हणून काय झालं एकेका रूममध्ये तिच्या आकारानुसार पाच ते सात जण कोंबायचे, त्यात दोन किंवा तीन जण बेडवर तर बाकीचे खाली टाकलेल्या एक्स्ट्रा मॅट्रेसेस वर झोपणार आणि असल्या जुनाट, खटारा बसेस मधून प्रवास करणार हे आम्हाला बिलकुल पटले नव्हते.
संध्याकाळी पणजीतल्या शेवटच्या हॉटेलची पाहणी केल्यावर तिथून जवळच असलेल्या एका "आगे दुकान, पीछे मकान" टाईप घरगुती बार अँड रेस्टोरंट मध्ये बिअरचा आस्वाद घेत काकांना काय रिपोर्ट द्यायचा ह्यावर आम्ही चर्चा करत बसलो होतो. आमची चर्चा आणि काउंटरवर बसलेल्या गप्पिष्ट मालकाच्या चौकशांना टेबलवर बसून आम्ही देत असलेली उत्तरे आमच्या शेजारच्या टेबलवर बसून तळलेल्या बांगड्याचा साथीने बिअर रिचवत बसलेल्या एका तरुणाच्या कानावरही पडत होती. आम्ही गोव्यात कुठल्या कामासाठी आलो आहोत आणि त्यात कुठल्या अडचणी आहेत हे लक्षात आल्यावर त्याने बसल्या जागेवरूनच,
"हाय... मायसेल्फ विली, बट आय ॲम नॉट सिली... " असा मिश्कीलपणे स्वतःचा परिचय देत "तुमची हरकत नसल्यास ह्या कामात मी तुम्हाला थोडीफार मदत करू शकतो!" असे उद्गारता झाला.
एकंदरीत त्याचे राहणीमान आणि देहबोलीवरून तो सभ्य, सुशिक्षित आणि सुसंस्कृत वाटल्याने आम्ही त्याला आमच्या टेबलला जॉईन होण्यास सांगितले.
कोंकणी, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि पोर्तुगीज अशा पाच भाषा अस्खलितपणे बोलणारा पंचवीस-सव्वीस वर्षांचा हा विल्यम मस्करेन्हस उर्फ 'विली' आपल्या वडिलांबरोबर त्यांच्या रिअल इस्टेट एजन्सीच्या व्यवसायात होता. कैक वर्षांपासून गोव्यातील खाणींमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगार/कर्मचाऱ्यांची वाहतूक हाताळण्याच्या पिढीजात व्यवसायात असलेलया, आणि पणजीच नव्हे तर संपूर्ण गोव्यातले व्यवसाय आणि राजकीय क्षेत्रातील 'बडे प्रस्थ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका कुटुंबाच्या नव्या पिढीतला एक वारस ह्या विलीचा वर्गमित्र होता. शेकडो बसेसचा ताफा आपल्या पदरी बाळगणाऱ्या ह्या ट्रान्सपोर्टरची भेट घेतल्यास तुमचे काम सहजरित्या होऊ शकते असे त्याने आम्हाला सांगितले आणि बार मालकानेही त्याला दुजोरा दिला.
संध्याकाळी सहा-सव्वा सहाचा सुमार होता, सात वाजता पणजीतले सर्व व्यवहार बंद होऊन बाहेरून आलेल्यांना इथे कर्फ्यू लागलाय कि काय अशी शंका येण्यासारखी परिस्थिती निर्माण व्हायला अजून पाऊण तास तरी बाकी असल्याने उद्या त्याची भेट घेण्यापेक्षा आजच घेऊ असा विचार करून आम्ही विलीला सोबत येण्याची विनंती केली आणि त्याने ती मान्य केल्यावर तिथून उठून सरळ त्या ट्रान्सपोर्टरचे ऑफिस गाठले.
