उदयपूर,हल्दीघाटी,कुंभलगड व चितौडगड भटकंती पूर्वतयारी
उदयपूर,हल्दीघाटी,कुंभलगड व चितौडगड भटकंती पहिला दिवस
उदयपूर,हल्दीघाटी,कुंभलगड व चितौडगड भटकंती दुसरा दिवस
आज सहलीचा तीसरा दिवस होता. आम्ही आज सकाळी सात वाजता आवरून तयार झालो. ड्रायव्हर कार घेऊन तयार होता. गाडी अतिशय व्यवस्थित होती. आज आम्हाला कुंभलगड, हल्दीघाटी, एकलिंगजी आणि सहस्र बाहू मंदिर ही ठिकाणे पाहायचे होते.
आता यात वेळेचे नियोजन करण्याच्या अनुषंगाने एक माहिती सर्वांना असायला हवी म्हणून सांगते, की एकलिंगजी मंदिर सकाळी दहा नंतर भाविकांसाठी उघडते. इथे फोटोग्राफी वर बंदी आहे. एकलिंग जी मंदिराच्या अगदी जवळच काही अंतरावर सहस्त्रबाहू मंदिर (ज्याला स्थानिक सास-बहू मंदीर म्हणतात)आहे. हे मंदिर सकाळी आठ ते सायंकाळी साडेसहा पर्यंत उघडे असते. सहस्त्र बाहू मंदिर इथे लौकीकार्थाने कोणतीही देवाची मूर्ती नाही. तथापि हे मंदिराचे अवशेष आहेत. परंतु यावरती अत्यंत देखणे असे कोरीव काम आहे. सद्यस्थितीत हे स्थळ प्री-वेडिंग फोटोशूट साठी प्राधान्याने वापरले जाते. एकलिंगजी मंदिर हे देखील कोरीव कामाचा उत्तम नमुना आहे. तथापि यातील केवळ मुख्य मंदिराचा भाग हा भाविकांसाठी खुला आहे. अन्य मंदिरे व आजूबाजूच्या भागांमध्ये पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही. कुंभलगड हा किल्ला सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये पर्यटकांसाठी खुला आहे.
कुंभलगड येथे विकांताला व सुट्टीच्या दिवशी प्रचंड गर्दी असते. त्यामुळे तिकीट खिडकी वरती बरीच रांग लागते. शिवाय तिकीट खिडकीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पार्किंगसाठी बरीच जागा असली तरी तेथे आधीच गाड्यांनी पार्किंग अडवले असल्यास तुम्हाला पार्किंगसाठी बरेच मागे यावे लागते आणि तिथून तिकीट खिडकीपर्यंत चालत जाणे हे बरेच मोठे अंतर ठरू शकते. त्यामुळे जेवढे लवकरात लवकर तुम्हाला कुंभलगडला जाऊन वाहन पार्क करणे शक्य होईल तेवढे करणे सोयीचे ठरते. कुंभलगड व चित्तोडगडचे तिकीट तुम्ही आधीच काढून ठेवू शकता. आम्ही हे ऑनलाईन बुकिंग आधीच केले होते. https://payumoney.com या संकेतस्थळावरती ऑनलाइन बुकिंगची सोय आहे. येथे जोधपूर हे शहर निवडावे लागते. जोधपूर हे शहर निवडल्यानंतर तेथे कुंभलगड आणि चित्तोडगढ या दोन्हीही किल्ल्यांचा किल्ल्यांचे ऑपशन तुम्हाला दिसतात. त्यातील कुंभलगड निवडल्यानंतर पुढे तुम्हाला काही डिटेल्स भरावे लागतात. जसे की तुम्ही इंडियन आहात, प्रौढ किती, मुले किती इ. प्रतिमाणशी 35 रुपये तिकीट आहे. मुलांकरता प्रवेश निशुल्क आहे.
ड्रायव्हरने सांगितले की प्रथमतः कुंभलगड येथे जाऊया. तीन तास तरी लागतील. वास्तविक उदयपूर ते कुंभलगड हे अंतर 85 किलोमीटर आहे. परंतु रस्ता एकल आहे. मध्ये तर खूपच खराब आहे. चिंचोळा रस्ता असल्यामुळे समोरून एखादे वाहन आले तर अतिशय काळजीपूर्वक क्रॉस करावे लागते. त्यामुळे केवळ गुगल मॅप वरती दोन तासाचे अंतर दिसत आहे असे समजून प्रवासाचे नियोजन करू नये. उदयपूर-कुंभलगड या प्रवासाला आरामात तीन तास लागतात.
कुंभलगड सलग चढायला साधारण अर्धा तास लागतो. रस्त्याचा चढ दगडी असून अत्यंत तीव्र आहे. दगडी मार्ग असला तरीही त्यातून चालत जाणे हे पायाचे दुखणे असलेल्या लोकांसाठी अत्यंत कठीण होऊ शकते. त्यामुळे शारिरीक दुखणे असलेल्या लोकांनी स्थलदर्शनात कुंभलगडचा समावेश विचारपूर्वक करावा. ड्रायव्हरच्या सूचनेप्रमाणे आम्ही प्रथम कुंभलगडला जायचं ठरवले. तेथून पुढे हल्दीघाटी आणि त्यानंतर सर्वात शेवटी एकलिंगी व सहस्त्रबाहू मंदिर करायचे असे नियोजन ठरले. जाताना आम्ही गाडीतच नाष्टा करण्यासाठी पोहे पार्सल घेतले आणि आम्ही कुंभलगडकडे प्रस्थान केले.
