गेल्या वर्षापासून माझा उदयपूरला जाण्याचा प्लान चालू होता. शेवटी 2022 च्या दिवाळीच्या सुट्टीच्या आधी उदयपूरला जायचं नक्की झालं. बजेट ट्रीप नियोजन करायचे होते. कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त स्थलदर्शन करता यावं हा मुख्य उद्देश होता. त्यामुळे कंजूस सरांचे मार्गदर्शन घेतलं. त्यांनी तत्परतेनं अतीशय उपयुक्त माहिती दिली. त्यांच्या सल्याप्रमाणे माऊंट अबू या सहलीत समाविष्ट न करता माझ्या सहलीच्या नियोजनात काही बदलही केले. या सहलीचे नियोजन करताना ट्रिप ॲडव्हायझर आणि इतरही चॅनल वाल्यांचे व्लॉग कामी आले.आम्ही ट्रेनने जायचे ठरवले. स्लीपर कोचचे तिकीट साधारण रु.550/- प्रतिमाणशी आहे. सर्वांच्या सुटीच्या तारखा विचारात घेऊन BDTS उदयपूर Sf एक्सप्रेस चे स्लीपर चे बुकींग करुन टाकले.मुंबईवरुन उदयपूरला स्लीपर बसनेही जाता येते. तेवढेच तास लागतात. अगाऊ बुकींग केले तर रु.1000 च्या आसपास तिकीट आहे. तारीख जवळ असेल तर मात्र रु.2000-2500 दर होतात. हे मी मेक माय ट्रीप वर पाहिले.
उदयपूरमध्ये 2 दिवसांनतर फारसे काही पाहण्यास नसल्याने आजुबाजुचा भाग फिरायचा ठरवला. सुरुवातीला एक दिवस एकलिंगजी, नाथद्वारा व हल्दीघाटी पाहायचे ठरवले होते. परंतु नाथाद्वाराला खूपच गर्दी असते. शिवाय पार्किंग स्पेस ही प्रत्यक्ष मंदिरापासून खूप लांब आहे (20 मिनिटे चालत). देवाची मूर्ती दर्शनासाठी अत्यंत कमी कालावधीसाठी खुली ठेवत असल्याने अतीगर्दी आणि खूप चेंगराचेंगरी वगैरे होते असे वाचनात आल्यानंतर तिथे जायचे कॅन्सल करून टाकले. त्याच वेळेला एकलिंगजी जवळील सास बहू मंदिर (सहस्र बाहू मंदिर) हे सुंदर मंदिर माझ्या पाहण्यात आले. त्यामुळे ते माझ्या स्थलदर्शनात समाविष्ट करून टाकले.
/>
खरंतर उदयपूर मध्ये सुरुवातीला चारच दिवसांचा प्लॅन केला होता. पण शनिवारी रात्री उदयपूर वरून मुंबईला येणारी कोणतीही थेट ट्रेन नसते. सबब 19 ऑक्टोंबर ते 23 ऑक्टोंबर असा पाच दिवसांचा रविवार पर्यंत मुक्काम वाढवला. उदयपूर वरून निघणारी ट्रेन चित्तौडगड ला थांबत असल्याने दिवसभर चित्तोडगढ बघून रात्री उदयपूर वरून निघणारी ट्रेन चित्तोडगडला पकडायची असा बेत नक्की झाला. शेवटी 2 दिवस उदयपूर, एकदिवस – एकलिंगजी, नाथद्वारा, सह्स्रबाहु(सासबहु) मंदीर व हल्दीघाटी पाहायचे व एक दिवस कुंभलगड व राणकपूर पाहायचे व शेवटच्या दिवशी येता-येता चित्तौडगड पाहायचे असे 5 दिवसांचे नियोजन झाले.