ऑफिस एकदम टकाटक होते. आमच्या आधी आलेली एक पार्टी केबिन मधून बाहेर पडण्याची वाट बघत फार वेळ नाही पण पाच-दहा मिनिटे आम्हाला रिसेप्शनमध्ये बसावे लागले. केबिनमध्ये गेल्यावर विलीच्या मित्राने ज्या प्रकारे त्याचे स्वागत केले ते पाहिल्यावर मात्र ते खरोखरचे जुने मित्र असल्याची आमची खात्री पटली आणि त्याच्याविषयी मनात जी काही थोडीफार शंका होती ती पण दूर झाली.
सुमारे पाऊण तास चाललेली आमची मिटिंग छान झाली होती. आमचे गोव्याला येण्याचे प्रयोजन, गरजा आणि अपेक्षा व्यवस्थितपणे समजून घेतल्यावर त्याने काही आकडेमोड करुन मुंबई-ठाण्याहून मुलांना गोव्याला आणणे, त्यांना गोवा फिरवणे आणि पुन्हा मुंबई-ठाण्याला नेऊन सोडण्यासाठी होणाऱ्या प्रवासखर्चाचे अंदाजपत्रक तयार करून देत, त्यांच्या ताफ्यातील टॉप कंडिशन मधल्या बसेस देण्याचे आश्वासन तर दिलेच, वर "उद्या दुपारपर्यंत मला वेळ द्या, भावंडांशी चर्चा करून मुलांच्या ॲकोमोडेशनची व्यवस्था आणि भटकंतीचा कार्यक्रमही तयार करून देतो" असे सांगून दुसऱ्या दिवशी चार वाजता पुन्हा भेटण्याची वेळ दिली.
त्याचे आभार मानून ऑफिसमधून बाहेर पडलो तेव्हा साडे सात वाजून गेले असतील त्यामुळे अपेक्षेप्रमाणे सर्वत्र सामसूम झाली होती त्यामुळे मगाशी अर्धवट सोडलेला 'कार्यक्रम' पूर्ण करण्याचा आणि पणजीतच जेवण करून म्हापश्याला परतण्याचा आमचा विचार बारगळण्याची चिन्हे दिसत होती पण "मगाचच्याच बार मध्ये परत जाऊ, त्याचा मालक मागेच राहतो , तिथे बिअर पण मिळेल आणि तुमच्या जेवणाचीही काहीतरी सोय होईल" असे विलीने सांगितल्यावर सगळ्यांच्यात पुन्हा उत्साह संचारला 😀
पुन्हा तिथे पोचल्यावर दुकानाच्या बंद दरवाज्याआड आमचा कार्यक्रम साग्रसंगीत पार पडला. तिथून अगदी जवळ रहात असलेल्या विलीने बिअर साठी कंपनी दिली पण जेवणासाठी त्याला घरी जाणे भाग असल्याने तो थांबणार नव्हता. निघताना दुसऱ्या दिवशी चार वाजता त्याच्या व्यावसायिक कारणांमुळे तो आमच्याबरोबर येऊ शकत नसल्याचे स्पष्ट करून उद्या तुम्ही जाऊन या आणि संध्याकाळी साडेपाच नंतर इकडे आलात तर आपली इथेच भेट होईल असे सांगून त्याने आमचा निरोप घेतला.
रात्री दहाच्या सुमारास लॉजवर परतल्यावर तिथून काकांना फोनवर गेल्या दोन दिवसांत घडलेल्या सर्व घडामोडींचा सविस्तर वृत्तांत सांगितल्यावर पोरं नुसताच आगाऊपणा करत नसून सोपवलेले काम मनापासून करतायत हे बघून ते पण खुश झाले होते!
दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत इकडे-तिकडे फिरत टाईमपास केल्यावर ठरलेल्या वेळी आम्ही ट्रान्सपोर्टरच्या ऑफिसवर पोचलो. विलीच्या मित्राने सांगितल्याप्रमाणे येण्या जाण्याचे दोन दिवस आणि गोवा भटकंती साठी तीन दिवस असा त्या शिक्षण संस्थेला आणि आम्हाला अपेक्षित असल्यापेक्षा चांगला, एकूण पाच दिवसांचा मस्त कार्यक्रम तयार करून ठेवला होता आणि मुलांच्या निवासाच्या व्यवस्थेसाठीही एक ठिकाण शॉर्टलिस्ट करून ठेवले होते, त्याने सोबत दिलेल्या त्याच्या कर्मचाऱ्याबरोबर आम्हाला आता तिथे प्रत्यक्ष भेट देऊन ते ठिकाण पसंत पडल्यास त्यावर शिक्कामोर्तब करण्याचे काम तेवढे बाकी होते.
तिथून निघून मांडवी नदी ओलांडल्यावर जेमतेम २-३ किमी अंतरावरच्या 'ब्रिटोना' येथे असलेल्या एका सरकारी विश्रामगृहात आम्ही पोचलो. ह्या विश्रामगृहाचे स्वरूप मात्र नेहमीपेक्षा थोडे वेगळे होते. पोर्तुगीज शासनकाळात बांधण्यात आलेल्या तीन किंवा चार चांगल्या प्रशस्त खोल्या असलेल्या १५-२० बैठ्या बंगल्यांचा तो एक समूह होता. भरपूर मोकळी जागा, छान सावली देणारी मोठी झाडे आणि एकाबाजूला नदीपात्र असे ते रिसॉर्ट सदृश्य ठिकाण आम्हाला बघताक्षणीच आवडले होते. त्याचा फारसा वापर होत नसल्याने थोड्या साफ-सफाईची गरज होती पण ती करवून घेणे सहजशक्य होते.
तिथून पुन्हा ऑफिसवर आल्यावर आम्हाला ते ठिकाण पसंत असल्याचे सांगून व्यवहाराची बोलणी करायला घेतली. सदर सरकारी विश्रामगृह शैक्षणिक संस्थांना नाममात्र शुल्क आकारून वापरायला दिले जात होते. त्याची मंजुरी मिळवण्यासाठी संस्थेच्या लेटरहेडवर विनंती अर्ज करणे आणि शुल्क भरणे एवढीच काय ती औपचारिकता त्यासाठी आवश्यक होती. थोड्याफार वाटाघाटी करून ॲडव्हान्स वगैरेची रक्कम ठरवून त्याच्या सही-शिक्क्यानिशी लिखित एस्टीमेट आणि विश्रामगृह मिळण्यासाठी द्यायच्या विनंती अर्जाचा मसुदा घेऊन आम्ही तिथून निघालो.
बाहेर पडल्यावर एका पी.सी.ओ. मधून काकांना फोन करून सर्व अपडेटस देऊन संस्थेच्या लेटरहेडवर मसुद्याबरहुकूम टंकलेला अर्ज आणि ॲडव्हान्स देण्यासाठीचे पैसे घेऊन गोव्याला येण्यास सांगितले. आवश्यक ती जमवाजमव करून ते तीन किंवा चार दिवसांनी मुंबई-गोवा खाजगी डेली सर्व्हिसच्या बसने इकडे येणार होते. त्यामुळे अर्थातच तेवढे दिवस आम्हाला 'जीवाचे गोवा' करण्यासाठी रान मोकळे मिळाले होते 😂
निव्वळ 'योगायोगाचा' बळावर सर्व कामे कल्पनेपेक्षा जलदगतीने आणि व्यावहारिकदृष्ट्या सगळ्याच पक्षांना फायदेशीर ठरतील अशा प्रकारे झाली होती.