ड्रायव्हर अतिशय नम्र व सज्जन होता. ड्रायव्हरने आम्हाला सांगितले की, या रस्त्यावरती जी काही गावे आहेत, तो सर्व एरिया साधारण आदिवासी समाजाचा आहे. हे लोक सकाळी लवकर कामासाठी बाहेर पडतात आणि दुपारी आपली मजुरी घेऊन परत येतात. येताना दारू वगैरे पिऊन येतात. त्यामुळे दुपारी चार- पाच नंतर या ठिकाणी फिरणे अत्यंत धोकादायक आहे. इथे समोरून गाडी/दुचाकी आली तर पहिल्यांदा आपल्यालाच गाडी रस्त्याखाली घेऊन वाट करुन द्यावी लागते. याबाबतीत कोणताही वाद घालून चालत नाही. त्यामुळे जेवढ्या लवकर या परिसरातून आपल्याला परत निघता येईल ते सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगले आहे. त्यामुळे आपण प्रथम कुंभलगडला जात आहोत.
या संपूर्ण प्रवासामध्ये आम्हाला वाटेत फार कमी तुरळक हॉटेल दिसली. दुकाने फारशी अशी नाहीत. पेट्रोल पंप सुद्धा फार कमी ठिकाणी दिसले. त्यामुळे सेल्फ ड्राईव्ह करणाऱ्यांनी ही वस्तुस्थिती ध्यानात घ्यावी. उदयपूर ते कुंभलगड अशी बस सेवा आहे. परंतु त्याचे फ्रिक्वेन्सी अत्यंत कमी आहे . आमच्या तीन तासाच्या प्रवासात मला केवळ एकच बस दिसली आणि त्या बसच्या टपावरती सुद्धा माणसे बसलेली दिसली. आम्ही ड्रायव्हरला विचारले की एवढी माणसे का भरतात? त्यावर ड्रायव्हरने उत्तर दिले की कोणत्याही गावांमध्ये हात दाखवला तर गाडी ही थांबवावीच लागते. नाहीतर ते लोक दगड मारून मारून गाडी फोडतात. . अशी बरीच रंजक माहिती आम्हाला प्रवासादरम्यान मिळत होती.
फोटो
एक गोष्ट नक्की की, उदयपूर ते कुंभलगड हा प्रवास अत्यंत निसर्गरम्य असा आहे. माझ्या आयुष्यात केलेला हा एक अत्यंत अविस्मरणीय प्रवास म्हणावा लागेल. एका बाजूने अरवली पर्वत डोंगरांग ही तुमच्या सोबत सतत असते आणि उजव्या बाजूला बाणस नदी वाहत असते. हा भाग बघताना एकावेळी आपल्याला वाटतं की आपण हिमालयात आहोत का? एकावेळी वाटतं की आपण कोकणात आहोत का? अत्यंत घनदाट झाडी आजूबाजूला दिसत असते. किती पाहू आणि किती नको. मी खूप फोटो या प्रवासादरम्यान काढले आणि एक वेळ अशी आली की त्यानंतर फोटो काढणे बंद करून टाकले आणि डोळ्याने या निसर्गाचा आस्वाद घेत मी हा प्रवास पूर्ण केला.
काही फोटो
ही डोंगर रांग इतकी सुंदर आहे की ज्यांनी ती पाहिली आहे त्यांनाच कळू शकेल की त्याचे सौंदर्य अत्यंत वेगळ्या प्रकारचे आहे. ड्रायव्हरला मी विचारले की कधी मुंबईला तुमचे येणे जाणे होते का? त्यावर त्यांनी असे उत्तर दिले की आमच्यासारखी माणसे मुंबई सारख्या गर्दीच्या शहरात राहू शकत नाही. आम्ही अत्यंत निसर्गरम्य वातावरणात राहतो. हे पहाड नजरेस दिसली नाही तर मग आम्ही बेचैन होतो. आम्ही कधी बाहेर गेलो आणि हे पहाड दिसले नाहीत तर कधी एकदा परत जातो असे होते. ज्यावेळी आम्ही आमच्या शहरात येतो त्यावेळी मन थाऱ्यावर येते. पहाडी आहे तर सर्व आहे व आपण आहोत. हा सर्व निसर्ग टिकवला पाहिजे. हे पहाड असेच राहिले पाहिजे. आता कुंभलगड मध्ये सुद्धा तुम्ही बघाल तरी पहाड फोडून काहीजण ते रिसॉर्ट बनवत आहेत. पण हे योग्य नाही. त्यावर आम्ही विचारले की ही पहाडी आहे ती खाजगी मालकिची आहेत का? त्यावर त्यांनी उत्तर दिले की बरेचसे वनविभागाचे आहेत पण काही ठिकाणी पूर्वापार लोक राहत आहेत ते त्यांच्याच मालकीचे आहेत. ते तिथे डोंगर फोडतात आणि रिसॉर्ट बनवतात. एका अल्पशिक्षित ड्रायव्हरचे इतके शहाण्यासारखे विचार ऐकून आम्ही विचारात पडलो.
