उदयपूर,हल्दीघाटी,कुंभलगड व चितौडगड भटकंती पूर्वतयारी
उदयपूर,हल्दीघाटी,कुंभलगड व चितौडगड भटकंती पहिला दिवस
उदयपूर,हल्दीघाटी,कुंभलगड व चितौडगड भटकंती दुसरा दिवस
उदयपूर,हल्दीघाटी,कुंभलगड व चितौडगड भटकंती तीसरा दिवस
आज आमच्या सहलीचा चौथा दिवस होता. सकाळी सर्वचजण उशीरा उठलो. झोप मस्त झाली होती. आवरुन निवांत नाश्ता करुन आज स्थानिक स्थलदर्शन करायचे होते. कालच्या ड्रायवरच्या ओळखीचा एक रिक्षावाला दिवसभरासाठी 800 रु. या दराने ठरवला. तो आम्हाला 11 वाजता घ्यायला येणार होता. आज आम्ही सहेलियोंकी बाडी व फतेहसागर लेक पाहणे, अस्सल राजस्थानी पद्धतीचे जेवण जेवणे (दाल- बाटी सोडून) व खरेदी करणे इतकेच ठरवले होते. या तीन दिवसात खूपच जास्त चालणे- फिरणे झाले होते. त्यामुळे आजचा दिवस निवांत ठेवला होता. ठरलेल्या वेळी आमचा रिक्षावाला आला. आम्ही सहेलियोंकी बाडी येथे गेलो. सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत ही बाग पर्यंटकांसाठी खुली असते. तिकीट दर रु.10 आहे. हि बाग अतीशय रम्य असून अगदी एकदा तरी पहावीच अशी आहे.
या बागेविषयी थोडक्यात माहिती अशी की 18 व्या शतकात महाराज संग्राम सिंग यांनी आपल्या पत्नीला भेट म्हणून या बागेची निर्मिती केली. ही राणी आपल्या लग्नानंतर स्वत: सोबत 48 दासींना सोबत घेऊन आली होती. त्यामुळे राजपरिवारातील लहान मुली व दासींना खेळण्याकरीता व त्यांच्या मनोरंजनाकरीता या बागेची निर्मिती करण्यात आली . ही बागदेखील वास्तुरचनेचा उत्तम नमुना आहे. फतेहसागर तलावातील पाणी येथील कारंज्यांसाठी उपयोगात आणले जाते. इथले कारंजे त्याकाळी इंग्लंडमधून आयात केले होते. काही कारंजे विशिष्ट पद्धतीने टाळी वाजविली की सुरु होतात व बंद होतात. हे गाईड बरोबर करुन दाखवतात. आम्हाला काही जमले नाही. आम्ही काही येथे गाईड घेतला नव्हता कारण ही सर्व माहिती जाण्याआधीच माहिती होती. ही बाग पाहण्यासाठी किमान 1 तास तरी हवा. बागेच्या आत कलांगण नावाचे चित्रप्रदर्शन आहे. मेवाडच्या राजा-राणीच्या या बागेच्या अनुषंगाने प्रसंगाचे रेखाटन या चित्रांमध्ये आहे. तिथे फोटोग्राफी मनाई आहे. प्रवेश निशुल्क आहे. चित्रे छान आहेत.फोटो काढण्याची आवड असणाऱ्यांनी तर हे ठिकाण मुळीच चुकवू नये.
काही फोटो
इथे फोटो काढत असताना एक गंमत झाली. एका कारंज्यापाशी मी माझ्या मुलाला फोटो काढताना काही सूचना देत होते. आमच्या बाजूला एक कॉलेजवयीन मुलांचा समुह होता. त्यातील एका मुलाने माझ्याकडे पाहिले व ओळखीचे हसला. मी त्या मुलाला फॅमिली फोटो काढण्याची विनंती केली. त्यावर त्याने विचारले की महाराष्ट्रातून कुठून आलात? माझ्या नवऱ्याने सांगितले मुंबईहून आलो, पण आम्ही मूळचे कोल्हापूरचे. त्यावर तो मुलगा उत्तरला की मीही कोल्हापूरचाच आहे. इथे कोटा येथे शिकण्यासाठी राहत आहे. मग काय! दोन कोल्हापूरकर भेटल्यावर गप्पा रंगल्या. मग अजून एक जोडी व त्यांचा मुलगा आमच्याशी बोलायला आले. तेही कोटा येथे राहणारे लष्करी कर्मचारी होते. ते मूळचे बेळगावचे व कोल्हापूरात अनेक नातेवाईक असलेले. मराठी भाषा कानावर पडताच एकत्र आलेलो आम्ही सगळे 15-20 मनिटे बोलून आपापल्या दिशेला पांगलो.
12 वाजून गेले होते.. तेथे एका मोठ्या वृक्षाखाली आम्ही साधारण 1 तासभर बसलो. आजुबाजूला गर्द हिरवी झाडे व थंडगार वारे वाहत होते. भरदुपारीही तिथले वातावरण आल्हाददायक होते. मुलगा आसपास खेळत राहिला आणि आम्ही शांततेचा व त्या निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेत राहिलो. साधारण 1 वाजता आम्ही तेथून(नाईलाजास्तव) निघालो. कारण भूकेने आवाज द्यायला सुरुवात केली होती. आम्ही रिक्षावाल्याला काही स्थानिक प्रसिद्ध रेस्टॉरंटबद्दल चौकशी केली . त्याने 3-4 ठिकाणी नेले परंतू तिथले मेनू पाहून निराशा झाली. डाल-बाटी सोडून कोणी काही द्यायला तयार नव्हते. व आम्हाला ते सोडून इतर पारंपारीक पदार्थ खायचे होते (जसे की केर-सांगरीची भाजी).
मी आधीच एक ट्रॅडीशनल खाना नावाचे रेस्टॉरंट गुगलवर शोधून ठेवले होते. तेथे अस्सल पारंपरीक जेवण मिळते व त्याचे रिव्ह्यूही छान होते. परंतू एक थाळी 800 रु होती, जी मला खूप जास्त वाटत होती. शेवटी मी नवऱ्याला याबद्दल सांगितलं व तो म्हणाला ट्राय करु.सहेलियोंकी बाडी पासून हे रेस्टॉरंट जवळच आहे. आम्ही तीथे गेलो. तिथली रचना पारंपरीक होती. द्रोण व पत्रावळीतच जेवण वाढतात. गेल्या गेल्या आम्हाला थंडगार गुलाब सरबत पिण्यास दिले गेले. नवऱ्याने काय काय पदार्थ आहेत ते विचारले. त्यांनी सांगितलेले मेनू ऐकून आम्ही हेच शोधत होतो याची खात्री पटली व आम्ही 2 थाळींची ऑर्डर दिली. थाळी अनलिमिटेड होती. मुलगा माझ्याच ताटात जेवणार होता, ते त्यांना चालणार होतं (आपल्या इथे असं चालत नाही. निम्मा चार्ज घेतात.)
थाळीचा फोटो
ताटात डावीकडून सांगते.... केर-सांगरीची भाजी. ही भाजी पाच प्रकारच्या जंगली काटेरी वनस्पतींपासून (याला पंचकूटा पण म्हणतात) बनवली जाते. खूप औषधी असते. पंचकूटा वाळवून वर्षभर खाल्ली जाते. राजस्थानमध्ये गेलात तर ही भाजी खायला विसरु नये. मिरचीचा तिकोरा (लोणचे टाईप), खजूर व किसमिसची चटणी , ही सर्वाधिक चविष्ट होती. लसूण चटणी व सूंठ चटणी. त्याच्या उजवीकडे चूरम्याचा लाडू व बेसन वडी. त्यानंतर बाजरीचा पापड. मध्यभागी जकोलमा पूरी. ही पूरी गव्हाच्या पीठाचीच असते परंतू ही बनविणे अत्यंत कठीण आहे . खूप सॉफ्ट असते व तोंडात विरघळून जाते. डावीकडून द्रोणात चण्याची आमटी(डाळ), गोविंद गट्टे, कढी, चक्केकी सब्जी- ही सर्वात चविष्ट होती आम्ही तीनदा घेऊन खाल्ली, उडीद डाळ, कुल्हडमध्ये थंड व फ्रेश ताक!!
