हिमाचल प्रदेश :कांगडा व चंबा सहल : भाग ७: डलहौसी परिसर

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
7 Feb 2023 - 3:22 pm

भाग ६ येथे वाचा

काल अंधार पडल्यावर आम्ही डलहौसीला येऊन पोहचलो होतो. समुद्रसपाटीपासून साधारण ६५०० फूट उंचीवरील हे ठिकाण. सध्या अतिशय थंड तरीही खूपच आल्हाददायक वातावरण. ब्रिटिश वास्तुकला, सुंदर चर्च, पाइन्स ,देवदार, ओक, रोडोडेंड्रॉन. अशा अनेक वेगवेगळ्या वनस्पती असलेली दाट झाडी तसेच धौलाधर पर्वतरांगेतील उत्तुंग शिखरे हे येथील प्रमुख आकर्षण.

१८४५ च्या अँग्लो-शीख युद्धानंतर पंजाबचे राज्यकर्ते युध्दाच्या खर्चाची नुकसानभरपाई ब्रिटिशांना देण्याबद्दल बांधील होते. १८५० काळात ब्रिटिश विश्रांतीसाठी व आरोग्य केंद्रासाठी हिल स्टेशनच्या शोधात होते. त्यांच्या नजरेत भरलेल्या धवलधार पर्वत रांगांमधील पश्चिमेकडील पाच टेकड्या याकरिता त्यांनी ताब्यात घेतल्या. (कथलॉग, पोट्रेन, तेहरा/तेराह , बाक्रोटा आणि भांगोरा ) बदल्यात राजाची खंडणी काही प्रमाणात कमी केली गेली. ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांचे नाव या शहरास देण्यात आले. (माहिती संग्रहित)

हिमाचल प्रदेश पर्यटन विकास मंडळाची दोन हॉटेल्स डलहौसीत आहेत. पैकी हॉटेल गीतांजलीत आम्ही काही खोल्या आधीच आरक्षित केलेल्या होत्या. जुन्या काळच्या एकमजली लाकडी बांधकाम असलेल्या ब्रिटिशकालीन बंगल्याचे रूपांतर होटेलमध्ये करण्यात आले आहे. उतारावर असल्याने हॉटेलमध्ये पोहचण्यासाठी रस्त्यापासून पायऱ्यानी थोडे खाली उतरावे लागते.सामान घेऊन चढ उतर करण्यास जेष्ठ नागरिकांना त्रास होऊ शकतो पण हॉटेलचे कर्मचारी मदत करतातच त्यामुळे शक्यतो अडचण येत नाही. थोडे नूतनीकरण केल्यास हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतर सहज होऊ शकेल. पण नकोच. हिल स्टेशनला सर्वसामान्यांना परवडतील अशी चांगली हॉटेल्स कमीच असतात. त्यामुळे आहे ते चांगलेच.
आमचे हॉटेल 'गीतांजली'

हॉटेल डलहौसीच्या 'ठंडी सडक' वर आहे. कमी सूर्यप्रकाशामुळे रस्त्याला असे नाव दिले गेले आहे. रस्त्याच्या एका बाजूला उंच डोंगर व दुसऱ्या बाजूस जुन्या इमारती व हॉटेल्स. त्यांच्यामागे काही ठिकाणांहून दिसणाऱ्या 'पांगी' पर्वतरांगा. (डलहौसीत एक गरम सडकही आहे)
भरपूर उंची असलेल्या प्रशस्त खोल्या . कांगडा परिसरात कुठेही जास्त थंडी जाणवली नाही. परंतु आता जास्त उंचीवर आल्याने हेवेत चांगलाच गारठा होता. त्यामुळे येथील रूम हिटर चांगलेच कामात आले.

सकाळी नाश्ता आटोपून भटकंतीसाठी निघालो. उंचीवरून थोडे खाली येऊन चमेरा सरोवर येथे जाण्याचे ठरवले. अवघ्या एक-दिड तासात आणि २५-३०किमी अंतर पार करून आपण येथे पोहचतो. रावी खोऱ्यातच मणिमहेष येथे उगम पावणाऱ्या रावी नदीवरील चमेरा धरणाच्या जलसाठ्यामुळे हे सरोवर तयार झाले आहे. अनेक प्रकारच्या जलक्रीडा येथे करता येतात.
उंचावरून दिसणारे चमेरा धरण व सरोवर

थोड्याच वेळात धरणाजवळील तलेरू या बोटिंग पॉइंटला पोहचलो.

जलाशयाच्या पाण्यात बोटीने फिरून धवलधार पर्वतरांगा, पाइन वृक्षांचे दादाट जंगल यांचे रमणीय दृश्य अनुभवायचे होते. तिकीट खिडकीवर जाऊन अर्ध्या तासासाठी रु.४००/- (जीएसटी सहित) याप्रमाणे १२ जणांचे रु.४८००/- भरले.