वाटेतच बाणस नदीचे एक अप्रतिम दृश्य दिसले. ड्रायव्हरनेच आम्हाला खास येथे गाडी थांबवत फोटो काढायला सांगितले. तो म्हणाला की मी माझ्या मुलांसोबत आणि मित्रांसमवेत इथे येत असतो . असं वाटत होतं की आपण कुठेतरी लेह-लदाखला आलो आहोत की काय! तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की हो खुदागवाह या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये या स्थळाचे शूटिंग आहे ते काहीतरी लेह लडाख या साईड कडचा सीन म्हणून इथे चित्रित झालेला आहे. मी काही तो सिनेमा पाहिलेला नाही. ज्यांनी पाहिला असेल त्यांना कदाचित कळेल.
फोटो
वाटेत ठिकठिकाणी थांबत निसर्गाचा आस्वाद घेत व तिथे फोटो काढत आम्ही रमत गमत कुंभलगडला पोहोचलो, त्यावेळी दहा वाजून गेले होते.
फोटो
तिकीट काढलेले असल्यामुळे आम्ही थेट प्रवेशद्वारापाशी गेलो. तिथे ऑनलाईन तिकीट चेक करून आम्हाला आज सोडले गेले. ड्रायव्हरला तिथेच गाडी पार्क करण्यासाठी जागा मिळाली आणि आम्ही कुंभलगड मध्ये प्रवेश केला.
कुंभलगडचे विशेष म्हणजे दुरून हा गड दिसत नाही. साधारण गडाच्या जवळ पाचशे मीटरच्या अंतरावरती गेल्यानंतरच हा गड दिसतो. लांबून कुठूनही पाहिले तरी इथे कोणता किल्ला आहे हे शत्रूला दिसू नये त्या अनुषंगाने याची अशी ही अद्भुत रचना केलेली आहे. हा गड गाईड शिवाय पाहु नये. येथे रजिस्टर गाईड फार कमी दिसले. इथे केवळ सरकारी गाईंना परवानगी आहे त्यामुळे आपल्याकडे ऑप्शन्स फार कमी राहतात. आम्ही गेलो त्यावेळी तिथे केवळ तीनच सरकारी गाईड होते. त्यांनी आम्हाला साडेसातशे रुपये फी सांगितली. शेवटी आम्ही तिथेही एक गाईड 750 रुपयांना ठरवला. गाईड घेतल्याचा दुसरा फायदा म्हणजे गाईड प्रत्येक ठिकाणी थांबत थांबत, एखाद्या ठिकाणची माहिती सांगत सांगत आपल्याला वरपर्यंत नेतात. त्यामुळे आपण गड चढताना पायावर जास्ती ताण येत नाही. तरीदेखील आम्ही वाटेत थांबत थांबतच गड चढलो.
आता गडाविषयी थोडेसे. खरंतर मूळात सहाव्या शतकामध्ये मौर्य साम्राज्यातल्या राजाने इथे गड बांधला होता असे समजले जाते. परंतू आत्ताचा जो कुंभलगडचा किल्ला बांधलेला आहे तो पंधराव्या शतकात राणा कुंभा यांनी बांधला आहे. हा इतर किल्यांसारखा मानवी वस्तीचा किल्ला नाही. हा केवळ लढाई करण्याच्या अनुषंगाने बांधलेला किल्ला आहे. मंदिराच्या किल्ल्याच्या पूर्ण परिसरामध्ये 360 मंदिरे आहेत. त्यातील 300 ही जैन मंदिर आहेत आणि इतर हिंदू मंदिर आहे. . राणा कुंभा हे आठ फूट उंचीचे होते. मंदिरातील शिवलिंग हे चार फूट उंचीचे आहे. राणा कुंभा मांडी घालून बसल्यावर बिल्व पत्र वाहताना समोरील शिवलिंगाची उंची ही कमी असावी अशा पद्धतीने त्यांनी शिवलिंग स्थापन केले आहे. आता बऱ्याचशा मंदिरांमधल्या मूर्तींचा भंग झाल्यामुळे यातील कोणत्याही मंदिरामध्ये पूजा केली जात नाही. फक्त केवळ एक शिवमंदिर आहेत तिथे आज देखील पूजा केली जाते असे कळले.
या किल्ल्याचे जे वास्तू रचनाकार होते त्यांचे नाव श्री.मंडन असे होते. ज्या वेळेला या किल्ल्याचे बांधकाम सुरू झाले त्यावेळी सकाळी बांधलेले बांधकाम रात्रीपर्यंत पडून जात असे. असे का होते हे तिथल्या एका साधू पुरुषास विचारले गेले .त्या साधू पुरुषांनी असे सांगितले की इथे मूळ देवीचे स्थान आहे आणि तिला स्वतःहून इच्छुक असलेल्या माणसाचा बळी दिल्याशिवाय इथले बांधकाम पूर्ण होणार नाही. राजाने राज्यात दवंडी पेटवली की असा कोणी माणूस स्वेच्छेने स्वतःचा बळी देण्यास इच्छुक आहे का? तथापि कोणीही पुढे आले नाही. शेवटी त्या साधू पुरुषांनी स्वतःचा बळी देण्याचे ठरवले. त्यावर त्यांनी सांगितले की मी चालावयास सुरुवात केल्यानंतर ज्या स्थानी थांबेन तिथे माझे मस्तक कापावे आणि त्यानंतर माझे धड जिथे कोसळेल तिथे किल्ल्याचे निर्माण होईल. तो साधू पुरुष जिथे पहिल्यांदा थांबला तिथे भैरव पोल असा मोठा दरवाजा आहे तिथे त्यांचे मस्तक कापले गेले.