सर्वप्रथम हे आम्हाला ताटात थोडे थोडे वाढले गेले व कशाबरोबर काय खायचे हे सांगून प्रत्येक पदार्थ चाखायला लावला. हे मार्गदर्शन करण्यासाठी वाढपी तिथेच उभा होता. हे खूप गरजेचे होते. कारण त्यामुळे पदार्थांची चव वाढली व सर्व पदार्थांचा आम्ही पूरेपूर आस्वाद घेतला. त्यानंतर त्यांनी बाफला (सॉफ्ट बाटीसारखा), पकोडी पुलाव व बाजरेका खिचडा हे पदार्थ चाखायला सांगितले. तथापि आम्ही खाण्यात एवढे मग्न की मी नंतर फोटो काढायचे विसरले. त्यानंतर त्यांनी सर्व पदार्थ आम्हाला लागतील तसे वाढले. इथे वाढताना सुरुवातीस अगदी घास-घासभर वाढतात व सर्व पदार्थ चाखून झाले की मग आपल्याला पाहिजे तसे वाढतात. त्यामुळे आपण आवडीच्या पदार्थांचा पुरेपूर आस्वाद घेऊ शकतोच, शिवाय अन्नही वाया जात नाही.
पकोडी पुलाव जबरदस्त होता. तर बाजरेका खिचडा हा मला त्या सर्व थाळीत सर्वात जास्त आवडलेला पदार्थ. आपल्याकडे ज्वारीच्या कण्या करतात तशाच या बाजरीच्या कण्या. फक्त त्यात खूप सारे तूप व साखर घालून खातात. एक घास खाताच मी तृप्त होऊन डोळे मिटले.
शेवटी खास फोटोसाठी घेतलेल्या बाजरेका खिचडाचा फोटो
मी अतीशयोक्ती नाही करत. हे जेवण माझ्या आयुष्यात जेवलेल्या काही सर्वोत्तम जेवणांमधील आहे. हा एक सोहळा होता व तो आम्ही पूरेपूर साजरा केला. नवऱ्याने सर्व ताट चाटून पुसून साफ केले. मुलाने पूरी व चक्केची सब्जीवर ताव मारला. रेस्टॉरंटचे मालक प्रत्येक टेबलवर जाऊन अगत्याने विचारत होते की, जेवण कसं वाटलं म्हणून. आमच्या टेबलापाशी आल्यावरही त्यांनी हाच प्रश्न विचारला. नवरा म्हणाला सिर्फ पेट ही नही भरा... मनभी भर गया!(हिंदी?....) त्यांना कळलं असावं आम्हाला काय म्हणायचंय! ते समाधानाने हसले. त्यांनी मला विचारलं की मी पाहतोय, तुमच्या मुलाने काहीच खाल्ले नाही. तो पुरेसा जेवला आहे असं मी सांगितलं तरी त्यांनी वाढप्याला बोलावून भात वाढायला सांगितला व मुलाला 2 घास खायलाच लावले! तृप्त मनाने आम्ही तेथून बाहेर पडलो. उदयपूर सहलीत, जरी ही थाळी थोडी महाग असली तरी पैसा वसूल आहे, त्यामुळे मीस करु नये.
आता दुपारचे 2 वाजून गेले होते. एवढे सारे जेऊनही हलकेच वाटत होते. आता आम्हाला शॉपिंग करायचे होते. आम्हाला काही शो-पीसेस व ड्रेस मटेरिअल खरेदी करायचे होते. काही स्वस्तात मस्त वस्तू दिसतात का याचा आम्ही शोध घेऊ लागलो. शेवटी हाथी पोल येथील मार्केटमध्ये आम्हाला सर्व मनासारख्या वस्तू मिळाल्या. खरेदीच्या अनुषंगाने अजून एक अनुभव सांगते. करणी माता मंदीरहून येताना रिक्षावाल्याने एका गव्हर्मेंट दुकानापाशी आमची रिक्षा थांबवली. तिथे आम्ही आयुर्वेदिक असा केसाला लावायचा कलप (हेअरडाय) (रु.450)आणि केसाला लावण्याची काही प्रॉडक्ट्स (शिकेकाई पावडरसारखे )(रु.250) विकत घेतले. तथापि दोन्ही प्रोडक्ट्स बकवास आहेत. त्या दुकानदाराचा असा दावा होता की हा कलप स्किनला लागत नाही. हा पूर्णपणे आयुर्वेदिक आहे. एकदा लावला की तीन-चार महिने रंग जात नाही. त्यामुळे ट्राय करुन बघूयात म्हणून केसाचा कलप आम्ही घेतला. तथापि आता तीन ते चार वेळा आमचा लावून झालेला आहे. अत्यंत फालतू प्रॉडक्ट आहे. त्यामुळे कोणी उदयपूरला जाणार असेल आणि दुकानदाराने कितीही कन्व्हिन्स केले तरी ही आयुर्वेदीक हेअरडाय किंवा केसाची शिकेकाई, फेस पॅक इ. खरेदी करू नका, असा माझा सल्ला आहे.
आता बोटींगकरीता फतेहसागर लेक येथे जायचे होते. सहलीच्या दुसऱ्या दिवशीच सिटी पॅलेस झाल्यानंतर करणी माता मंदिर ला जायचे आणि येताना सरकारमान्य बोटीतून बोटिंग करायचे असे ठरवले होते. परंतु करणी माता मंदिर येथेच आम्हाला उशीर झाला. त्यामुळे आमचे लेक पिचोलामध्ये बोटिंग करण्याचे राहून गेले. खरं म्हणजे सर्व पर्यटक असे लिहितात की लेक पिचोला मध्ये तुम्ही बोटिंग नाही केलं तर तुमची उदयपूर सहल अपूर्ण राहते. वेळेअभावी आम्ही शेवटपर्यंत लेके पिचला मध्ये बोटिंग करुच शकलो नाही. तसेही जवळपास रोजच आम्ही गणगौर घाटावरती जाऊन लेक पिचोलाचे दर्शन करतच होतो. त्यामुळे बोटिंग करताना आम्हाला परत काही वेगळे दृश्य दिसले असते असे आम्हाला वाटले नाही. त्यामुळे आम्ही फतेहसागर लेक येथेच बोटिंग करायचे ठरवले होते. एव्हाना 5 वाजत आले होते. आम्ही नेहरु गार्डन, फतेहसागर लेक येथील बोटींग पॉईंटला पोचलो.
फतेहसागर येथे साध्या बोटींगचे तिकीट काढले. यात लेकच्या मध्यभागी बेटावर साधारण 15-20 मिनिट सोडणार होते व तेथून परत यायचे अशी अर्धा तासाची फेरी होती. प्रतिव्यक्ती 75 रु. तिकीट होते. आमचा 10 जणांचाच्या ग्रुपला पाच मिनिटात बेटावर सोडून बोट निघून गेली. त्या बेटावर गार्डन आहे. हा निव्वळ फोटो पॉईंट आहे. इथे बाकी काही नाही.