सर्व स्थलदर्शनाचा नकाशा
/>
उदयपूरमध्ये काय पाहाल? –
खुद्द उदयपूर शहर पाहायचे झाले तर 2 दिवस पुरेसे आहेत. शहरातील प्रमुख आकर्षण पुढीलप्रमाणे –
नाव वेळ प्रवेश फी(प्रौढ) (मुले)
1) सिटी पॅलेस सकाळी 9.00 ते. 5.30 रु.२५० रु.१००
2) जगदीश मंदीर सकाळी 8.00 ते 9.30
3) लेक पिचोला बोट राईड सकाळी 9.30 ते 5.30 सकाळी रु.४०० व संध्याकाळी रु.८००, मुले सकाळी रु.२०० व संध्याकाळी रु.४००
4) बगोर की हवेली शो सकाळी 7.00 ते 8.30 ऑफलाईन रु.७५ ल ऑनलाईन रु.१०५
5) करणी माता मंदीर रोप वे सकाळी 9.00 ते.9.00 रु.९५
6) फतेह सागर लेक (मोती मगरी) सकाळी 9.00 ते 6.00 बोटींग साधी रु.७५ स्पीड बोट-२२०
7) सहेलियोंकी बाडी सकाळी 9.00 ते 7.00 रु.१०
8) सज्जनगढ (मॉन्सून) पॅलेस सकाळी 8.00 ते 6.00 रु.११०
9) विंटेज कार म्युजियम सकाळी 9.00 ते.9.00 रु.४०० रु. २००
10) बाहुबली हिल्स
यातील अनु क्र.1-5 येथील स्थळे जवळजवळ असून एका दिवसात पाहता येतात. तर अनु क्र. 6-7 व 8 येथील स्थळे जवळजवळ आहे. त्यामुळे दोन दिवसात अनु क्र. 1-7/8 आरामात पाहू शकता. यातील विंटेज कार म्युजियम हे जुन्या कारचे खाजगी संग्रहालय आहे. त्यात आम्हाला स्वारस्य नसल्याने ते वगळले. सज्जनगढ व बाहुबली दोन्ही थोडे शहरापासून लांब आहेत. केवळ व्यू पॉईंट असल्याने व टॅक्सीनेच जावे लागत असल्याने खर्चाचा (दोन्ही स्थळांचा टॅक्सी खर्च अंदाजे रु.2500-3000 ) विचार करता ही स्थळे तेवढी आवश्यक वाटली नाहीत. सबब आम्ही तिथे गेलो नाही.
उदयपूर स्थलदर्शनाचा नकाशा-
/>
उदयपूरमध्ये रस्ते चिंचोळे आहेत. सतत ट्राफीक जाम असते. त्यामुळे शहर फिरण्यासाठी कारपेक्षा रिक्शा हा जास्त सोईचा पर्याय आहे. रिक्शाभाडेदर रु.100 पासून सुरु होतात. मिटर वगैरे काही नसतं. त्यामुळे एकेकटे ठिकाण पाहण्यापेक्षा दिवसभराची किंवा काही तासांची रिक्शा बुक केलेली परवडते. दिवसभराची रिक्शा 800-1000/- रु. मध्ये मिळते. उदयपूर सहलीत राहण्याचे ठिकाण शक्यतो लेक पिचोलाच्या जवळ असावे. जेणेकरुन तुम्ही सर्व ठिकाणे चालत कव्हर करु शकाल. जर तुम्ही रेल्वे स्टेशनच्या आसपास रुम घेतली, तर प्रत्येकवेळी तुम्हाला रिक्षाने शहरात यावे लागते. जे अनावश्यक खर्च वाढवते. उपरोक्त अनु क्र.१-५ हि स्थळे लेक पिचोलाच्या जवळ चालत जाण्याच्या अंतरावर आहेत.
मी महिनाभर आधीपासून हॉटेलचे बुकिंग करायचे बघत होते. आधी मी ॲगोडावरून एक हेरिटेज हवेली बुक केली होती. तथापि तिथे फोन केल्यानंतर कळाले की माझ्या 6 वर्षाच्या लहान मुलाचे ते एक्स्ट्रा चार्जेस ऐनवेळी आल्यावर घेणार होते. माझ्या बुकींगमध्ये तो फ्रीमध्ये राहू शकत असल्याचे नमुद होते. तथापि त्या हॉटेल मालकाने अतिरीक्त शुल्क भरावे लागेल असं सांगितले. त्यामुळे तिथे जायचं कॅन्सल करून टाकले व वेबसाईटवर तक्रार नोंद केली. नंतर Goibio वरून मी गजकर्ण हवेली ही लेक पिचोलाच्या काठी असलेली रूम मला बरीच स्वस्त मिळत होती. आणखीन एक दुसरे हॉस्टेल होतं त्याचेही रिव्ह्यू चांगलं होते. त्या दोघांचेही मी बुकिंग करून टाकले. गजकरण हवेलीला मी प्रत्यक्ष फोन करून विचारले त्यावेळी त्यांनी तीच रूम मला अन्य काही चार्जेस न भरता केवळ चौदाशे रुपये मध्ये दिली व कंपनीतर्फे बुकिंग न करण्याचे सुचवले. मी लेक पिचोलाच्या काठावर गजकर्ण हवेली हे लेक व्यू गेस्ट हाऊस बुक केले. जे मला नॉन एसी प्रतिदिन 1400/- रु. ला. पडले. 50% रक्कम आधीच भरून टाकली आणि माझ्या हॉटेलचे बुकिंग फिक्स करून टाकले. कुंभलगड व हल्दीघाटीला जाण्यासाठी ओळखीचा टॅक्सीवाला तुम्ही आल्यावर उपलब्ध करुन देतो असं हॉटेलमालकांनी सांगितल्यामुळे मी निर्धास्त झाले.