भैरवपोल
तिथुन त्यांचे धड जवळपास 500 मीटर पुढे चालत गेले आणि तिथे मुख्य किल्ला उभारला गेला आहे. किल्ल्याच्या आत मध्ये त्यांची समाधी देखील बांधली आहे. आजही तिथे त्यांची पूजा होते आणि त्यानंतर हे पूर्ण किल्ल्याचे बांधकाम केले गेले. हा किल्ला समुद्रसपाटीपासून तीन हजार सहाशे फूट उंचीवर आहे आणि या किल्ल्याची भिंत 36 किलोमीटर लांब आहे. ग्रेट वॉल ऑफ चायना नंतर ही जगातील सर्वात लांब भिंत आहे. भिंतीची जाडी ही पंधरा फूट आहे.
फोटो
टेहळणी बुरुज
इथून वरती गेल्यानंतर तिथे महाराणा प्रताप यांचे बालपण जिथे गेले ते प्रांगण दिसते. तसेच एक देवीचे मंदिर आहे. जिथे आज देखील अखंड ज्योत तेवत आहे. त्याची जबाबदारी ही संबंधित पुजार्यांकडे परंपरागत आहे. आज देखील एक स्त्री याची व्यवस्था पाहते. ती सकाळी लवकर येऊन मंदिरामध्ये दिवा प्रज्वलित करते व दुसऱ्या दिवशी सकाळी परत येते. तिथे मंदिराचे दरवाजे बंद असतात. आम्ही त्या मंदिराच्या बाहेर उभे राहिलो तर आतील ज्योतीची धग आम्हाला बाहेरही जाणवत होती.
तेथून आम्ही किल्ल्याच्या वरती आलो. चित्तोडगड मध्ये महाराणा प्रताप यांचे वडील उदयसिंग यांना त्यांचे चुलते मारावयास आले असता पन्ना दाईने त्यांच्या जागी आपल्या मुलाला ठेवून, उदयसिंग यांना गूपचूप कुंभलगड किल्ल्यावर पाठवले. आपल्या धन्याला वाचविण्यासाठी स्वत:च्या मुलाचे प्राण पणास लावणाऱ्या पन्ना दाईचा त्याग मोठा मानला जातो. महाराणा प्रताप यांचा जन्म याच किल्ल्यावर झाला व त्यांचे बालपण देखील याच किल्ल्यावर गेले. अन्न व पाणी नसेल तर सैनिक लढू शकत नाहीत ही गोष्ट विचारात घेऊन किल्ल्याच्या आसपास धरण व बंधारे घालून पाण्याचा साठा केलेला आहे. त्यामुळे अन्नधान्य व पाणी याची कमतरता या किल्ल्यावर कधीही जाणवली नाही. किल्ल्याच्या आत देखील एक मोठी विहीर आहे आणि त्या विहिरी मधून पूर्ण किल्ल्यामध्ये पाणी खेळवले जात होते. थोडक्यात हा किल्ला अभियांत्रिकीचा उत्तम नमुना आहे. परंतु जर गाईड सोबत असेल तरच या गोष्टी समजू शकतात. गडाच्या सर्वात वरच्या टोकावरुन अरवली पर्वतरांगांचे नयनरम्य दृश्य दिसते. संपूर्ण किल्ला पहायला आम्हाला अडीच तास लागले.
फोटो
इथून आम्ही हल्दीघाटीकडे प्रस्थान केले. साधारण 1 च्या सुमारास आम्ही महाराणा प्रताप म्युजियमपाशी पोचलो. बाजूलाच चेतक रेस्टॉरंट आहे तीथे राजस्थानी थाळी घेतली. नवऱ्याने दाल-बाटी घेतली. दोन्हीही चवीला अप्रतीम होते.
हल्दीघाटी येथील राणाप्रताप म्युजिअम-
हल्दीघाटी येथील महाराणा प्रताप म्युझियम सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत उघडे असते. येथे तीस रुपये प्रति व्यक्ती प्रवेश फी आहे. येथे एक संग्रहालय असून तेथे युद्धाशी संबंधित शस्त्रे व इतर गोष्टींचे प्रदर्शन आहे. त्यानंतर एक व्हिडिओ शो होतो ज्यामध्ये सर्व ग्रुपला एकत्र या संग्रहालयाचे निर्माण कसे झाले याबद्दल माहिती दिली जाते. त्यानंतर सर्व ग्रुपला एका थिएटरमध्ये नेले जाते तेथे हलदी घाटीच्या युद्ध यावरती एक डॉक्युमेंटरी शो दाखवला जातो. त्यानंतर दृक-श्राव्य माध्यमाद्वारे आभासी पुतळ्यांवर प्रकाशझोत टाकून महाराणा प्रताप यांच्या आयुष्य कालातील घडलेल्या घटनांचे वर्णन पाहत पाहत आपण त्या संग्रहालयातून बाहेर पडतो. या सर्व गोष्टी पाहण्यात साधारण एक तास जातो.
फोटो
राणा प्रताप यांचे सोबती
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
फेटा एवढा मोठा आहे. डोकं किती मोठं असेल!