आम्हाला बोटीत जाऊन बसण्यास सांगण्यात आले. आम्ही तिकीटाची मागणी केली असता नकार मिळाला. तुम्ही जीएसटी सहित वसुली करीत आहात तर तिकीट तर दिलेच पाहिजे असे म्हटल्यावर जीएसटी आम्हाला भरायचा आहे तो आम्ही भरू तुम्ही सहलीला आला आहात, बोटींचा आनंद घ्या असे उत्तर मिळाले. (तुम्ही सहलीचा आनंद लुटा, आम्ही तुम्हाला लुटू असेच काहीतरी म्हणायचे असेल) बरीच हुज्जत घालूनही तिकीट मिळेना. आजूबाजूला चौकशी करता कंपनीचे कंत्राट संपलेले असूनही ते धंदा करीत असल्याचे समजले. आज भ्रष्ट व्यवस्थेचा फटका मात्र आम्हाला बसला होता. मुलीने गुगलवर कुठेतरी याबद्दलचा रिव्ह्यू टाकला. शेवटी निषेध व्यक्त करून दिलेले पैसे परत घेतले व काठावरूनच येथील सौंदर्याचा लाभ घेतला.


सरोवराच्या बाजूलाच असलेल्या स्टॉलवर ताजे खाद्यपदार्थ बनवून मिळतात. तेथेच थोडे खाऊन डलहौसीला परत निघालो.

दुपारचा एक वाजला होता. डलहौसीच्या सुभाष चौकला पोहचलो . प्रदीर्घ काळ तुरुंगात राहिल्यानंतर झालेल्या आजारातून बरे होण्यासाठी १९३७ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस हे डलहौसीत वास्तव्यास होते.

सुभाष चौकाच्या बाजूलाच छोट्याशा टेकडीवर 'सेंट फ्रान्सिस चर्च' आहे. या कॅथलिक चर्चला भेट दिली. सगळीकडे प्रचंड धुके व अतिशय थंड असे वातावरण होते. भर दुपारी संध्याकाळ झाल्याचा भास होत होता. दगड व लाकूड यांचा वापर करून बांधण्यात आलेली ही अतिशय देखणी इमारत आहे.

सुभाष चौक ते गांधी चौक पायी फिरणे हाही येथील पर्यटनाचा एक भाग. अनेक छोटी मोठी कपडयांची, खाद्यपदार्थ , भेटवस्तू वगैरेंची दुकाने येथे आहेत. आम्हीही चालत गांधी चौकला पोहचलो.

चौकाला लागूनच 'सेट जॉन चर्च' आहे . 1863 मध्ये बांधलेले हे प्रोटेस्टंट चर्च डलहौसीचे सर्वात जुने चर्च तरीही, गजबजलेल्या भागातील सुंदर इमारत.

चौकातच GPO ची इमारत असून त्यातच तिबेटियन मार्केट आहे. तिबेटियन मार्केट उबदार कपडे, कार्पेट, हस्तकलेच्या वस्तू इ. साठी प्रसिद्ध आहे.

किरकोळ खरेदी करत 'ठंडी सडक' ने रमतगमत हॉटेलला पोहचलो. रात्रीच्या जेवणात खीर प्राशन करत आज कोजागिरीही साजरी केली.

क्रमश:

प्रतिक्रिया

चमेरा धरण परिसर अतिशय सुंदर दिसतो आहे. भर दुपारीही धुक्यात बुडालेले डलहौसी अद्भुत. चर्चची दगडी बांधणीची वास्तुरचना विशेष आवडली.

अक्षय देपोलकर's picture

9 Feb 2023 - 11:01 am | अक्षय देपोलकर
टर्मीनेटर's picture

9 Feb 2023 - 11:20 am | टर्मीनेटर

हा भागही आवडला. फोटोजही छान 👍
शंभरेक वर्षे जुन्या "भरपूर उंची असलेल्या प्रशस्त खोल्या" असणाऱ्या होटेल्स्मध्ये रहायला मजा येते! आता अशा प्रकारची (नविन) बांधकामे क्वचितच दिसतात.

सुंदर वास्तू आहेत.वातावरणही आल्हाददायक आहे.

कर्नलतपस्वी's picture

11 Feb 2023 - 9:58 am | कर्नलतपस्वी

बांधलेल्या इमारती मजबूती बरोबर स्थानिक वातावरणास अनुकूल होत्या.

फोटो व वर्णन दोन्ही छान,आवडले.

गोरगावलेकर's picture

14 Feb 2023 - 11:37 am | गोरगावलेकर

प्रचेतस, अक्षय देपोलकर, टर्मीनेटर, Bhakti, कर्नलतपस्वी आणि सर्व वाचकांचे खूप खूप धन्यवाद.

तर्कवादी's picture

17 Feb 2023 - 3:58 pm | तर्कवादी

लुटेरा नावाचा हिंदी चित्रपट बघून मला डलहौसीबद्दल कुतुहल निर्माण झाले.. चित्रपट बघून अनेक वर्षे झालीत तरी ते कुतुहल अजून कायम आहे. अजूनपर्यंत मी उत्तरेकडे भ्रमंती केली नाही... शिमला, मनाली, डलहौसी सारे काही बघायचे आहे कधीतरी.
डलहौसीबद्दल अधिक काही लिहू शकाल काय ? शहर , रस्ते कसे वाटले ई.