आता सर्व तयारी झाली होती. कधी एकदा आम्ही उदयपूरला जाते असं मला झालं होतं. कारण स्वत: प्लान केलेली व लांबची अशी ही माझी पहिलीच सहल होती. शेवटी जायचा दिवस उजाडला. आम्ही रेल्वेने रात्री 11:25 वाजता बांद्रा टर्मिनस सोडले आणि उदयपूरच्या दिशेने प्रस्थान केले. इथे मला आवर्जून सांगण्यासारखी एक गोष्ट वाटते ती म्हणजे ट्रेन अतिशय स्वच्छ होती. आम्ही सामान्य स्लीपर श्रेणीने प्रवास केला. परंतु कुठेही असुविधा जाणवली नाही. टॉयलेट स्वच्छ होते. कंपार्टमेंट वाखाणण्याजोगे स्वच्छ होते.प्रवास अतीशय सुखकर झाला. यात अजून एक लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे आपल्या इथे एरवी महाराष्ट्रात कुठे गेल्यानंतर रेल्वेच्या डब्यात खाण्यापिण्याचे विक्रेते सतत ओरडत येत असतात तसं कोणीही ट्रेनमध्ये आलं नाही. अगदी सकाळी नऊ-साडेनऊ वाजता रतलाम मध्ये ट्रेन थांबली त्याच वेळेला आम्हाला नाश्ता घेण्यासाठी खाली उतरावे लागले. ट्रेनमध्ये कोणीही नाश्ता घेऊन आलं नाही.
रतलाम स्टेशनवर ट्रेन दहा ते पंधरा मिनिटे थांबते तेवढ्या वेळात मी खाण्यापिण्याच्या बऱ्याच वस्तू विकत घेतल्या. त्यामुळे जे कोणी या ट्रेनने प्रवास करणार असतील त्यांनी थोड्या खाण्यापिण्याच्या तसेच कोरड्या खाद्यवस्तू सोबत ठेवलेल्या बऱ्या. आवर्जून सांगण्याची गोष्ट म्हणजे रतलाम स्टेशन वरती आम्ही घाईगडबडीत पोहे,ढोकळा आणि समोसा घेतला. पोहे अगदी अतिशय चविष्ट होते. पोह्यामध्ये कांदा नव्हता. पण पोह्याची स्वतःची अशी एक विशिष्ट चव होती.त्याच्यावर थोडीशी शेव आणि एक विशिष्ट जीरावन मसाला सारखा मसाला भुरभुरलेला होता. त्यामुळे पोहे अतीशय चविष्ट लागत होते. समोसा तर इतका खुसखुशीत व चविष्ट होता की त्याच्यासाठी कुठल्या चटणीची सुद्धा गरज नव्हती. ढोकळा ही बरा होता.त्यामुळे कधी रतलाम ला उतरलात तर हे पदार्थ ट्राय करायला हरकत नाही. त्यानंतर उदयपूर येईपर्यंत आम्ही काहीच खाल्ले नाही कारण 4-5 तासांत आम्ही उदयपूरला पोचणार होतो..........
प्रतिक्रिया
29 Nov 2022 - 7:45 pm | mayu4u
पु भा प्र
रच्याकने, स्क्रीनशॉट कोणत्या फोन वरुन घेतलेत?
29 Nov 2022 - 9:09 pm | टर्मीनेटर
वाह! हि सर्वच ठीकाणे बघितली असल्याने त्यांच्याबद्दल वाचायला नक्कीच आवडेल 👍
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
29 Nov 2022 - 9:22 pm | कंजूस
उपयुक्त वर्णन.
नकाशासह तपशील आवडले.
29 Nov 2022 - 11:05 pm | श्वेता२४
@mayu4u माझा सॅमसंग गॅलेक्सी M33 आहे त्यावरून स्क्रीन शॉट घेतले आहेत.
@ टर्मिनेटर व कंजूसजी प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद. परंतु तुमच्या इतके चांगले प्रवास वर्णन काही मला लिहिता येणार नाही.
तुम्हाला अजून एक विचारायचे आहे .वरील लेखांमध्ये मी उदयपूर मधील ठिकाणे, त्यांची वेळ व प्रवेश फी याचे तक्त्यासारखे लेखन केले होते मध्ये बरीच स्पेस पण दिली होती परंतु प्रकाशित होताना ते चिकटून आलेले दिसत आहे. यावरती काय तोडगा आहे ते सांगाल का?