महाराणा प्रताप यांचे साथीदार
येथे अनेक आयुर्वेदिक उत्पादने विक्रीस ठेवली आहेत. ते तेथे आलेल्या पाहुण्यांनागुलाब अर्काचे सरबत थोडेसे चाखावयास देतात. आम्हाला अतिशय आवडले म्हणून आम्ही एक बाटली विकत घेतली. दोनशे रुपयाला एक बाटली मिळते. म्युझियमच्या आवारातच पारंपारिक पद्धतीने गुलाबांचा अर्क काढला जातो. त्याचे यंत्र.
संग्रहालयाच्या जवळच चेतक घोड्याची समाधी आहे. २१ जून १५७६ रोजी तेथे घनघोर युद्ध झाले. राणाप्रतापनी अकबराच्या सैन्याला हळदीघाटच्या खिंडीत गाठले. राजपुतांचा सेनापती होते हकीम शहा सुर एक पठाण होते. तर अकबराचा सेनापती होता मानसिंग. या लढाईमध्ये राणा प्रताप यांनी मानसिंग च्या हत्ती समोर येऊन जोरदार भाला फेकला. परंतु मानसिंगने तो वार चुकवला व स्वतःचे प्राण वाचवले. त्यावेळी महाराणा प्रताप यांचा घोडा चेतक यांनी हत्तीच्या सोंडेवर चढून राणा प्रताप यांना वार करण्यास मदत केली होती. तथापि त्याचवेळी हत्तीने हातातील तलवारीने घोड्याचा एक पाय जखमी केला. तीन पायावरती दौडत घोडा चेतक याने महाराणा प्रताप यांना सुरक्षित स्थळी नेले. या सुरक्षित स्थळी नेताना त्याला नाला पार करण्यासाठी मोठी उडी मारावी लागली. जखमी अवस्थेतील चेतकने महाराजांना सुरक्षितपणे सोडूनच आपले प्राण त्याग केले. त्याची समाधी सुद्धा या म्युझियम जवळच आहे.
फोटो
तेथून साधारण दहा मिनिटांच्या अंतरावर हल्दीघाटी आहे.हल्दीघाटी हे नाव तेथील मातीच्या पिवळ्या रंगावरुन पडले आहे.
फोटो
हल्दीघाटीच्या युद्धात महाराणा प्रताप यांचे सैन्य कमी होते.अकबराचे सैन्य खूप जास्त होते. तथापि गुरील्ला पद्धतीने राणा प्रताप यांच्या सेनेने अकबराच्या सेनेचा धुव्वा उडवला. हे युद्ध अनिर्णित राहिले . कारण की या युद्धा मध्ये कुठल्याच राजाचा मृत्यू झाला नाही. हल्दीघाटी मध्ये झालेल्या युद्धाचा महाराणा प्रताप यांच्या वरती खूप परिणाम झाला. त्यानंतर त्यांनी सर्वच राजेशाही पद्धतींचा त्याग केला. ते रानावनात राहू लागले. आपल्या सहकाऱ्यांसह त्यांनी मेवाडचा सर्व प्रांत हा अकबराच्या प्रभावातून मुक्त करण्याची शपथ घेतली. आणि पुढच्या बारा वर्षाच्या काळातही मोठ्या प्रमाणात निधी उभा करून सहकाऱ्यांना युद्ध प्रशिक्षणात गुंतवून ठेवून बराचसा प्रांत त्यांनी पुन्हा आपल्या ताब्यातही घेतला. केवळ चित्तोडगड वरती स्वारी करणे बाकी होते. परंतु हल्दीघाटीमध्ये त्यांना प्राप्त झालेल्या जखमांनी नंतर उग्र स्वरूप धारण केले आणि वयाच्या 56 व्या वर्षी या महावीर योद्ध्याचा मृत्यू झाला. मेवाड प्रदेशातील लोक केवळ दोघांनाच खर्या अर्थाने राजे मानतात. एक महाराणा प्रताप व त्यांचे घराणे व दुसरे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे घराणे! कारण दोघांनीही मुघलांसमोर शेवटपर्यंत शरणागती पत्करली नाही. हे कुठेही गेलात तरी इतिहासाच्या अनुषंगाने जागोजागी ऐकायला मिळते. महाराणा प्रताप यांचे जीवन व छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवना यात बरेच साम्य आढळते. हल्दीघाटीच्या युद्धाची माहिती ऐकत असताना आपणही भावनिक होऊन जातो.
हल्दीघाटीवरुन दहा-पंधरा मिनिटांच्या अंतरावर रक्त तलाई आहे. हल्दीघाटीच्या युद्धाच्या वेळेला मान्सूनचा पहिला पाऊस पडला. तथापि मोठ्या प्रमाणात कत्तल झाली होती. दोन्ही बाजूंचे अनेक योद्धे वीरगतीस प्राप्त झाले होते. त्यामुळे अनेक प्रेतावरून हे पावसाचे पाणी वाहत जाऊन एका विशिष्ट जागी जाऊन साठले. मोठ्या प्रमाणात कत्तल झाली असल्यामुळे या पाण्याचा रंग लाल होता. त्यामुळे या रक्ताच्या पाण्याचे तळे साठले. हीच जागा पुढे रक्त तलाई म्हणून प्रसिद्ध झाली. येथे राजपुतांच्या सेनेतील वीरगती प्राप्त झालेल्या वीरयोद्ध्यांचे तसेच हाकिमशाह सुरी या सेनापतीचेही स्मारक आहे. हल्दीघाटीच्या जराच पुढे हाकिम शहासूर यांचे मस्तक पडले. परंतु त्यांच्या घोड्याने त्यांचे धड पळवत पळवत रक्त तलाई येथे नेले. तेथेच त्यांचे दफन करण्यात आले आहे.तेथे श्री.खान जे गाईड खान या नावाने ओळखले जातात त्यांच्याकडे हकीमशाह सुरी यांच्या समाधीचे जतन करण्याचे काम आहे. त्यांनी रक्त तलाई या स्थानाबद्दल व हल्दीघाटी च्या युद्धाबद्दल आम्हाला माहिती सांगितली. त्यांच्या म्हणण्यानुसार हकीमशहा सूरी यांच्या हातात तलवार होती. ती कुणालाच काढता आली नाही. त्यामुळे तलवारीसह त्यांचे येथे दफन करण्यात आले आहे.