काही फोटो
आम्ही भरपूर फोटो काढले. तरीही वेळ उरलाच . शेवटी कंटाळा आला व सर्वजण बोट कधी येतेय याची वाट बघत किनाऱ्यावर बसलो. 10 मिनिटानी एक बोट आम्हाला परत घेऊन जायला आली तेव्हा बाजूने बऱ्याच स्पीड बोटी जात होत्या. मुलाने स्पीड बोट सफारीचा हट्ट धरला. मी मान्य केला. नवरा मात्र कंटाळला होता त्यामुळे आम्ही दोघांचेच तिकीट काढले. माणशी 130 रु. तिकीट होते. इथे बोटींगचे अनेक पॉईंट आहेत व प्रत्येकाचे दर वेगवेगळे आहेत.
साध्या बोटीचा अनुभव खूपच कंटाळवाणा होता. परंतू स्पीड बोटीचा अनुभव अतीशय थरारक होता. शेवटी बोट लाटांवरुन उडून परत पाण्यात आपटली तेव्हा मस्त वाटले. स्पीड बोटींग करत असताना सूर्यास्त होत होता,ते दृश्यही खूप छान दिलत होते. मी व मुलगा जाम खुश झालो.
फोटो
त्यामुळे फतेहसागर लेक येथे केवळ स्पीड बोटींग करावे. साधे बोटींग करुन पैसा व वेळ दोन्ही वाया घालवू नये असे मी ठामपणे म्हणू शकते. आता 6 वाजून गेले होते. उंट सफारी प्रतीव्यक्ती 200 रु. सांगितली. मुलाने ठाम नकार दिला. नवराही उत्सुक नव्हता. मीही याआधी खूपवेळा उंटावर बसले असल्याने शेवटी माझाही उत्साह बारगळला.
आता आम्ही खाण्या-पिण्याकडे मोर्चा वळवला. मुलाने चॉकलेट आईस्क्रीम घेतले. मला भूक अशी नव्हती. पण कंकाकांनी सूचविल्याप्रमाणे तिथे रबडी ट्राय करायचे ठरवले. एक स्वच्छसे दुकान पाहून तिथे आम्ही दोन्ही पदार्थ ऑर्डर केले.
फोटो
दोन्हीही मस्त होते. नवऱ्यानेही रबडी टेस्ट केली. मग एक ग्लास गरम दूधही घेतले. कारण सूर्यास्तानंतर थंडी पडायला लागली होती. 7 वाजत आले होते. उद्या आम्हाला हॉटेल चेकआऊट करुन चितौडगढला जायचे होते. दिवसभर चितौडगढला भ्रमंती व रात्री 11 वाजता तेथूनच रेल्वेने मुंबईकडे प्रस्थान करायचे होते. त्यामुळे हॉटेलचे बील पे करणे, सामानाची बांधाबांध करणे या गोष्टींसाठी रुमवर लवकर जाणे भाग होते. रात्री मुलगा व नवऱ्याने रुमवर हक्का नूडल्स ऑर्डर केल्या. सर्व आटोपेपर्यंत नऊ वाजले.
आज आमच्या तळ्याच्या काठी वास्तव्य असण्याचा शेवटचा दिवस होता. उद्या आम्हाला सकाळीच 7 वाजता हॉटेल सोडायचे होते. मुलगा लवकर झोपी गेला व नेहमीप्रमाणे आम्ही खिडकीतून बाहेरचे तळ्याकाठचे दृश्य पाहत गुजगोष्टी करत बसलो. या 4 दिवसात कुटुंब म्हणून आम्ही एकमेकांसोबत अतीशय आनंदाचा काळ व्यतीत केला होता. लग्नानंतर मधूचंद्रासाठी गोव्याला गेलो, त्यानंतर गेली 10 वर्षे आम्ही कुठेही बाहेरगावी ‘फिरण्यासाठी’ म्हणून गेलोच नव्हतो. नेहमीच्या धकाधकीच्या जीवनात असे निवांत क्षण वेचणे किती महत्वाचे असते हे नवऱ्याला कळून चुकले होते. अशी ट्रीप तू दरवर्षी प्लान कर, आपण जात जाऊ असे आश्वासन नवऱ्याने दिले. मला खूप बरे वाटले व इतक्या दिवसापासून केलेल्या नियोजनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले..........!
दुसरे दिवशी सकाळी कालचाच रिक्षावाला ठरलेल्या वेळी सकाळी 7 वाजता घ्यायला आला. उदयपूर ते चित्तौडगड हे अंतर साधारण 111 कि.मि. आहे. रस्ता अतीशय चांगला असून हायवे आहे. त्यामुळे उदयपूरवरुन 2 तासात पोचता येते. आम्हाला सरकारी बस स्टॅंडवर न सोडता रिक्षावाल्याने खाजगी बस स्टॅंडवर सोडले कारण बसची फ्रिक्वेन्सी जास्त व बसायला फिक्स जागा मिळते म्हणून. या गाड्यांना गर्दी असते. त्यामुळे आम्ही खाजगी बसने जायचे ठरवले. बस अर्ध्या तासाने आली . ट्रॅवल्ससारखी होती. आरामात प्रवास झाला. रु.80 तिकीट होते सरकारी बसचे रु.45 असते.
वाटेत एका ठिकाणी नाश्त्याकरीता गाडी थांबली. ड्रायवर व कंडेक्टर नाश्त्यासाठी उतरले. हे एक मोठे मिष्ठान भांडार होते. बाहेर गरमागरम फापडा, मिरची भजी, समोसे व कचोरी तळले जात होते. आम्ही नाश्ता केला नव्हता . त्यामुळे नवऱ्याने मिरचीवडा, फापडा, समोसा व कचोरी हे सगळेच पदार्थ बांधून आणले. सर्व पदार्थ गरमागरम होते. कचोरी बोटाने मोडली तर वाफ बाहेर आली. फापड्यासोबत कांदा,काकडी,टोमॅटो व मिरची बारीक कापून मिक्स करुन दिले होते. काय जबरद्सत चव होती सगळ्यांची!मी आयुष्यात खालेल्ले सर्वात उत्तम समोसा,कचोरी,मिरचीवडा व फापडा होता हा!त्यावर मस्त चहा घेतला. पुढे अर्ध्या तासातच आम्ही चित्तौडगडला पोहोचलो.
बस स्टॅंडवर उतरताच एक रिक्षावाला गड फिरवण्यासाठी 600 रु. ला फिक्स केला. त्याच्याच ओळखीचा एक गाईड त्याने आम्हाला 400 रु.ला ठरवून दिला. सामान कुठेतरी ठेवणे आवश्यक होते. त्यामुळे त्यांच्याच ओळखीच्या गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका चांगल्या हॉटेलमध्ये आम्ही सामान ठेवले. हे एक AC रेस्टॉरंट होते. इथे पोटभर नाश्ता करुन गड फिरायला निघायचे ठरवले. कारण 3-4 तास सहज लागणार होते. आम्ही तेथे पराठ्यांचा मजबूत नाश्ता केला व चितौडगढ पहायला सुरुवात केली. संपूर्ण चित्तोडगड किल्ला पायी पाहायला 2-3 दिवसही पूरणार नाहीत. तथापि गाईड काही महत्वाची निवडक ठिकाणे दाखवतात. ही ठिकाणे पाहण्यासाठी 2.5 ते 3 तास लागतात. प्रत्येक वास्तुच्या दारापर्यंत रिक्षा जात असल्याने येथे पायपीट काही फारशी करावी लागत नाही.