30 Nov 2022 - 4:32 am | कंजूस
दोन तीन <br /> ओळीच्या शेवटी वापरणे.
30 Nov 2022 - 6:53 am | गोरगावलेकर
नव्या मुंबईतील एका स्थानिक राजकीय नेत्यासोबत सवलतीच्या दरात केलेली महिला मंडळाची उदयपूर सहल आठवली. आपण लेखात सांगितलेली काही ठिकाणे पहिली आहेत.त्यांच्याबद्दल व इतर ठिकाणांबद्दल वाचायला निशचितच आवडेल.
30 Nov 2022 - 8:46 am | प्रचेतस
सुरुवात आवडली. नकाशे, तिकिटदर, राहण्याची ठिकाणे ह्याची व्यवस्थित माहिती दिल्याने इकडे जाण्याचे नियोजन सोपे करता येईल.
30 Nov 2022 - 10:22 am | सौंदाळा
हेच म्हणतो,
खूपच तपशीलवार आणि मुद्देसूद माहिती आहे. याचा नक्की उपयोग करणार.
पुभाप्र
2 Dec 2022 - 5:43 pm | चौथा कोनाडा
+१
हेच म्हणतो.
2 Dec 2022 - 5:43 pm | चौथा कोनाडा
+१
हेच म्हणतो.
30 Nov 2022 - 9:09 am | कर्नलतपस्वी
पश्चिम सीमेवरील राज्य असल्यामुळे राजस्थान मधे बरेच वर्ष राहायला व वारंवार जायला मिळाले. बहुतेक प्रवास स्वताच्या,सरकारी गाडीतून केला.येथील रस्ते खुप चांगले आहेत. घरची मंडळी आली होती तेव्हां अलवर-जयपूर-अजमेर-पुष्कर-उदयपूर असा भटकंतीच्या उद्देशाने प्रवास केला. सर्व ठिकाणी महाराष्ट्र मंडळात वास्तव्य केले त्यामुळे राहाण्याचा खर्च नगण्य. त्यावेळेस मी अलवर महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष असल्यामुळेच इतरत्र दूरध्वनी संबध होते.
चित्तोडला सीताफळ चांगली ,भरपुर मिळतात. खाल्लीच असतील. सहेली की बाडी मधे फोटो शूटही केले असेल.
आठवणी जागृत झाल्या.
पुढचा भाग लवकर येऊ द्यात.
30 Nov 2022 - 9:52 am | श्वेता व्यास
छान सुरुवात आहे, पुभाप्र.
30 Nov 2022 - 11:17 am | श्वेता२४
सर्व प्रतिसाद कर्त्यांचे मन:पूर्वक आभार. खरंतर हा भाग सर्वांना थोडा रटाळ वाटेल. परंतू माझा हेतू हाच आहे की, मला सर्व माहिती जमवायला २-३ महिने गेले. त्यामुळे ती सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देणे, जेणेकरुन ज्यांना भविष्यात जायचे आहे त्यांना नियोजन करताना अडचण येऊ नये.
@कर्नलसाहेब कुंभलगडला आम्हाला सिताफळे मिळाली. ती आम्ही घरी घेऊन आलो. पिकल्यावर अत्यंत मधुर व रसरशीत लागली चवीला. केवळ ६० रु. मध्ये १५ सिताफळे दिली मुलांनी. पुढे विस्तृत वर्णन येईलच.
2 Dec 2022 - 8:27 pm | Nitin Palkar
खूपच छान माहित दिली आहे. मी याच महिन्यात जयपूर, रणथम्बोर, जोधपुर, उदयपुर अशी सहल आखली आहे. तुमच्या माहितीचा नक्की उपयोग होईल.
5 Dec 2022 - 10:50 am | श्वेता२४
तुमच्या सहलीकरीता शुभेच्छा! इथे सचित्र वृत्तान्त टाका.
16 Dec 2022 - 11:52 am | राजेंद्र मेहेंदळे
सगळे मिपाकर नाताळ च्या आधीच फिरायला निघालेत वाटते. असो, आमची सध्या सुट्टीआधीची हापिसची कामे संपवायची गडबड चालु आहे, त्यातच बसल्या बसल्या हे धागे वाचायला मिळणे म्हणजे दुधाची तहान ताकावर!!
धागा माहितीपुर्ण आहे, तुमच्या नियोजनाचा पुढे नक्कीच उपयोग होईल. आता पुढचा भाग वाचतो सवडीने.
16 Jan 2023 - 12:01 pm | श्वेता व्यास
सर्व नियोजन करता येण्यासारखी माहिती सांगितलीत, धन्यवाद.
जायचं झालं तर त्यासाठी वाखूसा आहे :)