शालेय सहलीवरून रात्रीचा प्रवास करत परतणाऱ्या एका बसला घोटी जवळ भीषण अपघात होऊन त्यात अनेक विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू होण्याच्या घटनेच्या तात्कालिक पार्श्वभूमीवर सर्व प्रवास दिवसा व्हावेत अशी त्या संस्थेची मुख्य अट होती तिला विलीच्या मित्राने फायदेशीर करून दाखवले होते. येताना आणि जाताना दिवसाचा प्रवास असल्याने त्याने २ X २ ऐवजी ३ X २ बसेस घेण्यास सूचवले त्यामुळे जिथे १०० मुलांसाठी तीन ३५ सीटर २ X २ बसेस लागणार होत्या तिथे दोन ५१ सीटर ३ X २ बसेस मध्ये काम भागणार होते. असे करण्यातून कमी होणारा प्रवासखर्च कंपनीला म्हणजे पर्यायाने काकांना थोडा अतिरिक्त नफा मिळवून देणार होता.
सरकारी विश्रामगृह मिळणार असल्याने हॉटेल मधील वास्तव्यावर होणारा खर्च लक्षणीयरीत्या कमी होणार असल्याने पर्यायाने विद्यार्थ्यांसाठी प्रतिडोई कमी होणारा सहल खर्च त्यांच्या पालकांसाठी लाभदायी ठरणार होता.
विलीच्या मित्राला प्रतिवर्षी पंधरा ते वीस दिवस चालणाऱ्या ह्या सहलींच्या रूपाने आमच्याकडून नियमित व्यवसाय मिळणार होता.
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे एक अप्रत्यक्ष असा 'आर्थिक' लाभ जो खरंतर विलीच्या मित्राच्या खिशात जाणार होता तो त्याने 'उदारपणे' आम्हा तिघांना मिळेल ह्याची काळजी घेतली होती 😀
शाळेत आम्हाला (नक्की कितवीत असताना ते नाही आठवत) इंग्रजी विषयात 'प्रॉफिट' कि 'व्हॉट इज प्रॉफिट' अशा काहीतरी शीर्षकाचा एक फार छान धडा होता. त्यात 'प्रॉफिट' म्हणजे नफ्याची अतिशय सुंदर व्याख्या दिली होती. 'एखाद्या व्यवहारात सहभागी असलेल्या सर्वच पक्षांना त्यातून कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मिळणारा लाभ म्हणजे प्रॉफिट' असा काहीसा त्याचा सारांश होता. वरील व्यवहार त्या व्याख्येप्रमाणे सर्वांसाठी लाभकारक ठरणार होता!
कोण, कुठला हा 'विली'? पटकथेत नसलेल्या एखाद्या पात्राने अचानक एंट्री घ्यावी आणि सर्व प्रमुख पात्रांवर कडी करत भाव खाऊन जावे त्याप्रमाणे चोवीस तासांपूर्वी अशा नावाची कोणी व्यक्ती पृथ्वीतलावर अस्तित्वात आहे ह्याचाही थांगपत्ता नसलेल्या आम्हाला तो अचानक भेटतो काय, स्वतःहून मदतीची तयारी दाखवतो काय, आणि अल्पावधीत आमचे कार्य तडीस नेण्यास हातभार लावतो काय, हा सगळा निव्वळ योगायोग नाहीतर काय? अर्थात असे योगायोग प्रत्येकाच्या जीवनात सदैव घडत असतात, त्यांचे बाहू पसरून स्वागत करणे हे मात्र आपले काम. ठरवलेल्या गोष्टी कधी होतात तर कधी बिघडतात आणि कधी बिघडलेल्या गोष्टीही अनपेक्षितपणे अजून चांगल्याप्रकारे घडत असतात. 'Face life as it comes... This is the true spirit.' म्हणतात ते खोटे नाही!