आता चितौडगडबद्दल थोडेसे. "गढ मैं है गढ चित्तौड, बाकी सब है गढैय्या!" अशी म्हण चित्तोडगडवासी अभिमानाने सांगतात. चित्तौडगड हा केवळ भारतातीलच नव्हे तर आशियातील मानवी वस्ती असलेला (जिथे माणसांची घरे आहेत व अजुनही राहतात.) सर्वात मोठा किल्ला आहे. . हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. हा किल्ला पांडवकालीन आहे, मौर्यांनी बांधला असे अनेक सिद्धांत आहेत. हा किल्ला प्रथम चित्रांगद मौर्य याने बांधला. त्या वरुन या जागेचे नाव प्रथम चित्रकूट व मग पुढे चितौडगड असे झाले.
तथापि याचा खरा इतिहास इ.स. 730 ला बाप्पा रावळ यांनी हा किल्ला जिंकून घेतला तेव्हापासून सुरु होतो. बाप्पा रावळ हे असे महापराक्रमी राजा होते की त्यांनी अफगाणपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला होता व त्यानंतर 400 वर्षे कुणाही अफगाणीची/त्या प्रदेशातून भारतावर आक्रमण करण्याची हिंमत झाली नाही! या किल्याची परकीय आक्रमकांनी अनेकवेळा तोडफोड केली. परंतू राजपूतांनी ताबा मिळवल्यावर पुन्हा पुन्हा बांधून उभा केला आहे. किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ 700 एकर किंवा त्याहून अधीक आहे. किल्ल्याला भैरव पोल, पदन पोल, हनुमान पोल, गणेश पोल, जोरला पोल, राम पोल आणि लक्ष्मण पोल(म्हणजे दरवाजा) अशी सात दरवाजे आहेत. किल्ल्यातील प्रमुख वास्तूंमध्ये कीर्ती स्तंभ, विजय स्तंभ, पद्मिनी पॅलेस, गौमुख जलाशय, राणा कुंभा पॅलेस, मीरा मंदिर, जोहरस्थल, जैन मंदिर आणि फतेह प्रकाश पॅलेस यांचा समावेश आहे.
चला तर मंडळी .....आता चितौडगड पाहूयात !!
पोल फोटो......
गडावर पोचल्यावर खालील गावाचे नयनरम्य दृश्य...
प्रथमत: राणा कुंभ महाल
तिकीट काऊंटर इथून जवळच आहे. येथे संध्याकाळच्या लाईट ॲड साऊंड शो चे तिकीट मिळते. शो संध्याकाळी 6.45 ते 7.45 असा असतो व रु.150+जीएसटी त्याचे तिकीट असते. जाताना पाहू असा विचार करुन आम्ही फक्त किल्ला पाहायचे प्रतिव्यक्ती रु.35 तिकीट काढले. या महालात आता काही पाहण्यासारखे नसून येथे केवळ भग्नावशेष उरले आहेत.
कुंभ महाल (संग्रहीत छायाचित्र)
आम्ही पुढे प्रस्थान केले.कुंभ श्याम मंदीर! (कुंभस्वामी मंदीर)
हे मंदीर राणा कुंभा यांनी इंडो-आर्यंन शैलीत निर्माण केले आहे. हे भगवान विष्णूला समर्पित असलेले मंदीर आहे. मंदिरामध्ये कृष्ण बलराम आणि राधा राणी यांच्या मूर्ती आहेत. मंदीरावर उत्कृष्ट कोरीव काम आहे.
फोटो
कुंभ श्याम मंदीराच्या प्रांगणातच बाजुला संत मीराबाई व त्यांचे गुरु संत रोहीदास यांचेही मंदीर आहे. संत रोहीदास यांच्या पादुका आहेत.
पादुकांच्या वरोबर वरती घुमटात पंचमुखी मूर्ती आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे पाच शरीर असून एकच मूख आहे. हे पाच भाग पंचतत्वे यांचे प्रतिक आहेत. कोणत्याही बाजूने पाहिले तरी प्रत्येक शरीर परिपूर्ण दिसते.
फोटो
मीराबाई मंदीर ....
संत मीराबाई चित्तौडगड येथे राहत होत्या. परंतू त्यांच्यावर विषप्रयोग झाल्यावर त्या येथून निघून गेल्या. इथे गिरीधर गोपालस्वरुप मूर्ती आहे. मीराबाईच्या मंदिर मध्ये दिसत असणारी मूर्ती ही आता नव्याने बसवण्यात आली आहे. मूळची राजा भोज याने स्थापन केलेली मूर्ती होती. ती हलदी घाटीचे युद्ध संपल्यावर मानसिंग जाताना येथे आला आणि इथली मूळ कृष्णाची मूर्ती त्याने आमेर किल्ल्यातील गज शिरोमणी मंदिर येथे नेऊन स्थापना केली.
फोटो
इथून पुढे आहे ते त्रिमूर्ती मंदीर....
हे 1000 वर्ष पूर्वीचे मंदिर आहे. राजा भोज याने 11 व्या शतकात हे मंदिर बांधले. अल्लाउद्दीन खिलजीने याची तोडफोड केली. नंतर चौदाव्या शतकात राजा मोकल याने 1428 मध्ये याची पुनर्निर्माण केले. याला समाधीश्वर मंदिर असेही म्हणतात. मूर्ती नऊ फूट उंच आहे. एकाच दगडामध्ये त्रिमूर्ती कोरलेले आहेत. मंदिराचा मागचा भाग जो आहे तो जगन्नाथ पुरी सारखा आणि पुढील भाग जो आहे तो सोमनाथ मंदीरसारखा याप्रमाणे रचना केली आहे. हे मंदीर ब्रम्हा, विष्णू व महेश यांचे मंदीर आहे. मंदीरावर अप्रतिम कोरीवकाम आहे.
फोटो....
मंदीराच्या समोर नंदीमंडप असून त्यावरील कोरीवकामही देखणे आहे.
फोटो
ब्रम्हदेवाचे मंदीर असल्यामुळे पाया हा कमळाच्या नक्षीचा आहे. तसेच त्यावर हत्ती कोरलेले आहेत(फोटोत हत्तींच्या सोंडा तोडलेल्या दिसतात).
अश्वमेध यज्ञाचे दृश्य ....घोडा व लवकुश
त्या काळी नर्तीका जे नृत्य करत त्यांच्या मुद्रा कोरलेल्या आहेत.
फोटो
नर्तिका ज्या दागिने व अलंकार धारण करत त्यांचे डिझाईन या फोटोत आडव्या खांबांवर कोरलेले दिसते.
फोटो
या सुंदर मंदीराला दृष्ट लागू नये म्हणून हा एकमेव काळा दगड आहे. खांबांवर नर्तीका मुद्रा दिसत आहेत.
फोटो
बाजूलाच असलेले गोमुख तीर्थ
इथून पुढे आपणास दिसते ते जोहरस्थळ.
हे जे लोखंडी ग्रीलच्या आतला पूर्ण भाग आहे, तो जोहर स्थळ म्हणून आता ओळखले जाते.
इथे आधी 40 फूट खोल खड्डा खणला जायचा आणि त्याच्यात लाकडं व तेल टाकले जायचे. अग्नी प्रज्वलित करुन स्त्रिया यामध्ये स्वतःच्या प्राणांची आहुती द्यायच्या ज्याला जोहर असे म्हटले जाते.