फोटो
राणा प्रताप संग्रहालय, चेतक समाधी, हलदी घाटी व रक्ततलाई हे सर्व पाहण्यात आमचा बराच वेळ गेला. तेव्हा पाच वाजले होते. वेळ कसा गेला हे कळलेच नाही. सहस्र बाबू मंदिर हे सहा वाजता बंद होते. आम्हाला तिथे जाण्यासाठी सहा वाजणार होते .त्यामुळे आम्ही वेळेत तिथे पोहोचू की नाही याचे प्रचंड टेन्शन आले. कारण ते मंदिर खूपच सुंदर असून पाहण्यासारखे होते तरी तिथे आता अजिबातच पुरेसा वेळ मिळणार नव्हता. आम्हाला आत तरी सोडतील की नाही अशी शंका होती. ड्रायव्हरने हे सर्व लक्षात घेऊन आपल्या परीने वेळेत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आम्ही सहस्त्रबाहू मंदिर येथे पोहोचलो तेव्हा सूर्यास्त झाला होता. परंतु अजून पूर्ण अंधार पडला नव्हता. सहा वाजले होते. परंतु आत कुणाचे तरी प्रिवेडींग शूट चालू होते. दोन ग्रुप्स होते. त्यामुळे आम्हाला तिथल्या माणसांनी आत मध्ये सोडले. आम्ही आत गेलो आणि अतिशय हताश वाटले. कारण मंदिर अतिशय सुंदर होते. हे मंदिर पाहायचं सोडून आपण हल्दीघाटी व रक्त तलाई येथे फारच वेळ घालवला असे आमचे मत झाले. परंतु आता नाईलाज होता. आम्ही शक्य तेवढे भराभर फोटो काढू लागलो. परंतु फोटोचा ग्रुप मुख्य मंदिराच्या समोरच फोटो काढत असल्यामुळे आम्हाला काही तिथे जाऊन फोटो काढता येईना. आम्ही अंधार पडायच्या आधी शक्य तेवढे फोटो काढून घेतले आणि मुख्य मंदिराच्या तिथून हे ग्रुप कधी जातात याची वाट पाहू लागलो. ते ग्रुप तिथून जाताच आम्ही त्या मंदिराचेही फोटो काढून घेतले. परंतु पूर्णतः अंधार असल्यामुळे मंदिराच्या आतले मात्र फोटो काही काढता आले नाहीत. साधारण अर्धा तास आम्ही तिथे होतो. तिथे गाईड वगैरे अशी काही व्यवस्था नाही. हे पाहायला एक-दोन तास तरी वेळ राखीव हवा.
काही फोटो-
त्यानंतर तिथूनच जवळ असलेल्या एकलिंगजी मंदिर येथे आम्ही गेलो. एकलिंगजी हे मेवाड राजांचे कुलदैवत. युद्धाला निघण्यापूर्वी ते इथे दर्शनासाठी येऊन आशिर्वाद घेत असे कळले. दर्शनात फारशी रांग वगैरे नव्हती. व्यवस्थित दर्शन झाले. येथे फोटोग्राफी परवानगी नसल्यामुळे फोटो काढता आले नाहीत. आता घरी परतायचे होते. आजचे सर्व स्थळ दर्शन पार पाडले होते. फक्त सहस्त्रबाहू मंदिर याकरिता म्हणावा तसा वेळ देता आला नाही त्याचे दुःख मात्र मनात नक्की होते. परंतु स्वतः नियोजन केलेल्या प्रवासात असे काहीतरी कमी जास्त व्हायचेच. आम्हाला रूमवर पोहोचायला साधारण नऊ वाजले. उद्याचा दिवस मुद्दामच निवांत ठेवला होता. स्थानिक उदयपूर फिरायचे होते. राहिलेले स्थलदर्शन करायचे, थोडेफार खरेदी करायची, असं उद्याच्या दिवसाचे निवांत नियोजन होते. त्यामुळे लवकर उठण्याची घाई नव्हती. दिवसभर खूप दमल्यामुळे आम्ही लगेचच झोपी गेलो.
प्रतिक्रिया
15 Dec 2022 - 6:36 pm | कंजूस
कुंभालगडातली आणखी काही मंदिरे पाहिली का?
वेळ खरा किती लागेल? किती चालावे लागते?
आम्ही फक्त एकलिंगजी आणि नाथ द्वारा (फक्त बंद दारच)पाहून परतलो. नाथ द्वारा बाजारातले विक्रेते लबाड वाटले. सगळा माल सूरत,नवसारी इथून येतो.