असो, तर ह्या यशाच्या खऱ्या मानकऱ्याला त्याचे श्रेय देण्यासाठी आम्ही पुन्हा त्या कालच्या बारमध्ये पोचलो तेव्हा काल सांगितल्याप्रमाणे विली तिथे होता. सर्व अपडेट्स दिल्यावर "दुसऱ्या दिवसापासून तीन-चार दिवस आम्ही मोकळे असल्याने आता आम्हाला तू गोव्याचे अंतरंग दाखव" अशी त्याला गळ घातली आणि त्यानेही दिवसाच्या पहिल्या सत्रात त्याची कामे आटपून दुपारनंतरचा वेळ आमच्याबरोबर फिरण्यासाठी देण्याचे मान्य केल्यावर उत्साहाच्या भरात त्याला बिअरने अंघोळ घालायचीच काय ती बाकी ठेवली होती, अशी दणदणीत पार्टी आम्ही त्यादिवशी केली.
मग काय, दुसऱ्या दिवसापासून पुढचे तीन दिवस सकाळी उठुन चहा-नाश्ता झाल्यावर उत्तर गोव्यातल्या एखाद्या बीचवर जाऊन शॅक मधून घेतलेल्या बिअर पित समुद्रात डुंबत राहणे, तिथेच कुठेतरी जेवण करून लॉजवर परतल्यावर आंघोळी-पांघोळी उरकून थोडावेळ वामकुक्षी घेऊन चार-साडेचार वाजता पणजीतुन विलीला उचलून रात्री उशिरापर्यंत गोव्याचे अंतरंग बघत फिरणे हा दिनक्रमच होऊन गेला. काकांनी गाडी आणि ड्रायव्हर सोबत 'बरोबर असू देत' म्हणत खर्चायला पैसेही बऱ्यापैकी दिले होते त्यामुळे आर्थिक बाजूही भक्कम होती.
भटकंतीच्या पहिल्याच संध्याकाळी विली महाशयांनी आम्हाला वास्कोतील 'बायना बीच'चे दर्शन घडवले. गोव्यातील 'मोस्ट हॅपनिंग प्लेस' असलेल्या ह्या ठिकाणाला तिथे होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याने सरकारने पुढे उध्वस्त केल्याने राष्ट्रीय संपत्तीचे मात्र भरपूर नुकसान झाले 😀
भारतातल्या भारतात सहजपणे पुरवले जाणारे 'शौक' करण्यासाठी मग देशातल्या असंख्य 'आंबट शौकिनांना' नाईलाजाने ज्यादा पैसे खर्च करून पार थायलंड मधल्या 'बँकॉक' पर्यंत जाण्यास भाग पाडले गेले. ह्या सर्व प्रकारामागे भारतातला पैसा परदेशाकडे वळवण्यासाठी केलेले एखादे मोठे 'आंतरराष्ट्रीय षडयंत्र' असावे कि काय अशी शंका अधून-मधून मनात डोकावते 😂
असो, मग दुसरी संध्याकाळ मांडवी नदीतील क्रूझवर आणि एका 'डिस्कोथेक' मध्ये तर तिसरी संध्याकाळ 'प्रायव्हेट बीच पार्टी' एन्जॉय करण्यात गेली.
रात्रभर प्रवास करून काका चौथ्या दिवशी सकाळी गोव्याला पोचल्यावर मग विलीच्या मित्राकडे जाऊन पुढचे सोपस्कार पार पाडले. विश्रामगृहाचे मंजुरीपत्र दुसऱ्या दिवशी दुपार पर्यंत मिळणार होते त्यामुळे आमचा मुक्काम आणखीन एका रात्रीसाठी वाढला होता. त्याच्या पुढच्या दिवशी सर्व कामे आटपल्यावर आमचा परतीचा प्रवास सुरु झाला होता.
कामानिमित्ताने घडलेल्या ह्या सात-आठ दिवसांच्या गोवा सफरीत आम्ही भरपूर मजा-मस्ती करून झाली होती आणि स्थलदर्शनाची राहिलेली कसर पुढच्या महिन्यात व्याजासकट भरून निघणार असल्याने 'पांचो उंगलीया घी मैं...' अशी त्यावेळची परिस्थिती होती आणि प्रत्यक्ष सहली सुरु झाल्यावर '...और सर कढाई मैं' हे त्यास जोडले जाउन "पांचो उंगलीया घी मैं और सर कढाई मैं" अशी ती म्हण पूर्णत्वास जाणार होती!