इतिहासात तीन मोठे जोहर झाले व त्यात एकूण 26000 स्त्रियांनी परकीय आक्रमकांच्या हाती लागून शील भ्रष्ट होऊ नये म्हणून अग्नीस्नान केले. पहिला जोहर झाला राणी पद्मावतीच्या नेतृत्वाखाली इ.स. 1303 ला अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण केले होते तेव्हा 16000 स्त्रियांनी, दुसरा 1535 ला बहादुर शहा च्या आक्रमणाच्या वेळी राणी कर्णावती हिने 13000 स्त्रियांच्या सहित जोहर केला, तिसरा जोहर अकबराने आक्रमण केले त्यावेळी राणी फूलकंवर हिच्या नेतृत्वाखाली 7000 स्त्रियांनी जौहर केला . पुरातत्व खात्याने या जागेत उत्खनन/संशोधन केले असता हाडे, कवट्या, दागिने व काही तत्सम गोष्टी मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाल्या व ही जागा जौहरस्थळ असल्याचे सिद्ध झाले.
जोहरस्थळाच्या बाजूलाच विजय स्तंभ आहे.
1448 मध्ये मेवाडचा राजा राणा कुंभ याने महमूद खिलजीच्या माळवा आणि गुजरातच्या संयुक्त सैन्यावर मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी बांधला होता. विजयस्तंभ हे चित्तौडगडच्या आकर्षक वास्तूंपैकी एक आहे जे 1458 ते 1468 या काळात बांधले गेले गेले. याचे 9 मजले असून हे नवग्रहांवर आधारीत आहे. राशींची चिन्हे यावर कोरलेली दिसतील. विजय स्तंभामध्ये सर्व धर्माच्या मूर्तींचा समावेश आहे. 122 फूट उंच आहे आणि आत मध्ये 127 पायऱ्या आहेत. खालून पसरट, मध्ये निमुळता आणि वरून परत पसरट अशाप्रकारे डमरूच्या आकारासारखा हा बनवला आहे. तिसऱ्या व आठव्या मजल्यावरती अल्ला, खुदा हा शब्द लिहिला असल्यामुळे त्याची तोडफोड केली गेली नाही. इतर सर्व मुर्तींची तोडफोड करण्यात आली आहे.यावर अद्भूत कोरीवकाम आहे.
फोटो
इथून पुढे आम्ही कालिका मंदीरात गेलो
हे पूर्वी सूर्यमंदीर होते. तथापि परकीयांच्या आक्रमाणात हे उद्ध्वस्त झाले. आता तेथे कालिकादेवीची प्रतिष्ठापना केली आहे.
फोटो
इथून पुढे आम्ही गेलो राणी पद्मावतीच्या महालात..
राणी पद्मावतीच्या महालाचे दोन भाग आहेत. एक नेहमीची वास्तू जी तलावाकाठी आहे. दुसरी जी तळ्याच्या मध्याभागी असून येथेच खिलजीने तीचे प्रतिबिंब पाहिले असे म्हणतात परंतु या बद्दल वाद आहेत.. तळ्याच्या मध्याभागी असलेला महाल हा पाहुण्यांकरीता वापरला जात असे, तीथे राणी पद्मिनी राहत नव्हती असेही मानले जाते.
फोटो
यानंतर आम्ही गेलो सूरज पोल येथे..
त्या काळात युद्धातील हत्ती धडका देऊन दरवाजा तोडत असत. त्यांना तो तोडता येऊ नये म्हणून या दरवाजावर अणकूचीदार लोखंड आहे..
फोटो
सुरज पोल येथे आता जो अणकूचीदार दरवाजा दिसत आहे हा नंतर बसवलेला आहे. फतेहपुर सिक्री येथे जो बुलंद दरवाजा आता महणून आपण पाहतो तो मूळ दरवाजा सूरजपोल येथील होता. तो अकबराने इथून नेला आणि फतेहपूर सिक्री येथे बसवला.
फोटो
याच गेटमधून राणा रतन सिंग रावळ अल्लाउद्दीन खिलजी यांस निरोप देण्यास गेला असता शेवटच्या पोलपाशी खिलजीने राणा रतन सिंग रावळ यास दगाबाजीने बंदी बनवून नेले.
फोटो
येथे काही संदर दृश्ये दिसतात. अरवली पर्वताचा एका झोपलेल्या माणसाच्या आकारासारखा पर्वताचा भाग दिसतो.
खाली गावाचा सुंदर नजारा दिसतो.
फोटो
इथून किर्तीस्तंभ पहावयास गेलो
कीर्तिस्तंभ हा 22 मीटर उंच स्तंभ 12 व्या शतकात बांधण्यात आला होता. रावल कुमार सिंह यांच्या कारकिर्दीत जैन धर्माला किर्तीमान करण्यासाठी हा स्तंभ एक जैन व्यापारी भार्गवाला यांनी बांधला होता. जैन धर्माच्या अनेक अनुयायांकडून कीर्तिस्तंभ हे प्रमुख जैन तीर्थक्षेत्र मानले जाते. या स्तंभावर जैन धर्माची शिल्पे कोरलेली आहे.
फोटो
जैन मंदीर
इथून जात असताना चित्तौडगड येथील तत्कालीन अत्यंत भरभराटीस असलेला कापड तयार करण्याचा कारखाना दिसला.
फोटो
त्यानंतर आम्ही तेथील गव्हरमेंट म्युजियम मध्ये गेलो. इथे गाईडने आम्हाला चंदनाचा लेप असलेली साडी व औषधी रजई पाहावयास नेले.( जी इथेच मिळते असे त्यांचे म्हणणे होते. ) चंदनाचा लेप असलेल्या साडीला मस्त चंदनाचा दरवळ येत होता. साडी 2000 रु. पासून सुरुवात म्हणल्यावर मी परत ठेवणार होते. परंतू नवऱ्याने ही साडी माझ्याकडून तूला ‘पाडव्याची भेट’ म्हणल्यावर मी पडत्या फळाची आज्ञा समजून घेऊन टाकली! ही साडी 4 वर्षानंतर वापरायची नसल्यास परत पाठवून द्या. 50 टक्के पैसे परत मिळतील असे सांगून बील मिळाले.
त्यानंतर येथील सर्वात शेवटचे आकर्षण फतेह प्रकाश पॅलेस येथे आलो.
हा राजवाडा महाराज फतेह सिंग यांनी बांधला व त्यांचे येथे वास्तव्य होते. ही अत्यंत देखणी वास्तू असून आत मोठे संग्रहालय आहे. येथे अनेक नकाशे, पुतळे, शस्त्रास्त्रे व प्रतिकृत्या यांचे दालन आहे. हे सर्व पाहण्यात तास-दीड तास सहज जातो. खूपच सुंदर संग्रहालय आहे.
फोटो
बंदूकांचा आकार पहा.
जहांगीरकालीन चिलखत
बाहेर येताच तेथे राजप्रासादाच्या प्रांगणात प्रतिव्यक्ती 100 रु. देऊन आम्ही घोडेस्वारी करण्याचा आनंद लुटला. आता दुपारचे 4 वाजत आले होते.
फोटो
आम्ही परत आमच्या रेस्टॉरंट वर आलो. नवऱ्याने मोबाईल वाय-फायला जोडून घेतला. चित्तौडगड, कुंभलगड इथे रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे. त्यादिवशी भारत पाकिस्तान 20-20 मॅच होती. नवऱ्याला ती अजिबात चुकवायची नव्हती. त्यामुळे त्यांनी मोबाईल सुरू केला व मॅच संपेपर्यंत मी व माझा मुलगा काहीबाही पदार्थ ऑर्डर करुन खात बसलो. शेवटी विराट कोहलीने फ्री हिट (कि नो बॉल? )वरती 2-3 रन्स पळून काढून ती ऐतिहासिक मॅच जिंकून दिली व आमची सुटका झाली. साधारण सात वाजले होते. रात्री 11 टी ट्रेन असल्याने टाईमपास करणे भाग होते. संध्याकाळचा लाईट ॲन्ड साऊंड शो आम्ही नाही पाहिला कारण इतिहासाचा नाही म्हणलं तरी ओव्हडोस झाला होता. नवीन काही पाहायला मिळणार नव्हतं. शेवटी आम्ही तेथीलच एका स्थानिक बागेमध्ये फिरावयास गेलो. तिथे मुलगा तासभर खेळत होता. छान टाईमपास झाला.