15 Dec 2022 - 6:36 pm | कपिलमुनी
तुमच्या लेखामुळे जायची इच्छा प्रबळ होउ लागलि आहे
15 Dec 2022 - 6:58 pm | श्वेता२४
@कंजूसजी तेथील मंदिरे बरीच लांब होती. पाहण्यासारखे काही आहे असे वाटले नाही . दगडी बांधकाम आहे कलाकुसर अशी काही नाही .एकूण साडेतीनशे मंदिरे आहेत .किती किती पाहणार? शिवाय तिथे आता पूजा होत नाही. नुसतेच अवशेष आहेत. आम्हाला दिवसभरात अजून बाकीचे स्थल दर्शन करणे ही बाकी होते त्यामुळे मंदिरे पाहणे टाळले. कुंभलगड येथे बरीच पायपीट करावी लागते. विशेषतः तो गडाच्या दगडी रस्त्याचा चढ चढून जाणे हेच मोठे आव्हान आहे. बाकी गडावर फिरावे लागते त्याचे काही वाटत नाही. गडावरील सर्वच ठिकाणे व मंदिर ही पाहायची असे म्हणले तर मला वाटते तीन चार तास पुरेसे आहेत. नाथद्वाराला आम्ही जायचे टाळले त्याचे कारण सुरुवातीच्याच एका लेखात दिले आहे.
@कपिलमुनी नक्कीच जा. खूप सुंदर आहे हा प्रदेश...
15 Dec 2022 - 11:28 pm | गोरगावलेकर
फोटो एकापेक्षा एक सुंदर. सास बहू मंदिर खूप आवडले. माहिती, वर्णन दोन्हीही छानच.
एक छोटासा बदल मात्र करा.
हा किल्ला डोंगरावर तीन हजार सहाशे मीटर उंच आहे
येथे मीटर ऐवजी फूट करा.
16 Dec 2022 - 9:44 am | कर्नलतपस्वी
@श्वेता , ओघवते वर्णन लेखावरून नजर काढू देत नाही. फोटो खुपच सुंदर आहेत. सिटी पॅलेस,सहेली की बाडी उदयपुर, सिलीशेड,जयसमंद,विजयमंदिर अलवर अशा अनेक राजस्थानी शहरात हिन्दी चित्रपट चित्रीत झाले आहेत.'मेरा साया' या चित्रपटातील तु जहाॅ जहाॅ रहेगा हे गणे त्यापैकीच एक.
भैरव पोल जवळपास सर्वच किल्ल्यांवर बघायला मिळेल.
महाभारत कालात भिमाने आपल्या गदेने डोंगरला मोठ्ठे गोल भगदाड पाडले. त्या जागेला पांडूपोल म्हणतात.
पोल म्हणजे दरवाजा.
सर्व लेख पुन्हा एकदा वाचुन काढणार आहे.
मिपावरील भटके भटकंतीचे इतके सुंदर वर्णन करतायत की सर्व एकत्रीत करून मस्त पुस्तक बनू शकते.
सर्व भटक्यांनी विचार करावा.
16 Dec 2022 - 11:16 am | श्वेता२४
@गोरगावलेकर चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. बदल केला आहे.
@कर्नलसाहेब तुमच्या प्रतिक्रीयेतूनही बरीच वेगळी माहिती कळाली.
मिपावरील भटके भटकंतीचे इतके सुंदर वर्णन करतायत की सर्व एकत्रीत करून मस्त पुस्तक बनू शकते.
संपादक मंडळाने या सूचनेचा विचार करायला हरकत नाही.
16 Dec 2022 - 12:48 pm | राजेंद्र मेहेंदळे
हाही भाग उत्तम
16 Dec 2022 - 12:56 pm | प्रचेतस
हा भाग आतापर्यंतच्या सर्व भागांवरिल कळस आहे. अतिशय आवडला. कुंभलगड अजस्त्र आहे. जिंकण्यास अत्यंत अवघड. नागर शैलीतले सहस्रबाहू मंदिर एकदम सुरेख.
16 Dec 2022 - 2:06 pm | श्वेता२४
@ राजेंद्र मेहेंदळे व @ प्रचेतस
तुम्ही या लेखमालेच्या सर्वच भागांवर दिलेल्या प्रतिक्रीयांसाठी धन्यवाद ! आपल्यासारख्या जुन्या व तज्ञ मिपाकरांकडून कौतुकाची थाप मिळणे हे माझ्यासाठी खूप उत्साह वाढवणारे आहे.
19 Dec 2022 - 12:08 pm | सौंदाळा
सहस्रबाहू मंदीराचे फोटो अप्रतिम.
महाराणा प्रताप यांच्याबद्दलची माहिती आणि फोटो पण खूप सुंदर.
इकडचे किल्ले, गढ्या, राजवाडे, मंदीरे खूपच सुंदर आहेत आणि त्यांची हानी पण झाली नाही / हानी केली नाही.
पण महाराष्ट्रात मात्र असे चित्र नाही याचे कारण काय असेल? रजपूत हे मुघलांचे मांडलिक झाल्यामुळे ह्या सर्व वास्तू अबाधित राहिल्या का?