क्रमशः
(तळटिपः आधीच्या एका भागावर काही सुहृद मिपाकरांनी दिलेल्या प्रतिसादात 'अवांतर वगैरेची काळजी न करता बिनधास्त लिहा' असे दिलेले अभय शिरसावंद्य मानल्याने ह्या भागात भटकंती नखभर आणि 'स्मरणरंजन' हातभार झाले आहे त्याबद्दल क्षमस्व 🙏 )
प्रतिक्रिया
24 Mar 2023 - 3:25 pm | अथांग आकाश
मी पहिला! :)
आता सावकाशीने वाचतो!!
24 Mar 2023 - 3:49 pm | अथांग आकाश
झक्कास! स्मरणरंजन आवडले आहे!!
पुढचा भाग जरा लवकर येउद्या!!! :)
24 Mar 2023 - 5:26 pm | चांदणे संदीप
स्मरणरंजन अतिशय आवडल्या गेले आहे.
बिग बँग होऊन तुमच्यातल्या भटक्याचे नवीन जग अस्तित्वास आले असे म्हणता येईल.
पुभाप्र!
सं - दी - प
25 Mar 2023 - 5:18 pm | तुषार काळभोर
स्मरणरंजन प्रचंड आवडले गेलेले आहे!!
तुमच्या स्मरण-गाठोड्यात बराच खजिना दिसतोय! आणखी काही कट्टे करावे लागतील...
26 Mar 2023 - 7:10 pm | टर्मीनेटर
अथांग आकाश | चांदणे संदीप | तुषार काळभोर
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
@ चांदणे संदीप
हो तसे म्हणता येईल. आयुष्यातला एक मोठा टर्निंग पॉईंट होता तो 😀
@ तुषार काळभोर
करूयात की! (नुकत्याच झालेल्या लोणावळा कट्ट्याच्या अनुभवावरून) आतापासून ठरवायला घेतले तर २०२५ पर्यंत नक्की होऊ शकेल 😂
29 Mar 2023 - 9:07 am | रंगीला रतन
+३३३३३३३
जाम भारी !!!
रच्याकने- स्मरणरंजन म्हंजे नॉस्टॅल्जिया गुगलल्यावर कळले :=)
24 Mar 2023 - 6:41 pm | सौंदाळा
भारीच प्रवासवर्णन + कथा + व्यक्तीचित्रण सगळे एकत्र आणि एकसंध
पुभाप्र
24 Mar 2023 - 7:02 pm | राजेंद्र मेहेंदळे
ही मालिका मधेच निसटली होती हातातुन. आता पुन्हा वाचायला घेतली आहे. आधाशा सारखे ३-४ भाग वाचुन काढले, आता पुन्हा निवांत वाचतो. वाखुसा.
या आधी गोव्याला गेलोय, पण ते नुसते पैशापरी पैसे गेले असे वाटत राहिले. अशी सुशेगाद ट्रिप करायची आहे.
24 Mar 2023 - 7:44 pm | Bhakti
भारीच गोष्ट!
26 Mar 2023 - 7:14 pm | टर्मीनेटर
सौंदाळा | राजेंद्र मेहेंदळे | भक्ती
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
25 Mar 2023 - 2:39 pm | प्रचेतस
आहा, एकदम भारी लिहिलंय.
गोव्यात गेल्यावर संध्याकाळी बांदोडकर मार्गावरील बाकड्यांवर बसून मांडवीतले तरंगते, चमचमते कॅसिनोज बघणे मलाही फार आवडते. पुढचे स्मरणरंजन तर अतिशय भारी. आता पुढच्या भागाची प्रचंड उत्सुकता लागली आहे. तुमच्या पोतडीत एकापेक्षा एक सर्स किस्से दडलेले आहेत. एकेक करुन बाहेर येऊ द्यात बयाजवार.