फोटो
स्थानिक मार्केटमध्ये दिवाळीचा बाजार भरला होता तेथे फेरफटका मारला. साडेनऊ-दहा वाजताच आम्ही रेल्वे स्टेशन वरती पोहोचलो. अकरा वाजेपर्यंत ट्रेन येताच मुंबईकडे रवाना झालो. मुंबईमध्ये आम्ही दुसरे दिवशी दीडच्या सुमारास पोचलो त्या दिवशी लक्ष्मीपूजन होते. लक्ष्मीपूजनाची तयारी करायची होती. कुंभलगडवरुन हल्दीघाटीकडे जात असताना वाटेत आदिवासी मुले सिताफळे विकतात. अगदी ५०-६० रुपयात डझनभर फळे मिळाली होती. त्याचीच आरास करुन फायनली वेळेत लक्ष्मीपूजन करून आमच्या या ट्रीपची यशस्वी सांगता झाली!
फोटो
प्रतिक्रिया
21 Dec 2022 - 5:06 pm | अक्षय देपोलकर
21 Dec 2022 - 5:07 pm | अक्षय देपोलकर
21 Dec 2022 - 5:14 pm | श्वेता२४
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
21 Dec 2022 - 7:11 pm | कंजूस
तुम्ही माहितीसुद्धा अगोदर मिळवली होती. फोटो सुरेख आलेत आहेत. दोन तीन नवीन जागा कळल्या.
"इतिहासाचा नाही म्हणलं तरी ओव्हडोस झाला होता." हे खरंय. आमच्या कोटा-बुंदी-चितोडगढ-उदयपूर ट्रिप मध्ये हेच झालं. आता महाल नकोच.
बोटिंगची आवड नसल्याने ते टाळलं आणि सिटी पॅलेस ते प्रताप स्मारक हे अंतर तलावांच्या काठाने चालत (पेंडसे वाचवले) गेलो. वाटेत एक परदेशी वयस्कर बाई (६०~) भेटली व ती विचारत होती की अजून किती अंतर आहे . पण तिला इंग्रजीचा गंध नव्हता. बोटं दाखवून,घड्याळ दाखवून "अर्धा तास" सांगण्यात बराच वेळ गेला. प्रताप पाहण्याच्या वर्षांचं कुणी नव्हतं म्हणून गाळला. ओटोने सहेलियों की बाबी गाठली.
{ बुंदीहून रेल्वेने} चितोडगढ स्टेशनला आल्यावर. एका ओटोने बस स्टँडला आलो तेव्हा ड्रायवर बोलला की उद्या चितोढगढ पाहायचा असेल तर साडेचारशे रु सात ते अकरा दाखवेन आणि मीच गाईड. ( २०१३) संध्याकाळी फोन करून सांगा.
हॉटेल रुम चोवीस तासाने मिळाल्याने एका दिवसांत काम झाले.
कीर्ती स्तंभ, विजयस्तंभ फोटो फारच सुंदर.
मुलाला ट्रिप फार आवडलेली दिसते आहे.
______________
माउंट अबूला गेल्यास तिथे स्थानिक लोकांचे मार्केट वेगळे आहे तिथे जा. ( पर्यटक जात नाहीत.) तिकडे स्वस्त कपडे मिळतात. रबडीही चांगली कढईतली तयार मिळते.
22 Dec 2022 - 11:13 am | अनिंद्य
छान भटकंती झाली. जवळपास सर्व कव्हर केले तुम्ही.
'ट्रॅडिशनल खाना' तुम्ही जमवला याबद्दल विशेष कौतुक, थोडे आपल्या चाकोरीबाहेरचे खाणे-पिणे हे प्रत्येक सहलीत जमवायलाच पाहिजे. त्याची निराळी मजा. नाहीतर स्विस आल्प्सला कसा वडापाव मिळाला खायला ह्याचेच अप्रूप असणारे / सर्वाधिक कौतुक करणारे असतात :-)
पुढील भटकंतीला शुभेच्छा.
22 Dec 2022 - 11:30 am | प्रचेतस
अगदी. हेच म्हणतोय.
त्या त्या ठिकाणच्या स्थानिक पदार्थांची चव आवर्जून चाखलीच पाहिजे.
22 Dec 2022 - 11:44 am | श्वेता२४
थोडे आपल्या चाकोरीबाहेरचे खाणे-पिणे हे प्रत्येक सहलीत जमवायलाच पाहिजे
अगदी सहमत . तरीही स्थलदर्शनाच्या नादात खाण्यापिण्याच्या भ्रमंतीकडे थोडे दुर्लक्षच झाले. रबडी-घीवर खायला वेळ मिळाला नाही. प्रथितयश दुकानांमध्ये कचोरी, चाट , स्वीट इ. खायला जमले नाही. तरी ट्रॅडिशनल खाना मध्ये जेवल्यामुळे ही उणीव बर्याच प्रमाणात भरुन निघाली. परंतु तिथे जेवलो नसतो तर सहल अपूर्णच राहिली असती. कदाचित भविष्यात जयपूर, जोधपूर सहलीत याकडे लक्ष देईन.22 Dec 2022 - 11:33 am | प्रचेतस
लेखमाला अतिशय आवडली. राजस्थान सहलीला जाण्यास प्रेरित करणारी. अर्थात राजस्थानला गेलोच तर चितोडगड, कुंभलगड आणि राजस्थानातील प्राचीन मंदिरे ह्यांनाच प्राधान्य असेल. राजवाडे बघण्यात फारसा रस नाही.
उदयपूरपासून वाळवंट किती दूर? मला त्या सॅण्ड ड्युन्स बघायची इच्छा आहे.
22 Dec 2022 - 11:52 am | श्वेता२४
राजस्थानातील प्राचीन मंदिरे ह्यांनाच प्राधान्य असेल. राजवाडे बघण्यात फारसा रस नाही.
बरोबर आहे. आपापल्या आवडीनुसार स्थलदर्शन करावे हेच खरे. तरीही उदयपूरमधले राजवाडे हे संग्रहालयदेखील असल्याने गाईडसोबत हे सर्व पाहणे हा एक अभ्यासपूर्ण अनुभव ठरला. भविष्यात राजस्थानात अन्य ठिकाणी आता यापुढे आम्हालाही कदाचित राजवाडा पाहणे कंटाळवाणे ठरु शकते.उदयपूरपासून वाळवंट किती दूर? मला त्या सॅण्ड ड्युन्स बघायची इच्छा आहे.
उदयपूरपासून जैसलमेर ५०० कि.मि. दूर आहे. थेट ट्रेन नाही. तथापि जोधपूरवरुन ट्रेनने ८ तास लागतात. त्यापेक्षा पुणे/मुंबई येथून थेट जैसलमेरला गेलेले बरे. ४ दिवसांची मस्त ट्रीप होऊ शकते. मीही राजस्थानचा हाच भाग भविष्यात पाहणार आहे कधीतरी. सर्वात शेवटी जयपूर, अजमेर, पुष्कर इ. पाहणार असे ठरवले आहे.22 Dec 2022 - 12:23 pm | कंजूस
पुणे ते भगतसिंग की कोठी(जोधपूर) ही ट्रेन योग्य आहे. तिथून जोधपूर - बारमेर -जैसलमेर -बिकानेर ही वाळवंटी सहल आखता येईल.