22 Dec 2022 - 3:58 pm | टर्मीनेटर
राजस्थानच्या मेवाड प्रांतात मुघलांना अतिशय कडवा विरोध झाला होता. तिथल्या लोकांनी प्राणांची आहुती दिली पण मुघलांशी तडजोडी केल्या नाहीत त्यामुळे मेवाडमधलया कित्येक पुरातन वास्तूंची हानी झालेली आहे. त्याउलट मारवाड प्रांतात मात्र आपली मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी मुघलांशी अनेक तडजोडी केल्या गेल्या अगदी रोटी-बेटी व्यवहारही केले गेले (जोधा-अकबर हे एक उदाहरण).
मुघलांचे मांडलिकत्व पत्करणाऱ्या, मालमत्तेसाठी त्यांच्याशी रोटी-बेटी व्यवहार करणाऱ्या मारवाड प्रांतातील लोकांविषयी आजही मेवाड प्रांतातील लोकांच्या मनात प्रचंड अढी आहे आणि विशेष म्हणजे ते ती लपवतही नाहीत!
"हिंदुस्तान के दो ही शेर... एक महाराणा प्रताप और दुसरा छत्रपती शिवाजी..." हे तिथल्या मुलांच्या मनावर अगदी लहानपणा पासूनच बिंबवले जाते आणि उदयपूर, हल्दीघाटी, चितोडगड पासून संपूर्ण मेवाड प्रांतात फिरताना आपल्याला त्याची प्रचिती येत राहाते!
19 Dec 2022 - 2:41 pm | श्वेता२४
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
पण महाराष्ट्रात मात्र असे चित्र नाही याचे कारण काय असेल? रजपूत हे मुघलांचे मांडलिक झाल्यामुळे ह्या सर्व वास्तू अबाधित राहिल्या का?
अगदी बरोबर. जिथे जिथे मुगलांना विरोध झाला तिथे वर्चस्वासाठी लढाया झाल्या. आणि लढाई म्हणली की विध्वंस आलाच. ज्या राजांनी सामोपचाराची भूमिका घेतली , मांडलीकत्व पत्करले किंवा जिथे आक्रमणकर्ते पोहोचू शकले नाही तेथील स्थापत्य तुलनेने आज चांगल्या अवस्थेत दिसून येते.
22 Dec 2022 - 3:32 pm | टर्मीनेटर
ही सर्व ठिकाणे मनमुरादपणे बघीतली/अनुभवली आहेत, आणि तुम्ही ती जशीच्या तशी पुन्हा डोळ्यांसमोर उभी केलीत त्यामुळे माझ्याकडुन ह्या भागासाठी १०० पैकि १०० मार्क्स! खुप छान लिहिलं आहेत 👍
सहस्त्र बाहु मंदीरासाठी तुम्हाला वेळ कमी पडला ह्याची हळहळ वाटली! आम्ही ह्या ठिकाणी २०१६ च्या एप्रिल महिन्यात संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास तेथे पोचलो होतो आणि तेव्हाही मंदिर सहा वाजताच बंद होत होते पण तेव्हा दिवस मोठा असल्याने संध्याकाळी सात-सव्वा सात पर्यंत चांगला उजेड असायचा. मंदिर नीट बघायला किती वेळ लागतो ह्याची पूर्ण कल्पना असलेल्या आमच्या अनुभवी ड्रायव्हरच्या सूचनेप्रमाणे प्रवेश करतानाच तिथल्या रखवालदाराच्या हातावर शंभर रुपये टेकवल्याने मग त्यानेही बिचाऱ्याने ठार अंधार पडल्यावर आम्ही स्वतःहून तिथून बाहेर पडेपर्यंत आम्हाला डिस्टर्ब् केले नव्हते!
तुमचे चेहेरे झाकण्यासाठी स्मायलीचा वापर करावा लागल्याने गाभाऱ्याची पार्शवभूमीही थोडी झाकली गेली असल्याने मंदिराचा समोरून काढलेला माझा एक फोटो 😀
16 Jan 2023 - 12:57 pm | श्वेता व्यास
कुंभलगड आणि सासबहू मंदिर आवडले.
18 Jan 2023 - 1:20 pm | चंद्रसूर्यकुमार
हा भाग पण आवडला.
कुंभालगडवर बाबराने मारलेल्या तोफगोळ्यामुळे मुख्य प्रवेशद्वाराजवळ भिंतीला लहानसा खड्डा पडला आहे असे गाईडने आम्हाला सांगितले होते. खखोदेजा. तरी तो फोटो देत आहे.
कुंभालगड बघून झाल्यावर त्यांची जंगल सफारी घेतली होती. जंगलात बरेच आत घेऊन जातात. तिथल्या वातावरणातील गारवा आणि निवळशंख शांतता या दोन गोष्टी अगदी हव्याहव्याशा वाटतात. इतर कोणत्याही जंगल सफारीप्रमाणे तिथे वाघ किंवा त्याचे भावंड- चित्ते वगैरे दिसले नाहीतच पण हरणे भरपूर बघून आलो :)
18 Jan 2023 - 6:07 pm | श्वेता२४
बाबराने (की आणी कोणी?) मारलेल्या तोफगोळ्यामुळे मुख्य प्रवेशद्वाराजवळ भिंतीला लहानसा खड्डा पडला हे आमच्याही गाईडने हे सांगितले होते. पण मी तिथे फोटो काढला नाही. त्यामुळे विखाण करताना आठवले नाही. जंगल सफारीचा अनुभव सांगितला ते बरे झाले कारण आम्ही केली नाही. तेथील जंगलात वाघ/चित्ते/सिंह नाहीत तर बिबटे असतात असे सांगितले आम्हाला.