25 Mar 2023 - 6:50 pm | कंजूस
यांचा अडीच तास एकमेव श्रोता होण्याचं भाग्य लाभलेला.
26 Mar 2023 - 2:45 pm | कुमार१
हे भलतेच आवडले आहे.....
26 Mar 2023 - 7:24 pm | टर्मीनेटर
प्रचेतस | कंजूस | कुमार१
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
@ कंजूस
😀 😀 😀
कंकाका तरी त्या दिवशी तुमच्या मुलीचा रात्री १० च्या आसपास फोन आला म्हणून अडीच तासांत भागले, नाहीतर आणखीन किती वेळ आपल्या गप्पा चालल्या असत्या कोणास ठाऊक 😂
26 Mar 2023 - 7:23 pm | गवि
मस्त आहे वर्णन.
बायना बीचबद्दल उपरोधिक परिच्छेद मजेशीर आहे. वीसेक वर्षांपूर्वी ज्यांनी हा बीच पाहिला असेल आणि आता पाहिला असेल तर बदल किती ठळक आणि परिणामकारक आहे हे जाणवून थक्क व्हायला होईल. पूर्वी तिथे पर्यटक म्हणून साईट सीईंग अशा अर्थाने बीच व्हिजिट शक्यच नव्हती.
गोव्याबाबत नुकत्याच आलेल्या काही बातम्या एकदम आठवल्या. टुरिस्ट आणि लोकल संघर्ष अधे मध्ये दिसतो. पण लोकल गोयंकार मनुष्य खरोखर शांत आणि गोड स्वभावाचा आहे. टुरिस्टच अनेकदा फार माज दाखवताना दिसतात. टाळी एका हाताने वाजत नाही हे नक्की.
असो. पुढेही अशी प्रवासवर्णने येऊ द्या.
26 Mar 2023 - 8:53 pm | टर्मीनेटर
खरं आहे!
पण बाकी काही असो, पुर्वी तिथला माहौल कसला भारी असायचा. खुल्या समुद्रकिनाऱ्यावरही 'बास' चा मस्त पंच देणाऱ्या त्या साउंड सिस्टिम्स, त्यावर वाजणाऱ्या संगीताच्या तालावर स्वयंस्फूर्तीने थिरकणारी पब्लिक, फुल्टू धमाल असायची. वरती उल्लेख केलेला विली आंणि आमच्यातला एक मित्र चांगलेच नृत्यनिपुण होते, ते दोघे असे जबरदस्त नाचायचे कि इतर बघेही हौशीने त्यांच्याबरोबर नृत्यात सामील व्हायचे. संगीत ऐकत, बिअर पित गप्पा मारत वाळुवर नुसते बसायला पण मजा यायची.
आम्ही दरवर्षी तिथे आवर्जून जायचो, पण आता मात्र माझ्यामते तिथले चैतन्य साफ हरवले आहे 😀
सहमत! स्थानिकांना तुच्छ लेखत वागण्या बोलण्याची एक घाणेरडी वृत्ती हल्ली बहुसंख्य पर्यटकांमध्ये बघायला मिळते त्याची परिणीती अनेकदा अशा संघर्षांमध्ये होत असते. आणि काहीवेळा अति गळेपडू फेरीवाले/विक्रेते हे सुद्धा अशा वादांस कारणीभूत असतात.
28 Mar 2023 - 7:26 pm | Nitin Palkar
खूपच छान... नेहमीप्रमाणेच.
अतिशय चित्रदर्शी स्मरणरंजन.
पुभाप्र
29 Mar 2023 - 4:35 pm | गोरगावलेकर
हा भागही आवडला
31 Mar 2023 - 10:09 am | टर्मीनेटर
Nitin Palkar | रंगीला रतन | गोरगावलेकर
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