बिकानेर -शेखावटी -दिल्ली -विमानाने परत हेसुद्धा वाढवता येईल.
आग्रा (ताज,लाल किल्ला)- फतेहपूर सिक्री अकबराचे शहर-भरतपूर (पक्षी अभयारण्य)-अलवार -दीग-(चित्रे,महाल) झुनझुनु (हवेल्या) -रेवारी-दिल्ली ही एक सहल आवडेल.
सवाईमाधोपूर(रणथंबोर)-कोटा-झालावार(सूर्यमंदिर)/बुंदी(किल्ला आणि चित्रे)-चितोडगढ (शिल्पे आणि गड इथे आलेच आहे) ही एक सहल.
Everyman guide series -भरपूर चित्रांसह नकाशे,इतिहास देणाऱ्या मालिकेने भारतात फक्त राजस्थानवरच पुस्तक काढले आहे. (२०पौंड)
22 Dec 2022 - 12:41 pm | प्रचेतस
धन्यवाद कंकाका आणि श्वेता२४ या माहितीबद्द्ल.
तिथून जोधपूर - बारमेर -जैसलमेर -बिकानेर ही वाळवंटी सहल आखता येईल.
ही सहल करायला आवडेल.
22 Dec 2022 - 11:33 am | श्वेता२४
तुम्ही माहितीसुद्धा अगोदर मिळवली होती.
- त्यात तुमचाही वाटा आहे, हे नम्रपणे नमुद करु इच्छिते.आता महाल नकोच.
- नवऱ्यालाही व मलाही फारसा बोटींगमध्ये इंटरेस्ट नाही पण मुलाचाही विचार करणे भाग होते अन्यथा त्याला कंटाळवाणे वाटले असते. नवऱअयाने आता सांगितले आहे की पुढच्या वेळी थंड ठिकाणी जायचे नियोेजन कर. जिथे फक्त निसर्ग असेल.बोटिंगची आवड नसल्याने ते टाळलं
ड्रायवर बोलला की उद्या चितोढगढ पाहायचा असेल तर साडेचारशे रु सात ते अकरा दाखवेन आणि मीच गाईड
चित्तौडगडला गाईड स्थानिकच आहेत. त्यांचा इतिहास सांगण्यावर भर असतो. परंतु कोरीव कामाबद्दल फारशी माहिती नसते. त्यांना २ ते २.५ तासाच एक गिर्हाईक संपवायचे असते. तरी आमच्या गाईडने आमच्यासाठी चार तास न कंटाळता दिले. त्याने सांगितले की कोरीव कामाची विस्तृत माहिती घेण्यासाठी तुम्हाला एखादा तज्ञ गाठावा लागेल. इथल्या गाईड लोकांचा माहिती सांगण्याचे ठरलेले असते. महत्वाचे तेवढेच सांगतात. परंतू इथल्या वास्तूंवरचे कोरीव काम अप्रतीम आहे. त्यावर भर देणारा गाईड शोधणे अवघड आहे.
मुलाला ट्रिप फार आवडलेली दिसते आहे.
हो. त्याला सहल अतीशय आवडली. त्याने न कंटाळता संग्रहालय व सर्व गडही तीतक्याच आवडीने पाहिले. त्याला चालायचा कंटाळा नसल्याने तो सर्व ठिकाणी उत्साहाने फिरला. कुंभलगड आम्ही थांबत थांबत चढलो पण तो मात्र सहज चढून गेला. प्रत्येक दिवसाच्या कार्याक्रमात त्याला आवडणारे काहीतरी असेल याची मी काळजी घेत होते. त्याला पुन्हा उदयपूरला जायचे आहे असे तो अजूनही सांगत असतो.
22 Dec 2022 - 5:27 pm | टर्मीनेटर
"तालों मे नैनिताल, बाकी सब तलैया" ह्या नैनितालवासींच्या म्हणीवर आधारित प्रसिद्ध गाणे आहे, पण नैनिताल पाहिल्यावर त्यात अतिशयोक्ती असल्यासारखे वाटते 😀
पण
हे मात्र अगदी सार्थ वाटते! ५९० फुट उंचीच्या टेकडीवर, ६९२ एकर क्षेत्रफळ व्यापणारा चित्तोडगड कसला अवाढव्य आहे ... पाहुन डोळ्यांचे पारणे फिटते. विजयस्तंभ आणि मीरा मंदिर ह्या माझ्या तिथल्या सर्वात आवडत्या वास्तु!
जवळपास दिड वर्षापुर्वी प्राचीन वास्तुं विषयीच्या एका फेसबुक ग्रुप वर कुंभलगड आणि चित्तोडगड वर हे लघुलेख लिहिले होते त्यांची आठवण आली ही मालिका वाचताना!
छान झाला प्रवास आणि मालिका... मजा आली वाचायला! पुढिल भटकंती आणि लेखनास शुभेछा 👍
22 Dec 2022 - 5:32 pm | श्वेता२४
मन:पूर्वक धन्यवाद!
22 Dec 2022 - 6:29 pm | कर्नलतपस्वी
पुणे ते भगत की कोठी(जोधपूर) ही ट्रेन योग्य आहे. तिथून जोधपूर - बारमेर -जैसलमेर -बिकानेर ही वाळवंटी सहल आखता येईल.
बिकानेर -शेखावटी -दिल्ली -विमानाने परत हेसुद्धा वाढवता येईल.
१००% सहमत.
जोधपूरला मिर्ची बोंडा,मावा कचोरी.
खरेदी करायची असेल तर त्रिपोलीया बाजारात करावी. सरकारी अथवा रिक्षावाल्याने दाखवलेल्या दुकानात करू नये.
बारमेर ला बांधणीच्या चादरी,साड्या व ड्रेस चांगले स्वस्त मीळतील.
याच भागात चांदीची अॅन्टीक ज्वेलरी सेट मीळतात पण बघून घ्यावेत.
भटकंती व वर्णन वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. बरेच वेळा ट्रेनिंग, एक्सरसाईज करता राहिल्यामुळे संपुर्ण भाग बघून झाला.
मालिका आपण खुपच सुदंर लिहीली आहे.
22 Dec 2022 - 7:30 pm | श्वेता२४
मनःपूर्वक धन्यवाद!
23 Dec 2022 - 7:13 pm | राजेंद्र मेहेंदळे
छानच झाली की ट्रिप!! म्हणता म्हणता सपली सुद्धा. एखादी कौटुंबिक सहल काढताना या सगळ्या माहितीचा नक्कीच उपयोग होइल. वाखुसा.
24 Dec 2022 - 12:26 pm | गोरगावलेकर
सुंदर झालाय हा भाग आणि संपूर्ण मालिकाही. यातील बराचसा भाग पाहिलेला असूनही आपल्या नजरेतून पाहिलेल्या येथील ठिकाणांबद्दल वाचायला मजा आली.
25 Dec 2022 - 6:01 pm | श्वेता२४
प्रतिसादासाठी धन्यवाद.
26 Dec 2022 - 1:02 pm | शशिकांत ओक
ही वास्तू आतून चढून जाऊन वर पर्यंत जाता येईल का?
27 Dec 2022 - 9:44 am | श्वेता२४
नाही. आतून प्रवेश बंद आहे. फक्त बाहेरूनच पाहता येतो.
27 Dec 2022 - 12:48 pm | सस्नेह
सुरेख वर्णन व फोटो.
खाद्यपदार्थांचे वर्णन, फोटो व विवेचन मस्त!
27 Dec 2022 - 11:07 pm | श्वेता२४
मनःपूर्वक धन्यवाद
28 Dec 2022 - 1:54 pm | चित्रगुप्त
वर्णनातील बारकावे, उपयुक्त माहिती आणि भरपूर फोटो या सर्वातून मनोरंजक, उद्बोधक आणि मार्गदर्शक अशी खूपच छान झाली ही लेखमाला. लेखातील बहुतांश जागा बघितलेल्या असल्याने पुनःप्रत्ययाचा आनंद लाभला.
मी १९७५ च्या सुमारास चित्तौडला गेलो होतो तेंव्हा विजयस्तंभात वरपर्यंत गेल्याचे आठवते. साठ, सत्तरच्या (आणि ऐंशीच्याही) दशकात बघितलेले किल्ले, प्रासाद, मंदिरे, निसर्गरम्य जागा जवळजवळ निर्मनुष्य असायच्या, कारण तेंव्हा तिथपर्यंत पहुचणे कठीण असायचे आणि लोकांकडे पैसाही नसायचा. इंदौरहून आम्ही दोन-तीन मित्र सायकलने अजिंठा-वेरूळ-देवगिरी, अशीरगड वगैरेला, तसेच बडोद्याला मुद्दाम तिथली संग्रहालये बघायला गेलो होतो. कित्येकदा मी ट्रकच्या टपावर बसून कुठल्यातरी फाट्यावर उतरायचे, मग जंगलातून मार्ग काढत किल्ल्यापर्यंत पोचायचे, असे केलेले आहे.
आताशा मात्र गर्दीमुळे आपण कुठून इथे आलो असे होते. त्या दृष्टीनी आमची पिढी भाग्यवान म्हणावी लागेल.
आम्ही अलिकडे उदयपूर वगैरेला गेलो होतो तो काळ लॉकडाउन लागण्याच्या थोडेसेच दिवस आधीचा होता. परदेशातून पर्यटक येण्याचे थांबलेले होते आणि मोठमोठ्या हॉटेलांची आरक्षणे रद्द झालेली होती. सर्वत्र अनिश्चिततेचे सावट पसरलेले होते. परंतु त्यामुळे आम्हाला एरव्ही गर्दीने भरलेल्या जागा, राणकपूर, कुंभलगड वगैरे जवळजवळ निर्मनुष्य असलेले सावकाशीने फिरता आले. असो.
या सुंदर लेखमालेबद्दल अनेक आभार.
28 Dec 2022 - 4:00 pm | श्वेता२४
आपला विस्तृत प्रतिसाद माझ्यासाठी प्रोत्साहन देणारा आहे. मनःपूर्वक धन्यवाद.
29 Dec 2022 - 1:59 am | चित्रगुप्त
तुम्ही दिलेल्या फोटोंपैकी काही थोडीशी काटछाट करून टाकले असते तर बरे झाले असते असे वाटले. उदाहरणार्थ :
मूळ फोटो:
29 Dec 2022 - 11:09 am | श्वेता२४
पुढच्यावेळी यात सुधारणा करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद
29 Dec 2022 - 10:42 pm | MipaPremiYogesh
खूपच अप्रतिम वर्णन आणि माहिती. छान झालेली दिसते आहे ट्रिप. पूर्ण iternary देऊ शकता का
30 Dec 2022 - 3:30 pm | श्वेता२४
iternary
उदयपूर
दिवस १ - १)जगदीश मंदीर 2)सिटी पॅलेस 3)लेक पिचोला बोट राईड किंवा ४)करणी माता मंदीर (५ च्या सुमारास वर जावे व सूर्यास्त आवर्जून पहावा. रोप वे आहे.)
दिवस २ - १)सहेलियोंकी बाडी २) मोती मगरी 3)फतेहसागर लेक 4)बगोर की हवेली शो (चूकवू नये)
दिवस ३ - 1)कुंभलगड २) हल्दीघाटी-राणा प्रताप म्युजिअम, चेतक घोडा समाधी व रक्ततलाई(ऑप्शनल) ३) सहस्त्रबाहु मंदीर (मस्ट आहे. २ तास काढून जावे) 4)एकलिंगजी मंदीर (सर्वात शेवटी करावा.) उदयपूर परत
दिवस ४ - उदयपूर-चितौडगड (बस/कारने जावे) चित्तौडगड - राणा कुंभ महाल,कुंभ श्याम मंदीर, मीरा मंदीर, त्रिमूर्ती मंदीर, गोमूख तीर्थ, जोहर स्थळ, विजय स्तंभ, कालिका मंदीर, किर्ती स्तंभ, जैन मंदीर, फतेह प्रकाश पॅलेस व सायंकाळी लाईट ऑन्ड साऊंड शो. चितौडगडवरुन रात्री ट्रेनने मुंबईला परत.
येथे दिवस ३ ला उदयपूरला परत येण्याऐवजी कुंंभलगड येथे मुक्कामही करु शकता. संध्याकाळी तेथेही लाईट ऑन्ड साऊंड शो असतो. शिवाय जीप सफारीही आहे. परंतू तेथील जंगलात फार काही पाहण्यासारखे नाही. त्यामुळे आम्ही तो ऑप्शन गाळला.
16 Jan 2023 - 3:58 pm | श्वेता व्यास
छान ट्रिप झाली आहे, आणि आमचीसुद्धा छान सफर घडवून आणलीत. :)
लेखमाला माहितीपर आणि अशी ट्रिप करू इच्छिणाऱ्यांना मार्गदर्शनपर झाली आहे.
16 Jan 2023 - 5:03 pm | श्वेता२४
तुम्ही सर्वच भागांवर आवर्जून प्रतिसाद दिले आहेत. त्याबद्दल धन्यवाद.
18 Jan 2023 - 1:43 pm | चंद्रसूर्यकुमार
सुंदर फोटो आणि प्रवासवर्णन. चित्तोडगडवर काही काही जागा बघून मात्र मन अगदी विषण्ण होते. त्यातील सगळ्यात महत्वाची जागा म्हणजे ज्या मैदानात राजपूत स्त्रियांनी तीन वेळा जोहार केला ते मैदान. आणि दुसरे म्हणजे चित्तोडगडवर काही मंदिरांमध्ये प्रवेश मिळत नाही. तिथे आसपासही फिरकू देत नाहीत. त्याचे कारण म्हणजे आक्रमकांनी तिथल्या मंदिरातील मूर्ती आणि इतर गोष्टींचा विध्वंस केला आहे. इतिहासाची आवड असलेलेल्या कोणालाही ते ऐकून अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही. संत मीराबाई ज्या कृष्णाच्या मंदिरात जाऊन कृष्णाची पूजा करायची तिथे जाणेही एक वेगळाच अनुभव असतो.
उदयपूरमध्ये आणखी एक ठिकाण बघितले होते. ते होते जुन्या गाड्यांचे संग्रहालय (Vintage and Classic Car Museum). मला एक तर गाड्यांमधले काही समजत नाही आणि फार आवडही नाही. तिकडच्या २० जुन्या गाड्या बघण्यासाठी ४ वर्षांपूर्वी तब्बल साडेतीनशे रूपये तिकिट होते. तिथे उगीच गेलो असे झाले. आतल्या गाड्यांचे फोटो गुगल मॅप्समध्येही बघायला मिळतात. तेच वर ३५० (आता कदाचित जास्तही) देऊन बघायची काहीच गरज नाही.
25 Feb 2023 - 2:14 am | पर्णिका
लेखमाला फारच छान झाली, फोटोही सुरेख आहेत.
उदयपूर करावेच लागेल आता... 😉
'ट्रॅडीशनल खाना' च्या रेकोबद्दल खूप धन्यवाद !